मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|सिध्दान्तबोध|
अध्याय १४ वा

श्रीसिध्दान्तबोध - अध्याय १४ वा

‘श्रीसिध्दान्तबोध’ हा संतकवि श्रीशहामुनि यांचा ग्रंथ म्हणजे मराठी वाड्मयाच्या खाणींतील एक तेजस्वी हिरा आहे.


श्रीगणाधिपतये नम: ॥ श्रीगुरुभ्यो नम: ॥
देवा अगाध तुझी थोरी ॥ नेणों म्हणती वेद चारी ॥ तेथें बुध्दीची कुसरी ॥ काय माझी तकेंल ॥१॥
ब्रह्मादिकांचें ध्यानीं ॥ लक्षितां नये शार्ड्गपाणी ॥ तो माझिया अंत:करणीं ॥ केवीं बिंबे जगदीश ॥२॥
आपुल्या सहस्त्रमुखांची थोरी ॥ वर्णितां भागला खगारी ॥ तो माझिया वैखरीं ॥ काय स्तवितां पुरेल ॥३॥
क्षीरसिंधु ज्याचे चरणीं ॥ मेघ गृहीं वाहे पाणी ॥ तेथें म्या चुळकाभरी घेवोनी ॥ काय घालूं देवाला ॥४॥
नवलक्ष तारागण ॥ पुष्पें वाहती सुरगण ॥ म्यां घेऊनि तुळसीपान ॥ कोणे ठायीं ठेवावें ॥५॥
गगानायेवढें अंबर ॥ कटीस न पुरे एक फेर ॥ तयासी फडकें वीतभर ॥ कोणे ठायीं नेसवूं ॥६॥
चंद्रसूर्यासारिखी ज्योती ॥ अखंड जळे प्रकाशदीप्ती ॥ तेथें माझी काडवाती ॥ काय उजेड पडेल ॥७॥
ब्रह्मांडायेवढें देउळ ॥ मायेनें रचिलें विशाल ॥ मी मातीचा करोनि चिखल ॥ कोठें घालूं देव्हारा ॥८॥
मंडप देऊनि आकाश ॥ उभा केला धरोनि पैस ॥ चौहाताच्या चांदव्यास ॥ कोणें स्थलीं ताणावें ॥९॥
आयाम गगनांत ॥ वाजे घंटा विश्व ऐकत ॥ माझी घांटी गृहांत ॥ ऐकों न ये कवणासी ॥१०॥
यापरी माझी किंमत ॥ काय स्वामीस द्यावें उचित ॥ ऐसें जाणोनि निवांत ॥ नाम मात्र आठवीं ॥११॥
बहुतां जनांचें बोलणें ॥ सर्व करावें कृष्णार्पण ॥ विचारावें विवेकज्ञान ॥ आपुली वस्तु कोण तें ॥१२॥
करावे देह अर्पण ॥ हें तों पंचभूतांचें जाण ॥ ते प्रकृति आधीन ॥ चालवी तैसें चालत ॥१३॥
कान डोळे आपुले म्हणविती ॥ तरी कां अंधबधिर होती ॥ पाय पांगुळ दंत पडती ॥ धरितां उपाय चालेना ॥१४॥
रोग होय पोटांत ॥ वैद्यालागीं दाविती हात ॥ ज्याचे त्यास नाहीं कळत ॥ येवढी भ्रमणा देहाची ॥१५॥
मुळीं देहची नव्हे आपुले ॥ मग कृष्णार्पण काय केलें ॥ वस्त्रें द्रव्य दारा मुलें ॥ हे तो मायिक जाणावीं ॥१६॥
वस्त्रदान द्रव्यदान ॥ त्याहोनि श्रेष्ठ अन्नदान ॥ हेंही पृथ्वीपासोनि ॥ त्याचा कर्ता ईश्वर ॥१७॥
आधीं विचारोनि पाहावें ॥ मग कृष्णार्पण करावें ॥ हें नाणितां अनुभवें ॥ केली खटपट ते वृथा ॥१८॥
आपण देह कीं देहा वेगळा ॥ त्याचा विचार नाहीं केला ॥ तंववरी वांयाचि गलबला ॥ बोलूनि काय सार्थक ॥१९॥
आतां असोत हे बोल ॥ अनुभवें दिसती अवघे फोल ॥ या लागीं ज्ञान प्रांजळ ॥ गुरुकृपेचें असावें ॥२०॥
या ग्रंथाचा अनुभव ॥ दाविता श्रीगुरुदत्तदेव ॥ येर्‍हवीं मी तव मानव ॥ यातीनें ही अविंध ॥२१॥
नाहीं पुराण श्रवण ॥ घोकिलें नाहीं व्याकरण ॥ येथें गुरुकृपाप्रमाण ॥ जाणा तुम्हीं श्रोते हो ॥२२॥
आतां समस्तांसी दंडवत ॥ ग्रंथ ऐका सावचित ॥ ऋषिभाषणांचे शब्दार्थ ॥ परिसवीन आवडीं ॥२३॥
मागील अध्यायीं निरुपण ॥ सांगितला विराट्‍ पुरुष विस्तीर्ण ॥ तयावरी एक ऋषीन ॥ निरसूनि स्तविलें निर्गुणा ॥२४॥
तयावरी आणिक बोलिला ॥ पृथ्वीचा महिमा सांगितला ॥ तंव आणिक एक उचंबळला ॥ तेणें स्तविलें पाण्यासी ॥२५॥
इतुकी जाहली मागें कथा ॥ मागेल अध्यायीं वदे वक्ता ॥ तंव आणिक ऋषीच्या मता ॥ आलें तेंचि बोलतों ॥२६॥
समस्त बैसलें महापुरुष ॥ श्रवण करिती सावकाश ॥ एक बोले इतिहास ॥ ऐका म्हणे सिध्द हो ॥२७॥
ईश्वर म्हणतां पाण्यालागून ॥ तें अगस्तीनें केलें प्राशन ॥ मूत्रद्वारें टाकून ॥ क्षार केला समुद्र ॥२८॥
पाहतां जन सकळ ॥ अपानद्वारें धुती मळ ॥ तो ईश्वर केवळ ॥ कैसा वाचे म्हणावा ॥२९॥
ऐका पाण्याचा गुण ॥ अतिशय पडतां पर्जन्य ॥ निंदू लागे विश्वजन ॥ चिळस वाटे सर्वांसी ॥३०॥
तैसा नव्हे परमात्मा ॥ जयाची तेजस्वी प्रतिमा ॥ तयाचा सांगेन महिमा ॥ श्रवण करा मुनि हो ॥३१॥
जयासी म्हणावें ईश्वर ॥ तो अग्नि ओळखावा साचार ॥ मुख्य देव निराकार ॥ गुणातीत जाणावा ॥३२॥
पाहतां अग्नींचें तेज ॥ सर्वप्रकाशाचें बीज ॥ विश्वजठरीं गौप्य गुज ॥ चालवी कार्य कारण ॥३३॥
पोटांतून गेलिया अनल ॥ देह होय ओला चिखल ॥ हातपाय पडती शीतळ ॥ लोक म्हणती जीव गेला ॥३४॥
मनुष्य भक्षी अन्नास ॥ त्याचा पचवोनि करी रस ॥ तेणें सर्व शरीरास ॥ तृप्ति होय जाणावें ॥३५॥
अग्नि वसे नेत्रांत ॥ म्हणोनि दिसती सर्व पदार्थ ॥ तेज गेलिया अंध होत ॥ शून्य दिसे दशदिशां ॥३६॥
चंद्र सूर्य तारागण ॥ तेजें प्रकाशती पूर्ण ॥ तयांच्या उजेडें सर्व जन ॥ करिती सर्व व्यापार ॥३७॥
प्रत्यक्ष सूर्यनारायण ॥ ऐसें वदे वेदवचन ॥ अर्ध्य देती ब्राह्मण ॥ प्रात:काळीं भानूस ॥३८॥
प्राणापान धरुनी अंगीं ॥ लक्ष लाविती सिध्द योगी ॥ आराधिती सूर्यालागीं ॥ सत्य ईश्वर जाणोनी ॥३९॥
भानुसारिखा सांडोनि देव ॥ पाषाण पूजिती मूढ मानव ॥ जाणते पुरुष धरुनि भाव ॥ सदा पूजिती रवीसी ॥४०॥
राजेलोक महायज्ञ ॥ अग्निमुखीं करिती हवन ॥ नित्य वैश्वदेव करिती जाण ॥ तृप्ति होय देवांसी ॥४१॥
जे निराकार ज्योत ॥ तोचि अग्नि मूर्तिमंत ॥ तेज दिसे लखलखित ॥ जाळूं शके ब्रह्मांड ॥४२॥
अग्निपासोनि विश्व जाहलें ॥ प्रळय होतां अग्नीनें जळे ॥ यालागीं महाकाळें ॥ अग्नि सिध्दची बोलिजे ॥४३॥
विश्वामध्यें ज्योती ॥ आत्मरुपें गा वर्तती ॥ मुद्रा लावूनि ज्ञानी पाहती ॥ प्रकाश पडे सर्वही ॥४४॥
ज्योतिर्मय ब्रह्मपूर्ण ॥ ऐसीं बोलती पुराणें जाण ॥ यालागीं मुक्त भगवान ॥ अग्नि ब्रह्म साचार ॥४५॥
सांडोनि अग्नीची सेवा ॥ जे भजती अन्य देवां ॥ ते जाती आडमार्गे रौरवा ॥ मोक्षमार्ग चुकोनि ॥४६॥
मोक्षाचें हेंचि फळ ॥ मुख्य भजावा आधीं अनळ ॥ ऐसा ऋषि प्रांजळ ॥ ज्ञान आपुलें बोलिला ॥४७॥
तयाचें ऐकोनि वचन ॥ दुसरा उठला दांत चावोन ॥ म्हणे हेंचि तुमचें ज्ञान ॥ कळों आलें आम्हांसी ॥४८॥
चुकलां आत्मसुखाची गोडी ॥ मांडतां प्रपंच्याची परवडी ॥ करी सृष्टीचा घडमोडी ॥ त्यासी कैसें विसरलां ॥४९॥
अग्नि म्हणतां ईश्वर ॥ याचा करावा विचार ॥ भृगुआश्रमीं राक्षस क्रूर ॥ अकस्मात पातला ॥५०॥
भृगु गेला वनांत ॥ स्त्री ठेवूनी गुंफेंत ॥ द्वारीं होमकुंडांत ॥ अग्नि होता प्रत्यक्ष ॥५१॥
अग्नीस म्हणे निशाचर ॥ भृगूची वनिता सुंदर ॥ इच्या बापें साचार ॥ आधीं मातें वोपिली ॥५२॥
त्याची साक्ष तूं सत्य ॥ बोल पुरुषा यथार्थ ॥ होय म्हणां अनळ सत्य ॥ राक्षस घेऊनि पळाला ॥५३॥
यावरी भृगुऋषी ॥ सवेंचि पातला आश्रमासी ॥ भ्रंश चाहला गुंफेसी ॥ वनिता कोठें दिसेना ॥५४॥
द्वारीं होता हुताशन ॥ त्यासी पुसिलें वर्तमान ॥ तो म्हणे ऐका वचन ॥ सांगतों मी मुनींद्रा ॥५५॥
तुम्ही नव्हतां गुंफेसी ॥ राक्षस आला पापराशी ॥ साक्षी पुसली आम्हांसी ॥ कृत्रिम भाव धरुनी ॥५६॥
म्यां यथार्थ सांगतां ॥ घेऊनि पळाला तुमची वनिता ॥ ऐसें ऋषीनें ऐकतां ॥ क्रोधें आपटी जटेसी ॥५७॥
म्हणे अरे क्रियाभ्रष्टा ॥ सर्वभक्षका महानष्टा ॥ तुझिया बोलानें दुष्टा ॥ नेली अंगना राक्षसें ॥५८॥
सत्य बोलतां घडे पतन ॥ तेंचि जाणा त्यास दूषण ॥ असत्य बोलता वांचे प्राण ॥ दूषण त्यांतें असेना ॥५९॥
अग्नीस ईश्वर कैसें म्हणणें ॥ ऋषीनें शापिला दारुण ॥ त्या दिवसापासोन ॥ सर्वभक्षक जाहला ॥६०॥
जो ऋषीनें शापिला ॥ तो ईश्वर कैसा जाहला ॥ त्याचा अनुभव घेतला ॥ कवण्या ज्ञानें सांगपां ॥६१॥
चंद्र सूर्य ईश्वर ॥ अग्नीचा अंश निर्धार ॥ ग्रहण पीडा वारंवार ॥ प्रत्यक्ष लोक देखती ॥६२॥
अग्नि जाळी विश्वा पोळी ॥ तो केवीं होय वनमाळी ॥ म्हणोनि तुमची बोली ॥ मातें कांहीं रुचेना ॥६३॥
मुख्य कोण ईश्वर ॥ तो मी सांगतों साचार ॥ परिसतां तुमचें अंतर ॥ होय सोज्वळ स्वरुपीं ॥६४॥
वायु ऐसा त्रिभुवनीं ॥ सांग कोणी प्रतापखाणी ॥ ज्याची गुप्त प्रगट करणी ॥ नकळे कळा कोणासी ॥६५॥
वायुस्वरुपें देव राहती ॥ भुचर खेचर विचरती ॥ नाना मंत्रांच्या शक्ति ॥ वायुरुपें असती कीं ॥६६॥
वायूस नाहीं आकार ॥ पाहतां दिसे निर्विकार ॥ सकळ सृष्टीचा उभार ॥ वायुमुळें होतसे ॥६७॥
वायुस म्हणावें महामाया ॥ वायु जाणिजे चतुर्थ तुर्या ॥ शरीरीं जे प्राणक्रिया ॥ तोही वायु जाणावा ॥६८॥
वायुसारिखी पाहीं ॥ दूसरी वस्तु चालक नाहीं ॥ याचा प्रत्ययो पाहीं ॥ परस्परें येतसे ॥६९॥
सर्वभक्षक एक वायु ॥ सर्वांतरीं एक वायु ॥ सर्वरक्षक एक वायु ॥ सर्वांश्रीत वायूची ॥७०॥
वायु तारी वायु मारी ॥ अगाध वायूची थोरी ॥ पिंडब्रह्मांडांभीतरीं ॥ सत्ता एक वायूची ॥७१॥
वायु होतां चंचळ ॥ माया होतसे ढिसाळ ॥ तोचि जाहलिया निश्चळ ॥ निर्गुण आत्मा बोलिजे ॥७२॥
चंद्र सूर्य तारागण ॥ वायुचक्रीं भ्रमती जाण ॥ अनेक योगांचें साधन ॥ वायुमुळें होतसें ॥७३॥
बहु मंत्रांचें खेळ ॥ वायूनेंच होय सकळ ॥ भूतपिशाच वेताळ ॥ वायुमुळें झडपती ॥७४॥
प्रदीप्त करावया अनळ ॥ वायु फुंकितां होय प्रबळ ॥ अग्नीचे सामर्थ्य विशाळ ॥ वायुमुळें असें कीं ॥७५॥
वायु फुंकितां दीप लागती ॥ वायु झडपितां विझे वाती ॥ वायुमुळें सर्वशक्ती ॥ चढे बळ अंगासी ॥७६॥
वायुसकळांचा प्राण ॥ वायु जनीं जनार्दन ॥ वायु अवघा नारायण ॥ सत्य ईश्वर निर्धारें ॥७७॥
जळ तेंही अचेतन ॥ त्यासी वायु चाळवी जाण ॥ वाहती सरिता विस्तीर्ण ॥ वायुबळें घळघळां ॥७८॥
वोहटे समुद्र चढे भरती ॥ विशाळ लाटा उसळती ॥ पाण्यावरती जहाजें चालती ॥ हें तों करणीं वायूची ॥७९॥
मोट बांधोनि पाण्याची ॥ आकाशांत हिंडवी वायूची ॥ वृष्टि करी पर्जन्याची ॥ धान्य पिके त्यामुळें ॥८०॥
आभाळ दाटे वोसर ॥ हा तो वायूचा चमत्कार ॥ धरेलागीं आधार ॥ वायूचाची जाणिजे ॥८१॥
नाना रोगांचें बंबाळ ॥ वायुमुळें होती प्रबळ ॥ वायूनें तिडका पोटशूळ ॥ उठती नळ पाठीसी ॥८२॥
डोकें आणि कान ॥ वायुमुळें करिती कणकण ॥ अंग तोंडा जांभयी जाण ॥ वायुमुळें होतसे ॥८३॥
उचकी आणि ढेंकर ॥ होय शिंका शेंबुड पाझर ॥ हालती पापण्या पाद कर ॥ वायुमुळे वोळखावें ॥८४॥
दमा खोकला लागती ॥ हातपाय पांगुळ होती ॥ बुध्दि चळोन भकों लागती ॥ हे तो गति वायूची ॥८५॥
शरीरी प्रंचप्राण ॥ हाचि तो वायू जाण ॥ याची नांवें भिन्न भिन्न ॥ परिस तेंही सांगतों ॥८६॥
उदान वसे कंठीं ॥ तो अन्नपाणी घोटी ॥ भरती करोनि पोटी ॥ ढेंकर देयी तृप्तीचा ॥८७॥
प्राण वसे हृदयांत नासिकद्वारें भाते फुंकित ॥ तेणें जठराग्नि चेतत ॥ होय रस अन्नाचा ॥८८॥
त्या रसाचा करुनि पाट ॥ व्यान लावी नाडीवाट ॥ सर्वांगीं रोम उमट ॥ टवटवीत रसानें ॥८९॥
रस पोंहचे सर्वांगास ॥ मग राहे तो बाकस ॥ अधोद्वारें अपान त्यास ॥ लोटोनि घाली बाहेर ॥९०॥
समान नाभिस्थानी बैसोनी ॥ सर्व संधि पैस करोनी ॥ जो हातांपायां लागोनी ॥ हालवी सूत्र धरोनी ॥९१॥
वायु गांठ काखेंत ॥ ते सुटतां निर्जीव होत ॥ लुंजत होऊनि लोंबत ॥ लोक म्हणती गेला वारा ॥९२॥
याचिपरी जाण ॥ गुडघ्यांत वायूचें बंधन ॥ तो दु:खी होतसे ॥९४॥
जेथें वायूचा चळ जाहला ॥ त्याचजागीं शून्य पडिला ॥ बधिर आणि मुका जाहला ॥ वायुस्तंभन होतांची ॥९५॥
कानीं एके डोळां देखे ॥ मुखें बोले रस चाखे ॥ नाचे हांसे गाय हरिखें ॥ हा तो खेळ वायूचा ॥९६॥
शरीरांतून वायु निघाला ॥ लोक म्हणती जीव गेला ॥ कोठें श्वास नाहीं उरला ॥ रडो लागलें कुटुंब ॥९७॥
कांहीं धुकधुकीं असतां घर ॥ म्हणती नका होऊं घाबिर चांचपती अंग पाय कर ॥ उष्ण किंवा शीतळ ॥९८॥
चैतन्य आणि चेतना ॥ वायूसचि म्हणावें जाणा ॥ त्रिगुण त्रिपुटीच्या खुणा ॥ वायुच जगीं बोलिजे ॥९९॥
जीव आणि शिव ॥ तोही वायूचाचि भाव ॥ यालागीं मुख्य देव ॥ वायु सत्य असे कीं ॥१००॥
देवाचे सत्तेवांचून ॥ झाडाचें पान न हाले जाण ॥ तरी वायुवेगळें कोण ॥ हालवी सांगा वृक्षासी ॥१॥
जो आपुलें अंतरीं ॥ तोचि विश्वाचें शरीरीं ॥ पशुपक्षीयां माझारी ॥ वायु एकचि विचरे कीं ॥२॥
वायु घरीं बाहेरी ॥ पिंडब्रह्मांडाभीतरीं ॥ चौखाणींची दोरी ॥ वायु वेगळी चळेना ॥३॥
अगाध वायूचा महिमा ॥ सांगतां नये मुनि उत्तमा ॥ भरला असे अपार व्योमा ॥ कोठें अंत लागेना ॥४॥
विश्वाचें सूत्र वायू हाती ॥ म्हणोनि सूत्रधारी म्हणती ॥ कैवल्यदानी मोक्षपती ॥ वायू एक परमात्मा ॥५॥
बहु सूक्ष्म आणि स्थूल ॥ एक वायुचि विशाळ ॥ बहु चंचळ होय निश्चळ ॥ कळा एका वायूची ॥६॥
ज्याचें चरणाविण चालणें ॥ तिहीं लोकीं फिरणें ॥ वाचे वांचोनी बोलणें ॥ करांविण घडमोडी ॥७॥
सकळ सृष्टीसी प्रळयकर्ता ॥ एक वायुचि तत्त्वतां ॥ पुन्हां रचावयाची अवस्था ॥ धरिता एक वायूची ॥८॥
वायु कोपल्या झाडें मोडती ॥ ब्रह्मांडें खचोनियां जाती ॥ घाली पृथ्वी पालथी ॥ येवढी शक्ति वायूची ॥९॥
ब्रह्मा आणि हरिहर ॥ तेही वायुचे अवतार ॥ दिसे जितुकें चराचर ॥ वायुरुपें संचरे ॥११०॥
यापरी ऋषी वायूची ॥ महिमा वदला बहुतची ॥ ते परिसोनी मने मुनींचीं ॥ उल्लासती बोलावया ॥११॥
समुदाव बैसला ऋषींचा ॥ जया उदीम असे चर्चेचा ॥ भांडवल जोडिती ब्रह्मज्ञानाचा ॥ निष्ठा धरुनी ईश्वरीं ॥१२॥
ईश्वरप्राप्तीकारणें ॥ केलीं तपें सुकृताप्रमाणें ॥ तयासारिखीं बोलती ज्ञानें ॥ झाडा देती सर्वही ॥१३॥
वायूचा महिमा गहन ॥ ऋषीनें सांगितला सीमा करुन ॥ तें परिसोनि वचन ॥ उत्तर वदे दूसरा ॥१४॥
अहो ऐका विवेकमती ॥ आत्मा बोलिजे निश्चळस्थिती ॥ याविषयीं वेदश्रुती ॥ प्रमाण करोनि बोलिला ॥१५॥
वायु असे चंचळ ॥ परमात्मा तो निश्चळ ॥ सूर्य आणि खद्योतबाळ ॥ समता केवीं तेजाची ॥१६॥
उंच वाढलें वारुळटेके ॥ तरी काय मेरुसमान तुके ॥ याविषयीं विवेक ॥ पुरता करा चतुरहो ॥१७॥
मुख्य देव तो आकाश ॥ पसरलासे पैस ॥ ब्रह्म म्हणावें तयास ॥ निश्चयात्मक जाण पां ॥१८॥
आकाशा नाहीं जाणें येणें ॥ सबाह्य अंतरीं पूर्ण ॥ निरामय निराकार गगन ॥ मायातीत सद्वस्तु ॥१९॥
आकाश जाळितां जळेना ॥ प्रळयवायूने उडेना ॥ जलवृष्टि होतां भिजेना ॥ सर्वातीत असे कीं ॥१२०॥
विटेना जिरेना सदास्थिर ॥ चळेना ढळेना अंबर ॥ तुटेना फुटेना गहन गंभीर ॥ परात्पर आकाशची ॥२१॥
असोन सर्वांत वेगळा ॥ ऐसी कवणाची सांगा कळा ॥ वायु ईश्वर म्हणितला ॥ त्याचे गुण ऐकावे ॥२२॥
निद्रा लागतां जीवासी ॥ तस्कर नेती वस्त्रासी ॥ हृदयीं असतां प्राणासी ॥ ठाउकें कैसें होईना ॥२३॥
वायुचि आत्मा म्हणितला ॥ तरी अज्ञानदशा कां तयाला ॥ सुखदु:खातें वेष्टिला ॥ भोगी यातना देहाची ॥२४॥
वायूमध्यें नाना रोग ॥ पीडा पावे सकळ जग ॥ ऐसें असताम तो श्रीरंग ॥ कैसा बोलतां विवेकी ॥२५॥
आतां परिसा एकचित्त ॥ तुम्हां सांगतों यथार्थ ॥ जैसें असेल तैसें तथ्य ॥ सत्य बोलतों सिध्दची ॥२६॥
आकाशायेवढी सांठवण ॥ दुसरी वस्तु सांगा कवण ॥ उंच तरी त्या प्रमाण ॥ कांही एक दिसेना ॥२७॥
निश्चयात्मक खंब्रह्म ॥ ऐसा श्रुति बोलती वर्म ॥ उपाधिरहित व्योम ॥ ईश्वर कांहो न म्हणावा ॥२८॥
आकाशापरतें कांहीं ॥ बोलावया दुसरें नाहीं ॥ यालागीं मुख्य पाहीं ॥ आकाश ब्रह्म साचार ॥२९॥
ब्रह्मांड आकाशांत सांठवे ॥ शेखीं आकाशापोटीं उद्भवे ॥ हें तो जाणा अनुभवें ॥ सज्ञान तुम्ही चतुर हो ॥१३०॥
वायूंत असोन चळेना ॥ अग्नींत असतां जळेना ॥ पाण्यांत असोन भिजेना ॥ एवढी कळा नभाची ॥३१॥
पाहतां आकाशाचा आकार ॥ कोणता प्रकार सांगा चतुर ॥ यालागीं गा निर्विकार ॥ आकाश होय सत्यची ॥३३॥
आकाश होतें निश्चळ ॥ तेंचि ब्रह्म केवळ ॥ तया निश्चळीं जें चंचळ ॥ वायु त्यास म्हणावें ॥३४॥
निश्चळ तें ब्रह्म पूर्ण ॥ चंचल ते माया जाण ॥ ती प्रसवली त्रिगुण ॥ ब्रह्मा विष्णु महेश्वर ॥३५॥
वायूची पडल्या कातर ॥ तोचि जाहला वैश्वानर ॥ तयास म्हणावें श्रीशंकर ॥ तमोगुणें जाणपां ॥३६॥
वायूपोटीं अग्नि जाहला ॥ उष्णदशेतें पावला ॥ म्हणोनि तमोगुण त्याला ॥ बोलती शास्त्र सिध्दांत ॥३७॥
अग्नि द्रवतां पाणि जाहलें ॥ म्हणोनि सत्वगुण बोलिलें ॥ तें शीतळ दशेतें पावलें ॥ विष्णु नाम ठेवूनी ॥३८॥
पाण्याची निघाली मळी ॥ तयाची गोठूनि पृथ्वी जाहली ॥ तो ब्रह्मा ही बोली ॥ रजोगुणें जाणपां ॥३९॥
पृथ्वीवांचोनि पाहीं ॥ काहीं निर्माण होणार नाहीं ॥ म्हणोनि ब्रह्मा पाहीं ॥ सृष्टिकर्ता बोलिजे ॥१४०॥
सकळांचें जीवन पाणी ॥ पाण्यावांचोनि मरत प्राणी ॥ यालागीं संरक्षणीं ॥ विष्णु साच जाणावें ॥४१॥
अग्निवांचोनि संहार ॥ कैसा होईल साचार ॥ म्हणोनि तो शंकर ॥ संहारकर्ता सर्वांसी ॥४२॥
आकाश तें ब्रह्म पूर्ण ॥ वायु ते माया जाण ॥ तेज तें गौरीरमण ॥ आप विष्णु वोळखावा ॥४३॥
मही ते चतुरानन ॥ यापरी पंच भूत त्रिगुण ॥ सविस्तर तुह्मांलागुन ॥ गुह्य फोडोनी दाविलें ॥४४॥
आकाशास कर्तव्यता नाहीं ॥ सर्व कळा वायूच्या ठायीं ॥ यालागीं माया पाहीं ॥ वायूसीच म्हणावें ॥४५॥
मायाचाळक विश्वालागुनी ॥ ऐसें बोलती पुराणीं ॥ तरी वायूवांचूनि करणी ॥ दुजियाची दिसेना ॥४६॥
निश्चळ तें ब्रह्म गगन ॥ माया ते वायु जाण ॥ तेज आप धरे लागुन ॥ हरि हर ब्रह्मा बोलिजे ॥४७॥
ब्रह्म माया त्रिगुण ॥ पंचभूतांत घ्या वोळखोन ॥ हे नेणोनियां अज्ञान ॥ व्यर्थ संदेही लोटला ॥४८॥
पांचांवेगळें कांहीं ॥ पाहावया आणिक नाहीं ॥ म्हणोनि मुख्य पाहीं ॥ पंचभूतात्मक ईश्वर ॥४९॥
हें उघडें दिसतें डोळां ॥ पांचावेगळा कोण बोला ॥ ऐसें समस्त सिध्दांला ॥ ऋषि ज्ञान बोलिला ॥१५०॥
हें परिसोनि समस्तीं ॥ उत्तर करिती पुढती ॥ त्यांच्या ज्ञानाची मती ॥ श्रोते तुम्हां सांगेन ॥५१॥
अहो ऐका ग्रंथ प्रांजळ ॥ होय विवेकाचा सुकाळ ॥ जोडीन अक्षरें सुढाळ ॥ गोड जेवीं पीयूष ॥५२॥
अमृताची चवी फिकी ॥ ऐसी बोली वदेन रसिकी ॥ जें ऐकोनियां विवेकी ॥ धन्य म्हणती वक्तया ॥५३॥
आधींच संदेह न धरावा ॥ समग्र ग्रंथ परिसावा ॥ सारवस्तु स्वभावा ॥ दिसों येईल भाविकां ॥५४॥
पूर्वजन्मीं पुण्य केलें ॥ त्याचें यश फळासी आलें ॥ म्हणोनि अनुभवाचे डोळे ॥ प्राप्त जाहले भाग्यानें ॥५५॥
देव असोनि सहकारी ॥ भीक मागोनि पोट भरी ॥ हे तो दैवाची थोरी ॥ दिसों येतसे लोकांसी ॥५६॥
गुप्त भाग्य देवदत्त ॥ नगारा वाजवी जगांत ॥ कीर्ति वाढे विश्वांत ॥ साधु साधु म्हणोनी ॥५७॥
सांपडे मोहरांची घागर ॥ सांडी कवडयांचा व्यवहार ॥ तेवीं जोडतां परमेश्वर ॥ संसार त्यागिती सज्जन ॥५८॥
तुच्छ म्हणती इंद्रलोक ॥ ते काय मानिती राज्यसुख ॥ जन्मोजन्मीं ब्रह्ममुख ॥ भोगितां सरेना कल्पांतीं ॥५९॥
प्राप्त जाहला भगवंत ॥ संसारातें मारी लात ॥ विपरीत अज्ञानां वाटत ॥ म्हणोनि करिती हेळणां ॥१६०॥
आतां निंदो कीं वंदो जन ॥ आम्हास तों अवघे समान ॥ हेचि श्रीगुरुची आज्ञा पूर्ण ॥ जीवीं धरोनि राहिलों ॥६१॥
आतां जीवींच्या जीवना ॥ कुशळस्वामी नारायणा ॥ शहामुनि लागे चरणा ॥ हस्त ठेवा मस्तकीं ॥१६२॥
इति श्रीसिध्दांतबोधग्रंथे अध्यात्मनिरुपणतत्वसार निर्णये चतुर्दशोध्याय: अध्याय ॥१४॥ ओंव्या ॥१६२ ॥

N/A

References : N/A
Last Updated : September 23, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP