मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|सिध्दान्तबोध|
अध्याय ३५ वा

श्रीसिध्दान्तबोध - अध्याय ३५ वा

‘श्रीसिध्दान्तबोध’ हा संतकवि श्रीशहामुनि यांचा ग्रंथ म्हणजे मराठी साहित्याच्या खाणींतील एक तेजस्वी हिरा आहे.


श्रीगणाधिपतये नम: ॥ श्रीगुरुभ्यो नम: ॥
ओं नमो जी गणनायका ॥ तूं ओंकारस्वरुपपीठिका ॥ वेदशास्त्रांचा बीजांकुर देखा ॥ तुजपासोनि उद्भव ॥१॥
चारी पुरुषार्थ चारी भुजा ॥ विवेक सोंड सरळ वोजा ॥ अभयपाणी भक्तकाजा ॥ महाराजा उभारिसी ॥२॥
जीव शिव तेंचि गंडस्थळें ॥ भिन्न परी मस्तकीं मीनले ॥ शोभायमान बरवे शोभले ॥ भेद अभेद दावुनी ॥३॥
स्वीकारुनि शिवउपनिषदांचे लाडू ॥ गिळिशी वेदांतींचा पेडू ॥ घालिसी भेदविघ्नावरी धाडू ॥ होसी सुरवाडु निजदासां ॥४॥
नीतीचा करीं अंकुश ॥ मिरविशी ज्ञानाचा फरश ॥ शांति पीतांबर शोभे कासेस ॥ पायींस तोडर उदार ॥५॥
चौदा विद्या चौसष्टी कळा ॥ ऋध्दि सिध्दी तिष्ठती जवळा ॥ सहज स्वभावें करिशी लीला ॥ अनंत कळा तुजपासी ॥६॥
चौसष्टी जोगिणी कात्यायनी ॥ चामुंडा शीतळा मिळोनी ॥ भोंवत्या मिरवती जैशा सौदामिनी ॥ स्तविती पुराणीं आकार ॥७॥
तुज चिंतोनि सुरगण ॥ करिती दैत्यनिशाचरांचें कंदन ॥ तुज नवशिल्या संपूर्ण ॥ फळदाता तूं होसी ॥८॥
महाकवी ग्रंथकर्ते ॥ प्रारंभीं स्तविती स्वामी तूतें ॥ माझा केवा काय तेथें ॥ तुझें स्तवन करावया ॥९॥
सर्वांरंभीं तुझें पूजन ॥ ब्राह्मण करितां तुजलागून ॥ तेथें मीहि एक दीन ॥ नमन करितों पायांसी ॥१०॥
जो उल्लाळा ब्रह्मभुवनीं ॥ तेचि शारदा विश्वमोहिनी ॥ आदिमाया मूळभवानी ॥ प्रकाशवाणी ज्ञानाची ॥११॥
सर्व काळ सूत्रदोरी ॥ हृदयीं हेलाविशी प्रेमलहरी ॥ तूंचि होसी बागीश्वरी ॥ कवित्वरस वोतिसी ॥१२॥
ब्रह्मा हरिहर बाळकें ॥ निर्मिसी माये तूं कौतुकें ॥ निजविसी उन्मनी पालखें ॥ अक्षय सुख त्यां करिसी ॥१३॥
आदिमाया तुर्या ज्योती ॥ नादरुपिणी परा शक्ती ॥ स्फूर्तीसी ज्ञानदीप्ती ॥ तेचि सरस्वती तूं आम्हां ॥१४॥
तूंचि होऊनि प्रसन्न ॥ अभय देशी कवीलागून ॥ यालागीं करितों नमन ॥ वारंवार पदांबुजीं ॥१५॥
जयजयाजी आचार्या ॥ अवलोकन मीपण गेलें लया ॥ वर्णावया गुरुवर्या ॥ ठाव कैंचा मीतूंपणा ॥१६॥
लवण नमूं गेलें जीवनीं ॥ नाठवे मीठ किंवा पाणी ॥ गूळ विचारी गोडी कोठूनी ॥ तेव्हां गोड आपणचि ॥१७॥
प्रभा पुसे दीपालागून ॥ किरण निरखिती रविवदन ॥ आमुचा जन्म जाहला कोठून ॥ ती गति जाहली आम्हांसी ॥१८॥
घटाकाश पुसे नभा ॥ कधीं भेटीच्या द्याल लाभा ॥ चंद्रबिंब चिंतित उभा ॥ कधीं भेटेल चंद्रमा ॥१९॥
पट म्हणे भेटवा तंतूला ॥ तंतु पुसे कापुस कोठें राहिला ॥ तैसें जाहले आम्हांला ॥ वेडावलों आपणातें ॥२०॥
घट पुसे मृत्तिका मज दावणें ॥ नग म्हणे कोठें हरपलें सोनें ॥ कर्पूर स्मरे सुवासाकारणें ते गति जाहली आमुतें ॥२१॥
मत्स्य पुसे उदक दाखवा ॥ मृग विचारी कोठें सुवास बरवा ॥ मैलागर मज उटी लावा ॥ सुगंधाची चांगली ॥२२॥
आम्ही आम्हां चुकलों ॥ देव शोधावया लागलों ॥ श्रीगुरु पाहतांच भेटलों ॥ मी ब्रह्म अनादी ॥२३॥
काय चेटक गुरुपासी ॥ मंत्र फुंकितां श्रवणासी ॥ हस्त ठेवितां शिरासी ॥ अष्टभावें निवालों ॥२४॥
ऐसिया श्रीगुरुराया ॥ काया सांडली ओवाळुनियां ॥ मग चरणरज वंदोनियां ॥ शीतळ जाहलों सर्वांगीं ॥२५॥
गेला गेला भवता ॥ जिराला वासनेचा कल्प ॥ जाहलों स्वरुपीं तद्रूप ॥ आपीं आप कोंदलों ॥२६॥
गुरुसी व्हावया उतराई ॥ पाहतां पदार्थ न दिसे कांहीं ॥ क्षीरसिंधूसी कांजी पाहीं ॥ पाजिल्या काय संतोषे ॥२७॥
लक्ष्मीस वाहिले काचमणी ॥ गंगेस अर्पिलें चंबूभर पाणी ॥ सूर्यापुढें काडवाती लावूनी ॥ चाला म्हणे या प्रभें ॥२८॥
जरी समर्पूं कायेसी ॥ कायेचीं पंचभूतें मिरासी ॥ अर्पण करावें जीवासी ॥ जीवा जीवपण तंव मिथ्या ॥२९॥
आतां उगीच असावें मौन ॥ हेंचि गुरुसी घडे नमन ॥ पुढें बोलावें तें उदकीं लेखन ॥ काय अक्षर उमटेल ॥३०॥
यापरी गुरुची गरिमा ॥ कैचीद्यावया उपमा ॥ आतां वंदोनि पादपद्मा ॥ केला आत्मसंतोष ॥३१॥
यावरी नमून श्रीमहेश ॥ नमून विष्णूब्रह्मयांस ॥ अवघा ब्रह्मींच विलास ॥ भिन्न भिन्न नसे कीं ॥३२॥
नमूं इंद्र चंद्र सूर्य ॥ नमूं वाचस्पती कुबेर ॥ गुरुवर्य नमूं वरुण शुक्राचार्य ॥ सकल सुरा नमन माझें ॥३३॥
नमूं पंच महाभूतां ॥ नमूं पंच प्राण तत्वतां ॥ नमूं इंद्रियां समस्तां ॥ अंत:करणा तुज नमो ॥३४॥
नमूं आलिया नरदेहासी ॥ जेणें साधिलें परमार्थासी ॥ नमूं आप आपणांसी ॥ विवेक ज्ञानासीं नमूं नमूं ॥३५॥
नमूं सकल विश्वजना ॥ समान सम भावना ॥ नमूं धन्य मीतूंपणा ॥ ऐक्य विचारा तुज नमूं ॥३६॥
आतां नमूं संतमंडळी ॥ जे आत्मबोध रंगली ॥ त्यांची सांगेन नामावळी ॥ श्रवणें दुरितें भस्म होती ॥३७॥
नारद कुबेर वरुण यम ॥ शुक्र बृहस्पति इंद्र चंद्र धर्म ॥ सूर्य वसिष्ठ पराशर परम ॥ कवि वाल्मीकी व्यासमुनि ॥३८॥
गौतम विश्वामित्र अगस्ती ॥ शुक सनकादिक शौनक स्थिती ॥ भार्गव कपिल दाल्भ्य काश्यप वरती ॥ भृगु आणि वामदेव ॥३९॥
सुतारी देवल उद्दालक ॥ शमिक जडभरत दत्तात्रेय देख ॥ याज्ञवल्क्य भारद्वाजादिक ॥ मुनि मुद्गल कदर्यू ॥४०॥
(कवि) हरि अंतरिक्ष प्रबोध पिप्पलाय ॥ आविर्होत्र द्रुमिल चमस करभाजन ॥ अत्रि मैत्रय सुत जाण ॥ बृहदश्च ऋषि मार्कंडेयो ॥४१॥
असित देवल दुर्वास वामदेव ऋषी ॥ संजय जैमिनी वैशंपायन उपमन्यु दयेंसी ॥ हरिश्चंद्र इक्ष्वाकु दधीची सुखराशी ॥ भुशुंडी भर्तृहरी पुंडरीक ॥४२॥
ऐल नील अष्टावक्र ॥ सुधन्वा मुचकंद बिभीषण ॥ वाळि सुग्रीव नळनीळ जाण ॥ प्रल्हाद सुदामा बोध क्रोधन ॥ जनक आणि अजामिळ ॥४३॥
चंद्रासह रुक्मांगद अंगद ॥ श्रियाळ मयुरध्वज सिध्द ॥ गजेंद्र आणि गरुड प्रसिध्द ॥ विदुर पिंगल भीष्माचार्य ॥४४॥
धर्म भीम अर्जुन ॥ नकुळ सहदेव सुभद्रा रत्न ॥ कुंतीदमयंती चांगुणेंचें भूषण ॥ गोपाळ गोपिकाप्रिय हरी ॥४५॥
उध्दव यदु अक्रूर परिक्षिती ॥ श्रीयश जटायु जानकी सती ॥ शबरी अनसूया भगवती ॥ भागीरथी आणि भगीरथ ॥४६॥
मैत्रेय अहल्या कमळजा सती ॥ कयाधु अंजनी अरुंधती ॥ लोपामुद्रा रेणुका सावित्री सती ॥ शांडिल्या आणि सुमती ॥४७॥
मंदोदरी गर्भा सुलोचना ॥ रुक्मिणी पद्मा द्रौपदी जाणा ॥ सध्याळी राधिका यज्ञपत्न्या ॥ चंद्रावळी वसुदेव देवकी ॥४८॥
कुब्जा नंद यशोदा ॥ शंकराचार्य भास्कर श्रीधर वरदा ॥ मधुसूदन हस्तामलक प्रबुध्दा ॥ मुकुंदराज जैतपाळ ॥४९॥
मत्स्येंद्र गोरख भर्तरी जोगी ॥ सच्चिदानंद गैनी चौरंगी ॥ याज्ञवल्की कृष्णदास सेवक फकीर जोगी ॥ श्रीनिवास जयदेव निवृत्ती ॥५०॥
ज्ञानेश्वर सोपान मुक्ताबाई चांगया ॥ जालंधर अच्युत गुणालया ॥ खळ सिध्द मैराळ सिध्दसालया ॥ वरवाळ सिध्द नागेश मैनावती ॥५१॥
निपट चर्पट चांद बोधला ॥ संतिदास विक्रम गोपीचंद भला ॥ तारामती रोहिदास मैनावती वेल्हाळा ॥ दामोदर कानिफा नारायण ॥५२॥
मृत्युंजय मालो नरहरी ॥ सांवता विठोबा खेचरी ॥ नाम विठोबा गोदामहादा हरी ॥ परसाभागवत कान्होपाठक ॥५३॥
जनमित्र विठ्ठल गोरा कूलाल ॥ सेना कूर्मदास प्रबळ ॥ त्रिलोचन जनजसवंत बाळ ॥ नरहरि सोनार लतिबा वामन ॥५४॥
बाजिद पठाण दामा नामा ॥ उदासी नानक सदानंदी प्रेमा ॥ रामानंद कबीर कमाल गुरुमहिमा ॥ रामदास जसवंत काको मडका ॥५५॥
शहा हुसेन शाहु शमना ॥ माधो प्रेमानंद मदालसा जाणा ॥ कान्होपात्रा मिरा हरि कृष्णा ॥ जनी बहिणी नागरकुमाई ॥५६॥
मलुकदास ज्ञानसिध्द ॥ रेणुकानंद मैराळ सिध्द ॥ दामाजीपंत भक्तीचा कंद ॥ भर्तृहरी नरसिंह भारती ॥५७॥
नरसीमेहता पंपा पिपा ॥ तुळसी सजनकसाई अनुकंपा ॥ भानुदास जनार्दनीं कृपा ॥ एकनाथ गुरु भक्त रामया ॥५८॥
पुरुषोत्तम चिंतामणी सुगर ॥ मुद्गल भक्त आनंदमूर्ति समिर ॥ अनंतकवि लीलाविश्वंभर ॥ कृष्णदास दिगंबर अवधूत ॥५९॥
मारकोनाथ विश्वंभर विठ्ठल ॥ दासोपंत रामा वल्लभ समकुळ ॥ लोलिंबराज संतोष लिंबया प्रेमळ ॥ गंगाधर कान्होरी मुरारी ॥६०॥
शांतिलिंग कृष्णयोगिराज ॥ सूरदास रामदास तुकोबा महाराज ॥ शेकमहंमद मुधया बोधराज । केशव राघो चैतन्य जयराम ॥६१॥
रंगनाथ कल्याणस्वामी ॥ चंद सखी मानपुरी गुरुपादपद्मीं ॥ उध्दवचिध्दन जगन्नाथ स्वामी ॥ सखाराम शिवराम समर्थ ॥६२॥
मलारी रघुपति निरंजन ॥ जोगा प्रेमा चिन्मयचंदन ॥ प्रल्हाद श्रीधर गोपाळनंदन ॥ अनंत जाहले होती पुढें ॥६३॥
गुप्त प्रगट बाळ पिशाच उन्मत्त ॥ साधक सिध्द गुरु भक्त मुक्त । ज्यांची नावें श्रवणपुटांत ॥ पडतां नाश दोषांचा ॥६४॥
ईश्वर तो महासागरु ॥ संतमेघ तो उदारु ॥ समुद्रापरीस मेघांचा उपकारु ॥ विशेष होय विश्वातें ॥६५॥
जगदीश परीस देख ॥ त्यापासोन संत जाहले कनक ॥ परिसा परीस कांचन देख ॥ उपयोगा येत जगासी ॥६६॥
ईश्वर वैश्वानराचा डोंगर ॥ संतदीपक चालवी विश्वव्यवहार ॥ श्रीमंताचा मंत्री चतुर ॥ राज्यभार चालवी ॥६७॥
ईश्वर गुप्त तो जगास पाहून ॥ संत दयाळू देती दर्शन ॥ देव पाहे भक्त अभक्त लक्षण ॥ संत समान सर्वांसी ॥६८॥
हिरण्यकशिपु रावण वैरी ॥ ज्यातें देव कोपोनि मारी ॥ प्रल्हाद बिभीषण शरण पायांवरी ॥ संकट वारुन संरक्षी ॥६९॥
तैसे नव्हेति संतसाधू ॥ समसमान ज्यांचा बोधू ॥ न धरिती कवणातें विरोधु ॥ सदा स्वानंदु ॥ सर्वांसी ॥७०॥
यालागीं संतमहिमा अचाट ॥ नामें उडे भवबोभाट ॥ तुटे कर्माचें कचाट ॥ भरे पेंठ मोक्षाची ॥७१॥
शिरीं घेऊनि संतपादुका ॥ धुवोनि प्यालों पादोदका ॥ तेणें कोटीतीर्थे देखा ॥ प्राप्त जाहलीं आम्हांसी ॥७२॥
जगाचे पाषाण जीव निर्जिव ॥ आमचे संतसजीव जीव ॥ करुं पूजेचा गौरव ॥ जीवेंभावें ओंवाळूं ॥७३॥
संतनामाची गुंफोनि माळा ॥ आवडीं घालितसों आपुल्या गळां ॥ नित्य नूतन तेजागळा ॥ कदा कल्पांतीं सुकेना ॥७४॥
संतचरणीचें घेऊनि रज ॥ भाळीं लावितां सहज ॥ तेणें जाहलों तेज:पुंज ॥ गेले त्रिताप शुध्द मी ॥७५॥
आमची तों हेचि बुध्दी ॥ जें मिळावें संतांचें पदीं ॥ जैसा वोहळ मिळे महा नदी ॥ सिंधुमिळणीं सार्थक कैचें ॥७६॥
वत्स गाईचेनि संगें ॥ सुखें हिंडे निर्भय मागें ॥ तेवी आम्हीं संतसंगें ॥ क्रीडा करुं आनंदें ॥७७॥
संत आणि इतर जन ॥ कैस होती समसमान ॥ ज्यांसाठी नारायण ॥ पाठोपाठीं धांवत ॥७८॥
कुग्राम आणि द्वारका ॥ सौंदणीं समान सारिखा ॥ समुद्रप्राशनीं घोर कां ॥ अगस्तीसी लागला ॥७९॥
सामान्य स्त्री आणि पतिव्रता ॥ खद्योत आणि शार्वरहता ॥ विवशी आणि शिवकांता ॥ भिल्लटी रंभा सारिख्या ॥८०॥
समुद्र आणि डबक ॥ राजहंसासमान बक ॥ मयूरपंक्तिसीं कैसा काक ॥ विरोळा शेषासम कैसा ॥८१॥
मेरु आणि वारुळ ॥ गरुडासारिखें झुरळ ॥ हनुमंतापुढें अखयाचें बाळ ॥ धेनु शुनी सारिख्या ॥८२॥
राम आणि रावण ॥ धर्म आणि दुर्योधन ॥ कंस आणि श्रीकृष्ण ॥ भीम आणि कीचक ॥८३॥
निंबोळी आणि आंबा ॥ गाडगा आणि तुंबा ॥ गोंधना आणि दाळिंबा ॥ भोंकरा सम सीताफळें ॥८४॥
रूईदोडे आणि केळांची फणी ॥ कांचखडे आणि स्यमंतमणी ॥ गोरक्ष शब्द वेदवाणी ॥ व्यासासमान शारीर कवी ॥८५॥
वेश्या वन्हि आणि नदीचें पाणे ॥ लष्कर कलार शिंपी वाणी ॥ राव सोनार मरगट कुंटणी ॥ यांचा विश्वास मनीं धरुं नये ॥८६॥
आतां किती उपमा द्यावी ॥ जगा संतांची द्यावी पदवी ॥ कान फाडोनी उदंड जोगी मिरवी ॥ तरी काय होती गोरक्ष ॥८७॥
अंतर साधु जगास ॥ जेवी इक्षुरस एरंडरस ॥ चंद्रमा आणि चांदणीस ॥ कां महेश आणि जंगम ॥८८॥
ब्राह्मण आणि गुरव ॥ ब्राह्मण आणि भार्गव ॥ यादव आणि माधव ॥ नातरी नारद आणि इतर चाड ॥८९॥
यापरी संतांची बरोबरी ॥ जनास केलिया न होय सरी ॥ विषयीं लंपट ब्रह्मचारी ॥ योग्यता समान होईल ॥९०॥
सिंह आणि लांडगा ॥ भला आणि दांडगा ॥ स्थिर आणि उंडगा ॥ षंढ गोवी मर्दासम ॥९१॥
वोंवा जिरे सारिखी ॥ भागीरथीसम वोहळ कीं ॥ प्रतिमा पायरी पाषाण कीं ॥ पूज्य समान होतील ॥९२॥
जे राम वानर ॥ तेचि गोपाळ समग्र ॥ कलियुगीं तेचि अवतार ॥ संतरुपें प्रगटले ॥९३॥
वानर गोपाळ नसतां वेदाधिकारे ॥ पुराणीं वाजले त्यांचे नगारे ॥ तेवीं संत बहुयातींत खरे ॥ राबे देव त्यांचें घरीं ॥९४॥
अगाध संतांचें महिमान ॥ गर्जे कीर्तिघोष कीर्तन ॥ नामें रंगलें विश्वाचें वदन ॥ परिसोनि विस्मयो सुरांसी ॥९५॥
म्हणे निवेदिलें संतांसी ॥ सख्यभक्ति श्रीरामासी ॥ अंतीं जिवलग कृष्णासी ॥ गोपाळ त्यांचा प्राणसखा ॥९६॥
यालागीं राम तोचि कृष्ण ॥ कृष्ण तेचि संत जाण ॥ संत गुरु तैं तत्समान ॥ भिन्नभेद असेना ॥९७॥
रामकृष्ण संतगुरु ॥ एकस्वरुप हा निर्धारु ॥ निर्गुण सगुण जगदाकारु ॥ गोठलें ब्रह्म एकचि ॥९८॥
एक ब्रह्म ठसावयासी ॥ शरण जावें श्रीगुरुसी ॥ जेणें चुके चौर्‍याशीं ॥ मुक्त होय जीवदशा ॥९९॥
सर्वशास्त्रांचें संमत ॥ गुरु करावा समर्थ ॥ ज्यापासी ज्ञान अद्भूत ॥ प्रतापी गुरु तो एक ॥१००॥
ज्याचा गुरु असे काबाडी ॥ त्याचें दैन्य कोण फेडी ॥ सहज जगाचे तोंडीं ॥ शब्द निघे बोलतां ॥१॥
उगीच केली फुंकाफुंकीं ॥ मंत्रक्रियेंत चुकाचुकी ॥ जेवीं पोरें खेळती एकीबेकी ॥ एकी ना दोन कळेना ॥२॥
यालागीं गुरु गवाळी न करण ॥ गुरु करावा ज्ञानसंपन्न ॥ जो तोडी तत्काळ बंधन ॥ शरण होतां शिष्यासी ॥३॥
निगुरे बुरसे अमंगळ मानस ॥ गुरुमार्गी पवित्र सर्वांस ॥ निगुर्‍याचे पाहों नये मुखास ॥ गुरुमार्गियाचे पाय वंदावे ॥४॥
एक गुरु असतां दुसरा करावा ॥ हाहि संशयाचा गोंवा ॥ मुळीं एकचि गुरु आघवा ॥ दोन कोठें सृष्टींत ॥५॥
दत्तात्रेयें चोवीस गुरु केले ॥ पंचविसावें नरदेह नेमिले ॥ तेव्हा ते काय श्रेष्ठ जाहले ॥ किंवा वंद्य सर्वांसी ॥६॥
गुरु एक परब्रह्म ॥ ऐसें गुरुगीता बोले वर्म ॥ सकळ धर्मांचा पैं धर्म ॥ गुरु ब्रह्म सिध्दांत ॥७॥
गुरुभक्त जो तद्रूप ॥ त्यासी जगचि अवघें गुरुरुप ॥ अस्तमाना गेला कल्प ॥ उदय जाहला एकचि ॥८॥
घालितां गुरुकृपेचे अंजन ॥ जनचि दिसे जनार्दन ॥ उडे भेद भ्रांति अज्ञान ॥ ठसे सर्व ब्रह्मही ॥९॥
महाभाग्य गुरुचें घरीं ॥ नका सांडून होऊं भिकारी ॥ संसार सोसा माझारीं ॥ किती घ्याल भव ओझें ॥११०॥
म्लेंच्छराज्याभीतरीं ॥ हिंसा घडे घरोघरीं ॥ हा काय दोष कर्म अघोरी ॥ ज्याचें गांवीं नसे कीं ॥११॥
एक उंबर फळ भक्षितां ॥ लक्षजीवांची होय हत्या ॥ हा लोकांच्या चित्ता ॥ कांहीं उमज सुचेना ॥१२॥
गेला पिता आजा पणजा ॥ मरे कन्या पुत्र भाजा ॥ ऐशा काळाच्या मौजा ॥ पाहोनि डोळे झांकिती ॥१३॥
देण्याघेण्याची राखिती सई ॥ आठव नाहीं मसणखाईं ॥ या गोष्टीची लाज नाहीं ॥ स्वस्थ बसती लोक कैसे ॥१४॥
दिवसां व्यापारांत करिती वणवण ॥ रात्री स्वप्नांत फिरे भ्रमण ॥ अवघ्या जिण्याची जाहली भणभण ॥ मरण शेवटीं चुकेना ॥१५॥
पिता असोनि समुद्र ॥ बहिण लक्ष्मी मेहुणा श्रीधर ॥ शंख भीक मागे दारोदार ॥ संचितासीं काय करील ॥१६॥
दुर्योधन सार्वभौम नृपवर ॥ कृष्ण विदुर बोधकर्ते थोर ॥ केला सर्व गोत्रसंहार ॥ संचितासी काय करील ॥१७॥
पोटीं जन्मला राम अवतार ॥ वसिष्ठ गुरु शिरावर ॥ दशरथासी शोकसागर ॥ संचितासी काय करील ॥१८॥
रामासारिखा भर्ता ॥ राजा जानकीचा पिता ॥ कारागृहीं जानकी सचिंता ॥ संचितासी काय करील ॥१९॥
राया द्रुपदाची कुमरी ॥ पांच पांडव असती शिरीं ॥ दुर्योधन सभेस उभी करी ॥ संचितासी काय करील ॥१२०॥
ज्याच्या पुण्याची विशाळ थोरी ॥ पुराणें सांठविती ब्रह्मांड-भांडारीं ॥ तो हरिश्चद्रंराजा डोंबाघरीं ॥ संचितासी काय करील ॥२१॥
अर्जुनासारिखा प्रचंड पिता ॥ कृष्णासारिखा मामा असतां ॥ अभिमन्यूस जयद्रथें मारिली लत्ता ॥ संचितासी काय करील ॥२२॥
पोटीं जन्मला वनमाळी ॥ मायबापें पडलीं बंदीशाळीं ॥ शरपंजरीं पडिला भीष्म बळी ॥ संचितासी काय करील ॥२३॥
व्यासासी माता ढीवरी ॥ परीक्षितीस सर्प दंश करी ॥ मांडव्य ऋषि शूळावरी ॥ संचितासी काय करील ॥२४॥
पांडव राजे हस्तनापुरींचे ॥ जाहले सेवक विराटाचे ॥ अर्जुनास श्रृंगार वनितेचे ॥ संचिताचे काय करील ॥२५॥
पवित्रतनु चंद्रसूर्याची ॥ त्यांस पीडा राहुकेतुंची ॥ भगेंद्र शरीर इंद्राची ॥ संचितासी काय करील ॥२६॥
गाय पवित्र ब्राह्मण पूजी ॥ विष्ठा भक्षी मुखामाजी ॥ ब्रह्मयासी मृत्युलोकीं कोणी न पूजी ॥ संचितासी काय करील ॥२७॥
धर्म नल पुण्यशील ॥ वनीं कष्ट भोगिती प्रबळ ॥ भुजंग जाहला नहुषभूपाळ ॥ संचितासी काय करील ॥२८॥
भागीरथी शिवाचें शिरीं ॥ जिला वंदिजे समस्त सुरीं ॥ ते शंतनूची जाहली नारी ॥ संचितासी काय करील ॥२९॥
पिता दोघे पुत्र निमाले ॥ आपणा वैधव्य वोढवलें ॥ सत्यवती शोक करी लोळे ॥ संचितासी काय करील ॥१३०॥
शुक्राचार्याची देवयानी ॥ जाहली ययातीची कामिनी ॥ कवीचा नेत्र फुटला बळीचें यज्ञीं ॥ संचितासी काय करील ॥३१॥
संचित प्रारब्धाचा ठेवा ॥ तैसाच भोग घडे मानवां ॥ थोरथोरांसी पडला गोंवा ॥ इतरांचा पाड कायसा ॥३२॥
देव घेतसे अवतार झोले ॥ मग इतर मनुष्यांचे काय चाले ॥ साधुसंत भले भले ॥ तेही पडती पेंचांत ॥३३॥
कर्मे राम वनांतरीं ॥ कर्मे कृष्ण करी चोरी ॥ कर्मे विष्णु बळीचें द्वारीं ॥ कर्मे देव बंदी रावणाचे ॥३४॥
कर्मे पांडवा वनवास ॥ कर्मे यादवांसी नाश ॥ कर्म पीडी मारुतीस ॥ पार्थरथीं बैसविला ॥३५॥
कर्म विश्वातें आटीं ॥ कर्म लागलें देवांचे पाठीं ॥ अचाट कर्माची गोष्टी ॥ मारी मिठी सोडीना ॥३६॥
कर्मे क्षार समुद्र ॥ कर्मे क्षयरोगी चंद्र ॥ कर्मे सगर समग्र ॥ भस्म जाहले कपिलशापें ॥३७॥
कर्मे शिवास लिंगपतन ॥ कर्मे नारदाची नारदी जाण ॥ कर्मे पीडिलें ऋषि तपोधन ॥ इतरांचा केवा तो किती ॥३८॥
कर्मे संचित प्रारब्ध ॥ तिघांचे सांखळीचा भारी बंद ॥ यासी तोडी ऐसा मर्द ॥ सद्गुरुवांचूनी असेना ॥३९॥
संचितप्रारब्धाची बेडी ॥ प्रतापें सद्गुरु एक तोडी ॥ ज्यापासी ज्ञानकुर्‍हाडी ॥ तोही तो कर्मवृक्ष समुळींसी ॥१४०॥
हा लटिकाचि संसार ॥ जैसा भरे प्रहर बाजार ॥ काय स्वप्न साचार ॥ दिसे भास भलताचि ॥४१॥
जैसें स्वप्नीं तैसें जागृतीं ॥ यांत कर्तृत्वें काय साच असती ॥ दिवसां निजतां अवघी रीती ॥ वोस दिसे सर्वही ॥४२॥
काय दुर्बळाची काहाणी ॥ परिसोनी संतोष होय मनीं ॥ किंवा सिंदीच्या प्राशनीं ॥ दर्प उठे मुखांत ॥४३॥
फुसका कळों आला संसार ॥ सावध होणें हा श्रेष्ठाचार ॥ कांहीं एक नेम निर्धार ॥ धरिल्या बरें होतसे ॥४४॥
पादरक्षासह थाळींत पाय ठेवून ॥ नाडियावर चाले कोल्हाटीण ॥ लोक पाहती तिजलागून ॥ तिचें लक्ष दम धारणीं ॥४५॥
घागरीवरी घागरी ठेवूनि गुर्जरी ॥ हात मोकळे चाले झडकरी ॥ सखियांसी नाना गोष्टी करी ॥ परी लक्ष कुंभीं असे ॥४६॥
चकोरी फिरे वनांतरीं ॥ लक्ष ठेवी चंद्रावरी ॥ कर्कोची चार्‍यासि जाय दूरी ॥ पिल्यांवरी ध्यास तिचा ॥४७॥
चातक गगनामाजी फिरे ॥ लक्ष मेघोदकीं भरे ॥ गाई रानामाजी चरे ॥ हेत वत्सापासी असे कीं ॥४८॥
मयूर लक्षी मेघांसी ॥ सिंह अवलोकीं गजासी ॥ हंस लक्षी मुक्तांसी ॥ मीन पाण्यासी सोडीना ॥४९॥
यापरी ईश्वरीं लावूनी लक्ष ॥ संसारीं असावें दक्ष ॥ उपडोनि कल्पनेचा पक्ष ॥ मोक्षपदीं बैसावें ॥१५०॥
भाग्यवंताचें मंदिर पाहिलें ॥ त्यांत दरिद्री प्रवेशले ॥ सुरेख पाहोनि संतोषलें ॥ आशा नसे त्या घरीं ॥५१॥
तैसा संसार आपुला नव्हे ॥ तेथें कासयासि लोभावें ॥ उगाचि तमाशा जावें ॥ वस्ती करुं सारखें ॥५२॥
वृत्तींचा करावा उपरम ॥ धारणा असावी सदा सम ॥ विश्वीं न पाहावें विषम ॥ हें वर्म श्रीगुरुचें ॥५३॥
सर्व साधनांचें सार ॥ सत्याचा धरा निर्धार ॥ महा सूर ॥ मान्य करिती हरिहरां ॥५४॥
सत्यसंरक्षणीं जो नर ॥ त्यासी मानी सर्वेश्वर ॥ सत्यावर संतोषे सहस्त्रकर ॥ सत्यास देव राजी असे ॥५५॥
सत्याएवढें नाहीं तप ॥ असत्याएवढें नसे पाप ॥ सत्यस्वरुपीं करी तद्रूप ॥ असत्य घाली नरकातें ॥५६॥
सत्य तारी असत्य बुडवी ॥ सत्यवादी रवा काढोनि दावी ॥ असत्यासी दिवाण नागवी ॥ काळे तोंड दावीना ॥५७॥
सत्याएवढा जप नसे ॥ सत्यासारिखा मैत्र न दिसे ॥ सत्यापासीं देव वसे ॥ असत्य नाशी सर्वहि ॥५८॥
सत्य संरक्षी श्रीराम ॥ वन सेवी पुरुषोत्तम ॥ सत्यधारी महा भीष्म ॥ ब्रह्मचर्यें वर्तला ॥५९॥
हरिश्चंद्र तारामती ॥ सत्य धरिती पुराणीं कीर्ती ॥ सत्यापें चारी पुरुषार्थ राबती ॥ मुक्ति तिष्ठती सतापासीं ॥१६०॥
सत्यशीलनलराजा ॥ सत्येंची धर्मराजें लाविली ध्वजा ॥ सत्यवादी अंबरीषाच्या काजा ॥ अवतार घेणें पडलें हरीतें ॥६१॥
सत्य संरक्षी शकुंतला ॥ जाहली वंशवल्लीची माला ॥ रुक्मांगद धर्मांगद पुण्याथिला ॥ केला वंशीं उध्दार ॥६२॥
सत्यरेखा वोढी लक्ष्मण दीर ॥ सीता वोलांडितां दु:खाचे डोंगर ॥ असत्य वदतां युधिष्ठिर ॥ अंगुष्ठ त्याचा गळला ॥६३॥
अवघ्या मंत्रांत पडे फेर ॥ नामामाजी भिन्न प्रकार ॥ सत्य सर्वांसी साचार ॥ नसे भेद सत्यापासीं ॥६४॥
एकएक मताचे ठायीं ॥ नामक्रिया भिन्न पाहीं ॥ ज्यास मानिती सर्वही ॥ सत्य सर्वांसी पाहिजे ॥६५॥
कैसाहि असो मतवादी ॥ सत्यासि वंदी आदी ॥ सत्यासि कोण निंदी ॥ ऐसा पंथ असेना ॥६६॥
अठरापगड यातींत ॥ सत्य मिरवे महा समर्थ ॥ सत्य धरितां तरले बहुत ॥ सत्य सर्वांचें मस्तकीं ॥६७॥
सत्याचा प्रताप गहन ॥ सत्यापासी नारायण ॥ सत्य संतांचें जीवन ॥ तोडी बंधन भवाचें ॥६८॥
सत्यापासी वसे धर्म ॥ सत्यापासी वर्णाश्रम ॥ सत्यापासी क्रिया धर्म ॥ स्वयें बोध सत्य कीं ॥६९॥
एक सत्य नसतां जवळ ॥ अवघा परमार्थ टवाळ ॥ संसार तोही बाष्कळ ॥ सत्य क्रिया वांचोनी ॥१७०॥
दरिद्री अथवा सधन ॥ फार लबाडी वदे वदन ॥ मागें पुढें निंदी जन ॥ विश्वास त्याचा न धरिती ॥७१॥
ऐसी ओळखावी लपंडाई ॥ न पडावें असत्याचे ठायीं ॥ सत्यची प्यावी दुग्धसायी ॥ असत्य तक्र यजावें ॥७२॥
सत्य स्वीकारिजे इक्षुरस ॥ असत्य त्यागिजे चुईस ॥ सत्य वसे ज्याचे वाचेस ॥ कोटी तीर्थें सत्यापासी ॥७३॥
सर्व व्रतांचें त्फळ ॥ सत्यापासी वसे अढळ ॥ सत्य पवित्र निर्मळ ॥ सत्य ब्रह्म साचार ॥७४॥
यापरी सत्याचा महिमा ॥ निरुपिला ज्यास नाहीं उपमा ॥ थोडका प्रपंचही तुम्हां ॥ ऐकारे सांगतो ॥७५॥
मागें प्रपंच बहुतां रीतीं ॥ उकलोनि दाविला यथानिगुतीं ॥ पुढें प्रकार पध्दती ॥ गति सांगतों परिसावी ॥७६॥
अवघ्या प्रपंचाचें मूळ ॥ मुख्य महतत्व निर्मळ ॥ तया पासोनि निपजेल ॥ प्रपंचाचें लिगाड ॥७७॥
महत्तत्वापोटीं तामस अहंकार ॥ तो बापासी वेगळा करी संसार ॥ त्याचा पुत्र गगनाचा पसर ॥ तोही बापासी मिळेना ॥७८॥
आकाशाचा वायु लेंक ॥ तोही पित्यास न मानी देख ॥ तो निश्चळ हा चंचल भडक ॥ जाहला प्रपंच सहजचि ॥७९॥
वायुपोटीं वैश्वानर ॥ त्यासी पिता करी वैर ॥ तेजा पोटीं जाहलें नीर ॥ तो पित्यासी दावा धरी ॥१८०॥
उदकापोटीं धरा निर्माण ॥ ते न बोले बैसली रुसोन ॥ वंश एक परी स्वभाव भिन्न ॥ सहज जाहला प्रपंच ॥८१॥
श्रवणाचें कार्यं नेत्र परिसेना ॥ नेत्राचें कार्य घ्राण करीना ॥ घ्राणकार्य वदन चालवीना ॥ जाहला सहज प्रपंच ॥८२॥
हाताचें पाय ऐकेना ॥ पायांची गति शिश्न चालेना ॥ शिश्नाचें कार्य गुद ऐकेना ॥ जाहला सहज प्रपंच ॥८३॥
पंचप्राणांचें पांच फरगडे ॥ पांच वोढिती पांचाकडे ॥ पंच विषयांचे गुंबाडें ॥ एकांत एक मिळेना ॥८४॥
अंत:करण मनांत मिळेना ॥ मन बुध्दीतें मिसळेना ॥ बुध्दि चित्तांत समरसेना ॥ अहंकार मुसंडे भलतीकडे ॥८५॥
प्रपंचाचा झाडा ॥ तुम्हांसी दाविला करुनि उघडा ॥ यानें लाविली पीडा ॥ यासी काय करावें ॥८६॥
अहो ऐका नवल पाड ॥ प्रपंच म्हणिजे जड ॥ कैसा गळां येऊनि पड ॥ हा विचार समजा सज्जन हो ॥८७॥
कोणी एक म्हणतों तमाखु सोडिना ॥ तिणें काय याचा पदर धरिला जाणा ॥ आपुली वासना जाईना ॥ म्हणे गळां पडली काय करुं ॥८८॥
तेवीं प्रचंड जड जाणा ॥ तो गळां पडला सुटेना ॥ जेवीं पाण्यासी हुंबरी घालितां जाणा ॥ पाणी काय भांडे गोपाळांसी ॥८९॥
पृथ्वी मूर्ख आणि जडपण ॥ भिंत ढांसळे मनुष्य पावे मरण ॥ धरणीस असतें जरी ज्ञान ॥ तरी ऐसें न करिती ॥१९०॥
नौकेंत बैसोनि जाण ॥ यात्रेस जाती पवित्र जन ॥ त्यांसि जळ बुडवी आपण ॥ मूर्ख नव्हे ज्ञान कैचें ॥९१॥
वन्हि लागला गृहाप्रति ॥ ब्राह्मण स्त्रिया पुस्तकें जळती ॥ ज्ञान कैचें मूर्ख रीती ॥ म्हणोनि जाळी भलत्यासी ॥९२॥
वायु भरभराट करी ॥ मृत्तिका भरे नेत्रां भीतरीं ॥ उगाचि वाहे गगनोदरीं ॥ समय असमय कळेना ॥९३॥
आकाश अवघे पोकळ ॥ शून्य पसरला निर्बळ ॥ तामस अहंकार मूर्ख केवळ ॥ नसे विचार त्यापासी ॥९४॥
तामस अहंकाराची जननी ॥ महत्तत्व म्हणती तिजलागूनी ॥ तिजपासी अज्ञानाची करणी ॥ किती म्हणोनी सांगावी ॥९५॥
अवसेचे राती ॥ गचकाहुरी पोथी वाचिती ॥ त्यासी अक्षरें न दिसतीं ॥ तैसी जाती महत्तत्वीं ॥९६॥
महत्तत्व म्हणिजे अज्ञान ॥ तेचि अविद्या मूळ जाण ॥ जिच्या लपेटीं भवबंधन ॥ जीव फसले चौर्‍यांसी ॥९७॥
पाहतां अविद्येचे स्वरुप ॥ जैसें खपुष्पाचें रुप ॥ तिचा केवढा खटाटोप ॥ विश्वामध्यें वाढला ॥९८॥
मुलें खेळती जळाचे ठायीं ॥ कोंबडा कोंबडी करिती पाही ॥ तैसी अविद्येची नवाई ॥ काय कौतुक सांगावें ॥९९॥
जेथें कडु बीजाचें आळें ॥ तेथें कैचीं येतील अमृतफळें ॥ तेवीं अविद्या सत्य टवाळ ॥ मग सत्य कैंचा प्रपंच ॥२००॥
आधीं अविद्या एकीं असावी ॥ मग प्रपंचाची करावी उगवी ॥ वांझपुत्राची आणावी ॥ जन्मपत्रिका कोठूनी ॥१॥
बाहुली बाहुल्यांच्या लग्नासी ॥ धटित पुसावें जोशासी ॥ तेवीं लिहितां अविद्येसी ॥ आश्चर्य वाटे कवीला ॥२॥
आम्ही प्रपंच सांगितला ॥ जैसा स्वप्नींचा गलबला ॥ तस्करीं येऊनि घाला घातला ॥ जागृति होतां काय सत्य ॥३॥
वृक्षावरोनि मर्कट पाहे जळीं ॥ दुसरा दिसे बैसला वोहळीं ॥ धरावया झेंप घातली ॥ खाय बुचकुळी जळांत ॥४॥
रानांत आपण आरोळी ठोकली ॥ कडयांत पडसाद उठे तत्काळीं ॥ शस्त्र घेऊनि धांवे उतावेळीं ॥ कोण तेथें पुसतसे ॥५॥
निशीं मार्गी स्थाणु पाहोन ॥ म्हणे चोर उभा धरुन ॥ काठी मारितां बाभुळ ओळखून ॥ आपणचि हांसे आपणातें ॥६॥
सिंहें कुपांत टाकिली उडी ॥ मेलों म्हणोनि हडबळी ॥ तेवीं आपुली कल्पना गाढी ॥ पडे संशय बेडींत ॥७॥
बागुल आला रे आला ॥ मूल भिऊनि दबून राहिला ॥ तो बागुल मारावयाला ॥ कवण प्रयत्न करावा ॥८॥
अगा स्वप्नांत जो असें ॥ त्याच स्वप्न साच दिसे ॥ जागृति जाहलिया कैसें ॥ एकलाचि असे पलंगीं ॥९॥
परी लटिकें हें गारुड ॥ खेळों जाणे तो गांवगुंड ॥ ज्ञानावांचोनि मूढ ॥ काय अनाडी वृथाचि ॥२१०॥
खेळों जाणे तो दाता दांडाईत ॥ अंगासि लागों नेदी हात ॥ या नांव बिरुदाइत ॥ जिंकोनि जाय चौर्‍याशीं ॥११॥
लटिकी चौर्‍याशीं असे ॥ अज्ञान्यासी साच भासे ॥ मृगांबु मृगांसि दिसे ॥ ज्ञात्यास तेथें जळ कैचें ॥१२॥
अधर्म्यासी धर्म दिसेना ॥ दुर्योधनासी सद्भाव असेना ॥ ज्ञात्यासी प्रपंच दिसेना ॥ दोहीचि अवघा अज्ञाना ॥१३॥
गारुडी सर्प हाती धरी ॥ इतर भिऊन पळती दूरी ॥ ज्ञान्यासि पाप नाहीं संसारीं ॥ अज्ञान्यासी पापें वेष्टिलें ॥१४॥
आकाश पृथ्वी दोघें उगीं ॥ मध्यें हिंदोळा खाती तिघीं ॥ उदक वन्हि वायूच्या अंगीं ॥ किती हेलपाटे सांगावे ॥१५॥
ज्याचि वृत्ति सम निश्चळ ॥ तो सुखी सर्व काळ ॥ ज्यासी वासनेचा मळ ॥ त्यासी दु:ख प्रबळ कीं ॥१६॥
आंतिल खुंटयासी दाणा लागला ॥ तो सुखी निश्चळ राहिला ॥ खुंटा मोडितांचि रगडला ॥ पीठ केला जात्यानें ॥१७॥
जो गुरुज्ञान खुंटयासी बैसला ॥ चौर्‍याशींचें जांतें काय त्याला ॥ ज्यानें गुरु खुंटा सोडिला ॥ तो रगडिला काळानें ॥१८॥
जोंधळ्यांच्या ताटांचा रस काढिला ॥ तो कढईंत शिजविला ॥ तेणें गूळ नव्हेचि वहिला ॥ कष्ट होती वृथाचि ॥१९॥
इक्षुरसीं उपजे गूळ ॥ तेवीं ज्ञानीं मोक्ष अढळ ॥ इतर साधनांचें फळ ॥ जेवीं रस कडब्याचा ॥२२०॥
यालागीं आपणासि उमगा ॥ नातरी अवघाचि शिमगा ॥ बळकट गुरुचें पायीं लागा ॥ तेथें दगा दिसेना ॥२१॥
जैसा दारुचा नळा पेटे ॥ एक पडे एक फूल उमटे ॥ तैसें जन्म मरणाचे चपेटे ॥ किती म्हणोनि सांगावे ॥२२॥
पाहतां वृक्षांची जाती ॥ एका पत्रें लागती एका गळती ॥ तैसे संसाराची आवृत्ती ॥ कित्येक फिरती पेंचांत ॥२३॥
यासाठीं भक्तिहीनाचें जिणें ॥ तें दिसों लागे लाजिरवाणें ॥ म्हणोनि ज्ञाते ते धन्य ॥ कितीप्रकारें सांगावे ॥२४॥
हात अन्नातें चिवडिती ॥ ग्रास उचलोनि मुखांत घालिती ॥ हात चिकटतां लीद लाविती ॥ जिव्हा लीद कां स्पर्शेना ॥२५॥
ते जिव्हेंपासी ज्ञान ॥ सर्वरसांसी चवी असे जाण ॥ पदार्थ भक्षूनि आपण ॥ हात मूर्ख त्या चिकट ॥२६॥
ज्ञात्या मुखींसि इतुकें अंतर ॥ नानात्व घ्यावें तुम्ही चतुर ॥ म्हणोनि ज्ञानियांचें घर ॥ सेवणें हें उचित ॥२७॥
ज्ञात्याची पाहोनि समभक्ती ॥ अज्ञान्याची विषय जाती ॥ ज्ञानी फिरंगीचें मोल करिती ॥ मूर्ख करी मेणाची ॥२८॥
शाहणा मधास घेत ॥ मूर्ख बाकस  संग्रहीं करीत ॥ मध रुपया शेर विकित ॥ मेणाची किंमत पैसा शेर ॥२९॥
ज्याचें हृदयीं ज्ञान प्रकाश ॥ ज्ञाता त्यासी लक्षीतसे ॥ मूर्ख पुसे यातीस ॥ उंच किंवा नीच कीं ॥२३०॥
अवघीं एक्या मातीचीं मडकीं ॥ त्यांसी उंच नीच काय पारखी ॥ रांजणांत विटाळ उदकीं ॥ न दिसे स्पर्श सर्वांचा ॥३१॥
अग्नि सदा सोंवळा ॥ पारुसपण नसे नदीला ॥ अमृत साजुक शिळें बोला ॥ हे काय परीक्षा पाहण्याची ॥३२॥
गाय तांबडी काळी पांढरी ॥ तैसीं दुग्धाचीं रंगें नाहीं जाहलीं ॥ मोगरा चांफा गुलाब फुलीं ॥ सुगंधीं रंग नसे कीं ॥३३॥
पक्षी पांढरीं आणि काळीं ॥ परी भेद न दावी साउली ॥ पंचरंगाची आप्तगरी केली ॥ छाया उमटे एकचि ॥३४॥
अंगुष्ट तर्जनी मध्यम कनिष्ठिका ॥ सहित पांच अंगोळिका ॥ परी कर एकचि देखा ॥ नसे लेखा दूसरा ॥३५॥
नदी उगमीं स्थिर असे ॥ मध्येंच खळखळ वाहत दिसे ॥ कुलालचक्र गरगरां फिरतसे ॥ वरी मडकें स्थिर कीं ॥३६॥
चंद्राचें अंगीं श्वेतशामिका ॥ राशी नवाळीं मिरवे देखा ॥ कळा तुटती वाढती देखा ॥ चंद्र निर्मळ अद्वैतपणें ॥३७॥
लेखणीचें कांडें एक असे ॥ लिहितां रेषा एक उमटतसे ॥ मध्यें दोन जिभा चिरल्यादिसे ॥ इतुकेन भेद कल्पना ॥३८॥
पाहतां मुळीं कांडें एक ॥ शेवटीं रेषा उमटे एक ॥ मध्यें द्वैत दावी देख ॥ प्रमाण काय मानावें ॥३९॥
चाककणा बैल फिरे ॥ विहीर तों बैसलीसे स्थिर ॥ रात्रंदिवस वाहे नीर ॥ दरडी उग्याचि असती ॥२४०॥
अभ्र वाहे निरंतर ॥ मुलें म्हणती पळतो चंद्र ॥ जातें फिरे खुंटा स्थिर ॥ नक्षत्रें फिरती नभ अचळ ॥४१॥
देह प्रारब्धें हिंड ॥ आत्मा तो अचळ अखंड ॥ बैल चाले लाट हेलपाटे उदंड ॥ घाणा उगाचि फिरेना ॥४२॥
म्हशीचीं शिंगें वांकडीं ॥ दुधांत काय पडतसे अडीं ॥ तैशी कमान वांकुडी ॥ तीर नीट असें कीं ॥४३॥
अक्षर मातृका वांकडी ॥ वाचेसि काय पडतसे अडी ॥ पोरें खेळती वाघुकी ॥ बहु रेषा करी चिरा ॥४४॥
त्रिगुणीं गुंफिले जन ॥ यालागीएं स्वभाव त्यांचा भिन्न ॥ साधु पाहाती समान ॥ गुणस्वभाव त्यागूनी ॥४५॥
द्रुमीं वांकडियां फार शाखा ॥ परी वृक्ष एकचि देखा ॥ तेवीं विश्वाचिया वर्तणुका ॥ विश्वंभर स्वयं असे ॥४६॥
यालागीं अद्वैतभक्ती ॥ करितां लाभे सुख विश्रांती ॥ हेचि कवीची विनंती ॥ भक्ति श्रेष्ठ सर्वांसी ॥४७॥
भक्तीस नलगे वर्णाश्रम ॥ जो आचार तो उत्तम ॥ ऐसा वदे पुरुषोत्तम ॥ गीतेमाजी स्वमुखें ॥४८॥
भावें वंदितां संतांचें मोचे ॥ भक्तीनें नीचाचे जाहले उंचे ॥ दोष जावया जन्मांतरींचें ॥ आन उपाय असेना ॥४९॥
भाव तेथें भक्ती ॥ भाव तेथें मुक्ती ॥ भावापासी घडे विश्रांती ॥ भाव कारण सर्वांसी ॥२५०॥
भावासाठीं रघुवीरें ॥ घेतलीं शबरीचीं बोरें ॥ पांचाळीच्या शाकापत्रें ॥ तृप्त केलें सहस्त्रऋषी ॥५१॥
भावें सुदाम्याचे पोहे भक्षी ॥ भावें पांडवांसी वनीं रक्षी ॥ देव भाविकासी रक्षी ॥ राहे अक्षयी भावापासी ॥५२॥
भावें उग्रसेनाची वारिली पीडा ॥ भावें कुब्जेचा घेतला विडा ॥ भावें रुक्मिणीसी जाहला जोडा ॥ भावें किरातपुत्रा विद्या फळली ॥५३॥
भावें बिभीषणाला लंकाभुवन ॥ भावें मारुती चिरंजीव जाण ॥ भावें गजेंद्र उध्दरण ॥ नक्र ही नेला तयासवें ॥५४॥
भाव तेथे शांती ॥ भाव तेथें विरक्ती ॥ भावापासी पुरुषार्थ राबती ॥ भाव तेथें क्षमा वसे ॥५५॥
भावापासी वैराग्य ॥ भावापासी सिध्दयोग ॥ भावापासी महाभाग्य ॥ सर्व लाभ भावापासी ॥५६॥
भावापासी तीर्थें व्रतें ॥ भावापासी धारण ज्ञान वर्तें ॥ भाव धरितां होती मुक्त ॥ न लागतीं इतर साधनें ॥५७॥
यालागीं असावा मुख्य भाव ॥ भावापासी परमार्थगौरव ॥ परमार्थीं संतांचा समुदाव ॥ संत तेथें देव तिष्ठे ॥५८॥
आमुचे देव ते संत सेवा ॥ याहूनि लाभ न दिसे बरवा ॥ घरीं बैसल्या मोक्ष ठेवा ॥ देती संत दयाळू ॥५९॥
संत आमुचें देवतार्चन ॥ संत पादुका आमुचें पूजन ॥ करुं सतांचें पूजन स्मरण ॥ निवारुं कोटि दुरितांसी ॥२६०॥
संतसेवा अनुष्ठान ॥ संतसंगें वैकुंठ जाण ॥ संत तेथें आनंदघन ॥ निवे अष्टांग सर्वदा ॥६१॥
संतकृपावर्षाव घन ॥ होतां शहामुनी हर्षपावन ॥ आनंदें करी उड्डाण ॥ वृत्ति पुच्छ पसरोनी ॥६२॥
इति श्रीसिध्दांतबोधे भाववर्णनें पंचत्रिंशत्तमोध्याय: ॥३५॥ अध्याय ॥३५॥ ॥ ओव्या ॥२६२॥

N/A

References : N/A
Last Updated : November 22, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP