मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|सिध्दान्तबोध|
अध्याय २१ वा

श्रीसिध्दान्तबोध - अध्याय २१ वा

‘श्रीसिध्दान्तबोध’ हा संतकवि श्रीशहामुनि यांचा ग्रंथ म्हणजे मराठी साहित्याच्या खाणींतील एक तेजस्वी हिरा आहे.


श्रीगणाधिपतये नम: ॥ श्रीगुरुभ्योनम: ॥
जरी कौतुक जगदीश करी ॥ विपरीताचें सुपरीत होय तरी ॥ धर्म तोचि अधर्म करी ॥ अधर्म नेत सिध्दीतें ॥१॥
पितृवचन उल्लंघितां पतन ॥ ऐसीं बोलती पुराणें जाण ॥ प्रल्हाद तें न मानोन ॥ कोठें पावला पतनासी ॥२॥
मातृ आज्ञेंत वर्तन ॥ यासही शास्त्र प्रमाण ॥ भरत निंदी कैकयीलागून ॥ केव्हां घडली अधोगती ॥३॥
वडिलबंधु पित्यासमान ॥ मर्यादा उल्लंघितां घडे दूषण ॥ बिभीषणें धिक्कारिला रावण ॥ काय नरकीं तो गेला ॥४॥
पुत्रावांचून मोक्ष नाहीं ॥ ऐसा निश्चय केला जिहीं ॥ भीष्माचार्याच्या ठायीं ॥ कोठें होती संतती ॥५॥
स्त्रीनें त्यागिल्या भ्रतार ॥ घडे चौर्‍यांशीचा फेर ॥ यज्ञपत्न्यांनी त्यजितां वर ॥ कैशा पावल्या सद्गती ॥६॥
स्त्री त्यागोन भर्तार जाय ॥ तेंही दूषण त्यासी होय ॥ गोपीचंदे केलें काय ॥ सहस्त्र स्त्रिया त्यागिल्या ॥७॥
गुरुआज्ञा प्रमाण ॥ ऐसें बोले वेदवचन ॥ बळीनें उल्लंघुनी शुकवचन ॥ संकल्प सोडी वासना ॥८॥
गुरुवांचूनि मोक्ष नांहीं ॥ ऐसें बोलती श्रेष्ठ पाहीं ॥ गजेंद्र गणिकचे ठायीं ॥ कोणें कान फुंकिले ॥९॥
आचार निष्ठा धरितां ॥ पावन होती तत्वतां ॥ आजामिळाची योग्यता ॥ कोठें होती पवित्र ॥१०॥
गुरुस न देतां दक्षिणा दान ॥ शिष्य होई ना पावन ॥ नारदें वाल्मीकास उपदेशून ॥ काय त्यापासून घेतलें ॥११॥
उगेचि बोलती मनुष्य पाहीं ॥ पुरता विचार करीत नाहीं ॥ स्वल्पज्ञानें फुगोनी पाहीं ॥ ऐकिलें तेंचि जल्पती ॥१२॥
यालागीं जें देव करी ॥ ते सिध्दीस जाय चराचरीं ॥ इतर उपाय कोटिवरी ॥ करितां प्राप्ति श्रमाची ॥१३॥
सिध्द योगी करिती कष्ट ॥ त्यांसी दर्शनाची होईना भेट ॥ कीं अर्जुनालागीं फुकट ॥ दावी ठेवणें विश्वरुप ॥१४॥
दूध मागतां उपमन्य ॥ क्षीरसिंधु वोपी नारायण ॥ कौशिकाचीं तपश्चर्या गहन ॥ धुळीमाजी घातली ॥१५॥
ध्रुवाचे होतें इतुकेंचि मनीं ॥ बैसावें पित्याचें जानुस्थानीं ॥ तो अढळपदीं स्थापुनी ॥ श्रेष्ठ केला सर्वांसी ॥१६॥
हिरण्यकशिपु रावण वैरी ॥ हे राज्याचे अधिकारी ॥ मुद्गलभट्ट भक्ति करी ॥ अन्नवस्त्र मिळेना ॥१७॥
हरिश्चंद्र पुण्यप्राणी ॥ वाहे डोंबाघरीं पाणी ॥ व्याधें बाण मारितां चरणीं ॥ मुक्त केला तत्काळ ॥१८॥
हें विपरिताचें सुपरीत ॥ कर्ता एक भगवंत ॥ मनुष्या पुरुषार्थ ॥ कांहीं सिध्दी जाईना ॥१९॥
कोणी म्हणेल मी श्रीमंत ॥ करितों दान पुण्यें बहुत ॥ तों देवाच्या लेखांत ॥ अणुमात्र असेना ॥२०॥
कोणी दावील तपाचें बळ ॥ कोणी म्हणेल मी आचारशीळ ॥ कोणी म्हणेल मी शास्त्रकुशल ॥ ते तृणतुल्य देवासी ॥२१॥
म्हणूनी अनन्यशरण ॥ सोडोनि सर्व अभिमान ॥ हेंही देवाचें भजन ॥ जाणीव सरे मानसीं ॥२२॥
अनंत पापांच्या राशी ॥ पदरीं असतां मनुष्यासी ॥ कृपा करितां हृषीकेशी ॥ रोम स्पर्शो देईना ॥२३॥
यापरी माझ्या ठायीं ॥ अविंधयातीचा प्रकार देहीं ॥ किंवा निजरुपाच्या पाहीं ॥ कराव्या गोष्टी सुखानें ॥२४॥
यातीचा असोनि यवन ॥ प्रगट सांगों ब्रह्मज्ञान ॥ हें विपरिताचें सुपरीत जाण ॥ कर्ता एक जगदीश ॥२५॥
अहो भीमाचिया हातें ॥ जरासंध मारावा हें उचित ॥ स्वतां काय सामर्थ्य ॥ नव्हतें श्रीकृष्णासी ॥२६॥
हें वर्म ब्रह्मादिकां न नेण ॥ ज्याची कळा तोचि जाण ॥ म्हणोनि देव करील तें प्रमाण ॥ जनाचे उपाय ते मिथ्या ॥२७॥
आतां असो हे उपपत्ती ॥ सर्व सत्ता ईश्वराचे हातीं ॥ बाहुली करुनि माझी मती ॥ सूत्रधारी तो जाहला ॥२८॥
माझ्या बुध्दीची करोनि लेखणी ॥ आपुल्या कृपेची हस्ते धरोनी ॥ ज्ञानांजन घेऊनी ॥ विवेक पत्रीं लिहीतसे ॥२९॥
लिहितां वाढला थोर ग्रंथ ॥ नाम ठेविलें या सिध्दांत ॥ पुढें निरुपणाची मात ॥ परिसा श्रोते सादर ॥३०॥
मागील अध्यायीं कथा ॥ सांगितलें मोक्षदार्था ॥ देवांची उत्पत्ति संहार अवस्था ॥ तेंहीं निरुपण ॥ सांगितलें ॥३१॥
हें परिसोनि द्विजवर्या ॥ प्रश्न आठवलासे हृदया ॥ मग वंदोनि देवपायां ॥ प्रार्थना करी सद्भावें ॥३२॥
अहो जी त्रैलोक्यस्वामी ॥ सर्वव्यापक असा तुम्हीं ॥ सृष्टि उत्पत्ती कैसी आम्ही ॥ ऐकों ऐसी वासना ॥३३॥
पहिले माझे चारी प्रश्न ॥ देहप्रपंच जीव निर्गुण ॥ त्यांत एका प्रश्नाचें विवरण ॥ तुम्हीं निरुपिलें मजलागीं ॥३४॥
सांगितली देवांची उत्पत्ती ॥ जे श्रुत नव्हती कवणाप्रती ॥ ते बेरीज करुनि मजप्रती ॥ यथासांग निरुपिलें ॥३५॥
वेद शास्त्र पुराण ॥ त्यांचें केलें बहुत शोधन ॥ परी इतुके देवांचे गण ॥ नाहीं कोठें परिसिलें ॥३६॥
एकेक देवांची थोरी ॥ सांगितली विशाळ भारी ॥ समर्थ वदतां वैखरी ॥ कुंठित होय आमुची ॥३७॥
इतुका देवांचा बंबाळ ॥ त्यांचें जन्म कर्म सकळ ॥ तुम्हीं निरुपिलें प्रांजळ ॥ गुंती नाहीं ठेविली ॥३८॥
जैसें दर्पणीं मुख पाहणें ॥ तैसें जाहलें मजलागून ॥ फिटलें संशयतम दारुण ॥ तुझ्या कृपेच्या रवीनें ॥३९॥
देवा थोर आनंद जाहला ॥ मरतया सुधारस लाधला ॥ कीं शैलारीच्या पदाला ॥ भणंग जाहला अधिकारी ॥४०॥
अथवा रंकाचिया घरीं ॥ प्रवेशे विष्णूची अंतुरी ॥ कीं दमयंती माळ घेतां करीं ॥ नळ नाहो भेटला ॥४१॥
निशाचरापासून ॥ मुक्त होतां जानकीरत्न ॥ रघुपतीचें घ्यावया दर्शन ॥ कोटि आल्हाद अंतरीं ॥।४२॥
पाषाण देहातें सूटलिया ॥ मुक्त जाहली विरिंचितनया ॥ विश्वामित्राची तपश्चर्या ॥ भ्रंशतां हर्ष पुरंदरां ॥४३॥
यापरी माझी बुध्दि हर्षली ॥ जैसी मुक्यानें साखर भक्षिली ॥ तें सांगतां नये जनांजवळी ॥ त्याची गोडी तो जाणें ॥४४॥
तैसें मातें जाहलें स्वामी ॥ जेव्हां कृपा केली तुम्ही ॥ नांदों ब्रह्मसुखाचें धामीं ॥ भवभय वायु स्पर्शेना ॥४५॥
आतां ऐसीया सुखसेजा ॥ बैसविलें त्वां महाराजां ॥ करुं आनंदाच्या मौजा ॥ एवढी ध्वजा लागली ॥४६॥
अहो माझिया भाग्यासी ॥ पार नाहीं हृषीकेशी ॥ परी पुसणें एक देवासी ॥ दयाराशी सांगावें ॥४७॥
ब्रह्मीं माया कैशी जाहली ॥ तिणें सृष्टि कैशी विस्तारली ॥ तीन गुण पंचभूतें जन्मलीं ॥ कवणापासोनि दातारा ॥४८॥
हेंचि होतें माझिया मनीं ॥ जें पुसावें स्वामीलागूनी ॥ तरी कृपा करुनि मोक्षदानी ॥ तें कैसें भावें निवेदीं ॥४९॥
ऐसा द्विजाचा भाव ॥ हृदयीं आणोनि देवाधिदेव ॥ म्हणे तुझिया पुसण्याचा नवलाव ॥ अपूर्व वाटे आमुतें ॥५०॥
बहुत करिती प्रश्नगोष्टी ॥ परी नये गा तुझी हातवटी ॥ निजहृदयीं संपुटीं ॥ ठेविलें तेंचि पुससी ॥५१॥
तरी तुजसारिखा श्रोता ॥ जोडलासी माझिया मनोरथा ॥ काय ठेवूं गुह्यार्था ॥ ऐक आतां सांगतों ॥५२॥
मागें अवतार श्रेष्ठ जाहले ॥ परी हें भांडार नाहीं उघडलें ॥ कार्यापुरतें बोलिलें ॥ श्रोते समजले तेथेंचि ॥५३॥
त्यांत तूं मोठा साक्षेपी ॥ ऐसें कळलें ममस्वरुपीं ॥ मीही काढितों गुह्याची कुपी ॥ वस्तुपारखी तूं चतुरा ॥५४॥
तुझिया गुणालागुनी ॥ करीन आपुल्या सुखाचीं लेणीं ॥ सकळ इंद्रियें सकाग्र करुनी ॥ अंत:करणीं ऐक पां ॥५५॥
ब्रह्मीं माया जाहली ॥ ऐसी शास्त्रें बोललीं ॥ माया स्वरुपीं नाहीं जन्मली ॥ हा वेदांचा सिध्दांत ॥५६॥
एक ब्रह्मीं इच्छा जाहली ॥ तिणें सृष्टि विस्तारली ॥ एक म्हणती कल्पना मुळीं ॥ तेणें केला प्रपंच ॥५७॥
एक म्हणती स्वरुपनिर्गुण ॥ तेथें अहंब्रह्म जाहलें स्फुरण ॥ तेणें विस्तारिला विश्वजन ॥ नाहीं तरी होतें शून्यची ॥५८॥
एक म्हणती चार शून्य ॥ अंत ऊर्ध्व मध्य महाशून्य ॥ याच शून्यांपासोनि ॥ निर्माण जाहली वसुंधरा ॥५९॥
एक म्हणती मुळीं अलेख ॥ त्या पासोनि जाहला एक ॥ तोचि प्रणव देख ॥ त्याचे त्रिगुण पंचभुतें ॥६०॥
एक म्हणती अवघेंचि ब्रह्म ॥ तेथें कैचें जन्म कर्म ॥ मिथ्या वाढला भ्रम ॥ द्वैतवाद जल्पती ॥६१॥
एक म्हणती ब्रह्मीं ॥ माया जाहली नाहीं ॥ बोलती तितुके मिथ्याचि पाही ॥ संसार कोठें दिसत नाहीं ॥ भासे तितुकें मृगजळ ॥६२॥
एक म्हणती मुळीं महत्तत्व होतें ॥ तें प्रसवलें तमातें ॥ तम व्यालें अहंकारातें ॥ अहंकारे आकाश निर्मिलें ॥६३॥
आकाशपोटीं वायु जाहला ॥ वायु अग्नीतें प्रसवला ॥ अग्निपोटीं तोय निपजला ॥ तोयापासोनि पृथ्वी ॥६४॥
आकाश म्हणजे निश्चय ॥ वायूचा वेग चंचळ ॥ निश्चळा पोटीं चंचळ ॥ जन्मलें हें घडेना ॥६५॥
वायुतेजासी वैर ॥ तेज आपांचा दावा दुर्धर ॥ आप पृथ्विसी वैराकार ॥ परस्परें लागलें ॥६६॥
एक पोटीं एक जाहलीं ॥ हें तो शास्त्रें बोलिलीं ॥ परी मुख्य कोठून जन्मलीं ॥ हे तुज सांगों मूळकथा ॥६७॥
ब्रह्म म्हणजे शाश्वत ॥ प्रपंच तितुका नाशवंत ॥ शुध्दापोटीं विष पदार्थ ॥ कैसा जन्मला सांगपां ॥६८॥
सूर्याचें बिंबाआंतून ॥ जन्मलें तम दारुण ॥ कीं चंद्राचे उष्ण किरण ॥ निशींमाजी लागती ॥६९॥
सिंहापोटीं दर्दुर ॥ जन्मेल कैसा सांगा चतुर ॥ ऐरावतीचे कुशीं उंदिर ॥ गर्भ कैसा वाढेल ॥७०॥
अगा मृगाचे नाभीसी ॥ हिंग उपजेल काय गुणराशी ॥ कामधेनूचे कासेंशी ॥ तक्र निघेल दोहतां ॥७१॥
यापरी गा स्वरुपांत ॥ कैसा संसार जन्मेल नाशवंत ॥ स्वातीच्या उदकें शुक्तींत ॥ गुंज निपजेल पांढरी ॥७२॥
अमूल्य चिरतां हिरकणी ॥ कोळसा निघेल काय आंतुनी ॥ उगाळितां मैलागर साहाणीं ॥ सुवास सुटेल गंधाचा ॥७३॥
द्राक्षाचे वेलासी ॥ लागती येरंडाचे घड त्यासी ॥ कीं पिंपळाचें अग्रासीं ॥ कण्हेर पुष्प फळेल ॥७४॥
हेंही एक वेळा घडे ॥ परी प्रपंच ब्रह्म जाहला हें न घडे ॥ बोल तितुके अवघडे ॥ निजनिवाडें जाणपां ॥७५॥
निर्विकाराचिया पोटीं ॥ कैसी नाशिवंत प्रगटेल सृष्टी ॥ रंभागर्भसंपुटीं ॥ सैंधवखाणी होईल ॥७६॥
ब्रह्मीं माया जाहली ॥ हें तो बोलो नये बोली ॥ शस्त्र घेऊनियां साउली ॥ युध्द करील घडेना ॥७७॥
अगा ब्रह्मीं जाहली माया ॥ हें चावळताति वांया ॥ मंचकीं करोनि शय्या ॥ बुडालों म्हणे सागरीं ॥७८॥
ब्रह्मीं व्हावी घडामोड ॥ हें तो न घडे गा उघड ॥ जेवीं कापसाचा दगड ॥ कदा कल्पांतीं होईना ॥७९॥
ब्रह्म निर्विकार निरंजन ॥ अचळ अमळ तें पूर्ण ॥ व्यापक अव्यक्त शाश्वत गहन ॥ विकारलेश असेना ॥८०॥
ऐसीया स्वरुपांत ॥ प्रपंच निपजला जे म्हणत ॥ ते अज्ञानदशेनें भ्रमत ॥ नेणती अर्थ मुळींचा ॥८१॥
प्रपंच हा स्वतंत्र पदार्थ ॥ याचें मूळ तें अव्यक्त ॥ यासाठीं उत्पत्ति संहार होत ॥ वारंवार पूर्ववत् ॥८२॥
स्वरुपापासूनि प्रपंच जाहला ॥ माहाप्रळय ब्रह्मीं मिळाला ॥ मग जन्ममरण स्वरुपाला ॥ अव्यक्त कासया म्हणावें ॥८३॥
निराकार आकारा आलें नाहीं ॥ ऐसें बोलती ज्ञानी पाहीं ॥ फिरोनि म्हणती तोचि सर्वही ॥ चराचरीं विस्तारला ॥८४॥
ब्रह्मीं इच्छा ना कल्पना ॥ ऐसें बोलती ज्ञानखुणा ॥ म्हणती तोचि जाणा ॥ त्रैलोक्यसृष्टी प्रसवला ॥८५॥
एक म्हणती प्रपंच तेणेंचि केला ॥ एक म्हणती दुजा कोठूनि आला ॥ तोचि आपण आकारला ॥ सगुण आणि निर्गुण ॥८६॥
तूप थिजलें आणि विघुरलें ॥ कीं कनकाचें अलंकार केले ॥ तेवीं परब्रह्मची संचलें ॥ एकाचें अनेक होउनी ॥८७॥
हें अवघें विपरित पाहीं ॥ पडले तर्कवादी प्रवाहीं ॥ मागें फिरोनि पाहणें नाहीं ॥ ऐकिलें तेंचि सांगती ॥८८॥
तूप थिजलें आणि विघुरलें ॥ तें उष्णतेचे मुळें जाहलें ॥ ब्रह्म काय अग्निवरी ठेविलें ॥ म्हणोनि सगुण आणि निर्गुण ॥८९॥
सुवर्णाचे अलंकार ॥ कर्ता एक सोनार ॥ ब्रह्मीं कोण कारिगर ॥ घडोन केलें विश्व हें ॥९०॥
ऐसे दृष्टांत देऊन ॥ म्हणती सगुण तेंचि निर्गुण ॥ परी तें अल्पवादाचें ज्ञान ॥ पूर्ण दशा नव्हे कीं ॥९१॥
आतां असो हें बोलणें ॥ आणिक प्रकारचें ज्ञानें ॥ याचीं सांगतां लक्षणें ॥ ग्रंथविस्तार होईल ॥९२॥
त्वां पृच्छा मातें केली ॥ ब्रह्मीं माया कैसी जाहली ॥ त्याची सांगतों मुख्य किल्ली ॥ मुळींचें सूत्र आहे ॥९३॥
ब्रह्म जैसें निर्विकार ॥ मायाही तैसी तदाकार ॥ दोन्ही अनादिसिध्द अपार ॥ असती जुनाट युगाचीं ॥९४॥
ऐके ब्राह्मणा विचक्षणा ॥ तूं मनीं घेसी कल्पना ॥ देवें सांगितली द्वैतभावना ॥ अद्वैतपद बुडालें ॥९५॥
मुळीं एकची अद्वैत ॥ ऐसा देवाचा सिध्दांत ॥ तरी तें मिथ्या काय समस्त ॥ द्वैत तुम्ही सांगतां ॥९६॥
याविषयीं ऐक सुमानस ॥ अद्वैत म्हणावें स्वरुपास ॥ त्यासारिखें दुजें उपमेस ॥ व्यापकत्व असेना ॥९७॥
यास्वरुपाचे गुण ॥ पुढें सांगेन तुजलागून ॥ प्रस्तुत ऐकें तुझा प्रश्न ॥ सृष्टी कैसी जन्मली ॥९८॥
माया ते अनादि सिध्द ॥ तिच्या पोटीं देवांचा कंद ॥ म्हणोनि समस्त विबुध ॥ स्वतंत्र पदार्थ दाविला ॥९९॥
देवांचा विस्तार सांगितला ॥ परमेश्वर तो यां वेगळा ॥ तैसेंच प्रपंच उत्पत्तीला ॥ निरुपितों अवधारीं ॥१००॥
ब्रह्मस्वरुपाचे डोहीं ॥ उल्लेख मात्र जाहला नाहीं ॥ तो मायेच्या हृदयीं ॥ अंश कळला देवाचा ॥१॥
तूं म्हणसी माया निर्गुण ॥ हें तो न घडे गा वचन ॥ परमेश्वर तो स्वामी पूर्ण ॥ माया सेवक सर्वस्वें ॥२॥
परमेश्वर मायेचा नियंता ॥ मायेस नकळे स्वरुप तत्वतां ॥ म्हणोनि तो श्रेष्ठ पाहतां ॥ माया त्याची म्हणेरी ॥३॥
म्हणेरी म्हणजे म्हणितलें करावें ॥ आज्ञेंत सदा सादर असावें ॥ यालागीं माया विशेष जाणावें ॥ सर्वदेवांहूनि श्रेष्ठ ॥४॥
देवांपरिस माया थोर ॥ परमेश्वरासन्निध सादर ॥ परी तीस न कळे पार ॥ त्या निजस्वरुपाचा ॥५॥
त्या परमेश्वराचे आज्ञेनें ॥ माया निर्मी सृष्टीलागुन ॥ पंचभूतें आणि त्रिगुण ॥ करी उत्पन्न अष्टधा ॥६॥
आधीं देवांचा विस्तार ॥ करिती जाहली सविस्तर ॥ मग प्रपंचाचा आकार ॥ निर्मिला थोर कौतुकें ॥७॥
देवांची उत्पत्ति जाहली ॥ मागें तूतें निरुपिली ॥ आतां पंचभूतें जन्मलीं ॥ कोण्यापरी ऐक तें ॥८॥
मायेपासूनि विश्वरुप जाहलें ॥ तेथूनि अष्टभैरव प्रगटले ॥ त्या आठांपासूनि अष्टांश जन्मले ॥ कोण कोण ते ऐकपां ॥९॥
एक एक भैरवाचें स्वरुपास ॥ पन्नास कोटि योजनांचा पैस ॥ ज्या पुरुषाचा जो वर्ण असे ॥ तोचि अंश विस्तारला ॥११०॥
महादेव भैरवापासूनी ॥ निर्माण जाहला तमोगुणी ॥ सुनाभ भैरवापासुनी ॥ रजोगुण जन्मला ॥११॥
सत्वगुणाची राशी ॥ जाहली विष्णु भैरवापासी ॥ यापरी त्रिगुणासी ॥ उत्पत्ति जाहली द्विजवर्या ॥१२॥
महादेवापासून ॥ तमोगुण पावला जनन ॥ तो अष्टभैरवांतील जाण ॥ हें नेणती निजवर्म ॥१३॥
सत्वगुण विष्णुपासून ॥ ऐसीं बोलती पुराण ॥ परी तो वैकुंठीचा नव्हे जाण ॥ अष्टभैरवांतील ओळखावा ॥१४॥
रजोगुण ब्रह्मयाचा ॥ ऐसा निश्चयो ऋषीश्वरांचा ॥ परी तो अष्टभैरवांतील साचा ॥ सुनाभ होय अधिकारी ॥१५॥
आतां आकाशाची उत्पत्ती ॥ शंभुभैरवा पासूनि सुमती ॥ वायूची महा चपळ गती ॥ आलेख भैरवापासुनी ॥१६॥
विक्राळ भैरवाच्या पोटीं ॥ जन्मली तेजाची आगटी ॥ काळिंद्रि भैरवाचे मुखसंपुटीं ॥ आप तेथूनि उद्भवले ॥१७॥
मलिवर्धन भैरवापासुनी ॥ निर्माण जाहली हे मेदिनी ॥ ऐसें अष्टभैरवांपासुनी ॥ जाहले त्रिगुण पंचभूतें ॥१८॥
वावडे सोडिजे गगनीं ॥ तिची दोरी करीं धरोनी ॥ तेवीं महाभूतें पसरोनि ॥ सूत्रधारी भैरव ॥१९॥
महादेव भैरवाची ॥ तामसी प्रकृति तयाची ॥ म्हणोनि उत्पत्ति तमोगुणाची ॥ प्रगट जाहली ओळखावी ॥१२०॥
सुनाम भैरव तो विलासी ॥ हा स्वभावगुण त्यासी ॥ यालागीं रजोगुण त्यापासी ॥ विस्तारला जाण पां ॥२१॥
विष्णु भैरव तो सात्विक ॥ क्षमाशील स्वभाव देख ॥ यास्तव सत्वगुण आवश्यक ॥ जन्व पावला तेथुनी ॥२२॥
शंभुभैरव असे काळा ॥ यालागीं आकाशहि तैसा जन्मला ॥ शब्दगुण लागला त्याला ॥ कर्म त्याचें अवकाश ॥२३॥
आलेख पुरुषाचा हरितवर्ण ॥ तैसाची वायु असे जाण ॥ स्पर्श तो तयाचा गुण ॥ चंचळ कर्म ओळखावें ॥२४॥
विक्राळीचें स्वरुप आरक्त ॥ यालागीं तेज जैसें धगधगीत ॥ गुण त्याचा रुपवंत ॥ जाळावें तें कर्म कीं ॥२५॥
श्वेतवर्ण काळिंद्रीचें ॥ म्हणोनि शुभ्ररुप आपाचें ॥ रसत्वें असे गुण त्याचे ॥ शीतळता तें कर्म होय ॥२६॥
मलिवर्धन तो पीतवर्ण ॥ तेंचि महीचें स्वरुप ओळखण ॥ गंध तो असे तिचा गुण ॥ कठिण कर्म जाणिजे ॥२७॥
यापरी पंचभूतें जन्मलीं ॥ रुप गुण कर्मे सांगितलीं ॥ तींही गुणासहित अष्ट जाहलीं ॥ अष्ट पुरुषांपासुनी ॥२८॥
तमोगुणासी आधिदैवत ॥ महादेव ओळखे निभ्रांत ॥ रजोगुणासी दैवत ॥ सुनाभ होय साचार ॥२९॥
सत्वगुणासी आधिदैवत ॥ विष्णु होय क्षमावंत ॥ आतां पंचभूतांचें दैवत ॥ तेही परीस ब्राह्मणा ॥१३०॥
आधिदैवत आकाशासि ॥ शंभु भैरव होय निश्चयेंसी ॥ आणि आधिदैवत वायूसी ॥ आलेख भैरव जाणिजे ॥३१॥
आधिदैवत तेजालागुन ॥ विक्राळि भैरव अति दारुण ॥ काळिंद्रीभैरव तो गहन ॥ आधिदैवत आपाचें ॥३२॥
पृथ्वीसी आधिदैवत ॥ मलिवर्धन निश्चित ॥ यापरी अष्टांशाचें दैवत ॥ अष्टभैरवापासुनी ॥३३॥
अष्टभैरवांसी आधिदैवत ॥ विश्वरुप होय यथार्थ ॥ विश्वरुपासी आधिदैवत ॥ चैतन्य माया जाणिजे ॥३४॥
चैतन्यमाया ते पाणी ॥ विश्वरुप बीजासी बोलावा पावोनी ॥ अष्ट अंकुर त्यांतुनी ॥ भैरव खांद्या निघाल्या ॥३५॥
अष्ट खांद्यांपासून ॥ त्रिगुणपंचभूतें जाहलीं निर्माण ॥ तेचि शाखा पसरली विस्तीर्ण ॥ पत्र पुष्पें तीं विश्व कीं ॥३६॥
नाना देहांची आकृती ॥ स्थूल सूक्ष्म जे होती ॥ तेचि फळांची उत्पत्ती ॥ जाण निश्चितीं द्विजवर्या ॥३७॥
ब्राह्मणयाति जन्मली ॥ ते पिकलीं फळें रसाळीं ॥ क्षत्रिय ते अर्धकाची जाहलीं ॥ हिरवीं तितुके वैश्यलोक ॥३८॥
निपजतां जीं गळालीं ॥ ते शूद्रयोनींत विस्तारलीं ॥ आणिक खाणी जे जाहली ॥ कुहिट फळें जाणावीं ॥३९॥
चैतन्यमायेपासून ॥ तळीं पसरला विस्तारुन ॥ यालागुनी ऊर्ध्वमूळ वृक्षजाण ॥ कृष्ण बोलिला गीतेंत ॥१४०॥
हा वृक्षाकार प्रपंच ॥ तुज निरुपिला साच ॥ पिंड ब्रह्मांड रचलें याचें ॥ स्वर्ग पाताळ इत्यादि ॥४१॥
महामायेची म्हणेरी ॥ दैवी माया अवधारीं ॥ त्रिगुण पंचभूतें घेऊनि करीं ॥ रची पिंड ब्रह्मांडा ॥४२॥
आधीं पसरी आकाश ॥ आकाशापोटीं घाली वायूस ॥ वायूतळीं गा तेजास ॥ तेजातळीं आप कीं ॥४३॥
आपाच्या पोटांत धरणी ॥ धरणी माथां मेरु ठेवुनी ॥ मेरुवरी बैसवी देवांलागुनी ॥ तळीं विस्तारीं हो सृष्टीसी ॥४४॥
आकाशाहूनि निमे अनिल ॥ अनिलाहूनि निमे अनल ॥ अनलापरीस निमे जल ॥ जलाहून निमे पृथ्वी ॥४५॥
सरोवरामाझारी ॥ कमळ पुष्प ज्यापरी ॥ तेवीं पृथ्वी जळाभीतरी ॥ तरंगों लागली द्विजवर्या ॥४६॥
मग विशाळ मेरु घेऊनी ॥ माथां ठेवी दोहीं करानीं ॥ ते महीसी छिद्र पाडोनी ॥ जळामाजी प्रवेशला ॥४७॥
त्या मेरुसी आवरावया ॥ निर्मी पराक्रमी मूर्तित्रया ॥ अतुर्बळी विशाळ काया ॥ कूर्म वराहो ॥४८॥
तिघें तिहींकडोनि होउनी ॥ धरिती मेरुसी सांवरोनी ॥ त्याचे भारें हे मिदिनी ॥ स्थिर जाहली जळांत ॥४९॥
मग या पृथ्वीवरुतें ॥ विस्तार जाहला जीवातें ॥ ऐसा कल्पांतपर्यंत ॥ करी घडामोड सृष्टीची ॥१५०॥
मग महाप्रळयाचे काळीं ॥ मलिवर्धन करी सुखाची खोळी ॥ गिळी पृथ्वी सगळी ॥ जीवास नेई महामाया ॥५१॥
जातां पृथ्वीचा अंश ॥ उरे जळबंध विशेष ॥ त्या जळाचा करी ग्रास ॥ काळिंद्रि तात्काळ ॥५२॥
तेज शोषिलें विक्राळीनें ॥ वायु भक्षिला आलेखपुरुषानें ॥ आकाश आवरुन शंभूनें ॥ हृदयामाजी सांठविलें ॥५३॥
महादेव तमोगुणासी ॥ आवरी आपुल्यापासी ॥ सुनाभें रजोगुणासी ॥ सांठवी आपुल्या अंतरीं ॥५४॥
विष्णु सत्वगुणातें ॥ आवरी आपुल्या स्वरुपातें ॥ यापरी त्रिगुण पंचभूतें ॥ अष्टभैरवीं सामावलीं ॥५५॥
अवघ्या सृष्टीचा मेळा ॥ अष्टभैरवीं सामावला ॥ भैरव विश्वरुपीं होती गोळा ॥ विश्वरुप मायेनें ॥५६॥
यापरी सृष्टीची उत्पत्ति ॥ तुज निरुपिली द्विजमूर्ती ॥ पुन: त्याची संहारस्थिती ॥ यथासांग सांगीतली ॥५७॥
कूर्म आपुले अवयव पसरी ॥ फिरोनि तैसेचि पोटांत आवरी ॥ तेवीं प्रपंचाचे भरोवरी ॥ पसरी आवरी मायेतें ॥५८॥
प्रपंच जाहला आणि मोडला ॥ तरी नाशातें नाहीं पावला ॥ आहे बीजरुपें संचला ॥ अनादि सिध्द आयता ॥५९॥
कांतीण पसरी तंतूसी ॥ उगळूनि गिळी मुखें त्यासी ॥ सांठवोनि ठेवी पोटांतील कुशीं ॥ तंतु कांतीण नव्हे कीं ॥१६०॥
यापरी मायेच्या पोटांत ॥ तंतुरुपें प्रपंच होत ॥ माया प्रपंच नव्हे निश्चित ॥ जाण निभ्रांत द्विजवर्या ॥६१॥
माया म्हणिजे देवता ॥ तो स्वता पदार्थ तत्वतां ॥ प्रपंचाचे मिळणीं अतौता ॥ कदा कल्पांतीं मिळेना ॥६२॥
माया आदिकरुनि देव सर्व ॥ ते ज्ञानी असती बरव ॥ प्रपंच जड स्वभाव ॥ केवीं एकत्र होतील ॥६३॥
देव प्रपंच जाणा ॥ कदाचित एकत्र होईना ॥ मग परमेश्वरा निर्गुणा ॥ केवीं येती एक्यासी ॥६४॥
अगा महदंतर पडला ॥ ज्या निजस्वरुपीं प्रपंच विस्तारला ॥ त्याचिया विपरीत ज्ञानाला ॥ जोड नाहीं ब्रह्मांडी ॥६५॥
ऐसी जगदीशाची वाणी ॥ द्विजें परिसिली अंत:करणीं ॥ मग सुखावोनि लुब्धे मनीं ॥ मृग जैसा गायना ॥६६॥
फणी भुले नागासुराला ॥ कीं सुगंध प्रिय षट्‍पदाला ॥ तेवी देवाच्या वचनाला ॥ ब्राह्मण जाहला तन्मय ॥६७॥
मग संतोष पावोन ॥ पुढती पुसेल देवास प्रश्न ॥ ते कथा अपूर्व निरुपण ॥ पुढिले अध्यायीं परिसिजे ॥६८॥
सकळ सृष्टीची उत्पत्ती ॥ देवें सांगितली द्विजाप्रती ॥ ते अल्पवचनें श्रोत्यांप्रती ॥ निवेदिली सद्भावें ॥६९॥
जाहला एकविसावा प्रसंग ॥ प्रपंच पदार्थांचा योग ॥ गुरुकृपेनें यथासांग ॥ निरुपिला भाविकां ॥१७०॥
पुधें बाविसावें अध्यायीं मात ॥ होईल निरुपण अद्भुत ॥ श्रोते तुम्ही बुध्दिमंत ॥ स्वस्थ चित्तें परिसावें ॥७१॥
माझिया मुखशिंपल्यांतून ॥ शब्दमुक्ते निघती जाण ॥ तुम्ही ग्राहिक श्रोते होऊन ॥ करा खरेदी श्रध्दाद्रव्यें ॥७२॥
मी तंव जड पर्वतावरी ॥ कविता ओघ निघे बाहेरी ॥ श्रवणें श्रोता स्नान करी ॥ पवित्र होईल गंगेमाजी ॥७३॥
मी तंव क्षीरसागरु ॥ कृपेनें मंथन करी सद्गुरु ॥ कविता अमृत निघे सारु ॥ प्राप्त विबुध श्रोतयां ॥७४॥
मी तंव शैल हिमाचळ ॥ जन्मली कविता गिरिजा सुढाळ ॥ तुम्ही श्रोते होऊनि शिवदयाळ ॥ अंगिकारा निजलग्नीं ॥७५॥
मी तंव द्रुपद अवधारी ॥ कविता द्रौपदी जन्मली सुंदरी ॥ श्रोते अर्जुन होऊनि चतुरीं ॥ श्रवणयंत्र भेदावें ॥७६॥
ऐसे दृष्टांत देतां ॥ म्हणाल आपुली वाढवी कथा ॥ तरी शहामुनीचे कवितार्था ॥ तर्क वाढविता सद्गुरु ॥१७७॥
इति श्रीसिध्दांतबोधग्रंथे अध्यात्मनिरुपनतत्वसारनिर्णये एकविंशतितमोध्याय: ॥२१॥ ॥ओव्या ॥१७७॥

N/A

References : N/A
Last Updated : November 22, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP