मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|सिध्दान्तबोध|
अध्याय ३३ वा

श्रीसिध्दान्तबोध - अध्याय ३३ वा

‘श्रीसिध्दान्तबोध’ हा संतकवि श्रीशहामुनि यांचा ग्रंथ म्हणजे मराठी साहित्याच्या खाणींतील एक तेजस्वी हिरा आहे.


श्रीगणाधिपतये नम: ॥ श्रीगुरुभ्यो नम: ॥
ऐका कीर्तनाचा महिमा ॥ कीर्तन आवडे पुरुषोत्तमा ॥ शिवाचाही वाढवी प्रेमा ॥ कीर्तनीं ब्रह्मा संतोषे ॥१॥
कीर्तन आवडे नारदासी ॥ कीर्तन प्रिय सनकादिकांसी ॥ कीर्तन आवडे ऋषींसी ॥ कीर्तनीं व्यास वाल्मीक ॥२॥
कीर्तनीं शुक सुखावला ॥ कीर्तन प्रिय दत्ताला ॥ कीर्तन आवडे कपिलमुनीला ॥ कीर्तनीं काळ थरारी ॥३॥
रावणें केलें अनुष्ठान ॥ प्रसन्न होईना गौरीरमण ॥ मग करितां कीर्तनगायन ॥ जाहला प्रसन्न दीधला वर ॥४॥
प्रल्हादें करितां कीर्तन ॥ त्यास जाळीना हुताशन ॥ कीर्तन ऐकतां बळीन ॥ भक्त जाहला दैत्य असतां ॥५॥
कीर्तनें तरलें दुराचारी ॥ पतित दुरात्मे अनाचारी ॥ स्त्री पुरुष व्यभिचारी ॥ कीर्तनीं पार पावले ॥६॥
कीर्तनीं तरले महादोषी ॥ दग्ध जाहल्या पापराशी ॥ कीर्तन करितां भलतयासी ॥ दोष त्यासी असेना ॥७॥
कीर्तन भक्तीचा गौरव ॥ कीर्तनें संतांची ठेव ॥ कीर्तनें पावन होती सर्व ॥ कीर्तन वैभव साधूंचें ॥८॥
कीर्तनीं रामासी गोडी ॥ कीर्तनीं मारुतीस आवडी ॥ कीर्तनीं गरुड लडबडी ॥ पडे उडी देवांची ॥९॥
कीर्तनीं वळे घनसांवळा ॥ कीर्तनीं कृष्णाची लीला ॥ साह्य होय कीर्तनकर्त्याला ॥ चक्र घेऊनी उभा असे ॥१०॥
कीर्तनीं तुष्टे नीलकंठ ॥ धांवे विष्णु सोडून वैकुंठ ॥ कीर्तन करितां घडघडाट ॥ काळिज फुटे काळाचें ॥११॥
कीर्तनीं उभा नारायण ॥ श्रोता वक्ता सावधान ॥ भोळे भाविक सात्विक जन ॥ तरती नीच नीचाहूनी ॥१२॥
यापरी कीर्तनघोष ॥ हा संतांचा विलास ॥ सर्व शास्त्रांचें रहस्य ॥ गीता भागवत कीर्तनीं ॥१३॥
वक्ता विनवी श्रोतयांस ॥ कीर्तनीं नका करुं आळस ॥ पावाल मुक्तिसायुज्यास ॥ शुकवासांची प्रतिज्ञा ॥१४॥
अगाध कीर्तनाची प्रौढी ॥ काय तीर्थे व्रतें तारिती बापुडीं ॥ जप तप साधनें जाहलीं वेडीं ॥ ही गोडी जाणती संत कीं ॥१५॥
श्रीहरीनें वाहिली आण ॥ कीर्तनें उध्दरीन पतित जन ॥ हें वर्म जाणती सज्जन ॥ मूर्ख धांवती तपासी ॥१६॥
सर्वांसी करितों नमन ॥ आळस टाकोनि करा श्रवण ॥ होईल तुमचें कल्याण ॥ आशीर्वादें संतांच्या ॥१७॥
सांगीतला कीर्तनाचा रंग ॥ संतोष पावे अंतरंग ॥ पुढें कथेस प्रसंग ॥ प्रश्न परिसा शिष्याचे ॥१८॥
मागिल्या अध्यायीं निरुपण ॥ शिष्यानें पुसिले पांच प्रश्न ॥ अति सखोल गहन ॥ अनुपम उपयोगी ॥१९॥
शिष्यप्रश्नइंदु उदेला ॥ सद्गुरुसमुद्र हेलावला ॥ कीं चातकासाठीं वळला ॥ मेघ गडगड गर्जूनी ॥२०॥
कमळासाठीं सूर्य धावला ॥ वत्सास धेनूनें पान्हा घातला ॥ तेवीं शिष्यास गुरु पावला ॥ निर्धनासी धन जेवीं ॥२१॥
लावण्य़वनिता तारुण्य ॥ इच्छेसारखा भ्रतार मिळे जाण ॥ समाधान पावोनि निवे मन ॥ भोगीं निवे अष्टांग ॥२२॥
स्वातीजळशुक्तीपोटीं ॥ पडतां निपजतीं रत्नें गोमटीं ॥ तेवीं गुरुशिष्यांची मिठी ॥ जन्मे अनुभव मुक्ताफळ ॥२३॥
रविदधीचे घुसळणीं ॥ त्यांत निघे स्वादिष्ट लोणी ॥ किंवा दोन्ही काष्ठांचे मंथनीं ॥ प्रगटे वन्हि दाहक ॥२४॥
तेवीं गुरुशिष्याचा संवाद ॥ प्रगट होय आत्मबोध ॥ श्रोत्यास पावे आल्हाद ॥ होय लाभ सुखाचा ॥२५॥
दोघांचा झगडा तिसर्‍यास लाभ ॥ सहज न बोलती शब्दगर्भ ॥ किंवा भिडती दोन्ही इभ ॥ तमाशा सुख जगासी ॥२६॥
स्त्रीपुरुषांचे मैथुनीं ॥ बाळक उपजे रत्न गुणी ॥ अथवा गंगायमुनेचे मिळणीं ॥ तीर्थपर्वणी विशेष ॥२७॥
तैसी गुरुशिष्यांची गोष्टी ॥ अंतरीं परिसा कर्णपुटीं ॥ जेथें परमार्थी गोष्टी ॥ सुख संतुष्टीं मन निवे ॥२८॥
मागिल्या अध्यायींच्या प्रश्नाला ॥ गुरु म्हणे सावधान शिष्याला ॥ उघडोनि मतीच्या मांदुसेला ॥ अर्थहिरा दावितों ॥२९॥
प्रकृतिपुरुषांच्या भेदा ॥ त्वां पुसिला कैसा सांदा ॥ उघडितों याचे विनोदा ॥ घरीं मेधा तूं येथें ॥३०॥
कोयीपासी रस आंबट ॥ वरुता दावी स्वादिष्ट ॥ एकासीं दोन फांट ॥ तेवीं प्रकृति पुरुष पहा ॥३१॥
दीपज्योति पाहतां श्वेत ॥ त्यांतचि लाली रंग दावित ॥ उभयतां लक्षितां एक ज्योत ॥ प्रकृति पुरुष यापरी ॥३२॥
वरुता वाहे तो प्राण ॥ अधोद्वारीं वाहे तो अपान ॥ उभयतां भागीं वायु जाण ॥ तेवीं माया पुरुष कीं ॥३३॥
अंगा पाठी आणि पोट ॥ दोहींचा एक देहीं थाट ॥ वाहती गंगायमुनेचे लोट ॥ नीर एक स्वभावें ॥३४॥
उजवें दार आणि परसदार ॥ उभयतां मिळोनि एकचि घर ॥ एक वाम एक उजवा कर ॥ दोन्ही हात देहाचे ॥३५॥
डावा आणि उजवा डोळा ॥ देखणी दिठी एक दाहींला ॥ चाले इडा पिंगळा ॥ मुळीं श्वास एकचि ॥३६॥
प्रकृति पुरुषांची रचना ॥ तूतें दाविली विचक्षणा ॥ नाहीं ठेविलें अनुमाना ॥ यथार्थेसीं बोलिलों ॥३७॥
वस्त्राची घडी उकलोनी ॥ दाविती गिर्‍हाईकालागोंनी ॥ आंत बाहेर पाहोनि नयनीं ॥ मग घेती सणगासी ॥३८॥
पाण्यांत म्हैस बाहेर मोल ॥ तैसे नाहीं बोलिलों बोल ॥ आंत बाहेर निर्मळ ॥ उघडोनि अर्थ दाविला ॥३९॥
आतां भक्ति म्हणिजे काय ॥ तुझ्या प्रश्नाचा अभिप्राय ॥ त्याचा सांगतों निर्णय ॥ धरुनि धैर्यं आकर्णीं ॥४०॥
बहुतां ठायीं भक्तीचा लक्ष ॥ बहु उपासना बहु मोक्ष ॥ आतां होऊनियां दक्ष ॥ अक्षयी निरखीं अर्थ सिध्दी ॥४१॥
मुरळ्या बसव्या दांगत वाघे ॥ मुख्य रोगी भुते भीक मागे ॥ जोगी जंगम फकीर मलंग ॥ भक्ति अंगें म्हणविती ॥४२॥
भक्ति करिती हरिदास ॥ कीर्तनीं आणिती नवरस ॥ देह देव्हारे घुमार्‍यांस ॥ त्यासही भक्त म्हणावें ॥४३॥
श्रवण करावें तेही भक्ती ॥ स्मरणीं असावें तेही भक्ति ॥ अर्चन पूजा तेही भक्ती ॥ दास्यत्व भक्ति बोलिजे ॥४४॥
करावें देवास वंदन ॥ हेंही भक्तींचें लक्षण ॥ पादसेवा जाण ॥ तिलाही भक्ति बोलिजे ॥४५॥
देवासी मैत्री सख्यपण ॥ हेंही भक्तीचें कारण ॥ आपुला आत्मा करावा अर्पण ॥ हाही भक्ताचा महिमा ॥४६॥
सर्वांस अधिकार श्रवण ॥ श्रवण करिती सर्व जन ॥ एकाग्र करोनियां मन ॥ होय परीक्षिती तो एक ॥४७॥
मृत्यु पातल्या जवळ ॥ श्रवणीं बैसल्या नाढळे अढळ ॥ वन्हि पेटल्या धर जळे ॥ सांगतां श्रवणीं उठेना ॥४८॥
पुत्र निमाल्याची ऐकतां वार्ता ॥ परी न उठे श्रवण करितां ॥ तेव्हां लाभ गा तत्वतां ॥ श्रवण भक्ति म्हणावें ॥४९॥
दोन प्रहर कीर्तन करणें ॥ बिर्‍हाडा जाऊनि शयन करणें ॥ म्हणों नये हें कीर्तन ॥ कीर्तन म्हणजे अष्टप्रहर ॥५०॥
म्हणोनि कीर्तन नारदासी ॥ भक्ति शिरोमणि त्यासी ॥ कीर्तनावांचोनि दिवा निशीं ॥ एक पळ न राहती ॥५१॥
चार घटिका नामघोष केला ॥ आळसें उगाच राहिला ॥ केव्हां स्मरला केव्हां विसरला ॥ हें बेगारी स्मरण ॥५२॥
उठले अरिष्टांचें बंबाळ ॥ नाम उच्चारी कल्लोळ ॥ विसर न पडे एक घटिका पळ ॥ जिव्हा वळवळ चपळ नामीं ॥५३॥
पातल्या दु:खाच्या राशी ॥ राम स्मरे अहर्निशीं ॥ यालागीं स्मरण प्रल्हादासी ॥ स्मरणभक्ति बोलिजे ॥५४॥
अर्चनक्रिया जाण ऐसी ॥ चित्त असावें देवापासी ॥ तेव्हां करावें देवपूजेसी ॥ येर्‍हवीं श्रम वाउगा ॥५५॥
आपण बैसे देवपूजेला ॥ रागें काम सांगें माणसाला ॥ घाल खोगीर भरीं कंठाळेला ॥ लवकरी आटोपितों पूजा ॥५६॥
आपण देवपूजा करीं ॥ मन चहूंकडे फिरे फेरी ॥ रांगता पोरें येतां मारी ॥ कटकट करी घरांत ॥५७॥
कोणी पुसों आला त्यासी ॥ मसलत सांगे करितां पूजेसी ॥ हांसें वाटे देवासी ॥ म्हणे भला भला भटला ॥५८॥
ऐसें दांभिक पूजन ॥ देव कैसा होईल प्रसन्न ॥ याहूण मोकळा जाण गुंतो नसे त्यालागीं ॥५९॥
स्थिरावे देवपूजेंत मन ॥ या नांव भक्तीचें अर्जुन ॥ हें पृथुरायास घडलें जाण ॥ भूषण त्याचें पुराणीं ॥६०॥
एकास वंदी एकास निंदी ॥ एकास म्हणे हा दुर्बुध्दी ॥ एकाचें भावें लागे पदीं ॥ भेदाभेदीं जो वर्ते ॥६१॥
उंचयाती करी नमन ॥ नीचास म्हणे शिवेल कोण ॥ ऐसें ज्याचें भिन्न ज्ञान ॥ वंदनभक्ति ते नव्हे ॥६२॥
ब्रह्मादिक मुंगीपासोन ॥ खर शूकर श्वान जाण ॥ ब्राह्मण शूद्र धेनु यवन ॥ समान वंदन जो करी ॥६३॥
देव देऊळ नंदी पायरी ॥ पिंपळ बेल तुळसी मंजिरी ॥ वृक्ष पाषाण तृण अंकुरीं ॥ मानी सर्व हरिरुपें ॥६४॥
मही नीर अनल अनिल ॥ आकाश रवि तारामंडळ ॥ पशु पक्षी कुळाचळ ॥ कमळणी मयक सम वंदी ॥६५॥
सर्वांस मान्य वंदन ॥ हें भक्तीचें मंडण ॥ हें अक्रुरास घडलें जाण ॥ इतरां करितां अवघड ॥६६॥
सर्वत्र म्हणती दास ॥ काय देवाचे राहटती सेवेस ॥ सेवक बोलिजे मारुतीस ॥ इतर चाउटी बोलाची ॥६७॥
पादसेवन घडलें लक्ष्मीसी ॥ इतरां दुर्लभ दूरदेशीं ॥ पदीं चित्त जडे तो पादसेवेसी ॥ हें सुख भोक्ते संत कीं ॥६८॥
म्हणे माझा सखा हरी ॥ बहुदेशीं प्रीत धरी ॥ यास म्हणावें व्यभिचारी ॥ सख्यपण तें नव्हे ॥६९॥
आसनीं भोजनीं शयनीं ॥ न विसरे देवालागोनी ॥ बैसतां खेळतां गमनीं ॥ चित्त जडे हरिपासी ॥७०॥
देवाविण न गमे एक क्षण ॥ वियोगें पळ युगासमान ॥ उदकारहित न राहे मीन ॥ ही सख्यभक्ति बोलिजे ॥७१॥
भगवंतीं संसार करावा अर्पण ॥ दारा पुत्र तनु धन ॥ हीस म्हणावें आत्मनिवेदन ॥ बळीनें केली हे भक्ती ॥७२॥
सख्य केलें अर्जुनानें ॥ आत्मनिवेदन बळीनें ॥ हें भक्तीचें साजणें ॥ जाणती सुजाण अनुभवी ॥७३॥
एक देव एक आपण ॥ हें भेदभक्तीचें लक्षण ॥ जय विजय पावले रतन ॥ याचमुळें जाण पां ॥७४॥
याचमुळें नारदाची नारदी ॥ रावणें घातले बंदीं ॥ वाळी सुग्रीव पडले द्वंद्वीं ॥ भेदबुध्दीनें वाहवले ॥७५॥
राम अभेद बोधी तारेसी ॥ सुग्रीव दीर भोगी संतोष मानसीं ॥ उडाली कल्पना एकात्मतेसी ॥ स्वयें मुक्ति कीर्ति पुराणीं ॥७६॥
पांच भ्रतार भोगी पांचाली ॥ अभेदभावना मिळे पाप मेळीं ॥ गोपी भोगिल्या वनमाळीं ॥ अभेदज्ञानें ब्रह्मचारी ॥७७॥
नारद किंचित् भेदें नारदीं ॥ अभेदे कळींत मुक्त पदीं ॥ अभेद भृगूस शाप न बाधी ॥ एवढी पदवी अभेदांत ॥७८॥
अभेद बोध ते धन्य ॥ अभेदें सनकादिक पावन ॥ शुक मुक्त परिपूर्ण ॥ अभेद बोध याज्ञवल्की ॥७९॥
अभेद बोध जनकासी ॥ राज्य करिता मुक्तता त्यासी ॥ अभेद व्हावया उध्दवासी ॥ भागवत निवेदिलें ॥८०॥
भेदें अर्जुन न वधी गोत्रा ॥ कृष्णें सांगोनि अभेदमंत्रा ॥ कलहांत दावोनि ब्रह्मसूत्रा ॥ केलें सुपात्र निजमुक्तीं ॥८१॥
अभेदभक्तीचा मार्ग ॥ हाचि शिवादिकांचा योग ॥ अभेदभक्तीचा संतांस रंग ॥ जनी जनार्दन ते जाहले ॥८२॥
तोचि सांगे तोचि ऐके ॥ तोचि दृश्य तोचि देखे ॥ तोचि हुंगे रस चाखे ॥ तोचि बोले शब्दाते ॥८३॥
तोचि हालवी हातपाय ॥ तोचि जीव शिव होय ॥ तोचि आपुला आत्मा होय ॥ दुसरा नसे त्याविणे ॥८४॥
त्याचें करावें कीर्तन ॥ कीर्तनांत वसे नारायण ॥ नामीं रुपीं मीच जाण ॥ स्मरण कोणाचें करावें ॥८५॥
पूज्य पूज्यक नाहीं दुजा ॥ मीच देव माझी पूजा ॥ मीच गंध पुष्प धूप वोजा ॥ हीच अहोक्षजा गोड भक्ती ॥८६॥
मी वंदूं कवण कवणा ॥ विश्व माझें अवयव जाणा ॥ देवो देवी परिवार नाना ॥ अवघा व्यवहार मीच कीं ॥८७॥
हे भक्तीचें भूषण ॥ निवेदिलें तुजकारण ॥ आतां ज्ञान कासया म्हणणें ॥ तोचि विचार ऐकावा ॥८८॥
कैसें निराकार निर्गुण ॥ माया ईश्वर काय लक्षण ॥ अविद्या ते असे कोण ॥ ओळखे प्रपंच परमार्थ ॥८९॥
ओळखे स्वर्ग नरक पाप पुण्य ॥ ओळखे जीव शिव मी कोण ॥ तार विषम होतां विण्यालागूंन ॥ करी भणभण वाजवितां ॥९०॥
समभागें आणिल्या जुळून ॥ मंजुळ घुमघुमोन ॥ होय चित्ताचें समाधान ॥ ऐकोनियां मन निवे ॥९१॥
जैसें द्वैतवादियाचें मत ॥ तैशा तारा भणभण करीत ॥ अद्वैतवादी संतोष पावत ॥ ज्ञान तयासी बोलिजे ॥९२॥
कर्म क्रिया स्वधर्म परधर्म ॥ जाणे भक्तीचें वर्म ॥ उत्पत्ति स्थिति लय पूर्ण ॥ जाणे आगमनिगमांसी ॥९३॥
ग्रंथ वाचणें अर्थ काढणें ॥ भोग्य भोक्ता कोण जाणणें ॥ कर्ता अकर्त्यासी ओळखणें ॥ निरखी सार असार ॥९४॥
उदय पावला अद्वैतहेली ॥ भेदभावनिशि निरसिली ॥ चैतन्यकळा सबाह्य कोंदली ॥ ज्ञानकिल्ली या नांव ॥९५॥
कोंदोन ठेला आपोआप ॥ बुडाला संदेह भेद कल्प ॥ जिराला बहुवादाचा जल्प ॥ जाहला अमूप चिदाकाश ॥९६॥
विटाळ सोंवळ्याची कल्पना ॥ जप तप साधन ना स्पर्शे वासना ॥ निर्विकल्प समाधि जाणा ॥ शुध्द ज्ञान तो एक ॥९७॥
शुध्दज्ञान कळा प्रताप प्रौढी ॥ दाविली उभवोनि तुज गोडी ॥ ज्ञानवन्हि साधन काढी ॥ उरों नेदी आपणयासी ॥९८॥
त्वां पुसिलें अवघें एक ब्रह्म कैसें ॥ याचा अर्थ शुध्द परिसें ॥ हाचि निश्चयो अढळ वसे ॥ वेदशास्त्रीं पुराणीं ॥९९॥
सकळ ब्रह्म एक ॥ ही पुर्ती गुरुची मेख ॥ वेदांतीचा गर्भ हरिख ॥ अवघा उल्लेख एक ब्रह्म ॥१००॥
उंच नीच यातीस ॥ चंदन सारिखा सर्वांस ॥ किंवा सूर्याचा प्रकाश ॥ उंच नीच निवडेना ॥१॥
दोघे मित्रत्वें चालतां ॥ समाधान होतसें चित्ता ॥ तेथेंचि द्वैत उपजतां ॥ वाढे मत्सर कलहासी ॥२॥
अद्वैत बोधासी समाधान ॥ या दृष्टांतें घ्या ओळखून ॥ भेदमती नीच न्यून ॥ अनुभवें पहावें ओळखूनी ॥३॥
अनंत तरंग एक पाणी ॥ बहु नग एका सुवर्णी ॥ असंख्य तृण एक मेदिनी ॥ बहु शाखा द्रुम एक ॥४॥
बहु वस्त्रें एक तंतू ॥ बहु भांडे मृत्तिकाचि हेतु ॥ बहु इंद्रियें एक देहांतू ॥ बहुवासना मन एकू ॥५॥
अभ्र एक रंग अनेक ॥ पंच प्राण समीर एक ॥ बहु तारागण शुभ्रता एक ॥ बहु वाद्यें नाद एकचि ॥६॥
मही जळ एक सूर्य ॥ एकचि तेज एकचि वाय ॥ एकचि आकाश व्यापक होय ॥ एक पिंड ब्रह्मांड ॥७॥
एक स्फुरण तेज अंत:करण ॥ तेंचि मन बुध्दि अहंकार जाण ॥ तेंचि जाहले पंचप्राण ॥ तेंचि ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रियें ॥८॥
तोचि पंच विषय पंचभूत ॥ तेचि जिवंत तेचि मृत ॥ तेचि सर्व पदार्थ ॥ तेचि भक्त तेचि देव ॥९॥
तोचि राजा तोचि प्रजा ॥ तो संतोषी तोचि करी मौजा ॥ तोचि नातू तोचि पणतू पणजा ॥ तोचि साधु भोंदू गुरुशिष्य ॥११०॥
अकार उकार मकार ॥ अर्ध मातृका बिंदु वर ॥ हे पंच प्रकार ॥ एके अंगीं उमटले ॥११॥
तोचि ब्रह्मांड हिरण्यगर्भ ॥ तोचि पिंडीं स्वयंभ ॥ यापरी भेदाची भांब ॥ चढविती ते शतमूर्ख ॥१२॥
शिमग्यांत सोंगें आणी अनेक ॥ त्यांत खिलाडी खेळणार एक ॥ खांबसूत्रीं कळासूत्रींचें कौतुक ॥ कारिगिर असे एकचि ॥१३॥
दाहा अवतार एक विष्णु ॥ पन्नास मातृका एक ओंकार गुणू ॥ शिव एक पंचवदनू ॥ बोटें पांच कर एक ॥१४॥
कठिण मृदु श्वेत थंडगार ॥ पाहा एकचि नीर साचार ॥ तेवीं निर्गुण सगुण गोठला आकार ॥ ब्रह्माकार एकचि ॥१५॥
आतां बध्द मुक्त हें बोलणें ॥ जैसें मुक्या मुक्याचें भांडणें ॥ किंवा षंढषंढाचें मैथुनें ॥ काय संतती गणावी ॥१६॥
आकाशास केलें सारवणें ॥ समुद्रास तोय पाजणें ॥ सूर्यास शेकावयाकारणें ॥ जाळ करी तो मूर्ख ॥१७॥
यापरी पाप पुण्य़ बध्द मुक्तता ॥ ही वांझ संततीची कथा ॥ उदक पतिलेहोनि ठेवितां ॥ रोखा पंचोत्रा व्याजाचा ॥१८॥
जे वागविती अविद्याबंधन ॥ ते आकाशाची काजळी काढून ॥ घालोत सूर्यनेत्रीं अंजन ॥ उदकाचा करोत पाषाण सुखें ॥१९॥
जो अविद्या वाहे मानसीं ॥ मक्षिकेवर बैसोनि उडे आकाशीं ॥ आपुले अंगछायेसीं ॥ युध्द करु मौजेनें ॥१२०॥
वांझ प्रसवली नाहीं कुमरा ॥ त्याचे कजियाचा काय दरारा ॥ काळपुरुषासी भरुनि जरा ॥ मरे जगा देखतां ॥२१॥
वायूस धनुर्वात भरे ॥ जैं अग्नींस हींव संचरे ॥ शेष सेवा करी आदरें ॥ दर्दूरीच्या मंदिरीं ॥२२॥
जैं आकाशा लागे रोग ॥ शिधस्वरुपीं पिशाच लाग ॥ पार्वतीचें भुले अंग ॥ हाडळीलागोनि करी वेडें ॥२३॥
लक्ष्मी होऊनि दरिद्री ॥ भीक मागेल घरोघरीं ॥ तरी अविद्येची थोरी ॥ दिसों येईल ब्रह्मवेत्या ॥२४॥
कांतणीचे तंतून ॥ मुंगीमाजे मेरु बांधुन ॥ समुद्रपैलतीरा नेईल वोढून ॥ तरी अविद्या सत्य होय ॥२५॥
जेथें अविद्या सत्य नाहीं ॥ तेथें बध्दता म्हणेल काई ॥ भीष्में बाईलचि केली नाहीं ॥ नातू पणतू मग कैचें ॥२६॥
रज्जूचा सर्प जाहला नाहीं ॥ मग वधायाचें संकट काई ॥ मृगजळांत उदकचि नाहीं ॥ मग ठाव काढणें वृथाचि ॥२७॥
पाहतां अविद्याबंधन ना दिसे ॥ एक ब्रह्मचि सत्य असे ॥ हे अनुभवाचे ठसे ॥ वसवी हृदयीं तो धन्य ॥२८॥
त्वां पुसिली ब्रह्मींची गोष्टी ॥ त्याची सांगीतली हातवटी ॥ मी कोण हेंही निरखीं दिठीं ॥ भाव नुठी मग तूतें ॥२९॥
सहज नांव म्हणती गाडा ॥ त्या नांवाचा कर्ता निवाडा ॥ पदार्थ मात्र दिसे उघडा ॥ नांवास ठाव मिळेना ॥१३०॥
देहेंद्रियांस नांव नसे ॥ मीपण पाहतां कोठें न दिसे ॥ तेवीं जगास लागलें पिसें ॥ मी मी म्हणती सर्वत्र ॥३१॥
मीपणास ठाव नाहीं ॥ तोचि आत्मा तुझें हृदयीं ॥ जों कोंदला सर्वांठायीं ॥ मीपणाविरहीत ॥३२॥
मी जसें जो बोले बोल ॥ तोचि आत्मा नव्हे केवळ ॥ उघड बुध्दीचा डौल ॥ शोधीं हृदयीं ॥ तुझ्या तूं ॥३३॥
तूंचि निराकार सगुण ॥ तूंचि जगदीश जनार्दन ॥ तूंचि काळाचें जीवन ॥ मुख्य ब्रह्म तूंचि कीं ॥३४॥
अगा आपुल्या सावलीला ॥ आपणचि भिऊन पळाला ॥ सिंहें ठोकिलें आरोळीला ॥ दचकोन म्हणे कोणरे ॥३५॥
मेघ गडगडे अंबरीं ॥ त्याचा दचक आपणचि धरी ॥ तैसीचि तुझी नवलपरी ॥ भेसी आपण आपणा ॥३६॥
देहचि नाहीं मग निरसावें काई ॥ द्वैत नसतां तोडावयाचें संकट पाहीं ॥ लय लक्ष हा पूर्वपक्ष घेईं ॥ शास्त्राचा उभारा ॥३७॥
प्रपंचाचा ठाव नाहीं ॥ मग मोक्षास पुससी काई ॥ बध्दच वाव जाहला देहीं ॥ मुक्तासी गोष्टी कायसी ॥३८॥
पाहतां बंधन कोठें नसे ॥ सुटायाचें संकट कायसें ॥ भिन्न असतां तरी एकत्वाचे सायास ॥ जीवच नाहीं वैराग्य नाहीं कोण आटी ॥३९॥
जाहल्या अवतारांच्या संख्या ॥ हें भोरपी सोंग देखा ॥ नाम रुप कर्मरेखा ॥ पडिलें त्यासी बिंदुलें ॥१४०॥
जात संचित प्रारब्ध जाणे ॥ हें तो उदकावरील लिहिणें ॥ अवघा प्रकाशला चैतन्य ॥ दुजा कोणी दिसेना ॥४१॥
जगचि जाहला जगदीश ॥ उडाला गुरुशिष्य उपदेश ॥ महाग्रंथींचें हेंचि रहस्य ॥ कोंदलें चिदाकाश एकचि ॥४२॥
यापरी करुन उपदेश ॥ तोडला शिष्याचा भवपाश ॥ स्वानंदीं पावोनि उल्लास ॥ विनवी स्वामीस अतिनम्र ॥४३॥
म्हणे मुक्त केलें स्वामी ॥ मुक्त जाहलों माझा मी ॥ आतां पुसावयाची उर्मी ॥ उरली नसे दयाळा ॥४४॥
समुद्रीं पडे मिठाचा खडा ॥ काढो जातां जाहला वेडा ॥ तैसाच मीपणाचा निवाडा ॥ जाहला उघडा तव कृपें ॥४५॥
कूपआंतील खोली ॥ शोधूं गेला आकाश पोकळी ॥ तैसी मीपणाची बोली ॥ पुसिली पावलों प्रचीत ॥४६॥
शुकनळिकेच्या न्याया ॥ व्यर्थ गुंतलों वांया ॥ स्वामीनें करुनियां दया ॥ मुक्त केलें चौंदिशा ॥४७॥
दर्पणाच्या बिंबाला ॥ अडकलों होतों वायां तयाला ॥ त्वां फोडोनि भेदपणाला ॥ मज मी भेटलों स्वयंभू ॥४८॥
पाप पुण्य तें बुझवण ॥ बाळका बागुलभय दावून ॥ जेवीं वाघ गाय जाण ॥ लाकडाची ॥४९॥
मीच स्वयंभू चिदाकाश ॥ ब्रह्मा विष्णु माझेचि अंश ॥ मी ईशाचाही ईश ॥ जगीं जगदीश मी एक ॥१५०॥
आतां वर्णूं कथेची राहाटी ॥ कैसा वर्तूं या सृष्टीं ॥ काय आचरों धरुं पोटीं ॥ काय आचरों धरुं पोटीं ॥ काय पूजों काय भजों ॥५१॥
संसार टाकावे कीं करावे ॥ संन्यास घ्यावा कीं गृहस्थ असावें ॥ कोणते धारणेवर बैसावेम ॥ किंवा असावें मोकळें ॥५२॥
शिष्यें विनविलें श्रीगुरुपायां ॥ भरतें आलें करुणालया ॥ मग बोलता जाहला आचार्या ॥ तें गुणवर्या परिसा कीं ॥५३॥
मग म्हणे शिष्य सुजाणा ॥ सांगतों वर्तणुकेच्या खुणा ॥ बर्‍या आणाव्या मना ॥ तेचि रीतीं वर्तावें ॥५४॥
श्रीगुरुकृपेचें हेंचि फळ ॥ वृत्ती न करावी कल्लोळ ॥ नसावी साधनाची तळमळ ॥ कल्पनेचें मूळ स्पर्शो नये ॥५५॥
अंत:करण जैसें गंगाजळ ॥ कीं चिदाकाश निर्मळ ॥ दाही दिशा प्रांजळ ॥ गुंती कोठें नसावी ॥५६॥
मीच आत्माराम हा बोध उटी ॥ सबाह्य चिन्मया लागली दिठी ॥ सुटल्या लयलक्षाच्या गांठी ॥ जिराला पोटीं अहंभाव ॥५७॥
पापपुण्या घालोनि शून्य ॥ न पडावें स्वसुखासी न्य़ून ॥ लाहोनि उन्मनीचें अगम्य ॥ धन्य होणें नरदेहीं ॥५८॥
ब्रह्मीं माया जाहली नाहीं ॥ तिला निरसावयाचे प्रयत्न काईं ॥ बागुल मारावयाचे उपायीं ॥ श्रम करणें वृथाचि ॥५९॥
गणेश सारजेचें सोंग ॥ एकचि घेतो बहुविध रंग ॥ पाहोनि मृगजळाचा तरंग ॥ काय डोनी घालावी ॥१६०॥
छायेच्या रोगाचा खेद करणें ॥ रायविनोदियाचें सोंग प्रमाण धरणें ॥ तैसें संन्यासी होऊनि लक्ष लावणें ॥ साधावया निजवस्तू ॥६१॥
आपण कोण हा न कळे विचार ॥ मन धन कर्म हा फुसका थोर ॥ गुरुगम्यें विण ग्रंथ शोधिलें फार ॥ जैसी कस्तूरी गोणी खरपृष्ठीं ॥६२॥
तक्र घुसळितां न निघे लोणी ॥ राख फुंकितां न पडे वन्ही ॥ वाती लावी काजव्यालागोनी ॥ प्रकाश होणें कठिणचि ॥६३॥
ज्यासी नाहीं गुरुपदेश ॥ ते वाहताती संसारसोस ॥ काय जन्मोनि व्यर्थ माणुस ॥ कणीस जैसें उंसाचें ॥६४॥
मारुतीच्या लग्नास ॥ जाती चित्रींचीं माणुस ॥ किंवा बाज बाळंतिणीस ॥ सुईण नेत्रींची बाहुली ॥६५॥
व्योमखराटयांची केरसुणी ॥ नेत्रबाहुलीनें हातीं धरुनि ॥ समुद्रावरील केर झाडोनी ॥ वायुपोटीं सांठविला ॥६६॥
यापरी अवघी बाजागिरी ॥ पळणीस आश्रयो गंधर्वनगरी ॥ कल्पित ब्रह्मांड बोडंबरीं ॥ काय सत्य मानावें ॥६७॥
जो समजे त्यास अवघा हरी ॥ ना समजे त्यास संसार भ्रांत भारी ॥ यालागीं गा चतुरीं ॥ समर्थ गुरु सेविजे ॥६८॥
समर्थ गुरु म्हणोन ॥ वाल्मिकीचें पाप दहन ॥ अर्जुनासी उपदेश करुन ॥ मुक्त केला घोरकर्मी ॥६९॥
भ्रतारास होय दरिद्र ॥ स्त्रीस कैंचा सुखसमुद्र ॥ पोहतां नये त्याची कासधर ॥ तरणोपाय मग कैंचा ॥१७०॥
यास्तव गुरु असावा समर्थ ॥ ज्याचें दर्शनें पळे दुरित ॥ परिसीं स्पर्शतां किंचित ॥ लोहदशा पालटे ॥७१॥
लागले जरी चंद्रकर ॥ चंद्रकांतीं सुटे पाझर ॥ उदय पावतां भास्कर ॥ विकासे अब्जिनी उदकांत ॥७२॥
अवलोकितां कूर्मीण दिठीं ॥ बाळें होती तृप्त पोटीं ॥ तैसी पाहिजे गुरुहातवटी ॥ अनुग्रहितां शिष्यां प्रबोध ठसे ॥७३॥
मंत्र म्हणतां भूतां पळ ॥ तो पंचाक्षरी प्रबळ ॥ बोध होतां अवधा गळ ॥ समर्थ गुरु तो एक ॥७४॥
गुरु नसावा लोभिष्ट लालची ॥ गुरुची नसावी बुध्दि कांची ॥ गुरु नसावा जो प्रपंची ॥ सदा कचकची संतापें ॥७५॥
गुरु नसावा रोगी ॥ गुरु नसावा विषयभोगी ॥ गुरु नसावा फार उद्योगी ॥ कैफ गुरु नसावा ॥७६॥
गुरु असावा निर्मळ ॥ गुरु असावा प्रांजळ ॥ सखोल आणि सरळ ॥ गुरु जाज्वल्य असावा ॥७७॥
शांतिदया क्षमा शील ॥ गहन गंभीर परम दयाळ ॥ शास्त्र ज्यास करतळामळ ॥ जाणे अर्थ ग्रंथींचा ॥७८॥
व्हावा ज्ञानाचा मुगुटमणी ॥ ब्रह्मविद्येची अपार खाणी ॥ अध्यात्मविषयीं शिरोमणी ॥ पुरवी आयणी शिष्याची ॥७९॥
तूं म्हणसी कोणता करावा गुरु ॥ त्याचा ऐग बा विचारु ॥ कर्ममार्गा गुरु ॥ उत्तमयातीचा पाहिजे ॥१८०॥
ज्यास वर्णाश्रम लौकिक धर्म ॥ विधिनिषेध पाहिजे नेम ॥ तेणें करावा गुरु उत्तम ॥ मोक्षआशा धरुं नये ॥८१॥
ज्यास मोक्षाची गोडी ॥ त्याणें सांडावी लौकिकपरवडी ॥ ज्यापासी ब्रह्मैक्य जोडी ॥ तोच गुरु करावा ॥८२॥
द्रोणे धिक्कारिलें कोळियासी ॥ तेणें केलें मातीच्या द्रोणासी ॥ तेथें निश्चय केला गुरुसी ॥ फळली विद्या अद्भुत ॥८३॥
जयरामस्वामीनीं केला नापिक ॥ तेथें उदेला ज्ञानार्क ॥ जो हरी दारिद्रय-कळंक ॥ तोचि दाता मागत्या ॥८४॥
नदी वन्हि वाटेस ॥ सर्व धान्यें कापूस ॥ सर्वथा विटाळ नसे त्यांस ॥ स्पर्शतां कोणी यातीनें ॥८५॥
आपणास पाहिजे ज्ञानभांडार ॥ तरी भिक्षा करावी महाराघर ॥ तेथेंचि होय साक्षात्कार ॥ याहूनि लाभ कोणता ॥८६॥
तांबें पितळ लोह पाषाण मृत्तिकेंत ॥ टवळीं भिन्न दीप सारिखा जळत ॥ अज्ञान टवळीं मोजित ॥ ज्ञातें लक्षिती ज्योती कीं ॥८७॥
पाहों नये गंगेचें मूळ ॥ शोधूं नये ऋषींचें कुळ ॥ आपणांस जरी घेणें गूळ ॥ तरी आणिका पुसों नये ॥८८॥
कोणत्या दुमीं जन्मलीं ॥ ऐसी मदिरा नाहीं नेमिली बोली ॥ स्वाधिष्ठान पाहोनि चांगली ॥ ग्राहिक होती जाणते ॥८९॥
पाहतां पंचभूतांची जाती ॥ हे तो महातत्वीं होती ॥ त्यांच उंच नीच म्हणती ॥ कर्म राहटी जनाची ॥१९०॥
जो सर्वां न पाहे समान ॥ त्याच्या ज्ञानास लागलें लांछन ॥ एकतत्त्वीं न बैसे मन ॥ तरी तो शीण व्यर्थचि ॥९१॥
हाचि गुरुचा पाहिजे उपदेश ॥ श्वान शकूर दिसे महेश ॥ हा ब्रह्मींचा ब्रह्मरस ॥ बोध ठसे शिष्यासी ॥९२॥
सांगो शिष्याचें लक्षण ॥ बहु ग्रंथीं केलें लेखन ॥ तो बुध्दिमंत निपुण ॥ तोचि दांडायित या कामा ॥९३॥
कैसें वर्तावें संसारीं ॥ आत्मबोध जाहल्यावरी ॥ ही तुझी पुसीची परी ॥ त्यांत इतुका अर्थ वाढला ॥९४॥
खचोनि पडो ब्रह्मांड ॥ परी धारणेसी नाहीं खंड ॥ जैसें गगन उभें प्रचंड ॥ तैसें अखंड असावें ॥९५॥
सरिता भरोनि जाती आटोन ॥ समुद्र तो समसमान ॥ शुभाशुभ हें लक्षण ॥ ज्ञानियास न पाहिजे ॥९६॥
प्रपंच असेल तेव्हां उगवावा ॥ भिन्न असेल तरी त्याग करावा ॥ हा तूतें जाहला उगवा ॥ गुंता तूतें नसे कीं ॥९७॥
हें तों उत्तमधर्माचें ज्ञान ॥ हृदयीं ठेवूनि परिपूर्ण ॥ पूर्वपक्ष लटिका जाणोन ॥ लोकसंपादणी करावी ॥९८॥
प्रपंच भूतांचिया परिया ॥ त्या पंचभूतांची घडली काया ॥ त्यास त्यागून हिंडणें वांया ॥ कैसें घडेल सांग पां ॥९९॥
नलगे सांडावें मांडावें ॥ आहें तें संचलें स्वभावें ॥ मग गोसावी कशास व्हावें ॥ नलगे भगवें प्रावरण ॥२००॥
प्रपंच त्यागितां नये ॥ नवा करुनि रचितां नये ॥ हा जैसा तैसाचि आहे ॥ समजोन राहें उगाचि ॥१॥
जरी उदक सांडोनि फिरे लाट ॥ मृत्तिका सांडोनि बैसे घट ॥ तेव्हां प्रपंचाचें झट ॥ देह होईल निसुर ॥२॥
गंधक त्यासी घे घ्राणीसी ॥ सुगंध कोठून आणला आपणापासी ॥ वन्हि रुसला उष्णतेसी ॥ शीतळ होईल कोठोनी ॥३॥
गंध लावी कपाळावरी ॥ दर्पण घेवोनि नीट करी ॥ संचित रेघ वोढिली खरी ॥ ते कैसी निटावे ॥४॥
जेव्हां शरीर सुटे ॥ तेव्हां प्रपंच आवांका लोटे ॥ निमाल्यावरी क्रियेचीं कचाटें ॥ दाहा दिवस पुरती ॥५॥
जित्या मेल्या नासुटे कर्म ॥ कर्मी जन्मफेर्‍यांचा उगम ॥ हें समजोनियां वर्म ॥ राहटे तोचि एक चतुर ॥६॥
यालागीं ज्यासमयीं जैसें घडेल ॥ तैसें होऊनि साइजे सकळ ॥ आपुली वृत्ति अढळ ॥ आत्मरमणीं खेळावें ॥७॥
सोडों नये संतसंगासी ॥ अखंड भजावें श्रीगुरुसी ॥ शांत असावें मानसीं ॥ संतापऊर्मी स्पर्शो नये ॥८॥
प्रात:स्नानें सुशीळ असावें ॥ मळिन कुश्चळता भ्रष्ट नसावें ॥ दया धर्म प्रबोध करावें ॥ पवित्र असावें निजनामीं ॥९॥
गुरुमंत्राचा कीजे जप ॥ इतर पूजा ते खटाटोप ॥ उपासना गुरुपदीं तद्रूप ॥ इतर उपासना त्यासाठीं ॥२१०॥
मूळीं उदक घालितां शाखा वाढती ॥ मुखीं ग्रास घेतां इंद्रियाची तृप्ती ॥ सिंधुस्नानीं सकळ तीर्थे घडती ॥ अमृतापुढें सर्व गोडी ॥११॥
झोंप बैसता नेत्रांत ॥ सर्व इंद्रियें बंद होत ॥ तेवीं उपासितां गुरुपदांत ॥ सकळ देव सांपडती ॥१२॥
ज्ञान विग्रहो परमेश्वर ॥ तोचि श्रीगुरुचा अवतार ॥ तोचि परब्रह्म साचार ॥ ब्रह्मा हरिहर त्यांचेची ॥१३॥
म्हणोनि श्रीगुरुची उपासना ॥ श्रेष्ठ करीत आले जाणा ॥ यालागीं तनुमनधना ॥ अर्पण कीजे गुरुपायीं ॥१४॥
यापरी वदला श्रीगुरुनाथ ॥ शिष्यचरणीं जाहला सनाथ ॥ मग जोडोनियां हात ॥ सद्गद बोले गुरुसी ॥१५॥
घालोनियां लोटांगण ॥ स्तुती लागीं कुंठितमन ॥ उगाचि राहिला मौन ॥ निवाली ऊर्मी उठेना ॥१६॥
दशा पावोनि श्रीगुरुन ॥ म्हणे शिष्य जाहला पूर्णचैतन्य ॥ मग देवोनि आलिंगन ॥ निमग्न उभयतां आपणातें ॥१७॥
गंगेयमुनेचे घडघडाट ॥ मिळोन एकच वाहे लोट ॥ तेवीं गुरुशिष्यांचा उत्कंठ ॥ स्वरुपीं बोध समरसे ॥१८॥
गुरुशिष्यांचें करुन मिष ॥ कवीनें दाविला बोधप्रकाश ॥ श्रोत्यां लाभे सुखसंतोष ॥ सहज घडे श्रवणें ॥१९॥
पाणियाचा भरे जोर ॥ कारंज्याची उडे उंच धार ॥ वळल्या मेघ अनिवार ॥ पूर चढे गंगेसी ॥२२०॥
तेवीं गुरुकृपेचा भार ॥ अंत:करण हेलावे जेवीं सागर ॥ किंवा उदेल्या भास्कर ॥ किरणें पसरती ब्रह्मांडीं ॥२१॥
पुष्पविकास जाहल्यावरी ॥ सुगंध फांके बाहेरी ॥ हृदयीं ज्ञानाची भरोवरी ॥ इंद्रियद्वारीं बोध पसरे ॥२२
तुम्हां संतांचे आशिर्वाद ॥ लिहिलीं अक्षरें केला विनोद ॥ शहा मुनीचा हर्षानंद ॥ पूर्ण कर्ता श्रीगुरु ॥२२३॥
इति श्रीसिध्दांतबोधग्रंथे अध्यात्मनिरुपणतत्वसारनिर्णये त्रयस्त्रिंशत्तमोऽध्याय: ॥३३॥
अध्याय ॥३३॥ ओव्या ॥२२३॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥

N/A

References : N/A
Last Updated : November 22, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP