मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|सिध्दान्तबोध|
अध्याय १० वा

श्रीसिध्दान्तबोध - अध्याय १० वा

‘श्रीसिध्दान्तबोध’ हा संतकवि श्रीशहामुनि यांचा ग्रंथ म्हणजे मराठी वाड्मयाच्या खाणींतील एक तेजस्वी हिरा आहे.


श्रीगणेशाय नम: ॥
श्रीगुरुदत्तचरण ॥ वंदीतसे भावें करुन ॥ लक्ष्मीकांता हृदयीं स्मरोन ॥ ग्रंथ लिहितों बोध हा ॥१॥
सिध्दांतबोध हा ग्रंथ ॥ वाचितां ज्ञान होईल सत्य ॥ चौर्‍यायशीचे आवर्त ॥ चुकती सत्य त्रिवाचा ॥२॥
वासुदेवा नारायणा ॥ जगज्जीवना परब्रह्मा ॥ देवकीनंदना बाळकृष्णा ॥ करिसी क्रीडा गोकुळीं ॥३॥
इटीदांडू लंगोरी ॥ गोटी चेंडू हुतुतू करी ॥ सुरस पारंबिया वृक्षावरी ॥ घालिसी हुंबली हमामा ॥४॥
पानकोंबडा लपनडाई ॥ वळल्या करिसी चारिसी गाई ॥ खासी चोरिसी दुग्धसाई ॥ हस्त पुशीसी टिरीशी ॥५५॥
लुटलुट पळोनि पटपटां पडती ॥ गडबडा लोळोनि मृत्तिका उधळिती ॥ मांडी ठोकुनी झोंबी घेती ॥ होहो घालिती गोठणीं ॥६॥
एके दिवशीं वनमाळी ॥ नेटें वाजवी मुरली ॥ नाद ऐकोनि गोपी सकळी ॥ तन्मय जाहल्या मनांत ॥७॥
नाद पडतां कर्णद्वारीं ॥ प्रेम संचरलें शरीरीं ॥ विदेही होऊनि अंतरीं ॥ कृष्णाकडे धांवल्या ॥८॥
एके कानीं खोविलें मोतीं ॥ काजळ लावी नाकावरुती ॥ उघडीं थानें निरिया सांवरिती ॥ गृहाबाहेर निघाल्या ॥९॥
एकी वृषभास बाहला घालून ॥ वृषण पिळी दोहीं करानें ॥ म्हणे पाठीं घेतली कुसळीनें ॥ बंद केलें स्तनासी ॥१०॥
एवढें कृष्णें लाघव केलें ॥ नादें त्रिभुवन कोंदलें ॥ गाईस वाघ मैत्र जाहले ॥ वैराकार विसरोनी ॥११॥
ब्रह्मांड भरोनि नाद उरला ॥ तो विश्वहृदयीं सांठवला ॥ अनुहतध्वनी म्हणती त्याला ॥ ज्ञानी त्यासी ओळखती ॥१२॥
तोचि नाद माझिया कर्णी ॥ प्रवेशला गुरुमुखापासोनि ॥ तेणें कवितेची मांडणी ॥ प्रवाह चाले गंगेसी ॥१३॥
मागिल्या अध्यायीं ऋषीनें ॥ वर्णिलें कैलासभुवन ॥ सांगोनि चांगुणेचें महिमान ॥ शिवभक्ती दाविली ॥१४॥
बहु प्रेम भरोनि चितीं ॥ भावें स्मरतों गिरिजापती ॥ समस्त ऋषी लवण करिती ॥ नैमिषारण्यामाझारीं ॥१५॥
ऋषि म्हणे ऐका आतां ॥ शिवस्वामी सकळांचा दाता ॥ नामें उध्दरिलें जड पतितां ॥ तारक बिरुद त्या पायीं ॥१६॥
शिव शिव स्मरण ज्यासी ॥ निवारी कोटी विघ्नासी ॥ सनाथ करी अनाथासी ॥ दीनदयाळ महाराज ॥१७॥
जै त्रिपुर दैत्य माजला ॥ सकळदेवासी प्रळयो केला ॥ त्याशीं उपाय शिवें रचिला ॥ बहुत केला खटाटोप ॥१८॥
पृथ्वीचा रथ करोन ॥ चंद्रसूर्य चाकें सज्जून ॥ त्यास इंद्राचा कणा घालून ॥ जुंपिले वारु वायूचे ॥१९॥
वासुकीचा करोनि दोर ॥ रथ चालवी गिरिजावर ॥ विष्णूचा बाण केला चौधार ॥ धनुष्य सज्जिलें ब्रह्मयाचें ॥२०॥
यापरी करोनि साहित्य ॥ वधिला त्रिपुर दैत्य ॥ म्हणोनि त्रिपुरारी नांव सत्य ॥ उच्चारिती पुराणीं ॥२१॥
आणिक ऐका त्याची थोरी ॥ एकटा होता त्रिपुरारी ॥ मग अवलोकिलें भुजेवरी ॥ विष्णू तेथें जन्मला ॥२२॥
तेणें वाराणशी जाऊन ॥ मांडिलें उग्र अनुष्ठान ॥ साठी सहस्त्र वरुषें दारुण ॥ तपें तपला श्रीविष्णू ॥२३॥
आधींच पवित्र वाराणसी ॥ मेल्या पावती मुक्तीशीं ॥ दर्शनमात्रें पापराशीं ॥ दग्ध होती हा महिमा ॥२४॥
सुवर्ण आणि परिमळ ॥ तेवीं वाराणसीवर गंगाजळ ॥ स्नान करिता मोक्षफळ ॥ देत असे भाविकां ॥२५॥
आंगठीवरी हिरा जडित ॥ तेंवी काशींत मणिकर्णिका तीर्थ ॥ त्यासमान ऊर्वीवरी सत्य ॥ नसे बोलती पुराणें ॥२६॥
त्या मणिकर्णिकेचे स्थळीं ॥ तेथेंचि बैसला वनमाळी ॥ विशाळ धैर्याची महाफळी ॥ मेरु जैसा ढळेना ॥२७॥
देखोनियां तप अचाट ॥ सन्निध पातला नीलकंठ ॥ विष्णूस म्हणे तुज वैकुंठ ॥ अक्षयीं दीधलें नांदावया ॥२८॥
त्रैलोक्याचें वैभव गहन ॥ आजि वोपिलें तुजलागुन ॥ करीं सृष्टीचें संरक्षण ॥ सत्ता तूतें दीधली ॥२९॥
विष्णूस देवोन वरदान ॥ विश्व केलें त्याआधीन ॥ शिव गिरिजेतें घेऊन ॥ आनंदवनीं क्रीडे सदा ॥३०॥
ऐसा सांब ईश्वरु ॥ करुणाकर दयासागरु ॥ ज्याच्या रुपाचा पारु ॥ सहसा न कळे कोणासी ॥३१॥
अव्यक्त व्यक्तिवेगळा ॥ अपरिमितपरब्रह्म पुतळा ॥ निर्गुणासी वेदीं स्तविला ॥ अंतर्बाह्य व्यापक ॥३२॥
विश्वव्यापक शिवशंकर ॥ अंतर्साक्षी परमेश्वर ॥ कैलासवासी गिरिजावर ॥ तोचि स्वामी विश्वाचा ॥३३॥
यापरी शिवमहिमा ॥ ऋषीनें स्तविला करोनि सीमा ॥ ऐकोनि तापसांचा आत्मा ॥ संतोष नेदी मानसीं ॥३४॥
बहु विरक्तांची मंडळी ॥ तपस्तेजें कांति उजळली ॥ ज्ञानें अद्भुत मति फांकली ॥ बुध्दी प्रकाशली चिद्गगनीं ॥३५॥
एक कडकडां चावोनि दांत ॥ रागे भरोनि बोलता ॥ म्हणे त्वां स्तविला गिरिजाकांत ॥ कोण्याअर्थे सांगपां ॥३६॥
शिव म्हणिजे तमोगुण ॥ तैसें रज सत्वादि जाण ॥ तिघेही बंधुत्वासी कारण ॥ मोक्षदाते नव्हेती ॥३७॥
ब्रह्मा विष्णु हर ॥ हा तो मायेचा बडिवार ॥ मायानियंतां परमेश्वर ॥ ऐसें बोलती वेदांत ॥३८॥
एके दिवशी विधांता ॥ आळस आला सृष्टि करितां ॥ उबगे मानूनियां चित्ता ॥ जाता जाहला विदेशा ॥३९॥
पुढें भेटला महाविष्णु ॥ त्यासी सांगे चतुराननु ॥ सृष्टि करितां माझें मनु ॥ त्रासलेसे श्रीवरा ॥४०॥
बहुत करितां गाथागोवीं ॥ वीट घेतला माझिया जीवीं ॥ यालागीं होऊनि गोसावी ॥ टाकूनि जातों विश्रांतीतें ॥४१॥
मिथ्या विश्वरचना केली ॥ जैसीं चित्रींचीं बाहुली ॥ प्रलय अंतीं शिव जाळी ॥ करी होळी सर्वांची ॥४२॥
शाश्वत न दिसें पदार्थ कांहीं ॥ यालागीं उदास जाहलों देहीं ॥ निसुर जावोनि एके ठायीं ॥ सुखें निद्रा करीन ॥४३॥
ऐसें बोलत्तां ब्रह्मदेवें ॥ विष्णु म्हणे बहुत बरवें ॥ मान्य केलें माझिया जीवें ॥ केला विचार बरवा त्वां ॥४४॥
तूं निर्मितोसि भूगोळ ॥ मातें संरक्षणीं कष्ट प्रबळ ॥ त्वां त्यागितां जंजाळ ॥ सहज माझें फिटतसे ॥४५॥
यापरी दोघेजण ॥ मार्ग लंघिती अटव्य दारुण ॥ वृक्षातळीं पंचवदन अकस्मात् देखिला ॥४६॥
पाहोनियां हरि विधाता ॥ शिव पुसे कोठें जातां ॥ विष्णु म्हणे गिरिजाकांता ॥ ऐक तुजला सांगतों ॥४७॥
कष्टोनियां विधाता ॥ सृष्टि त्यागोनि जातो आतां ॥ प्रतिपाळणीं माझी चिंता ॥ परस्परें निस्तरली ॥४८॥
विष्णू वचनें रुद्र हांसिला ॥ मनीं बहुत संतोषला ॥ संहारकर्ता या कार्याला ॥ आजिपासोनि मुकलों ॥४९॥
प्रयागीं त्रिवेणीतीर्थे ॥ तेवीं तिघे एकचिते ॥ सृष्टि त्यागोनि अवघड पंथें ॥ एकांत स्थानीं पातले ॥५०॥
हें जाणोनि परमेश्वर ॥ दाविता जाहला चमत्कार ॥ निर्मिलें मायेचें जनावर ॥ जें जाहलें नाहीं सृष्टींत ॥५१॥
पुच्छाकडून मार्ग चाले ॥ वांकडी मान फेगडीं पाउलें ॥ भाळीं मुख हनुवटी डोळे ॥ जिव्हा लोळे नासिकीं ॥५२॥
पुच्छ तांबडें मान पांढरी ॥ कृष्णवर्ण दिसे पाठीवरी ॥ अकरा शिंगें पादचारी ॥ लांब रुंद सहायोजनें ॥५३॥
दोन संदुका भरल्या आंडयांनीं ॥ त्यांची वाहिली वरी गौणी ॥ वरता पुरुष एक बैसोनी ॥ गाणें गात चालिला ॥५४॥
हें देखोनियां विधाता ॥ विस्मयो करी आपुल्या चित्ता ॥ म्हणे मी सृष्टिकर्ता ॥ यासी कोणी निर्मिलें ॥५५॥
विष्णु म्हण यथार्थ पाहीं ॥ म्यं संरक्षिलेंचि नाहीं ॥ रुद्र म्हणे संहारप्रवाहीं ॥ मातें नाहीं आढळलें ॥५६॥
विचार करिती आपुले चित्तीं ॥ म्हणती ईश्वर आम्ही तीनमूर्ती ॥ आम्हावांचोनि या क्षितीं ॥ कोणें याशी निर्मिलें ॥५७॥
ऐसें विचारुनियां तिघेजण ॥ जाऊनि पुसती पुरुषालागून ॥ कोठोनि आलासी कोठें गमन ॥ प्रगट केलें पाहिजे ॥५८॥
ब्रह्मा विष्णु महेश ॥ तिधीं त्यागिलें सृष्टीस ॥ हें जाणोनि जगदीश ॥ मातें लौकरीं प्रेरिलें ॥५९॥
वचन ऐकोनि तो पुरुष ॥ वहन उभें करोंनि हांसत ॥ मज कार्याच्या उद्देशें ॥ शीघ्र गेलें पाहिजे ॥६०॥
ब्रह्मा विष्णु आणि हर ॥ नवे ठेवावे सृष्टी वर ॥ जुने बांधोनि लौकर ॥ कारागृहीं घालणें ॥६१॥
ऐसें आज्ञापिलें मातें ॥ त्याचि जातों कार्यातें ॥ ऐकोनि भयाभीतचित्तें । तिन्ही मूर्ति पैं जाहल्या ॥६२॥
मग पुसती पुरुषाला ॥ नवा ब्रह्मा कोठूनि आणिला ॥ हरिहर तुम्हाजवळा ॥ सन्निध कोठें दिसेना ॥६३॥
ऐकोनि पुरुष हांसे ॥ म्हणे तुम्हां लागलें पिसें ॥ संदुकींत आंडें भरलीं असे ॥ त्यांतही हरिहर सांठविले ॥६४॥
मग उघडोनियां संदुक ॥ दाविलीं अंडीं लक्ष एक ॥ अंडें फोडितां देख ॥ तीनमूर्ती प्रगटल्या ॥६५॥
पुरुष बोले तिघांशीं ॥ अनंत ब्रह्मांडें देवापाशी ॥ ब्रह्मा विष्णु महेशासी ॥ गणती कोणें करावी ॥६६॥
हें ऐकूनि तिघेजण ॥ धांवोनि धरिती त्याचे चरण ॥ म्हणती आम्ही चुकलों जाण ॥ जाऊनि रक्षुं सृष्टीला ॥६७॥
यापरी विनविलें पुरुषाला ॥ पुन्हां आले आपुल्या स्थळाला ॥ आपणापरीस ईश्वर आगळा ॥ ऐसें आले प्रचीती ॥६८॥
तिघे होऊनि लज्जित ॥ करिती सृष्टीचा कार्यार्थ ॥ तेथेंचि तुमचा बैसला हेत ॥ ईश्वर त्यासी म्हणतसां ॥६९॥
आणिक ऐका त्याचे गुण तिघीं धरिला अभिमान ॥ अनसूयासतीलागून ॥ गेले चेष्टा करावया ॥७०॥
दत्तात्रेय जननीला ॥ तिघे मागती भोजनाला ॥ म्हणती क्षुधेने देह पीडिला ॥ शांत करी जगदंबे ॥७१॥
स्वल्प गुंती असे आमुतें ॥ तेही सांगतों पतिव्रते ॥ नग्न होऊनि वाढीं आम्हांतें ॥ तरीच करुं भोजन ॥७२॥
हें ऐकोन्जि अनसूयेनें ॥ म्हणें यांणीं केलें कोंडणें ॥ यांसी न घालितां भोजनें ॥ लागें कळंक सत्वासी ॥७३॥
सप्तवरुषेंपर्यंत ॥ नग्न देखावें कुमारीप्रत ॥ अष्टमवरुषीं वस्त्ररहित ॥ होय दूषण उभयपक्षीं ॥७४॥
मी तंव पतिपरायण ॥ केवीं यांसी घालूं भोजन ॥ परपुरुषीं पाहतां नग्न ॥ पतनांसी जाय पतिव्रता ॥७५॥
ऐसें विचारोनि चित्तीं ॥ पतींचें तीर्थ घेतलें हातीं ॥ मस्तकीं शिंचितां त्रिमूर्ती ॥ जाहली लघु बाळकें ॥७६॥
वस्त्ररहित अत्रिवनिता ॥ परमपवित्र सत्वसरिता ॥ हरिहर आणि विधाता ॥ तृप्त करी स्तनपानें ॥७७॥
पाळणां निजवूनि तयांतें ॥ गृहांत बैसला स्वस्थचित्तें ॥ वार्ता कळतां नारदातें ॥ जाऊन सांगे गिरिजेला ॥७८॥
सावित्री कमला पार्वती ॥ एके स्थानीं बैसल्या होती ॥ मुनि जाऊनि तयांप्रती ॥ मात सांगे अनसूयेची ॥७९॥
विधि सुत म्हणे तुमचे कांत ॥ देखिले अनसूयेचें गृहांत ॥ सत्व घेऊं गेले तेथ ॥ बाळक केले तियेनें ॥८०॥
काढूनि तारूण्यदशेस ॥ करुनि ठेविले बाळवेष ॥ मी प्रत्यक्ष पाहिलें त्यांस ॥ विष्ठा मूत्र चिवडिती ॥८१॥
तुमचें असेल सत्व गहन ॥ अनसूयेपरीस विशाळ गहन ॥ तरी तिघीजणी जाऊन ॥ फेडा पतींचीं साकडीं ॥८२॥
अथवा सांडोनि गर्वासी ॥ शरण जावें अनसूयेसी ॥ प्रार्थून मागावें पतीसी ॥ पूर्वस्थिती मागुती ॥८३॥
परिसोनि नारदाची वाणी ॥ वेगें फुगल्या तिघीजणी ॥ म्हणती आम्हांसमान करणी ॥ भुवनत्रयी असेना ॥८४॥
आम्हीं देवाच्या वनिता ॥ अनसूया ऋषीची कांता ॥ अगाध सिंधु आणि सरिता ॥ समता कैसी घडेल ॥८५॥
दासी आणि स्वामीण ॥ एक म्हणतां लागे लांछन ॥ हंस बगळा श्वेतवर्ण ॥ क्रिया भिन्न असे कीं ॥८६॥
आम्ही म्हणिजे आदिमाया ॥ अनसूया ऋषीची जाया ॥ केवीं समता मुनिवर्या ॥ तूंचि यथार्थ सांग पां ॥८७॥
ऋषि म्हणे बहुत बरवें ॥ होईल तें दिसेल स्वभावें ॥ ऐसें वदोनि मुनि देवें ॥ गमन केलें मनोगती ॥८८॥
यावरी मग देवांगना ॥ क्रोधें भरोनि अंत:करणा ॥ अत्रिऋषीचिया सदना ॥ त्रय माया पातल्या ॥८९॥
अनसूया सडीतसे साळी ॥ द्वारीं उभ्या तिघी ते काळीं ॥ तयां न सन्मानी ते उगली ॥ कांडण कांडी स्वहस्तें ॥९०॥
हें देखोन पार्वती म्हणे ॥ आगे तापसाचे अंगने ॥ सन्मान न देशी आम्हांकारणें ॥ नेणसी महिमा श्रेष्ठांचा ॥९१॥
खोटें मनें कापटय केलें ॥ समर्थ आमुचे पति ठकिले ॥ त्या कर्माचें फळ भोगिलें ॥ आमुच्या क्षोभें पाहिजे ॥९२॥
परिसोनि संतोष अत्रिदारा ॥ समर्थांछ्या समर्थ चतुरा ॥ परिक्षोनि घेइंजे प्रियकरा ॥ पाळणांगर्भी त्रयमूर्ती ॥९३॥
तिघी पातल्या पालखानिकटीं ॥ वल्लभां पाहतां बाळें धाकुटीं ॥ करें चिवडिती मुत्रविष्टि ॥ त्रयमुर्ति सारिख्या ॥९४॥
हस्त पाद मुखकमळ ॥ समानकृति असती बाळ ॥ परिक्षावया ज्ञानबुबुळ ॥ संकोचोनी स्तब्धती ॥९५॥
विस्मयो करिती त्रय ललना ॥ सामर्थ्य वेंचोनि पाहती वदना ॥ अपरोक्ष दृष्टीनें पाहावेना ॥ दशा त्यांची न फिरेची ॥९६॥
कर स्पर्शावया दचकती मनीं ॥ पुरती वोळखी न पुरे नयनीं ॥ म्हणती वदला नारदमुनी ॥ तेंचि सत्यत्वा पातलें ॥९७॥
न चले सामर्थ्य पति घेतां ॥ लज्जायमान तिघी वनिता ॥ मग अनसूयेचि तत्वता ॥ प्रार्थनाअ करिती सद्भावें ॥९८॥
गिरिजा म्हणे ऋषिभामिनी ॥ अगाध सत्वाची तूं खाणी ॥ हृदयीं क्षमा धरोनी ॥ दया करीं सुखसरिते ॥९९॥
प्रार्थना करी शिवकांता ॥ ऐकोनि उठिली ऋषिवनिता ॥ तिन्ही बाळें हातीं धरितां ॥ पूर्व स्थितीतें पावले ॥१००॥
ब्रह्मा विष्णु महेश ॥ नमस्कारिती अनसूयेस ॥ म्हणती तुझिय सत्वास ॥ उपमा नसे ब्रह्मांडीं ॥१॥
या सृष्टिरचनेमाझारीं ॥ बहुसाल पवित्र नारी ॥ परी तुझें सत्व सूर्याशेजारीं ॥ खद्योतन्यानें दीसत ॥२॥
तुझ्या सत्वाच्या राशी पासोन ॥ दिसे ब्रह्मांड हें ठेंगण ॥ यालागीं तूंचि धन्य ॥ सत्ववती तूं माये ॥३॥
आतां आमुचे मनोरथ ॥ पुरवावया तूं समर्थ ॥ गर्भशक्तिके उदरांत ॥ साठवीं तिन्ही फळें ॥४॥
हाचि हर्ष आमुचें अंतरीं ॥ जन्म घ्यावा तुझें उदरीं ॥ स्तनपान करावया क्षुधा भारी ॥ प्रेमलहरी उसळत ॥५॥
परिसोनि तिघांचा अभिप्रावो ॥ अनसूया म्हणे अवश्यमेव ॥ मग देवोनी अभयरवो ॥ संतोषविलें विधिहरिहरां ॥६॥
ब्रह्मा विष्णु महेश ॥ जन्मती अनसूयेचे कुशीस ॥ तें कथेचें रहस्य ॥ निरुपण येईल पुढारीं ॥७॥
हें सांगावया कारण ॥ जे विधिहरिहरांचें प्रताप गहन ॥ त्यांसी ऋषिपत्नीनें ठकवून ॥ गर्व त्यांचे भाजले ॥८॥
ब्रह्मा विष्णु हर ॥ अनसुयेनें केले किंकर ॥ त्यांसी ब्रह्म म्हणतां चतुर ॥ केवीं तुकती निर्गुणी ॥९॥
एक्या समयास भृगून ॥ सत्यलोकीं प्रवेश करुन ॥ धातयास दंडें डंवचून ॥ ध्यान त्याचें भंगिलें ॥१०॥
विषाद पावोनि विधाता ॥ रोषें शापिला ऋषिपुरता ॥ भृगूनें भ्रुकुटीं ऊर्ध्व करितां ॥ रोमरेषा न मोडे ॥११॥
रुद्र उठिला क्षोभून ॥ उघडोनि विशाळ त्रिनयन ॥ ऋषि जाळोनि करावा दहन ॥ एवढा क्रोधाग्नि पेटला ॥१२॥
भृगुनें उचलितां भ्रुकुटी ॥ शमली क्रोधाची आगटी ॥ रंजुक पिवोनि तोफ मोठी ॥ शितळ होय ज्यापरी ॥१३॥
विस्मित जाहला पंचवदन ॥ भृगू निघाला तेथून ॥ वैकुंठगृहीं कैटभमर्दन ॥ तेथें आला मनोगती ॥१४॥
कमळेसहित श्रीहरी ॥ पहुडला होता मंचकावरी ॥ अकस्मात हृदयावरी ॥ लत्ताप्रहारें ताडिला ॥१५॥
विष्णु होऊनि जागृत ॥ त्वरें ऋषीचे चरण धरित ॥ म्हणे आजि पापरहित ॥ पादस्पर्शे मी जाहलों ॥१६॥
एवढा भृगूचा गरिमा ॥ भय मानिती हरि हर ब्रह्मा ॥ म्हणोनि समता पुरुषोत्तमा ॥ कैसी होती मुनिहो ॥१७॥
जयांवरी ऋषीचा कोप चाले ॥ कैसे ब्रह्मींचे पुतळे ॥ ऐसा ऋषि ज्ञान बोले ॥ नैमिषारण्यामाझारीं ॥१८॥
ते कथाश्रोतयां लागुनी ॥ सांगेन महाराष्ट्र देशवाणी ॥ कृष्णउपासक शहामुनी ॥ प्रगट करितों गूढार्थ ॥
इति श्रीसिध्दांतबोधग्रंथे अध्यात्मनिरुपणतत्त्वसारनिर्णये दशमोऽध्याय: ॥१०॥
अध्याय ॥१०॥ ओंव्या ॥११९॥
॥ श्रीराम ॥ श्रीराम ॥ श्रीराम ॥ श्रीराम ॥ श्रीराम ॥

N/A

References : N/A
Last Updated : September 23, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP