मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|सिध्दान्तबोध|
अध्याय २३ वा

श्रीसिध्दान्तबोध - अध्याय २३ वा

‘श्रीसिध्दान्तबोध’ हा संतकवि श्रीशहामुनि यांचा ग्रंथ म्हणजे मराठी साहित्याच्या खाणींतील एक तेजस्वी हिरा आहे.


श्रीगणाधिपतये नम: ॥ श्रीगुरुभ्योनम: ॥
ऐका श्रोते सज्जन ॥ या ग्रंथाचें निरुपण ॥ नुरे संशयाचें भान ॥ तरीच परिसा सादर ॥१॥
ज्याची मति अतिनिश्चळ ॥ होय बुध्दि बहु कुशळ ॥ तो तत्वशोधनी पायाळ ॥ ज्ञानांजन लेवोनी ॥२॥
तयावांचोनि हा ग्रंथ ॥ रुचि न पडे वाचितां अर्थ ॥ म्हणोनि सूज्ञपुरुषासी उचित ॥ होय लाभ श्रवणेंची ॥३॥
श्रवणाच्या दोन रीती ॥ एक रसिक पदार्थ पाहती ॥ एक तत्वसार शोधिती ॥ मुक्तिगति कारणें ॥४॥
पाहोनि श्रोतियांचा भाव ॥ तैसेंचि कवि करील लाघव ॥ अध्यात्मीं रसिकाचा गौरव ॥ दोन्ही आणि ग्रंथातें ॥५॥
ग्रंथ वाचितां सर्वांस रुचे ॥ असे अक्षरांचे घालीन सांचे ॥ ऐकत मन श्रृंगारिकांचें ॥ तेंही लुब्धे या ग्रंथीं ॥६॥
भाविकांसि ब्रह्माची खाणी ॥ उघडिली पहावया लोचनीं ॥ ऐसी अक्षरांची कोंदणीं ॥ करीन ग्रंथांतरी ते ऐका ॥७॥
रसिक ओवी प्रांजळ ॥ जोडीन अक्षरें अती सुढाळ ॥ जे वांचितां हृदयकमळ ॥ होय उल्हास चौगुणी ॥८॥
आतां असोत या युक्ती ॥ बुध्दीस भरो कुशळता पुरती ॥ विवेकें फांको फार मति ॥ भानुकिरण ॥ ज्यापरी ॥९॥
इतुकीच भिक्षा गुरुसी ॥ मागीतली पसरोनि पदरासी ॥ मग आरंभिलें प्रसंगासी ॥ लक्ष ब्रह्मीं ठेवूनी ॥१०॥
मागील अध्यायीं निरुपण ॥ जाहलें जीवपदार्थांचें कथन ॥ तें जगदीशमुखें विवेचन ॥ ऐकोन द्विज संतोषे ॥११॥
म्हणो अहो जी ब्रह्ममूर्ती ॥ तुम्हीं सांगितली जीवाची गती ॥ ते ऐकोनि माझी मनोवृत्ती ॥ सुखसिंधूंत बुडाली ॥१२॥
गर्भांध मानवाला ॥ रविबिंब उगवे डोळां ॥ मग पाहावया पदार्थाला ॥ गुंतां कांहीं असेना ॥१३॥
तैसें मज जाहलें स्वामी ॥ आजि कृपा केली तुम्हीं ॥ त्रैलोक्यवस्तीच्या धामीं ॥ पाहों जितुकें निर्मिलें ॥१४॥
तें चैतन्य मायेपासोन ॥ देव प्रपंच जीव जाण ॥ तीन पदार्थांचा विस्तार गहन ॥ मातें निरुपिला जगदीशा ॥१५॥
आतां मुख्य तुझें स्वरुप ॥ जो परब्रह्म तद्रूप ॥ तो मीं परिसें कर्णी स्वल्प ॥ ऐसें निवेदीं दयाळा ॥१६॥
तुझिया वक्तृत्वाची थोरी ॥ नसे देवऋषिमाझारी ॥ म्हणोनि उपदेश मातें करीं ॥ निजब्रह्मींचा आपुला ॥१७॥
ज्यास म्हणावें निर्विकार ॥ अव्यक्त आत्मा विश्वंभर ॥ तो कैसा जी साचार ॥ करुणाकर मज सांगा ॥१८॥
जो चैतन्यमायेचा स्वामी ॥ सर्वव्यापक अंतर्यामी ॥ तो भजावा जी आम्हीं ॥ हें गुह्य तुम्हीं बोला जी ॥१९॥
कोण गांव कोण ठाव ॥ कोण पुजावा तो देव ॥ त्याचा अवघा अनुभव ॥ मातें सांगा कृपेनें ॥२०॥
कैसें कीजे त्याचें ध्यान ॥ मुख्य नांव तरी कोण ॥ तो मज गुह्यार्थ फोडून ॥ उघड दावीं जगदीशा ॥२१॥
ऐसी ब्राह्मणाची विनंती ॥ परिसोनी बोले देवमूर्ती ॥ म्हणे द्विजा तुझी मती ॥ बहु युक्तीनें भरलीसे ॥२२॥
तूं चातुर्याची गुणराशी ॥ विशाल बुध्दी तुजपाशीं ॥ म्हणोनि उल्हास आम्हांसी ॥ बोलावया बहु वाटे ॥२३॥
अगा द्विजा गुणैकधामा ॥ तुझे बुध्दीची अगाध गरिमा ॥ अंतरींच्या निजवर्मा ॥ पुससी नेम करुनी ॥२४॥
मागें बहुत प्रश्न केलें ॥ तूं स्वल्प करुनि निरुपिले ॥ तैसें नाहीं आतां पुसिलें ॥ हें बोलणें अबोल ॥२५॥
परी तुझ्या आवडीं ॥ जाहली प्रसन्नता आमुची वेडी ॥ उभवूं महावाक्याची गुढी ॥ करुं उघडी ब्रह्मविद्या ॥२६॥
जीव प्रपंच सकळ देव ॥ यांचा सांगितला उगव ॥ आतां मुख्य देवाधिदेव ॥ तोही अभिप्राय आकर्णी ॥२७॥
कर्मयोनी दैवयोनी ॥ अंतराळसहीत स्वर्गभुवनीं ॥ सत्य वैकुंठ कैलास धामीं क्षीराब्धी अष्टभैरव ॥२८॥
विश्वरुप चैतन्य माया ॥ येथपर्यंत सांगितली देवांची चर्या ॥ याहीवरील अभिप्राया ॥ तेही तूतें सांगतों ॥२९॥
जीव प्रपंचां वेगळी ॥ तिन्ही मूर्ति असती न्याहाळी ॥ सच्चिदानंद एक मेळीं ॥ गुंफिली असे त्रिवेणी ॥३०॥
या तिहीं मूर्तीपर ॥ मुख्य असे परमेश्वर ॥ तो जगदीश निर्विकार ॥ उत्तम पुरुष बोलिजे ॥३१॥
सत् शब्दें ब्रह्म बोलिजे ॥ चित् शब्दें माया जाणिजे ॥ आनंद शब्दें ईश्वर ओळखिजे ॥ हे त्रिवेणी निर्धारी ॥३२॥
आतां या तिहींची एक वेणी ॥ गुंफिली असे मिश्र होऊनी ॥ जैसीं प्रयागीं त्रिवेणी ॥ एकत्र वाहे पूर्वेसी ॥३३॥
किंवा रक्त चर्म मांस ॥ भिन्न असोनि एक भास ॥ तैसा तिहींचा विलास ॥ असे सहवास एकत्वें ॥३४॥
तयास म्हणावें ब्रह्म ॥ ईश्वर ऐसें जें नाम ॥ या दोहींमध्यें मायेचा उगम ॥ हें निजवर्म जाण पां ॥३५॥
ब्रह्म माया ईश्वर ॥ तिहीं परता परमेश्वर ॥ उत्तम पुरुष निर्विकार ॥ जगदीश ऐसी संज्ञा ॥३६॥
तो सर्वशक्तियुक्त ॥ परमात्मा गा अव्यक्त ॥ तोचि एक आदि अंत ॥ सत्य स्वरुप मुख्य जें ॥३७॥
तोचि गा परम पुरुष ॥ ज्यासी म्हणावें अविनाश ॥ त्रैलोक्यस्वामी जगदीश ॥ विकार लेश असेना ॥३८॥
कल्पना आणि मायातीत ॥ ब्रह्म ईश्वराविरहित ॥ तोचि परमेश्वर अपरिमित ॥ अंत त्याचा लागेना ॥३९॥
तया स्वरुपाकडे ॥ बोलतां वेदासि कां नडे ॥ मग शास्त्रांचियां बडबडे ॥ कोणें जमा धरावी ॥४०॥
जेथें गुरु ना शिष्य ॥ स्वामी ना दास ॥ स्त्री ना पुरुष ॥ भास आभासांवेगळा ॥४१॥
तेथें एक ना अनेक ॥ दु:ख ना सुख ॥ हर्ष ना शोक ॥ संग नि:संगावेगळा ॥४२॥
तेथें देवी ना देव ॥ देह ना अवयव ॥ गांव ना ठाव ॥ नाम रुप असेना ॥४३॥
तेथें वर्ण ना व्यक्ती ॥ प्रकाश ना ज्योती ॥ शिव ना शक्ती ॥ जाति गोत असेना ॥४४॥
तेथें वेद ना शास्त्र ॥ नाम ना मंत्र ॥ चक्षु ना श्रोत्र ॥ लक्ष ना अलक्ष ॥४५॥
तेथें क्रिया ना कर्म ॥ नेम ना धर्म ॥ भक्ति ना प्रेम ॥ ज्ञान ना अज्ञान ॥४६॥
तेथें मही ना जळ ॥ तेज ना अनिळ ॥ आकाश ना पोकळ ॥ चंचळ मन तें असेना ॥४७॥
तें रोड ना स्थूळ ॥ खुजट ना उंच सरळ ॥ लांब नव्हे ना वर्तुळ ॥ नये प्रमाण सांगतां ॥४८॥
तेथें रजोगुण ना सद्गुण ॥ अहंकार ना तमोगुण ॥ चित्त बुध्दी अंत:करण ॥ अणु प्रमाण असेना ॥४९॥
बाळ ना तरुण ना म्हातारा ॥ परमात्मा नव्हे द्विजा चतुरा ॥ संसार वासनेचा उबारा ॥ याहूण पर जगदीश ॥५०॥
नव्हे श्वेत पिंवळा सांवळा ॥ पांचही रंगांवेगळा ॥ वाच्यांश नसे त्याला ॥ प्रणवादि पलीकडे ॥५१॥
तेथें नाद ना बिंदू ॥ ज्ञान ना बोधू ॥ अद्वय ना भेदाभेदू ॥ अप्रमेह आनंदू असेपां ॥५२॥
तेथें सुख ना दु:ख ॥ मळ ना चोख ॥ निरंजन ना लोक ॥ राव रंक असेना ॥५३॥
तेथें निद्रा ना जागृती ॥ देह ना विदेहस्थिती ॥ अवस्थातीत अमूर्ती ॥ मूर्ति आकार असेना ॥५४॥
चळेना ढळेना स्वरुप ॥ हालेना गळेना तद्रूप ॥ विटेना फुटेना अमूप ॥ उरेना जिरेना कल्पांतीं ॥५५॥
मुख्य स्वरुप परमेश्वराचें ॥ तुज निरुपिलें साचें ॥ यापरतें बोलावयाचें ॥ काम नाहीं द्विजोत्तमा ॥५६॥
आतां जड आणि चंचळ ॥ अज्ञान आणि निश्चळ ॥ या चौंपदार्थांचा खेळ ॥ असे अवघा जाण पां ॥५७॥
जड तितुके प्रपंच जाणिजे ॥ मृत्तिकापर्यंत बोलिजे ॥ अष्टधा प्रकृतिमिषें सहजें ॥ ओळखावा प्रपंच ॥५८॥
जडपदार्थाची प्राप्ती ॥ तुज सांगितली द्विजमूर्ती ॥ आतां चंचळाची स्थिती ॥ तीही परिसें सुजाणा ॥५९॥
देव तितुके चंचळ ॥ यांचा वेग अति चपळ ॥ गुप्त प्रगट तत्काळ ॥ सामर्थ्यवंत आसती ॥६०॥
शक्तिशब्दें सकळ देवता ॥ सकळही गुणधर्म तत्वतां ॥ ज्ञान विज्ञान पाहतां ॥ शक्ति शब्दें बोलिजे ॥६१॥
जितुकी कर्तृत्वाची कळा ॥ तितुकी मायेहाईं द्विजकुळा ॥ सत्ता सामर्थ्य गुण आगळा ॥ मायेपासीं असे कीं ॥६२॥
आतां अज्ञान म्हणावें जीवासी ॥ स्वतां सामर्थ्य नाहीं त्यासी ॥ नेणें ज्ञान कीं विवेकासी ॥ अति मूढ जाणावें ॥६३॥
जीवास ज्यांणें वोढिला ॥ तो त्याच्याचि स्वाधीन जाहला ॥ तरी सामर्थ्य जीवाला ॥ फिरावयाचे असेना ॥६४॥
भूतांची होतां झडपणी ॥ जीव पिशाच होय तत्क्षणीं ॥ पडे भूतसृष्टीचे बंदिखानीं ॥ भ्रमे खेचर होउनियां ॥६५॥
जैं पडे राक्षसयोनी ॥ तेव्हां तैसेंचि कर्म दावी आचरोनी ॥ अथवा जाय दैत्यांचिया मिळणीं ॥ असुरदशा तै वर्ते ॥६६॥
यमाहातीं जीव पडतां ॥ भोगी कुंभीपाक तत्वतां ॥ बैसे चौर्‍याशींच्या माथां ॥ अनेक देह मग धरी ॥६७॥
अथवा देवाचे हातीं पडे ॥ तैसेंचि भोगी सुखवडें ॥ किंव परमेश्वरीं भक्ति घडे ॥ तैं चढे मोक्षपदीं ॥६८॥
म्हणोनि अज्ञान जीवास ॥ म्हणावया कारण त्यास ॥ सदैव पराधीन सहवास ॥ स्वतंत्रता असेना ॥६९॥
परमात्मा तो निश्चळ ॥ कल्पांतीं नाहीं चळ ॥ यालागीं तो अढळ ॥ सर्वांवरिष्ठ जगदीश ॥७०॥
जड तो प्रपंचभास ॥ चंचळ तो देवाचा अंश ॥ अज्ञानदशा जीवास ॥ निश्चळ परमात्मा परिपूर्ण ॥७१॥
देवांस मोक्ष तो नाहीं ॥ नित्य बध्द असती पाहीं ॥ जैसें भाजलें खापर कोण्याही ॥ पदार्थासी मिळेना ॥७२॥
तैसा देवांचा पक्ष ॥ न्याहाळीं लाऊनि लक्ष ॥ यांस नाश ना मोक्ष ॥ असती जैसे तैसेची ॥७३॥
प्रपंच तो अत्यंत जड ॥ त्याचा मोक्ष तो काय दगड ॥ यालागीं हा उघड ॥ दिसों येतो पदार्थ ॥७४॥
बध्द मोक्ष हे दोनी ॥ लागले जीवालागुनी ॥ यालागीं संसारकहाणी ॥ विस्तारली बहु सृष्टीं ॥७५॥
नित्य बद्ध सकळ देव ॥ नित्य मुक्त परमात्मा अवयव ॥ बध्द मुक्त असे जीव ॥ अति जड तो प्रपंच ॥७६॥
नित्य असणें जीवास ॥ कैवल्यासारिखें दिस ॥ अनादिसिध्द आपैस ॥ असे अविद्याबंधनें ॥७७॥
ऐसें देवाचें वचन ॥ परिसोनि पुसे ब्राह्मण ॥ म्हणे अहो जी परिपूर्ण ॥ विनंति माझी अवधारा ॥७८॥
अनादिसिध्द म्हणतां जीवास ॥ मग अविद्याबंध कां हो त्यास ॥ स्वरुपसमान जीवास ॥ धरितां काय संदेह ॥७९॥
जैसा परमात्मा अनादिसिध्द ॥ तैसा जीवही अनादिसिध्द ॥ मग जीवासीच अविद्याबंध ॥ कांहो बंध लागला ॥८०॥
परिसोनि द्विजवचन ॥ देव म्हणे यथार्थ वचन ॥ त्वां पुसिला जो प्रश्न ॥ तो मिथ्या केवीं म्हणावा ॥८१॥
परमात्मा सर्वज्ञ परिपूर्ण ॥ पिंड ब्रह्मांड असे व्यापून ॥ जीवदशा तत्समान ॥ केवीं घडे विचारितां ॥८२॥
सूर्य आणि नक्षत्रांसी ॥ दोहींस निर्मिलें एक्या दिवसीं ॥ परि त्या सूर्याच्या तेजासी ॥ नक्षत्रें सरी न पावती ॥८३॥
तैसा जीव आणि परमात्मा ॥ दोन्ही अनादिसिध्द द्विजोत्तमा ॥ परी परमात्म्याची उपमा ॥ केवीं होय जीवासी ॥८४॥
नैनं छिंदंति अस्त्राणि ॥ ऐसा बोलिला शार्ड्गपाणी ॥ मग जीव अनादि या वचनीं ॥ काय दूषण बोलतां ॥८५॥
परमात्मा सर्वज्ञ ॥ जीवाची गति असे अज्ञान ॥ परमात्मा व्यापक परिपूर्ण ॥ जीव अज्ञान एकदेशी ॥८६॥
जीव मायेचे आधीन ॥ माया परमात्म्याचे स्वाधीन ॥ जीवास अनिवार बंधन ॥ निर्बंधन परमात्मा ॥८७॥
जीव मायेचे स्वाधीन ॥ म्हणोनि भोगी जन्ममरण ॥ नाना योनीं देह धरुन ॥ अविद्येमुळें होतसे ॥८८॥
अविद्याबंधन नसतें जीवाला ॥ मग सृष्टि निर्माण होती कशाला ॥ वेदशास्त्रांच्या कार्याला ॥ प्रयोजन काय असतें ॥८९॥
चंद्र आणि सूर्य जाणा ॥ कोणासाठीं करिती भ्रमणा ॥ रात्रिदिवसांची गणना ॥ कोणा अर्थी असती ॥९०॥
अगा परमार्थ आणि भक्ती ॥ कोणत्या कारणस्तव करिती ॥ बंधन नसतां मोक्षविश्रांती ॥ कां इच्छिती जीवदशा ॥९१॥
या जनांत विपरीत ज्ञान ॥ गुरु उपदेश शिष्यालागून ॥ जें मिथ्या अविद्याबंधन ॥ तूंचि ब्रह्म तद्रूप ॥९२॥
अविद्याबंधन मिथ्या पाहीं ॥ गुरुनें उपदेशूनि तोडिलें काई ॥ तूंचि ब्रह्म म्हणतां देहीं ॥ कैसा ईश्वर तो जाहला ॥९३॥
जरी काजव्यास सूर्य करी ॥ तरी सामर्थ्याची विशेष थोरी ॥ सूर्यासीच सूर्य उच्चारी ॥ यांत काय पुरुषार्थ ॥९४॥
जीवाचें अविद्याबंधन तोडून ॥ करी ब्रह्मरुपासमान ॥ हें परमेश्वरावांचोन ॥ इतरा सामर्थ्य नसेची ॥९५॥
म्हणती मायिक मिथ्या ॥ आम्ही तों ब्रह्मचि तत्वतां ॥ इतुक्यांत जन्ममरणवार्ता ॥ कैसी निस्तरे संसारीं ॥९६॥
अमृत भावून तक्र प्याला ॥ इतुकेनि अमर काय जाहला ॥ रंक म्हणे मी राव चांगला ॥ सत्ता पदवी येईल काय ॥९७॥
तैसें मुखें ब्रह्म बोलतां ॥ येईल काय ऐश्वर्य हाता ॥ म्हणोनि उपदेश तो वृथा ॥ मिथ्या समज मनाची ॥९८॥
जरी होय अपरोक्ष ज्ञान ॥ सुटे चौं देहांपासून ॥ पंचभूतें आणि त्रिगुण ॥ गळती जैसीं उंबरें ॥९९॥
आंडें उकलितां जाण ॥ होय पक्षी मोकळा आंतून ॥ किंवा शुक्तीची उकलितां शिवण ॥ दिसे मुक्ताफळ सोज्वळ ॥१००॥
तैसी जीवाची गति जाण ॥ तुटतां अविद्याबंधन ॥ मुक्त होय स्वरुपीं मिळोन ॥ नये कल्पांतीं संसारा ॥१॥
तुवां पुसला मागें प्रश्न ॥ अविद्याबंधन जीवालागुन ॥ त्यास्तव पडिलें इतुकें बोलण ॥ संशयनिवृत्ति करावया ॥२॥
जीव मायेचे स्वाधीन ॥ त्यासी म्हणावें अविद्याबंधन ॥ येथें संदेह होईल निर्माण ॥ मायेस्वाधीन जीव कां ॥३॥
ब्रह्मादिक हरिहर ॥ तेही मायेचे किंकर ॥ जीव अज्ञान अविचार ॥ होईल संदेह कासया ॥४॥
देह जीव प्रपंच ॥ मायेस्वाधीन साच ॥ यालागी ते उंच ॥ सह्ज सर्वा वरिष्ठ ॥५॥
ते मायेपासोन ॥ जैं सोडविता परमात्मा आपण ॥ तैं चुके जन्ममरण ॥ निश्चळ बैसे मोक्षपदीं ॥६॥
टाकोनि परमेश्वरी खुणा ॥ शोधिती वेद शास्त्रे नाना ॥ अनेक देवांच्या लागती भजना ॥ आवडे त्यासी उपासिती ॥७॥
जैं सकळ देवांची सांडूनि भक्ती ॥ मुख्य परमेश्वरासी भजती ॥ एकनिष्ठ अनन्य उपासिती ॥ ते बैसती मोक्षपदीं ॥८॥
अनेक उपासनेची भक्ती ॥ पुराणीं सांगीतली जनांप्रती ॥ बहुत प्रकारें पुण्य करिती ॥ तैं पावती मोक्षातें ॥९॥
पुरणांचें हेंचि बोलणें ॥ करावें याग यज्ञ दानें ॥ अश्वमेध विशाल गहने ॥ करितां मोक्ष पावती ॥११०॥
जप तप अनुष्ठान ॥ होम हवन देवतार्चन ॥ तीर्थ व्रत संध्या स्नान ॥ करितां प्राप्ति मोक्षाची ॥११॥
नाना महोत्साह करितां ॥ अश्वत्थासी प्रदक्षिणा घालितां ॥ पितृतिथीसी पिंड देतां ॥ मोक्ष घडे तत्काळ ॥१२॥
देव करावे धातुपाषाणांचे ॥ ते पुजावे नेमाचे ॥ नाहीं तरी मृत्तिकेचें गणेशलिंग करावे ॥१३॥
त्याची करुनियां पूजा ॥ उदकांत नेऊनि बुडवा वोजा ॥ इतक्यांत बैसेल सांम्राज्या ॥ हें पुराणींचें बोंलणें ॥१४॥
पितृमातृसेवेंत असावे ॥ भूदान गोदान करावें ॥ वस्त्रें द्रव्य द्विजां अर्पावें ॥ तेणें मोक्ष पावतो ॥१५॥
जैसे शास्त्र पुराणी बोलिलें ॥ तैसेंच जन वर्तो लागले ॥ त्यांत कामनिक फळ पावले ॥ स्वर्गीचें भोक्तृत्व ॥१६॥
आधींच जन अज्ञान ॥ त्यास शास्त्रपुराणीं गोवून ॥ घातलें कर्माचें बंधन ॥ देवताभजनीं लावुनी ॥१७॥
म्हणोनि चुकले निजमुळासी ॥ पाडिले चौर्‍यांशीचे फांसीं ॥ जे भजती परमात्मयासी ॥ ते पावती मोक्षपद ॥१८॥
ऐसें वदला मोक्षदाता ॥ जो जीवांचा क्लेशहर्ता ॥ त्याचे चरणीं ठेवूनि माथा ॥ करी ब्राह्मण प्रश्नातें ॥१९॥
अहो भवाब्धितारणा ॥ जन्ममरणदु:खनिवारणा ॥ जें वाक्य ऐकतां मना ॥ विषय ऊर्मी विसरली ॥१२०॥
मोक्षधामींच्या माहेरा ॥ एक पुसतों परमेश्वरा ॥ स्वल्प विनंति अवधारा ॥ निवेदितों पायांसी ॥२१॥
कोठोनि वेदाचा माग ॥ उद्भव जाहला मूळ सांग ॥ साही शास्त्रांचा योग ॥ कोणे पुरुषें विस्तारिला ॥२२॥
कोणें अठरा पुराणांची ॥ व्युत्पत्ति विस्तारिली साची ॥ भिन्न भिन्न नामें यांचीं ॥ मातें सांगा उगवोनीं ॥२३॥
या प्रश्नांचें उत्तर ॥ करिता जाहला जगदीश्वर ॥ म्हणे ऐकें द्विजा चतुर ॥ वेदव्युत्पत्ति सांगतों ॥२४॥
एक म्हणती वेद ब्रह्म्यानें केले ॥ एक म्हणती विष्णुपासीं जन्मलें ॥ एक म्हणती अनादि संचले ॥ स्वत: सिध्द असती ॥२५॥
एक म्हणती वेद नारायण ॥ प्रगटला विश्व तारावया लागून ॥ म्हणोनि वेदवाक्य प्रमाण ॥ इतर मतांतरें पाषंडें ॥२६॥
यापरी जन ते बोलती ॥ परंतु असे याची वदंती ॥ आतां मुख्य अन्वयाची जाती ॥ तूंतें सांगेन आकर्णी ॥२७॥
जेव्हां सृष्टी निर्माण जाहली ॥ जीवाची दशा विस्तारली ॥ मानवाची आकृति घडली ॥ बहुकुशळते मायेनें ॥२८॥
केल्या चौर्‍यांशी योनी ॥ त्यांत अपूर्व नरदेह उभारुनी ॥ स्त्रीपुरुष उभयतां निर्मुनी ॥ केला विलास कौतुकें ॥२९॥
तेव्हां यातिभेद नव्हता ॥ अवघें एकमय वर्तती तत्वतां ॥ सोंवळ्या ओंवळ्याची वार्ता ॥ नव्हती कोणा त्या समयीं ॥१३०॥
नव्हतें लग्नाचें कारण ॥ परस्त्रीशीं होतें मैथुन ॥ भलत्या घरीं भक्ष्य भोजन ॥ करितां विटाळ न धरिती ॥३१॥
नव्हतें ईश्वराचें भजन ॥ स्नान संध्या देवतार्चन ॥ तीर्थ व्रत उपोषण ॥ स्वप्नीं नेणती मनुष्यें ॥३२॥
नव्हतें जप तप अनुष्ठान ॥ भक्ति वैराग्य ज्ञान ॥ विवेक अनुभव अवघा शून्य ॥ शांति क्षमा कैंची ॥३३॥
नव्हता स्वधर्म किंवा परधर्म ॥ नव्हतें पुण्यपापकर्म ॥ भूतदया मानवा नेम ॥ आप पर हें नव्हतें ॥३४॥
नव्हता द्वैताचा विचार ॥ अवघा होता एकाकार ॥ तें पाहूनि सुरवर ॥ पुसतें जाहले ब्रह्मयासी ॥३५॥
सुरेश्वर म्हणे चतुरानना ॥ पृथ्वींत जाहली विश्वरचना ॥ त्यास आवरण करावें जाणा ॥ तेणें होईल साजिरी ॥३६॥
परिसोनि सुरेशाचे वचन ॥ यथार्थ मानी चतुरानन ॥ मग विष्णुपासीं जाऊन ॥ सांगे वार्ता सृष्टीची ॥३७॥
विरिंची म्हणें वैकुंठपाळा ॥ विश्वामध्यें बंबाळ जाहला ॥ जीव एकत्र कालवला ॥ स्वहित विचार नेणती ॥३८॥
नाहीं मर्यादा स्वधर्माची ॥ नेणती गति पापपुण्याची ॥ नाहीं वर्तणूक नीतीची ॥ आहाचवाहाच वर्तती ॥३९॥
त्यांसि घालूनि भय दारुण ॥ करावें शास्त्राचें बंधन ॥ तेणे वर्तती मर्यादेन ॥ देवधर्मा मानिती ॥१४०॥
ऐसें वदतां चतुराननू ॥ सत्य मानी श्रीविष्णू ॥ मग शिवा पासीं जाऊन ॥ विश्ववार्ता निवेदी ॥४१॥
विष्णु म्हणे विषप्राशना ॥ कैलासवासिया गौरीरमणा ॥ मृत्युलोकीं विश्वरचना ॥ त्यासी आवरण पाहिजे ॥४२॥
जन बहुत अज्ञान ॥ नेणती विवेक अनुभवज्ञान ॥ नेणती प्रपंच परमार्थालागुन ॥ आपुली शुध्दी नेणती ॥४३॥
ऐसें सांगतां शारंगपाणी ॥ कैलासवासी सत्य मानी ॥ तो क्षीराब्धीसी जाऊनी ॥ महाविष्णूसी आर्जवी ॥४४॥
हात जोडूनि त्रिनयन ॥ महाविष्णूसी करी विज्ञापन ॥ म्हणे स्वामी विश्वजन ॥ बहु अनिवार वर्तती ॥४५॥
नेणती देवाचा महिमा ॥ कैसें आचरावें सत्कर्मा ॥ विश्वलुब्ध होऊनि भ्रमा ॥ माजी पडिलें दयाळा ॥४६॥
म्हणोनि तयांलागून ॥ करावी शास्त्रमर्यादा दारुण ॥ तेणें वर्तती नेतिमार्गेकरुन ॥ मग कार्य चालेल सृष्टीचें ॥४७॥
ऐसें बोलतां शैलजामात ॥ संतोष मानी सिंधुजामात ॥ मग महाविष्णु त्वरित ॥ अष्टभैरवां आर्जवी ॥४८॥
म्हणे अष्टधा प्रकृती । तिचेनि ते अष्टमूर्ती ॥ त्यांत जनांची अज्ञानरीती ॥ नेणती तुमच्या रुपा ॥४९॥
ज्ञानविवेक होई जीवा ॥ जेणें घडे तुमची सेवा ॥ ऐसी सनद द्यावी जीवा ॥ शास्त्रें करुनी प्रमाण ॥१५०॥
महाविष्णूनें सांगता जाणा ॥ अष्टभैरवीं आणिलें मना ॥ तेही विश्वरुपास करुणा ॥ भाकिते जाहले सद्भावें ॥५१॥
भैरव म्हणती विश्वरुपासी ॥ जन नेणती पापपुण्य़ासी ॥ यांस द्यावी सनद सरिसी ॥ जेणें होती सज्ञान ॥५२॥
ऐसें बोलतां अष्टभैरवें ॥ विश्वरुप म्हणे बहुत बरवें ॥ मग तोही जाऊनियां आर्जवें ॥ चैतन्यमाये लागूनी ॥५३॥
विश्वरुप म्हणे महामाया ॥ विश्व जातसें अवघें विलया ॥ तयावरुती करुनि दया ॥ द्यावें पत्र करुणेचें ॥५४॥
ऐसें परिसोन महामायेन ॥ उश्वास टाकिला चौंवेळान ॥ तेचि चारी वेद गहन ॥ मूर्तिमंत प्रगटले ॥५५॥
मग चौवेदांनीं मुखेंकरुन ॥ केलें अद्भुत गायन ॥ जितुकें होतें ब्रह्मांडीं निर्माण ॥ तितुकें स्तविलें अक्षयीं ॥५६॥
साडे द्वादश मातृकाजाण ॥ निघाल्या एक एक श्वासांतून ॥ चौघांचें एकत्र केलें गणन ॥ जाहलीं पन्नास अक्षरें ॥५७॥
त्यां पन्नास अक्षरांपासून ॥ वेद शास्त्र आणि पुराण ॥ जितुकें शब्द उच्चारण ॥ तितुकें पन्नास अक्षरीं ॥५८॥
चौ वेदानें केलें गायन ॥ तें दैवामायेनें लिहून ॥ तयांचें पत्र करुन ॥ विश्वरुपा दीधलें ॥५९॥
ते वेदमुखींची ध्वनिका ॥ मानेनें सोंपिली विश्वरुपा देखा ॥ तयानें आणिला विवेका ॥ गुह्यार्थ वेदाचा ॥१६०॥
विश्वरुपें केला विचार ॥ वेदवाक्य कूटस्थ अक्षर ॥ हें देवांस नुगवे साचार ॥ अति गहन कठिण ॥६१॥
मग वेदाचा अर्थ शोधून ॥ त्यासी केलें भिन्न भिन्न ॥ कनिष्ठ मध्यम श्रेष्ठजाण ॥ केलें त्रिकांड तीं ठायीं ॥६२॥
कनिष्ठ तो कर्मकांड ॥ मध्यम तो उपासनाकांड श्रेष्ठ तो ज्ञानकांड ॥ या परी त्रिकांड वेदांचें ॥६३॥
त्रिकांडावरुतें ॥ बैसविलें तीं गुणातें ॥ त्याचाही अन्वय तूंतें ॥ ऐक सांगतो ब्राह्मणा ॥६४॥
तमोगुण कर्मकांडी ॥ रजोगुण उपासना कांडीं ॥ सत्वगुण ज्ञानकांडीं ॥ एवं त्रिकांडीं त्रिगुण ॥६५॥
मग विश्वरुपें आपण ॥ वेदवाक्य घेऊन ॥ दिलें अष्टभैरवांलागून ॥ प्रमाण करुन पत्रासी ॥६६॥
मग त्या वेदवाक्यांसी ॥ अष्टभैरवें आणिलें मनासी ॥ म्हणती यांच्या गुह्यार्थासी ॥ केवीं जाणती ऋषीजन ॥६७॥
अष्टभैरव विचार करिती ॥ कूटस्थ वेदांची वदंती ॥ याची नुगवे जनांसी गुंती ॥ अंतीं पडती भ्रमांत ॥६८॥
मग अष्टभेद दावोनी ॥ वेदांचा आश्रय घेवोनी ॥ अष्टशास्त्रें कुशळते करुनी ॥ निर्मिलीं जनां समजावया ॥६९॥
अलेख भैरवान ॥ ज्ञानकांडींचा अर्थ घेऊन ॥ वेदांतशास्त्र निर्मिलें तेण ॥ अति गहन अतर्क्य ॥१७०॥
विष्णुभैरव बहुकुशळत्व ॥ पाहूनि ज्ञानकांडाचा अर्थ ॥ सांख्यशास्त्राचा पदार्थ ॥ करितां जाहला साक्षेपें ॥७१॥
शंभुभैरव स्वतंत्र ॥ पाहून उपासनाकांडींचें सूत्र ॥ करिता जाहला न्यायशास्त्र ॥ बहु विचित्र लाघवी ॥७२॥
सुनाभ भैरव विचक्षणीं ॥ उपासनाकांडींचा अन्वय घेऊनी ॥ योगशास्त्राचे मांडणी ॥ करिता जाहला विविकें ॥७३॥
महादेव भैरव ॥ पाहोनि कर्मकांडींचा अनुभव ॥ निर्मिलें धर्मशास्त्र बरव ॥ वर्तावया जनासी ॥७४॥
बळिवर्धन भैरव चतुर ॥ करुनि कर्मकांडींचा विचार ॥ घातली कामशास्त्राची सदर ॥ बहुत प्रकार गवसूनी ॥७५॥
यापरी त्रिकांडींचीं ॥ सहा शास्त्रें निर्निलीं साची ॥ एकेक कांहीं दों शास्त्रांची ॥ केली उभारणी भैरवीं ॥७६॥
कालिंदि विक्राळ भैरव ॥ या दोघांचें अति लाघव ॥ यांनीं स्वतंत्र केला अनुभव ॥ दोनी शास्त्रें निर्मूनी ॥७७॥
कालिंदीभैरव विवेकराशी ॥ करिता जाहला निगमशास्त्रासी ॥ आणि आगमशास्त्रासी ॥ विक्राळभैरव उभारी ॥७८॥
यापरी आगमनिगमांतें ॥ दों भैरवीं निर्मिलें निरुतें ॥ म्हणोनि अष्टशास्त्रें तूतें ॥ म्हणितलें आम्हीं साक्षेंपें ॥७९॥
मग अष्टभैरवांनीं ॥ त्रिकांड वेदशास्त्र घेऊनी ॥ महाविष्णूपासीं देऊनी ॥ केली असे निजाज्ञा ॥१८०॥
महाविष्णूनें माथां ॥ वेदशास्त्र वंदूनि तत्वतां ॥ मग पाचारुनि गौरीभर्ता ॥ ययापासी दीधलीं ॥८१॥
शिवें बोलावूनि वैकुंठीच्या विष्णूसी ॥ वेदशास्त्रें सोंपिलीं त्यासी ॥ विष्णूही ब्रह्मयासी ॥ देता जाह्ला आवडीं ॥८२॥
ब्रह्मानें विचारुन मनांत ॥ चारी वेद मूर्तिमंत ॥ ठेविता जाहला सत्यलोकांत ॥ आपणापासीं मुख्य जे ॥८३॥
त्रिकांड वेदींची पत्रिका ॥ पठण करुन स्वयें देखा ॥ मग पाठवी विश्वलोका ॥ वर्तावया निजाज्ञा ॥८४॥
श्रेष्ठीं ऋषींश्वरीं मिळोनी ॥ वेदपत्रिका घेऊनी ॥ प्रगट करिती विश्वालागूनी ॥ वेदमर्यादा वर्तावें ॥८५॥
जो वेदमर्यादा लंघून ॥ स्वयंबुध्दि वर्तेल उन्मत्त होऊन ॥ तयास दंडील रविनंदन ॥ ऐसा पिटिती डांगोरा ॥८६॥
ऋषिमुखें पंडित देख ॥ घोकिते जाहले वेदवाक्य ॥ श्रवण करोनि विश्वलोक ॥ वर्तो लागले तैसेची ॥८७॥
तैं पासोन वर्णाश्रम ॥ वेदीं लाविलें जनास कर्म ॥ भक्तिउपासनेचा नेम ॥ ज्ञानमार्ग दाविला ॥८८॥
प्रगट केलें पापपुण्य ॥ वेदीं स्थापिले चारिवर्ण ॥ वैश्य क्षत्रिय ब्राह्मण ॥ शूद्र नेमिला कनिष्ठ ॥८९॥
ऐसें वदला अव्यक्त आत्मा ॥ परिसतां आल्हाद ब्राह्मणोत्तमा ॥ मग वंदोनि पादपद्मा ॥ करी पृच्छा देवासी ॥१९०॥
चारिवर्ण वेदीं केले ॥ ऐसें तुम्हीं निरुपिलें ॥ बावन्न वर्ण कोठूनि जाहले ॥ याचा कर्ता कोणजी ॥९१॥
या अठरा पगड जाती ॥ कैसी फांकली यांची मती ॥ भिन्नभिन्न कर्मांची गती ॥ कैसी निवडिली करावया ॥९२॥
हें सांगा मजकारणें ॥ ऐसें विनविलें ब्राह्मणें ॥ तें परिसोन करुणाघनें ॥ बोलता जाहला स्वमुखें ॥९३॥
म्हणे द्विजा ऐक वचनातें ॥ वर्णभेद सांगतों तूतें ॥ यांचा प्रवाह ऋषिकर्तें ॥ जाहलें तेंही आकर्णी ॥९४॥
यवनयातीचा प्रकारु ॥ मागां सांगितला तुज सविस्तरु ॥ तथापि आणिकही त्याचा विचारु ॥ ऐक सांगों स्वल्पसा ॥९५॥
दिल्व नामें महाऋषि ॥ यवन आदम म्हणती त्यासी ॥ आतां त्याच्या अभिप्रायासी ॥ सांगों समुळ तुजलागीं ॥९६॥
तो दिल्व ऋषिजाण ॥ करी महाविष्णूचें भजन ॥ हरिहरांचा द्वेष दारुण ॥ नित्य करीं मानसीं ॥९७॥
तेथें एक कार्फवऋषि ॥ नित्य भजे शिवासी ॥ तो उपहासी महाविष्णूसी ॥ करी द्वेष अखंडा ॥९८॥
दिल्व निंदी शिवासी ॥ कार्फव निंदी महाविष्णूसी ॥ यापरी दोहीं ऋषीसी ॥ द्वंद्व वाढलें परस्परें ॥९९॥
कार्फवे ऋषीनें शिवालय करुन ॥ आंत करी देवतार्चन ॥ दिल्व ऋषीनें मसीद बांधून ॥ करिता जाहला निमाज ॥२००॥
कोणे एके दिवसीं ॥ धेनु होती कार्फव ऋषीसी ॥ ती जाऊनि दिल्वऋषिआश्रमासी ॥ मसीदींत उभी राहिली ॥२०१॥
दिल्व ऋषीनें पाहोनि नयनीं ॥ म्हणे हे गाय महापापिणी ॥ आमुच्या पूजेच्या श्रेष्ठस्थानीं ॥ उभी असे दुष्ट ही ॥२॥
मग क्रोधें भरोनियां संतप्त ॥ घेऊनियां विशाळ दंड त्वरित ॥ मारुं धांवे जंव धेनूप्रत ॥ तंव ते क्रोधें फुंपाटली ॥३॥
सिंग टोंचोनि पोटातें ॥ विदारुन हृदयांतें ॥ धेनु गेली आश्रमातें ॥ दिल्व ऋषी तेथें निमाला ॥४॥
तयाचा पुत्र मुसळ ऋषी ॥ तो क्रूर बहु तापसी ॥ गाईनें वधिलें पितयासी ॥ ऐकूनि जाहला संतप्त ॥५॥
मग हातीं घेऊनि शस्त्रासी ॥ जाऊनि वधिलें त्या धेनूसी ॥ तिच्या भक्षूनि मांसासि ॥ सूड घेतला पितयाचा ॥६॥
त्याचे वंशीं जे जन्मले ॥ ते पितया सारिखे जाहले ॥ गाय वधुन भक्षूं लागले ॥ तोचि वाढला विस्तार ॥७॥
मूळ याचें दिल्व ऋषीश्वर ॥ या लागीं म्हणती दीनाचें घर ॥ मुसळ ऋषीचा विस्तार ॥ मुसलमान यास्तव ॥८॥
कार्फव ऋषीसी द्वंद्व वाढला ॥ म्हणोनि काफर म्हणती महाराष्ट्राला ॥ फोडिती शिवालय मूर्तीला ॥ द्वेष करिती देवाचा ॥९॥
यापरी यवनजातीची उत्पत्ती ॥ तुज सांगितली यथास्थिती ॥ पुढें अनामिकाची जाती ॥ कैसी जाह्ली तें ऐक ॥२१०॥
दीर्घ ऋषीचा कुमर ॥ महर्ष ऋषि अविचार ॥ गोमांसाचा आहार ॥ उच्छिष्ट भक्षिलें यवनाघरीं ॥११॥
तें कळतां लोकांसी ॥ वाळींत घातलें तयासी ॥ गांवाबाहेर वस्तीसी ॥ राहता जाहला महर्ग ॥१२॥
कोणी स्पर्श नकरी त्याला ॥ विटाळ मानिती महर्ग ऋषीला ॥ त्याचा वंश वृध्दीतें पावला ॥ श्वपच त्यातें म्हणावें ॥१३॥
महर्ग ऋषी पासोन जाहले ॥ म्हणोन महार नांव पावले ॥ आतां चांभार कैसे जाहले ॥ तेंही ऐके ब्राह्मणा ॥१४॥
गाईचा वध मुसळऋशीनें केला ॥ मांस घेऊन त्यागिलें त्वचेला ॥ तें कातडे घेऊन गेला ॥ चर्म ऋषि आश्रमा ॥१५॥
म्हणे हे गाईचे त्वचेसी ॥ परोपकारी लावूं यासी ॥ मग करुन पादरक्षेसी ॥ जगाचे पायीं लेववी ॥१६॥
त्याचे वंशीं जे जन्मले ॥ ते त्याचि कर्मी प्रवर्तले ॥ चर्व ऋषिपासोन जाहले ॥ यास्तव म्हणती चांभार ॥१७॥
कुंभ ऋषिपासोनि ॥ कुंभार जाहले निर्माण ॥ नाग्र ऋषीचें संतान ॥ न्हावी तितुका विस्तारला ॥१८॥
विश्वकर्मा ऋषी ॥ त्याचे वंशीं सुतार परियेसीं ॥ बहुत कुशळ सोमऋषी ॥ तया पासोन सोनार ॥१९॥
काश्व ऋषीची संतती ॥ ते कांसार ओळखें द्विजमूर्ती ॥ सिल्व ऋषीपासोन जन्मती ॥ शिंपी तितुकें जाणावे ॥२२०॥
गुल्वऋषिपासोन गुरव जाहले ॥ भुर्व ऋषिपासोन बुरुड विस्तारले ॥ पार्थिव ऋषीपासोन वहिले ॥ परिट तितुकें ओळखावे ॥२१॥
तैल्व ऋषीचे तेली ॥ कोष्टी कोक ऋषीचें कुळीं ॥ शाल्व ऋषिपासोन साळी ॥ जैन जीमुतऋषीचे ॥२२॥
ज्या ऋषीनें जो व्यापार केला ॥ तो त्याचे वंशीं तैसाच विस्तारला ॥ यापरी बावन्न वर्ण जाहला उदिमास्तव भिन्नभिन्न ॥२३॥
एकाएकांचा सांगतां विस्तार ॥ होईल ग्रंथासी पसर ॥ यालागीं स्वल्प विचार ॥ संज्ञा मात्र जाणविली ॥२४॥
आतां पुराणांची उत्पत्ती ॥ तेही ऐकें द्विजमूर्ती ॥ समस्त ऋषीश्वरांची मतीं ॥ विस्तारली अति गहन ॥२५॥
बकदालभ्य ऋषीपासून ॥ प्रगट जाहलें मत्स्य पुराण ॥ मृकंडि ऋषीनें जाण ॥ मार्कंडेय पुराण कथियेलें ॥२६॥
व्यास ऋषी पासून ॥ जाहलें भारत पुराण गहन ॥ भविष्योत्तर पुराण ॥ लोमहर्षन ऋषीनें निर्मिलें ॥२७॥
बृहन्नारदीय पुराण ॥ कूर्मऋषीनें केलें जाण ॥ ब्रह्मांड पुराणा लागून ॥ कर्ता जाहला अगस्ती ॥२८॥
ब्रह्मवैवर्त पुराण ॥ कश्यप ऋषीनें केलें जाण ॥ भारद्वाज ऋषि व्युत्पन्न ॥ वराह पुराण तो कर्ता ॥२९॥
वायुपुराणासी ॥ करिता जाहला अंगिरा ऋषि ॥ विष्णुपुराणासी ॥ श्रृंग ऋषि निर्मिता ॥२३०॥
वामन पुराणाला ॥ कण्वऋषि करिता जाहला ॥ आदित्य पुराणाला अत्रि ऋषि तो करी ॥३१॥
करी लिंगपुराणासी ॥ करिता जाहला पराशरऋषि ॥ पद्मपुराणासी ॥ पद्मऋषीनें केलें ॥३२॥
विभांडक ऋषीनें आपण ॥ केलें अग्निपुराणालागून ॥ वसिष्ठ ऋषिपासून ॥ कूर्मपुराण तें जाहलें ॥३३॥
स्कंदपुराणालागून ॥ कार्तिक ऋषि करी निर्माण ॥ गरुड पुराण केलें कथन ॥ बृहस्पति ऋषीनें ॥३४॥
यापरी पुराणांसी ॥ करिते जाहले समस्त ऋषि ॥ त्यांपासोन अनेक चरित्रांसी ॥ निर्मिते जाहले कवीश्वर ॥३५॥
मुख्य वेद चैतन्यस्वरुपीं जाहले ॥ विश्वरुपें त्रिकांड भाग केले ॥ सहाशास्त्रांसी निर्मिले ॥ अष्टभैरवीं जाणिजे ॥३६॥
महाविष्णूपासून ॥ चौदा विद्या निर्माण ॥ चौसष्टि कळा शिवापासून ॥ ओळखें खुण द्विजवर्या ॥३७॥
वैकुंठींच्या विष्णूनें ॥ मीमांसे केलें गे ओळखून ॥ उपनिषदें तितुकीं जाण ॥ चतुराननें स्वयें केली ॥३८॥
कोक केले इंद्रानें ॥ गायनकळा चित्रसेनानें ॥ मंत्र तितुके सांबानें ॥ कुविद्या यक्षिणीपासूनी ॥३९॥
मुख्य अठरा पुराणें ॥ ऋषीश्वरीं केलीं जाणें ॥ प्राकृत काव्य मनुष्यानें ॥ केले कलीमाझारीं ॥२४०॥
ऐसें बोलिला मोक्षदानी ॥ पुढती ब्राह्मण करी विनवणी ॥ त्या शब्दांची मांडणी ॥ शहामुनि वदेल ॥४१॥
इति सिध्दांतबोधग्रंथे अध्यात्मनिरुपणतत्वसारनिर्णयवर्णने त्रयोविशोंध्याय: ॥२३॥ ॥ अध्याय ॥२३॥

N/A

References : N/A
Last Updated : November 22, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP