मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|सिध्दान्तबोध| अध्याय ९ वा सिध्दान्तबोध प्रस्तावना अध्याय १ ला अध्याय २ रा अध्याय ३ रा अध्याय ४ था अध्याय ५ वा अध्याय ६ वा अध्याय ७ वा अध्याय ८ वा अध्याय ९ वा अध्याय १० वा अध्याय ११ वा अध्याय १२ वा अध्याय १३ वा अध्याय १४ वा अध्याय १५ वा अध्याय १६ वा अध्याय १७ वा अध्याय १८ वा अध्याय १९ वा अध्याय २० वा अध्याय २१ वा अध्याय २२ वा अध्याय २३ वा अध्याय २४ वा अध्याय २५ वा अध्याय २६ वा अध्याय २७ वा अध्याय २८ वा अध्याय २९ वा अध्याय ३० वा अध्याय ३१ वा अध्याय ३२ वा अध्याय ३३ वा अध्याय ३४ वा अध्याय ३५ वा अध्याय ३६ वा अध्याय ३७ वा अध्याय ३८ वा अध्याय ३९ वा अध्याय ४० वा अध्याय ४१ वा अध्याय ४२ वा अध्याय ४३ वा अध्याय ४४ वा अध्याय ४५ वा अध्याय ४६ वा अध्याय ४७ वा अध्याय ४८ वा अध्याय ४९ वा अध्याय ५० वा श्रीसिध्दान्तबोध - अध्याय ९ वा ‘श्रीसिध्दान्तबोध’ हा संतकवि श्रीशहामुनि यांचा ग्रंथ म्हणजे मराठी वाड्मयाच्या खाणींतील एक तेजस्वी हिरा आहे. Tags : pothisiddhant bodhपोथीसिध्दान्तबोध अध्याय ९ वा Translation - भाषांतर श्रीगणाधिपतये नम: ॥ आजि धन्य उगवला दिवस ॥ हृदयीं प्रगटला जगदीश ॥ जाहला ज्ञानाचा प्रकाश ॥ दाही दिशा उजळल्या ॥१॥सरली अज्ञानाची रजनी ॥ अवघे मार्ग दिसती नयनीं ॥ कथापंथे राजधानी ॥ जातां गुंती असेना ॥२॥ भावें वंदूनि श्रीगुरुसी ॥ पुढें आरंभिलें कथेसी ॥ पुत्र उपदेशी पितयासी ॥ तेंचि निरुपण परिसावें ॥३॥बाळक म्हणे मम जनिता ॥ सोडीं पुत्रमोहवार्ता ॥ भावें भजावें श्रीअनंता ॥ सार्थकता करीं आपुली ॥४॥ म्हणसी शरीर माझें असे ॥ हेंचि लागलें तुम्हां पिसें ॥ मृगजळाचे उल्लासें ॥ पेरूं पाहसी धान्यातें ॥५॥ढीवर मत्स्य धरावयाला ॥ मध्यरात्री गंगेसि गेला ॥ जळीं पाहें चंद्रबिंबाला ॥ मनीं हरिखला मत्स्यारी ॥६॥म्हणे आजि येथें कोठोनि ॥ अपूर्व वस्तु आली जीवनीं ॥ मग टाकीं जाळें पसरोनी ॥ तंव नीर हेलावलें ॥७॥तोयासरिसें बिंब हालत ॥ ढीवर भावी पळावया पाहता ॥ जाळें जळावर गोवित ॥ विशेष करी बळकटी ॥८॥आपुल्या मनीं विचार करित ॥ आजि अमूल्य सांपडली वस्तू ॥ माझ्या भाग्यासी नाहीं अंत ॥ हर्ष विशेष मानिला ॥९॥मग रात्रीं समय टळत आला ॥ चंद्र अस्तमानासी पावला ॥ ढीवर म्हणे अनर्थ जाहला ॥ वस्तु गेली निघोनी ॥१०॥याचिपरि उमजें राया ॥ मिथ्या भ्रमों नको वायां ॥ कैंचा पुत्र कैंची जाया ॥ होई विरक्त हरिभजनीं ॥११॥ऐकोनि पुत्राचा विवेक ॥ राजा जाहला निष्कलंक ॥ म्हणे जगीं मी एक मूर्ख ॥ व्यर्थ मोहें नाडलों ॥१२॥मग पुत्र राज्यीं स्थापिला ॥ आपण वानप्रस्थ जाहला ॥ स्त्रियांसहित वना गेला ॥ तपी तपला अद्भुत ॥१३॥ अंतकाळीं विमान आलें ॥ काया त्यजूनी मोक्षधामा गेले ॥ हेचि कथा चांगुणा बोले ॥ आपुल्या पती कारणें ॥१४॥आतां परीसा एक चरित्र ॥ कथा सांगतों परमपवित्र ॥ तेचि परिसोनि तुमचे श्रोत्र ॥ आनंदातें पावती ॥१५॥मालवदेशीं अवंतिका नगरीं ॥ भूधर राजा सदाचारी ॥ दारा पुत्र सून सुंदरी ॥ चौघां अनुभव एकची ॥१६॥उदार धीर गुणगंभीर ॥ विवेकचातुर्यज्ञानसागर ॥ प्रजापाळणीं करुणा अपार ॥ स्वधर्मी रत एकनिष्ठ ॥१७॥साधुसमागम शास्त्रसंग्रहो ॥ ईश्वर भजनीं परम मोहो ॥ दुष्टवासनेचा लाहो ॥ स्वप्नीं ज्यातें असेना ॥१८॥गोब्राह्मण प्रतिपाळक ॥ अज्ञानतमनिरसनीं अर्क ॥ धैर्य मेरुहून अधिक ॥ शीतळ जैसा जंद्रमा ॥१९॥पुराणश्रवण कीर्तन ॥ वृत्ती सदा सावधान ॥ सत्यवादी असत्यभाषण ॥ ज्याचे जिव्हेस असेना ॥२०॥भक्तिप्रेमाचा कल्लोळ ॥ शांतिक्षमेचा सुकाळ ॥ अनाथदीनावरी कृपाळ ॥ सुढाळ निर्मळ पवित्र ॥२१॥कीर्तिघोष परिसोनि श्रवणीं ॥ सत्व पहावया नारदमुनी ॥ परम हंसवेष स्वीकारुनी ॥ आला नृपातें गृहातें ॥२२॥नगराबाहेर पुष्पवटिका ॥ रम्य शिवालय शिवलिंग पिंडिका ॥ तें स्थळीं मुनीनें केली बैसका ॥ सेवकीं नृपातें सुचविलें ॥२३॥नगरप्रदेशीं शिवालयांत ॥ एक परमहंस पातला समर्थ ॥ दिसे रमाकांत कीं उमानाथ ॥ किंवा विधाताची स्वयें आला ॥२४॥वार्तिक निवेदितां नृपासी ॥ नारदें केलें कौतुकासी ॥ राजपुत्र होता मंदिरासी ॥ प्राण त्याचा हरितला ॥२५॥निमाला महीपाळनंदन ॥ गृहीं शोक प्रवेशला दारुण ॥ दासी महाशंख करुन ॥ राजसभेंत पातल्या ॥२६॥महाराजा तुझा नंदन ॥ अकस्मात् पावला निधन ॥ स्वामी याचें करावें शोधन ॥ कां अरिष्ट हें आलें ॥२७॥प्रजा प्रधान नगरलोक ॥ ऐकून करिती अपार शोक ॥ हरपलें सुढाळ माणिक ॥ विपरीत केलें विधातिया ॥२८॥सभामंडपी अवघे मिळोन ॥ महाशोक करिती दारुण ॥ राजा बैसला मौनेंकरुन ॥ हर्ष शोक त्यासी नसे ॥२९॥नरेश वदे समस्तजना ॥ कांरे करितां व्यर्थ रुदना ॥ निधन पावला तो परतेना ॥ त्याचा खेद कायसा ॥३०॥आत्मा गेलिया निघोन ॥ प्रेत श्मशानीं करावें दहन ॥ यापरतें कोणतें साधन ॥ सांगा तुम्ही चतुराहो ॥३१॥साहित्यास गुंतल्या प्रेतास ॥ निघोन जाईल परमहंस ॥ दोघे गेलिया लाभास ॥ काय उरेल तें सांग पां ॥३२॥आधीं भेटूं या साधूसी ॥ मग संस्कार करुं प्रेतासी ॥ ऐसें वदोनि सभेसी ॥ राजा आला ऋषीपासी ॥३३॥घेऊनि ऋषीचें दर्शन ॥ घाली साष्टांग लोटांगण ॥ परमहर्ष मनीं मानून ॥ विनविता जाहला ऋषीला ॥३४॥महादरिद्रें पीडिल्यावरी ॥ गृहीं प्रवेशे समुद्रकुमरी ॥ किंवा ऋणें गांजितां भारी ॥ परिस वोपी देवता ॥३५॥रोग उद्भवल्या शरीरीं ॥ त्यासी भेटे धन्वंतरी ॥ अथवा वांझोटी संसारीं ॥ पुत्र शेवटीं लाधला ॥३६॥सावित्रीस प्रसन्न रविनंदन ॥ प्राण पतीचा फिरतां जाण ॥ तेवीं स्वामीच्या दर्शनेंकरुन ॥ संतोष वाटे बहु जीवा ॥३७॥क्षुधार्थियासी क्षीरसिंधु ॥ चकोरा उदयपावे पूर्ण इंदु ॥ मारुती करितां सीताशोधु ॥ दर्शनें नेत्र निवाले ॥३८॥तैसें माझिया मनोरथीं ॥ सुखसंतोषें केली वस्ती ॥ स्वर्गींहून पातल्या भागीरथी ॥ सार्थक भगीरथाचें ॥४०॥यापरी तुमची जाहलिया भेटी ॥ तुटे संसारफांसाटी ॥ बैसेन सायुज्जपदाचे पटीं ॥ कृपा जाहलिया तुमची ॥४१॥तुम्ही दयेचे सागर ॥ दीनजनावर करुणा फार ॥ सहज विचरा महीवर ॥ उध्दरावया जीवांसी ॥४२॥आतां स्वामी ऋषिसत्तमा ॥ पवित्र करावें ममाश्रमा ॥ जेणें पावन आमचा आत्मा ॥ वाढें प्रेमा तें करी ॥४३॥परिसोनि रायाचें धैर्य ॥ मुनि मनांत करी आश्चर्य ॥ म्हणे नवल याचें कृतकार्य ॥ अपूर्व दशा पैं याची ॥४४॥मुनि म्हणे गा महिपाळा ॥ कर्ता सुगुण पुत्र तुझा निमाला ॥ गृहीं शोकसागर प्रवेशला ॥ त्यांत येणें किमर्थ ॥४५॥आम्ही सुखस्वानंदीं निमग्न ॥ तुझिया गृहीं शोक दारुण ॥ तेथें आमुचें आगमन ॥ कैसें घडेल सांग पां ॥४६॥राजा म्हणे शोकसंताप ॥ हा मिथ्या मायेचा विकल्प ॥ रज्जुसर्पाचा भरला कंप ॥ काय तेथें डंखावें ॥४७॥चुन्याचें टिमाणें शेतांत ॥ पाहोनि पळती मृग तेथ ॥ तें काय शेतांत राखणाइत ॥ मृषा कल्पना कुरंगांची ॥४८॥खडकीं धोंडयास शेंदूर लागला ॥ म्हणती अप्सरा महिषासुर बैसला ॥ स्वप्नीं गज पाठीस लागला ॥ तो काय धाडिला रायानें ॥४९॥मृगजळाचे पूर देखोन ॥ नौका पेटीयांचा सायास किं कारण ॥ बागुल मारावया जाण ॥ सेना समुदाय कासया ॥५०॥मुळींच जो जन्मला नाहीं ॥ तो निमाला हा शोक काई ॥ स्वप्नीं ऋण घेतल्या पाहीं ॥ जागृतीस काय फेडावें ॥५१॥कोण जन्मला कोण मेला ॥ मृषा मायिक गलबला ॥ ऋण काढिलें व्यवहाराला ॥ वाटसरु जामीन ॥५२॥गांवांत सार्याची आली पेटी ॥ चिंता दर्दुरीच्या पोटीं ॥ तेवीं जगाची पाहतां गोष्टी ॥ वृथा चावटी शोकाची ॥५३॥वाटसरु आला आणि गेला ॥ त्याचा खेद कोणें केला ॥ शिराळशेट उदकीं बुडविला ॥ कोण रडतो त्यासाठीं ॥५४॥मक्षिकेसाठीं कोण कष्टीं ॥ वमन होतां होती हिंपुटी ॥ तेवीं आपुल्या स्वार्थासाठीं ॥ करिती शोक माणसें ॥५५॥एक वाटसरु घरासि आला ॥ विश्वासें भांडारगृहीं ठेविला ॥ तेणें दगा दीधला ॥ मग खेद कांयसा ॥५६॥यापरी कोणी एक प्राणी ॥ सहज जन्मला आमुचें सदनीं ॥ तो गेला तत्काळ उठोनि ॥ नाहीं नेला कडदोरा ॥५७॥आमुची संपदा आम्हांपासी ॥ ठेऊनि गेला तो उदीमासी ॥ त्याचा खेद नसे मानसीं ॥ चला स्वामी आनंदमय ॥५८॥पाहोनि रायाचा अढळ धीर ॥ मुनीचें निवालें अंतर ॥ मग म्हणे नृपा तूं चतुर ॥ बरवा विवेक कथियेला ॥५९॥परी तुझी भार्या शोकसागरीं ॥ तिचें उदरीं दु:खलहरी ॥ पुत्रनिधनाचा भ्रम भारी ॥ संतोष काय आम्हां तेथें ॥६०॥राजा पाचारी कांतेसी ॥ तेही पातली ऋषीपासी ॥ म्हणे स्वामी चला गृहासी ॥ मुनिवर्या दयाळुवा ॥६१॥जीवासी करावया बोध ॥ यालागीं तुमची लीला अगाध ॥ दर्शनें जाती त्रिविधभेद ॥ सहा स्वानंद तुम्हांपासी ॥६२॥मेध धांवे जगासाठीं ॥ त्याहूनि तुमची विशेष राहाटी ॥ तुम्ही उध्दारा जीवकोटी ॥ फोडा पेटी अविद्येची ॥६३॥रवि अंधकार निवारुन ॥ चालवो विश्वाचें कार्य जाण ॥ तुम्ही अज्ञानतम निरसून ॥ करा प्रकाश ज्ञानाचा ॥६४॥चंद्र तापातें निवारुन ॥ शीतळ करी विश्वालागुन ॥ तुम्ही त्रिताप भंगून ॥ करा अक्षयी शीतळ ॥६५॥गंगा जाय समुद्रापासी ॥ उभयतटीं शीतळ करी लोकांसी ॥ तेवीं तुम्ही दयेच्या राशी ॥ विचरा जग तारावया ॥६६॥अंधनेत्रीं सूर्य बैसला ॥ तैसाची लाभ आम्हांसी जाह्ला ॥ चंद्रमौळी भाविकाला ॥ भेटे जैसा भाग्योदयीं ॥६७॥आतां चलावें मायाबापा ॥ करावी अनाथावरी कृपा ॥ आनंदाचिया स्वरुपा ॥ आनंदातें पाववी ॥६८॥परिसोनि नृपभामिनीची विनंती ॥ नारद सुखावला आपुलें चित्तीं ॥ म्हणे अगाध याची कीर्ती ॥ सिंधुपरीस सखोल ॥६९॥तिची धारणा आणोनि मनांस ॥ कसोनि पाहे कसोटीस ॥ म्हणे बोलसी विवेकें सुरस ॥ परी घरीं अनर्थ ओढवला ॥७०॥महाप्रिये तुझा नंदन ॥ काळें खंडिलें आयुष्यालागून ॥ महाअरिष्ट गिरी येऊन ॥ तुमचें गृहीं लोटला ॥७१॥ऐसें वदला देवऋषी ॥ हासें आलें राजपत्नीसी ॥ अभ्र पडळ वितुळल्या अपैसी ॥ गर्जना आकाशीं असेना ॥७२॥सर्प कांत टाकिल्यावरी ॥ त्याचा खेद काय अंतरीं ॥ चित्रें संहारिल्या पोतेर्यावरी ॥ कोण कष्टी त्यासाठी ॥७३॥मुदीची लाख गेलिया हरपोन ॥ तियेस्तव कोण करी रुदन ॥ वृक्षाचीं पत्रें गेलिया गळोनि ॥ खेद नसे द्रुमासी ॥७४॥वृक्षशाखे विहंगम बैसला ॥ त्याचा हर्ष नाहीं तिजला ॥ शेखीं उडोनि पक्षी गेला ॥ त्याचा खेद तो नसे ॥७५॥तैसे हे प्रजानन ॥ बस्तकरु वस्ती लागून ॥ त्याचा खेद काय कारण ॥ हें तो दिसे मूर्खत्व ॥७६॥आहे तों नखकेशांची प्रीती ॥ त्यागिल्या खेद नसे चित्तीं ॥ फळ लागल्या वेल ना सुकती ॥ सदा टवटवीती तेजस्वी ॥७७॥अपुला दात मुखीं वसे ॥ नित्य घासितां लखलखीत दिसे ॥ तो पडलिया कोण पुसे ॥ तेवीं कथा पुत्राची ॥७८॥परिसोनि पतिव्रतेचे बोल ॥ मुनि डोलवी आपुलें मौल ॥ कोण विवेक हा प्रबळ ॥ सांठविलासे हृदयीं ॥७९॥म्हणे बरवें बोलसी चतुर ॥ विचारसमुद्रे गुणगंभीर ॥ परि स्नुषेवरी तुझा कहर ॥ अरिष्टाचा मांडला ॥८०॥समंत नांमें स्नुषेसी ॥ सासूनें पाचारिलें तियेसी ॥ तिणें त्यागूनि पतिप्रेमासी ॥ ऋषीपासीं पातली ॥८१॥मुनीस करोनियां नमन ॥ उभी ठाकली कर जोडून ॥ म्हणे आजि उदेला सुदिन ॥ रंकागृहीं श्रीमंत ॥८२॥वनीं पडला तृषार्ती ॥ त्यासी पातली भागीरथी ॥ किंवा जनकाची यज्ञसमाप्ती ॥ नवही पुरुष मीनले ॥८३॥तैसें जाहलें मज स्वामी ॥ निवालें मी अंतर्यामीं ॥ तुमचे पाहोनियां पादपद्मी ॥ संतापउर्मी उडाली ॥८४॥सुकल्या अंकुरीं पीयूषधारा ॥ पूर्णिमा भेटे त्या चकोरा ॥ किंवा पार्वतीस सोयरा ॥ कैलासवासी लाधला ॥८५॥सिंधूस जामात होतां विष्णू ॥ निवे अष्टही भावें मनु ॥ संजीवनी साधितां गुरुनंदनु ॥ नगारीस संतोष ॥८६॥जन्म पावतांचि आस्तीकमुनी ॥ स्वानंद वासुकीच्या सदनीं ॥ वेद देतां विधिलागूनी ॥ होय संतोष सहजची ॥८७॥तैसें आम्हां जाहलें सुख ॥ अवलोकितां स्वामीचें मुख ॥ उडालें संचित प्रारब्धदु:ख ॥ कोंदला हरिख अंतरीं ॥८८॥भ्रांति उडाली मनाची ॥ चिंता हरपली चित्ताची ॥ सेवा घेणें मज दासीची ॥ चलावें स्वामी आश्रमा ॥८९॥वचन परिसोन मुनिनायक ॥ म्हणे ही एकापरीस एक अधिक ॥ कोंदला बोलती ज्ञानविवेक ॥ अतर्क्य बुध्दि पैं यांची ॥९०॥नारद वदे परिसें सुमती ॥ तुझा निधन पावला पती ॥ दहन करीं प्रेताप्रती ॥ वैधव्य तूतें पावलें ॥९१॥परिसोनि ऋषीच्या वचना ॥ हांसोनि बोले पद्मनयना ॥ म्हणे पंचभूतांचा देह जाणा ॥ कोण पुरुष कोण नारी ॥९२॥पंचभूतें समसमान ॥ आत्मा आत्मीं नसे जाण ॥ जीव जीवी हीं वचन ॥ नेमिलें नाहीं कर्त्यानें ॥९३॥बुडबुडा उठिला फुटला ॥ तो काय नाशातें पावला ॥ उदकामध्यें असे संचला ॥ बुदबळ सोकटी या न्यायें ॥९४॥जीवाचा पती परमेश्वर ॥ त्यास प्रणील तेचि चतुर ॥ तेव्हां पतिव्रता साचार ॥ एर्हवी विधवा अवघ्याची ॥९५॥स्त्री पुरुष हे कल्पना ॥ मिथ्या स्वप्नींची दिसे रचना ॥ अज्ञानश्रमें भ्रमले जाणा ॥ फिरे वाहुटळ भवचक्र ॥९६॥कोणी मेला ना जन्मला ॥ दिसे आत्मा एक संचला ॥ मुनी परिसोनि यां बोला ॥ आलिंगोनि पृष्ठीं थापटी ॥९७॥मग तिघांसी करीं धरोनी ॥ मुनी आला घरासी घेऊनी ॥ अवलोकिलें कृपा करुनी ॥ उठिला पुत्र रायाचा ॥९८॥मुनिस घाली लोटांगण ॥ बरें स्वामी केलें कल्याण ॥ गेलें पापताप दैन्य ॥ जीवन्मुक्त मी जाहलों ॥९९॥चौघे लागती चरणांसी ॥ मुनी दावी आपल्या रुपासी ॥ अभय देवोनियां त्यांसी ॥ निजगति गेला वैकुंठा ॥१००॥विष्णूस सांगोन धाडिले विमान ॥ चौघांसि केलें पावन ॥ यापरी भक्तीचें भूषण ॥ स्वर्गी पताका लागल्या ॥१॥आपण लाविला भोपळा ॥ तो दुसर्यानें तोडूनि नेला ॥ त्याचा खेद फार जाहला ॥ केले कष्ट वृथाची ॥२॥तोचि आपुल्या संतोषें करुन ॥ केला सत्पुरुषासी दान ॥ देत्या घेत्या समाधान ॥ खेद कैचा मग उरे ॥३॥जितुका मोह धरावा चित्तीं ॥ तों काळफांस कंठीं बैसती ॥ मग जन्ममरणाचिया पंक्ती ॥ फिरावें अफाट कोठवरी ॥४॥मरणाची बैसतां धडकी ॥ सर्वरोगांची उठे कडकी ॥ फुटोनि देहाची कर्ममडकीं ॥ जीव अडके काळचक्रीं ॥५॥निमाला तोचि गा गेला ॥ त्याचा सोबती कोण जाहला ॥ मृषा करिती गलबला ॥ शेखीं जेविती संतोषें ॥६॥मेला त्याचें तोंडीं माती ॥ जीवही अत्यंत मरती ॥ एकामागें एक जाती ॥ राहता ठाव दिसेना ॥७॥जन्म पुत्र शर्करा वांटिती ॥ मरतां शोकसागरीं पडती ॥ स्वप्नी मोहरांच्या घागरी सांपडती ॥ जागृतींत काय संतोष ॥८॥अवघी भ्रमाची खटपट ॥ वाहे मृगाजळाचा लोट ॥ साळी पिकवील तो भरी पोट ॥ हा बोभाट वृथाची ॥९॥स्वप्नीं जाह्लें फार कुमर ॥ ते स्वप्नींच निमाले समग्र ॥ यांचा हर्ष शोक घार ॥ काय जागृतीं धरावा ॥११०॥पितापुत्र सासु ॥ पति कांता सुहृदजना ॥ हा बाहुलीचा खेळ जाणा ॥ कोणी न होता कोणाचीं ॥११॥कोणी न येती अंतीं ॥ होईल धर्मचि सांगाती ॥ गेल्या विश्वांत राहील कीर्ति ॥ चंद्रसूर्य तोंवरी ॥१२॥संसार अवघा जाण ॥ ईश्वरीं करावा अर्पण ॥ तनु मन धन जीव प्राण ॥ या नव पुरुषार्थ महाराजा ॥१३॥ईश्वरीं अर्पिजे पुत्रफळ ॥ तेणें पाविजे पद अढळ ॥ यश कीर्ति निर्मळ ॥ राहील कल्पपर्यंत ॥१४॥यापरी चांगुणा सती ॥ विवेकें समजाविला पती ॥ मग पाचारी पुत्राप्रती ॥ हाक मारितां धांवला ॥१५॥ऐकोनि चांगुणेचय बोला ॥ रायें बहु संतोष मानिला ॥ म्हणे आवडे जें तुजला ॥ तेंचि करीन ममप्रिये ॥१६॥पांच वरुषाचा बाळ ॥ सुगुणरुप नामचि वेल्हाळ ॥ म्हणे मज कां उताविळ ॥ पाचारिलें तें सांगपां ॥१७॥पाहोनि पुत्राचें वदन ॥ पोटीं द्रविली करुणकरुन ॥ त्यासी बोलावया वचन ॥ शब्द कंठीं फुटेना ॥१८॥देखोनि चिलया पूर्णचंद्रा ॥ स्नेहलाटा मोहसमुद्रा ॥ उसळे परंतु मर्यादा ॥ नुलंघीच सत्याची ॥१९॥मग गिळोनि मोहाची उकळीं ॥ हृदयीं आठविला चंद्रमौळी ॥ धैर्य सांवरोनि वेल्हाळी ॥ मृद मंजुळ विनवी पुत्रा ॥१२०॥म्हणे वत्सा तुजलागीं ॥ भिक्षेस पातला महायोगी ॥ मांस भक्षावयालागीं ॥ निश्चयो केला तनूचें ॥२१॥ऐकोनि चिलया आनंदला ॥ म्हणे भाग्याचा उदयो जाहला ॥ दरिद्रीयाचे कन्येला ॥ पर्णूं आला श्रीमंत ॥२२॥तृषानळें जो शोषला ॥ तयासि सुधाब्धि भेटला ॥ तेवीं नाशिवंत तनूला ॥ लावी गतीला सत्पुरुष ॥२३॥बहुत सुकृतांच्या राशी ॥ जोडतां नरदेहा प्राप्ति ऐसी ॥ वस्तु लाभली ते सत्पुरुषीं ॥ अर्पितां सद्गति होतसे ॥२४॥म्हणोनि त्यागितां हे तनु ॥ मोक्षाऐसें जोडे धनु ॥ अजापालटें कामधेनु ॥ मिळतां न घे तो मूर्ख ॥२५॥याहूनि लाभ कवण तो जननी ॥ निमाल्या उठे दुर्गंधी घाणी ॥ घरचीं मुलें भिऊनी ॥ पळोनी जाती दूर पैं ॥२६॥तृणप्राय केश भाजती ॥ कोष्ठासारिख्या अस्थि जळती ॥ कपाळ भंगल्या मोक्ष म्हणती ॥ लोक जाती गृहासी ॥२७॥जोंवरी बैसती मसणखाई ॥ तोंवरी सांगती वैराग्य नवाई ॥ म्हणती संसार अवघा पाहीं ॥ नाशिवंत जाणिजे ॥२८॥दु:खदायक सकळ सृष्टी ॥ मृत्यु लागला सर्वांपाठीं ॥ काळ पेटलासे हटी ॥ जिवंत कोणा सोडीना ॥२९॥यालागीं साधुसंत सेवन ॥ भावें करावें भगद्भजन ॥ उल्लंघोनियां जन्ममरण ॥ सायुज्यसदन पावावे ॥१३०॥आमुचे प्रारब्धीं तें कैचें ॥ सांपडलों संसारमोहाचें कचें ॥ पदरीं सांठवण पापाचें ॥ देव कोठूनी आठवेल ॥३१॥मसणवटीं जोंवरी बैसती ॥ तोंवरी वैराग्य उपजे चित्तीं ॥ गृहीं पातल्या निश्चितीं ॥ शून्य जाहला परमार्थ ॥३२॥यापरी विश्वाची रीती ॥ क्षणक्षणा पालट चित्तीं ॥ शाश्वतपद जेणें प्राप्ती ॥ तो कोणता अर्थ सांगपां ॥३३॥आतां परिसावें सावधान ॥ इतिहास सांगतो पुरातन ॥ निश्चयीं बैसे तुझें मन ॥ होय बोध पूर्ण बुध्दीला ॥३४॥ वृत्रासुर महा असुर ॥ विशाळतनु पर्वताकार ॥ बोलतां गडगडे अंबर ॥ होय लडबड सुरांसी ॥३५॥उचलोनि ठेवितां चरण ॥ भूगोळ खचे भारें करुन ॥ शेष वराह दचकोन ॥ धैर्ये धरा सांवरिती ॥३६॥सहस्त्र ताड लंबायमान ॥ विश्व सांठवे एवढें वदन ॥ करीं गदा साठ योजन ॥ मोडूं पाहे ब्रह्मांड ॥३७॥तयाचे धाकें विबुध पळाले ॥ दाही दिशा पांगले ॥ सुरेश जाऊनि ते वेळे ॥ शरण आला विष्णूसी ॥३८॥ शक्र म्हणे जी कमलावरा ॥ कवण उपाय करावा असुरा ॥ कैटभारी म्हणे अमरवरा ॥ वर्म वदतों ऐक पां ॥३९॥दधीची नामें महाऋषी ॥ परमसाधु सत्वराशी ॥ त्याचे मागोनि अस्थीसी ॥ वज्र शस्त्रासी घडावें ॥१४०॥ऋषिअस्थींचें वज्र करुन ॥ तेणें निमेल असुर दारुण ॥ येर्हवीं करितां कोटि प्रयत्न ॥ उपाय कांहीं चालेना ॥४१॥आयुष्याची सर्वांस प्रीती ॥ केवीं ऋषि प्राण त्यजिती ॥ याविषयीं मातें निगुतीं ॥ कठिण दिसे स्वामीया ॥४३॥रमाकांत वदे सहस्त्रनयना ॥ भगवद्भक्त दयाब्धि जाणा ॥ परोपकारी वेचिती प्राणा ॥ इच्छा नाहीं देहाची ॥४४॥विष्णूसी वंदोनि अमरपाळ ॥ आज्ञा घेऊनी उतावीळ ॥ मनोवेगें ऋषीजवळ ॥ पदांबुजीं विनटला ॥४५॥अवलोकुनी ऋषीचें तेज ॥ बोलावया वाटे लाज ॥ हें जाणोनि योगिराज ॥ पृच्छा करी इंद्रासी ॥४६॥ऋषि म्हणे अमरपाळा ॥ किमर्थ पातलासि या वेळां ॥ इंद्र दिसतसे कोमाइला ॥ बोलतां मनीं संकोचित ॥४७॥परिसोनि ऋषीची वाणी ॥ इंद्र बोले जोडूनि पाणी ॥ अरिष्ट उद्भवलें असुरयोनीं ॥ प्रळय तेणें मांडिला ॥४८॥यालागीं तुम्हांपासी ॥ आलों इच्छोनि मानसीं ॥ तुमचिया अस्थीनें मरण त्यासी ॥ नेमिलेसें विधीनें ॥४९॥परिसोनि ऋषि हांसिन्नला ॥ इंद्रासी विनोदार्थ बोलिला ॥ जिताचि मागसी अस्थीला ॥ धन्य तुझा विवेक ॥१५०॥मज ऋषिचा प्राण घेऊन ॥ मारुं पाहसी असुरगण ॥ तुम्हां सुरांचें हें लक्षण ॥ मनुष्यासी काय म्हणावें ॥५१॥ऐकोनि ऋषीची बोली ॥ इंद्राची मति कुंठित जाहली ॥ बहुशक्ति ढिलावली ॥ श्वास घालोनि बैसला ॥५२॥ऋषि सांगे ज्ञानगोष्टी ॥ पुढे अस्थि न पडे दृष्टी ॥ असुर घेईल प्राण शेवटीं ॥ बरवें कांहीं दिसेना ॥५३॥बळें वधों जरी ऋषीसी ॥ शापोनि मेळवील धुळीसी ॥ इकडे असुर तो जीवासी ॥ गांठी घालील रोकडी ॥५४॥उभयपक्षीं संकट भारी ॥ पुढें कूप मागें विहिरी ॥ ऐसा चिंतेच्या सागरीं ॥ बुडोनि गेला अमरेंद्र ॥५५॥ऋषीनें ज्ञानीं विचारिलें ॥ सुरशाचें धैर्य पळालें ॥ मग अभयवचन दीधलें ॥ संतोषी केलें अमरेंद्रासी ॥५६॥ऋषि म्हणे सहस्त्रनयना ॥ तुजकारणें त्यागितों प्राणा ॥ मम अस्थींच्या वज्रें जाणा ॥ असुर दुर्जन मर्दी कां ॥५७॥परिसोनि ऋषीची अभयवाणी ॥ इंद्रा लाभ मानी चौगुणी ॥ रंक बैसे राज्यासनीं ॥ तेवीं मनीं संतोषला ॥५८॥निपुत्रिकाशी पुत्र जाहला ॥ की प्राण जातां सुधारस प्राशिला ॥ वारांगणा कामिकाला ॥ रात्रीं सांपडली वस्तीसी ॥५९॥नारदासी सांपडे कळी ॥ पोटांत करी गुदगुली ॥ किंवा मोहरांची गांठोळी ॥ अवचिता सांपडे दुर्बळा ॥१६०॥यापरी अमरेश पावोनि हरिखा ॥ बांधली शकुनाची ग्रंथिका ॥ मग ऋषि करोनि विवेका ॥ अस्थी वोपी इंद्रासी ॥६१॥ऋषीनें प्राण आकर्षिला ॥ योगमार्गे गतीस गेला ॥ इंद्रें अस्थीचें वज्र करुनि ते वेळां ॥ मग मारिला वृत्रासुर ॥६२॥हें सांगावया कारण ॥ परोपकारी पुरुष तोचि धन्य ॥ जयाची कीर्ति पुराण ॥ व्यास वाल्मीक वर्णिती ॥६३॥आतां विलंब न करीं जननी ॥ साधीं कार्य त्वरेंकरोनी ॥ क्षुधानळें पीडिलासे मुनी ॥ जठर त्याचें शांतवीं ॥६४॥परिसोनि बालकाचें वचन ॥ पोटीं धरिला चांगुणेन ॥ हृदयीं गहिंवर सांवरोन ॥ उचलोनि गृहांत आणिला ॥६५॥आडवा धरोनि बालकासी ॥ खड्ग वोपिलें पतीसी ॥ नृपें स्मरोनि शिवासी ॥ शिरकमळ उतरिलें ॥६६॥धैर्य सांवरोनि ते वेल्हाळ ॥ शिंक्यावरी ठेवी शिरकमळ ॥ धड माथा डोलवी ॥६९॥परी कसीतसे भक्तांसी ॥ महेश म्हणे चांगुणेसी ॥ अपवित्र धड घालिसी ॥ पवित्र शिरातें ठेवोनी ॥१७०॥आतां करीं एक युक्तीं ॥ शिर कांडोनि उखळाप्रती ॥ हरुषें गायें भगवंत प्रीतीं ॥ पाक करीं मग त्याचा ॥७१॥खेद मानून गहिंवरशील ॥ नेत्रीं अश्रुबिंदु ढळेल ॥ तरी उठोनि तत्काळ ॥ न भक्षितां जाईन ॥७२॥ऐसें वदतां महादेवें ॥ चांगुणा म्हणे बहुत बरवें ॥ तुम्ही स्वस्थचित्तें बैसावें ॥ आज्ञा तैसीच वर्तेन ॥७३॥नमस्कारोनि गिरिजापती ॥ शिरकमळ घेतलें हातीं ॥ उखळीं ठेवोनि चांगुणा सती ॥ कांडीत मुसळ घेऊनी ॥७४॥चांगुणा म्हणे माझिया बाळा ॥ सगुण सुंदरा चिल्लाळा ॥ सकुमार तनू कोमळा ॥ मुसळघायें कुटीत ॥७५॥तुज कुरवाळिलें ज्याहस्तें ॥ त्याचि करें कुटी त्यातें ॥ उचित काय हें जननीतें ॥ ऐसें म्हणसी बालका ॥७६॥तरी याचि विषयीं चिरंजीवा ॥ हा विवेक कथिला बरवा ॥ आतां विषाद सोडूनि द्यावा ॥ कल्याण इच्छीं मातेतें ॥७७॥गिरिजे माझी येउं दे करुणा ॥ चिलया बाळ माझा तान्हा ॥ त्यासी पाजीं प्रेम पान्हा ॥ सांभाळ करी कैलासीं ॥७८॥इतुके दिवस म्यां पाळिलें ॥ आजि तुझिया वोसगी घातलें ॥ मायबहिण कणवाळे ॥ क्षण एक न विसंबे ॥७९॥मग ह्मणे चिल्लाळा ॥ कैसें क्रमेल स्वर्गी तुला ॥ कवण म्हणे भूकेतान्हेला ॥ कोण कडिये खेळवी ॥१८०॥ऐसें बोलोनि गहिंवरली ॥ हृदयीं मोहाची उकळी आली ॥ स्तनीं दुग्धाची धार लागली ॥ मुसळ हातींचें निष्टलें ॥८१॥सवेंचि उमजें अंतरीं ॥ विवेक धैर्यातें सांवरी ॥ म्हणे मोहाची चांचरी ॥ कोठें संचार त्वां केला ॥८२॥मग म्हणे मी वेडी ॥ व्यर्थ मुलालागीं चरफडीं ॥ सांडोनि देवाची गोडी ॥ नष्ट मोहें नाडिलें ॥८४॥कैची कन्या कैंचा पुत्र ॥ मिथ्या मायिक विचित्र ॥ करोनि मोहाचें सूत्र ॥ तुझें माझें नाचवीं ॥८५॥ऐसें बोलोनि चतुरी ॥ शिर सडूनि पाक करी ॥ ताट वाढी शिवापुढारीं ॥ जेवा म्हणे दयाब्धी ॥८६॥क्षुधेनें पीडिलें शरीर ॥ पाकास विलंब लागला फार ॥ स्वामिसेवेसी पडिले अंतर ॥ क्षमा कीजे दयाळा ॥८७॥परिसोनि सतीचें वचन ॥ हांसोनि बोले गिरिजारमण ॥ उपवासी तुम्ही दोघेंजण ॥ मातें गोड लागेना ॥८८॥मान्य करोनि वचनासी ॥ उभयतां बैसाल पंक्तीसी ॥ तरीच स्वीकारीन भोजनासी ॥ निजमानसी जाणिजे ॥८९॥परिसोनि शिवाची अचाट वाणी ॥ श्रियाळें धाक घेतला मनीं ॥ म्हणे वल्लभे या वचनीं ॥ मातें वाटे विपरीत ॥१९०॥हा पेटलासे हटासी ॥ वधवोनि पोटींच्या बाळकासी ॥ तेंचि भक्षवूं पाहे आम्हांसी ॥ राक्षसी कर्म करुं नये ॥९१॥पाहोनि रायाचें मन:कल्पित ॥ चांगुणा धरी पतीचा हात ॥ म्हणे नवमास उदरांत ॥ म्यां सांठविला चिलया ॥९२॥एके दिवसांचे अंतीं ॥ सांठवितां भार काय नृपती ॥ यालागीं बैसोनियां पंक्ती ॥ संतोषवू भगवान ॥९३॥उभयतां सांडोनियां कल्पना ॥ पंक्ती बैसली भोजना ॥ ताट सांडोनि कैलासराणा ॥ उभा ठेला जावया ॥९४॥निपुत्रिकाचें अन्न भक्षिणें ॥ तेंचि आम्हां लाजिरवाणें ॥ आपुलें सुकृत वेंचणें ॥ पवित्र धर्म हा नव्हे ॥९५॥हें जाणोनि चांगुणा गोरटी ॥ धांवोन चरणीं घाली मिठी ॥ म्हणे मी अभाग्य करंटीं ॥ अतीत विमुख जातते ॥९६॥पाहोनि चांगुणेची भक्ती ॥ प्रसन्न जाहला गिरिजापती ॥ पंचवदन दिव्यमूर्ती ॥ तेज फांके अंबरीं ॥९७॥सजीव करोनी बालकासी ॥ भेटविलें जनकजननींसी ॥ शिव म्हणे चांगुणेसी ॥ प्रसन्न जाहलों वर मागें ॥९८॥पाहोनि शिवाचें रुप ॥ चांगुणा म्हणे गेलें पाप ॥ संतोष पावोनियां नृप ॥ उभयतां पदांबुज वंदिती ॥९९॥चांगुणा म्हणे दीनदयाळा ॥ कृपेनें वोपी वराला ॥ मातें छळिलें ऐसें कवणाला ॥ पुन्हा कसोटीं धरुं नये ॥२००॥हेंचि मागणें स्वामीस ॥ दीधलें म्हणे महेश ॥ विमानीं बैसवोनि कैलासास ॥ राजा नेला परिवारेशी ॥१॥एवढा प्रताप शिवाचा ॥ वर्णितां शिणल्या सहस्त्र वाचा ॥ सुरां असुरां मानवांचा ॥ वरद सत्य श्रीशंकर ॥२॥यापरी ऋषिसभेंत ॥ मुनि वदले श्रियाळगीत ॥ पुढें शिवमहिमा अद्भुत ॥ ऋषि वर्णितील तें परिसावें ॥३॥हातीं धरितांची लेखणी ॥ कविता चाले दुणावोनी ॥ श्रोते संतोषोनि मनीं ॥ आशीर्वाद देती वक्तया ॥४॥घेवोनि संतांचा आशीर्वादु ॥ विशेष चाले सिध्दांतबोधु ॥ शहामुनीचा आल्हादु ॥ चौगुणी वाढे ग्रंथार्थी ॥२०५॥इति श्रीसिध्दांतबोधग्रंथे अध्यात्मनिरुपणतत्त्वसारनिर्णये नवमोऽध्याय: ॥९॥अ. ओंव्या ॥२०५॥ N/A References : N/A Last Updated : September 23, 2020 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP