मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|सिध्दान्तबोध|
अध्याय ३४ वा

श्रीसिध्दान्तबोध - अध्याय ३४ वा

‘श्रीसिध्दान्तबोध’ हा संतकवि श्रीशहामुनि यांचा ग्रंथ म्हणजे मराठी साहित्याच्या खाणींतील एक तेजस्वी हिरा आहे.


श्रीगणाधिपतये नम: ॥ श्रीगुरुभ्यो नम: ॥
तुज नमो जी निर्विकारा ॥ स्वरुपस्वानुभवा परात्परा ॥ शुध्द चैतन्य अमूपा अपारा ॥ अगणिता अगम्या ॥१॥
नमो तुज जी निर्मळा ॥ सुखरुपा सुखविमळा ॥ सखोल अचळा तूं सरळा ॥ गगन खेळ तुजपोटीं ॥२॥
सर्वसाक्षी सर्वोत्तमा ॥ जगदीशा जगदात्मा ॥ लक्षितां जाहली वेदांची सीमा ॥ दमा भरला शेषासी ॥३॥
नमूं तुज निर्विकल्प निरंजना ॥ प्रकाशगहना परिपूर्णा ॥ प्रणवातीता अव्यक्त गहना ॥ परमपुरुशा परेशा ॥४॥
तुजपासोनि जाहलें स्फुरण ॥ तोचि प्रकृति पुरुष जाण ॥ त्यांसीच मूळमाया खूण ॥ तेचि गुणसाम्य बोलिजे ॥५॥
तोचि ॐकार नादाकार ॥ तेचि अर्धमात्रा साचार ॥ तीच तुर्या हा निर्धार ॥ तोचि ज्ञानविग्रहो सद्गुरु ॥६॥
तेथूनि जाहलें महत्तत्त्व ॥ तोचि तामस अहंकार होत ॥ तोचि प्रसवला पंचभूत ॥ जसे अवयव आपुले ॥७॥
ओंकाराचे त्रिपाद ॥ तोचि त्रिगुणांचा भेद ॥ अक्षर मातृका चाले छंद ॥ फांटे फुटले पन्नास ॥८॥
पन्नास अक्षरें दोन मातृका ॥ बावन्नांची भरती देखा ॥ प्रगट सांगों नये मुखा ॥ दोन मातृका ग्रंथीं गुप्ता ॥९॥
गुरुमुखीं बीजमंत्र ॥ दोन मातृका स्वतंत्र ॥ हें गुरुमुखें घेणें मूळसुत्र ॥ पवित्र अर्थ अगम्य ॥१०॥
दोन मंत्रांची बीजकळिका ॥ ते ज्ञानगुरुची रेखा ॥ गुरु जाणता देखा ॥ त्यापासीं वस्ती असे त्याची ॥११॥
शिष्य भेटे संपन्न ॥ त्यास गुरु सांगती कृपा करुन ॥ अनाडया शिष्यास काय सांगोन ॥ ज्यास अज्ञान जडबुध्दी ॥१२॥
गुरुमंत्राचा अनुभव सुरस ॥ त्यांतच ज्ञानाचा प्रकाश ॥ शिष्याचें प्रबोधोनि मानस ॥ प्रवीण मिळवी अनुतापीं ॥१३॥
गुरुमंत्राहूनि थोर नसे शास्त्र ॥ गुरुमंत्राहूनि श्रेष्ठ नसे मंत्र ॥ गुरुमहिमा विशेष ॥ शिव सनकादिक सेविता ॥१४॥
गुरुमंत्राचा महिमा ॥ जो जपे धरुन प्रेमा ॥ तो प्राप्तीची पावे सीमा ॥ याहून लाभ नसे कीं ॥१५॥
उल्लेख तोचि अंत:करण ब्रह्मांडीं म्हणतीं हिरण्य ॥ तो विष्णु महेश आपण ॥ चंद्र सूर्य विरिंची ॥१६॥
एकचि स्फुरणाचे पांच फांटे ॥ हिरण्यगर्भ त्याचा उमटे ॥ तेंचि देखतां चक्र प्रगटे ॥ नेटेबोटें सांगतों ॥१७॥
अंत:करणाठायीं फुटे ॥ मन बुध्दि चित्त अहंकार उमटे ॥ तेचि पंचप्राण उमटे ॥ ऐका विभाग सांगतों ॥१८॥
अंत:करण जाहला तो व्यान ॥ मन तोचि समान ॥ बुध्दि तो उदान चित्त प्राण ॥ अहंकार अपान लक्षावा ॥१९॥
जें अंत:करणपंचक ॥ तेंचि पंचप्राण देख ॥ तोंचि ज्ञानेंद्रियांचा लेख ॥ ऐकें मुखें प्रांजळ ॥२०॥
अंत:करण तेंचि श्रवण ॥ मन तेंचि त्वचा जाण ॥ बुध्दि चक्षु करी देखण ॥ चित्त रसना अहंकार घ्राण कीं ॥२१॥
अंत:करण तेंचि ज्ञानेंद्रियांत उमटे ॥ तेंचि कर्मेंद्रियांत राहाटे ॥ जडांत प्रवेशोनि नेहटे ॥ चालवी कर्म कार्ये ॥२२॥
अंत:करण शब्द बोले ॥ मन पाणी द्रियांत हाले ॥ बुध्दि उचली पाउलें ॥ चित्त तेंचि शिश्न करी मूत्र रती ॥२३॥
अहंकार गुदस्थानीं ॥ करी मळाची धुनी ॥ हीं कर्मेंद्रियें तुजलागोनी ॥ निरुपिलीं सुजाणा ॥२४॥
अंत:करण नभ व्यापून ॥ मन तें वायु जाण ॥ बुध्दि तेंचि हुताशन ॥ चित्त पाणी अहंकार धरणी ॥२५॥
शब्द तोचि अंत:करण ॥ स्पर्श तो मन घ्या ओळखोन ॥ बुध्दी रुपांत करी देखण ॥ चित्त रस अहंकार गंध ॥२६॥
एक्या स्फुरणाचें फरगडें ॥ विस्तारलें पाहा उघडें ॥ तोडोनि संदेहाचें बिरडें ॥ श्रोतयां निवाडें दाविलें ॥२७॥
एक दुम पत्रें फार ॥ एक उदक तरंग अपार ॥ तेवीं सृष्टीचा उभार ॥ मूळमाया स्फुरण कीं ॥२८॥
आतां आकार तोचि उकार ॥ उकार तोचि मकार ॥ मकार अर्धमात्रा निर्धार ॥ अर्धमात्रा ओंकार मूळध्वनी ॥२९॥
ब्रह्म प्रसवला ओंकार ॥ ओंकारापोंटीं सृष्टीचा विस्तार ॥ कापूस दोरा शेला प्रकार ॥ या रीतीं जाणावें ॥३०॥
शिर आणि हस्त पाद ॥ एकाचि परी हे तीन भेद ॥ तैसा ब्रह्मा ओंकार जगप्रसिध्द ॥ एकरुपें विलसत ॥३१॥
पंचब्रह्मींचा भेद ॥ कपिलगीतावेद प्रसिध्द ॥ तोही निर्णय अगाध ॥ सांगों संबंध परियेसा ॥३२॥
प्रथम अखंड ब्रह्म ॥ दुसरें दंडकार ब्रम्ह ॥ तृतीय कुंडाआकार ब्रम्ह ॥ चौथें ब्रम्ह जाणिजे बिंदू ॥३३॥
आतां पंचदेहांसि संबंधू ॥ तोही सांगतों बोधू ॥ परिसतां खेदू नुरे हृदयीं ॥३४॥
प्रथम स्थूलदेह जाण ॥ दुसरा सूक्ष्म तिसरा कारण ॥ चौथा महामाया कारण ॥ पांचवा कैवल्य बोलिजे ॥३५॥
पहिली अवस्था जागृती ॥ म्हणती स्वप्नस्थिती ॥ तिसरी धनसुषुप्ती ॥ चौथी तुर्या पांचवी उन्मनी ॥३६॥
पहिली वैखरी वाचा ॥ दुसरी मध्यमा वाचा ॥ तिसरी पश्यंती वाचा ॥ चौथी परा अनिर्वाचा पांचवी ॥३७॥
प्रथम अकार मातृका ॥ दुसरी उकार देखा ॥ तिसरी मकार ओळखा ॥ चौथी अर्थ पांचवी निर्विकार ॥३८॥
प्रथम रज दुसरा सत्वगुण ॥ तृतीय तमोगुण ॥ चौथा शुध्दसत्वगुण ॥ पांचवा निर्गुण सार जो ॥३९॥
प्रथम ब्रह्मा दुसरा विष्णू ॥ तिसरा रुद्र चौथा सर्वेश्वर आपणू ॥ पांचवा देव तो निर्गुणू ॥ तोचि वंद्य सर्वांसी ॥४०॥
प्रथम तें अध:शून्य ॥ दुसरें असें उर्ध्वशून्य ॥ तिसरा मध्यशून्य ॥ चौथे महाशून्य ॥ नि:शून्य तो पांचवा ॥४१॥
प्रथम सलोकता दुसरी समीपता ॥ तिसरी सरुपता ॥ चौथी सायुज्यता ॥ पांचवी निर्विकल्पता मी ब्रम्ह ॥४२॥
सांगीतले पांच प्रकार ॥ एक्या सूत्राचे आकार ॥ मुख्य एकचि पद निर्धार ॥ समजावें तें पंचविधी ॥४३॥
कृष्णें कल्पांतीं निरासी ॥ क्षर अक्षर तम पुरुषीं ॥ सांख्य विभागीं दों भागांसी ॥ प्रकृति पुरुष विभागी ॥४४॥
सद्गुरु धरीं अभेद भेदू ॥ एकचि दावी निजानंदू ॥ द्वैताचा लेश संबंधू ॥ आणुमात्र दिसेना ॥४५॥
दोन बुबुळें दिसती कावळ्याला ॥ आंत लेखणी एकचि कळा ॥ सहस्त्ररश्मी भानूला ॥ प्रभा सबाह्य एकचि ॥४६॥
ब्रह्मी जाहला उल्लेख ॥ हेंही बोलतां कलंक ॥ इच्छा कल्पनानीत वस्तु देख ॥ तेथें स्फुरण कां जाहलें ॥४७॥
ब्रह्मीं स्फुरण व्हावया काय कारण ॥ ऐसे म्हणतां उठती तर्क दारुण ॥ परिहार करावया जाण ॥ कुंठित होती ग्रंथकर्ते ॥४८॥
जो ब्रह्मीं लावील कारण कार्या ॥ त्याचा अनुभव वेगळा वायां ॥ जे ब्रह्मानंद अद्वया ॥ बट्टा तेणें लाविला ॥४९॥
हंसगीता अवधूतगीता ॥ भगवद्गीता शिवगीता ॥ यांत सिध्दांत पाहतां ॥ ब्रह्म एकचि ॥५०॥
अठरा पुराणांचें मादुसीं ॥ सांठवी अद्वैतरत्नांच्या राशी ॥ महाभारती विदुरनीतीसी ॥ अद्वैत राशी तो वेद ॥५१॥
कर्मकांड उपासनाकांड वेद ॥ उभारी पूर्वपक्ष भेद ॥ उत्ताराध्यायीं त्याचें केलें खंडन ॥ ज्ञानकांड उभारुनी ॥५२॥
वेदीं उपनिषदीं शुध्दज्ञान ॥ बोले अद्वैत सनातन ॥ शोधोनि घेती अर्थज्ञान ॥ ब्रह्मवेत्ते श्रेष्ठ जे ॥५३॥
ब्रह्मा आणि सनकादिकांशीं ॥ हंसें उपदेशिलें त्यासी ॥ नारदमुनि श्रीव्यासाची ॥ बोधी ब्रह्म एकचि ॥५४॥
तेचि अनुभवदीपिका ॥ व्यास बोधी श्रीशुका ॥ तोचि अर्थ भागवतीं देखा ॥। परिक्षिती परीक्षक ॥५५॥
अष्टवक्रे याज्ञवल्कीं ॥ बोध ठसावला राया जनकीं ॥ ज्याची कीर्ति स्वयें मुखीं ॥ वदला श्रीकृष्ण जगद्गुरु ॥५६॥
शिव उपदेशी श्रीभवानीसी ॥ अद्वैतज्ञान सुखाच्या राशी ॥ हेंचि ज्ञान लोपामुद्रेसी ॥ अगस्ति सांगे समर्थ ॥५७॥
कयाधूचे गर्भसंपुटीं ॥ प्रल्हाद भक्त जगजेठी ॥ नारद उपदेशी कर्णपुटीं ॥ ठसावला बोध स्वानंदें ॥५८॥
प्रणवबीज एक अक्षर ॥ कोंदला सबाह्य अंतर ॥ तोचि करी अखंड उच्चार ॥ नकार वाचे स्पर्शेना ॥५९॥
वसिष्ठमुनि योगींद्र ॥ उपदेशिला अवतार रामचंद्र ॥ श्रीराम बोध समुद्र ॥ सीता लक्ष्मण सांठवला ॥६०॥
सहा शास्त्रीं वेदांत ॥ भेद गौरव केसरी विख्यात ॥ ज्यात अद्वैतभेदाची मात ॥ सेविती सुर अनुभवी ॥६१॥
वेदशास्त्र महा प्रचंडें ॥ षड्‍शास्त्र त्यापुढें बापुडें ॥ जैसे समुद्रीं बुडबुडे ॥ तैसीं वेदांतीं इतर मतें ॥६२॥
वाचस्पतीस नापिताचें शहाणपण ॥ अर्जुनापुढें षढांचें शरसंधान ॥ कीं मेघापुढें जंबुकाचें गर्जन ॥ तेवीं वेदांतीं इतर मतें ॥६३॥
सूर्यापुढें तारागण ॥ गरुडापुढें टोळाचें उड्डाण ॥ शेषापासीं दर्दुरीचें वचन ॥ तेवी वेदांतीं इतर भाषा ॥६४॥
शुकापासीं इंद्रियभ्रष्ट ॥ कर्मनिष्ठापुढें कर्मभ्रष्ट ॥ सज्जनापासी जेवीं नष्ट ॥ तेवीं वेदांतीं इतर मतें ॥६५॥
व्यासापुढें डफगाणियाचे शाहीर ॥ चंद्रापुढें कैवर्तंकाचे सरदार ॥ मार्जारासन्मुख चालोन ये उंदीर ॥ तेवीं वेदांतीं इतर मतें ॥६६॥
हनुमंतापुढें राक्षसांची मती ॥ भीमासी नपुंसके घ्यावी कुस्ती ॥ परशुरामाचें कोदंड भिल्लटे कसती ॥ तेवीं वेदांताच्या पुढें चार्वाक ॥६७॥
यालागीं वेदांतींचा अर्थ शोधून ॥ निमग्न सनकादिक योगी व्युत्पन्न ॥ वेदांतीं शंकराचार्य पूर्ण ॥ जो ब्राह्मणांचा आचार्य ॥६८॥
प्राकृत कवि तो मुकुंदराज ॥ उभारी विवेकसिंधूचा ध्वज ॥ ज्ञानेश्वर महाराज ॥ अद्वैत वदे अद्भुत ॥६९॥
उत्तरगीता ज्ञानेश्वरी ॥ अमृतअनुभव अद्वैत कुसरी ॥ अर्थ पाहतां कल्पना वारी ॥ नुरे ठाव भेदाचा ॥७०॥
महासमर्थ एकनाथ ॥ केली अद्वैतसुखाची मात ॥ केशवस्वामी रंगनाथ ॥अ शुध्द वेदांती निपुण ॥७१॥
अद्वैतबाधा इतुक्यांची साक्ष ॥ कोण पामर वदेल द्वैताचा पक्ष ॥ अर्थ नेणोनि मुमुक्ष ॥ मोक्षासाठीं लडबडी ॥७२॥
कांहीं घडावें पुण्य ॥ धांवती वाराणसी होऊनि दीन ॥ हृदयीं आत्माराम परिपूर्ण ॥ नेणोनि फिरती दशदिशा ॥७३॥
एका सद्गुरुवांचून ॥ फोस दिसती सर्व साधन ॥ काय पुष्पें वेंचून ॥ हार गुंफणें वृथाचि ॥७४॥
गुरुबोध अद्वैत ब्रह्म ॥ हें श्रुत्यर्थाचें वर्म ॥ येणेंचि परमार्थे सुगम ॥ जनक यदू निवाले ॥७५॥
तुम्ही म्हणाल ब्रह्म एक ॥ एक सुखी एकासी दु:ख ॥ याविषयीं पाहा विवेक ॥ पुरता ध्यानीं आणिजे ॥७६॥
एका देहास दोन कर ॥ एक देवपूजा दानीं उदार ॥ एक धुतो अधोमुखद्वार ॥ यास कैसें करावें ॥७७॥
मेघ उदकींचा बिंदू ॥ गंगेंत पडतां मिळे सिंधू ॥ तोचि कूपीं पडतां मंदू ॥ मळिण होय कोंडणीं ॥७८॥
कल्पनातीत निर्मळ ॥ ते ब्रह्मीं मिळाले सरळ ॥ कल्पनाकूपीं जे अढळ ॥ ते पडले दु:खार्णवीं ॥७९॥
सरितांचे भरोनि जाती पूर ॥ त्यांत उदकाचा प्रकार ॥ कोठें स्थिर कोठें भंवर्‍य़ाचा फेर ॥ याप्रमाणें सुखदु:ख ॥८०॥
सिंधुतळीं उदक निश्चळ ॥ वरी लाटांचे खाय हिंदोळे ॥ तैसें सुखदु:ख प्रबळ ॥ एकातत्वीं उमटत ॥८१॥
नासिकाद्वारें प्राण सुगंध सुगी ॥ गुदद्वारें दुर्गंधी त्यागी ॥ एका वायूच्या अंगीं ॥ दोन प्रकार वर्तती ॥८२॥
अंत:करण ज्ञानेंद्रियांत एक ॥ कर्मेंद्रियांत बोले मुखें ॥ एकांत ज्ञान एकांत अज्ञान देखे ॥ दोहींभागी अंत:करण ॥८३॥
मन त्वगिंद्रयांत स्पर्शूं जाणे ॥ पाणीद्रियांत अवघेंचि नेणे ॥ बुध्दि चक्षु इंद्रियांत करी देखणें ॥ पाद इंद्रियांत अंध तें ॥८४॥
चित्त रसनेचा स्वाद जाणे ॥ शिश्नांत राहे मूर्खपणें ॥ अहंकार घ्राणेंद्रियांत सुगंध सेवणें ॥ गुदद्वारीं नेणें अवघें ॥८५॥
रावण बिभीषण सखे बंधू ॥ बिभीषण चिरंजीव जाहला साधू ॥ रावण नाश पावला बंधू ॥ वंश एक कर्म भिन्न ॥८६॥
एक्या रुप्याचे दोन प्रकार ॥ एक गोठ होऊनि मिरवी कर ॥ एक पायीं विरोधीं धुळींत फिरे ॥ करीं उंच पदीं नीचपण ॥८७॥
पाय चालती शीण पावती ॥ नेत्र आपुल्या स्थानीं सुखी असती ॥ एक्या देहीं सुखदु:खाची वस्ती ॥ कौतुक पाहा कर्त्यांचें ॥८८॥
पुत्र जन्मला ऐकोनि सुखी ॥ तोचि निमाला ऐकोनि दु:खी ॥ एक श्रवणांत पारखी ॥ सुखदु:खांची होतसे ॥८९॥
श्वेत आणि श्यामिका ॥ एका चंद्रा अंगीं देखा ॥ धन गेल्या पावे दु:खा ॥ मिळाल्या सुख बहु वाटे ॥९०॥
लोहदर्पणाचें पाहणं ॥ पुढें उजळ मागें मलिन ॥ मागेंपुढें धातूसमान ॥ लोखंड एक अखंड ॥९१॥
दर्पणदृष्टांतें जाण ॥ एक सुखी एक दु:खी मलिन ॥ दोहींमध्यें आत्मा पूर्ण ॥ हा एक गुंडा गुरुचा ॥९२॥
अद्वैत बोधाचा महिमा ॥ तुम्हां दाविला करुन सीमा ॥ पुढें बोलावयाची गरिमा ॥ उरली नाहीं कवित्वें ॥९३॥
आतां गुणभेद चरित्र ॥ तेंही तुम्हा दावितों सूत्र ॥ जैसें उदकावर लिहिलें चित्र ॥ अवयव त्याचे उमटेना ॥९४॥
अहो म्हणतां संतोष मानी ॥ अरे म्हणता क्षोभे चौगुणीं ॥ कैसी अक्षरामाजी माजणी ॥ फिरविली असे कर्त्यानें ॥९५॥
इंद्रधनुष्याची रेखा ॥ श्वेत पीत आरक्त देखा ॥ तेवीं त्रिगुणांचा लेखा ॥ एकसूत्रीं तीन फांटे ॥९६॥
श्वेत आरक्त काळिका ॥ तीन मिळोनि दीपकळिका ॥ पाद हस्त मस्तका ॥ एके अंगीं अनुभव ॥९७॥
एक गुलबासाचे झाडासी ॥ चुनडी फुलें येतीं त्यासी ॥ तांबडीं पांढरीं पिंवळें रंगासी ॥ घेऊनि उठे विचित्र ॥९८॥
छिटावरते रंगाचे बुटे ॥ कारेगराची कळा उमटे ॥ तैसे त्रिगुणांचे फांटे ॥ ओंकाराचे अंगीं ॥९९॥
तमोगुणापासोनि पंचविषय पंचभूत ॥ रजोगुणाचे दहाइंद्रियें प्राणपंचक होत ॥ सत्वगुण प्रसवत ॥ अंत:करणपंचक ॥१००॥
तामसगुणाची सृष्टी ॥ रजोगुणाची कर्म राहाटी ॥ सत्वगुणज्ञानाची उठी ॥ अवरावया दोहींतें ॥१॥
जड तितुका तमोगुण ॥ कर्मक्रिया रजोगुण ॥ देवतामंडळ सत्वगुण ॥ हे त्रिपुटी बोलिजे ॥२॥
तमाचे राक्षस तमाचे दैत्य ॥ सत्वाचे देवमय समस्त ॥ हे त्रिपुटी विख्यात ॥ प्रचीतीनें जाणपां ॥३॥
तम पाताळ रजो मृत्युलोक ॥ सत्वगुण स्वर्गादिक ॥ उत्तम मध्यम देख ॥ त्रिपुटीचे पकार ॥४॥
रजोगुण ज्यामाजी पडे ॥ त्याची क्रिया तैसी वाढे ॥ तैसी फळप्राप्ति घडे ॥ सुखी दु:खी मिश्रित ॥५॥
द्राक्षी गोड मिरची तिखट ॥ त्यापासी चाकवत आंबट एक्या पाण्याचे लोट ॥ भिन्न गोडी उमटती ॥६॥
तमोगुणावरी पुरुष रमती ॥ तामस क्रियाभ्रष्ट जीव जन्मती ॥ कुसावणें अंकुर उमटती ॥ फलें निपजतीं तैसींच ॥७॥
रजीं रमतां जे उपजती ॥ इंद्रियांत विषयांचा पूर भरती ॥ नानाविकार उफाळे घेती ॥ जन्मती निपती पुन:पुन: ॥८॥
सत्वगुणावरी उपजे प्राणी ॥ सत्ववासना भरे मनीं ॥ लागे परमार्थ भरणी ॥ त्यागी अवगुण न स्पर्शे ॥९॥
एकएक गुणाचे अंकुर ॥ विस्तार निवती अपार ॥ जया तमाचा भरेभर ॥ कुकर्म घडे बहु त्यासी ॥११०॥
चाहाडी चोरी तस्करधंदा ॥ आळस निद्रा करावी निंदा ॥ बोलतां बोलतां यावें वादा ॥ भरे क्रोधा अनिवार ॥११॥
अंगीं अंगमोडयाचा कडका ॥ उठे जांभयांचा भडका ॥ सदा अवगुणांचा सुडका ॥ हृदयीं धडका संतापाचा ॥१२॥
निर्दयीं निष्ठुर तामसी ॥ अघोरी हत्यारी होती हिंवसी ॥ घरीं दारीं सदा कर्कसी ॥ हे गुण तामसी ओळखावे ॥१३॥
लबाड तोंडाळ धीटकपटी ॥ दुर्जन खळ दुर्बुध्दि पोटीं ॥ उगाचि बैसे करित चावटी ॥ ओठीं राम त्याच्या कैंचा ॥१४॥
जैसी ओली गोवरी ॥ तैसा धुपे अंतरीं ॥ मायबाप बंधूंसी किरकिर करी ॥ सदा स्त्रीसीं वांकडा ॥१५॥
घरांत गांवांत चित्त न थारे ॥ काम नसतां रिकामा फिरे ॥ विकल्प वासना चिंता नुरे ॥ पेंगे बैसतां बोलतां ॥१६॥
निजे जैसा मृत्यु पावला ॥ किंवा घोरे जैसा भूत लागला ॥ विचार पुसतां सदा भ्रमला ॥ करी गलबला न बोलतां ॥१७॥
सदा अंगांत भरे मस्ती ॥ भलत्यासंगें घेई कुस्ती ॥ अजगर तैसा पडे सुस्ती ॥ नसती काढी उपाधी ॥१८॥
मार्गी चालतां जैसा लवंद ॥ अंगीं तमोगुणाचा मद ॥ अज्ञान मूर्ख मतिमंद ॥ करी छंद भलतेचि ॥१९॥
जित्यामेल्यावर बैसे माशी ॥ सिध्द निषिध्द न विचारी तामसी ॥ वांति आवडे श्वानासी ॥ तेवीं नीचकर्म प्रियकरी ॥१२०॥
साजुक नावडे खाय शिळें ॥ भलतेया ठायीं लोळे ॥ लागे पिशाच बरळे ॥ न करी आंघोळ मलीन सदा ॥२१॥
न धोये अंग दांत मलिन ॥ कैंई देवपूजा ईश्वरभजन ॥ टिरी डोकी खाजवी दोहीं करान ॥ बैसे उवा मारित ॥२२॥
ना भोगी त्यागी ॥ उगाच बैसे उद्योगी ॥ जैसा भगली जोगी ॥ प्रपंची ना परमार्थी ॥२३॥
तमोगुणाचें लक्षण ॥ सांगितलें त्याचें आचरण ॥ जैसें कातकाढयाचें लग्न ॥ वर्‍हाडी जैसी भूतावळी ॥२४॥
पाहिला अवघा तमोगुण ॥ जैसें पिकलें वृंदावन ॥ किंवा कोल्हाटी पगडी बांधोन ॥ दावी पुरुषार्थ पुरुषाचा ॥२५॥
सांगीतली तमोगुणाची भेटी ॥ परिसा रजोगुणाची राहाटी ॥ जैं ऐकतां कर्णपुटीं ॥ संतोष नेदी ज्ञानिया ॥२६॥
जितुका राजाचा डोहो ॥ तितुका माजवी मोहो ॥ जैसा पतिव्रतेसि नाहो ॥ तैसा पतिव्रतेसी नाहो ॥ तैसा विषयीं प्रीती करी ॥२७॥
गाये नाचे हांसे गदगदां ॥ बहुत मेळवी प्रमदा ॥ नाना टवाळी विनोदा ॥ करणें हा तो रजोगुण ॥२८॥
आवडे वेश्येचें गायन ॥ सुंदर अळंकारभूषण ॥ लावी अंगीं चंदन ॥ विडा तोंडीं अखंड ॥२९॥
वांकडी पगडी चौडयावर चाले ॥ सोंकटी बुदबुळें गंजिफा खेळे ॥ असत्य तोंडी फार बोले ॥ करी टवाळी भलत्याची ॥१३०॥
जीवासी जैसी प्रिय कुडी ॥ तैसी वनितेची आवडी ॥ गंधक दुर्गंधी न सोडी ॥ किंवा मासोळी जीवनातें ॥३१॥
तेवीं स्त्री वांचोनि जाण ॥ नावडे मायबाप बंधु बहिण ॥ अखंड चिंता वाहे मन ॥ स्त्रीउदरपोषणाची ॥३२॥
जैसा ईश्वरभजनीं विरक्त ॥ तेवीं स्त्री विषयीं चित्त ॥ तियेलागीं स्वार्थ ॥ करी व्यवसायबुध्दीचा ॥३३॥
शेतमेळा रोजगार करी ॥ व्यवसायावरी व्यवसाय धरी ॥ उसंत नाहीं पळभरी ॥ करी सोस दिवसरात्रीं ॥३४॥
न जाय तीर्था नावडे कीर्तन ॥ म्हणे रिकामा कोण जावयालागून ॥ जाती त्यासी निंदीपूर्ण ॥ वदे मोक्षपरमार्थ ॥३५॥
कोठें न जाय सांडूनि माडी ॥ धर्माविषयीं न वेंची कवडी ॥ लग्नकार्यासी उभारी ॥ गुढी म्हणे लौकिकासारखे करावें ॥३६॥
बांधी वापी कूप तटाक ॥ आवडे गाय महिषी अश्वादिक ॥ जेणें वाढें लौकिक ॥ तेंचि करी श्रध्देनें ॥३७॥
हास्य विनोद सुख मैथुन ॥ राजसत्ता प्रिय जाण ॥ भाग्य आलिया पुराणश्रवण ॥ होतां कारभार गोष्टींचा ॥३८॥
भक्षावयाची नाहीं मर्यादा ॥ बहुतप्रकारची मेधा ॥ जेणें होय रोगबाधा ॥ तो आहार स्वयें स्वीकारी ॥३९॥
परद्वार मद्यपान ॥ बोले फुगारा धरुन ॥ हें राजसाचें चिन्ह ॥ पुरे आतां नको हें ॥१४०॥
निरुपिलीं राजसाचीं चिन्हें ॥ संसारिकांसि बहुमान्य ॥ मातबर आले पाहुण ॥ ऋण काढून सण करी ॥४१॥
माशी आपण जिवें मरे ॥ परी जेवणारा करी घाबिरें ॥ तेवीं रजोगुण जेथें भरे ॥ तो फिरे भवचक्रीं ॥४२॥
होय रजाचें भारी बळ ॥ डोळ्यावर चढे धूळ ॥ दिवाळें काढितां तत्काळ ॥ इष्टमित्रांचें ऐकेना ॥४३॥
जो रजें माजला ॥ त्याचा परमार्थ हातींचा गेला ॥ पुढें भोगी जन्ममरणांला ॥ सुखाचा लेश मिळेना ॥४४॥
जाहली रजोगुणाची राहाटी ॥ सत्वगुण परिसा शेवटीं ॥ वर्तणुक पडतां कर्णपुटीं ॥ होय सार्थक मनीं धरितां ॥४५॥
कर्णी ऐकावें कीर्तन ॥ अथवा ग्रंथ पुराणश्रवण ॥ किंवा अध्यात्मनिरुपण ॥ जेणें समाधान चित्ता होय ॥४६॥
जनचि दिसे जनार्दन ॥ हें सात्विकाचें लक्षण ॥ नासिकीं तुळशीचा स्वाद घेण ॥ इतर सुगंधीं प्रीति नसे ॥४७॥
मुखीं करी नामस्मरण ॥ सर्वदा सत्य भाषण ॥ असत्याचा मळ जाण ॥ जिव्हाग्रींही स्पर्शेना ॥४८॥
करें करी देवपूजा ॥ दक्षिणा देई उत्तम द्विजा ॥ साधुसेवा पायवजा ॥ तळहातीं आवडीं ॥४९॥
पदीं करावें तीर्थगमन ॥ घ्यावें साधूचें दर्शन ॥ करी परोपकारीं धावन ॥ किंवा जाणें शिवालायीं ॥१५०॥
अंत:करण विशाळ पैस ॥ मनीं लक्षी चिदाकाश ॥ बुध्दीतें एकचि ब्रह्मभास ॥ चित्त चैतन्य अहंकार मी ब्रह्म ॥५१॥
उदार जैसा कल्पतरु ॥ धैर्यवंत जेवीं मेरु ॥ समुद्रतुल्य गहन गंभीर ॥ शांत कदूसारिखा ॥५२॥
चातुर्ये जैसा वाचस्पती ॥ विवेकीयांत जनक नृपती ॥ भला तरी धर्ममूर्ती ॥ ज्ञानी जैसा विदुर ॥५३॥
नेमरक्षणीं भीष्माचार्य ॥ बोध करावया स्वयें आचार्य ॥ आचारनिष्ठ शुध्दक्रिय ॥ पाहोनिया चर्या संतोष सर्वां ॥५४॥
शीतळ तरी जेवीं चंदन ॥ समान जेवीं सहस्त्रकिरण ॥ दयाळ तरी विष्णूचा गुण ॥ क्षमा धरेसारिखी ॥५५॥
जावें तीर्थांसी ही वासना ॥ करी व्रतें अवघड नाना ॥ स्नान नेम देवतार्चना ॥ आळस ज्यातें नसे कीं ॥५६॥
माता निश्चयें मानी काशी ॥ गुरुसमान पूजी पित्यासी ॥ जीवप्राण मानी बंधूसी ॥ भगिनी प्रीतीनें तोषवी ॥५७॥
वाटे जाती मिळोन ॥ येरयेरां सांभाळी प्रीतीन ॥ तेवीं स्त्रियाचें संरक्षण ॥ कर्ते शाहाणे सत्वगुणी ॥५८॥
घरीं सर्वांचें सोसावें ॥ सर्वांसी आर्जवावें ॥ अंगीं कर्तव्य ना फुगावें ॥ भावें भजावें संतासी ॥५९॥
भूतमात्रीं नम्रता ॥ विनयें बोले सर्वांच्या हिता ॥ अंगीं बाणली विरक्तता ॥ साधी पुरुषार्थ चौथा जो ॥१६०॥
निष्कपट सदा सरळ ॥ वाहे जैसा काळ ॥ एक धारणा अढळ । वृत्ति चंचळ होईल ॥६१॥
अखंड आचरावी तपश्चर्या ॥ पुसावें श्रीगुरुवर्या ॥ थुंकोनि सांडावी बाष्कळ क्रिया ॥ संतोषमनीं निमग्न ॥६२॥
हृदयीं सदा आनंद ॥ कोंदोनि गेला ब्रह्मानंद ॥ जिराला मीपणाचा फुंद ॥ सदा स्वानंद गुरुभजनीं ॥६३॥
संसार त्यागावा ही वासना ॥ व्हावी मुक्ति मनकामना ॥ घाली संतासी लोटांगणा ॥ शरण चरणा आलों म्हणे ॥६४॥
विषय तितुका वाटे वमन ॥ कुकर्म सांडी निपटून ॥ अंगीं वैराग्य बाणलें जाण ॥ करी पाठ बहु ग्रंथ ॥६५॥
संसार करी जैसा वेंठीं धरिला ॥ प्रहरभर करो कीर्तनाला ॥ अथवा वाची महाग्रंथाला ॥ सुखीं दु:खीं असे सम ॥६६॥
गमावल्याचा खेद न करी ॥ पावल्याचा हर्ष न धरी ॥ सदा संतोष अंतरीं ॥ घाली अंगीं ज्ञानकवच ॥६७॥
करी हृदयीं कल्लोळ ॥ राहे नम्र सदाप्रेमळ ॥ बोले सदा सर्वां मंजुळ ॥ भक्तीचा उल्लाळ वृत्तीं धरीं ॥६८॥
सखे जिवलग आवडती जन ॥ पाठ घरी संतांचें वचन ॥ सत्वगुणाचें लक्षण ॥ विचक्षण हो निवेदिलें ॥६९॥
त्रिगुणाचे तीन प्रकार ॥ नीच मध्यम श्रेष्ठ विचार ॥ ज्या गुणाचा जो अंकुर ॥ तो विस्तार कथियेला ॥१७०॥
जो जीव तमोगुणी ॥ त्यास श्वानसूकरयोनी ॥ वृश्चिक विखार होऊनि ॥ होय व्याघ्र जंबूक ॥७१॥
तामसी गुणाचा भर देखा ॥ पिशाच होऊनि झडपीं लोकां ॥ शेखीं भोगी दारुण नरका ॥ कर्मरेखा कठीण ॥७२॥
रजो गुणासी पुन्हा मनुष्य जन्म ॥ होय तस्कर हिंसाचारी अधम ॥ कातकाडी कैकाडी करी किरातकर्म ॥ अमंगळ मलिन शौच कैंचें ॥७३॥
तेलासंगे निपजे पेंड ॥ जोंधळ्याअंगीं निपजे गोंड ॥ तेवीं यांचे कर्म लंड ॥ पुन्हां दंड तेंचि फळ ॥७४॥
रायीच्या अंगीं तिखट ॥ चुना जैसा दासट ॥ चिंच दावी आंबट ॥ कुटकी कडुवट क्षार मिठीं ॥७५॥
वृंदावनासि कैचें गोडफळ ॥ शस्त्राची धार कोठून मऊ होईल ॥ सोरा शर्करा होईल ॥ हें कैसें घडों शके ॥७६॥
जें रजोगुणाचें आचरण ॥ त्यांसी प्राप्ती त्याप्रमाण ॥ लाविलें दामोंख्याचें वन ॥ आंबें कोठून येतील ॥७७॥
बकाचे अंगीं हंसपणें ॥ पांढर्‍या गुंजा मुक्ताफळें होणें ॥ तेवीं रजोगुणाच्या आचरणें ॥ सुखाचा लेश मिळेना ॥७८॥
पेरिले मळियांत एरंड ॥ कोठोनि होतिल इक्षुदंड ॥ फोडिलें चिमणीचे अंड ॥ गरुड काय निपजेल ॥७९॥
जन्ममरण चौर्‍याशीं फेर ॥ रजोगुणीं यांसि ऐसें अघोर ॥ सत्वशीळाचा विचार ॥ उत्तम किती सांगावा ॥१८०॥
सत्त्वगुणाचा होतां देहत्याग ॥ त्याचें होय उत्तम अंग ॥ भोगी स्वर्गसुखाचा भोग ॥ नांदे वैकुंठ कैलास ब्रह्मसदनीं ॥८१॥
त्रिगुणांचे तीन भाग ॥ निपजती रस विलग ॥ तोही अर्थ ऐका सुभग ॥ यथासांग सांगतों ॥८२॥
एक गुणाचे तीन रस ॥ त्यांसि म्हणावें नवरस ॥ हास्य श्रृंगार बीभत्स रस ॥ हे रजोगुणी ओळखावे ॥८३॥
वीर रौद्र भयंकर ॥ हा तमोगुणीं रसनिर्धार ॥ त्यांत सत्वाचा श्रेष्ठ प्रकार ॥ काय लागे सांगणें ॥८४॥
लक्ष्मी तेथें विलास ॥ सूर्य तेथें प्रकाश ॥ तैसा सत्वगुणीं रस ॥ सर्व भोग सुखाचा ॥८५॥
इक्षुरसीं गूळ ॥ जाईपाशीं फूल ॥ चंद्र तेथें शीतळ ॥ कर्पूरा सुवास सहजची ॥८६॥
पयाचें पोटीं दह्याची खाणी ॥ दह्याच्या पोटीं सहजचि लोणी ॥ लोणी तेथें तुपाची धणी ॥ भोजनीं तृप्ति सहजी ॥८७॥
धन तेथें लाभ ॥ लाभ तेथें सुखारंभ ॥ सुख तेथें समारंभ ॥ कुटुंबासी होतसे ॥८८॥
सत्वगुण तेथें दया ॥ दयेपासी वसे औदार्य ॥ औदार्यापासी करुणा माया ॥ मायेपासी वाढे प्रीती ॥८९॥
सद्गुणापासी वसे शांति ॥ शांति तेथें नांदे भक्ती ॥ भक्तिपासी चारी मुक्ती ॥ मुक्ति तेथें सुखसिंधु ॥१९०॥
पाणी तेथें रेत बिंदू ॥ बिंदु तेथें जमे देहसंबंधू ॥ देहापासीं शास्त्रबोधू ॥ बोधीं आनंद सुखाचा ॥९१॥
श्रवण तेथें मनन ॥ मनन तेथें निदिध्यासन ॥ निदिध्यासी समाधान ॥ समाधानी जगदीश ॥९२॥
ही सत्वगुणाची समृध्दी ॥ परिक्षीली श्रोतीं सद्बुध्दी ॥ मिळे सज्जनाची मांदी ॥ ते विधी निरुपिली ॥९३॥
मोहाळापासीं मक्षिकांचा समुदावो ॥ तैसा सद्गुणीं भल्याचा गौरवों ॥ बहुतांचा एकविध भावो । कीर्तंनीं जैसा वोढवे ॥९४॥
यापरी त्रिगुणांची रुढी ॥ सांगितली श्रोतयां परवडी ॥ आतां चौथ्या गुणाची प्रौढी ॥ ऐका भाविक सज्जनहो ॥९५॥
ऐकिले तिन्ही गुण ॥ परी चौथाही विशाळ गहन ॥ तो सद्गुरुकृपेविण ॥ प्राप्त न होय साधकां ॥९६॥
जरी प्रगट चौथा गुण ॥ त्रास तिघां लागून ॥ प्रयागींच त्रिवेणी बोलण ॥ सिंधुभेटी त्यां कैची ॥९७॥
अकार उकार मकार ॥ जिरे तेथें चंद्राकार ॥ दिवानिशि संध्याविचार ॥ महाप्रळयीं कोण पुसे ॥९८॥
चंद्र सूर्य तारा ॥ आकाश बुडाल्या कैंचा थारा ॥ महाशून्याचा पसारा ॥ वेदासी धड लागेना ॥९९॥
तो चौथा शुध्दसत्वगुण ॥ ज्ञानप्रकाश विशाळ गहन ॥ तो मी म्हणे नारायण ॥ जो अवतार श्रीकृष्ण ॥२००॥
ऐका दृष्टांत सांगतों तुम्हाला ॥ अग्नि घरोघर खेळावया गेला ॥ वन्ही घर कीं घर वन्ही जाहला ॥ बोलावया बोला श्रोते हो ॥१॥
जरी प्रगट ज्ञानवन्ही ॥ जाळी त्रिगुणदेहालागुनी ॥ पिंडब्रह्मांड जाळोनी ॥ नाहीं करी हरिहरां ॥२॥
संसार जाळोनि करी राख ॥ शेखीं राखही न दिसे देख ॥ कैंचा उंच नीच करावा रंक ॥ साधु रंग दिसेना ॥३॥
महाप्रळयाच्या समयास ॥ चारीं भूतें गिळी आकाश ॥ शेखीं त्याची होय निराख ॥ चिदंबर दिसेना ॥४॥
जेथें जेथें फिरे ज्ञानचक्र ॥ कोठें उरे आकारनक्र ॥ मोडी भेदांचा वक्र ॥ एकचि ब्रह्म बोधध्वजा मिरवे ॥५॥
हें नेणोनियां ज्ञान ॥ न जाती श्रीगुरुस शरण ॥ आपल्यामतें साधन ॥ करितां ठकले नेणों किती ॥६॥
एक वाढवी वाउग्या जटा ॥ एक बैसे गिरिकपाटा ॥ एक सेवी नदीतटा ॥ एक पेटवी पंचाग्नी ॥७॥
एक करिती व्रतास ॥ उपोषणें पीडिती कायेस ॥ एका साधनाचा सोस ॥ षट्‍चक्रें शोधिती ॥८॥
आधारीं नेमिती देवगणेश ॥ कल्पिती चारी मातृकेस ॥ स्वाधिष्ठानीं स्थानविधीस ॥ मातृका तेथें साहा असती ॥९॥
मणिपूरीं विष्णु ॥ दश मातृकांचा करिती गुणनू ॥ अनुहतीं गौरीरमणूं ॥ मातृका तेथें द्वादश ॥२१०॥
विशुध्द कंठीं वसे जीव ॥ षोडश मातृकांची ठेव ॥ द्विदळीं परमात्म्याचा गौरव ॥ दोन मातृका वसती तेथें ॥११॥
सहस्त्रदळीं श्रीगुरु ॥ तेथें नाहीं मातृकेचा उच्चारु ॥ आतां अजपाचा निर्धारु ॥ तोही विचारु आकर्णी ॥१२॥
मूळचक्रीं साहाशतांचा उच्चारु ॥ स्वाधिष्ठानीं साहासहस्त्रु ॥ मणिपूरांत साहासहस्त्रु ॥ अनुहतीं सहस्त्र साहा ॥१३॥
विशुध्दकंठीं सहस्त्र एक ॥ द्विदळीं सहस्त्र एक ॥ सहस्त्रदळीं सहस्त्र एक ॥ ही एकवीसी सहस्त्र साहाशतें ॥१४॥
हें अजपाचें गणित ॥ पन्नास मातृका सांगीतल्या तेथ ॥ दोन राहिल्या गुप्त ॥ पुसून घेणें गुरुसी ॥१५॥
जप होय श्वासोच्छ्‍वास ॥ सोहं उच्चारीं चाले निदिध्यास ॥ ही खूण कळे गुरुभक्तांस ॥ नेणे निर्गुरु अज्ञानी ॥१६॥
एक मूळबंध आकुंचन ॥ ओढी अनळातें साधून ॥ जालंधर बंध देऊन ॥ षड्‍चक्रातें भेदिती ॥१७॥
कुंडलीतें चेतवून ॥ काकीमुखांत प्रवेश करुन ॥ ब्रह्मरंध्रासी भेदून ॥ प्रवेश करिती सहस्त्रदळीं ॥१८॥
एक पंचप्राणातें आकर्षिती ॥ प्राण अपान एकत्वा आणिती ॥ मनपवनाचा ग्रास करिती ॥ तन्मय होतीं समाधिस्थ ॥१९॥
एक त्रिकूट श्रीहाट गोल्हाट ॥ ओलांडून जाती औटपीठ ॥ भ्रमरगुंफा पुण्य गिरि अचाट ॥ भेदोनि मिसळती ओंकारीं ॥२२०॥
एक भूचरी चांचरी खेचरी ॥ पडती मुद्रेचिया भरीं ॥ एक ऊर्ध्वबाहु ठाडेश्वरी ॥ एक होती आकाशमानी ॥२१॥
एक हिमाचळीं गळती ॥ एक प्रयागीं कर्वत घेती ॥ एक वाराणसींत मरती ॥ एक आश्रय धरिती गंगेचा ॥२२॥
एक देव्हारे धांवती ॥ बरें होईल कामचित्तीं ॥ एक कित्येक देव नवसिती ॥ खेटी करिती लोभास्तव ॥२३॥
एक धांवती धनास्तव ॥ एक धांवती पुत्रास्तव ॥ एक धांवती रोगास्तव ॥ एक हिंपुटी वनितेसाठीं ॥२४॥
जोगी जंगम सेवडे ॥ सोपी मलंग डोईफोडे ॥ कित्येक मुंडी दर्शनाचे मुंडे ॥ घुमती आपल्या मतानें ॥२५॥
एक अध्यात्मज्ञानाविणें ॥ वांझ दिसती साधनें ॥ मुळीं देहचि नश्वर जाण ॥ साधन काय शाश्वत ॥२६॥
देहचि तेथें पडला खंड ॥ साधनें कैसीं होती अखंड ॥ ज्या अविद्येनें वाढविलें बंड ॥ तोचि मूळ तंव मिथ्या ॥२७॥
आत्मा देही कीं देहावेगळा ॥ याचा शोध पाहिजे केला ॥ आधीं नेमावें आपणाला ॥ मी जीव कीं शिव ॥२८॥
शोध करितां बरें पाहीं ॥ मीपणासी ठाव नाहीं ॥ मग साधनें कर्तेही ॥ फुंकाइचा अंगारा ॥२९॥
चांदण चमत्कार चाले ॥ हें ब्रह्मीं नाहीं बोलिलें ॥ जेथें दुजेंचि नाहीं जाहलें ॥ तेथें चमत्कार कायसा ॥२३०॥
एक सांगे भूत भविष्य वर्तमान ॥ मंत्रसिध्दि चित्तधर्मजाण ॥ अवघे काल्पनिकगुण ॥ निर्विकल्पी सरेना ॥३१॥
आला आत्मा निराकार ॥ मुख्य ब्रह्मींचा आकार ॥ त्यासि वर्ण याती विचार ॥ लावितां पडती भवफेरे ॥३२॥
भवभ्रम तो भ्रांतीचा माग ॥ चढल्या म्हणे मी लागलों मागें ॥ आपल्याच तोंडें बकूं लागे ॥ घुमे पिशाचवृत्तीनें ॥३३॥
जातीची तेलीण नाम तुळसाई ॥ लागली हडळ म्हणे माळीन सोनाई ॥ आपणास विसरोन आपण बरळे पाही ॥ दुजें भूत दिसेना ॥३४॥
यापरी प्राणी आपणचि ईश्वर ॥ होय अविद्येचा संसार ॥ मग घुसे नानाप्रकार ॥ मी ब्राह्मण वैश्य क्षत्रिय शूद्र ॥३५॥
आपण अजात सांगे जात ॥ आपण देव म्हणती भक्त ॥ आपण स्वयंभ जन्ममरण कल्पित ॥ उंच असतां नीच होय ॥३६॥
अविद्या भूताचिया संसारीं ॥ काढावया श्रीगुरुपंचाक्षरी ॥ तो ज्ञानपलिता पेटल्यावरी ॥ बोले मी नाहीं आहेस तूं ॥३७॥
करिती कोटिसाधनें धरोघरीं ॥ न जाय अविद्या विवशी भारी ॥ गुरु भेटतांच पंचाक्षरी ॥ करी बोहरी क्षणांत ॥३८॥
गुरु उदेल्या दिनमणी ॥ अविद्या दिशा न दिसे नयनीं ॥ प्रळयवायूचे झडपणीं ॥ दीपकळिका रचेना ॥३९॥
समुद्रीं मीठसांठावा ॥ अग्नींत कापुराचा ठेवा ॥ पाषाणें आकाशीं थिगळें लावा ॥ तेव्हां गुरुकृपें अविद्या ॥२४०॥
रविबिंबीं अंधाराची घडे वस्ती ॥ तेव्हां ज्ञानापुढें चाले अविद्येची कुस्ती ॥ स्वयें स्वरुपीं होय वस्ती ॥ कैंची मस्ती अज्ञाना ॥४१॥
महाप्रळयांबु खवळल्यावर ॥ विरे मेरु सत्य कैलासशिखर ॥ बुडे सप्तही सागर ॥ लेखा काय वोहळांचा ॥४२॥
होतां ज्ञानप्रकाशक ॥ अवघें दिसे एकाएक ॥ तोही तुम्हां विवेक ॥ परिसा नावेक धैर्यानें ॥४३॥
नभास मूळ तामस अहंकार ॥ तामस अहंकाराचें मूळ महत्तत्व निर्धार ॥ महत्तत्वाचें मूळ साचार ॥ मायेचें मूळ उल्लेख ॥४४॥
उल्लेख तोचि ब्रह्मीं अंकुर ॥ अंकुर विस्तारला समग्र ॥ यालागीं तूं चराचर ॥ ब्रह्मरुप जाणावें ॥४५॥
पृथ्वीचें मूळ जळ ॥ जळाचें मूळ अनळ ॥ अनळाचें मूळ अनिळ ॥ अनिळास मूळ तें नभ ॥४६॥
शरीरास आधार इंद्रियांचा ॥ इंद्रियास बळ विषयांचा ॥ विषयांस सूत्र मनाचा ॥ मनास मूळ अंत:करण ॥४७॥
अंत:करणास मूळ तो श्रीविष्णु ॥ विष्णुचें मूळ तो स्फुरणु ॥ स्फुरणाचें मूळ निरंजनू ॥ निरंजन सहज निरामय ॥४८॥
अपानास मूळ प्राण ॥ प्राणास मूळ उदान ॥ उदानास मूळ समान ॥ समानास मूळ तो व्यान कीं ॥४९॥
व्यानास मूळ पवन ॥ पवनास मूळ शून्य ॥ गगनास मूळ शून्य ॥ शून्यास मूळ परब्रह्म ॥२५०॥
आकाराचें मूळ चित्त ॥ चित्ताचें मूळ बुध्दी होत ॥ बुध्दी ते मनाची जात ॥ मनाचा स्वामी अंत:करण ॥५१॥
अंत:करण विष्णूचें स्वरुप ॥ विष्णु निर्विकल्पाचा कल्प ॥ कल्प तोचि स्वरुप ॥ न लगे खटाटोप दुजियाचा ॥५२॥
गंधाचें मूळ रस ॥ रसाचें मूळ रुप असे ॥ रुपास मूळ तो स्पर्श ॥ स्पर्शाचें मूळ शब्द तो ॥५३॥
शब्दाचें मूळ तो नाद ॥ नादाचें तो अभेद ॥ अभेद म्हणिजे आनंद ॥ आनंदीं ब्रह्मानंद सहजचि ॥५४॥
पिंडाचें मूळ ब्रह्मांड असे ॥ ब्रह्मांडाचें मूळ हिरण्यगर्भ वसे ॥ हिरण्यगर्भ म्हणावें विष्णूस ॥ विष्णु उल्लेख उल्लेखीं ब्रह्म ॥५५॥
स्थूळाचें मूळलिंगदेह जाण ॥ लिंगदेहाचें मूळ तें कारण ॥ कारणाचें मूळ महाकारण ॥ महाकारणीं उल्लेख मूळ ॥५६॥
जागृतीस्वप्नाचें मूळ सुषुप्ती ॥ सुषुप्तीचें मूळ तुर्या म्हणती ॥ तुर्या मुराल्या उन्मनी जाणिजेती ॥ उन्मनी सुलीन ब्रह्मींची ॥५७॥
विपरीत अन्यथा ज्ञान ॥ यांचें मूळ अज्ञान ॥ अज्ञानाचें मूळ प्रकृति जाण ॥ प्रकृति पुरुषीं लीन ब्रह्मीं ॥५८॥
रज तम सत्व एक ॥ तिहींचें मूळ गुणसाम्य देख ॥ सुखसाम्य म्हणिजे उल्लेख ॥ उल्लेख ब्रह्मींचा अंकुर ॥५९॥
अकार तोचि उकार ॥ उकार तोचि मकार ॥ मकाराचें मूळ ओंकार ॥ ओंकार ब्रह्मींचा ॥२६०॥
ब्रह्मा तोचि विष्णु असे ॥ विष्णु तोचि सहज महेश ॥ महेश तो सर्वेश्वर अनायास ॥ सर्वेश्वर ब्रह्मीं ऐक्यचि ॥६१॥
अध:शून्य तो ऊर्ध्वशून्य ॥ ऊर्ध्वशून्य तोचि मध्यशून्य ॥ मध्यशून्य तें महाशून्य ॥ महाशून्य निरसूनि तदाकार ॥६२॥
यापरी ब्रह्मींची सांखळी ॥ कडीनें कडी मिळाली ॥ हें गुरु जाणे महाकिल्ली ॥ उघड केली श्रोते हो ॥६३॥
एकचि सूर्य नारायण ॥ सबाह्य विश्वाचें नेत्रीं व्यापून ॥ कोणत्या जातिपंथाचें देखण ॥ सूर्यावेगळें देखावें ॥६४॥
अवघ्या जातींची रसना ॥ सेवी एकचि स्वाद जाणा ॥ सारिखाचि स्वाद जाणा ॥ भिन्न भिन्न नसे कीं ॥६५॥
सकळांस सारिखी झोंप ॥ वृत्तीचा सुषुप्तीं होय कल्प ॥ उगवे जागृतीचा रोप ॥ विश्वास अवस्था सारिखी ॥६६॥
अवघी बेरीज एक ॥ हा श्रीगुरुनें घातला अंक ॥ ही अढळ रोविली मेख ॥ नाउपडे भेदितां कल्पांतीं ॥६७॥
आत्मप्रचीतीचें ज्ञान ॥ प्रांजळ केलें अर्थ फोडून ॥ जें ऐकोनि निवती सज्जन ॥ निमग्न होऊनि डोलती ॥६८॥
बहुग्रंथीं मांदुसांत ॥ कवीनें सांठविलीं होतीं अर्थरत्नें गुप्त ॥ तीं काढून करतळामळ दाविली दिसत ॥ संशय गेला पुसावयाचा ॥६९॥
वर्षाव केला ज्ञान धबाबा ॥ ऐकोनि शाहाणे म्हणती अबाबा ॥ हांकारती या रे लहान थोर बाबा ॥ घ्या रे लाभ सुखाचा ॥२७०॥
आध्यात्मनिरुपणाची मात ॥ केला अर्थ प्रगट सिध्दांत ॥ नामही सिध्दांतबोध मिरवत ॥ हा बडिवार श्रीगुरुचा ॥७१॥
अनंतधारा एक पाणी ॥ बहु अक्षरें एक वाणी ॥ तैसी तत्वांची ठेवणी ॥ एकरुपीं लक्षावी ॥७२॥
लोणी आणि माखण ॥ तेवीं जन आणि जनार्दन ॥ तैसे केलें देखणं ॥ श्रीगुरुरायें जाण पां ॥७३॥
मी ब्रह्म माझे चोहटा ॥ तोचि मुक्तीचा दारवंटा ॥ हें नेणोनि शिष्टा कष्टा ॥ त्यासि उपाय काय ज्ञात्यांचा ॥७४॥
सर्वांच्या मनीं व्हावी मुक्ती ॥ याची तोडितों भ्रांती ॥ सांगतों चारी मुक्ती ॥ कोण कोण त्या ऐकाव्या ॥७५॥
वैकुंठीं नांदावें ती सलोकता ॥ देवासमीप असावें ती समीपता ॥ देवासारिखें असावें ती स्वरुपता ॥ देवचि व्हावें सायुज्यता ती नांवें ॥७६॥
प्रळयीं देवासीच ग्रासील काळ ॥ तेव्हां मुक्तीचा काय कोल्हाळ ॥ वैकुंठ सत्यलोक ढांसळेल ॥ मुक्तीलागीं कोण पुसे ॥७७॥
मुक्ती म्हणजे कल्पना ॥ कल्पित ब्रह्मांड जाणा ॥ स्वप्नांत राव होऊनि भोगी शयना ॥ जागृतीं शाश्वत काय तें ॥७८॥
एकचि स्वरुप तदाकार ॥ तेथें द्वैतास कैंचा थारा ॥ मुक्ति मृगजळवत् बाजार ॥ रज्जूवरी सर्पाचि कल्पना ॥७९॥
टिटवी सारी रात जागे ॥ सत्कथेचा भाग लागे ॥ तेवीं श्रम वाउगे ॥ मुक्तीचें कारण अज्ञाना ॥२८०॥
मुळीं बध्दताचि नाहीं ॥ तेथें मुक्तता कैंची पाहीं ॥ नळिके बांधलाचि नाहीं ॥ व्यर्थ फडफडीं संशयानें ॥८१॥
श्वान दर्पणमंदिरीं प्रवेशला ॥ अवघीं श्वानें पाहों लागला ॥ भुंकभुंकोन घाबिरा जाहला ॥ पाहा मौज दुसरें नसतां ॥८२॥
मुठींत चण्याची आशा ॥ मर्कट गुंतोनि बैसला कैसा ॥ तैसा संशयाचा वळसा ॥ माजी पडिलें अज्ञान ॥८३॥
प्रतिंबिंबिं सिंहें उडी टाकिली ॥ गगनींचीं नक्षत्रें समुद्रीं भासलीं ॥ हंसें मुक्ताफळें भाविलीं ॥ बुडोनि मेलीं वृथाचि ॥८४॥
एकाचा हात उरावर पडिला ॥ महाघोरें बरळों लागला ॥ दुसर्‍यानें सावध केला ॥ म्हणे भूत बैसलें उरावरी ॥८५॥
बहुपोरांची करुन मेंढी ॥ एक वाघ होवोनि मारी मुसांडी ॥ मौज पाहतां श्रम सांडी ॥ सत्य काय मानावें ॥८६॥
हुतुतू खेळतां एकाचा गडी मेला ॥ एकाचा गडी उठला ॥ सत्य काय बोला ॥ विनोद काय ऐकावें ॥८७॥
पुरुष स्त्रीचें सोंग घेऊनि आला ॥ घरी बायकोच्या काय रांडवा जाहला ॥ उगाचि भेद भ्रांति गलबला ॥ किती म्हणोनि सांगावें ॥८८॥
फाल्गुन शुध्द पौर्णिमेसी ॥ कोण श्रृंगार चढे मनुष्यांसी ॥ गर्जना करिती शंखध्वनीसी ॥ सर्वांमुखीं अपशब्द ॥८९॥
हे असो विनोदगोष्टी ॥ आत्मज्ञानाविण चावटी ॥ धन्य तेचि जगजेठी ॥ जिहीं जोडिला पुरुषार्थ ॥२९०॥
भले मर्द गाजी ॥ मही जिंकिली संसारबाजी ॥ त्यांसी ईश्वर होऊनियां राजी ॥ केले मिरासी सुखाचें ॥९१॥
पदरीं असेल सुकृतठेवा ॥ तरीच घडे सद्गुरुसेवा ॥ नाहीं तरी हतदैवा ॥ हातीं नरोटी भिकेची ॥९२॥
गुरु बोलतां देव ॥ घडे सुखाचा उपाव ॥ भाषणें संतोष पावे जीव ॥ निवे तनू आणि मन ॥९३॥
उगाचि देउळीं जाऊनि बैसला ॥ देव मुका कोण पुसे सुखदु:खांला ॥ यापरी जन भुलला ॥ दगडा पाठीं लागला ॥९४॥
सजीव चैतन्य श्रीगुरुमूर्ती ज्ञानविग्रहो प्रकाशज्योती ॥ कृपाळु दयाळु उदारकीर्ती ॥ निरसी भ्रांती शिष्याची ॥९५॥
ज्यासि अक्षयी ज्ञानपूर्णिमा ॥ न दिसे अपूर्णतेची अमा ॥ त्यावर स्तवावया नाहीं उपमा ॥ करी सीमा परमार्थाची ॥९६॥
सर्वही परमार्थाचें मूळ ॥ एक सद्गुरुचि दयाळ ॥ करी कृपेचा कल्लोळ ॥ उध्दरी तत्काळ शिष्यांसी ॥९७॥
गुरुरवी उदेल्यावरी देखा ॥ मगकैंची सिनीवाली राका ॥ जेथें हरपे अवघी आशंका ॥ उडुगणांचा लेखा कोण करी ॥९८॥
जो शिवादिकांचा पाया ॥ रामकृष्णपूजेचें आचार्या ॥ मग इतर लोकांच्या पर्याया ॥ कोण आणी लेखासी ॥९९॥
तो गुरु जाहला कृपाळू ॥ परिपूर्ण रसिक कल्लोळू ॥ वर्षला ज्ञान शुध्दी परिमळू ॥ चकोर शाहामुनी तृप्त सदा ॥३००॥
इति श्रीसिध्दांतबोध अध्यात्मनिरुपणतत्वसारनिर्णये चतुस्त्रिंशोत्तमोऽध्याय: ॥३४॥
अध्याय ॥३४॥ ॥ओव्या॥३००॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥६॥

N/A

References : N/A
Last Updated : November 22, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP