मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|सिध्दान्तबोध|
अध्याय ३ रा

श्रीसिध्दान्तबोध - अध्याय ३ रा

‘श्रीसिध्दान्तबोध’ हा संतकवि श्रीशहामुनि यांचा ग्रंथ म्हणजे मराठी वाड्मयाच्या खाणींतील एक तेजस्वी हिरा आहे.


श्रीगणाधिपतये नम: ॥ श्रीगुरुभ्यो नम: ॥
आतां वंदू कुळस्वामिणी ॥ श्रीकृष्ण जगत्रयजननी ॥ मज प्रेमपान्हा पाजुनी ॥ संतोष करीं बाळकां ॥१॥
तुवां अवतार घेतला गोकुळीं ॥ वसुदेवयादवांचे मेळीं ॥ चोडकें घेऊनियां गोळी ॥ गोंधळ घालिती तुजपुढें ॥२॥
बैसोनि संकल्पसिंहावरी ॥ भीमत्रिशूळ धरिला करीं ॥ जरासंध महिषासुर मारी ॥ चिरुनि केला दुखंड ॥३॥
तुझें ऐकोनियां सत्व गहन ॥ नवस केला द्रौपदीनें ॥ कौरवमेंढयांची दावण ॥ मारीन तुजपुढें अंबिके ॥४॥
द्रौपदीनें केला नवस ॥ ऐकोनियां हसें येतसे विदुरास ॥ भीष्म म्हणे या वचनास ॥ विस्मयो कासया करावा ॥५॥
खडतर गोकुळींची देवता ॥ द्रौपदीनें नवल केला पुरता ॥ होमिलें कौरवकुळा समस्ता ॥ बरवें कांहीं दिसेना ॥६॥
कौरवकपटाचिया जाळीं ॥ द्रौपदी सांपडली मासोळी ॥ कृष्णजीवनालागीं तळमळी ॥ दुष्टउष्णें तडफडित ॥७॥
पांडवद्राक्षझाडास ॥ द्रौपदी फळ लागलें सुरस ॥ कौरवकावळे स्पर्शावयास ॥ कावकाव करिताती ॥८॥
त्यास रक्षण कोणी नाहीं ॥ धांवें पावें कृष्णाबाई ॥ प्रगट होई या समयीं ॥ महिमा दावीं आपुला ॥९॥
आजि वारीं हें सांकडें ॥ दुष्ट दु:शासन फेदी लुगडें ॥ धर्मराजा होऊन वेडें ॥ सत्यभाकेसी गुंतला ॥१०॥
भीम अर्जुन महासागर ॥ क्रोधभरते दाटे अपार ॥ धर्ममर्यादे बाहेर ॥ सामर्थ्य नाहीं जावया ॥११॥
भीमआरोळीची उसळ लाटे ॥ जहाज फांसे पडती उलटे ॥ दुर्योधनाचें धैर्यशिड तुटे ॥ तारूं बुडे हरुषाचें ॥१२॥
दुर्योधन म्हणे कर्म खोटें ॥ पुढें वोढवलें अदृष्टें ॥ भीम आरोळीनें हृदय फुटे ॥ धर्मा याते आवरीएं ॥१३॥
धर्मे आज्ञापितां भीमसेन ॥ मौनें बैसला श्वास घालोन ॥ पुढील भविष्य जाणे कोण ॥ ईश्वरमहिमा कळेना ॥१४॥
भीमआरोळीचा सिंधु वोहटलां ॥ धर्मसंपदेचा जंजिरा उघडा पडिला ॥ पायवाटे जाहली कौरवांला ॥ जिंकावया आवडी ॥१५॥
सुरंग लावूनि कपटाची ॥ उडविले बुरुज भीमबळाचे ॥ द्रव्य सांपडलें फुकाचें ॥ तस्कर तैसे लूटती ॥१६॥
फांसे टाकिल्यावरी ॥ धृतराष्ट्र विदुराशेजारीं ॥ म्हणें कवणें जिंकिलें ये अवसरीं ॥ कर्णी आधी सांगपां ॥१७॥
विदुर म्हणे हर्षे गाय ॥ व्याघ्राचे जाळींत बैसोंजाय ॥ पुढील भविष्य होईल काय ॥ ते तंव न कळे तियेसी ॥१८॥
तस्कर चोरी करितां हरुखें ॥ सांपडतां मारिती डोचकें । तेवीं तुझ्या पुत्रें कौतुकें ॥ धर्मसंपदा जिंकली ॥१९॥
रंका सांपडली कनकलाट ॥ परी जिरवावयाचें संकट ॥ विष खातां गोड वाटे ॥ प्राण घेईल शेवटीं ॥२०॥
धृतराष्ट्र म्हणे विदुरासी ॥ खोऊनि गोष्ट सांगसी ॥ अखंड मम पुत्रां निंदिशी ॥ सर्वथा स्तविशी पांडवां ॥२१॥
विदुर म्हणे कर्म विपरीत ॥ मरतयासी पाजितां अमृत ॥ हातें सारुनि करी परत ॥ भोग कवणाचा म्हणावा ॥२२॥
असा द्रौपदी सभेंत ॥ क्रोधें होऊनि संतप्त ॥ म्हणे कोणी न दिसे आप्त ॥ कृष्णा वेगीं धांवरें ॥२३॥
सहस्त्र अंगनांच्या कळपांत ॥ दु:शासन व्याघ्र पातला तेथ ॥ उडी घालोनि अकस्मात ॥ वोढूनि फरफरां आणिलें ॥२४॥
लोटूनि सभेचे जाळीभीतरीं ॥ सन्मुख बैसोनि गुरगुरी ॥ हस्तें पंचाननें आसुडी निरी ॥ घोटूं पाहे कंठासी ॥२५॥
थोर पडलें सांकडे ॥ भोंवती पाहे चहूंकडे ॥ कृष्णा दाखवीं रुपडें ॥ दुष्टापासोनी सोडवीं ॥२६॥
सकळ देवांचे स्वामिणी ॥ कृष्णा सखिये मायबहिणी ॥ अंबे स्मरतें तुजलागुनी ॥ घाली उडी संकटी ॥२७॥
द्रौपदी अधर ते धनुष्यबाण ॥ जिव्हासीत कठिण वोढून ॥ शब्दबाण सुटला कडकडोन ॥ कृष्णकर्णी धडकला ॥२८॥
त्वरें पातला श्रीहरी ॥ वस्त्रें पुरवूनि श्रम हरी ॥ लज्जित होऊनि कौरव वैरी ॥ अधोवदनें ऊठिले ॥२९॥
यावरी पांडवीं सेविले वनवास ॥ कष्ट भोगिले बारा वरुषें ॥ मग येऊनि राज्यास ॥ विभाग आपुला मागती ॥३०॥
द्रौपदी म्हणे धर्मराया ॥ म्यां नवशिली कृष्णमाया ॥ तिचा नवस फेडावया ॥ विलंब कांही न करावा ॥३१॥
कुरुक्षेत्रीं देऊनि मंडप ॥ आणोनि कौरवअजांचे कळप ॥ धरुं जातां भीम भूप ॥ बळेंचि थडका मारिती ॥३२॥
भीम अर्जुन उभयतां लागुन ॥ द्रौपदी म्हणे आणा पाचारुन ॥ कौरवबस्तांते वधून ॥ विभाग घेणें राज्याचा ॥३३॥
कर्णशंख चोंडकें वाजत ॥ भीम आरोळी समेळ गर्जत ॥ कथा गायिली महाभारत ॥ गोंधळ घातला रणयुध्दीं ॥३४॥
स्थापूनि कृष्णभगवतीस ॥ होमिलें कौरवबस्तांस ॥ द्रौपदीनें फेडिला नवस ॥ संतुष्ट केली जगदंबा ॥३५॥
प्रसन्न होऊनि भवानी ॥ आदिशक्ति नारायणी ॥ धर्मासी राज्यीं स्थापुनी ॥ सुखी केलें विश्वातें ॥३६॥
ऐसी माझी अंबाबाई ॥ तिचा महिमा वर्णूं काई ॥ भावें लागतसे पायीं ॥ दया करीं मज बाळका ॥३७॥
दत्तात्रेया गुरुमाउली ॥ करीं मज कृपेची साउली ॥ देई हातीं ज्ञान किल्ली ॥ होईन भांडारी मी तुझा ॥३८॥
उघडीन सत्यलोककोउडीला ॥ ऐवजी पाहीन कितीक भरला ॥ खरें खोटें आणूनि मनाला ॥ पारखून ठेवीन ॥३९॥
मागील अध्यायीं निरुपण ॥ नारदें धरिला अभिमान ॥ त्याची नारदी केली श्रीकृष्णें ॥ साठ पुत्र जन्मविले ॥४०॥
यावरी नैमिषारण्याभीतरी ॥ समस्तीं मिळोन ऋषीश्वरीं ॥ उसळती ज्ञानलाटा भारी ॥ येरयेरां वरी लोटती ॥४१॥
तेथें कोणे एके ऋषीनें ॥ बहुत वर्णिली दानपुण्यें ॥ विशेष स्तविले स्वर्गभुवन ॥ श्रेष्ठ स्थापिलें अमरांसी ॥४२॥
त्याचें ऐकोनियां वचन ॥ दुसरा ऋषि बोले क्षोभोन ॥ म्हणे नाशवंत स्वर्ग भुवन ॥ त्यासी दीधलें श्रेष्ठत्व ॥४३॥
कित्येकदा इंद्र जिंकोन ॥ धरोनि सोडिला सहस्त्रनयन ॥ दैत्य देव दारूण ॥ कलह करिता अखंड ॥४४॥
रावण राक्षस प्रबळ ॥ बंदी घातले देव सकळ ॥ आपदा भोगिली दु:ख पुष्कळ ॥ कळों आली आम्हांसी ॥४५॥
प्रगट होऊन रामरुपडें ॥ वारिलें देवांचे सांकडें ॥ त्याची काय सांगती प्रौढे ॥ काय वाचें बोलसी ॥४६॥
स्वर्गलोकीं सुख कैचें ॥ अखंड वाजतसें कचकचें ॥ तुमचें ज्ञान आहे काचें ॥ बुध्दि पुरती असेना ॥४७॥
आतां ऐका मी सांगेन ॥ पुण्य पावन ॥ तेथील स्वामी चतुरानन ॥ जो निर्मिता ब्रह्मांडें ॥४८॥
जो बोलिजे विधाता ॥ तोचि सकळ सृष्टीचा कर्ता ॥ होय विश्वाचा जनिता ॥ ईश्वर त्यातें बोलिजे ॥४९॥
जेणें आपुल्या इच्छेंकरुन ॥ रचिलें सकळ सत्यलोकभुवन ॥ ललाटीं शिव उत्पन्न ॥ कर्णी विष्णु जन्मला ॥५०॥
सूर्य चंद्र दोघांला ॥ जन्म नेत्रापासोन जाहला ॥ नासापुटीं वायु उद्भवला ॥ श्वासीं जन्म इंद्रासी ॥५१॥
चार्‍हीमुखांपासोनि ॥ वेद जाहले निर्माण ॥ अग्नि जाहला कंठांतून ॥ वरुण कक्षेपासोनी ॥५२॥
कल्पना करितांची मानसीं ॥ निर्माण जाहले म्हणोनि ऋषी ॥ ऋषींपासोनि सृष्टीसी ॥ जन्म जाहला जाणिजे ॥५३॥
कश्यपापासूनि सृष्टि जाहली ॥ हे तो भारतीं वानिली ॥ म्हणोनि असो हे बोली ॥ विस्तार लिहिणें कासया ॥५४॥
देव दैत्य राक्षसगण ॥ सर्प पक्षि व्याघ्र हरिण ॥ आणिक मानवीजन ॥ ऋषीश्वरीं निर्मिल ॥५५॥
विश्वाचा जनिता कश्यप ऋषी ॥ कश्यपाचा पिता मरीची ॥ मरीचीचा बाप विरंची ॥ स्वतां ईश्वर आपण ॥५६॥
ज्याचे सभेस ऋषींचे कटक ॥ बैसती तापसी वरिष्ठ ॥ मध्यें सिंहासन श्रेष्ठ ॥ त्यावरी विराजे विधाता ॥५७॥
वेद पुराणें दिव्य देही ॥ सदैव बसती ब्रह्मगेहीं ॥ सत्यावांचोनि बोलणें नाहीं ॥ धर्मवार्ता सर्वांसी ॥५८॥
अष्टांगयोग अभ्यासिती ॥ जे कर्वतीं देह कापिती ॥ तयांसी सत्यलोकप्राप्ती ॥ नेमिली असे विधीनें ॥५९॥
ब्रह्मचारी वानप्रस्थ ॥ संन्यासी परमहंस विख्यात ॥ सिध्दयोगी समस्त ॥ सदैव वसती ब्रह्मपुरी ॥६०॥
ठाडेश्वरी आकाशमुनी ॥ तपें तपती काया कष्टोनी ॥ शास्त्रव्युत्पन्न पंडित ज्ञानी ॥ तयांस वस्ती ब्रह्मपुरीं ॥६१॥
जे पंचाग्नी तापती ॥ शीतकाळीं जळांत बैसती ॥ ऊर्ध्वबाहु धूम्रपान करिती ॥ तयासी वस्ती ब्रह्मपुरीं ॥६२॥
सत्यवादी क्रियाशीळ ॥ स्वधर्मे वर्ते सार्वकाळ ॥ गोब्राह्मणासी न करी छळ ॥ तया वस्ती ब्रह्मपुरीं ॥६३॥
जिहीं परद्वार नाहीं केला ॥ स्पर्शले नाहीं मद्याला ॥ जयांसी पापाचा कंटाळा ॥ तयां वस्ती ब्रह्मपुरीं ॥६४॥
जे दुसरिया दु:ख न देती ॥ परोपकारीं प्राण वेंचिती ॥ चाहाडी चोरी निंदा न करिती ॥ तयां वस्ती ब्रह्मपुरीं ॥६५॥
अनंत जन्माचें सुकृत ॥ तरी ब्रह्मलोक प्राप्त ॥ याहून श्रेष्ठ पदार्थ ॥ पाहतां कोठें दिसेना ॥६६॥
हाचि निश्चय साचा ॥ ब्रह्मा ईश्वर सर्वांचा ॥ ऐकोन शब्द ऋषीचा ॥ विस्मय करिती मुनीश्वर ॥६७॥
ऋषीश्वरांचे मंडळींत ॥ एक खवळला रागें भरत ॥ म्हणे याचें ज्ञान विपरीत ॥ कोणें मनासी आणावें ॥६८॥
ब्रह्मा कोण हें कांहीं ॥ ऐसें पुरतें ठाउकें नाहीं ॥ स्वल्पज्ञानें बोलोनि पाहीं ॥ श्रेष्ठत्व दावितां आपुलें ॥६९॥
बरवें सांगतों आइका ॥ व्यर्थ कचकच करुं नका ॥ बैसलिया फुटकी नौका ॥ सिंधूंत केवीं तरेल ॥७०॥
गारगोटी बंधिली पदरा ॥ म्हणे मज सांपडला हिरा ॥ परीक्षावंत खोटा खरा ॥ क्षणामाजी पारखी ॥७१॥
श्वानासी मोगरा नांव ठेविला ॥ त्याचा हार कोणें गुंफिला ॥ सुवर्ण म्हणती अर्बटयाला ॥ काय व्यवहार होईल ॥७२॥
पिशाच म्हणे मी राजा ॥ मुजरा करील काय प्रजा ॥ तैसा विवेक हा तुझा ॥ वाटे माझे मानसीं ॥७३॥
खापरखुंटीच्या भाकरी ॥ खेळतां करिती कुमारी ॥ बोळक्यांत तुळसी मंजिरी ॥ म्हणती क्षीर रांधली ॥७४॥
चिरगुटाची बाहुली ॥ वस्त्राभरणें श्रृंगारिली ॥ पुरुषापाशीं निजविली ॥ काय होईल गर्भवती ॥७५॥
भीमासी मुष्टिभरी लाह्या ॥ केवीं तृप्त होईल त्याची काया ॥ पाहोनी शिंदीची शीतळ छाया ॥ हस्ती बांधिला विश्रांती ॥७६॥
धोतर्‍याचे कनकफुलें ॥ भक्तीनें देवासी वाहिलें ॥ रात्रीं तस्करी चोरुन नेलें ॥ कुटुंब काय संतोषे ॥७७॥
ताडपत्राचीं तानवडें करिती ॥ कोकणीं वनिता कर्णी लेती ॥ विकूं जातां वाण्या प्रती ॥ पैसा कोणी देईना ॥७८॥
कुंभाराच्या उदिमासी ॥ नलगे भांडवल खर्चासी ॥ तेवीं फुकाचें बोलावयासी ॥ काय वेंचे तूमचें ॥७९॥
आतां गडबड करुं नका ॥ मीं सांगतों तेंचि ऐका ॥ ब्रह्मलोक मज ठाऊका ॥ उघडोनि सवेंच दावितों ॥८०॥
ऐका ब्रह्मयाची काहणी ॥ त्यासी शंखासुरें ठोकोनी ॥ वेद नेले हो चोरोनी ॥ समुद्रामाजी दडाला ॥८१॥
सुताराचें हरपल्या वांकसं ॥ खोळंबा पडे इमारतीस ॥ तेवीं ब्रह्मा आपुल्या घरास ॥ उद्वेगित बैसला ॥८२॥
नाहीं सत्ता आणावयाची ॥ कोठें शुध्दि नलगे त्याची ॥ कष्टी होऊनि विरंची ॥ चिंतार्णवीं पडियेला ॥८३॥
नरसिंहाचा मंत्र चुकल्यावरी ॥ त्यास दैव पिशाच करी ॥ तैसा ब्रह्मा आपुल्या शरीरीं ॥ कांहीं उमज सुचेना ॥८४॥
राज्याचा मोठा कारभारी ॥ त्यासी तहगिर केल्यावरी ॥ लज्जा पावोन बैसे घरीं ॥ निवतां बाहेरी संकोच ॥८५॥
दोघें भांडत गेले चावडीसी ॥ एक फजित पावला सभेसी ॥ परतोनि जातां गृहासी ॥ तोंड करी वोखटें ॥८६॥
युध्दीं पळें रणशूर ॥ नालबंदी मागों जातां सत्वर ॥ जावया सरदारां समोर ॥ वरती मान करवेना ॥८७॥
वनिता परपुरुषीं रमतां ॥ तत्समयीं देखे भर्ता ॥ मग तया सन्मुख जातां ॥ मरण वाटे तियेतें ॥८८॥
मोटेचा नाडा गेला तुटोन ॥ पुढें पाट वाहील कशानें ॥ पुरुषाचें सरलिया व्यसन ॥ कोठूनि होय संतती ॥८९॥
पक्षियांचे पर उपडिले ॥ उडावयाचें स्फुरण गेलें ॥ भाजलें बीज शेती पेरिलें ॥ धान्य पिके कासयानें ॥९०॥
कुंभारचक्राचा होतां नाश ॥ मडक्यांचा कारखाना पडिला वोस ॥ तेवीं जाहलें ब्रह्मसभेस ॥ कर्म वेदांविण चालेना ॥९१॥
कामिका अंगनेवांचोनी ॥ निद्रा न लागे सुखशयनीं ॥ तैसें जाहलेम विधिलागोनी ॥ सुचित चित्तीं असेना ॥९२॥
मग विष्णूपासी जाऊन ॥ फिर्याद करुन सांगे गार्‍हाणें ॥ अभय दीधलें लक्ष्मीरमणें ॥ वेद तुझे आणितों ॥९३॥
हुडकोन पाहे भूमंडळ ॥ एकवीस स्वर्ग सप्तपाताळ ॥ मनीं विचारोनि वैकुंठपाळ ॥ सिंधुशोधन आरंभीं ॥९४॥
जळांत करावया प्रवेश ॥ कोणत्या रुपें होईल पैस ॥ ऐसें विचारुन मत्स्यवेष ॥ धरोनि शिरला जराब्धी ॥९५॥
शोधिले सप्तसिंधु अचाट ॥ उंच नीच बेटें सदट ॥ पाहतां गिरीचें कपाट ॥ त्यांत शंखासुर बैसला ॥९६॥
निद्रित देखोनियांन नयनीं ॥ म्हणे सावधपणें मारिजे प्राणी ॥ मग पुच्छातें फडत्कारुनी ॥ जागृत केला वेदचोर ॥९७॥
उठोनि दैत्य अतुरबळी ॥ दीर्घ ठोकिली आरोळी ॥ धांवोनि मत्स्या मिठी घाली ॥ दोघे युध्दीं मिसळले ॥९८॥
गुडघे मेटि भांडी खुटी ॥ दैत्यें बहुत केली हुटहुटी ॥ मत्स्य धरोनि दाढे दपटी ॥ मोडिली हाडें कडकडां ॥९९॥
यापरी वधिला शंखासुर ॥ वेद घेऊनि आला श्रीधर ॥ ब्रह्मा येवोनि समोर ॥ भावें विष्णु पूजिला ॥१००॥
यापरी श्रीअनंत ॥ दैत्य वधी पापमूर्त ॥ परोपकारी दयावंत ॥ वेद विधीस दिधले ॥१॥
जरी ब्रह्मा ईश्वर म्हणतला ॥ तरी शंखासुरें कां ठकविला ॥ शरण गेला विष्णूला ॥ कोठें राहिली प्रतिष्ठा ॥२॥
कोणे एके दिवशीं ॥ सनत्कुमारें पुसिलें विधीस ॥ पूर्णब्रह्मप्राप्तीसी ॥ सांगा उपाव श्रेष्ठहो॥३॥
कैसा आत्मा कैसा जीव ॥ त्याचा सांगिजे उगव ॥ त्रिगुण विषयाचा ठाव ॥ ज्ञानदृष्टि देऊनी ॥४॥
ऐसें ऐकोनियां जाणा ॥ ब्रह्मयांस कांहीं सुचेना ॥ श्रमित होऊनियां मना ॥ तटस्थ ठेला ते समयीं ॥५॥
चहुं वेदांचा वक्ता ॥ शास्त्रपुराणांसी जाणता ॥ जो सृष्टीचा स्वयें कर्ता ॥ त्याची बुध्दि हरपली ॥६॥
तेव्हां होऊन राजहंस ॥ अवतार घेऊनि परमपुरुष ॥ करुन सनत्कुमारा उपदेश ॥ गुथि उगवली विधीची ॥७॥
एके दिवशीं चतुरानन ॥ गर्वे फुगला आपण ॥ विष्णूसी म्हणे तूं कोण ॥ मीच ईश्वर सर्वांचा ॥८॥
हरि म्हणे तुज लागलें वेडा ॥ माझे गर्जती पवाड ॥ मी फेडितों सर्वांचे साकडे ॥ साक्ष देती पुराणें ॥९॥
ब्रह्मा म्हणे तुम्ही कोठें होतां ॥ मी सृष्टीचा आदिकर्ता ॥ पाहीं आणीन वेद आतां ॥ विलंब लागों नेदींच ॥११०॥
दोघे पेटले हटास ॥ टाकोनि बोलती मर्यादेस ॥ पाहोनि उभयतां झोंबीस ॥ नारद तेथें पातला ॥११॥
विष्णूसी म्हणे बुध्दि कवण ॥ आपुली प्रतिष्ठा करणें रक्षण ॥ दुसरिया तोंडें तंडण ॥ हेचि उणीव श्रेष्ठातें ॥१२॥
सवेंचि ब्रह्मयासी म्हणे ॥ कळलें तुमचे शाहाणपण ॥ कित्येक जागीं फजित पावोनि ॥ ईश्वर आपणा म्हणवितां ॥१३॥
कळली दोघांची बुध्दी ॥ सांगतो तें ऐका आधीं ॥ तिरायतीवांचोनि कधीं ॥ निवाडाअ तुमचा होईना ॥१४॥
कैलासवासी गौरीरमण ॥ जुना पुरुष श्रीभगवान ॥ तो निवडील यथार्थ जाण ॥ संदेह फिटेल दोघांचा ॥१५॥
ऐकोनि मुनीच्या वचनासी ॥ दोघे गेले शिवापासीं ॥ म्हणती आमच्या भांडणासी ॥ निवडून देणें पशुपते ॥१६॥
शिव म्हणे भांडूं नका ॥ मी सांगतों तें ऐका ॥ विष्णूसी म्हणे माझ्या पादुका स्पर्शोनि येणें लौकरी ॥१७॥
ब्रह्मयासी म्हणे मुकुटावरुतें ॥ हात लावोनि यावें तेथें ॥ आज्ञा घेऊनि त्वरितें ॥ शीघ्रगतीं तो चालिला ॥१८॥
शिवासी करुनियां नमन ॥ पद स्पर्शावयालागून ॥ मार्गी चालतां जाण ॥ कोटि वरुषें क्रमियेली ॥१९॥
विष्णु विचारी मनांत ॥ शिवाचा न कळे अंत ॥ फिरोनि जावें त्वरित ॥ हाचि लाभ दिसतसे ॥१२०॥
मग फिरोनि लक्ष्मीभर्ता ॥ कैलासीं आला त्वरिता ॥ नमस्कारुनि षण्मुखताता ॥ मौनें पाठीं बैसला ॥२१॥
शिव पुसे विष्णूला ॥ पाय स्पर्शोन्न तुम्हा आलां ॥ हरि म्हणे अंत नाहीं लागला ॥ अगाध महिमा स्वामीचा ॥२२॥
येरीकडे हो विधाता ॥ लक्ष वरुषें क्रमिलीं चालतां ॥ बहुत श्रम पावला चित्ता ॥ दु:खित होऊनि बैसला ॥२३॥
कष्टी जाहला चतुराननु ॥ पुढें देखिली कामधेनु ॥ तीस म्हणे माझा मानुं ॥ उल्लासे ऐसें सांगपां ॥२४॥
हांसोनि बोले दुग्धखाणी ॥ तुमचा वृत्तात कळला मनीं ॥ त्वरें जातां कार्यालागुनी ॥ तें तव सिध्दी न पवेची ॥२५॥
कोटि योजनें पर्यंत ॥ उंच गेले गगनचुंबित ॥ कोठें न लागे मुगुटाचा अंत ॥ फिरोनि आले माघारीं ॥२६॥
ऐकोनि पशुवनितेच्या वचनाला ॥ दचक बैसला विरंचीला ॥ म्हणे पुढें जावयाला ॥ शक्ति मातें असेना ॥२७॥
आतां ऐकें वत्सले जननी ॥ म्यां मुगुट देखिला म्हणूनी ॥ याची साक्ष त्वां देवोनी ॥ पडिला प्रसंग संपादी ॥२८॥
धेनु म्हणे बुध्दि चळली ॥ असत्य वदतां शिवाजवळी ॥ शापून मेळवील धुळी ॥ विपरीत कर्म करुं नये ॥२९॥
विधि म्हणे अवघड ॥ विष्णूसी घातली होड ॥ नाहीं म्हणतां प्रतिष्ठा उडे ॥ यासी कैसें करावें ॥१३०॥
भिडेस घालुन्हि धेनूसी ॥ ब्रह्मा गेला शिवापासीं ॥ म्हणे म्यां देखिलें मुगुटासी ॥ साक्ष धेनु आणिली ॥३१॥
ऐसें वदता चतुरानन ॥ क्रोधें पेटला पंचवदन ॥ धेनूस म्हणे तूं पापिण ॥ असत्य साक्ष मज देशी ॥३२॥
तुझें अपवित्र होईल मुख ॥ सर्वदा भक्षिशील नरक ॥ पुच्छ धरुनियां लोक ॥ पूजा करितील उफराटी ॥३३॥
रागें आपटोनि जटेसी ॥ शाप दीधला ब्रह्मयासी ॥ अपूज्य होसील भूलोकासी ॥ तुझी मूर्ति न पूजिति ॥३४॥
मी ईश्वर हा अभिमान ॥ जिराला स्फुंदे म्लान वदन ॥ मौनेंचि सत्यलोका जाऊन ॥ श्वास घालीत बैसला ॥३५॥
ऐसी ब्रह्मयाची करणी ॥ त्यासी ईश्वरत्व स्थापूनी ॥ याचि ज्ञानें जाहला मुनी ॥ कळों आलें महत्त्व ॥३६॥
आणिक कर्म ब्रह्मयाचें ॥ पुराणप्रसिध्द आहे साचें ॥ तेंही उघड करोनि वाचें ॥ बरवें ऐका सांगतों ॥३७॥
एके दिवशीं नारदमुनी ॥ सहज पातला ब्रह्मसदनीं ॥ विरिंची म्हणे कोठूनी ॥ येणें जाहलें सांगपां ॥३८॥
मुनि म्हणे मृत्युलोकांत ॥ नवल देखिलें अद्भुत ॥ गौळियाचे घरांत ॥ सिध्दपुरुष जन्मला ॥३९॥
म्हणे ईश्वर तो मीची ॥ मजपुढें काय विरंची ॥ पूजा घेतसे त्रिलोकांची ॥ यमुनातटीं क्रीडतो ॥४०॥
ऐसें ऐकोनि जगज्जनितां ॥ संतप्त जाहला नारदपितां ॥ म्हणे मुकुंदासी
ठकवून आतां ॥ गाई वत्सें आणितों ॥४१॥
यापरी विचारुन गौतमश्वशुर ॥ सोंगें नटला तस्कर ॥ यमुनातटीं सावित्रीवर ॥ गुप्तरुपें पातला ॥४२॥
कृष्ण नवह्ता ज्या समयीं ॥ ऐसी संधि साधूनि पाहीं ॥ गोपाळ वत्सें अवघड ठायीं ॥ नेऊनि ठेविलीं कपाटीं ॥४३॥
विधीनें मानूनियां हरुष ॥ जाता जाहला सत्यलोकास ॥ हे जाणोनियां जगदीश ॥ कौतुक करिता जाहला पैं ॥४४॥
निर्मिलीं मावेचीं वांसुरें ॥ तांबडीं ढवळीं मोरीं खैरें ॥ कबरीं पीतवर्णे कपिलाकारें ॥ रोडकीं मोठीं थोर सान ॥४५॥
तैसेच गोपाळ निर्मिले गडी ॥ पेंदा सुदामा वांकुडी ॥ बडजा जयासी श्रीकृष्ण आवडी ॥ तैसें संगी मीनले ॥४६॥
काणीं बहिरीं चोंचरीं मुकीं ॥ दांतरीं धोंधरीं तोंतरीं मुकी ॥ लंगडे पांगळे हातमोडकीं ॥ उंच ठेंगणें खुजे खुरटीं ॥४७॥
अवगुणी गुणवंत तामसी हटी ॥ लबाड तोंडाळ धीट कपटी ॥ थोट भ्याड चाहाड चोरटीं ॥ बलिष्ठ गाढे पांगुळ ॥४८॥
काठी कांबळें नागसुर मुरली ॥ हुडु कदफडी सारंग जवळी ॥ कृष्णापासीं सकळ मंडळी ॥ पहिल्या ऐसी विराजे ॥४९॥
गोळा करुन वांसुरां ॥ संध्याकाळीं जाती घरा ॥ गाईं वांसुरें मायलेंकरा ॥ अंतर कांहीं पडेना ॥५०॥
यापरी लोटलें एकवर्ष ॥ विचार करी चतुर्मुख ॥ म्यां ठकविला मदनजनक ॥ घरें बुडालीं गौळियांचीं ॥५१॥
आतां जाऊं गौकुळासी ॥ जरी शरण येतील मजसी ॥ गोपाळ वत्सें देईन त्यांसी ॥ सुखी करीन समस्तां ॥५२॥
ऐसें विचारोन कमलोद्भव ॥ जावोनि पाहे गोकुळ गांव ॥ वत्सें गोपाळांचा समुदाव ॥ यमुनातटीं क्रीडती ॥५३॥
म्हणे हें कैसें जाहलें ॥ कोणें त्यासी दाखविलें ॥ विवरांतून वासुरें मुलें ॥ केव्हां येणें आणिली ॥५४॥
सवेंचि फिरोन माघारा ॥ उघडोनि पाहे विवरद्वारा ॥ गोपाळ वत्सें समुदाव सारा ॥ ठेविला तैसाची असे तो ॥५५॥
म्हणे हें काय गारुड जाहलें ॥ कृष्णें ऐथें नवल केलें ॥ दोहीं ठायीं वांसरें मुलें ॥ सारखींच असती ॥५६॥
अपूर्व कृष्णाची कळा ॥ होय ब्रह्मीचा पुतळा ॥ शरण रिघावें गोपाळा ॥ अन्याय मागून घेईजे ॥५७॥
लज्जित होऊनि मानसीं ॥ धांवोनि आला हरीपासीं ॥ नमन करोनि चरणांसीं ॥ जोडोनि पाणी बोलत ॥५८॥
म्हणे तूं श्री अनंत ॥ तुझा न कळे खेळ गुप्त ॥ कोटि ब्रह्मांडे निमिषांत ॥ रचोनि मोडिसी इच्छामात्रें ॥५९॥
अनंत माया तुझ्या हातीं ॥ काय एक न करिसी श्रीपती ॥ मी अपराधाची मूर्ती ॥ क्षमा करीं दयाळा ॥१६०॥
तुझा नेणोनियां महिमा ॥ व्यर्थ वर्तलों तस्करकर्मा ॥ तूं सर्वसाक्षी अंतरात्मा ॥ हा निश्चयो मज कळला ॥६१॥
तूं अजर अमरं परात्पर ॥ निरामय निर्गुण निर्विकार ॥ स्वयंभ निरालंब पारावार ॥ अनुपम अगम्य ॥६२॥
ऐसें बोलोनियां पडे ॥ गोपाळ म्हणती लागलें वेडें ॥ वृक्ष ब्राह्मण चहूं तोंडें ॥ शरण आला मुलाशीं ॥६३॥
कर्णी ऐकोनि गोपाळवार्ता ॥ विस्मित जाहलां विधाता ॥ आणोनि वत्सां समस्तां ॥ कृष्णापाशीं दीधलीं ॥६४॥
आज्ञा मागोनि श्रीहरीची ॥ सत्यलोका गेला विरिंची ॥ ऋषि म्हणे विधात्यासी ॥ कथा समस्त ऐकिली ॥६५॥
कोणे एके दिवसांत ॥ रावणाची चुकली तिथ ॥ दशानन क्षोभला अद्भुत ॥ आणा म्हणे ब्रह्मयासी ॥६६॥
उग्र राक्षस खर्वनामा ॥ धाडिला सत्यलोकग्रामा ॥ पाहोनि तयाची प्रतिमा ॥ कंपित जाहला विरिंची ॥६७॥
पर्वताएवढें मस्तक ॥ बारा गांवें लांब नाक ॥ दाढी ऐसें भकास मुख ॥ आंत जिव्हा सरिता जैसी ॥६८॥
इमारतीच्या तुळवटा ॥ तेवीं दंत वाजती खटाखटां ॥ मुसळा सारिख्या रोमजटा ॥ उभ्या असती शरीरीं ॥६९॥
डोंगरांत विशाळ विवर ॥ यापरी त्याचें कर्णद्वार ॥ जुळ्या येवढें डोळे उग्र ॥ वटारोनी पाहातसें ॥१७०॥
मेघ गडबडे अंबरीं ॥ तैसे शब्द गर्जना करी ॥ ब्रह्मयासी म्हणे रामारी ॥ तुजवरी क्षोभला ॥७१॥
ब्रह्मा होऊनियां वेडें ॥ हातीं घेऊनि पातडें ॥ रावणाचे सभेपुढें ॥ बळे बोबडी बोलतां ॥७२॥
इतराजी केली रावणें ॥ बैसवूनि ठेविला सहा महिने ॥ अजीं करुनि बिभीषणें ॥ सोडविला ते समयीं ॥७३॥
आणिक ऐका त्याचे गुण ॥ सुंदर कन्या अवलोकून ॥ काम उद्भवला दारुण ॥ धांवोनि पदरीं झोंबला ॥७४॥
येरी म्हणे ऐक ताता ॥ हें काय आतां ॥ उन्मत्त होऊनि विधाता ॥ बळें संधटे अंगासी ॥७५॥
झटपट होता दोघांसी ॥ कंदर्प गळाला भूमीसी ॥ लज्जित होऊनियां मानसीं ॥ म्लानवदनें परतला ॥७६॥
ऐसीं ब्रह्मयाची कर्मे अचाटें ॥ ईश्वर म्हणतां लाज वाटे ॥ मुखें बोलिला मुनि स्पष्टे ॥ नाहीं ठेविली मर्यादा ॥७७॥
यापरी निरसिलें विधीस ॥ पुढें वर्णिलें वैकुंठास ॥ तेचि निरुपणाचें रहस्य ॥ उघडोनि दावी सज्जना ॥७८॥
जयासी राजा करी भांडारी ॥ जडाव दागिने त्याचे पदरीं ॥ देत घेत आपल्य करीं ॥ राशी मोजी मोत्यांच्या ॥७९॥
परमार्थ भांडार श्रीगुरुचें ॥ मी व्यापारी सेवक त्याची ॥ माझ्या वाचें काय वेंचे ॥ बोलावया ग्रंथासी ॥१८०॥
गांव मोकासा जाहला ज्यासी ॥ सत्ता करावया लाज कायसी ॥ अमृत पाजितां रोग्यासी ॥ अव्हेरी कोणी दिसेना ॥८१॥
असो पैसा नसेल जयाचे पदरीं ॥ लक्ष्मी जावोनि बैसल्या घरीं ॥ कोण म्हणेल त्यास भिकारी ॥ ताजीम देत श्रीमंत ॥८२॥
तेवीं मी रंक दीन ॥ कृपा केली नारायणें ॥ मुखीं चंद्रवतऽ चिद्रत्नें ॥ ग्राहक श्रोते खरिदकर्ते ॥८३॥
आतां असो हा प्रसंग ॥ पूर्ण कर्ता श्रीरंग ॥ पुढील कथेचा मार्ग ॥ क्रमितां निशा पावली ॥८४॥
प्रसंग समाप्तरात्रीस ॥ पुढें प्रारंभ उगवेल दिवस ॥ कथापंथे जावयास ॥ हरुष वाटे मानसीं ॥८५॥
माझा साबडा शब्दु ॥ आवडी परिसती साधु ॥ शहा मुनीचा आनंदु ॥ पूर्णकर्ता ईश्वर ॥८६॥
इति श्रीसिध्दांतबोधे तत्त्वसारनिरुपणं नाम तृतीयोऽध्याय: ॥३॥
ओंव्या ॥१८६॥

N/A

References : N/A
Last Updated : September 23, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP