मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|सिध्दान्तबोध|
अध्याय ४६ वा

श्रीसिध्दान्तबोध - अध्याय ४६ वा

‘श्रीसिध्दान्तबोध’ हा संतकवि श्रीशहामुनि यांचा ग्रंथ म्हणजे मराठी साहित्याच्या खाणींतील एक तेजस्वी हिरा आहे.


श्रीगणाधिपतये नम: ॥ श्री गुरुभ्यो नम: ॥
नमूं श्री नारायणा ॥ गणेश सरस्वती तूंचि गुरुराणा ॥ जनीं जनार्दना परिपूर्णा ॥ अंतर्बाह्य तूंचि कीं ॥१॥
ब्रह्माविष्णुमहेश ॥ तूंचि विश्व तुझाचि विलास ॥ इशाचाही परम ईश ॥ जगीं जगदीश परमात्मा ॥२॥
गया काशी पुण्यक्षेत्रीं ॥ दान करणें पवित्र पात्रीं ॥ इतर काय अपवित्र धरित्री ॥ या कल्पनेचें सूत्रीं अज्ञान ॥३॥
सगुण आणि निर्गुणाचें ॥ कल्पावें स्वरुप काय उंच नीचें ॥ एकाचि उदकाचे ॥ थोर लाट साने बुदबुदे ॥४॥
दर्पणाचे अंगीं दुजा भास नसे ॥ पाहतां अंगीं दोन दिसे ॥ निद्रितापासी स्वप्न भासे ॥ जागृति दृष्टीं दिसेना ॥५॥
देव देवी परिवार ॥ लक्षितां एक साचार ॥ ऐसा ज्याला बोधपसर ॥ तोचि पुरुष सुखाब्धी ॥६॥
याचि सुखीं सुखावला शुक ॥ व्यास वाल्मीक सनकादिक ॥ ब्रह्मानंदीं योगी देख ॥ स्वानुभवें डुल्लती ॥७॥
जाणोनि ब्रह्म एक सत्य ॥ या विचारें वर्तती साधुसंत ॥ निर्भय कल्पनातीत ॥ जीवन्मुक्त स्वानंदें ॥८॥
अनंतधारा बिंदु देख ॥ निरखितां दिसे तोय एक ॥ असंख्य पत्रांचे लेख ॥ वृक्षीं बीज एकचि ॥९॥
मुळीं कर्ता पुरुष एक ॥ दावी एकीं अनेक अनेकीं एक ॥ सनई वाजे तर्‍हातर्‍हा देख ॥ मुळीं वाजविणार एकचि ॥१०॥
अनेक पंथ अनेक याती ॥ काया मिरवे पंचभूतीं ॥ आंत जीवाचे एक जाती ॥ आत्मा एक सहजेंची ॥११॥
गज उंट अश्व प्यादा फर्जी ॥ लक्षितां काष्ठ एक त्यामाजी ॥ तैसा ईश्वर असे मौजी ॥ खेळे एक अनेकीं ॥१२॥
मुनींद्र गुरुचा उपदेश ॥ यालागीं शाहामुनि नाम असे ॥ कल्पना सांडून चतुर पुरुषें ॥ अर्थ मनासी आणिजे ॥१३॥
कल्पनेच्या नाना जाती ॥ मारिल्या मेखा बहु पंथी ॥ बळकट बैसली भेद भ्रांती ॥ अद्वैत सूत्र उमजेना ॥१४॥
नामरुप ही कल्पना ॥ जगास समजावया जाणा ॥ सत्य आत्मा एकचि जाणा ॥ पूर्ण खुणा गुरुच्या ॥१५॥
गुरुकृपा प्रताप प्रौढी ॥ रची ग्रंथाची परवडी ॥ उभवी अनुभवाची गुढी ॥ परमगोडी रहस्य जें ॥१६॥
संतपदींचें रज घेऊन ॥ भाळीं लावितां उदेल भाग्य पूर्ण ॥ मती प्रकाशिली ज्ञान गहन ॥ बोले चातुर्य पदरचना ॥१७॥
रचना सिध्दांतबोधग्रंथीं ॥ ज्यांत उगवे अवघीच गुंथी ॥ परंतु मध्यें चित्तांत भ्रांती ॥ श्रोते जनीं न आणिजे ॥१८॥
सांगेन  अनेकपंथांचे गुंथाडे ॥ द्वैतभेदाचे कल्प गाढे ॥ अज्ञानाचे श्रवणीं भरे वेडें ॥ लाभ जोडे सज्ञान ॥१९॥
कल्पोनि ऋषीमतास ॥ निरास करीन देवतामंडळास ॥ सुखें थापावया ब्रह्मरसास ॥ उंचनीच भाग नेमीन ॥२०॥
अवघा एक मय हरी ॥ हा भाव कवीच्या अंतरीं ॥ शेवटीं अद्वैत बोध कुसरी ॥ ठसे लहरी अनुपम ॥२१॥
मध्यें भेदाचा सुकाळ ॥ करुन दावीन रसकल्लोळ ॥ श्रोतीं न मानावा विकळ ॥ ग्रंथ पुरता शोधावा ॥२२॥
भेद कल्पना वंचून जाणा ॥ अभेदबोध येईना मना ॥ भूस उपजल्यावांचूनि कणा ॥ निवाडा कैसा होईल ॥२३॥
यालागीं समग्र शोधावा ग्रंथ ॥ कळेल वोळखावयाची मात ॥ उडे संशय कल्पनाजात ॥ जिरे ऊर्मी मनाची ॥२४॥
न जाय श्रोत्यांचीं कल्पना अंत:करणीं ॥ तरी कां कवीनें धरावी ग्रंथीं लेखणी ॥ नुसता श्रम करोनी ॥ दोषी आपण होईजे ॥२५॥
काय वेद शास्त्री उणें ॥ आधिक दाविजे लेहून ॥ उगेंच थोरवीचें मिरवण ॥ दरिद्रि बीनसी त्यापरी ॥२६॥
पदरीं नाहीं धनाचा सांठा ॥ नुसता अभिमानाचा ताठा ॥ काय करावा क्रियाहीन करंटा ॥ धड प्रपंची ना परमार्थीं ॥२७॥
ज्ञानभांडार हृदयीं सांठे ॥ पसरे विवेक ब्रह्मरस मोठे ॥ मग ब्रह्मांडाचे कोटें ॥ दिसे लोचनीं सर्वही ॥२८॥
परीक्षा करावी तत्वांची ॥ समजल्या जाय भ्रांत चित्ताची ॥ वोळख पुरे मीपणाची ॥ नुरे भवाची काजळीं ॥२९॥
अंत:करणपंचक आकाशाचें ॥ प्राणपंचक वायूचें ॥ ज्ञानेंद्रियपंचक तेजाचें ॥ पृथ्वीचें कर्मेंद्रियपंचक ॥३०॥
उदकाचा विषय रेचक जाणा ॥ त्यांच्या ओळखाव्या वेगळाल्या खुणा ॥ तोचि ज्ञानाचा शाहणा ॥ चतुर पुरुष बोलिजे ॥३१॥
अंत:करणपंचक देवता मंडळ ॥ प्राणपंचक मायामंडळ ॥ ज्ञानेंद्रियांत कर्तृत्वाचा खेळ ॥ कर्मेंद्रियांत कर्मराहाटी ॥३२॥
परधर्म विचार जीवपणाचा ॥ स्वधर्मविचार शीवपणाचा ॥ उभयतां निराळा बोध ईश्वरींचा ॥ शुध्द परमार्थ मी ब्रह्म ॥३३॥
ओंकारबीजापासोन रचना ॥ त्याचा संसारवृक्ष जाणा ॥ वेदशास्त्रापुराणांची गणना ॥ त्यांतील बीज हेंच कीं ॥३४॥
कल्पित संसाराची राहाटी ॥ कल्पित साधनाच्या कोटी ॥ कल्पित चमत्कार उठी ॥ तोहि मायीक कल्पित ॥३५॥
जें कल्पून साधन आरंभिलें ॥ तें निर्विकल्प कैसें होईल ॥ कल्पनातीत अनुभवसिध्द केलें ॥ तोचि ब्रह्मविद बोलिजे ॥३६॥
जें चित्तानें चिंतावें ॥ चित्तानें केलें तें मायीक जाणावें ॥ यालागीं चिंतनातीत व्हावें ॥ तेव्हां शुध्द परमार्थ ॥३७॥
परमार्थ म्हणिजे शुध्द अद्वैत ॥ भेद कल्पना केर न मिळे ज्यांत ॥ हनुमंतापुढें बळवंत ॥ चौखाणीतां मिळेना ॥३८॥
सूर्यास न दिसे जोडपें ॥ आकाशासम भांडें नसे अमूप ॥ विजेसमान चमके दीप ॥ ऐसा कोठून आणावा ॥३९॥
अद्वैतब्रह्मीं जें एक ब्रह्म ॥ तेथें चमत्कार दाविणें हा भ्रम ॥ मूर्खा न कळे हें वर्म ॥ चमत्कारीं संतोषे ॥४०॥
जयानें चमत्कार दाविला ॥ जन त्याचे भेटीला गेला ॥ संत साधु नाहीं वोळखिला ॥ ज्यास अनुभव पूर्ण कीं ॥४१॥
अनुभव म्हणिजे आपण जगदीश ॥ जग आपुला अवयव बस ॥ तेथें चमत्काराचें पीस ॥ कोण दावी कोणातें ॥४२॥
दर्पणीं बिंब पाहोन ॥ त्यावर चवताळून धांवे श्वान ॥ तैसें चमत्काराचें लक्षण ॥ ज्ञानिया पुढें फोस कीं ॥४३॥
असो या जगासि बोलवेना ॥ उगेंस राहतां संतोष मना ॥ बोलतां उर फुटे जाणा ॥ तो उमजेना आपण श्रमी ॥४४॥
यासाठीं वादविवाद वितंड ॥ सोडोनि कुभांड बंड ॥ ज्यांत भेदाचा पडे खंड ॥ तो संवाद करावा ॥४५॥
तुटे उपाधिकचाटें ॥ विकल्पवासना समूळ तुटे ॥ अनुभवाचा लोट उठे ॥ फिटे पडदा भ्रांतीचा ॥४६॥
भरत आणि राव जनकासी ॥ घोर संग्राम होतां उभयतांसी ॥ भरतें जिंकोन जनकासी ॥ संपदा त्याची हरिली ॥४७॥
वाजी वारण उष्ट्र रथ ॥ एकत्र करुन सकळ पदार्थ ॥ विजयी होऊन राजा भरत ॥ संतोष नगरा ॥४८॥
नारद पातला त्या समयासी ॥ रायें नमस्कारुन ऋषिसी ॥ परमानंदें सन्मानिला ॥४९॥
राजा म्हणे मुनिवर्या ॥ तुमच्या आशीर्वादें पावलों जया ॥ राया जिंकोन लवलाह्यां ॥ सर्व संपदा आणिली ॥५०॥
यश पावलों आजि भारी ॥ यालागीं आल्हाद माझें अंतरीं ॥ नारद वदे नवल आश्चर्य ॥५१॥
मी जनकाच्या घरांत ॥ गेलों होतों आतांचि तेथें ॥ तो जनकराजा आनंद भरित ॥ शर्करा वांटीत बैसला ॥५२॥
म्यां पुसिलें आजि काय आनंद तुम्हाला ॥ तो म्हणे भरत जिंकिला ॥ तूं वदतोसि जनक जिंकिला ॥ हें नवल मज वाटे ॥५३॥
राजा म्हणे मुनिनायका ॥ म्यां जिंकिलें सत्य जनका ॥ तुम्हीं वदतां हें कौतुका ॥ वाटे माझ्य़ा मनासी ॥५४॥
नारदें धरुन भरतासी करीं ॥ गेला जनकाचिये नगरी ॥ गुढिया उभारिल्या घरोघरीं ॥ साकरा वांटिती गजपृष्ठीं ॥५५॥
तेंही कौतुक पाहोन ॥ सभेंत प्रवेशला भरत जाण ॥ तों जनकाचें हर्षवदन ॥ आनंदभरित बैसला ॥५६॥
भरत वदे जनकासी ॥ म्यां जिंकिलें तुझिया वैभवासी ॥ तूं तव आनंद भरित मानसीं ॥ त्याचें कौतुक मज वाटे ॥५७॥
म्यां तूतें जिंकिलें जाण ॥ तुमचें व्हावें म्लान वदन ॥ तुम्ही निर्भय आनंदघन ॥ याचें वर्म कोणतें ॥५८॥
परिसोनि भरताची वाणी ॥ जनक हास्यवदनीं ॥ सर्व पदार्थ ईश्वरें निर्मूनी ॥ आपण जाहला सुचित्त ॥५९॥
सूत्रें करुन नाना विनोद ॥ जीव नाचवी विनोदछंदें अहंपणे भुलले अंध ॥ मुळींचें सूत्र नेणती ॥६०॥
कर्मकाष्ठांची करुन नौका ॥ त्यांत बैसवी जीवांस जेखा ॥ संसारसमुद्रांत फिरवा देखा ॥ भवचक्रीं फिरे गरगरां ॥६१॥
अज्ञान बीज अविदया आळें ॥ संसारवृक्ष विस्तारले ॥ स्वर्गनरकादि त्यांची फळें ॥ सुखदु:खातें भोगवी ॥६२॥
पुण्य करितां स्वर्ग घडे ॥ पापामुळें नरक जोडे ॥ जेव्हां दोहीं वेगळा पडे ॥ तेव्हां सांपडे मोक्षगती ॥६३॥
पुण्य म्हणिजे सुवर्णबेडी ॥ पाप जाणिजे लोखंडीबेडी ॥ दोहींसही प्रारब्ध झोडी ॥ घाली परवडी जन्माच्या ॥६४॥
जन्ममरणांचा सांठा ॥ हेलावती सुखदु:खांच्या लाटा ॥ शोकसंतापाचा भडका मोठा ॥ उठे न सुटे कल्पांतीं ॥६५॥
ऐशा राहाटगाडग्याच्या कोडी ॥ दु:ख भोगिकां जीव तडफडी ॥ विश्रांती न मिळे एक घडी ॥ घडीघडी करी तळमळ ॥६६॥
नाना संतापाची ऊर्मी ॥ चित्त उदयोगी होय श्रमीं ॥ त्रिविधताप जन्मोजन्मीं ॥ दु:खाधानीं संतप्त ॥६७॥
जैसा दगडमार्गी खिळखिळा होय गाडा ॥ किंवा हिसके खाय मोटेचा नाडा ॥ अथवा वेंठोचा धरिला घोडा ॥ कोण निगा करी त्याची ॥६८॥
जो बंदी घातला माणुस ॥ काय सुख त्या उल्हास ॥ दरवेशी वागवी वाघास ॥ राग असोन काय करी ॥६९॥
चंद्रसूर्याचा प्रताप गाढा ॥ त्यांचे पाठीं लागली ग्रहाची पीडा ॥ हरिश्चंद्र पुण्यवंत धडपुडा ॥ वनवास दीधला कौशिकें ॥७०॥
शिवापाठीं भस्मासुर लागला ॥ शंखासुरें ब्रह्मयास ठकविला ॥ विष्णु वृदेच्या स्मशानीं बैसला ॥ भगेंद्री जाहला सुरेंद्र ॥७१॥
ऐशा कर्माच्या गती ॥ करिती सुरां असुरांच्या फजिती ॥ तेथें मानवांची काय गती ॥ कर्मापुढे तगावया ॥७२॥
एवढें कर्म दारुण ॥ त्यासी निरसी ब्रह्मज्ञान ॥ तें ज्ञान होय गुरुकृपेनें ॥ हा लाभ पदरीं मग पडे ॥७३॥
ज्ञानदृष्टीनें निरखितां ॥ संसार दिसे फोस रिता ॥ मृगजळीं तारूं घालितां ॥ काय उतारी तें सत्य ॥७४॥
खेळ खेळतां सोंकटीस ॥ हारी जीत काय सत्य असे ॥ तेवीं यश अपयश पाहतां दिसे ॥ जेवीं बाहुलीची सोयरीक ॥७५॥
अगा स्वप्नींचा व्यवहार पाहतां ॥ मिथ्या दिसे जागृत होतां ॥ तैसा संसारींच्या कथा ॥ हारी जीत मिथ्याची ॥७६॥
कोणाची संपदा कोणास गेली ॥ हे तों चाली कोठें नाहीं जाहली ॥ जैसे जयाचे नग ल्याली ॥ त्याचें त्यास दयावें कीं ॥७७॥
पाहतां प्रपंच पंचभूतांचा ॥ जीव सत्य आत्मा याचा ॥ संबंध नसे एकमेकांचा ॥ जेवीं पाषाण आकाश ॥७८॥
वायु आणि धरणी ॥ किंवा पाणी आणि अग्नी ॥ सूर्य निशीच्या मिळणीं ॥ संबंध कैसा घडेल ॥७९॥
जीव नव्हे प्रपंचाचा ॥ प्रपंच तो पंचभूतांचा ॥ त्यांत हर्षशोक लाभहानीचा ॥ करणें हें तो मूर्खता ॥८०॥
जाहलिया संसार ॥ ब्रह्मांडासहित मेरुमांदार ॥ तेहेतीस कोटी सुरवर ॥ तेही लयातें पावती ॥८१॥
जाईल सत्यलोक वैकुंठ कैलास ॥ ब्रह्मां विष्णु महेश ॥ गेले दैत्य आणि राक्षस ॥ रावणाऐसा पुरुषार्थी ॥८२॥
एकवीस स्वर्ग सप्त पाताळ ॥ चंद्ररवि नक्षत्रें ग्रहमंडळ ॥ सप्तद्वीपें नवखंडें विरतील ॥ शून्य होईंल आकार ॥८३॥
यापरी उमज राया ॥ मृगजळवत लटकी माया ॥ कैंचा पुत्र कैंची जाया ॥ नव्हे संपदा आपुली ॥८४॥
माझी संपदा नेली लुटून ॥ मी पावलों समाधान ॥ उपाधि आली तुजलागून ॥ निरुपाधि मी जाहलों ॥८५॥
जितुका व्याप तितुका संताप ॥ उपाधि कचाट तेंचि पाप ॥ भासे रज्जु भयंकर ॥ सर्प ॥ कंप सुटे नेणत्या ॥८६॥
बागुल भावून आरडून पळाला ॥ सत्य मानावें काय या बोला ॥ मृगजळ लोट उखरीं भासला ॥ तो काय होय जलाब्धी ॥८७॥
पाण्यांत चंद्र बिंबला ॥ बाळ मागे खेळावया मातेला ॥ कासवाचे तूप ओखदाला ॥ आणा रोग जाईल ॥८८॥
गाईचें दूध काढून ॥ फिरोन भरा कासेंत नेऊन ॥ सशाचे शिंग उपडून ॥ छेद पाडा गगनासी ॥८९॥
यापरी लटिका मायेचा जल्प ॥ मिथ्या घडे शोकसंताप ॥ अंगीं भरला हिंवताप ॥ त्याचें रुप दिसेना ॥९०॥
यापरी उमज राया भरता ॥ सोडीं राज्यलोभ भवचिंता ॥ अनुभवीं निर्भयपद अच्युता ॥ च्युत न होय कल्पांतीं ॥९१॥
लक्षीं निजानंद निरायास ॥ जेथें नसे मायाभास ॥ दिसे काळचक्र फोस ॥ प्रकाशीं आपण आपणां ॥९२॥
तुझ्या देहीं जें मीपण उठवी ॥ तेचि आत्मयाची मुख्य पदवी ॥ या ज्ञानें जीव उजवी ॥ उगवी गोवी जन्माची ॥९३॥
हेंचि सभाग्य लक्षण ॥ स्फुरे जया ब्रह्मचि त्रिभुवन ॥ कोंदला आपीं आप परिपूर्ण ॥ तरंग जैसा सागरीं ॥९४॥
मुख्य समाधीचें लक्षण ॥ मीच ब्रह्म आनंदघन ॥ या बोधीं योगी निपुण ॥ चिद्विलासें क्रीडती ॥९५॥
ऐसा वदला राजा जनक ॥ संतोष पावला राजा भरत देख ॥ उडाला आशा मोह कलंक ॥ नि:शंक निर्भय जाहला तो ॥९६॥
जीव समता बाणली ॥ एकात्मतेची उघडली खोली ॥ दैवदशा परम उदेली ॥ सबाह्य न्याहाळी जगदात्मा ॥९७॥
मौनावला न बोले कांहीं ॥ पुढें स्तुति करावया न उरली पाहीं ॥ मग चरणावर ठेवूनि डोई ॥ विरक्त जाहला अनुतापें ॥९८॥
ठसावला जनकाचा उपदेश ॥ नुरे भरभ्रांतीचा लेश ॥ मग त्यागून राज्यास ॥ उदास वृत्तीं विचरे सदा ॥९९॥
यालागीं साधूपासी ॥ विश्वासल्या ठसावे ब्रह्मराशी ॥ चुके चौर्‍यांसींची फांसी ॥ मुक्त होय जगदीशा ॥१००॥
मिथ्या माया परी चपेट भारी ॥ प्रतिबिंब पाहोनि क्षोभे केसरी ॥ किंवा दर्पणावर व्याघ्र श्वान गुरारी ॥ पाहतां बाळ दचके बागुला ॥१॥
विश्वामित्राची तपश्चर्या ॥ मेनिकेनें धाडिली विलया ॥ यापरी मायेची चर्या ॥ भुलवी महाश्रेष्ठांसी ॥२॥
जो श्रीरामाचा श्रीगुरु ॥ ब्रह्मज्ञानाचा अगाधभरु ॥ विश्वामित्रें मारितां कुमरु ॥ जीव दयावया उदित जाहला ॥३॥
तपोनिधी दुर्वासऋषी ॥ पाठीं चक्र लागलें त्यासी ॥ तो छळों धांवे अंबरीषासी ॥ पळे जीव घेऊनी ॥४॥
नारद ब्रह्मचार्‍यांत शिरोमणी ॥ मागे कृष्णअंगनेलागूनी ॥ पावला विटंबना वनिता होऊनी ॥ मायालाघव हें देखा ॥५॥
पराशराची ख्याति पुराणीं ॥ ढीवरी पाहोनि लुब्धे मनीं ॥ रतिविलासे वीर्यपतनीं ॥ व्यास तेथें जन्मला ॥६॥
इंद्र जाहला भगींद्र ॥ कलंक पावला चंद्र ॥ सुरगुरु ज्ञानसमुद्र ॥ अग्रजभार्या भोगिली ॥७॥
अगाध मायेचा गोंवा ॥ मोही ब्रह्माविष्णुसदाशिवां ॥ तेथें मनुष्याचा कोण केवा ॥ मायेपुढें शहाणपण ॥८॥
धर्मराज धर्मभूतीं ॥ पुण्यशीळ अगाध शांती ॥ सखोल सरळ समुद्रमती ॥ सत्यवादी पवित्र ॥९॥
दयावंत गुणगंभीर ॥ प्रजापाळक करुणा अपार ॥ न्याय नीती सर्वज्ञ चतुर ॥ सुढाळ निर्मळ कोमळ ॥११०॥
धर्मात्मा शुध्द आत्मा ॥ कल्पांती न टळे आपुल्या नेमा ॥ ज्ञान विवेक पुण्यात्मा ॥ पवित्र कर्म आचरे ॥११॥
रत्नपरीक्षा आत्मपरीक्षा ॥ पुरुषपरीक्षा स्त्रीपरीक्षा ॥ जाणे चित्ताची परीक्षा ॥ सर्वांविषयीं संपन्न ॥१२॥
जाणे न्यायनीती शोधूं ॥ वसिष्ठासमान अगाध बोधू ॥ निर्वैर सदा स्वानंदू ॥ शत्रुमित्र ज्या सम ॥१३॥
धैर्य मेरुसमान देख ॥ कृष्णभजनी प्रेम अधिक ॥ विष्णुसमान प्रजापाळक ॥ शीतळ जैसा चंद्रमा ॥१४॥
नम्र मंजुळ सरळ बोलणें ॥ सर्वांची रक्षूं जाणे मनें ॥ अजातशत्रु गुणसंपन्न ॥ दिसे साजिरा गोजीरा ॥१५॥
ऐसिया धर्मास मायामोहो ॥ लपटोन भ्रमिष्ट केला पाहाहो ॥ कुसंग खेळाचा घेऊन कलहो ॥ राज्य हरविलें दुर्जनी ॥१६॥
गेली दैवाची पवित्रदशा ॥ प्राप्त जाहली पुढें अवदशा ॥ चौघेबंधु पत्नी डोळसा ॥ घेऊनि वनीं निघाला ॥१७॥
श्रमोनि बैसला वृक्षातळीं ॥ समीप बंधु महाबळी ॥ पुढें द्रौपदी उभी लक्षणें अंगीकारिलीं ॥१९॥
वनवासीं वसणें फलहार ॥ वल्कलें नेसणें जटाभार ॥ आचरावी तपस्या महा उग्र ॥ हे तों क्रिया ऋषींची ॥१२०॥
तुज सभाग्य भूपाळा ॥ योग्य नव्हे वनवाससोहळा ॥ सांडोनि ऐश्वर्य अष्टभोगांला ॥ दारिद्रय भोगणें उचित नव्हे ॥२१॥
अवलंबूनि शांतीस ॥ साहावे जगाचे उपद्रवास ॥ हे गुण पाहिजेत साधूस ॥ तुज नरेंद्रा योग्य नव्हे ॥२२॥
रायाचे लक्षण नसावें साधूसी ॥ साधूची वर्तणूक नसावी नृपासी ॥ पुरुषश्रृंगार वनितेसी ॥ भूषण दिसे विपरीत ॥२३॥
स्त्रीचे अलंकार पुरुषासी ॥ विटंबना होय लेतां त्यासी ॥ जें ज्यां योग्य तें त्यांसी ॥ भूषण होय सुजाण ॥२४॥
बुगडी घालूं नये नाकांत ॥ नथ खोवू नये कानांत ॥ जो पदार्थ जेथें उचित ॥ तेथेंचि शोभा साजिरी ॥२५॥
तस्कर परद्वारीं दुर्जन ॥ साधूसि दिसती सज्जन ॥ रायानें करावें त्यांस दंडण ॥ हाचि स्वधर्म तयाचा ॥२६॥
तुम्ही सार्वभौम छत्रपति ॥ हे काय डोहळे होणें छत्रपति ॥ कैलास सोडोनि गिरिजापति ॥ मसणीं बैसणें ही शोभा ॥२७॥
वैकुंठपुर सोडोनि नगरीं ॥ उभें राहावें बळीचें द्वारीं ॥ हे काय शोभा त्यास  ॥ तैसें तुम्हीं करितसां ॥२८॥
ज्या देहीं जडावे रत्नांचे थाट ॥ त्या शरीरीं विभूतीचे पेट ॥ मिष्टान्नाचा आला वीट ॥ वनफळें आवडलीं ॥२९॥
अष्टभोग सुमनशेज ॥ तृणावरी निजावें हे आवडी उपजे ॥ स्वारीस शिबिका अंबरी रथ साजे ॥ त्यापरीस पदीं गमन साजिरें ॥१३०॥
लोडतिवासी शिरीं छत्र चवरी ॥ त्यापरीस द्रुमछाया दिसे बरवी ॥ परवानगीवांचून भेद होईना लवकरी ॥ आतां चारी दिशा मोकळ्या ॥३१॥
कोमाइलीं बंधूंचीं वदनें ॥ आम्ही दिसों रंक दीन ॥ तुमच्या एका शांतीनें ॥ देहदशा भोगविली ॥३२॥
परिसोन द्रौपदीची विनंती ॥ हांसोनि बोले धर्ममूर्ती ॥ म्हणे होणार बळवंत गती ॥ त्यासी काय करिसील ॥३३॥
जो दुखण्या पडे माणूस ॥ पंचाक्षरी सांगे देवभूतांस ॥ वैदय वदे वातपित्त विशेष ॥ ज्वरबाधा असे कीं ॥३४॥
जोशी म्हणे ग्रहबळ ॥ शनि राहु गुरु बळ ॥ हें दुखण्याचें मूळ ॥ ग्रहशांति करावी ॥३५॥
साधु म्हणे प्रारब्धभोग ॥ भोगणें लागे हा उदयोग ॥ हेंचि खरें इतर वाउगें ॥ जोशी वैदय पंचाक्षरी ॥३६॥
याविषयीं ऐक एक मौज ॥ परिसतां तुम्हां वाटे चोज ॥ रावणास आत्मज ॥ कन्या जाहली सुंदर ॥३७॥
ठाणमाण सुरेख चांगली ॥ वोतीव प्रकाशाची पुतळी ॥ मृगलोचनीं विशाळभाळी ॥ दिसे साजिरी गोजिरी ॥३८॥
रावणें अवलोकून नयनीं ॥ प्रीती बैसली आवडी मनीं ॥ ओवाळूनि सांडी सांडणी ॥ झणी दृष्टी लागेल ॥३९॥
घरींचा गुलाम पोर एक ॥ डबरें पोट अपरें नासिक ॥ पाय हात पडवळें देख ॥ विपारा काळा कोळसा ॥१४०॥
कन्येचें नाम ठेविलें भामिनिका ॥ गुलामाचें नाम ठेविलें रेखा ॥ भामिनी आवडे दशमुखा ॥ रेखा खेळवी कडेसी ॥४१॥
एकें दिवसीं सभेंत ॥ रावण बैसला आनंदभरित ॥ मांडीवर बैसवून भामिनीतें ॥ लक्षी तिचें स्वरुप ॥४२॥
ब्रम्हयास पुसे रावण ॥ ईस नवरा होईल कोण ॥ पाहा पंचाग बरें शोधून ॥ सत्य सांगा आमुतें ॥४३॥
ब्रह्मा म्हणे इचा भ्रतार ॥ रेखा गुलाम घरीचा पोर ॥ परिसोन रावण क्रोध भरे ॥ म्हणे काय वदतां विरंची ॥४४॥
सेवकांस म्हणे रावण ॥ रेखाचें करा शीरछेदन ॥ येरीं उचलोनि त्वरेन समुद्रामाजी टाकिला ॥४५॥
मणिमल्ल दैत्याची नारी ॥ तप करीं समुद्रतीरीं ॥ पुत्रइच्छा धरुनि अंतरीं ॥  शंकरातें आराधीं ४६॥
अवलोकीं समुद्रजीवनीं ॥ रेखा पाहतां देखिला नयनीं ॥ उडी घालोनि त्वरेंनी ॥ बाहेर काढला जीव असे ॥४७॥
उचलोन घेतला लौकर कडिये ॥ मुख पाहे घडिये घडिये ॥ प्राणसखा मज होय पढिये ॥ दिला पुत्र सदाशिवें ॥४८॥
नेला घरास लवडसवडी ॥ महा हरुषाची उभविली गुढी ॥ वैदय आणोनि तांतडीं ॥ उपचारिला रसायणें ॥४९॥
त्याची उदेली दैवरेषा ॥ गेली दैन्याची अवदशा ॥ पालटलें शरीर उजळला ठसा ॥ दिसे पुतळा वोतींव ॥१५०॥
चिंतामणी ठेविलें नांवा ॥ अलंकार वस्त्रें श्रृंगारिला बरवा ॥ नाना उपचारें करी गौरवा ॥ धनी केला राज्यासी ॥५१॥
इकडे रावण म्हणे भामिनीला ॥ नवरा चांगला ॥ तो जोशाचिया चित्ता आला ॥ चिंतामणी नोवरा ॥५२॥
घटित उतरे ठीक ॥ म्हणती मणिमल्ल दैत्याचा पुत्र देख ॥ नवरा चांगला सुरेख ॥ लावण्यपुतळा मदनाचा ॥५३॥
वर आला रावणाच्या मना ॥ वर्‍हाड आरंभिलें जाणा ॥ वरात आली लंकाभुवना ॥ रावण गेला सामोरा ॥५४॥
गौरवन आणिलें मंडपासी ॥ लग्न लाविलें मिळोनि जोशी ॥ मग आरंभिलें लाजाहोमासी ॥ विचित्र गायन नृत्य होतसे ॥५५॥
रेखा कडे घेऊनि भामिनीला ॥ प्रदक्षिणा करी लाजाहोमाला ॥ रावण पुसे ब्रह्मदेवाला तुमचें भविष्य मज सांगा ॥५६॥
ब्रह्मा म्हणे सत्य गोष्टी ॥ कर्मरेखा लिहिली उलाटीं ॥ भामिनीरेखांस पडली गांठी ॥ सत्य गोष्टी रावणा ॥५७॥
रेखा म्हणोनि हांक मारा ॥ धांवत येईल सामोरा ॥ तरीच मी ब्रह्मा खरा ॥ वचन मानीं यथार्थ ॥५८॥
रावण म्हणे रेखा ॥ धांवत आला समोर देखा ॥ वदे मी तुमचा सेवक सखा ॥ जाहलों जामात महाराजा ॥५९॥
विस्मयो जाहला दशमुख ॥ म्हणे भामिनीस कर्मरेखा ॥ बळवंत कर्म देखा ॥ न सोडीं सूत्र विचित्र ॥१६०॥
यापरीस मज सुजाणे ॥ कर्मरेखा बळवंत जाणे ॥ ते भोगवी दु:खें दारुणें ॥ यास कैसें करावें ॥६१॥
प्रारब्धें हरिश्चंद्रें वनवास भोगिले ॥ शिबिरायें मांस तुकिलें ॥ मयूरध्वजें कर्वंत घेतलें ॥ नळें भोगिलें कष्टांसी ॥६२॥
महा भीष्मास ब्रह्मचर्य येणें ॥ पिता पंडूस कोड भरणें ॥ धृतराष्ट्रास अंधत्व येणें ॥ विचित्र गती कर्माची ॥६३॥
भीमार्जुनांस धर्म म्हणे ॥ तुमचीं कां कोमाइलीं वदनें ॥ हीं कौतुके कृष्णाचि जाणे ॥ मायालाघव दाखवी ॥६४॥
निमित्त ठेवूनि आम्हांवरी ॥ नाना यत्नें दुष्टां मारी ॥ तुम्हांस भय नाहीं संसारीं ॥ निर्भय असावें बंधु हो ॥६५॥
कृष्ण नव्हे यादव सोयरा ॥ हा माया विष्णु लाघवी खरा ॥ मुक्त करावया धरा ॥ अवतार घेतला हरीनें ॥६६॥
लीलाकौतुक देव करी ॥ तुम्हीं कां चिंतातुर अंतरीं ॥ सुखें क्रीडा महीवरी ॥ कृष्णस्मरणीं भय नाहीं ॥६७॥
अंगीं वज्रकवच कृष्णकृपेचें ॥ भय नाहीं कळिकाळाचें ॥ सेवा अनुभवरस भक्तीचें ॥ ज्यांत स्वानंद आनंद कीं ॥६८॥
संसार माया फोस ॥ याचा कशास वाहतां सोस ॥ जोडा अविनाश पदास ॥ ज्यांत कल्याण उभयलोकीं ॥६९॥
सूर्यवंश सोमवंशांत ॥ राजे झाले असंख्यात ॥ कोण उरले पृथ्वीवरुते ॥ दावावया लोचनीं ॥१७०॥
पुण्यवंतांचें थाट ॥ त्यांचें निर्मूळ जाहलें सपाट ॥ तुमचाही पुढें नट ॥ लयापावेल जाणपां ॥७१॥
कोणाची संपदा कोणाची संतती ॥ आजि पावेतों राहिली क्षिती ॥ विषयलोभें पडली भ्रांती ॥ स्वहित आपुलें उमजेना ॥७२॥
मधुमक्षिका संग्रह करितां ॥ बनकर नेइ झोडून त्यां देखतां ॥ मक्षिका कपाळीं भणभणितां ॥ केले कष्ट वृथाचि ॥७३॥
वाळवी बांधी घर ॥ मृत्तिका उकरोन करी विवर ॥ सर्प आंत करी संचार ॥ नाशी त्याचे प्राणांसी ॥७४॥
पहा कोसलियाचा विपरीत परी ॥ आपण घर करोनि कोंडे अंतरीं ॥ त्यापरी देहबुध्दीच्या परी ॥ फसेल जीव उमजेना ॥७५॥
मी ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र ॥ हाही देहबुध्दिचा प्रकार ॥ येणें जिवास लागला घोर ॥ जन्ममरण भोगिती ॥७६॥
जीव आत्म्याचा प्रतिबिंब ॥ शरीर पंचभूतांचा डंभ ॥ उखरी मृगाजळाचा दिसे तुंब ॥ तैसा जात अभिमानें ॥७७॥
देहबुध्दी च्याच्या पोटीं ॥ अविदया लागली त्याचे पाठीं ॥ साखर घेऊन हर्षें वांटी ॥ कोटी जन्म सोडीना ॥७८॥
अविदयामुळें स्वर्ग नरक ॥ अविदया मुळें प्रारब्ध देख ॥ नाना संताप महा शोक ॥ भ्रमे भूतचक्रीं भूतसा ॥७९॥
तेवीं अविदया जावयास ॥ धरावी सद्गुरुची कांस ॥ शरण जावें संतास ॥ भवपाश तोडावे ॥१८०॥
आतां बंधु हो भिऊं नका ॥ अविदया वांझसंतती देखा ॥ धरा भक्तीचा आवांका ॥ कृष्ण भजनीं सावध असा ॥८१॥
ऋषि सांगे अध्यात्मचर्चा ॥ अनुभव बोध मौजेचा ॥ उदय होईल भाग्याचा ॥ कृष्णकृत्यें जाणिजे ॥८२॥
भाव भक्तीचा दिवा ॥ कृष्ण जगद्गुरुचे पाद सेवा ॥ त्याच्या आशीर्वादें बरवा ॥ जय पावला राज्यांत ॥८३॥
कृष्णभजनीं धरलिया नेट ॥ विघ्नें होतीं सर्व सपाट ॥ प्राप्त होईल राज्यपट ॥ कीर्ती घोष गर्जेल ॥८४॥
यापरी बोधोनि बंधूंसी ॥ शांत केलें द्रौपदीसी ॥ भीमे वंदुनि धर्मासी ॥ आनंदातें पावला ॥८५॥
अर्जुन जोडूनि दोनी कर ॥ धर्मासी करी नमस्कार ॥ म्हणे व्यास भीष्म विदुर ॥ तूंचि पंडू आमुचा ॥८६॥
तनु मन जीव अर्पिला तूतें ॥ तुझी आज्ञा ते कोटिमुहुर्त ॥ गुरु माता पिता आमुतें ॥ तुजवीण दुजा असेना ॥८७॥
नकुळ सहदेव म्हणती आम्ही बाळकें ॥ कृपेनें पाळिसी कौतुकें ॥ कुंती माद्रीपरीस मोह अधिक ॥ लळा पाळिसी दयार्णवा ॥८८॥
विवेकें समजोनि पांडव ॥ धर्मआज्ञेनें वर्तती बांधव ॥ साह्य करोनि यादव ॥ सुखें विचरती सिंहवत ॥८९॥
ज्यांत अनुभव रहस्य गोडी ॥ तेचि लिहिलें चरित्र आवडीं ॥ सिध्दांतबोधाची उभविली गुढी ॥ ग्रंथ आणिला नेटका ॥१९०॥
शुध्द परमार्थचरित्र ॥ कथा वदलों परमपवित्र ॥ श्रवणें श्रोतियांचे श्रोत्र ॥ ढेंकर देती तृप्तीचा ॥९१॥
धरुन अनुभवाची कडसणी ॥ केली ग्रंथाची उभारणी ॥ करितां तीन पारायणीं ॥ मनोरथ पुरती भाविकांचे ॥९२॥
भाविकांस होईल कल्पतरु ॥ ज्ञात्यास ब्रह्मींचा सागरु ॥ संसारिकास संसारविचारुन ॥ कळों येईल पारायणीं ॥९३॥
रसिकांस वाटे रस गोडी ॥ परमार्थींयांस वाटेल परमार्थ जोडी ॥ ब्रह्मज्ञानी उभविती गुढी ॥ म्हणती हें भाग्य आमुचें ॥९४॥
फार काय वदों या वदनें ॥ कल्याण भाविकांचें श्रवणें ॥ जाईल पीडा निरसोन ॥ पुरती मनोरथ मनाचे ॥९५॥
एका पारायणें चतुराची ॥ उगवेल गुंथी मनाची ॥ भ्रांति निरसोन चित्ताची ॥ करील कल्लोळ स्वानंदीं ॥९६॥
कामिकास कल्पतरु ॥ सिध्दांतबोध दातारु ॥ इच्छा पूर्ण करील ईश्वरु ॥ हा आशीर्वाद गुरुचा ॥९७॥
आतां समाप्तीचा प्रकार ॥ उत्कर्ष बोलती विचार ॥ श्रवणें श्रोतियां हर्ष भरे ॥ ऐसा स्वानंद वर्षतो ॥९८॥
कल्पनातीत शुध्दज्ञान ॥ ज्यांत सज्जनांचें समाधान ॥ अर्थ विचारितां मन ॥ पुढें धांव घेईना ॥९९॥
आतां नमूं मूळबीज ॥ ज्या बीजीं ब्रह्म विराजे ॥ आपुली मूळ मिरास आपणा उमजे ॥ होय काज जन्माचें ॥२००॥
शहामुनीचें सार्थक ॥ तुम्हां संतांचे पाय देख ॥ पावलों अक्षयी निजसुख ॥ स्वानंदपदीं निमग्न ॥२०१॥
इति श्रीसिध्दांतबोधग्रंथे अध्यात्मनिरुपणतत्वसारनिर्णये षट्‍चत्त्वारिंशत्तमो ध्याय: ॥४६॥
॥अध्याय ४६॥ ओव्या २०१॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ श्रीराम ॥

N/A

References : N/A
Last Updated : November 24, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP