मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|सिध्दान्तबोध|
अध्याय २४ वा

श्रीसिध्दान्तबोध - अध्याय २४ वा

‘श्रीसिध्दान्तबोध’ हा संतकवि श्रीशहामुनि यांचा ग्रंथ म्हणजे मराठी साहित्याच्या खाणींतील एक तेजस्वी हिरा आहे.


श्रीगणाधिपतये नम: ॥ श्रीगुरुभ्योनम: ॥
जो निर्विकार निरंजन ॥ सच्चिदानंदस्वरुपाहूनि भिन्न ॥ विश्वरुप करी ज्याचें ध्यान ॥ तयासि नमन पैं माझें ॥१॥
जो अष्टभैरवांसी अलक्ष ॥ महाविष्णूसी न कळे ज्याचा पक्ष ॥ महाविष्णु महेश्वर साक्ष ॥ करिती ज्या स्वरुपाची ॥२॥
वासवा न कळे ज्याचें लाघव ॥ चित्रसेनसांबां न कळे ठाव ॥ शिव नेणें ज्याचें वैभव ॥ तयासी नमन सद्भावें ॥३॥
इतुकिया देवांसी नुगवे उगवा ॥ तेथें यक्षिणीचा कोण केवा ॥ मग ऋषि अथवा मानवां ॥ कोण धरी लेखासी ॥४॥
ऐसिया अव्यक्त स्वामीतें ॥ अष्टभावें नमन निगुतें ॥ जयाचे कृपेनें मातें ॥ संशय वार्ता स्पर्शेना ॥५॥
आतां नमूं हंसमूर्ती ॥ उगविल्या ब्रह्मांदिकांच्या गुंती ॥ सनकादिकां मुक्तपंथीं ॥ स्वरुपस्थिती दाविली ॥६॥
जेणे निर्मिलें हंसगीतेसी ॥ उघडिलें परमार्थभांडारासी ॥ तो कृतयुगींच्या अवतारासी ॥ हो त्या स्वरुपासी पैं नमो ॥७॥
आतां नमूं त्या पुरुषासी ॥ जो जन्मला अनसूयेचे कुसी ॥ चमत्कार दावूनि गोरखियांसी ॥ नवनाथ सिध्द जिंकिले ॥८॥
आर्लेय रायासि पद्मपुराणीं ॥ निरुपिली ब्रह्मस्वरुपाची खाणी ॥ अवधूतगीतेसी निमूनी ॥ संन्यासपंथ स्थापिला ॥९॥
केला यदूसी संवाद ॥ उघडोनि दाविला ब्रह्मबोध ॥ जयाचा महिमा श्रीगोविंद ॥ भागवतीं अनुवादला ॥१०॥
तया दत्तात्रेयप्रभूसी ॥ अनन्यभावे नमूं चरणासी ॥ जो सिंहाद्रीचा रहिवासी ॥ सर्वांठायीं व्यापक ॥११॥
आतां नमूं शार्ड्गपाणी ॥ जो कैवल्याचा मोक्षदानी ॥ जयाचीं गुणचरित्रें वाखाणी ॥ स्वयें ब्रह्मा चहूंमुखें ॥१२॥
तयाचे वर्णितां पवाडे ॥ वेदास महत्त्व चढे ॥ शास्त्रपुराणांचे जुंबाडे ॥ तेही पावले प्रतिष्ठा ॥१३॥
जो चैतन्यमायेचा स्वामी ॥ सर्वव्यापक अंतर्यामी ॥ तया श्रीकृष्णाचे पादपद्मीं ॥ मस्तक ठेवीं सहस्त्रदा ॥१४॥
अभिमन्युजननीचा भर्ता ॥ तया उपदेशिली भगवद्गीता ॥ तयाचा अर्थ पाहतां ॥ शिवही माथा डोलवी ॥१५॥
गमन करितां निजधामा ॥ पाहोनि उध्दवाचा प्रेमा ॥ दाविला भागवतें महिमा ॥ अनेक उपमा देवोनी ॥१६॥
जयाच्या चरित्रबोलेंकरुन ॥ रंगिलें गातां विश्वाचे वदन ॥ तया श्रीकृष्णचरणीं नमन ॥ वारंवार पैं माझें ॥१७॥
आतां नमूं परमपुरुष ॥ जेणें भट्टास केला उपदेश ॥ सांगितला पूर्ण ज्ञानाचा रस ॥ उघडे केली ब्रह्मविद्या ॥१८॥
परी अवतार पुरुषासी ॥ नमो आरंभिलें प्रसंगासी ॥ देवद्विजांच्या संवादासी ॥ परिसा श्रोते सादर ॥१९॥
मागिले अध्यायी निरुपण ॥ सांगितलें मुख्यस्वरुपाचें चिन्ह ॥ तयावरी वेदांची उत्पत्ति गहन ॥ तेही निरुपिली द्विजातें ॥२०॥
शास्त्र आणि पुराण ॥ यांची सांगीतली उत्पत्ति गहन ॥ यतीचा प्रकार भिन्न भिन्न ॥ तेंही निरुपण दाविलें ॥२१॥
हें परिसोन द्विजवर्य ॥ वंदोनि अवतारपुरुषाचे पाय ॥ मग म्हणे जी देवराय ॥ विनंती माझी अवधारा ॥२२॥
तुम्ही निरुपिलें वेदशास्त्रांसी ॥ सांगितलें अठरा पुराणांसी ॥ परि याचा गुह्यार्थ आम्हांसी ॥ फोडोनि नाहीं दाविला ॥२३॥
त्रिकांडींच्या अन्वयातें ॥ भिन्न भिन्न सांगावें समर्थे ॥ कोण्या शास्त्रीं काय बोलिलें तें ॥ मज परिसवा निवाडें ॥२४॥
अठरापुराणामाझारी ॥ काय निरुपिलें ऋषीश्वरीं ॥ तेंही मातें श्रवण करीं ॥ वचनामृतें दातारा ॥२५॥
ऐसा बोलिला श्रोता गुणी ॥ वक्ता जगदीश वदे वाणी ॥ म्हणे परिसें द्विजचूडामाणी ॥ वेद वदला जो अर्थ ॥२६॥
कर्मकांडांतील हेंचि वर्म ॥ श्रेष्ठ आपुला वर्णाश्रम ॥ मुख्य कर्म तेंचि ब्रह्म ॥ हाचि स्वधर्म स्थापिला ॥२७॥
निश्चयें स्थापिला चारी वर्ण ॥ वैश्य क्षत्रिय ब्राह्मण ॥ शूद्रासहित चहूंचें गणन ॥ सदर वेदानें घातलें ॥२८॥
चहूं वर्णांत द्विज श्रेष्ठ ॥ त्याहूनि केला क्षत्रिय कनिष्ठ ॥ क्षत्रियातळीं वैश्य स्पष्ट ॥ वैश्याहून न्यून शूद्रातें ॥२९॥
कर्मकांडींची व्युत्पत्ती ॥ बहुविधा निषेध स्थापिती ॥ मुंजी लग्नें पितृतिथी ॥ स्नान संध्या जप न्यास ॥३०॥
आपुलाले कर्माचा स्वभाव ॥ तेणें मोक्षाचा घडे ठाव ॥ हा कर्मकांडींचा अनुभव ॥ उघड केला वेदानें ॥३१॥
कर्मकांडामाझारी ॥ भट्टाचार्य जाहला अधिकारी ॥ तेणें कर्म श्रेष्ठ चराचरीं ॥ तेंचि विस्तारलें बहुसाल ॥३२॥
तया वेदवक्याचेनि बळें ॥ ब्राह्मण गर्वे आथिले ॥ कर्मी ब्रह्म बोलिलें ॥ इतर उपाय ते मिथ्या ॥३३॥
वेद द्विजें अंगीकारिले ॥ इतर यातीसी वाळिलें ॥ म्हणूनि अहंकारें मिरवूं लागले ॥ ब्राह्मण जाहले गर्विष्ठ ॥३४॥
यापरी कर्मकांडीचा ॥ तुज अनुभव सांगितला साचा ॥ आता उपासनाकांडींचा ॥ तोही एक सिध्दांत ॥३५॥
अनेक देवांची उपासना ॥ उपासनाकांडीं स्थापिली जाणा ॥ बहुभक्तीची भावना ॥ नानापरी दाविली ॥३६॥
बहु तपें अनुष्ठान ॥ करितां पावे नारायण ॥ प्राणायाम योगसाधन ॥ करितां मोक्ष विश्रांती ॥३७॥
योग यज्ञ दान धर्म ॥ करितां पावती परब्रह्म ॥ श्रेष्ठभक्तींचा नेम ॥ हेंचि वर्म उपासनाकांडी ॥३८॥
सर्वदा करावें ईश्वरभजन ॥ जप तप नामस्मरण ॥ येणें होती पतित पावन ॥ तरती प्राणी संसारीं ॥३९॥
संसार अवघा नाशवंत ॥ त्यागून व्हावें भगवद्भक्त ॥ धरावी साधूंची संगत ॥ करावें कडकडित वैराग्य ॥४०॥
धरावी शांति क्षमा दया ॥ त्यजावें काम क्रोध लोभ तया ॥ देह गेह पुत्र जाया ॥ वांतिप्राय त्यागिजे ॥४१॥
बहु पुण्य आचरावें ॥ सत्य वाचेसि वदावें ॥ पाप वाढों न द्यावें ॥ प्रेम असों द्यावें गुरुपासीं ॥४२॥
उपासनाकांडामाझारी ॥ मध्वाचार्य जाहला अधिकारी ॥ तेणें भक्ति विशेष थोरी ॥ तेचि निष्ठा लाविली ॥४३॥
भक्तीवांचोनि मोक्ष नाहीं ॥ उपासनाकांडींचा अनुभव पाहीं ॥ पुढें ज्ञानकांड तेही ॥ उघड ऐकें द्विजोत्तमा ॥४४॥
ज्ञानकांडीचें बोलणें ॥ अद्वैत कथिलें ब्रह्मज्ञान ॥ प्रपंच सृष्टीचें भान ॥ मिथ्या ऐसें मांडिलें ॥४५॥
सकळ ब्रह्म एक ॥ हा ज्ञानकांडींचा विवेक ॥ भक्ती उपासना कर्म देख ॥ हे स्वप्नवत कल्पना ॥४६॥
दिसे जितुके चराचर ॥ तो ब्रह्मींचा विस्तार ॥ आकार आणि निर्विकार ॥ असे ब्रह्म एकचि ॥४७॥
परिसोनी देवाचा अभिप्राय ॥ प्रार्थना करी द्विजवर्य ॥ म्हणे अहो जी देवराय ॥ वेद ऐसें कां वदला ॥४८॥
कोठें बोलिला कर्म श्रेष्ठ ॥ कोठें सांगितली उपासना वरिष्ठ ॥ कोठें सांगितलें ब्रह्मचि एकनिष्ठ ॥ ऐसें त्रिकांड वदला ॥४९॥
वेदीं एकही निश्चय नाहीं ॥ मग जनांचा अन्याय कांहीं ॥ हा माझें अनुभव देहीं ॥ प्रचीत याची बैसेना ॥५०॥
जगदीश म्हणे ब्राह्मणा ॥ उत्तम काढिली त्वां कल्पना ॥ आतां परिसोनि बुध्दिनिपुणा ॥ वेदगुह्यार्थ सांगतों ॥५१॥
वेदें सृष्टीमध्यें अवलोकिलें ॥ जीव बहुत अज्ञान देखिले ॥ मग त्यांसी कर्म स्थापिलें ॥ यातिभेद दावूनी ॥५२॥
कर्म तेंचि श्रेष्ठ ब्रह्म ॥ ऐसें वेदें दाविलें वर्म ॥ यालागीं जन स्वधर्म ॥ करिते जाहले वेदआज्ञा ॥५३॥
कर्मीच गुंतले अवघे जन ॥ नेणती भक्तिवैराग्य ज्ञान ॥ म्हणोनि उपासना भजन ॥ दावी वेद जनांसी ॥५४॥
वेदीं फिरोन जंव पाहिलें ॥ तंव चैतन्यमायेपासोनि अवघें विस्तारलें ॥ यालागीं सकळ ब्रह्म बोलिलें ॥ द्वैतभाव विसरोनी ॥५५॥
वेदांचें मुख्य देखणें ॥ चैतन्यस्वरुपापर्यंत जाण ॥ यास्तव चैतन्यमायेलागून ॥ वेद ब्रह्म बोलिला ॥५६॥
आतां चैतन्यावरुतें ॥ वेदासि निरखेना निरुतें ॥ म्हणोनि कुंठित जाहला वाचेतें ॥ नेति शब्दें मौनावला ॥५७॥
एक म्हणती वेद जाणून परतले ॥ एक म्हणती नेणोनि फिरले ॥ हें तुज गुह्यार्थ कळलें ॥ पाहिजे द्विजवर्या ॥५८॥
वेदें ओळखिलें चैतन्यस्वरुपासीं ॥ तेथोनि जन्मही तयासी ॥ मग चैतन्य ब्रह्म हा विश्वासीं ॥ धरोनि वेद मौनावले ॥५९॥
चैतन्यमायेपरतें न कळे कांहीं ॥ यालागीं वेद नेति बोलिले पाहीं ॥ म्हणोनि अर्थद्वय ज्ञान तेंहीं ॥ अन्वय लाविती वेदाचा ॥६०॥
जें कर्मी यथासांग वर्तले ॥ तयां स्वर्गफल प्राप्त जाहलें ॥ उपासनामार्गी राहाटले ॥ ते पावले वैकुंठ कैलास ॥६१॥
जे ज्ञानमार्गी शोधूनी ॥ अद्वैत निश्चय मानूनी ॥ ते पावले चैतन्यालागूनी ॥ वेदाधारें जाणपां ॥६२॥
आतां वेदांत शास्त्राचे ठायीं ॥ अद्वैतब्रह्म कथिलें पाहीं ॥ ब्रह्मीं प्रपंच जाहला नाहीं ॥ हाचि केला निश्चय ॥६३॥
इच्छा कल्पनातीत ॥ ब्रह्म निरामय आनंदभरित ॥ हा वेदांतशास्त्राचा सिध्दांत ॥ माया स्वरुपीं नाहीं जाहली ॥६४॥
सांख्यशांस्त्रीं कळविलें ॥ जे ब्रह्मींच विश्व विस्तारलें ॥ जळापोटीं तरंग उद्भवलें ॥ किंवा कनकीं नग जैसे ॥६५॥
कापुसाचिया मुळें ॥ जाहलीं तिवटें परकाळें ॥ तैसें ब्रह्मचि आकारिलें ॥ विश्वमय जाणावें ॥६६॥
हें विश्वचि ब्रह्म पाहीं ॥ त्याविण दुसरा पदार्थ नाहीं ॥ हा सांख्यशास्त्रींचा अनुभव घेई ॥ ओळखोनियां द्विजोत्तमा ॥६७॥
न्यायशास्त्रीं कथिलें द्वैत ॥ माजविला कळी ॥ विजयाची गुढी उभविली ॥ हे तो किल्ली विष्णूची ॥६८॥
सुरांअसुरां लाविला ॥ राक्षसा दिसे भयानक ॥ युध्दप्रसंगीं हांव अधिक ॥ हाचि तवक विष्णूचा ॥६९॥
बळरामाचा गर्व हरोन ॥ सत्यभामा लज्जित करुन ॥ गरुडाचा फुंद जिरवून ॥ हेंही विंदान विष्णूचें ॥७०॥
प्रतापें जिंकोनि रुक्मिणी ॥ रुक्मया विटंबिला रथबंधनी ॥ बाणासुराच्या भुजा छेदुनी ॥ उखा अनिरुध्दा पर्णिली ॥७१॥
भीमहस्तें जरासंध ॥ मल्लयुध्दें केला वध ॥ बहुत नृपांचें वृंद ॥ करी निर्द्वंद्व विष्णूची ॥७२॥
सभापर्वी शिशुपाळ ॥ शस्त्रें छेदिले कंठनाळ ॥ भय पावलें सर्व नृपाळ ॥ तोही खेळ विष्णूचा ॥७३॥
वनवासीं घातलें पांडवा ॥ राज्य भोगा कौरवां ॥ कलहमूळ उद्भवा ॥ हा अभिप्राय विष्णूचा ॥७४॥
अठरा अक्षौहिणी दळ ॥ कुरुक्षेत्रीं आटलें सकळ ॥ कर्ण भीम द्रोणा शल्य ॥ कालचक्रीं ग्रासिलें ॥७५॥
धृतराष्ट्रसंततीचा लयो ॥ पांडुवंशीं विजयाचा उदयो ॥ पुढें अश्वमेघाचा अन्वयो ॥ बुध्दिप्रेरक विष्णूची ॥७६॥
अश्वमेघासाठीं ॥ जिंकिल्या भूपांच्या कोटी ॥ असंख्य सैन्याच्या थाटी ॥ पार्थशरें संहारिल्या ॥७७॥
महावीर यादव रुप ॥ त्यांस घडविला ब्रह्मशाप ॥ संहारिलें आपेंआप ॥ हा संकल्प विष्णूचा ॥ ७८॥
कृष्णें कठोर कर्मे केलीं ॥ तीं जाणावीं अंशें घडलीं ॥ परमेश्वर कृपेची माऊली ॥ सम विषम त्या नसे कीं ॥७९॥
माया विष्णूपासोन ॥ जाहलें तें केलें कथन ॥ आतां परमेश्वर जो निर्गुण ॥ त्याचे गुण परियेसीं ॥८०॥
गोकुळ त्यागितां कृष्ण ॥ मथुरेलागीं करिता गमन ॥ गोपिकांसी वियोग गहन ॥ शोकार्णवीं लोटल्या ॥८१॥
गोवत्सां तोडातोडीं ॥ किंवा मीन जळातें सोडी ॥ अस्तमानी रवि देतां बुडी ॥ होय विघडी चक्रवाकां ॥८२॥
तयापरी गोपललना ॥ कृष्णसंभोग आठवोनि मना ॥ विरहज्वरें करिती रुदना ॥ म्लानवदना होऊनी ॥८३॥
गोकुळीं न दिसे शार्ड्गपाणी ॥ अश्रुबिंदू ढाळती लोचनीं ॥ श्रीकृष्ण वियोगें कामिनी ॥ शोक मनीं अद्भुत ॥८४॥
कुरळकेशीं जाहली जटा ॥ भांग फणिविण मळवटा ॥ न ये झोंप नेत्रीं ताठा ॥ भरला फांटा विष्णुविणें ॥८५॥
हस्त पाद न धुती अंग ॥ त्यागिले पंच विषयभोग ॥ चित्तीं भरला अनुराग ॥ अति उद्वेग हरीचा ॥८६॥
सेवूं जातां अन्नपाणी ॥ विषप्राय वाटे वदनीं ॥ हास्यविनोद नाठवे मनीं ॥ लागली उन्मनी हे दशा ॥८७॥
ठेवा हरपल्या लोभ भ्रमती ॥ जैसें पिशाच संचरे चित्तीं ॥ गोपिकालागीं ते गती ॥ होती जाहली हरिविण ॥८८॥
जेवितां घांस आडके मुखीं ॥ पाणी पितां लागे उचकी ॥ मार्गी जातां जाय लचकी ॥ चुकी पडे गृहकामा ॥८९॥
यापरी गोपिका दु:खी ॥ अहर्निशीं पडिल्या शोकीं ॥ हें वर्म जाणे हरि कीं ॥ कृपावलोकीं तो जाहला ॥९०॥
यादवांमाजी पूजन ॥ पुण्यश्लोक रायांचे कथन ॥ सुरां असुरांचें युध्द कंदन ॥ कथिले दाहा अवतार ॥९१॥
विष्णुचरित्र शिवचरित्र ॥ शक्तिउपासनेचे नेम स्तोत्र ॥ अनेक विद्या साधनें मंत्र ॥ षट्‍कर्म विद्या दाविली ॥९२॥
दाविले बहुत देश ॥ सत्यलोक वैकुंठ कैलास ॥ मेरुपर्वत स्वर्गास ॥ स्तवितीं जाहलीं पुराणें ॥९३॥
काशी माहात्म्य मथुरा माहात्म्य ॥ द्वारका माहात्म्य गंगामाहात्म्य ॥ सिंधुसरितांचे उगम ॥ मुंजी लग्नें वर्णिलीं ॥९४॥
पुराणीं वेदांचाही आश्रय घेतला ॥ शाखांचाही सिध्दांत स्थापिला ॥ ज्ञानाचाही अनुभव दाविला ॥ भक्ति ज्ञान वैराग्य निवेदिलें ॥९५॥
हा पुराणींचा विचार ॥ तुज निरुपिला सविस्तर ॥ यांत बहुत बोलिला प्रकार ॥ तें कासया सांगावें ॥९६॥
मुख्य वेदांचें देखण ॥ चैतन्य मायेपर्यंत जाण ॥ तेथून मौनावलें वेदवचन ॥ नेति शब्दें बोलोनी ॥९७॥
यालागीं रचिला पदार्थ ॥ तुज दाविला उघडोनि अर्थ ॥ पाल्हाळ करितां वाढेल ग्रंथ ॥ त्यासी काय प्रयोजन ॥९८॥
ऐसें वदतां परमपुरुष ॥ परिसोन द्विज करी प्रश्नास ॥ म्हणे स्वामी जगदीश ॥ परिसा माझी विनंति ॥९९॥
मायानियंता परमेश्वर ॥ ऐसा वेदांचा उच्चार ॥ तुम्ही म्हणतां मायेपर्यंत निर्धार ॥ केला असे वेदानें ॥१००॥
चैतन्य म्हणजे मायास्वरुप ॥ तेंचि वेदानें कैसें स्थापिलें तद्रूप ॥ यासी मातें स्वल्प ॥ गुंती दिसे दयाळा ॥१॥
परिसोनि द्विजाचा अभिप्राव ॥ बोलता जाहला देवाधिदेव ॥ म्हणे तुझ्या संशयाचा ठाव ॥ नुरे ऐसें सांगतों ॥२॥
माया निरुपिल्या तुज चार ॥ ते मायेचा वेदें केला निर्धार ॥ चौथी चैतन्यमाया अपार ॥ तेचि ब्रह्म स्थापिलें ॥३॥
महामाया तळीं दैवीमाया ॥ ते वेदीं केली मुख्य माया ॥ कनिष्ठ ते जाण अविद्या माया ॥ परी चैतन्यमाया ते धन्य ॥४॥
हा मुख्यवेदांचा निर्धार ॥ तुज निरुपिला सविस्तर ॥ म्हणोनि वेदांचा उच्चार ॥ मायापरते स्वरुप ॥५॥
चैतन्यमायेपर्यंत ॥ वेद पाहोनियां निवांत ॥ सकळ शास्त्रींचें मत ॥ भैरवापावेतों जाणावें ॥६॥
पुराणांचें जें देखणें ॥ तें क्षीराब्धिपर्यंत जाणणें ॥ प्राकृत कवीचें बोलणें ॥ कैलासवैकुंठापावेतों ॥७॥
ऐसें वदतां श्रीदेवें ॥ ब्राह्मण म्हणे बहुत बरवें ॥ साहा दर्शनांचा अनुभव ॥ मातें सांगा निवडोनी ॥८॥
देव म्हणे द्विजालागुन ॥ ऐक साहादर्शनांची नामें भिन्न ॥ कामशास्त्राचें देखण ॥ कानफाटयाचा सिध्दांत ॥९॥
ब्रह्मांडीं आत्मा बोलती ॥ अखंड वायु धारणा करिती ॥ प्राणापाना निरोधिती ॥ मुद्रा लाविती लक्षुनी ॥११०॥
घालिती वज्रासन पद्मासन ॥ साधिती अष्टांगयोग साधन ॥ हृदयीं भैरवांचें ध्यान ॥ शक्तिउपासना बहु करिती ॥११॥
सेविती मद्यमांसांचा आहार ॥ मुखीं साबरी मंत्रोच्चार ॥ सिध्दि साधनें अष्टही प्रहर ॥ हाचि अभ्यास तयांसी ॥१२॥
झोळी यंत्र माळा मेखला ॥ सैली शिंगी टोपी डोईला ॥ बहुत हाव तीर्थाटणाला ॥ देशोदेश फिरताती ॥१३॥
जारण मारण उच्चाटण ॥ ऐसे विद्येचें करिती ध्यान ॥ मसणखाईंत बैसोन ॥ वश करिती भूतप्रेतें ॥१४॥
निमाल्या मनुष्याची खोपरी ॥ भरोनि वागविती भीतरीं ॥ कोणासि दाऊनि चमत्कारीं ॥ वश करिती जनांसी ॥१५॥
मोहनी घालोनि स्त्रियेतें ॥ भुलवोनि नेती सांगातें ॥ सर्वदा तामसप्रकृतितें ॥ शांति क्षमा असेना ॥१६॥
नाहीं स्नान जप तप ध्यान ॥ अघोरकर्मी मलिन ॥ नित्य अफु भांग प्राशन ॥ तन्मय होणें कैफानें ॥१७॥
कोणीं केलिया स्वल्प अन्याय ॥ क्षोभोनि मारिती मंत्रघाय ॥ यापरी वर्तणूक होय ॥ कानफाटया जोग्याची ॥१८॥
नाहीं शांति क्षमा दया ॥ मोक्ष कैंचा त्या प्राणिया ॥ व्यर्थ जन्मोनि गेले वायां ॥ धड प्रपंच ना परमार्थ ॥१९॥
हें कान फाटयाचें दर्शन ॥ याचें कामशास्त्र देखण ॥ परी परमार्थाची खूण ॥ अणुप्रमाण असेना ॥१२०॥
धर्मशास्त्राचें देखण ॥ अनुभवी सेवडा दर्शन ॥ करिती केशांचें लुंचन ॥ पारसनाथा पूजिती ॥२१॥
हिंसेचियासाठीं ॥ नासिकीं बांधिती अविपटी ॥ मुख झांकोनि सांगती गोष्टी ॥ नेसती शुभ्र वस्त्रासी ॥२२॥
जेव्हां बैसती भोजनीं ॥ वाजविती घंटा घोषध्वनी ॥ दुजयाचा शब्द पडतां श्रवणीं ॥ उठती त्यागुनी अन्नासी ॥२३॥
निंदिती तीर्थव्रतांसी ॥ द्वेषिती शास्त्रपुराणांसी ॥ न मानिती इतरां देवांसी ॥ ध्यान करिती बौध्दाचे ॥२४॥
हे दर्शन शेवडयाचें ॥ धर्मशास्त्र नेमिलें त्याचें ॥ तिजे दर्शन योगशास्त्राचें ॥ जंगम ओळखें सुजाण ॥२५॥
डोईवर जटांचा भार ॥ गळां बांधिती लिंग पाथर ॥ करिती शंखघंटांचा गजर ॥ ‘ओंनम: शिवाय’ उच्चारुनी ॥२६॥
भगवें करुन वस्त्रांसी ॥ लाविती विभूतिपट्टा कपाळासी ॥ गळां मेखला करीं झोळीसी ॥ कोरांन्न भिक्षा मागती ॥२७॥
घालिती रुद्राक्ष मेखला ॥ साधिती आसन योगमुद्रेला ॥ यापरी जंगमप्रदर्शनाला ॥ योगशास्त्रीं बोलिलें ॥२८॥
यवनयातीचे फकीर ॥ सोपी मुंडी मलंग थोर ॥ द्वैतपक्षाचा अधिकार ॥ दर्शन त्याचें न्यायशास्त्र ॥२९॥
सांख्यशास्त्री जोगी जटिल ॥ सर्वदा तामसी क्रोध पुष्कळ ॥ उन्मत्त दशा अहंता प्रबळ ॥ गर्विष्ठबुध्दीनें वर्तती ॥१३०॥
क्षत्रियासारखी प्रकृती ॥ शास्त्रांचीं वोझीं वागविती ॥ स्वयातीसी युध्द करिती ॥ नसे शांति तयांलागीं ॥३१॥
कोणी होती नग्न दिगंबर ॥ कोणी भगवीं करिती चीर ॥ कोणी करिती उदिम व्यापार ॥ कोणी होती मठपती ॥३२॥
कोणी होती दुग्धआहारी ॥ कोणी होती ठाडेश्वरी ॥ कोणी ऊर्ध्वबाहु वरते करीं ॥ कोणी होती आकाशमौनी ॥३३॥
कोणी होती घरबारी ॥ कोणी होते ब्रह्मचारी ॥ कोणी धूम्रपान करी ॥ कोणी फिरती दशदिशां ॥३४॥
त्याचें मूळ म्हणसी कोठून ॥ तरी सांगतो तुजलागून ॥ शंकराचार्यापासून ॥ उद्भव जटिलमार्गाचा ॥३५॥
प्रथम शिष्य विश्वरुपाचार्य ॥ दुजा शिष्य पद्माचार्य ॥ तिजा शिष्य नृतकाचार्य ॥ श्रृंगिरीआचार्य तो चौथा ॥३६॥
मुख्य शंकराचार्य वरिष्ठ ॥ चौं शिष्यांचे चार मठ ॥ तयांपासोनियां प्रगट ॥ दशनाम संन्यास वाढला ॥३७॥
तीर्थ आश्रम वन ॥ पर्वत सागर मिळोन ॥ सरस्वती भारती आदिकरुन ॥ पुरी दाहावा जाणिजे ॥३८॥
यापरी जटिलमार्गाचें ॥ सांख्यशास्त्र दर्शन त्याचें ॥ आतां वेदांतशास्त्राचें ॥ श्रीपाद दर्शन तें ऐका ॥३९॥
त्यागून शिखासूत्रांसी ॥ हातीं वागवी दंडकमंडलूंसी ॥ करी त्रिकाळ स्नानासी ॥ सोहं मंत्र उच्चारी ॥१४०॥
साहा दर्शनांचा मार्ग ॥ तुज निरुपिला यथासांग ॥ परी मोक्षसुखाचा भाग ॥ त्यांचे ठायीं घडेना ॥४१॥
जैं आचरे श्रीपाद शुध्दनेम ॥ तैं सांपडे विश्वरुपाचें निजवर्म ॥ नाहीं तरी रविसुताचें धाम ॥ पदरीं बांधिलें निश्चयें ॥४२॥
कानफाटा आणि सेवडा ॥ जरी आचरे स्वधर्म निधडा ॥ तरी अष्टभैरवपदा रोकडा ॥ पावे निश्चयें जाणिजे ॥४३॥
सेवडा कानफाटा होऊन ॥ जरी करिती भोंदू आचरण ॥ तरी नरकभोग दारुण ॥ पदरीं त्यांचे बांधिला ॥४४॥
सोपी मुंडी मलंग फकीर ॥ राहाटती शुध्दभजनें निरंतर ॥ पावती महाविष्णूचें नगर ॥ क्षीराब्धिपदाचे ठायीं ॥४५॥
अवलंबूनि फकीरीसी ॥ होय उन्मत्तदशा त्यांसी ॥ मग चौर्‍यांसीच्या फांसीं ॥ पडोनि पावती यातना ॥४६॥
जटिल आणि जंगम निगुते ॥ आचरती शुध्दमतीतें ॥ तैं पावती कैलासपदातें ॥ शिवासन्निध साचार ॥४७॥
तेही होती मतिमंद ॥ करिती जेथें तेथें द्वंद्व ॥ मग यमाजीचे बंद ॥ खाती दंड कुडाचे ॥४८॥
यापरी साहादर्शन ॥ देवें निरुपिलीं द्विजालागून ॥ मग पुसता जाहला ब्राह्मण ॥ पांच आश्रम ते कैसे ॥४९॥
करावया प्रश्नाचा परिहार ॥ बोलता जाहला जगदीश्वर ॥ म्हणे परिसें ब्राह्मणा चतुर ॥ पांचही आश्रम सांगतों ॥१५०॥
प्रथम आश्रम ब्रह्मचारी ॥ स्त्रीजातीचा स्पर्श न करी ॥ कामवासना मनामाझारी ॥ अणुमात्र न स्पर्शे ॥५१॥
निष्काम कामनारहित ॥ न खाय मिष्टान्न तांबुलवर्जित ॥ आश्रम नेमीं सदा रत ॥ मृदु शय्या नसावी ॥५२॥
न करावें स्त्रियांशी भाषण ॥ न करावें स्त्रियांशीं अवलोकन ॥ न करावें स्त्रीनिकट आसन ॥ बाधक जाण ब्रह्मचर्या ॥५३॥
दिवसां अवलोकी स्त्रियांसी ॥ स्वप्नीं वीर्यपतन पुरुषासी ॥ यालागी ग्रामवस्तीसी ॥ ब्रह्मचार्‍यानें राहूं नये ॥५४॥
एकस्थळीं न करावा वास ॥ तीर्थयात्रे हिंडावें अनेक देश ॥ नित्य घोंकणें शास्त्रास ॥ फार निद्रा करुं नये ॥५५॥
विशेष भक्षूं नये अन्नासी ॥ अल्प आहार असावा त्यासी ॥ उंच शुभ्र वस्त्रांसी ॥ ब्रह्मचारीया लेवूं नये ॥५६॥
ऐसिया नेमें असतां जरी आयुष्य सरे तत्वतां ॥ तरी सत्यलोकाची प्राप्तता ॥ ब्रह्मचारी पावती ॥५७॥
धरोनि ब्रह्मचर्य नेम ॥ घडे इंद्रियें भ्रष्टकर्म ॥ तरी अघोर नरकींचें धाम ॥ वस्ती त्यातें बोलिजे ॥५८॥
आतां गृहस्थाश्रमीं कैंसें ॥ तेंही परिसें अनायासें ॥ नेमिलेंसे शास्त्रीं जैसें ॥ तैशापरी राहाटावें ॥५९॥
आधीं पवित्र कुळ शोधून ॥ पाहावी नोवरी शुभलक्षण ॥ सर्वांगींची आकृती चिन्ह ॥ अवलोकावीं सामुद्रिक ॥१६०॥
ठोंसर केश जटा वळिती ॥ तरी जाणावी दरिद्री पुढती ॥ भिवयांस गांठी पाडिती ॥ तरी होईल कटाक्ष ॥६१॥
निरूंद कपाळ खुजट कर्ण ॥ तरी जाणावी भाग्यहीन ॥ बसके गाल संकुचित
नयन ॥ भार्या न करावी ॥६२॥
स्थूळ ओंष्ठ दीर्घ दंत ॥ घोगरा घसा बोले ठसठसीत ॥ उंच मान ठोसर बहुत ॥ तेही भार्या न करावी ॥६३॥
निरुंद कपाळ रुंद मनगट ॥ पसर स्तनडंबरे पोट ॥ मोठी टांच फेंगडी बोट ॥ तेही भार्या न करावी ॥६४॥
लांब हात नखें पांढरीं ॥ बहुत उंच होय ठेंगणी जरी ॥ निघती बरगडया शरीर भारी ॥ तेही भार्या न करावी ॥६५॥
बारीक मांडी ठोंसर पोटरी ॥ कान्ही तिरळी शब्दें तोंतरी ॥ कोळशासारिखा वर्ण जरी ॥ तेही भार्या न करावी ॥६६॥
बहुत हांसे फार बोले ॥ मागें पाहे पुढें चाले ॥ परपुरुषीं मोडी डोळे ॥ तेही भार्या कुलक्षणी ॥६७॥
कच्छ फेडी वारंवार ॥ डोईचा खांद्यावरी पदर ॥ तोलून चाले उरावर ॥ तेही भार्या कुलक्षणी ॥६८॥
लेंकीस लोभ सूनेसि मारी ॥ नित्य कलह माजवी घरीं ॥ फिरोनि उत्तर भ्रतारासी करी ॥ तेही भार्या कुलक्षणी ॥६९॥
क्षणक्षणा उठे बैसे ॥ परपुरुषीं मन वसे ॥ पति पाहोनि न उल्हासे ॥ तेही भार्या न करावी ॥१७०॥
माहेरा जावया उल्हास वाटे ॥ सासर्‍या जावया विटे ॥ खाजवी डोई मोडी बोटें ॥ तेही भार्या कुलक्षणी ॥७१॥
चोरुनि दुग्ध घृत प्राशन करी ॥ पुसतां घाली मांजरीवरी ॥ आहार निद्रा आळस भारी ॥ तेही भार्या कुलक्षणी ॥७२॥
श्रृंगारावया नगभूषणासी ॥ सर्वदा तंडे भ्रतारासी ॥ भिक्षुकावरी धांवे लास जैसी ॥ तेही भार्या कुलक्षणी ॥७३॥
ऐसिया गुणांची अंगना ॥ होतां जिताचि नरक जाणा ॥ यालागीं शुभलक्षणा ॥ पाहोनि कीजे वधु वर ॥७४॥
कुरळ केश बारीक जरी ॥ ते भाग्यवंत सुंदरी ॥ भाळ रुंद अंगुळें चारी ॥ तेही भार्या करावी ॥७५॥
नीट नासिक उंच कर्ण ॥ मुख वांटोळे विशाळ नयन ॥ अधर जिव्हा आरक्त जाण ॥ तेही स्त्री करावी ॥७६॥
सूक्ष्म हनुवटी शुभ्र दंत ॥ हिरकण्यां ऐसे शोभिवंत ॥ नीट ग्रीवा नेमस्त ॥ तेही भार्या करावी ॥७७॥
बारीक माज मंद उदर ॥ पाद आणी रुंद उर ॥ वाटोळी उंच स्तनें कठोर ॥ तेही भार्या करावी ॥७८॥
स्थूळ मांडया पोटर्‍या सरळ ॥ चवडे करंगुळी टांचा वर्तुळ ॥ मुखें बोले शब्द मंजुळ ॥ तेही भार्या करावी ॥७९॥
सुकुमार तेचि चांपेंकलिका ॥ सौंदर्यदीपलतिका ॥ कुळतारिणी केवळ नौका ॥ तेही भार्या करावी ॥८०॥
रक्षी उभयतां कुळांचें नांव ॥ भ्रतारसेवेसि अष्टही भाव ॥ हृदयीं वसे विवेक अनुभव ॥ तेही भार्या करावी ॥८१॥
परपुरुष पित्यासमान ॥ कुटुंबाचें रक्षूं जाणें मन ॥ लवोनि चाले मंद बोलणें ॥ तेही भार्या शुभलक्षणीं ॥८२॥
चातुर्य लक्षण गुणरत्न ॥ भ्रतारआज्ञा वेदप्रमाण ॥ आहार निद्रा स्वल्प जाण ॥ तेही भार्या शुभलक्षणी ॥८३॥
सर्वलक्षणीं गुणराशी ॥ पाहतां दिसे भाग्यवंतासी ॥ बहुतांयत्नें पर्णावें तिसी ॥ गृहस्थाश्रम तरीच बरवा ॥८४॥
एकनाड षडाष्टक चुकवून ॥ दोहींचा पाहोन एक गण ॥ ग्रह मैत्री छत्तीस लक्षण ॥ कुशळ शोधूनी पाहणें ॥८५॥
संपादिला गृहस्थाश्रम ॥ राहाटों वसे स्वहित धर्म ॥ करी वेदविरहित कर्म ॥ तोचि अधर्म गृहस्थासी ॥८६॥
चोरुन मेळवी धनासी ॥ पोशी आपल्या कुटुंबासी ॥ कापटय वसे बहुमानसीं ॥ तोचि अधर्म गृहस्थासी ॥८७॥
स्वल्पासाठी कलह करणें ॥ अखंड घुमे क्रोधायमान ॥ भलतेंचि बोले अवलक्षण ॥ तोचि अधर्म गृहस्थासी ॥८८॥
घरीं कटकट अष्टौप्रहार ॥ नसतां अपराध स्त्रीस मार ॥ चालवी सोयर्‍यासी वैराकार ॥ तोचि अधर्म गृहस्थासी ॥८९॥
आपुली वासना मांसावरी ॥ निमित्त करोंनि देवावरी ॥ जीव वधूनि आहार स्वीकारी ॥ तोचि अधर्म गृहस्थासी ॥१९०॥
गृहीं असोनि आपुली वनिता ॥ परद्वारीं फारसी आस्था ॥ विमुख होय संत पाहतां ॥ तोचि अधर्म गृहस्थासी ॥९१॥
पदरीं असोनि धनाच्या राशी ॥ परी पसा न वेंचीं धर्मांसी ॥ बहुत लोभी हांव मानसी ॥ तोचि अधर्म गृहस्थासी ॥९२॥
बहु आहार निद्रा मैथुन ॥ परनिंदा असत्यभाषण ॥ संशय विकल्प हिंसाकारण ॥ तोचि अधर्म गृहस्थासी ॥९३॥
सर्वदा आळसी बुध्दिमंद ॥ करी नीचासी संबंध ॥ लटका करी अनुवाद ॥ तोचि अधर्म गृहस्थासी ॥९४॥
मनुष्यजन्म पावोनि ॥ न करी परमेश्वराचें भजन ॥ न वाची नायके शास्त्रालागून ॥ तोचि अधर्म गृहस्थासी ॥९५॥
न करी साचारविचार ॥ नोळखे पापपुण्य़ नर ॥ विषयलुब्ध वासना फार ॥ तोचि अधर्म गृहस्थासी ॥९६॥
साधूंसि पायां पडतां लाजे ॥ वेश्याघरीं जावोनि मौजे ॥ हित अनहित न सुचे ॥ तोचि अधर्म गृहस्थासी ॥९७॥
भोजनपंक्तींत करी प्रपंच ॥ न्याय निवडूनि घेई लांच ॥ ईश्वरभजनीं धरी संकोच ॥ तोचि अधर्म गृहस्थासी ॥९८॥
घरीं अन्नवस्त्राची आटी ॥ आपण बैसी चावडीं मठीं ॥ फुकट सांगे लोकां गोष्टी ॥ तोचि अधर्म गृहस्थासी ॥९९॥
ऐसी ज्या गृहस्थांची राहाटी ॥ ते जाती नरकाचिया हाटीं ॥ वृषभापरीं शिणोनि शेवटीं ॥ मरोनि जाती चौर्‍यांसीं ॥२००॥
यालागूनि गृहस्थानें ॥ सर्वदा असावें सावधानें ॥ सारसार विचार करणें ॥ हाचि स्वधर्म गृहस्थासी ॥१॥
आपुले कष्टें धन जोडून ॥ त्यावरी रक्षी कुटुंबालागून ॥ करी अतीताचें पूजन ॥ तोचि स्वधर्म गृहस्थासी ॥२॥
होय पापासी विमुख ॥ संतसेवेसि सदा संमुख ॥ मानी आप्तहित तेंचि सुख ॥ तोचि स्वधर्म गृहस्थासी ॥३॥
न करी हिंसा परद्वार ॥ वेगमर्यादा वर्ते सादर ॥ भूतमात्रीं दया फार ॥ तोचि स्वधर्म गृहस्थासी ॥४॥
आलिया भिक्षुक आश्रमासी ॥ अन्नवस्त्रें तोषवी त्यासी ॥ अंगर्वे वंदी साधूसी ॥ तोचि स्वधर्म गृहस्थासी ॥५॥
परोपकारीं वेंची प्राण ॥ निंदा न करी वाचे मौन ॥ परस्त्री पाहतां नपुंसकपण ॥ तोचि स्वधर्म गृहस्थातें ॥६॥
पराचा जाहलिया अपराध ॥ क्षमा अवलंबूनि न करि द्वंद्व ॥ अहंपणाचा उतरी मद ॥ तोचि स्वधर्म गृहस्थासी ॥७॥
स्वजातीसी नम्रता ॥ सोयरियांच्या आवडे चित्ता ॥ चालवी विश्वास सख्यता ॥ तोचि स्वधर्म गृहस्थासी ॥८॥
यापरी गृहस्थाश्रमीं राहतां ॥ आयुष्य वेंची जीविता ॥ तया वैकुंठ लोकीं योग्यता ॥ घडे फळभोगी सुरवांडी ॥९॥
हे गृहस्थाश्रमाची राहाटी ॥ सांगीतली द्विजाचे कर्णपुटी ॥ पुढें वानप्रस्थाची कसवटीं तेंही गोष्टी मांडिली ॥२१०॥
देव म्हणे द्विजवर्या ॥ परिसें वानप्रस्थाची चर्या ॥ संगें घेवोनि आपुली जाया ॥ वनवासीं निघावें ॥११॥
त्यागूनि ग्रामवस्ती ॥ वास्तव्य कीजे अरण्यासी ॥ स्वीकारुनी कंदमूळांसी ॥ तपश्चर्या करावी ॥१२॥
घेऊनि आपुली पत्नी ॥ शय्या करावी एकासनीं ॥ उभयतांमध्यें दंड ठेवूनी ॥ मैथूनक्रिया न करावी ॥१३॥
नये भादरुं डोईचे केश ॥ काढूं नये नखांस ॥ उटणें मर्दन अंगास ॥ वानप्रस्थीं न करावें ॥१४॥
घ्यावे स्नानास शीतळ जळ ॥ घासूं नये अंगीचा मळ ॥ मुखप्रक्षालन आळुमाळ ॥ वानप्रस्थें न करावें ॥१५॥
सीतमासीं जळांत बैसोन ॥ चातुर्मासीं करावें अनुष्ठान ॥ पुढें उष्णकाळ मांडल्या जाण ॥ पंचाग्नितापें तपावें ॥१६॥
पातल्या पर्जन्याचे दिवस ॥ उघडया अंगीं सेविजे वृष्टीस ॥ यापरी बाराही मास ॥ कष्ट करणें वानप्रस्थीं ॥१७॥
ऐसियापरी वानप्रस्थ ॥ आचरतां पावे देहाचा अंत ॥ तयासी कैलासलोक प्राप्त ॥ घडे निश्चित निर्धारें ॥१८॥
धरोनि वानप्रस्थाचें रुप ॥ करी व्यवहार खटाटोप ॥ स्वयें करितां विषय स्वल्प ॥ जाय अध:पाता तत्काळ ॥१९॥
हे वानप्रस्थाची क्रिया ॥ तुज सांगीतली द्विजवर्या ॥ आतां संन्याशाचिया अभिप्राया ॥ येतीं कर्मे ती ऐका ॥२२०॥
घेतां संन्याशाचें सोंग ॥ कीजे शिकासूत्रत्याग ॥ अनेक विषय भोग ॥ वांतिप्राय त्यजावे ॥२१॥
घेऊनि संन्याशाचा वेष ॥ पदरीं जरी बांधिजे द्रव्यास ॥ तरी भक्षिले गोमांस ॥ एवढा दोष त्या घडे ॥२२॥
होतां स्त्रियेचें अवलोकन ॥ मानी खरीशुनीसमान ॥ ऐसी विरक्ति धरी मन ॥ संन्यासदशा तैं जोडे ॥२३॥
त्यागूनि वासनेचा मळ ॥ सांडी कल्पनाविटाळ ॥ वमी क्रोध अहंता अमंगळ ॥ होय निर्मळ निजशांती ॥२४॥
महातीर्थ पवित्रवनीं ॥ वसिजे संन्यासी तयास्थानीं ॥ बहुतजनांचे संघट्टणीं ॥ राहतां दूषण घडेल ॥२५॥
भांग तमाखूरुपानें ॥ स्वीकारुं नये संन्याशानें ॥ सोंगटी गंजिफाचें व्यसन ॥ खेळतां दूषण तयालागीं ॥२६॥
दंड कमंडलु हातीं धरोनी ॥ स्वल्पवस्त्र कौपीन नेसोनी ॥ त्रिकाळ स्नानसंध्या सारोनी ॥ स्पर्श कवणाचा करुं नये ॥२७॥
धरोनि नासिकेची बोंडी ॥ कीजे प्रणव आंतिले तोंडीं ॥ आत्मा जाणावा ब्रह्मांडीं ॥ सगुण धोंडीं पूजों नये ॥२८॥
स्वयें न करावा पाक ॥ पदरीं घेऊं अन्न शुष्क ॥ करतलभिक्षा मागोनि देख ॥ स्वीकारावें आवडीं ॥२९॥
ऐसी संन्याशाची कसोटी ॥ होतां सुटे देहाची गांठी ॥ जाऊनि बैसे क्षीराब्धितटीं ॥ महाविष्णूसंनिध ॥२३०॥
यापरी चारीही आश्रमा ॥ तुज सांगीतले द्विजोत्तमा ॥ आतां जो परमहंसनामा ॥ तोही सांगतो तुजप्रती ॥३१॥
परमहंसी असावें नग्न ॥ न करावें वस्त्रांचे परिधान ॥ शिखासूत्र त्यागून ॥ उदास देही असावें ॥३२॥
न करावें जप तप ध्यान ॥ पूजनहास्य विनोद गायन ॥ एक स्थलीं वास्तव्य करुन ॥ परमहंसीं राहूं नये ॥३३॥
सगुणमूर्तीस नमस्कार ॥ न करावा नाममंत्र उच्चार ॥ इच्छूं नये सन्मान आदर ॥ बाळदशा वर्तावें ॥३४॥
घेऊं नये वस्त्रासी ॥ घालूं नये पादरक्षेसी ॥ प्रक्षाळूं नये मुखासी ॥ अंग मर्दन करुं नये ॥३५॥
शिकूं नये कळाकुसरी ॥ धरुं नये शस्त्र दंड करीं ॥ बैसूं नये वाहनावरी ॥ पलंगी शय्या करुं नये ॥३६॥
टेंकून न बैसावें लोडासी ॥ वोढूं नये गुरुगुंडीसी ॥ फार बोलूं नये जनांसी ॥ श्रीमंताघरीं जाऊं नये ॥३७॥
सकलजीवांवरी सारिखा लोभ ॥ केलिया अन्याय न करी क्षोभ ॥ काम क्रोध वासना दंभ ॥ स्वप्नीं नुपजे मानसीं ॥३८॥
ऐसा जो परमहंस ॥ त्यागितां देहपिंजर्‍यास ॥ पावे अष्टभैरवपदास ॥ भोगी त्या सुखास स्वानंदें ॥३९॥
हे पांच आश्रम परदर्शन ॥ यांसि फळभोग देखतां जाण ॥ परंतु परब्रह्म वस्तु निर्वाण ॥ न पावती इतुकेही ॥२४०॥
ऐसा परमात्म्याच्या गोष्टी ॥ पडल्या द्विजाच्या कर्णसंपुटीं ॥ तेणें बांधोनि जीवाचे गांठीं ॥ जाहला संतुष्ट स्वानंदें ॥४१॥
करोनी मनांत विचार ॥ पुसेल देवास प्रश्नोत्तर ॥ तेही प्रश्नाचे प्रकार ॥ पुढीले प्रसंगीं मांडीन ॥४२॥
करोनी बुध्दिची मूस ॥ वोतीन अनुभवाचा रस ॥ आत्मज्ञानाचें पाटस ॥ हृदयीं बिंबवीन श्रोत्यांचे ॥४३॥
दवडोनी भ्रांतीच्या कलंका ॥ सुचित्त होऊन ग्रंथ ऐका ॥ उजळून ज्ञानदीपिका ॥ श्रोत्यापुढें ठेवितों ॥४४॥
करोनी अंत:करण पैस ॥ धरा ग्रंथाची दृढ कास ॥ संसारसिंधु पैलतीरास ॥ उतरीन माझा सद्गुरु ॥४५॥
या ग्रंथाचें शोधन ॥ करोनि रहाटे ज्यांचें मन ॥ त्यांचें चुके जन्ममरण ॥ सत्य साक्षी परमात्मा ॥४६॥
त्या परमात्म्याचा निदिध्यास ॥ हृदयीं लागला शहामुनीस ॥ म्हणोनि त्याचे बुध्दीस लिहावया उल्हास ग्रंथासी ॥२४७॥
इति सिध्दांतबोधग्रंथे अध्यात्मनिरुपणतत्वसारनिर्णये चतुविशोंध्याय:  अध्याय ॥२४॥ ॥ ओव्या ॥ २४७ ॥

N/A

References : N/A
Last Updated : November 22, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP