मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|सिध्दान्तबोध|
अध्याय ४२ वा

श्रीसिध्दान्तबोध - अध्याय ४२ वा

‘श्रीसिध्दान्तबोध’ हा संतकवि श्रीशहामुनि यांचा ग्रंथ म्हणजे मराठी साहित्याच्या खाणींतील एक तेजस्वी हिरा आहे.


श्रीगणाधिपतये नम: ॥ श्रीगुरुदत्तात्रेयाय नम: ॥
श्लोक ॥ नमो निर्गुणा हे परा देवदत्ता ॥
जगीं सर्वही जाण तूझीच सत्ता ॥ तुझा दास मी देईं सद्भक्तिभावा ॥ कृपें ग्रंथ हा तूंचि सिध्दीस न्यावा ॥१॥
जय जय जगदीश ज्योतिप्रकाशका ॥ त्रैलोक्यस्वामी जगव्यापका ॥ एकीं अनेका अनेकीं एका ॥ कोण लेखा लेखी तुज ॥१॥
लय लक्षाहूनि अलक्ष ॥ तेथें कोण योजावा पूर्वपक्ष ॥ ध्येय ध्याता म्हणावा दक्ष ॥ कोणा साक्षी पुसावी ॥२॥
करुन ब्रह्मांड सपाट ॥ आकाशावर केली पायवाट ॥ चढलों महाशून्याचा घाट ॥ नि:शून्या ठाव दिसेना ॥३॥
फुटलें आकाश चौठायीं ॥ मुक्ताफळें विखुरलीं ठायीं ठायीं ॥ प्रकाशलें चांदणें दिशा दाही ॥ सूर्याविण प्रकाश कोंदला ॥४॥
नेत्रींची सजूनि बाहुली ॥ अर्धचंद्रींचें अंजन ल्याली ॥ बिंदु शेल्याची बुंथी घेतली ॥ स्वयें मिरवली निजशून्यीं ॥५॥
अखंड लागल्या पर्जन्यधारा ॥ तिळभरी कोठें न भिजे धरा ॥ घुमघुमे नाद गर्जे एकसरा ॥ मन वांहाटोली विराली ॥६॥
आटलें गगन फुटला झरा ॥ विझाल्या वन्ही तापल्या नीरा ॥ मुंगीनें माजेसि बांधिला दोरा ॥ वोढोनि नेलें गडयासी ॥७॥
गाईनें वाघ मारिला ॥ सशानें सिंह गिळिला ॥ मुंगुस गजापाठीं लागला ॥ हरिणीनें धरिला लांडगा ॥८॥
बळें वर्षला पाऊस भिजला ॥ वाटसरु जाताम वाटेस टणकला ॥ निजणार तळीं डोईवर बाजला ॥ गाता मुका ऐकता बहिरटा ॥९॥
बंधु भोगीतसे भगिनी ॥ पुत्र दिसे मात्रागमनी ॥ कन्या निघे व्यभिचारिणी ॥ सून असे चोरटी ॥१०॥
उंटावर बोकड उडाला ॥ सरडें गरुड पछाडिला ॥ कावळीपोटीं हंस जन्मला ॥ टिटवीनें शोषिला समुद्र ॥११॥
चारी मुकीं चारी तोंडाळ ॥ चवघे वाजविणार चार ढोल ॥ चार कोल्हाटणी खेळती खेळ ॥ पांच जागे पांच निद्रित ॥१२॥
एक नारी अकरा भ्रतार ॥ पांच मूर्ख पांच चतुर ॥ एक दांडगा बखेडखोर ॥ करी बंड भलतेंचि ॥१३॥
शेळी व्याली वाघ जाहला ॥ हांसे आलें चिमणीला ॥ हा विलास कवीनें मांडिला ॥ समजावा चतुरांसी ॥१४॥
ग्रंथरचनेचें कौतुक ॥ केला समजावया विवेक ॥ अर्थ शोधिल्या अनुभविक ॥ उगवे भ्रांति मनाची ॥१५॥
मन:कल्पित होय सृष्टी ॥ मन:कल्पित ग्रंथराहाटी ॥ निर्विकल्पीं कैंच्या गोष्टी ॥ ठाव नाहीं शब्दाचा ॥१६॥
परंतु शब्दावांचून ॥ बोध न ठसे जीवालागून ॥ ज्ञान तोही पांगुळ जाण ॥ शब्दांवाचोनी काय ॥१७॥
शब्दीं वेद शास्त्रें पुराणें ॥ शब्दीं गीता भागवत वदणें ॥ मंत्र जप नामस्मरणें ॥ यांचें सूत्र शब्दांत कीं ॥१८॥
शब्दीं शब्द धडकला ॥ शब्द तो अनुभवास मिळाला ॥ शब्दीं कलहो माजला ॥ शब्द तोडी वादासी ॥१९॥
मुळीं शब्द तोचि उल्लेख ॥ उल्लेखीं चाले अवघा लेख ॥ अक्षर मातृका ओंकार देख ॥ शब्द त्यासी श्रृंगारी ॥२०॥
आतां शब्दरत्नांचा श्रृंगार ॥ केला ग्रंथाचा उभार ॥ आतां परिसा इतिहाससार ॥ ऐका तुम्हां सांगतों ॥२१॥
मेरुमाथां वैकुंठ ॥ वाराणसीवर भागीरथीचा लोट ॥ तेवीं पतिव्रतांमाजी श्रेष्ठ ॥ हिरा जैसा कोंदणीं ॥२३॥
दुमगोत्रीं मैलागिरीचंदन ॥ पंचभूतांत जैसें गगन ॥ अक्षरमस्तकीं मिरवे व्यंजन ॥ तेवीं मंडन अनसूया ॥२४॥
सामर्थ्येंचि मायराणी ॥ उभा करुं शके तरणी ॥ क्षमाशील जेवीं धरणीं ॥ धैर्य श्रेष्ठ मेरुपरी ॥२५॥
शुभलोचनी शुभवदनी ॥ सुढाळ सुफळ मंजुळवचनी ॥ शांतशीलता निर्मळजनीं ॥ लावण्य तारुण्य चातुर्य ॥२६॥
विवेक विचार परमार्थ शुध्द ॥ स्वानंदीं आनंदीं आनंद बोध ॥ प्रेमळ प्रांजळ निर्द्वंद्व ॥ अद्वयबोधीं निमग्न ॥२७॥
सर्वसुखाची प्रेमलहरी ॥ सारासार विचारी अंतरीं ॥ विधिसुत अत्रि भ्रतार शिरीं ॥ जो अंकुर ब्रह्मींचा ॥२८॥
ब्रह्मज्ञानाचा कोंभ ॥ हृदयीं पैसे जैसें नभ ॥ चिदाकाशींचा गर्भ ॥ स्तंभ हा धैर्याचा ॥२९॥
तप तरी शिवासमान ॥ वक्तृत्वसहित वेद संपन्न ॥ सखोल समुद्राहून गहन ॥ प्रतापी विष्णूसारिखा ॥३०॥
त्या अत्रिऋषीलागून ॥ अनसूया करी नमन ॥ बोले परम विनयवचन ॥ पुसे खोल अर्थांसी ॥३१॥
म्हणें स्वामी साही शास्त्रें ॥ कां विवादलीं विचित्रें ॥ याचें काय गर्भसूत्रें ॥ वदा वकत्रें आपुल्या ॥३२॥
अत्रि म्हणे ज्ञानखाणी ॥ बोलसी सुढाळ शुभवचनीं ॥ सांगतों शास्त्रांची मांडणीं ॥ वाद जाहला तो अर्थ ॥३३॥
वेदांत या रीतीं वदतसे ॥ स्वरुप निर्गुण निराकार असे ॥ माया प्रपंच्याचा लेश ॥ त्याचे ठायीं नसेचि ॥३४॥
अढळ अचळ कधीं ढळेना ॥ स्वयंभ संचला गळेना ॥ कल्पना इच्छातीत स्फुरेना ॥ स्फुरला नाहीं परब्रह्म ॥३५॥
हें परिसोनि सांख्य वदला ॥ एक परी तरंगु हेलावला ॥ वेदांत म्हणे बट्टा लागला ॥ चळ जाहला स्वरुपीं ॥३६॥
सांख्य वदे वेदांतासी ॥ तूं अद्वैत ब्रह्म बोलसी ॥ तरी एवढया ब्रह्मांडासी ॥ कोणें निर्मिलें सांग पां ॥३७॥
वेदांत म्हणे मृगजळवत् ॥ रज्जूवर सर्पभास उठत ॥ सांख्य म्हणे यांतच द्वैत ॥ रज्जू पाहणार दोन कीं ॥३८॥
यापरी दोघांचे भांडणीं ॥ न्याय बोले दबावूनी ॥ तुम्हांस नुगवे गवसणी ॥ मी सांगतों खरें तें ॥३९॥
दोघेही चुकलां याचे किल्ली ॥ मी सांगतों उगवूनि किल्ली ॥ माया ब्रह्म वेगळीं ॥ अनादिसिध्द असती ॥४०॥
जीव स्वरुपावेगळा ॥ म्हणोनि सुखदु:खें वेष्टिला ॥ वेदांत म्हणे भलाभला ॥ स्वरुप व्यापक कीं एकदेशी ॥४१॥
तूं जरी म्हणसी व्यापक ॥ जीव वेगळां कोठें बैसेल देख ॥ न्याय म्हणे ऐके विवेक ॥ दृष्टांत तूतें सांगतों ॥४२॥
वस्त्र उदक बुडविलें जळांत ॥ उदक व्यापलें वस्त्रांत ॥ वस्त्र उदक नव्हे निश्चित ॥ यापरी व्यापून वेगळा ॥४३॥
पाहोनि तिघांचे झोंबीस ॥ योगशास्त्र बोले त्यास ॥ कोणें पाहिलें ईश्वरजीवांस ॥ उगाचि वितंडवाद कां कारणें ॥४४॥
करावें साधन हेंचि बरवें ॥ ज्यांत जीवांचें सार्थक होये ॥ वेदांत म्हणे कैसा आहे ॥ तोचि दावीं शाहाणिया ॥४५॥
व्यापक ब्रह्म सर्वांठायीं ॥ त्याविण ठाव कोठेंचि नाहीं ॥ जीव स्वतां नीर्मिला देहीं ॥ त्याचा मायबाप कोण तो ॥४६॥
न्याय म्हणे तुम्ही शब्दज्ञान ॥ सांगतां पोकळज्ञान ॥ तरी दावा प्रकाशरुप ॥ उघड डोळां स्वरुप ॥४७॥
उगाच सर्व ब्रह्म बोलतां पाहीं ॥ सामर्थ्य पाहतां कोठें नाहीं ॥ अवघ्या ब्रह्मांडाचे ठायीं ॥ कोणे अंत घेतला ॥४८॥
वेदांत म्हणे तुम्ही अज्ञाना ॥ विश्वविलास ब्रह्मींचा जाणा ॥ लटकी काढोनि कल्पना ॥ ईश्वर म्हणतां न दिसे ॥४९॥
धर्मशास्त्र करी उत्तर ॥ कोणें पाहिलें ब्रह्मांड समग्र ॥ उंच नीच प्रकार ॥ सहज दिसोन येतसे ॥५०॥
तुरुंगासारिखा न दिसे तुरंग ॥ एकसारिखा कैंचा मातंग ॥ विळे वाखर फिरंग ॥ किंमत एक नसे कीं ॥५१॥
मलागिरी बोरी खैर ॥ परिस पाथर हिरा गार ॥ शेला पासोडी प्रकार ॥ एक दरानें विकीती ॥५२॥
साधु आणि दुर्जन ॥ पतिव्रतेसम व्यभिचारीण ॥ वोहळ सरोवर गंगाजीवन ॥ ब्रह्मा कुलाल महतर ॥५३॥
यापरी कर्में उंच नीच ॥ कर्ता दिसे तोचि साच ॥ तुमच्या वादाची कचकच ॥ परिणाम सिध्द नव्हेचि ॥५४॥
ईश्वरें सृष्टि निर्मिली ॥ तेव्हांचि कर्मांची उभारणी जाहली ॥ देवऋषि राक्षस कुळीं ॥ कर्म कोणा सोडीना ॥५५॥
कर्म हरिहरा पेलपटे ॥ कर्माचें अवतार झपेटे ॥ कर्मांचें पेंच मोठे ॥ भोगवी अचाट कष्टासी ॥५६॥
सर्वांसी श्रेष्ठ कर्म ॥ कर्मींच सांपडे परब्रह्म ॥ हेंचि कर्माचें वर्म ॥ कर्तव्य कोणा सोडीना ॥५७॥
कामशास्त्र बोले आपुली सिध्दी ॥ म्हणे तुम्ही अवघेचि खळवादी ॥ नेणा आत्मप्राप्ती सिध्दी ॥ न कळे निधी मोक्षाची ॥५८॥
देहींच आत्मा जाण ॥ सर्व भोग देहापासोन ॥ देह निमाल्या अवघें शून्य ॥ स्वर्ग नरक मिथ्याचि ॥५९॥
यापरी शास्त्रें भांडती ॥ एक एकांत न मिळती ॥ म्हणोनि ज्ञानी सुमती ॥ निवांत राहती निर्द्वंद्व ॥६०॥
शास्त्रें बहु प्रकारें भांडलीं ॥ त्यांत मातृकाचि मिरवली ॥ सर्वांस ओंकार एक मूळीं ॥ बीज वोळखे सुजाणा ॥६१॥
अवघ्यांस मूळ ओंकार ॥ ओंकारास मूळ ब्रह्म साचार ॥ यालागीं धरी निर्धार ॥ अद्वैत खरें मिथ्या ॥६२॥
अनसूया म्हणे शास्त्र गुंती ॥ तुम्ही सांगीतली उकलोनि रीती ॥ पुढें ब्रह्मींची प्राप्ती ॥ कैसी होय तें सांग पां ॥६३॥
गेलें आयुष्य व्यर्थ पाहीं ॥ मन चंचळ आवरत नाहीं ॥ बुडालें संसार-वासनेच्या डोहीं ॥ पुढें दु:ख जन्ममरणांचें ॥६४॥
माया मोह लोभ भारी ॥ काम क्रोध संताप मत्सरी ॥ त्रिविध ताप जाळीतसे अंतरीं ॥ चित्त चक्र फिरे गरगरां ॥६५॥
पुण्य पाहतां पदरीं नसे ॥ कर्म राहाटींत पाप वसलें असे ॥ देहबुध्दी मीपणाचें पिसें ॥ जातसे वय फुकट तें ॥६६॥
प्रपंच कर्दमांत रुतली बुध्दी ॥ पाठीं लागला काळ द्वंद्वी ॥ अल्प प्राप्तीची नसे सिध्दी ॥ पडिले चौर्‍याशीं बंदींत ॥६७॥
संचित प्रारब्धें घेतली पाठी ॥ जीव जाहलासे हिंपुटीं ॥ सुखाचा लेश न दिसे दृष्टीं ॥ जरी नाचे डोईवरी ॥६८॥
चाले शोक सागर लोट मोठा ॥ उसळती संताप-ऊर्मीच्या लाटा ॥ भरला अविदयेचा फांटा ॥ मर्कट चेष्टा वृत्ति करी ॥६९॥
याविषयीं सांगा ज्ञान शुध्द ॥ ज्यांत होय संपूर्ण बोध ॥ लागे निर्विकल्प समाध ॥ नुरे द्वंद्व साधनाचा ॥७०॥
परिसोनि अनसूयेची विनंती ॥ हर्ष पावला अत्रि चित्तीं ॥ म्हणे परिसें विचार सुमती ॥ सांगतों अनुभव उघडाची ॥७१॥
कांहीं एक पश्चात्तांपावांचून ॥ प्रगट होईना ब्रह्मज्ञान ॥ यासाठीं इतिहास सांगेन ॥ श्रवण करीं सभाग्ये ॥७२॥
सोमवंशीं राजा धर्मसेन ॥ त्याची कन्या सुढाळ रत्न ॥ कमळाबाई नांव जाण ॥ जाहली वंशउध्दारणी ॥७३॥
नीट नेटकी चंद्रवदनी ॥ लावण्यलतिका मृगलोचनी ॥ ठाणमाण चातुर्य गुणीं ॥ सभाग्य सुरेख साजिरी ॥७४॥
नूतनदशेचा भर ॥ प्रथम नाहाणाचा प्रकार ॥ चतुर्थदिवशीं लोक समग्र ॥ वोंटभरणा निघाले ॥७५॥
असंख्य बायकांचा थाट ॥ वाजंत्र्यांचा कडकडाट ॥ उठला आनंदाचा लोट ॥ महा समारंभ मांडिला ॥७६॥
त्याचि समयीं एक वार्तिक ॥ वार्तां घेऊनि आला देख ॥ म्हणे तुम्हीं मांडिला हरिख ॥ पति इचा निमाला ॥७७॥
राहिला वादयांचा घुमघुमस्वर ॥ उठला शंखध्वनीचा गजर ॥ खळबळला शोकाचा सागर ॥ वितळला रस सुखाचा ॥७८॥
सहस्त्र करिती रुदन ॥ अवघीं लक्षिती कमळेलागून ॥ तिचें दिसे सहर्ष वदन ॥ आश्चर्य मानिती सर्वत्र ॥७९॥
एक म्हणती शोक न करी कमळा ॥ एक म्हणती सती निघायाला ॥ नेम असेल केला ॥ एक म्हणती पदर काढीना ॥८०॥
एक म्हणती चिंताज्वरें व्यापून ॥ गेली दग्ध अंतरीं होऊन ॥ शब्द खुंटला न बोले वचन ॥ लाही लाही जीवाची ॥८१॥
एक म्हणती दिसे मुखावर तेजगी ॥ एक म्हणती पुसा इजलागीं ॥ आम्ही शोकाचे उद्वेगीं ॥ कोठपर्यंत बैसावें ॥८२॥
एक वृध्द पुसे चतुरी ॥ काय हेत तुझिया अंतरीं ॥ कमळा हांसोनि उत्तर करी ॥ तुम्ही किमर्थ शोकांत ॥८३॥
कोण मेला कोण जन्मला ॥ याचा विचार नाहीं केला ॥ उगाचि शोकाचा गलबला ॥ नेणा विचार मूळींचा ॥८४॥
या पंचभूतां माझारी ॥ कोण पुरुष कोण नारी ॥ आत्मा एक चराचरीं ॥ दुजी परी असेना ॥८५॥
मी जितांचि मेलें पाहीं ॥ कल्पना सती जाहली खाई ॥ ज्ञानाग्नि पेटला देहीं ॥ संचित गोवर्‍या जाळिल्या ॥८६॥
प्रारब्धाची जाहली राख ॥ चित्त विरक्त जाहलें देख ॥ कोण इंद्रियांचा चाळक ॥ त्यासी शोधीं मातींत ॥८७॥
तुम्ही समस्त या गृहाप्रती ॥ मी शोधितें आपुल्या निजपती ॥ जो वारी शोक संतापवृत्ती ॥ करी कल्याण अक्षयी ॥८८॥
मग अनुताप घेऊनि सांगातें ॥ गेली शरण भरद्वाज ऋषीतें ॥ प्रेमभावें करी नमनातें ॥ नाठवे पिता पति बंधू ॥८९॥
बहु हर्षे पिटोनि टाळी ॥ म्हणे आजि दैवदशा उदेली ॥ तूं भेटलासी कृपेची माउली ॥ जाईल सिध्दी मनोरथ ॥९०॥
मज करीं विष्णूची भेटी ॥ बैसवीं निजानंद वैकुंठीं ॥ वारीं त्रिताप कृपादृष्टीं ॥ निवटीं समूळ भवासी ॥९१॥
ईश्वरप्राप्तीकारणें ॥ तुम्ही सांगाल मज साधनें ॥ तीर्थव्रत अनुष्ठानें ॥ माझेन हें घडेना ॥९२॥
स्त्रीदेह माझा यासी ॥ घेतां नये संन्यासासी ॥ नूतनदशा वय मुसमुसी ॥ फिरत नये जगदृष्टीं ॥९३॥
माझा राहे देहधर्म ॥ ऐसें उपदेशा निजवर्म ॥ ध्यान धारणा जप नेम ॥ हें तो मातें असाध्य ॥९४॥
तूं महाराज गुरु समर्थ ॥ मज भेटवीं भगवंत ॥ पूर्ण करीं मनोरंथ ॥ पुन्हा न फिरे भवचक्रीं ॥९५॥
अज्ञानें धरिलें मज नक्रें ॥ त्यासी तोडी ज्ञानचक्रें ॥ वृत्रासुर जेवीं मारिला शक्रें ॥ तेवीं निवटीं अविदया ॥९६॥
कमळा म्हणे पितृघरीं ॥ भिंतीवरी लिहिती चित्र करीं ॥ त्यां पांसी शिकलें कळाकुसरी ॥ चित्ररेखा तद्रूप ॥९८॥
ऋषि म्हणे बहुत बरवें ॥ सांगेन त्यारीतीं वर्तावें ॥ माजघरीं चित्र काढावें ॥ श्रीविष्णूचें सुरेख ॥९९॥
शंख चक्र गदा पद्मेंसी सहित ॥ ठाणमान आनंदयुक्त ॥ घवघवित शोभायमान हर्षयुक्त ॥ दिसे गोजिरा साजिरा ॥१००॥
भाळ ललाट चक्षु श्रवण ॥ गाल नासिक हनुवटी वदन ॥ हृदयीं पदक विराजमान ॥ मांडया पोटर्‍या चरणकमळें ॥१॥
गंध धूप नैवेद्य फल तांबूल दावणें ॥ सद्भावें पंचारती वोंवाळणें ॥ श्री नारायणनाम स्मरणें ॥ अष्टहीभावें नमावें ॥२॥
यापरी ऋषीनें उपदेश केला ॥ कमला हृदयीं बोल ठसावला ॥ मग नमस्कारोनि ऋषीला ॥ गेली गृहासी स्वानंदे ॥४॥
ऋषीनें सांगीतली हतवटी ॥ तैसेंचि चित्र रेखी गोरटी ॥ आल्हाद पावोनि आपुल्या पोटीं ॥ सदा संतुष्ट आनंदमय ॥५॥
यापरी लोटले षण्मास ॥ भेटीस पावला जगदीश ॥ घेऊन ब्राह्मणाचा वेष ॥ कमळेपासी तो आला ॥६॥
कमळेनें करोनियां नमन ॥ उभी ठाकली कर जोडून ॥ देव वदे चित्र काढल्यास ॥ काय होतें सांग पां ॥७॥
म्हणे श्रीगुरु आज्ञा समर्थ ॥ यां भेटेल श्री अनंत ॥ हरि म्हणे अवघें व्यर्थ ॥ फसविलें तुजला गुरुनें ॥८॥
मजसारिखें चित्र काढून ॥ भिंतीवरी दाविसी लेहोन ॥ आतांचि बोलत नारायण ॥ भेटवीन तद्रुप ॥९॥
येरी म्हणे बहुत बरवें ॥ हस्तलाघव माझें पाहावें ॥ जैसा वोतिला रस स्वभावें ॥ नीटनेटका साजिरा ॥११०॥
देवें पालटोनियां वयासी ॥ जाहला वृध्द संन्यासी ॥ मग म्हणे चुकलीसी ॥ मी वृध्द तरुण ॥११॥
अंतरीं सावध होऊन ॥ डोळे पुसोन करी लेखन ॥ येरी विस्मय पावोन ॥ होता तैसा चित्रिला ॥१२॥
देव जाहला जटाधारी ॥ विष्णूनें तुंबा घेतला करीं ॥ म्हणे तूं चुकलीस वो सुंदरी ॥ पाहातीस एक लिहितीस एक ॥१३॥
तुझा माझा जाहला पण ॥ तूतें न साधे हें साधन ॥ आतां बोलता नारायण ॥ तुझे दृष्टी पडेना ॥१४॥
चाकटली कमळा अंतरीं ॥ परम आश्चर्य मनांत करी ॥ याणें केली नवलपरी ॥ गवसावयाचा गवसेना ॥१५॥
मग म्हणे मी स्वामी ॥ उदयां यावें दयाळा तुम्ही ॥ मी गुरुसि पुसोनी ॥ काढीन तुमच्या छबीला ॥१६॥
बरवें म्हणोन गेला हरि ॥ येरी चिंतातुर अंतरीं ॥ खेद पावोनियां भारी ॥ गेली पुन्हा ऋषीतें ॥१७॥
साष्टांग घाली लोटांगण ॥ दीर्घस्वरें करी रुदन ॥ प्रेमभावें गहिंवरोन ॥ बोले मुनीसी तेधवां ॥१८॥
तुम्हा शरणागताची लाज ॥ केलें अनाथाचें काज ॥ मिरवे अभयपणाचा ध्वज ॥ गुरुमहाराज दयाब्धी ॥१९॥
तुम्ही सांगितल्या प्रमाण ॥ करीत होतें नित्य ध्यान ॥ एक सत्पुरुष येवोन ॥ मनोवृत्ति भंगिली ॥१२०॥
म्हणे मजसारिखें काढी चित्रासी ॥ भेटवीन बोलत्या देवासी ॥ तैसीच मी लिहितां छबीसी ॥ पालटोनि दावी अनेक ॥२१॥
म्यां उदयीक नेम केला ॥ पुन्हा देईं दर्शनाला ॥ होय म्हणोनि तो गेला ॥ कळाधारी कौशल्य ॥२२॥
त्यासि उपाव तूं समर्थ ॥ जाणसी ज्ञानभरित ॥ मी तों दीन अनाथ ॥ आश्रय तुमच्या पायांचा ॥२३॥
त्याचा कृत्रिम भाव तूं अटोप ॥ त्याची माझी बैसवी टीप ॥ पुन्हा करी खटाटोप ॥ नुठे कल्प तें करीं ॥२४॥
परिसोनि कमळजेची वाणी ॥ हांसोनि बोले भारद्वाज मुनी ॥ तूं संतोष ठेवीं मनीं ॥ त्याचा हुनेर तो कर्ता ॥२५॥
माझ्या किल्लीची बैसवी तूं आट ॥ पुढे चालेना त्याची चपेट ॥ होय विदया लटपट ॥ ऐसा झपेट तूं खेळ ॥२६॥
तूं होई गांवगुंड ॥ तो किती खेळेल गारुड ॥ मांडी चेडा एक अभंड ॥ त्याचे बंड चालेना ॥२७॥
तूं आपुल्या गृहा जाऊन ॥ कोनाडयांत ठेवीं एक दर्पण ॥ तो आल्यावर जाण धरोन ॥ दावीं चित्र बिंबीचें ॥२८॥
तो जें जें धरील रुप ॥ तें तें दिसेल तद्रूप ॥ त्याचा हुनेराचा कल्प ॥ दमेल या युक्तीनें ॥२९॥
गुरुकृपेची लाहोनि कळा ॥ परम हर्षली राजबाळा ॥ आनंद न माय हृदयकमळां ॥ दर्पण आणोनि ते वेळीं ॥१३०॥
कोनाडयांत मांडिला ॥ संतोष बहु कमळेला ॥ मग वंदोनि चरणकमळा ॥ गेली गृहा स्वानंदें ॥३१॥
उदय पावला वासरमणी ॥ भेटीस पातला चक्रपाणी ॥ कमळा अष्टभावें नमूनी ॥ उभी ठेली बध्दांजली ॥३२॥
कैट भारी म्हणे राजसे ॥ काढी चित्र मज ऐसें ॥ येरी म्हणे म्यां सूरसें ॥ लिहिली तुमची प्रतिमा ॥३३॥
विधिजनक म्हणे मज दावीं ॥ कमळा म्हणे गोष्टी बरवी ॥ माजघरीं कोनाडयांत ठेवी ॥ दर्पणांत दाविली ॥३४॥
निरखोनि पाहे दर्पणांत ॥ साजिरा दिसे मूर्तिमंत ॥ बहु पालटी रुपांत ॥ ठाकठीक रेखिला ॥३५॥
मग हांसला गदापाणी ॥ म्हणे बरवां केली त्वां करणी ॥ जाहलों प्रसन्न तुजलागोनी ॥ मागसी ते देईन ॥३६॥
कमळा म्हणे माझा पती ॥ त्यांसी दयावी तुम्ही मुक्ती ॥ तुझें ध्यान अभयमूर्ती ॥ वसो माझ्या हृदयीं ॥३७॥
तूं जगदीश निगमा ॥ मज पावन केलें पुरुषोत्तमा ॥ ऐसें बोलोनि पादपद्मा ॥ घाली लोटांगण आवडीं ॥३८॥
अभय देवोनि कमळेसी ॥ अदृश्य जाहले हृषीकेशी ॥ अत्रि म्हणे अनसूयेसी ॥ ख्याती केली कमळेनें ॥३९॥
देह वनितेचा असोन ॥ पतीलागोन केलें पावन ॥ आपुलेंही केलें कल्याण ॥ या नांव शाहाणी बोलिजे ॥१४०॥
यालागीं परमार्थासी ॥ अनुताप पाहिजे मानसीं ॥ तेव्हां पावे ब्रह्मपदासी ॥ व्यर्थ चावट कामा नये ॥४१॥
आणीक ऐकें वो सुंदरी ॥ सांगतों मदालसेची थोरी ॥ बोध करुनियां पुत्रीं ॥ केलें समर्थ सिध्दची ॥४२॥
मदालसा म्हणे पुत्रांसी ॥ मृत्युलोकीं दु:खाच्या राशी ॥ जन्ममरण चौर्‍यांशी ॥ पुढें कृतांतदंड दारुण ॥४३॥
वाजे घडियाळ घडोघडीं ॥ आयुष्य जातसे तांतडी ॥ गर्भवास दु:ख नरक जोडी ॥ सांठवण पोतंडी ते फुटकळ ॥४४॥
अवघड दुर्गंधीचा सांठा ॥ टांगला गेलासे पोटांत उफराटा ॥ जठराग्नीचा उकाडा मोठा ॥ बांधिली मोट वारेंत ॥४५॥
महा दुर्गंधीं योनींतून ॥ जन्मला त्यासें वागविसी भूषण ॥ बाल्य तारुण्य आपण जाईल निघोन ॥ जरा बैसेल मस्तकीं ॥४६॥
येईल मरणाची हुडहुडी ॥ काळ चावील जैसी कांकडी ॥ किती फिरसी युगाच्या चौकडी ॥ द्यावया दडी जगीं मिळेना ॥४७॥
संसार घोर महादारुण ॥ चिंताज्वरें व्याकुळ मन ॥ बहुऋणाची कांचण ॥ देत त्रास दारा पुत्र ॥४८॥
उठती रोगांचे बंबाळ ॥ जीव होईल महाव्याकुळ ॥ मग त्रासूनि करिसी हळहळ ॥ शोक संताप करील दग्ध ॥४९॥
पडेल मोहाची फांसोटी ॥ जीव होईल फार कष्टी ॥ भोगिसी दु:खाच्या कोटी ॥ धोपटील मृत्यु निर्दयी ॥१५०॥
आतां धरा शहाणपण ॥ स्मरा चित्तीं चैतन्य नारायण ॥ तुमचें होईल कल्याण ॥ आशीर्वादें माझिया ॥५१॥
विषयभावना करा वमन ॥ विकल्प धुवोनि राखा सुमन ॥ हृदयीं लक्षा लक्ष्मीरमण ॥ होईल शमन शरण तुम्हां ॥५२॥
करा वैराग्य अद्भुत ॥ त्रैलोक्यांत होईल मात ॥ प्राप्ति पावाल पद अच्युत ॥ जो च्युत नसे कल्पांतीं ॥५३॥
कीर्तिघोष गर्जेल पुराणीं ॥ सभाग्य व्हाल इये जनीं ॥ जंववरी वसे चक्रतरणी ॥ तोंवरी नाम राहेल ॥५४॥
हा न साधितां पुरुषार्थ ॥ जन्म जाईल अवघा व्यर्थ ॥ कोण तरले धरितां स्वार्थ ॥ परमार्थावांचुनी चतुर हो ॥५५॥
संसारशीण महा शोष ॥ उसंत नाहीं रात्रंदिवस ॥ शेखीं पाहात अवघें भूस ॥ फोस गर्भ अर्की फळांचा ॥५६॥
काय कांदयाची सलपट ॥ असे मृगजळ लहरी अफाट ॥ किंवा ससा श्रृंगें उभारी नीट ॥ किंवा कोट गंधर्व नगरीं ॥५७॥
दोघांच्या भांडणास बुजवण मीन ॥ इंद्र धनुष्याची नये ओढितां कमान ॥ कारागृहीं घातल्याचें मन ॥ करी मसलत वृथाची ॥५८॥
वादयें फोडोनि नाद पाहतां ॥ न दिसे नये हातीं तत्वतां ॥ काजव्यासी वात लाऊं जातां ॥ दीपप्रकाश मग कैंचा ॥५९॥
तैसा संसाराचा शेवट ॥ अंतीं पाहतां अवघें तळपट ॥ जैसें लसणाचें फलकट ॥ नये सांठवूं संग्रहीं ॥१६०॥
काय सुतंतूचा रोजगार ॥ खेळतां फुटती गुडघे कोंपर ॥ गृहीं पातल्यावर ॥ कोण गांठोडी लाभाची ॥६१॥
बाहुल्याच्या लग्नासी ॥ आमंत्रणीं तृप्ति बाळकांसी ॥ तेवीं जाणा संसारासी ॥ शेवट गोड दिसेना ॥६२॥
कामक्रोधांचे कडके ॥ उठती त्रितापांचे भडके ॥ बैसती मृत्यूचे कठिण धडके ॥ होती फांके जीवाचे ॥६३॥
यापरे उमजावें बाळका ॥ धरा भक्तीचा आवांका ॥ बैसा अचळ विवेक नौका ॥ नाहीं धोका भावाचा ॥६४॥
लावा हरिभजनाचा चटका ॥ घ्या रामरसायण घुटका ॥ तोडा अविदयाबंधन कटका ॥ फटका ममतेपासोनी ॥६५॥
लावा स्वकीर्तीची ध्वजा ॥ माझा हेत पुरवावया ॥ उभयलोकीं करा मौजा ॥ सुख सायुजें निजसुखी ॥६६॥
उन्मनी मंचकीं करा शयन ॥ नसे स्वप्नसुषुप्तिभान ॥ अक्षयी असा सुखसंपन्न ॥ ब्रह्मानंदीं निर्भय ॥६७॥
यापरी आठही पुत्रांसी ॥ बोधोनि केले ब्रह्मनिवासी ॥ प्रपंच विकल्प वासनेसी ॥ स्पर्शूं नाहीं दीधलें ॥६८॥
त्या मदालसेची ख्याति पुराणीं ॥ मुखें वदला व्यासमुनी ॥ तेंचि रहस्य तुजलागोनी ॥ पवित्रेचें निरुपिलें ॥६९॥
यापरी अत्रि कृपाळ ॥ बोधिली अनसूया सुढाळ ॥ आधींच कनकझारी निर्मळ ॥ त्यांत गंगाजळ सांठलें ॥१७०॥
केशरांत कालविला चंदन ॥ जाईंत गुंफिलीं मालती सुमन ॥ ज्यापें परीस त्यापें चिंतामणी देण ॥ किंवा पयीं शर्करा कालविली ॥७१॥
घृत शिंपितां धडके वन्ही ॥ रविदर्शनें विकासे अब्जिनी ॥ तरुण लावण्य विशाल नयनी ॥ घालितां अंजन शोभा सुरेख ॥७२॥
पुरणामाजी घालितां गूळ ॥ उदकावर पसरे पडतां तेल ॥ तेवीं अनसूयेस बोध प्रबळ ॥ अत्रिकृपे ठसावला ॥७३॥
हें पुरातन चरित्र ॥ श्रोतियां निवेदिलें पवित्र ॥ भरे अंत:करण पात्र ॥ ऐसें सूत्र ज्यामाजी ॥७४॥
परमार्थ लाभाकारणें ॥ सांगीतलीं अनुभवाची कथनें ॥ ज्यांत सज्जनांचीं समाधानें ॥ त्या अर्था निरुपिलें ॥७५॥
कालक्रमणा सावकाश ॥ लिहिला भक्तीचा विलास ॥ रंजविलें आपलें मानस ॥ कोणी बरें म्हणो कीं वाईट ॥७६॥
वाईट बरें कोणीच नाहीं ॥ विश्व आपुले अवयव पाहीं ॥ मी तूंपण पाहतां देहीं ॥ नामरुप असेना ॥७७॥
हे एक जातीचें नाम ॥ दुसरें योनीचें असे नाम ॥ तिसरा बोलिजे देहनाम ॥ जन्मनाम तो चौथा ॥७८॥
वृत्तिनाम पांचवा जाणणें ॥ सहावा वर्णनाम बोलणें ॥ सातवा कर्मनाम उच्चारणें ॥ आश्रमनाम तो आठवा ॥७९॥
व्यावसाय करी तो नववा ॥ अडनांवें हटकी तो दाहावा ॥ कांहीं नसतां जाहला गोवा ॥ करितां उगवा गुंतागुंती ॥१८०॥
आत्मा नामरुपातीत ॥ पंचभूतें तों अजात ॥ पाहतां नामाचा अंत ॥ कोठें थांग लागेना ॥८१॥
यापरी समजाविशी नामाची ॥ सद्गुरुनें केली पूर्ण मनाची ॥ भ्रांति उडाली शहाची ॥ आणिली रुची परमार्था ॥८२॥
गुरुकृपेचें आलें भरतें ॥ आठवलें तें गाइलें गीत ॥ जितुका पसर होता मतींत ॥ संतापुढें ठेविला ॥८३॥
नाहीं केली खटपट ॥ अक्षरार्थ तो जुनाट ॥ येथें बोलावयाची हातवटी स्पष्ट ॥ यालागीं चाले लोट वक्तृत्वाचा ॥८४॥
सद्गुरुघरींचा ज्ञानसिंधू ॥ त्यांतील काढिला एक बिंदू ॥ तोचि विस्तारिला सिध्दांतबोधू ॥ सुख स्वानंदू भाविकां ॥८५॥
सिध्दांतबोध गुरुचा शिक्का ॥ दाविला परमार्थ नेटका ॥ भवसमुद्रावरी सोडिली नौका ॥ कळसूत्री सखा सद्गुरु ॥८६॥
प्रसंग पाहतां सिध्दांतबोधाचे ॥ आंत गरे ज्ञानफणसाचे ॥ किंवा वोतले रस ब्रह्मींचे ॥ नातरी ब्रह्मविदयेचे अलंकार ॥८७॥
सिध्दांतबोध आनंदक्षेत्र ॥ पक्वान्नें ब्रह्मज्ञानाचीं विचित्र ॥ सेविती परम सुरस पवित्र ॥ तृप्त होती अंत:करणीं ॥८८॥
सिध्दांतबोध मानससरोवर ॥ अर्थमुक्ताफळें विखुरलीं समग्र ॥ सेविती राजहंस सज्जनचतुर ॥ विवेकचंचूच्या योगें ॥८९॥
सिध्दांतबोध कामधेनू ॥ दुभे श्रध्दाळू वत्सालागूनू ॥ निवे तनु प्राण मनू ॥ सहित भाव अष्टही ॥१९०॥
प्रगट केला बोध अगाध ॥ दाविला बहुमतांचा भेद ॥ शेवटीं केला अद्वयानंद ॥ निश्चयाचा श्रेष्ठ तो जो ॥९१॥
वदले होते अनुभवी श्रेष्ठ ॥ तैसाचि अर्थ लिहिला म्यां स्पष्ट ॥ गुह्य अर्थ गगनावर पायवट ॥ नीट केली जावया ॥९२॥
फोडोनि ध्यान्याचें भांडार ॥ केला सज्जनांस श्रृंगार ॥ निवे प्रेमळांचें अंतर ॥ तोषती श्रवणें सर्वही ॥९३॥
करोनि विवेकाची मूस ॥ आंत वोतिला ब्रह्मरस ॥ गोठला अद्वयानंदविलास ॥ पूर्ण प्रकाश सुखाचा ॥९४॥
आतां बोलावयाची जाहली सीमा ॥ खुंटला शब्द गोठला प्रेमा ॥ अक्षयी जाहली पूर्णिमा ॥ अमा दृष्टीं पडेना ॥९५॥
पुरली मनाची हौस ॥ सुख जाहलें विशेष ॥ आलिया नरदेहास ॥ सुफळ जाहला संसार ॥९६॥
होतें संचित वजा ॥ केल्या संतसंगें मौजा ॥ साम्राज्यपदीं लागली ध्वजा ॥ गुरुराजा तुझ्या धर्में ॥९७॥
जाहला ग्रंथ सुगम ॥ निवेदीन गुरुसंप्रदाय धर्म ॥ पुढल्या प्रसंगीं अनुपम ॥ उपदेशरस वोतीन ॥९८॥
पुढें समाप्तीचा प्रसंग ॥ ज्यांत दिसेल आत्मरंग ॥ स्थिर होईल मनतुरंग ॥ लागे लग्न जीव शिवां ॥९९॥
अवघ्या संतांसी शरणागत ॥ पोसणें बाळ मी अंकित ॥ पुरवा शहामुनीचा हेत ॥ अक्षयीं ठेवा पायांपासी ॥२००॥
इतिश्रीसिध्दांतबोधग्रंथेअध्यात्मनिरुपणतत्वसारनिर्णये द्विचत्वारिंशोध्याय: ॥४२॥
अध्याय ॥४२॥ ओव्या ॥२००॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ श्रीराम ॥

N/A

References : N/A
Last Updated : November 24, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP