मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|सिध्दान्तबोध|
अध्याय ३१ वा

श्रीसिध्दान्तबोध - अध्याय ३१ वा

‘श्रीसिध्दान्तबोध’ हा संतकवि श्रीशहामुनि यांचा ग्रंथ म्हणजे मराठी साहित्याच्या खाणींतील एक तेजस्वी हिरा आहे.


श्रीगणाधिपतये नम: ॥ श्रीगुरुदत्तात्रेयाय नम: ॥
ओं नमो सद्गुरु तमारी ॥ प्रकाशती उन्मेषकिरणें भारी ॥ लोपली अविद्याशर्वरी मति-अब्जिनी विकासली ॥१॥
अर्थसुगंधीं मन भ्रमर ॥ अक्षरीं घुमतसे झुंकार ॥ आत्मतृप्ति सिंधु क्षुधाहार ॥ मग लीन राहे उन्मनींत ॥२॥
जीव पडिला पंचकोशीं ॥ निघावया सामर्थ्य नाहीं त्यासी ॥ त्या पंचकोशांच्या कुलुपासी ॥ उडावया सत्ता स्वामीस ॥३॥
अयुतवर्षे केलिया तप ॥ न सांपडे गुरुचें स्वरुप ॥ शरण आलिया स्वल्प ॥ होय अमूप कृपाळू ॥४॥
गुरुमहिमा अगाध ॥ वर्णूं न शकती विबुध ॥ तेथें अल्प मी मतिमंद ॥ काय वक्तृत्वीं शोभेल ॥५॥
सूर्याची काढावया मळी ॥ उटणें लावी नेत्रींची बाहुली ॥ शोधावया गगन पोकळी ॥ पांगुळ उठेल आवडीं ॥६॥
सिंधु शोधावयालागीं ॥ मनांत इच्छा करी मुंगी ॥ शेषकन्येच्या भोगीं ॥ वासना धरी गांडूळ ॥७॥
करावया पृथ्वीचें वजन ॥ मुंगळे जाती ताजवा घेऊन ॥ किंवा वायु मोजावया लागून ॥ थोटयानें कंबर बांधिली ॥८॥
ऐकोनि श्रोते विचक्षण ॥ म्हणती कां केलें ग्रंथलेखन ॥ वक्ता वदे परिसा वचन ॥ अर्थ मनासीं आणिजे ॥९॥
इतुकें घडो शके एकवेळ ॥ परि गुरुमहिमा अगाध नकळ ॥ उडोनि चिमणीचें बाळ ॥ गरुडासी युध्द केवीं करी ॥१०॥
आतां असोत त्या युक्ती ॥ वर्णूं न शके माझी मती ॥ यालागीं चरणांवरुती ॥ डोई ठेविल मौनेंची ॥११॥
बोलावा तितुका शब्दा शून्य ॥ गगनासी न लगे सारवण ॥ तैसें सद्गुरुंचें स्तवन ॥ वृथा वाग्जल्प कर्त्यासी ॥१२॥
जैसें जाणोनि जें बोलणें ॥ जेवीं मुक्तासी कलह करणें ॥ वेदां त्यापुढें डफगाणें ॥ शाहीर मत लबाडी ॥१३॥
वांझपुत्रासी जन्मपत्रिका ॥ वाचितां कोण ग्रह पडे ठावुका ॥ समुद्र पोहण्याचा आवांका ॥ धरितां मूषका वृथाचि ॥१४॥
यापरी कवित्वाची हुटहुटी ॥ लिहितां ग्रंथ दिसे चाहुटी ॥ जैसी घूस उकरी माटी ॥ नसता लाभ श्रमची ॥१५॥
म्हणाल ऐसें कळल्यावरी ॥ मग कां केली हुटहुट भारे ॥ याविषयीं ऐकावें चतुरीं ॥ अनुभव याचा सांगतों ॥१६॥
पुष्पविकास आल्या देखा ॥ सहज फांके सुवासिका ॥ पोट भरलिया अन्नोदका ॥ ढेंकर येतो अनायासें ॥१७॥
तारुण्यपणें माजल्यावरी ॥ सहज उठे कामलहरी ॥ द्रव्य असल्या पदरीं ॥ व्यवहार करितां राही ना ॥१८॥
उदक तेथें हेलावे तरंग ॥ आकार आल्या उठे रंग ॥ जन्म पावल्या अंग ॥ इंद्रियें सहज व्यापिती ॥१९॥
सहस्त्र किरणें प्रकाशलिया ॥ ऊन पडे आपसया ॥ चंद्रबिंब देखिलिया ॥ प्रभा पसरे अंबरीं ॥२०॥
हृदयीं प्रगटलिया बोधु ॥ उल्लेख दावी स्वानंदशब्दु ॥ गर्भवती होतां वधू ॥ पोट वाढे सहजचि ॥२१॥
गगन तेथें पोकळ ॥ वायूपासोनि गुण चंचळ ॥ तेजीं ज्वाळाचें बंबाळ ॥ उदकीं पाताळपण वसे कीं ॥२२॥
बीज तेथें अंकुर ॥ अंकुरीं वृक्षाचा उभार ॥ वृक्षीं शाखांचा पसर ॥ शाखीं पत्र पुष्प फळ ॥२३॥
फळीं निपजे रस शुध्द ॥ रसीं जिव्हेस स्वाद ॥ स्वादी आत्मयास आनंद ॥ आनंदी सुख सहजचि ॥२४॥
ब्रह्म तेथें होय उल्लेखा ॥ उल्लेख तेथें ओंकार देखा ॥ ओंकारी उठती मातृका ॥ मातृकेंत गुण उद्भवे ॥२५॥
गुणीं प्रकृतिस्वभाव ॥ स्वभावें चाले ग्रंथगौरव ॥ ग्रंथीं अर्थाचा उगव ॥ गुरुकृपेनें होतसे ॥२६॥
तुम्हीं म्हणाल मागें ग्रंथ फार जाहले ॥ आतां कशाला नूतन लिहिले ॥ मागें जाहले पुढें होती वहिले ॥ सृष्टिकर्म ऐसेंचि ॥२७॥
मागें जाहली संतमंडळी ॥ असंख्य कविता त्याणीं केली ॥ पुढें होतील एकाहूनि एक बळी ॥ चमत्कारी भविष्यकर्ते ॥२८॥
अज्ञानाचें बोलणें पाहीं ॥ त्यासारिखे संत आतां नाहीं ॥ काय उणें ईश्वराचे ठायीं ॥ अनंत निर्मिता संतासी ॥२९॥
अपार ईश्वराचें कौतुक ॥ कोणे घटीं कैसा विवेक ॥ आतां आहेत पुरुष कित्येक ॥ पुढें होतील गुरुकृपें ॥३०॥
दुर्योधनास भला कोठें दिसेना ॥ धर्मास विश्व सखे जाणा ॥ ज्याची जैसी भावना ॥ त्यासी तैसा जगदीश ॥३१॥
मूर्खास साधु कोठें न दिसे ॥ ज्ञात्यासी विश्व संत भासे ॥ असें हें लौकिक पिसें ॥ ग्रंथ परिसा सादर ॥३२॥
पाहिलिया प्रसंगापासोन ॥ तिसांपर्यंत केलें कथन ॥ बहुमतांचें निरुपण ॥ केलें भिन्नभिन्न प्रसंगीं ॥३३॥
बहुमतांचा कोठा खोलिला ॥ अनेक मतांचा सिध्दांत कथिला ॥ पुढें उर्वरित भाग उरला ॥ ज्यांत बीज पारमार्थिक ॥३४॥
आतां मुख्य कवीची बुध्दी ॥ विशाळ प्रगटेल आत्मसिध्दी ॥ हेलावेल ब्रह्मज्ञानाचा उदधी ॥ जाईल सिध्दी परमार्थ ॥३५॥
ग्रंथ बहुमतांनीं केले ॥ जे समर्थ ज्ञानाचे पुतळे ॥ त्यापुढें आमचे लिहिले ॥ जेवीं गरुडापुढें टोळ उडे ॥३६॥
भानुपुढें खद्योत ॥ तेवीं संतांपुढें माझे ग्रंथ ॥ परि ते महाराज कृपावंत ॥ अव्हेर कवणा न करिती ॥३७॥
वाल्मीक महा अपराधी ॥ कृपा करोनि केला ज्ञानाब्धी ॥ अपार पसरलीसे बुध्दी ॥ केला ग्रंथ शतकोटी ॥३८॥
हस्तामलक शंकराचार्यांसी ॥ वदला पूर्ण ज्ञानासी ॥ मान्य केलें त्याच्या वचनासी ॥ नव्हे रीती समर्थ ॥३९॥
सूर्यास ओवाळिता काडवातीनें ॥ कोणाच आव्हेर केला तेणें ॥ तैसीं माझीं अल्प वचनें ॥ मान्य करिती श्रीमंत ॥४०॥
येथूनि गुरुशिष्यांचा संवाद ॥ करितां निघेल अगाध बोध ॥ तुटती संशयाचे कंद ॥ नुरे द्वंद्व कल्पनेचें ॥४१॥
शिष्य तापत्रये संतापला ॥ शुध्द अनुताप हृदयीं भरला ॥ श्रीगुरुला शरण आला ॥ अनन्यभावें करोनियां ॥४२॥
म्हणे मी बुडालों भवसागरीं ॥ यालागीं काढावें बाहेरी ॥ तुझ्या कृपेची लहरी ॥ भरे अंतरीं तें कीजे ॥४३॥
शोकमोहांचे डोंगर ॥ यांसी वाहतां शिणलों फार ॥ तूं कृपेचा सागर ॥ करीं उध्दार पैं माझा ॥४४॥
जन्ममरण चौर्‍यायशीं यातना ॥ भोगितां त्रास आला मना ॥ आतां करावी स्वामी करुणा ॥ वारीं भ्रमणा जीवाची ॥४५॥
जीवाचें तुटें अविद्याबंधन ॥ ऐसा बोध करा मजलागून ॥ काम क्रोध मद मत्सर दारुण ॥ पीडा यांची निवारीं ॥४६॥
वासना लागलीसे पाठीं ॥ भोगिल्या गर्भवासकोटी ॥ तेणें जाहलों दीन करंटी ॥ पोटीं संताप शमेना ॥४७॥
काय मायेचें गारुड ॥ याचें नुगवे आम्हातें बिरड ॥ जेणें अविद्याबीज भरड ॥ ऐसें कोडें उगवावें ॥४८॥
बहुत शाहाणपण करिता झालों ॥ कितेक पंथांसी शरण गेलों ॥ तीर्थे व्रतें आचरलों ॥ कठिण अभ्यासिली योगमुद्रा ॥४९॥
बहुत केलें ग्रंथशोधन ॥ न मुरे मन होईना उन्मन ॥ यालागीं तुज आलों शरण ॥ कृपाघनें तारावें ॥५०॥
जागृतीं स्वप्नीं सुषुप्तींत ॥ नुमजे प्रपंच परमार्थ ॥ पडिलों कल्पनेच्या गर्तेत ॥ नुगवे अर्थ स्वहिताचा ॥५१॥
जाहलों कुटुंबाचा दास ॥ पोटासाठीं करीं सायास ॥ केला संसाराचा सोस ॥ न मिळे क्लेश सुखाचा ॥५२॥
वृत्तीस विषयाचा भोंवरा ॥ भ्रांति फिरवी गरगरां ॥ कोठें बैसावया न मिळे थारा ॥ भरला वारा अहंकृतीचा ॥५३॥
नाहीं शांति क्षमा दया ॥ न सुटे आशा तृष्णा माया ॥ संतापें व्यापिलीसे काया ॥ विश्रांति छाया तव चरणीं ॥५४॥
जें पाहावें तें कर्म कचाटें ॥ भरती अहंकाराचे फांटे ॥ दु:खसिंधूंत जीव लोटे ॥ चित्त फिरे भवचक्रीं ॥५५॥
आतां तूंचि मोक्षदाता ॥ वारीं माझी भवचिंता ॥ उध्दरावें मज पतिता ॥ तूं संहारिता पापाचा ॥५६॥
परिसोनि शिष्याची उक्ती ॥ कृपेनें द्रवली गुरुमूर्ती ॥ म्हणे तूं कोण्या अर्थी ॥ गुंतलासी तें सांगपां ॥५७॥
काय पुसावयाचा हेत ॥ तें तूं बोले उकलूनि चित्त ॥ तुझा पूर्ण करीन मनोरथ ॥ बोलें निश्चित मजपासीं ॥५८॥
तूं भाकितोसी ग्लानी ॥ संतोष माझें अंत:करणीं ॥ काय वसे तुझ्या मनीं ॥ तेंचि पुसें सुजाणा ॥५९॥
ऐकोनि श्रीगुरुची अभयवाणी ॥ शिष्य संतोष मानी चौगुणी ॥ पुसावया शब्द वदनीं ॥ प्रेमसिंधु उचंबळें ॥६०॥
त्रिवार प्रदक्षिणा करुन ॥ केलें साष्टांग नमन ॥ उभा ठाकला कर जोडून ॥ मंजुळ बोलें नम्रतें ॥६१॥
म्हणे अहो जी दीनदयाळा ॥ तुझा प्रताप सर्वांहूनि आगळा ॥ न वर्णवे सहस्रमुखाला ॥ ब्रह्मादिकां अलक्ष ॥६२॥
हरिहरांवरी तुझी थोरी ॥ इंद्र चंद्र चरण धरी ॥ नारद त्रैलोक्यासि पूज्य निर्धारीं ॥ त्याचें शिरीं हस्त तुझा ॥६३॥
वेदशास्त्रांची पाहिली राहाटी ॥ गुरुवांचोनि परवस्तुसी नव्हे भेटी ॥ करितां साधनकोटी ॥ भूस होती तुजविणें ॥६४॥
अठठयायशीं सहस्त्र ऋषि मिळून ॥ श्रीगुरुसी येती शरण ॥ चौर्‍यायशीं सिध्दांसी भूषण ॥ गुरुकृपेनें शोभलें ॥६५॥
नवनाथ जोगी मत्स्यें गोरखी ॥ दत्त भर्तृहरि जालंधर कानिफा कीं ॥ व्यास वसिष्ठ वाल्मीक जो कीं ॥ जाहले श्रेष्ठ गुरुकृपें ॥६६॥
राम कृष्ण अवतार समर्थ ॥ जाहले गुरुचे अंकित ॥ महाज्ञानी साधुसंत ॥ गुरुमहिम्यानें साजिरे ॥६७॥
काय वर्णूं तुझा महिमा ॥ शरण आलों पादपद्मां ॥ करी मजवर कृपेची गरिमा ॥ उध्दरीं आत्मा हा माझा ॥६८॥
सांगा क्षमेचें लक्षण ॥ शांति म्हणावी कोणालागून ॥ मुख्य वैराग्य ते कवण ॥ धैर्य कशास म्हणावें ॥६९॥
कैसें करावें श्रवणासी ॥ कोणे रीतीं उच्चारावें नामासी ॥ काय लक्षावें मानसीं ॥ ध्यान करणें तें कैसें ॥७०॥
गुरु म्हणे ऐक स्वभावें ॥ विश्व मीच जाणावें ॥ मग रागें कोणावर भरावें ॥ हें समजणें ते क्षमा ॥७१॥
दंत लागल्या जिव्हेसी ॥ नये पाडितां दशनांसीं ॥ उगेंचि राहावें मानसीं ॥ क्षमा त्यासी म्हणावी ॥७२॥
विश्व हें आपुलें अवयव ॥ हें क्षमेचें वैभव ॥ अपराधियाचा करावया गौरव ॥ तेव्हां क्षमा शोभे कीं ॥७३॥
विश्वचि आपुला आत्मा ॥ या बोधाची जाहली सीमा ॥ उडाली भेदाची काळिमा ॥ शांति गरिमा तैं लाभे ॥७४॥
शास्त्रशोधाचा जिराला फुंद ॥ उडोनि गेला भेदाभेद ॥ विकाररहित बोधशुध्द ॥ या नांव ते शांति ॥७५॥
जिराली वैराग्याची खटपट ॥ साधनांची राहिली चटपट ॥ पुसावया सांगावयाची निमे हुटहुट ॥ शांति चोखट ती नांव ॥७६॥
मुराली वृत्ति ब्रह्मानंदीं ॥ शोधितां न मिळे कोठें द्वंद्वीं ॥ सुखाचा जाहला उदधी ॥ नाहीं व्याधि द्वेषाची ॥७७॥
समुद्राऐसा गहन गंभीर ॥ स्वरुपीं जाहला तदाकर ॥ नुगवे मीपणाचा अंकुर ॥ शांतीचा निर्धार तो सत्य ॥७८॥
सांगितलें शांतीचें वैभव ॥ परिसा वैराग्याची ठेव ॥ ज्याचें वाटे नवलाव ॥ तें वैराग्य सांगतों ॥७९॥
कुटुंबत्याग नव्हे वैराग्य ॥ करावा वासनेचा त्याग ॥ न स्पर्शे संकल्पमांग शुध्द वैराग्य त्या नांव ॥८०॥
चिदाकाश तैसा निर्मळ ॥ न स्पर्शे कल्पनेचा मळ ॥ मज नसे देहाचा विटाळ ॥ गेली तळमळ साधनांची ॥८१॥
विषयांचें मूळ तीं इंद्रियें ॥ इंद्रियांचा आधार तो देहे ॥ देहास आत्मयास जो पाहे ॥ अंतर पृथ्वी नभांचें ॥८२॥
मुळींच देह नव्हे आपुले ॥ इंद्रियग्राम जड पडले ॥ विषयांच्या गोंधळें ॥ नये अळुमाळ आत्म्या पैं ॥८३॥
रवि आणि मृगजळ ॥ मयंक आणि कमळ ॥ तेवीं आत्मा सोज्वळ ॥ विषयलेश त्या नाहीं ॥८४॥
आत्मा स्वयंप्रकाश चैतन्य ॥ विषय लिंगदेहाचें स्फुरण ॥ तें स्थूळ इंद्रियद्वारें प्रवेशून ॥ करी विकार सुखदु:खें ॥८५॥
मी आत्मा अजरामर ॥ देहासी लागले षड्‍ विकार ॥ ऐसा ज्यास दृढ निर्धार ॥ वैराग्य खरें या नांव ॥८६॥
त्याग केला कुटुंबीं ॥ लाविली राख घेतली तुंबी ॥ मी अडकलों प्रतिबिंबीं ॥ हें वैराग्य मूर्खाचें ॥८७॥
सांगितली वैराग्याची गोष्टी ॥ ऐका धैर्याची हातवटी ॥ जो आचरेल या राहाटीं ॥ तोचि पुरुष धैर्याचा ॥८८॥
प्रपंच हें ईश्वराचे ॥ हें नासल्या आपुलें काय वेचें ॥ ऐसें समजणें चित्ताचें ॥ धैर्य त्या नांव बोलिजे ॥८९॥
गताचा न कीजे शोक ॥ आपण अजर देख ॥ जन्मल्या मेल्याचें सुखदु:ख ॥ न करी विवेकीं आपण ॥९०॥
जें जें आकारास आलें ॥ तितुकें नाशातें पावलें ॥ हें समजोनि जो राहे अढळे ॥ धैर्ये केवळ तो एक ॥९१॥
घर जाळोनि निमालीं कांताकुमर ॥ गेलें द्रव्य रोग करी संचार ॥ अनेक दु:खांचा पातलिया पूर ॥ होय मेरु धैर्याचा ॥९२॥
मीच आत्मा अविनाशी ॥ गेले आले मानी स्वप्नासी ॥ सदा संतोष अहर्निशीं ॥ धैर्य त्यासी आम्ही म्हणों ॥९३॥
आतां श्रवण हातवटी ॥ ऐकें शिष्या कर्णपुटीं ॥ जैसी बिडालाची दिठि ॥ तन्मय होय मूषकावरी ॥९४॥
गौरीगायन ऐकोन ॥ कुरंग वेधे एकाग्र होऊन ॥ अर्थी बुडोन जाय मन ॥ वृत्ति राहे एकाग्र ॥९५॥
उडे आळस निद्रा भ्रांती ॥ ठसावे विवेक अनुभव चित्तीं ॥ ऐसी ज्याची सावध मती ॥ श्रवणपध्दति ही होय ॥९६॥
केल्या श्रवणाचें मनन ॥ राहे तैं लाभ पूर्ण ॥ मननावांचूनि ॥ श्रवण ॥ जैसे धनलाभा तस्कर हरी ॥९७॥
शेत पिकल्यावरी टोळ पडिले ॥ बहुनवसें पुत्र जन्मले ॥ परी काळें बांधोनि नेले ॥ ज्ञान बुडविलें अहंकारें ॥९८॥
यालागीं श्रवणाचे मनन ॥ करावें हें शहाणपण ॥ नवविधा भक्तीचें लक्षण ॥ प्रथम यापरी जाणावें ॥९९॥
नामायेवढी शक्ती ॥ शोधितां न मिळे असंख्य पोथी ॥ नामें पतित उध्दरती ॥ अतिनष्ट भ्रष्ट जे ॥१००॥
नामें तरले कोटयानकोटी ॥ हीनयाती व्यभिचारिणी खोटी ॥ जीचें नाम घेऊं नये ओंठीं ॥ ती शुध्द जाहली निजनामें ॥१॥
नामें उपणिली थोर पेडी ॥ नाम पातकांतें झोडी ॥ नामाऐसी अगाध प्रौढी ॥ नुरे काडी द्वेषाची ॥२॥
नामे तरले असंख्यात ॥ हें सकळ संतांचे संमत ॥ नामावांचोनि साधन व्यर्थ ॥ फोल दिसती ते कष्ट ॥३॥
नामापुढें अनुष्ठान ॥ योग याग मुद्रा ध्यान ॥ तीर्थव्रतांची किंमत कोण ॥ नामासम तुकावया ॥४॥
नामें चारी मुक्ति होती दासी ॥ चारी पुरुषार्थ लागती पायांसी ॥ नामापासीं देव अहर्निशीं ॥ नामापासीं देव अहर्निशीं ॥ नामापासीं निजमोक्ष ॥५॥
नामापासीं तिष्ठती सिध्दी ॥ नामापुढें तुच्छ भवाब्धी ॥ नामाऐसी गोडविधी ॥ नये शुध्द त्यासम ॥६॥
यापरी नामाचें महिमान ॥ त्वां पुसिलें कैसें करावें स्मरण ॥ जैसें लोभियांचे धन ॥ क्षणभरी तो न विसंबे ॥७॥
गाय फिरे अरण्यांत ॥ वत्सापाशीं अक्षयी चित्त ॥ पक्षिणी चारिया दूरी जात ॥ परी अंतर पिल्यांपासी ॥८॥
बहुतां दिवशीं पतीची वार्ता ॥ आलिया परिसे पतिव्रता ॥ कीं निमाल्या पुत्र कर्ता ॥ खेद पितयाचा जाईना ॥९॥
अखंड ईश्वराची मूर्ती ॥ विसरुन पडे ज्याचें चित्तीं ॥ अष्टौप्रहर लयस्थ व्रती ॥ स्मरणशक्ति या नांव ॥११०॥
ब्रह्मादिक मुंगीपासोन ॥ शिव विष्णु सुरगण ॥ इंद्र चंद्र ब्रह्मांड संपूर्ण ॥ लक्षी ब्रह्म एकचि ॥११॥
पशु पक्षी वनचर जळचर ॥ तृण पाषाण मेरुमंदार ॥ सत्यलोक वैकुंठ कैलासशिखर ॥ देखे चराचर एकवस्तु ॥१२॥
अंतर्बाह्य आत्मा एक ॥ उडाला द्वैताचा कळंक ॥ हेचि लक्षाची मूस सुरेख ॥ सभाग्य देख तो जाहला ॥१३॥
झांकोनि अंबकें दोनी ॥ लक्षिती शून्यालागोनी ॥ एक झगमगीत रुप पाहोनी ॥ तन्मय होती अंध ते ॥१४॥
मी कोण लक्षितों काये ॥ विचार ध्यानास नये ॥ कीर्ति तितुका तो अपाये ॥ उपाय तो लक्ष नव्हे ॥१५॥
ध्येय ध्याता ध्यान त्रिपुटी जाण ॥ तें कैसें म्हणों ध्यान ॥ होय त्रिपुटीखंडन ॥ ध्यान लक्ष तो भृत्य ॥१६॥
त्वां पुसिलें पृच्छेसी ॥ तें मी वदलों यथार्थेसीं ॥ पुढें काय संशय मानसीं ॥
मन उल्हासीं तो वदे ॥१७॥
गुरुवाक्य उदेला हेली ॥ विकासली शिष्यमनकमळी ॥ नेत्रीं आनंदाश्रु पातलीं ॥ मृद मवाळीं विनय वदे ॥१८॥
म्हणे स्वामी जगज्योती ॥ तुझ्या वक्तृत्वाची अपूर्व स्थिती ॥ इतरही ग्रंथकार वदती ॥ गूढ अर्थी तर्केना ॥१९॥
अर्थ उकलोनि प्रांजळ ॥ ओव्या सुरस शब्द मंजुळ ॥ प्रवाहे जैसें गंगाजळ ॥ नुरे मळ पृच्छेचा ॥१२०॥
सांगा कवण तो स्वधर्म ॥ कशास म्हणावें परधर्म ॥ कोणतें नेमावें कर्म ॥ यांचें वर्म स्वयें वदा ॥२१॥
दया कोण धर्म कोणता ॥ देव पुजावा कोण जप कोणता ॥ कोण मंत्र स्नान तत्वतां ॥ हे गुरुनाथा स्वयें नेमी ॥२२॥
शिष्याचा प्रश्न उदेला इंदू ॥ गुरुचा हेलावला ज्ञानसिंधू ॥ करावया अगाध बोधू ॥ वेदविशुध्द सर्वज्ञ ॥२३॥
परिक्षी परिक्षवंता चतुरा ॥ निवडोनि दावितों अर्थहिरा ॥ अमूल्य जिन्नस माल खरा ॥ प्रज्ञाधनें घेईजे ॥२४॥
द्रवती चंद्रामृततुषार ॥ घेऊं जाणती चकोर चतुर ॥ उदय पावतां सहस्त्रकर ॥ उल्हासें विकास कल्हारीं ॥२५॥
मेघमुखींचा बिंदुउदक ॥ वरिच्यावरी झेली चातक ॥ कूर्मजननीचें अर्भक ॥ निरखितां तृप्त होतसे ॥२६॥
वक्तृत्वाचा येतां लोट ॥ आकर्णितां भरे अर्थीचें पोट ॥ लागतां मधाचें बोट ॥ मक्षिका लिगटत अनायासें ॥२७॥
चुना हळद पूर्व रंग टाकिती ॥ एकत्र दोनी आरक्त होती ॥ वक्तया श्रोत्यांची रीती ॥ ऐसी गति पाहिजे ॥२८॥
दुग्धास ऊत येतां जाण ॥ वर सिंचिती उदकालागून ॥ तो मित्र आज्ञा मानून ॥ तत्काळ बैसे तळासी ॥२९॥
ओघ येता नदोनदीं ॥ ऐक्य होती सिंधूचे संधीं ॥ गुरुशिष्यांची बुध्दि ॥ याविधि यावें तें सुख ॥१३०॥
हें असो त्वां पुसिले प्रश्न ॥ सांगतों घे गा निरखून ॥ ओतितों अक्षरें रस भरुन ॥ होय तृप्त सुधाहारी ॥३१॥
त्वां पुसिले स्वधर्म कवण ॥ ओळखावें जीवाचें लक्षण ॥ जीव ब्रह्मींचा बिंब जाण ॥ नव्हे पंचभूत मायेचा ॥३२॥
जीव अंश माझा असे सत्य ॥ ऐसें कृष्ण वदे गीतेंत ॥ यालागीं जीवाची जे जात ॥ तोचि स्वधर्म करावा ॥३३॥
जीव नव्हे ब्राह्मण क्षत्री ॥ वैश्य शूद्र पुरुष ना स्त्री ॥ उंच नीच वर्ण तंत्रीं ॥ नव्हें सूत्रीं कर्माच्या ॥३४॥
जीवाचा हाचि स्वधर्म ॥ मीच आत्मा परब्रह्म ॥ मज कैचें क्रियाकर्म ॥ मी मूळबीज परमात्मा ॥३५॥
स्थूळ सूक्ष्म कारण ॥ याचा साक्षी मीच जाण ॥ मी शुध्द गा चैतन्य ॥ मायातीत शुध्दवस्तु ॥३६॥
मी मूळाधार ना स्वाधिष्ठान ॥ मणिपूर ना अनुहत लक्षण ॥ विशुध्द चक्र परब्रह्मरंध्राहून ॥ सहस्त्रदळ तें नव्हे ॥३७॥
चतुर्दळ षड्‍दळ ॥ द्वादशदळ आणि षोडशदळ ॥ द्विदल षट्‍चक्रांची माळ ॥ नसे मळ मजपासीं ॥३८॥
नेत्र कंठ ना हृदयस्थान ॥ पंचमुद्रा ना सत्रावी जीवन ॥ अवस्था तीन निर्गुण ॥ सहजानंद माझा मी ॥३९॥
मी नव्हे गा पंचप्राण ॥ पंचज्ञानेंद्रियें जाण ॥ पंच कर्मेंद्रियें भिन्न ॥ पंचविषय नव्हे मी ॥१४०॥
नव्हे मी अंत:करण ॥ संकल्पविकल्पात्मक मन ॥ बुध्दीचा निश्चयो नव्हे जाण ॥ चित्त अहंकार मी नव्हे ॥४१॥
नव्हे मी विराट हिरण्य माया ॥ महत्तत्त्व ना मात्रात्रया ॥ नव्हें मी साक्षी मूळ तुर्या ॥ अगाध चर्या मजमाजी ॥४२॥
या नांव स्वधर्म बोलिजे ॥ हें न कळे तें वायां जल्पिजे ॥ आतां तो परधर्म सहजें ॥ ऐक निवाडें गुणज्ञा ॥४३॥
मी ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र ॥ मी उंच नीच नारी नर ॥ माझे यातीचा उत्तम प्रकार ॥ माझे घर कुटुंब मी वतनीं ॥४४॥
मी आकर्णी निरखीं नयनीं ॥ माझी घ्राण रसना वदे वदनी ॥ माझा देह संसार पत्नी ॥ मीच पापी पुण्यात्मा ॥४५॥
देह जाण पंचभूतांचे ॥ माझें म्हणोनि मूर्ख नाचे ॥ बंधन पडलें अविद्येचें ॥ विश्व गुंतलें भवचक्रीं ॥४६॥
प्रकृतीपासोन निपजे कर्म ॥ तें माझे म्हणे अहंभ्रम ॥ ज्ञानावाचोनि अवघा श्रम ॥ नये वर्म निवडितां ॥४७॥
असो परमार्थाची क्रिया ॥ त्वां परीक्षिली चातुर्या ॥ आतां कर्माच्या पर्याया ॥ उघड तुज सांगतों ॥४८॥
देह जड इंद्रियें जड ॥ या प्रकारें लिंगदेह उघड ॥ हिरण्यगर्भाची गडबड ॥ कर्ते पंचक कर्मासी ॥४९॥
रवि तेथें प्रकाश पडे ॥ चंद्र तेथें चांदणे उघडे ॥ वायुपासी चंचळता जोडें ॥ पाणी तेथें पातळ ॥१५०॥
शर्करा तेथें स्वाद ॥ पुष्पामाजी वसे गंध ॥ तेवीं देहाचा संबंध ॥ कर्म विस्तार स्वभावें ॥५१॥
उदक तेथें तरंग ॥ सुवर्णापासी उमटे नग ॥ पंचभूतांचें जग ॥ जगीं कर्म वेष्टिलें ॥५२॥
मृतिकेपोटीं घट ॥ तंतुसंबंधीं प्रगटती पट ॥ बीजामुळें वाढे वट ॥ विस्तार शाखा बहुविध ॥५३॥
अग्निपासोन भांडें तापें ॥ भांडयामुळें उदक तापें ॥ उदकापासोनि पाकांचे रुप ॥ मग रुचि दे भोक्तया ॥५४॥
लिंगदेहापासोन ॥ चलन इंद्रियांस जाण ॥ इंद्रियांपासोनि कर्म दारुण ॥ विस्तार पावे सुख:दुख ॥५५॥
कर्माचे मूळ लिंगदेह जाण ॥ लिंगदेह म्हणजे अंत:करण ॥ अंत:करणाहोनि भिन्न ॥ आत्मा जाणती ज्ञानी सर्वदा ॥५६॥
सांगितली कर्माची गती ॥ आतां ऐक दयेची रीती ॥ जेणें बोध उपजे चित्तीं ॥ वर्तणुकें हातवटी ॥५७॥
आपुले अवयव पाद कर ॥ त्यांसी संरक्षण आठही प्रहर ॥ तैसे जीव समग्र ॥ अंगभूत जाणावे ॥५८॥
कोणाचें न दुखवावें अंतर ॥ हें मुख्य दयेचें घर ॥ मुंगीपासोनि चराचर ॥ दिसे साचार एकवस्तु ॥५९॥
दुसर्‍याची पीडा निवारुन ॥ त्याचें करावें समाधान ॥ रोगी दरिद्री दीन हीन ॥ करावें संरक्षण ती दया ॥१६०॥
आपल्या पोटींचीं बाळें ॥ त्यांसाठीं जीव जैसा तळमळे ॥ तैसा भूतमात्रीं कावळे ॥ करणें दया त्या नांव ॥६१॥
मुख्य दयेचें लक्षण ॥ आपुल्या जीवाचा उध्दार करण ॥ चौर्‍यायशीं नरकांपासून ॥ मुक्त होणें संसारीं ॥६२॥
आपुल्या जीवास जो उध्दरी ॥ तोचि दयेचा अधिकारी ॥ वर्म जाणिजे चतुरीं ॥ आतां धर्म कोण तो ऐक ॥६३॥
धर्म म्हणजे देवाची भक्ती ॥ बहु उपासना फळाशा चित्तीं ॥ वांच्छिती स्वर्गप्राप्ती ॥ धर्म नीति बोलिजे ॥६४॥
अनेक देवांची उपासना सांडणें ॥ मुख्य ईश्वरीं प्रेम धरणें ॥ एकनिष्ठ निष्काम भक्ति करणें ॥ श्रेष्ठ धर्म बोलिजे ॥६५॥
कृष्ण बोलिला सर्व धर्म त्यागणें ॥ म्हणजे बहुदेवांची भक्ति त्यजणें ॥ मज एकातें शरण येणें ॥ मुख्य धर्म या नांव ॥६६॥
सांडोनि वासनेचा कल्प ॥ मी ब्रह्म हा बोधपीप ॥ याचा अर्थ श्रीकृष्णभूप ॥ बोलिला सदूप गीतेंत ॥६७॥
हा स्वधर्माचा अर्थ ॥ पुढें दानाचा पदार्थ ॥ ज्यातें उगवे अवघी गुंत ॥ तो परिसें कर्णपुटीं ॥६८॥
हरिश्चंद्र राजा दानशूर ॥ भोगी दु:खाचें डोंगर ॥ शिबि मयूरध्वज कर्णवीर ॥ पडिले घोरांतदु:खचक्रीं ॥६९॥
मुळीं देहच आपुला नव्हे ॥ मग दान कशाचें करावें ॥ आकारलें तें प्रपंचस्वभावें ॥ देता घेतां दोनी मिथ्या ॥१७०॥
मुख्य दान ईश्वराचें म्हणावें ॥ आपण कांहीं नाहीं निश्चयें मानावें ॥ यांत प्रपंच अवघा उघवे ॥ तें वर्म जाणती श्रेष्ठ जे ॥७१॥
मी दाता अभिमान धरिती ॥ यालागीं क्लेश बहु भोगिती ॥ अहंकृती संत निरसिती ॥ सुखें असती निरुपाधी ॥७२॥
धर्म सांगतां दानाचा महिमा ॥ तोही निवेदिला शिष्योत्तमा ॥ आतां देवपूजेच्या नेमा ॥ तेंही सुगम सांगतों ॥७३॥
एक नेमून पुढें ठेवी देव ॥ दुसरा पदार्थ पूजा गौरव ॥ तिजा आपण कल्पी जीव ॥ होय नेमक आपण कर्ता ॥७४॥
सजीव पुष्पें तोडून ॥ निर्जिव पाषाण धातूस वाहण ॥ हें अज्ञानाचें लक्षण ॥ पूजाधर्म तो नव्हे ॥७५॥
सर्वही एक ब्रह्म जाणिजे ॥ ही महापूजा बोलिजे ॥ विषमभाव त्यागिजे ॥ सम घेइंजे ही पूजा ॥७६॥
दुर्जन कामक्रोधादिकांस ॥ त्यागोनि संतापउर्मीस ॥ गेले भेदाभेद द्वेषाद्वेष ॥ पूजा विशेष ती नांवें ॥७७॥
देव प्रसन्न होय तें करावें कर्म ॥ हें पूजेचें मुख्य वर्म ॥ बाह्य उपचार वृथा श्रम ॥ पूजाकर्म तें नव्हे ॥७८॥
देव आपण पूजा ही त्रिपुटी ॥ तेथें पडली देवाची तुटी ॥ लिंगीं पूजिला धूर्जटी ॥ केवीं प्रसन्नता होईल ॥७९॥
अभंगास करुं नये भंग ॥ या नांव पूजा सांग ॥ एक भक्त देव कर्ता भाग ॥ चुकेल लाग पूजेचा ॥१८०॥
जैसा एक निर्मळ हिरा ॥ तैसा ब्रह्मींचा पसारा ॥ अकल्पनेचा करां ॥ घालुंये ही पूजा ॥८१॥
ऐकें जपाची मात ॥ माळा फिरवी बोटांत ॥ जेव्हां दांत ओंठ हालत ॥ चित्त फिरत दशदिशे ॥८२॥
जप म्हणिजे चित्त नाढळे ॥ नामरुपीं आहे जडलें ॥ सदा सोहं ध्यानीं गुंतलें ॥ अचल बैसले ध्रुव जैसा ॥८३॥
हा जप बोलिजे श्रेष्ठ ॥ मंत्रक्रिया ऐसे प्रकट ॥ जेणें चुके कर्म राहाट ॥ पिके पेंठ मोक्षाची ॥८४॥
कोटीमंत्राचें बीज ॥ गुरुमंत्र गोप्यगुज ॥ ईश्वर जिंके येवढें तेज ॥ महावाक्याचें रहस्य ॥८५॥
ज्या मंत्राची प्रौढी ॥ इतर मंत्र काय बापुडीं ॥ जाहली दुष्टकर्मांची कोडी ॥ उभवी गुढी मोक्षाची ॥८६॥
मंत्र जपतां हृदयभुवनीं ॥ करी जन्ममरणाची धुनी ॥ पापाचा लेश नुरे स्वप्नीं ॥ पवित्र करी जीवात्मा ॥८७॥
श्रेष्ठ मंत्र त्यजोनि अल्प जपणें ॥ हिरा टाकोनि गारगोटी बांधणें ॥ कामधेनु दवडूनि पोसणें ॥ वत्स जैसे अजाचें ॥८८॥
गुरुनाम तारक मंत्र ॥ जेणें चाले काळावर शस्त्र ॥ खेरीज अन्य स्वतंत्र ॥ त्रिभुवनांत असेना ॥८९॥
सुधा सांडूनि तक्र प्राशन ॥ कण त्यजोनि कोंडा सांठवण ॥ विष्णु सोडूनि महिषाचें पूजन ॥ करणें हें विपरीतार्थ ॥१९०॥
सुवासिणीचें आमंत्रण वेश्येला ॥ गुरुमंत्र सांडूनि इतर घेतला ॥ ब्राह्मण अव्हेरुनि कुलाल पूजिला ॥ नागवला तो आत्महिता ॥९१॥
ही मंत्राची हातवटी ॥ पुढें ऐक स्नानगोष्टी ॥ निर्मल अंत:करण पोटीं ॥ अंकुर नुठी विकल्पाचा ॥९२॥
संकल्पापासोनि मन धुतलें ॥ वाचा सत्य सरळ बोले ॥ असत्याचा मळ न मिळे ॥ पवित्र स्नान तें म्हणिजे ॥९३॥
जैसें सूर्याचें बिंब ॥ तैसें जयाचें अंतर स्वयंभ ॥ गेलें विकाराचें देहमळ ॥९५॥
यापरी स्नानाचा उगावा ॥ तूतें निवेदिला शिष्या बरवा ॥ तुझ्या प्रश्नाचा ठेवा ॥ तुझ्या पदरीं घातला ॥९६॥
यापरी श्रीगुरुने ॥ शिष्याचें केलें समाधान ॥ पुढती होऊनियां सावधान ॥ पुसेल आणिक प्रश्नासी ॥९७॥
त्यांसी ऐसी श्रोतियांची पडे मिठी ॥ तरी वक्त्याची हातवटी ॥ ग्रंथश्रवणें सार्थक ॥९९॥
न लगे अर्थ पुसावा दुसर्‍यांसि ॥ वाचितां ठावा पडे मानसीं ॥ उघड प्रांजळ बोध जीवासी ॥ होय लाभ या ग्रंथीं ॥२००॥
पाहोनियां इतर ग्रंथा ॥ नाहीं केली हे कविता ॥ श्रीगुरुचा आशीर्वाद पुरता ॥ बोधठसा अंतरीं ॥२०१॥
श्रीमुनींद्रगुरुचें वचनें ॥ सर्वांचें झालें कल्याण ॥ त्वा स्वामीं विसरोन ॥ आणिक काय जोडावें ॥२०२॥
वायूचा होतां स्पर्श ॥ तरंग हेलावे समुद्रास ॥ तैसी गुरुकृपा शहामुनीस ॥ उठे तर्क कवितेचा ॥२०३॥
इति श्रीसिध्दांतबोधग्रंथे अध्यात्मनिरुपणतत्वसारनिर्णये एकत्रिंशोऽध्याय: ॥३१॥
अध्याय ॥३१॥ ओव्या ॥२०३॥

N/A

References : N/A
Last Updated : November 22, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP