मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|सिध्दान्तबोध|
अध्याय ८ वा

श्रीसिध्दान्तबोध - अध्याय ८ वा

‘श्रीसिध्दान्तबोध’ हा संतकवि श्रीशहामुनि यांचा ग्रंथ म्हणजे मराठी वाड्मयाच्या खाणींतील एक तेजस्वी हिरा आहे.


श्रीगणेशायनम: ॥
सकळ मंगळांचें मंगळ ॥ श्रीकृष्णचरणकमळ ॥ सत्ता सामर्थ्य ऐश्वर्य अढळ ॥ अक्षयी वसे ज्यापाशीं ॥१॥
ज्याच्या प्रतापाची सीमा ॥ वर्णूं न शके शिव ब्रह्मा ॥ अंगें येवोनियां रमा ॥ दास्य करी सर्वस्वे ॥२॥
तोचि माझा समर्थ स्वामी ॥ सेवकां बसवी मोक्षधामीं ॥ त्याचे वंदोनि पादपद्मीं ॥ सार्थक करीं जीवाचें ॥३॥
जयाचें नाम उच्चारितां ॥ चुके संसारदुख:व्यथा ॥ ऐशिया विसरोनि समर्था ॥ आणीक काय जोडावें ॥४॥
आपल्या पतीलागोनी ॥ सोशी कुटुंबाची जाचणी ॥ सासुनणंदाची कांचणी ॥ सुखावरी घेतसे ॥५॥
धरोनि द्रव्याची आस ॥ वेश्या नाचे सभेस ॥ सांडोनि लज्जेचे बुध्दीस ॥ नि:शंक रते परपुरुषीं ॥६॥
लोक विनोदे चेष्टा करिती ॥ त्याचा खेद न मानी चित्तीं ॥ द्रव्य पाहोनियां हातीं ॥ वोपी शरीर आपुले ॥७॥
न पाहे काळा गोरा ॥ तरुण किंवा म्हातारा ॥ धरुनि अर्थाच्या विचारा ॥ पुरुषीं लक्ष ठेवीना ॥८॥
पाहोनि एक देवमणी ॥ शत खोडी नाणोनि मनीं ॥ द्रव्य देवोनियां गुणी ॥ ग्राहीक होती अश्वातें ॥९॥
यापरी संसारांत ॥ जयासी पाहिजे परमार्थ ॥ तो सहस्त्र उपाधि वारित ॥ हितार्थ मानी हरिभक्ती ॥१०॥
जो लागे हरिभजनीं ॥ तयासी निंदिजे विश्वजनी ॥ तो जगाचे घाय सोसोनी ॥ मौनें भजे श्रीहरीसी ॥११॥
विपरीत जनाचा स्वभावो ॥ न कळे शतपुरुषांचा अनुभवो ॥ कोणे घटीं कैसा देवो ॥ त्याचा साक्षी ईश्वर ॥१२॥
हें नेणोनियां अज्ञान ॥ करिती संतांचें छळण ॥ त्यांचे गुणदोषलक्षणें ॥ मुखें आपुल्या जल्पती ॥१३॥
एक म्हणती सत्य साधु ॥ एक म्हणती खरा भोंदु ॥ एक म्हणती महा मैंदु ॥ मिथ्या सोंग मिरवितो ॥१४॥
एक म्हणती यातिभ्रष्ट ॥ एक म्हणती क्रियानष्ट ॥ एक म्हणती हा पापिष्ठ ॥ स्वधर्म येणें बुडविला ॥१५॥
एक म्हणती संन्यास घेतला ॥ संसारकुटुंबाचा त्याग केला ॥ वस्त्रें द्रव्य मागतो कशाला ॥ आशा अझूनि सुटेना ॥१६॥
एक म्हणती लावोनि लंगोटी ॥ जावोनि बैसावें गिरिकपाटीं ॥ नगरलोकां राहटी ॥ यांत कां हो फिरतो ॥१७॥
एक म्हणे हा घेरबारी ॥ आम्हां ऐसा संसार करी ॥ कष्ट होईना निर्बळ शरीरीं ॥ भंगली जाहला गोसावी ॥१८॥
एक भावें पायां पडती ॥ एक निंदाद्वेष करिती ॥ यापरि जनांची प्रकृती ॥ बरवें न म्हणती कोणातें ॥१९॥
जित्या सर्पातें मारिती ॥ मृत्तिकेंचा नाग करिती ॥ वारुळीं पय घृत वोपिती ॥ नमन करिती मृत्तिकेतें ॥२०॥
ऐसी रीत या जगाची ॥ जिता निंदा करिती साधूची ॥ तो सामावल्या तयाची ॥ पूजा करिती सोंवळ्यानें ॥२१॥
ऐसीं विश्वाची कचाटें ॥ वर्तो लागले उफराटे ॥ साधु जाती सन्मार्गवाटे ॥ त्यांसी दूषण लाविती ॥२२॥
जो गजपृष्ठीं आरुढला ॥ श्वानाचें भय काय त्याला ॥ पाहोनि मूषकांचा गलबला ॥ बिडाल भेवोनी पळेना ॥२३॥
मीनले मुर्कुटांचे जेवीं तृणें ॥ संसारजळी आंतून ॥ संतवायु आडकेना ॥२५॥
जो पोहे अमृताचे सागरीं ॥ तो केवीं थिल्लरीं बुडया मारी ॥ श्रीमंताचा कारभारी ॥ गर्दभ कैसा वळील ॥२६॥
जो अंतीं विमानारुढ झाला ॥ मोक्षपदासीं पावला ॥ तो चौर्‍यायसी यातनेला ॥ स्वप्नामाजी न स्पर्शे ॥२७॥
वायसाचे संगतीं ॥ राजहंसा नव्हे तृप्ती ॥ तैसी दुर्जनांची जाती ॥ संतोष न देती भाविकां ।२८॥
असोत विश्वसाच्या गोष्टी ॥ सद्गुरुचरणीं घातली मिठी ॥ जयाचे कृपेनें उघडली दृष्टी ॥ तर्क चाले कवितेचा ॥२९॥
करोनि अहंकाराचा वध ॥ मग ऐकों सिध्दांतबोध ॥ ऋषिभाषांचे शब्द ॥ परिसतां तृप्ति श्रोतया ॥३०॥
मागिले अध्यायीं निरुपण ॥ ऋषीनें निंदिले वैकुंठभुवन ॥ वदे कैलासीचें महिमान तेचि कथा परिसावी ॥३१॥
पवित्र नैमिषारण्यासी ॥ बैसले ऋषि तपोराशी ॥ तयांत एक तापसी ॥ पुरुषार्थ सांगे आपुला ॥३२॥
म्हणे ऐका माझें वचन ॥ सिध्दांत सांगतों विचारुन ॥ करितां श्रवण तुटे बंधन ॥ मोक्ष पावे जीवात्मा ॥३३॥
सर्वांगीं शिर प्रधान ॥ तेवी जाणा कैलासभुवन ॥ तेथें वसे गौरीरमण ॥ शंकर नाम जयाचें ॥३४॥
ज्याच्या प्रतापाची प्रौढी ॥ रची ब्रह्मांडांची उतरडी ॥ दृष्टि करितां वांकुडी ॥ जाळूं शके त्रैलोक्या ॥३५॥
आकाशमंडप उभा केला ॥ मेरुस्तंभ मध्यें रोंविला ॥ वायु दोरें ताणिला ॥ चिरिल्या कनाता दशदिशा ॥३६॥
दिवटी जळे सूर्याची ॥ चंद्रज्योत लागली चंद्राची ॥ असंख्यात नक्षत्रांची ॥ दीपमाळिका उजळली ॥३७॥
शशि भानु तारागण ॥ त्यांच्या ज्योतीच्या काळजीन ॥ शामता पावले गगन ॥ कृष्णवर्ण यास्तव ॥३८॥
जेवीं स्फटिक चैतन्य ॥ तेवी दिसे कैलासभुवन ॥ सहस्त्र रश्मीचे नयन ॥ द्वार निरखितां स्तब्धती ॥३९॥
एवढी सामर्थ्याची थोरी ॥ विष्णु करितो दिवाणगिरी ॥ इंद्र करें चामरें वारी ॥ ब्रह्मा जाहला पुरोहित ॥४०॥
सकळसुरांचें कटक ॥ कार्ये करिती होऊनि सेवक ॥ अवघीं तीर्थे जैसे रंक ॥ झाडलोट करितां ती ॥४१॥
सप्तहि समुद्र मूर्तिमंत ॥ वरुण पाणी वाहे गृहांत ॥ स्तविताति उमाकांत ॥ विंजणा वारी हिमालय ॥४२॥
वन्ही करी स्वयें पाक ॥ पंक्ती वाढी षण्मुख ॥ विडा देतसे विनायक ॥ पीक धरी सरस्वती ।४३॥
जयाच्या नामाची नौबत ॥ चौघडा वाजे चौं वेदांत ॥ अठरा पुराणें सनया घुमत ॥ कर्णे वाजती साही शास्त्रें ॥४४॥
जयाचे आज्ञेनें ॥ धरा धरिली सहस्त्रवदनें ॥ मर्यादा उल्लंघावयाकारणें ॥ सत्ता नसे रमाजनका ॥४५॥
मोहमाया विश्वजननी ॥ लावण्यलतिका दिव्यदामिनीए ॥ प्रकाशवंत गिरिजा भवानी ॥ शोभे जयाचे अर्धांगीं ॥४६॥
सर्व भूषणीं अलंकृत ॥ शिवशक्ति उभयतां शोभत ॥ दीनदयाळ त्रैलोक्यनाथ ॥ ऐसा समर्थ असेना ॥४७॥
एके समयीं शिवसदनीं ॥ विचरत पातला नारदमुनि ॥ म्हणे ऐक पिनाकपाणी ॥ अपूर्व वार्ता निवेदितों ॥४८॥
मृत्युलोकीं श्रियाळ राजा ॥ चांगुणा नामें तयाची भाजा ॥ तुझिया भक्तिचिया काजा ॥ प्राण वेंची आपुला ॥४९॥
गगनीं मेघाची शरधार ॥ तैसा दानशूर उदार ॥ विशाळ धैर्य गुणगंभीर ॥ भाग्यवंत दयाब्धी ॥५०॥
शांतिक्षमेचा सागर कामक्रोध मारिले तस्कर ॥ कृपणवृत्ति दवडोनि दूर ॥ नाहींच केली देशांत ॥५१॥
दुष्टदमनीं जैसा काळ ॥ प्रजापाळक दीनदयाळ ॥ सत्पुषांचा होऊनि बाळ ॥ दास्य करी सर्वस्वें ॥५२॥
बहु चंचळ हरीची कामिनी ॥ तेही स्थिरावली श्रियाळसदनीं ॥ धर्मास ठाव नेदी कोणी ॥ तोही बस्तीस राहिला ॥५३॥ नृपजनकें नवशिलें महेशा ॥ म्हणोनि पावला चांगुणा स्नुषा ॥ ते जन्मोनि पवित्रवंशा ॥ ध्वजा लाविली सत्वाची ॥५४॥
पतिव्रता परम चतुरा ॥ जाणे सारासार विचारा ॥ वाजें कीर्तीचा नगारा ॥ नाद पसरे भुवनत्रयीं ॥५५॥
साठ पुत्रांचा जनक ॥ वदला वार्ता शिवासन्मुख ॥ आश्चर्य करुनि पंचमुख ॥ मृत्युलोका पातला ॥५६॥
आछादी दिव्य स्वरुपाला ॥ भणंगवेषें जोगी जाहला ॥ करी पात्र कौपीन नेसला ॥ गृहा गेला चांगुणेच्या ॥५७॥
पाहोनि भगवत्स्वरुप ॥ समीप पातला सत्वधीर भूप ॥ देऊनि मुक्ताफळांचे मंडप ॥ मंचकासनी बैसविला ॥५८॥
वार्ता परिसोनि नृपकांता ॥ बाहेर पातली सत्वसरिता ॥ करीं कनकपात्र तत्वतां ॥ पाद प्रक्षाळी स्वहस्तें ॥५९॥
स्त्रीपुरुष जोडूनि पाणी ॥ बहु प्रार्थिला शूळपाणी ॥ म्हणती स्वामी कृपा करोनी ॥ भोजन केलें पाहिजे ॥६०॥
षड्रसपक्वान्नें करुन ॥ पात्र वाढिलें विस्तारुन ॥ आपुल्या पालवें मक्षिका वारुन ॥ झारी घेवोनि उभी असे ॥६१॥
पाहोनि चांगुणेचा आदरु ॥ हांसोनि बोले गिरिजावरु ॥ आपुल्या पालवें मक्षिका  वारुन ॥ झारी घेवोनि उभी असे ॥६१॥
पाहोनि चांगुणेचा आदरु ॥ हांसोनि बोले गिरिजावरु ॥ मज पाहिजे मांस आहारु ॥ अन्नभक्षण करीना ॥६२॥
आणाल पशुमांस मारुन ॥ त्याचा न करी स्पर्शजाण ॥ नरमांस पाकें करुन ॥ तृप्त होईल वासना ॥ आतां ऐकें वो महीपाळा ॥ तुझा पुत्र असे चिल्लाळा ॥ त्याचें मांस बहुत कोमळा ॥ हेत माझा भक्षावया ॥६४॥
उभयतां धरोनि त्यातें ॥ वध कीजे आपुल्या हातें ॥ अश्रु पातल्या नेत्रातें ॥ पात्र त्यागीन तत्काळ ॥६५॥
परिसोनी अनंगरिपूची वाणी ॥ नृप दचकला अंत:करणीं ॥ म्हणे वल्लभे या संकटांतूनी ॥ कैसें निघावें सांगपां ॥६६॥
परिसोनि पतिवचना ॥ उत्तरकरी मृगलोचना ॥ सत्व सांडितां जाईजे पतना ॥ पुन्हा काय जोडावें ॥६७॥
मानवी जन्माचें हेंचि फळ ॥ ईश्वर काजीं वेंचिजे सकळ ॥ येर्‍हवीं स्वप्नवत् हें मृगजळ ॥ शाश्वत कांहीं दिसेना ॥६८॥
जितुकें दिसे तितुकें नासे ॥ ऐसें बोलिलें वेदव्यासें ॥ यालागीं सोडूनि मोहपिसें ॥ निश्चय धरा शिवपदीं ॥६९॥
विमुख होतां तापसी ॥ नेईल सृकृतांच्या राशी ॥ उरेल भांडवल कुडीसी ॥ काळ ग्रासील स्वल्पांत ॥७०॥
निमाल्या चौर्‍यासी नरक ॥ भोगणें लागे आवश्यक ॥ ऐसा विचारोनि विवेक ॥ करावें सार्थक महाराजा ॥७१॥
नृप म्हणे तूं गुणवेल्हाळ ॥ बोलसी ज्ञान जें प्रांजळ ॥ वंशीं जन्मला एकचि बाळ ॥ त्यास कैसें वधावें ॥७२॥
भांडवल रक्षून व्यवहार कीजे ॥ शकुन पाहून कार्य साधिजे ॥ गोत्र ओळखून कन्या दीजे ॥ विपरीत कर्म करुं नये ॥७३॥
मोड उगवितांचि उपडिला ॥ मग म्हणे भक्षीन फळाला ॥ प्राण गेलिया कुडीला ॥ अभ्यंग कीजे कैसेनी ॥७४॥
नाशिक छेदूनि नेलें तस्करीं ॥ मोतीं घडावया हर्ष धरी ॥ कर प्रदीप्त अनळ करी ॥ कूप खणी कुदळीनें ॥७५॥
आंख भंगल्या चक्राचा ॥ मार्ग विशोधी शकटाचा ॥ धरोनि भरंवसा अंगबळाचा ॥ उडी घाली सागरीं ॥७६॥
भाकर भाजाया न मिळे खापर ॥ लावी समर्थाशीं वैर ॥ तोही एक मूर्खाचार ॥ माझिये दृष्टी दिसतसे ॥७७॥
हरभरे पेरावयासी नेले ॥ त्यांचे भाजून फुटाणे केले ॥ क्षुधाप्रदीप्तें भक्षिले ॥ पीक जोडे कोठूनियां ॥७८॥
पंतोजीच्या शाळेसी ॥ नाहीं लिहिलें ओन्याम्यासी ॥ षडशास्त्री पंडितासी ॥ भाषण करुं इच्छितो ॥७९॥
करीं जोडे कोठूनियां ॥ म्हणे जाळीन नक्षत्रांला ॥ सरमडाचा तीर केला ॥ भेटूं पाहे मारुती ॥८०॥
विश्वामित्र प्रतिज्ञा करी ॥ म्हणे घेईन अमरपुरी ॥ साठी सहस्त्र संवत्सरीं ॥ तपें तपला कौशिक ॥८१॥
इंद्र प्राचारी मेनकेला ॥ तूं जाय कर्मभूमीला ॥ गधिज मुनि हटा पेटला ॥ घेऊं पाहे ममसदना ॥८२॥
इंद्रें आज्ञापितां जाणा ॥ महीवरी पातली देवांगणा ॥ ऋषि करी अनुष्ठाना ॥ तेचि गुंफेसी पै आली ॥८३॥
ऋषि सन्मुख सरोवर ॥ तेथेंचि ठेवी फेडून चीर ॥ वस्त्राविरहित सुंदर ॥ क्रीडा करी विनोदें ॥८४॥

गायन करी रम्य विनीत ॥ ऋषीलागीं अवयव दावीत ॥ कौशिकें पाहोन तेथ ॥ तटस्थ मुद्रा लाविला ॥८५॥
मुख अवलोकितां नयनीं ॥ काम उठिला फुपाटोनी ॥ आसनाहून चळला मुनी ॥ निकट गेला ललनेपासी ॥८६॥
कोण कोठील तूं सुंदरी ॥ एकली क्रीडसी सांग चतुरी ॥ खंजनाक्षी म्हणे तुम्हांसी तरी ॥ हा विचार कासया ॥८७
वंदोनि हांसली गदगद ॥ मुनीस खवळला काममद ॥ समीप जाऊनियां शब्द ॥ हळूच बोले तियेशी ॥ आतं चलावें गुंफेसी ॥ फळें अर्पितो भक्षावयासी ॥ येरी म्हणे परपुरुषीं ॥ संभाषण मी करीना ॥८९॥
ऋषी हनुवटी धरुनि हातें ॥ पुसे काय आवडी तूतें ॥ मेनका म्हणे सर परतें ॥ लज्जा कैसी वाटेना ॥९०॥
ऋषि व्यापिला कामोर्मीकरुन ॥ विसरला तपश्चर्यालक्षण ध्यान ॥ मग उभयबाहीं कवळोन ॥ वदनांबुज चुंबिलें ॥९१॥
उचलोनी घेतली कडेवरती ॥ नेली पर्णकुटी आतौती ॥ सुरतानंदें देऊनि रति ॥ तपसामुग्री बुडविली ॥९२॥
ऋषीचे भांडवल सरलें ॥ मेनके मानसीं सुचलें ॥ मग सावरुनि सांउलें ॥ गुंफेबाहेर निघाली ॥९३॥
कौशिकें धावोन अंचली धरिली ॥ मेनका म्हणे बुध्दि चळली ॥ वनिता पाहोनि एकली ॥ बळें झोंबसी लंपटा ॥९४॥
तुज येवढा चाळा विषयाचा ॥ तरी कां स्वीकारिला वेष ऋषीचा ॥ व्यवसाय सोडिला संसाराचा ॥ धड प्रपंच न परमार्थ ॥९५॥
करितां सुंदर वनिता गोमटी ॥ कोणें घातली आडकाठी ॥ वनीं बैसले लेवोनि लंगोटी ॥ विटंबिले कां कायेसी ॥९६॥
शब्द बाणें विंधोनि ऋषिसी ॥ मेनका गेली स्वर्गासी ॥ स्मृति पावोनियां ऋषि ॥ म्हणे भांडवल बुडविलें ॥९७॥
अरेरे कामा पापिष्ठा ॥ धुळींत घातलें जोडल्या कष्टा ॥ स्वल्पासाठीं अनर्थफांटा ॥ कोठें निर्माण जाहलासी ॥९८॥
बहुत कष्टें धन जोडिलें ॥ गांठोडें तस्करें चोरुनि नेलें ॥ तैसें कौशिकासी जाहलें ॥ हात चोळीत बैसला ॥९९॥
यालागी ऐक वो कांतें ॥ धरुं नये अचाट नेमातेम ॥ आपणासि टाकिलिया अर्थातें ॥ करितां उचित दिसतसे ॥१००॥
पोटीं आहे एक अंश ॥ तो अर्पितां होय निर्वंश ॥ आम्हीं निमाल्या क्रियेस ॥ करील कोण सांगपां ॥१॥
ऐकोनि भ्रताराची वाणी ॥ चांगुणा बोले सत्वखाणी ॥ म्हणे मोक्षफळ सांडोनी ॥ पतनकामना इच्छितां ॥२॥
हरिश्चंद्र तारामती ॥ त्यांची परिसिली असेन कीर्ती ॥ पुण्यशीळ नळ दमयंती ॥ सत्व रक्षितां उध्दरिलीं ॥३॥
याविषयीं परिसावें कांता ॥ निरुपितें इतिहासकथा ॥ श्रवणें बोध उपजे चित्ता ॥ विरक्ति बाणे मानसीं ॥४॥
श्रुतसेननामें नृपती ॥ पराक्रमी विशालकीर्ती ॥ एकाज्ञा राज्य क्षिती ॥ दुजा रिपु असेना ॥५॥
पर्णिल सहस्त्र स्त्रियांशीं ॥ परि पुत्रसंतान नाहीं वंशीं ॥ बहुत नवशिलें देवांसी ॥ परी पुत्र लाभेना ॥६॥
उदासवृत्ती नृपवर ॥ सहज बैसला सभागार ॥ तों अकस्मात ऋषीश्वर ॥ राजालयीं पातला ॥७॥
रायें नमस्कारुन ऋषी ॥ अत्यादरें पूजी त्यासी ॥ संतोष पावोनि तापसी ॥ प्रसन्न जाहला नृपातें ॥८॥
ऋषी म्हणे महीपाळा ॥ कांहीं माग मातें वराला ॥ अटक असेल हरीहराला ॥ तें मी देईन तुजलागीं ॥९॥
ऋषि वदतां अभयउत्तरीं ॥ राजा शकुनगांठ बांधी पदरीं ॥ हर्ष पावोनि अंतरी ॥ बध्दांजुली बोलत ॥११०॥
नरेश म्ह्णे जी योगींद्रा ॥ भाग्यें लाधलो नरेद्रपदा ॥ पुत्रवंशीं नुगवे चंद्रा ॥ निर्वंश नशी दाटली ॥११॥
सुंदर मंदिरें वोस नगर ॥ आंत निर्द्रव्य सावकार ॥ लावण्यवनिता पुरुश जर्जर ॥ किंवा चंद्र अवसेचा ॥१२॥
क्षुधेने पीडिलें शरीर ॥ केले सुगंध उपचार ॥ सैन्यावांचोनि राजेश्वर ॥ शोभा न पावे एकटा ॥१३॥
यापरी योगिराजा ॥ म्यां सहस्त्र पर्णिल्यां भाजा ॥ पाहावया हेत आत्मजा ॥ पूर्ण कांहीं होईना ॥१४॥
तूं समर्थ कृपामूर्ती ॥ मातें करी पुत्रप्राप्ती ॥ हें परिसोनि विरक्ती ॥ फळ करांत सूदलें ॥१५॥
जैसी विद्युल्लता चमकोनी ॥ गुप्त होय तेच क्षणीं ॥ तैसा ऋषि वर देउनी ॥ अदृश्य जाहला तत्काळ ॥१६॥
विस्मित जाहला राजेश्वर ॥ केवढा ऋषीचा चमत्कार ॥ मुनिवेषें ईश्वर ॥ दर्शन देऊन लोपला ॥१७॥
ऐसें भावोनि नृपती ॥ परमलाभ मानूनि चित्तें ॥ गृहीं प्रवेशोनि वनितेहाती ॥ फळ आवडीं वोपिलें ॥१८॥
सहस्त्र अंगना नृपासी ॥ एक स्वीकारी फळासी ॥ स्वल्पकाळें गर्भासी ॥ धरिती जाहली खंजनाक्षी ॥१९॥
नवमास भरतांचि त्वरित ॥ पुत्र प्रसवली गुणवंत ॥ नरेश परिसोनि मात ॥ हर्षे गुढिया उभारी ॥१२०॥
लक्ष गायी ब्राह्मणां ॥ विशेष वांटिली दक्षिणा ॥ मानी ब्रह्मांडगोळ ठेंगणा ॥ हर्षे कोंदला नरपती ॥२१॥
सहस्त्र अंगनाचें अंत:पुरीं ॥ रायासि प्रिय तेचि अंतुरी ॥ भोजन शयन तिचे मंदिरीं ॥ वियोग एक लक्षण साहीना ॥२२॥
हें जाणोनि दशशतनारी ॥ विचार करिती परस्परीं ॥ रायासि प्रिय तेचि अंतुरी ॥ भोजन शयन तिचे मंदिरीं ॥ वियोग एक लक्षण साहीना ॥२२॥
हें जाणोनि दशशतनारी ॥ विचार करिती परस्परीं ॥ रायें आम्हासी त्यजोनि दूरी ॥ पुत्रवतीस लुब्धला ॥२३॥
म्हणती पुत्रें घातला घाला ॥ पति आमुतें अंतरला ॥ आतां विष पाजूनि बाळा ॥ नाहींच करुं संसारीं ॥२४॥
समस्त मिळोनियां एकांता ॥ गौप्य विचार केला पुरता ॥ सवतिमत्सर धरुनि पुरता ॥ वधों आरंभिलें बालका ॥२५॥
मुलास आणिती खेळावयास ॥ ऐसा दाविती विश्वास ॥ एके दिवशीं बाळकास ॥ विषप्रेरण योजिलें ॥२६॥
निद्रित पाहोनियां जननी ॥ बाळ आणिला चोरोनी ॥ त्यासि पाजोनि विषपाणी ॥ पुढती तेथेंचि ठेविला ॥२७॥
श्वास टाकोनि प्राणरत ॥ काया होवोनि पडिलें प्रेत ॥ त्वरें उठोन माता पाहता ॥ तंव बाळ काळें ग्रासिलें ॥२८॥
मग ओरडोनि घातली मिठी ॥ उचलोनि लाविला कंठीं ॥ उभयकरें कपाळ पिटी ॥ शोक करी आक्रोशें ॥२९॥
मुक्ताफळांचे हार ॥ तोडूनि सांडी महीवर ॥ नेत्रीं आंसुवांची धार ॥ अंजन वदनीं पसरलें ॥१३०॥
केश तोडी पल्लव फाडी ॥ शंख करी घडीघडी ॥ जिव्हा पडतसे वांकुडी ॥ शब्द कंठीं फुटेना ॥३१॥
वार्ता परिसोनि राजेश्वर ॥ मूर्छित पडे महीवर ॥ धुळींत लोळे नृपवर ॥ हाहा शब्दें गर्जत ॥३२॥
म्हणे विधातिया नष्टा ॥ काय लिहिलें अदृष्टा ॥ कोण पापाचा सांठा ॥ दु:खसागरीं घातलें ॥३३॥
ऐसें बोलोनि पहुडली क्षितीं ॥ सेवक धरोनि सांवरिती ॥ नरनारी शोक करिती ॥ आकांत नगरीं मांडला ॥३४॥
हे जाणोनि नारदमुनि ॥ त्वरें पातला राजधानीं ॥ नृपतीलागीं सावध करोनी ॥ मुख प्रक्षाळी स्वहस्तें ॥३५॥
नारद म्हणे अगा राजा ॥ शोक करिशी कवणिया काजा ॥ निमाल्या रडसी आत्मजा ॥ चिरंजीव कोण सांगपां ॥३६॥
तूतें लागलें हेंचि वेडें ॥ शोक करिशी वनितांपुढें ॥ घालोनि मोहाचें सांकडें ॥ माया विश्वातें भुलवित ॥३७॥
संसारमृगजळींचें पाणी ॥ काय उतरसी तारुं घालोनी ॥ तूंच मोहजाळें भ्रमोनी ॥ शोक करिसी जाणत्या ॥३८॥
हरिहरांसी लागला मृत्यु ॥ कोणीच न दिसे शाश्वत ॥ तूं मानवी जन येथ ॥ शाश्वत काय कल्पिसी ॥३९॥
राया संसाराची जाती ॥ हे तो वांझेची संतती ॥ यालागीं विवेकवंती ॥ उदासवृत्तीं असावें ॥१४०॥
कैंचें घर कैंचें दार ॥ अवघा मिथ्याचि व्यवहार ॥ गारुड भासे वोडंबर ॥ दिसे परी लटिकेंचि ॥४१॥
असतां वैभवसंपत्ति ॥ पारके तेही आप्त होती ॥ द्रव्य सरल्या नांव न घेती ॥ सखेही होती दूरस्थ ॥४२॥
द्रव्यवंत पुरुषासी ॥ वनिता तिष्ठे होऊनि दासी ॥ तोचि पावल्या दरिद्रासी ॥ लासा होय अंगना ॥४३॥
तूं म्हणसी माझें राज्य ॥ हे तो काळाचें खाज ॥ यालागीं सांडी लोककाज ॥ सार्थक करी जीवाचें ॥४४॥
कोठूनि आलासि कोठें जासी ॥ शोधीं आपुल्या मूळासी ॥ तत्त्वसारनिर्णयासी ॥ झाडा करीं पिंडाचा ॥४५॥
जेवीं कर्दळीचा ढोळ ॥ पदर उकलितां अवघा पोकळ ॥ किंवा गारोडियाचा खेळ ॥ करिती भुजंग वादीचा ॥४६॥
लहान मुलांचें पोट चिरिती ॥ मृत्तिकेचे रुपये करिती ॥ खोटयाचें खरें करिती ॥ लोक रिझती पाहोनी ॥४७॥
तयापरी पंचभूतांचें ॥ गारुड रचिलें मोहमायेचें ॥ मिथ्याचि परी साचें ॥ करोनि दाविलें अगडंबर ॥४८॥
जैसा रहाटगाडग्याचे विचारें ॥ एक रिचे एक भरे ॥ तेवीं जन्ममरणांचे फेरे ॥ परस्परें होत असती ॥४९॥
असंख्य हिंडतां योनी ॥ कोठें विश्रांति न पवे प्राणी ॥ यालागी मनुष्यखानी ॥ निर्माण केली जगदीशें ॥१५०॥
परी येथें जाहलें उफराटें ॥ लागली कर्मांचीं कचाटें ॥ अहंतां धामणीचें फुंफाटें ॥ जीव अवघे नागवी ॥५१॥
पडिले चौर्‍यासीचे फेर्‍यांत ॥ सुखदु:खाचें हिंदोळ” लागत ॥ तेथोनि काढावया त्वरित ॥ समर्थ एक सद्गुरु ॥५२॥
जे लागले सद्गुरुकासेस ॥ निघाले सायुज्यतीरास ॥ चुकले ते गेले भवडोहास ॥ विकल्पमासे तोडिती ॥५३॥
जितां संसाराचा घोर ॥ ते निमाल्यापाठीं यमप्रहार ॥ चहूंकडोनि दु:खांचे डोंगर ॥ विश्रांति कोठें दिसेना ॥५४॥
परीसोनि नारदाचा बोध ॥ नृपाचा झडला मोहफुंद ॥ अंतरीं होऊनि सद्गद ॥ विस्मय करीं मानसीं ॥५५॥
मुनीचा उपदेशभानु उगवला ॥ नृपाचा मोहतम निरसिला ॥ परंतु पुत्रखेद लागला ॥ तेणें कळंकी दिसतसे ॥५६॥
हें जाणोनि मुनि चित्तीं ॥ म्हणे रायासी लागली विरक्ती ॥ परी पुत्र शोकाची गुंती ॥ स्वल्प कांहीं दिसतसे ॥५७॥
मग अमृतदृष्टीं विलोकिलें ॥ निर्जीव बाळ सजीव जाहलें ॥ समस्त लोकां नवल वाटलें ॥ आश्चर्य केलें नृपानें ॥५८॥
नारद म्हणे बालका ॥ उठोनि समजावीं जनका ॥ तुजसाठीं पावोनि दु:खा ॥ शोकसागरीं बुडाला ॥५९॥
परिसोनि मुनीच्या वचना ॥ हांसोनि बोले बाळक तान्हा ॥ मग म्हणे नृपा सुजाणा ॥ काय तुझें हरपलें ॥१६०॥
तुझें राज्य कोणें हरविलें ॥ किंवा शरीर जरेनें व्यापिलें ॥ किंवा युध्दीं घाव लागले ॥ तेणें दु:खें विलपसी ॥६१॥
तूं रडसी मजकारण ॥ हें तो मूर्खत्वलक्षण ॥ जीव मायेचे आधीन ॥ काढी घाली कुडीतें ॥६२॥
कोणी एक मार्गस्थ ॥ विश्रांती राहिला नगरांत ॥ रात्रक्रमोनियां तेथ ॥ अरुणोदयीं निघाला ॥६३।
त्यासी वेष्टोनि नगरलोक ॥ पदरीं धरोनि करिती शोक ॥ तेवीं तुझा हा विवेक ॥ वाटे माझे मानसीं ॥६४॥
आणिक परिसें नवल ॥ सांगतों आकर्णी महीपाळा ॥ तुमचे बुध्दीच्या मळा ॥ झाडोनि करील सुचित्त ॥६५॥
सावकारें पुत्रासी ॥ क्रोधें प्रेरिलें वणजेसी ॥ मार्गी जातां वस्तीसी ॥ ग्रामीं एके राहिला ॥६६॥
विश्रांतिस्थळीं करितां शयन ॥ परिसिलें वेश्येचें गायन ॥ मग निद्रेस त्यागून ॥ प्रवेशे परअंगनेचें गृहीं ॥६७॥
लक्षून सभाग्य सावकार ॥ विशेष वेश्या करी आदर ॥ म्हणे तुम्हावांचून इतर नर ॥ नाहीं नेत्रीं लक्षिला ॥६८॥
परिसोनि मोहें द्रवला ॥ म्हणे जीव तुज स्वाधीन केला ॥ द्रव्य अर्पूनि वेश्येला ॥ षण्मास तेथें राहिलासे ॥६९॥
गृहीं पिता करी चिंता ॥ शुध्दीसि धाडिला गुमास्ता ॥ तोही त्या ग्रामीं तत्वतां ॥ विश्रांतिसी राहिला ॥१७०॥
प्रहर निशा लोटल्यावरी ॥ विशेष वेश्या गायन करी ॥ हाही चित्या मंदिरीं ॥ श्रवणाविषयीं प्रवेशला ॥७१॥
तेथेंचि स्वामीचा कुमर ॥ बैसला वेश्येच्या समोर ॥ ओळखी जाहली परस्पर ॥ आवडीं दोघे भेटले ॥७२॥
गुमास्ता म्हणे गा चतुरा ॥ घरीं कष्टी होय म्हातारा ॥ त्वां न येतां त्वरा ॥ मातें शुध्दि धाडिले ॥७३॥
येरु म्हणे ऐक आतां ॥ हे वेश्या पतिव्रता ॥ मजवांचूनी दुजा भर्ता ॥ नाहीं दृष्टिं देखिला ॥७४॥
इचि निष्ठा माझे ठायीं ॥ निवतां प्राण सांडील पाहीं ॥ गुमास्ता म्हणे युक्ति पाहीं ॥ सांगतों तें आकर्णी ॥७५॥
पेठेस जाऊनि सांगातें ॥ माल खरेदी भरुनि लावा मातें ॥ मग तुम्हीं वेश्येतें ॥ घेऊनि सुखें क्रीडावें ॥७६॥
तेणें मान्य करोनि वचनासी ॥ उभयतां गेले पेठेसी ॥ सवेंचि त्या नगरासी ॥ किराणा घेवोन पातला ॥७७॥
गुमास्तयानें केलें कौतुक ॥ पेटींत घातला धन्याचा लेंक ॥ हातीं घेऊनि संदुक ॥ वेश्येमंदिरीं प्रवेशला ॥७८॥
तीस म्हणे तुझ्या मित्रानें ॥ अमूल्य धाडिलें तुज वसनें ॥ त्याचें नाम उच्चारणें ॥ उचलोन नेईं घरांत ॥७९॥
हांसोनि वेश्या बोलली ॥ म्या लक्षपुरुषांची मैत्री केली ॥ कोणाचे नाम तुम्हांजवळी ॥ सांगावया उमजेना ॥८०॥
तथापि कांही एक ॥ दाहा सहस्त्र नामांकित ॥ स्वल्प सांगतें तें ऐक ॥ उच्चारुनि बोलली ॥८१॥
तितुकियांत नाहीं गुमास्ता बोलिला ॥ मग वेश्येसी राग आला ॥ म्हणे कोणी असेल चांडाळा आला ॥ नांव त्याचें आठवेना ॥८२॥
पेटींत सावकारपुत्रानें ॥ दचक घेतला मनें ॥ मन म्हणे इणें नष्टेनें ॥ मातें मोहूनि गोविलें ॥८३॥
हांसोनि गुमास्ता थुंकत ॥ म्हणे ऐकिला वृत्तांत ॥ तुझें नांव इच्या हृदयांत ॥ उच्चारितां गवसेना ॥८४॥
युक्तीनें बोध करोनि त्वरित ॥ घरा आणिला स्वामिसुत ॥ ऐसा योजून दृष्टांत ॥ राजपुत्र बोलिला ॥८५॥
पुत्रवचन ऐकोनि नृपती ॥ उठोनि जाईल वनाप्रती ॥ तेचि कथा चांगुणासती ॥ पती लागीं सांगेल ॥८६॥
तेचि निरुपणाची मात ॥ सांगेन श्रोतियां समस्त ॥ माझ्या मतीचे पोतडींत ॥ भरती करी सद्गुरु ॥८७॥
जेणें समुद्राचा पाट लाविला ॥ मग तुटी कैंची उदकाला ॥ कृष्णसागर हृदयीं भरला ॥ लोट चाले कवित्वाचा ॥८८॥
बुध्दिवंत चतुर शाहाणे ॥ ऐकतां शहामुनीचीं वचनें ॥ संतोष होऊनियां मनें ॥ परमानंदें डोलती ॥१८९॥
इति श्रीसिध्दांतबोधग्रंथ अध्यात्मनिरुपणतत्त्वसारनिर्णये अष्टमोऽध्याय: ॥८॥
अध्याय ॥८॥ ओंव्या ॥१८९॥ श्रीराम ॥

N/A

References : N/A
Last Updated : September 23, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP