मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|सिध्दान्तबोध|
अध्याय १७ वा

श्रीसिध्दान्तबोध - अध्याय १७ वा

‘श्रीसिध्दान्तबोध’ हा संतकवि श्रीशहामुनि यांचा ग्रंथ म्हणजे मराठी साहित्याच्या खाणींतील एक तेजस्वी हिरा आहे.


श्रीगणाधिपतये नम: ॥ श्रीगुरुभ्यो नम: ॥
तुज नमो जी दातारा ॥ कृपावंता परमेश्वरा ॥ दयासागरा करुणाकरा ॥ चरणीं थारा मज देई ॥१॥
मी नेणें विचागगोष्टी ॥ म्हणोनि चरणीं घातली मिठी ॥ मायबापा जगजेठी ॥ सांठवीं पोटीं मज दीना ॥२॥
मी अन्यायाची राशी ॥ कोटि अपराधी लंड तामसी ॥ महाराजा हृषीकेशी ॥ मज पामरासी क्षमा करीं ॥३॥
बहुत केलें खोटें कर्म ॥ आचरलों क्रियाभ्रष्ट धर्म ॥ अधमापरीस मी अधम ॥ दुष्ट परम दुरात्मा ॥४॥
चहाडी चोरी साधुनिंदा ॥ ऐसिया आचरलों अपराधा ॥ सर्वदा संसार दुर्मति धंदा ॥ नाहीं गोविंदा तुज भजलों ॥५॥
पापराशींचें समुद्र भरले ॥ पुण्य पाहतां न दिसे राईतुलें ॥ कोण्या गुणें तुमचीं पाउलें ॥ प्राप्त होतील आमुतें ॥६॥
नाहीं आयुर्भाग्यनिधि ॥ तेणें तरी पुण्याची करुं वृध्दी ॥ अवघ्या दुर्बळत्वाची आदी ॥ माझ्या ठायीं भीनली ॥७॥
आतां कोणत्या उपायें दातारा ॥ मज प्राप्त होसी परमेश्वरा ॥ परी एक आश्रय शार्ड्गधरा ॥ दिसतो मातें साक्षीनें ॥८॥
जो शरण आला तुम्हांसी ॥ त्याचे गुणदोष न पाहसी ॥ ऐसें बिरुद तुम्हांपासी ॥ साक्ष देती पुराणें ॥९॥
लोह परिसासी स्पर्शतां ॥ निरसे काळिमा तत्वतां ॥ तेंवी तुझें नाम जपतां ॥ उडे कलंक पापाचा ॥१०॥
घेतां अमृताचा लेश ॥ होय सकळ दोषांचा नाश ॥ तैसा स्मरतां जगदीश ॥ जाती दोष दुरितांचें ॥११॥
म्हणोनि अनन्यभावें शरण ॥ आलों तुझिये नामीं जाण ॥ माझ्या पापाचे अवगुण ॥ कोठें राहतील भगवंता ॥१२॥
सूर्यापुढें अंधकार ॥ केवी राहों शके पामर ॥ तेवीं तुझ्या नामे साचार ॥ जाय दुस्तर निरसोनी ॥१३॥
ऐसा अनुभवाचा ठसा ॥ हृदयीं उमटला आपैसा ॥ जाहला कृपेचा भरंवसा ॥ कोण भीतो भवभया ॥१४॥
भवभयाची काहाणी ॥ जाहली स्वप्नतुल्य आम्हांलागुनी ॥ ऐसी परमेश्वराची करणी ॥ होती पावन नामानें ॥१५॥
नाम सकळ जन म्हणती ॥ परी श्रेष्ठ नाम चुकती ॥ ज्या नामें मोक्षगती ॥ तें नेणती अज्ञान ॥१६॥
ज्या नामें जोडे मोक्षपट ॥ तें नाम नाहीं गा प्रगट ॥ होय गुरुकृपा श्रेष्ठ ॥ तेव्हां प्राप्ति शिष्यासी ॥१७॥
शिष्य बहुत जन जाहले ॥ परी मोक्षफळातें चुकले ॥ संशय कल्पांती गुंतले ॥ कार्याकारण न पाहती ॥१८॥
गुरुपासूनि मंत्र घेती ॥ त्याचा विचार नाहीं चित्तीं ॥ स्नान करुन विभूति लाविती ॥ मंत्र जपती सावकाश ॥१९॥
गुरु कोण आपण कोण ॥ याचा अनुभव न करी जन ॥ पुढे आत्मशुध्दीचें ज्ञान ॥ प्राप्त होय कैसेनी ॥२०॥
बहुतप्रकारें शोधून ॥ गुरु करावा ज्ञानसंपन्न ॥ नाहीं तरी भांबावती जन ॥ नेणतां कान फुंकोनी ॥२१॥
ज्यास पोहतां नये वरसे ॥ दुसरा धरी कांसे ॥ दोघें बुडती अनायासें ॥ कोण काढी कोणातें ॥२२॥
तैसे गुरुशिष्य दोन्ही ॥ पडती चौर्‍यायसींच्या खाणीं ॥ म्हणोनि पुरत्या ज्ञानावांचोनी केला उपदेश तो व्यर्थ ॥२३॥
बहुत जनाच्या ठायीं ॥ मागें विपरीत जाहलें पाहीं ॥ पुसों जाताम अनुभव कांहीं ॥ आपुलेंच दाविती श्रेष्ठत्व ॥२४॥
जो तो म्हणतो मीच श्रेष्ठ ॥ माझा मार्ग सर्वां वरिष्ठ ॥ ऐसें बोलती घरोघरीं स्पष्ट ॥ आपुली सिराणी सांगती ॥२५॥
बहुतांसी गेलों शरण ॥ आपुल्या स्वार्थालागुन ॥ बहुत केलें मंत्रपठण ॥ त्यांत भ्रांति निरसेना ॥२६॥
मग पडलों संदेहाचे ठायीं ॥ स्मृतिभ्रंश जाहल पाहीं ॥ त्यावरी दृढता धरोनि हृदयीं ॥ अनुष्ठानीं बैसलों ॥२७॥
आपुल्या शक्तिप्रमाण ॥ षण्मास आचरलों अनुष्ठान ॥ प्रसन्न जाहला श्रीभगवान ॥ तेणें अनुभव दीधला ॥२८॥
तो दत्तात्रेय जगद्गुरु ॥ मुख्य परमेश्वरु अवतारु ॥ तेणें करुनि अंगिकारु ॥ मस्तकीं हस्त ठेविला ॥२९॥
त्याचे कृपेचा पूर्ण बोध ॥ हृदयीं जाहला अनुभव सिध्द ॥ तोचि विस्तारिला सिध्दांतबोध ॥ आज्ञा होतां श्रीगुरुची ॥३०॥
त्या गुरुसी करुनि नमन ॥ केलें पूर्वपक्षीं निरुपण ॥ षोदशाध्यायपर्यंत जाण ॥ ऋषिभाष्य निरुपिलें ॥३१॥
प्रथमाध्यायीं वदती ॥ विश्वाची सांगितली मती ॥ नाना उपासनेची शक्ती ॥ प्रगट केली श्रोतियां ॥३२॥
तयावरी अनेक दृष्टांत ॥ निमाल्या यमजाच होत ॥ केल्या कर्माचें संचित ॥ पत्र वाचिलें चित्रगुप्तें ॥३३॥
मग द्वितीयाध्यायीं जाण ॥ सांगितलें नारदाचें कथन ॥ पुढें ऋषिभाष्य निरुपण ॥ स्तवन केलें स्वर्गाचें ॥३४॥
तेंही निरसोनियां एक ॥ मग स्तविला सत्यलोक ॥ ब्रह्मा ईश्वर हाचि विवेक ॥ तृतीयाध्यायीं दाविला ॥३५॥
तयावरी एकान ॥ ब्रह्मयासी केलें नैश्चरपण ॥ विशेष स्तविला रमारवण ॥ विष्णुमहिमा दाविला ॥३६॥
चौथ्या अध्यायाचे अंतीं ॥ विष्णुचि ब्रह्म वदतां महती ॥ तों आणिक एक पुढती ॥ नव्हे ऐसें बोलिला ॥३७॥
केलें विष्णूचें निरसन ॥ सांगितलें जालंधराचें आख्यान ॥ इतुक्यांत चतुर्थाध्याय जाण ॥ समाप्तीतें पावला ॥३८॥
पंचम षष्ठ अध्यायीं निरुपण ॥ सांगितलें मारुतीचें गहन ॥ गरुड बळिरामांचा अभिमान ॥ सत्यभामेसहित हारिला ॥३९॥
सप्तम प्रसंगांत ॥ सांगितली वृंदेची मात ॥ अनेक दृष्टांतांचे अर्थ ॥ देऊनि विष्णु निरसिला ॥४०॥
अष्टमाध्यायीं जाण ॥ केलें कैलासींचें स्तवन ॥ श्रियाळचागुंणेचें आख्यान ॥ नवव्यापर्यंत सांगितलें ॥४१॥
दशमप्रसंगाभीतरीं ॥ बहुत स्तविला त्रिपुरारी ॥ पुढती एके ऋषीश्वरीं ॥ निरसन केले शिवासी ॥४२॥
एकादश अध्यापर्यंत ॥ निरसिलें ब्रह्मांविष्णु समस्त ॥ मग द्वादश अध्यायांत ॥ स्तवन केलें मायेचें ॥४३॥
तंव आणिक एक मुनि ॥ माया निरसली तत्क्षणीं ॥ सांगितली शुकाची कहाणी ॥ लज्जित केली अप्सरा ॥४४॥
तेरा चौदावें अध्यायीं निरुपण ॥ सांगितलें पंचभूतांचें महिमान ॥ पुन: त्यांचेंही निरसन ॥ त्याचि अध्यायीं सांगितलें ॥४५॥
पंचदशीं पंचीकरणाची ॥ सांगितली घडामोडी तत्वांची ॥ उत्पत्ति संहार एकात्मतेची ॥ अत्यंत गोडी दाविली ॥४६॥
षोडशाध्यायाभीतरी सांगितली द्वैतअद्वैतांची भरोवरी ॥ प्रकृति-पुरुष एकसरीं ॥ तोही निर्णय दाविला ॥४७॥
बहुत मतें बहुत ज्ञान ॥ बोलिले ऋषीश्वर मिळोन ॥ इतुकेनी सोळा प्रसंग ॥ समाप्तीतें पावले ॥४८॥
पुढे महिभट्टाचें ज्ञान ॥ केलें सविस्तर कथन ॥ मग गंगातीरीं जाऊन ॥ अनुष्ठानीं बैसला ॥४९॥
इतुक्या निरुपणाचे ठायीं ॥ पूर्वपक्ष जाहला पाहीं ॥ बहुत ऋषींचें हृदयीं ॥ परिसतां स्वानंद ॥५०॥
आतां येथून उत्तरार्ध ॥ अपूर्व निरुपणाचा स्वाद ॥ श्रोतयां होईल आनंद ॥ तैसें वदेन गुरुकृपें ॥५१॥
महिभट्टें अनुष्ठान ॥ केलें एक संवत्सर जाण ॥ परमपुरुषातें लक्षून ॥ निश्चयो धरिला परब्रह्मीं ॥५२॥
मग तेथें नवल वर्तलें ॥ अव्यक्त स्वरुप व्यक्तीस आलें ॥ परब्रह्म साकारलें ॥ महिभट्टाकारणें ॥५३॥
जो देवाधिदेव ॥ ज्यासी म्हणती निरवयव ॥ तोचि जाहला जी सावयव ॥ भक्तिभावाकारणें ॥५४॥
जो चैतन्य मायापरौता ॥ देव नेणती ज्याची वार्ता ॥ तिहीं देवांवरी ज्याची सत्ता ॥ तो पुरुष अवतरला ॥५५॥
ज्यासी म्हणती परमेश्वर ॥ तो उत्तम पुरुष निर्विकार ॥ सकळ देवां अगोचर ॥ परात्पर स्वयंज्योती ॥५६॥
जो महातेजाचें तेज ॥ जें सकळ निजांचें निज ॥ जें गुह्याचें गुप्त गुज ॥ तें साकारलें सगुणत्वें ॥५७॥
पवित्र गंगेचिया तटीं ॥ उभी सगुणमूर्ति गोमटी ॥ विद्युल्लतेच्या मिळोनि कोटी ॥ सांडणें होती मुखावरुनी ॥५८॥
पाहा त्या चरणांची शोभा ॥ अनंत भानूंचें बिंब गाभा ॥ भुजा दिसती स्वयंभा ॥ अभय पाणी उभारिले ॥५९॥
महिभट्टें अवलोकून नयनीं ॥ मूर्ति बिंबली हृदयभुवनीं ॥ सबाह्यांतरीं व्यापुनी ॥ मनोवृत्तीतें कोंदली ॥६०॥
हृदयीं जाहला सद्गदित ॥ शरीर जाहलें रोमांचित ॥ नेत्रीं ढळतीं अश्रुपात ॥ प्रेमें हृदयीं दाटला ॥६१॥
उभय जोडुनी पाणी ॥ मस्तक ठेविलें स्वरुपचरणीं ॥ साष्टांग दंडवत घालोनी ॥ स्तुति करुं लागला ॥६२॥
मग म्हणे जी दातारा ॥ कृपावंता परमेश्वरा ॥ मज शरणागतां किंकरा ॥ दर्शन दिलें स्वामिया ॥६३॥
मज अनाथासी सनाथ ॥ करावया तूं समर्थ ॥ आतां पुरती मनोरथ ॥ होईल परिहार कर्माचा ॥६४॥
पुरषोत्तमा जगन्नायका ॥ सर्वोत्तमा विश्वपाळका ॥ पूज्य होसी ब्रह्मादिकां ॥ माझा केवा तो किती ॥६५॥
परंतु माझ्या अल्प भावीं ॥ कृपा केलीजी गोसावीं ॥ पडिलों संशयाचे डोहीं ॥ तेथूनि काढीं दयाळा ॥६६॥
तुझें होता दर्शन स्पर्शन ॥ त्रिताप गेले पळोन ॥ स्वस्थ जाहलें अंत:करण ॥ बहु उल्लासलीं मनबुध्दीं ॥६७॥
आता होऊनियां औदार्य ॥ प्रगटीं बोधभानु सूर्य ॥ माझी भ्रांतिनिशा अंधार्य ॥ निरसीं दयासागरा ॥६८॥
बहुत मते बहुत ज्ञान ॥ पाहिलीं शास्त्रें पुराणें शोधून ॥ परी संशय भ्रांतीचें भान ॥ कांहीं केलिया शमेना ॥६९॥
चहूं वेदींचें विवरण केलें ॥ आगमनिगमांतें शोधिलें ॥ उपनिषदां नाहीं ठेविलें ॥ मीमांसातर्क इत्यादी ॥७०॥
केलें तपादि साधन ॥ प्राणापाननिरोधन ॥ इडा पिंगळा सुषुम्नेपासून ॥ षट्‍चक्रें शोधिलीं ॥७१॥
चतुर्दळ षट्‍दळ ॥ द्वादश आणि षोडश दळ ॥ द्विदळा वरुतें सहस्त्रदळ ॥ बावन मातृका पाहिल्या ॥७२॥
बहुत केलीं तीर्थाटणें ॥ अनेक व्रतांचीं उपोषणें ॥ शरीर जर्जर जाहलें तेणें ॥ सुखाचा लेश न मिळेची ॥७३॥
म्हणोनि तुमचा भरंवसा ॥ धरोनि बैसलों परमपुरुषा ॥ आतां पुरवीं मनींची आशा ॥ तूं सुवसा दीनांचा ॥७४॥
दीनानाथा दीनबंधु ॥ मायबाप कृपा सिंधु ॥ मज करीं आत्मबोधु ॥ साक्षात्कार तव स्वरुपीं ॥७५॥
तुझ्या स्वरुपीं समरसता ॥ मज द्यावी जी तत्त्वतां ॥ म्हणोनि चरणीं ठेविला माथा ॥ अनन्य भावेम भट्टानें ॥७६॥
पाहोनि भट्टाचा प्रेमा ॥ धीर न धरवे पुरुषोत्तमा ॥ मग आलिंगन दीधलें क्षेमा ॥ मुख स्पर्शिलें स्वहस्तें ॥७७॥
अमृतापरीस गोड प्रांजळ ॥ चापेकळिकेहूनि कोमळ ॥ शब्द बोलिला रसिक मंजुळ ॥ आदिपुरुष भट्टासी ॥७८॥
जगदीश म्हणे भट्टासी ॥ काय कामना तुझे मानसीं ॥ ते सांगिजे मजपासीं ॥ पूर्ण करीन यथार्थ ॥७९॥
सर्व जाणता तूं संपन्न ॥ किमर्थ केलें माझे ध्यान ॥ काय इच्छीतसें मन ॥ तें मज सांगें द्विजवर्या ॥८०॥
बहुत श्रमलासी मजकारणें ॥ त्याचें करीं आजि पारणें ॥ तृप्ति होईल मम वचनें ॥ पुन: क्षुधा न लागेचि ॥८१॥
ऐसें वदतां परमेश्वर ॥ ब्राह्मण करी नमस्कार ॥ म्हणे तूं कृपेचा सागर ॥ हेलावशी मज दीना ॥८२॥
म्यां विनवावें तुम्हांसी ॥ एवढी साम्यता कैंची मजसी ॥ खद्योत आपुले तेजासी ॥ काय मिरवे रविसंगें ॥८३॥
तुजसी करावया गोष्टी ॥ सामर्थ्य नाहीं हरिहरां पोटीं ॥ ब्रह्मादिक होती हिंपुटी ॥ तुजसाठीं महाराजा ॥८४॥
स्तवावया आपुलें एक तोंड ॥ सहस्त्र जिव्हा जाहल्या दुखंड ॥ चहूं वेदांचें महाबंड ॥ जाहले त्रिखंड तीं ठाई ॥८५॥
तरी न कळे तुझी व्याप्ती ॥ मौनावली वेदांची स्फूर्ती ॥ मग ऋषि मानवांची गती ॥ काय वद ती मिरवेल ॥८६॥
मी तंव दीन ब्राह्मण ॥ तुम्हालागीं अनन्य शरण ॥ माझें दुर्बळाचें वचन ॥ अंगिकारिसी जगदीशा ॥८७॥
आतां ऐका करुणाघना ॥ करितों पायांसी विज्ञापना ॥ पुसावया मनकामना ॥ उल्लासलीसे तुजपाशीं ॥८८॥
अपार सृष्टीच्या ठायीं ॥ तुझें व्यापारकृत्य असे पाहीं ॥ सुर असुरांचें हृदयीं ॥ साक्षी होऊनि वससी ॥८९॥
चैतन्य माया आदिकरुन ॥ जाणसी चराचर थोर सान ॥ सिध्द योगी ऋषीचें ज्ञान ॥ तेंही ठाऊक तुजलागीं ॥९०॥
वेदशास्त्रांचा गुह्यार्थ ॥ त्याचा जाणता तूं अनंत ॥ सृष्टीमाजी जो पदार्थ ॥ तोही गम्य गुम्हांसी ॥९१॥
समुद्राची उंची खोली ॥ पृथ्वी किती योजनें विस्तारली ॥ कित्येक आकाशाची पोकळी ॥ तुझे दृष्टिगोचर ॥९२॥
तुजसमान पुरुष दुसरा ॥ कवण उपमू परमेश्वरा ॥ यालागीं विनंति अवधारा ॥ स्वल्प निवेदितों पायांसी ॥९३॥
या ब्रह्मांडाभीतरीं ॥ देव किती असती चराचरीं ॥ श्रेष्ठ कनिष्ठ कोणेपरी ॥ निवडोनि सांगा स्वामिया ॥९४॥
कैसी प्रपंचाची रचना ॥ कवणापासूनि नारायणा ॥ याची करोनियां विवंचना ॥ मातें सांगा कृपाब्धी ॥९५॥
जीव हा काय पदार्थ ॥ कीं जाहला मायेचा निर्मित ॥ किंवा तुझ्या स्वरुपीं उत्पन्न होत ॥ किंवा आईता अनादी ॥९६॥
स्वयंज्योति परमेश्वर ॥ सकळ व्यापक परात्पर ॥ तुझ्या स्वरुपाचा निर्धार ॥ तोही मातें परिसवी ॥९७॥
या चोहों प्रश्नांची विनंती ॥ कृपेनें सांगा जी मजप्रती ॥ हें परिसोनि जगदीश चित्तीं ॥ मस्तक डोलवी स्वानंदें ॥९८॥
हास्य करोनि श्रीभगवान ॥ म्हणे ब्राह्मणा तूं एक जगीं धन्य ॥ एवढा विशाळ प्रश्न गहन ॥ पुसिला मातें साक्षेपें ॥९९॥
त्वां पुसिलें चोहों प्रश्नांस ॥ कीं चौं वेदांचे मुख्य कळस ॥ अथवा चौंपदांचे रहस्य ॥ नातरी चारी पुरुषार्थ ॥१००॥
तुझ्या चौं प्रश्नांचें उत्तर ॥ कीं चौं मुक्तींचें माहेरघर ॥ त्यापरता जो विचार ॥ तोही पुसिला पुशित ॥१॥
आतां ऐकें सावधान ॥ एकाग्र करोनि अंत:करण तुझ्या प्रश्नाचें विवरण ॥ करोनि दावितों समग्र ॥२॥
तुझिया चौं प्रश्नांचें उत्तर ॥ कर्णी ऐकें सविस्तर ॥ प्रथम देवतांची सदर ॥ झाडा करुन सांगतों ॥३॥
अगा या ब्रह्मांडभीतरीं ॥ किती असती जीव निर्धारीं ॥ याचें गणित वेदशास्त्रीं ॥ नाहीं जाहलें यथार्थ ॥४॥
अठरा पुराणाची वदती ॥ तेहतीस कोटी देव सांगती ॥ तयापरतें ब्रह्म बोलती ॥ तन्मय होती तितुक्यांत ॥५॥
ब्रह्मा विष्णु महेश ॥ यांसीच म्हणती जगदीश ॥ भजावया प्रेम विशेष ॥ धरिती हरिहरांपासी ॥६॥
यांहिवरुतें कित्येक देव ॥ त्यांचा नेणती अनुभव ॥ तळीं राहिला विस्तार सर्व ॥ तोही न कळे शास्त्रांसी ॥७॥
अगा ये कर्मभूमीपासून ॥ मुख्य जो परमेश्वर आपण ॥ यामध्यें देवांचा विस्तार गहन ॥ ऐक सांगतों ब्राह्मणा ॥८॥
प्रथम कर्मभूमींत ॥ तेरा कोटि देव समस्त ॥ यांचा पसारा पृथ्वींत ॥ विस्तारलासे जाणपां ॥९॥
तेरा कोटि देवांनी ॥ सकळ व्यापिली मेदिनी ॥ विश्व लाविलें आपुलें ध्यानीं ॥ त्रास देती जीवांसी ॥११०॥
ठायीं ठायीं घुमती ॥ विशाळ चमत्कार दाविती ॥ पूजा लोकांपासूनि घेती ॥ नवस पुरविती इच्छिले ॥११॥
एकासी होती प्रसन्न ॥ एका करिती उपद्रव दारुण ॥ एकासी देती विद्या ज्ञान ॥ एकासी करिती पिशाच ॥१२॥
जनीं वनीं घरोघरीं ॥ देव बैसले देव्हारीं ॥ यांचीं बंडें पृथ्वीवरी ॥ विस्तारलीं बहुसाल ॥१३॥
जन आधींच अज्ञान ॥ नेणती आत्मशुध्दीचें लक्षण ॥ मग सकळदेवांलागून ॥ भजती ईश्वर म्हणोनि ॥१४॥
म्हणती देव देवी परिवार ॥ हाचि विस्तारला ईश्वर ॥ यात्रे जाती नारीनर ॥ जाहलें सार्थक बोलती ॥१५॥
जग हें देवाचे आधीन ॥ त्या देवास यक्षिणी स्वामिण ॥ तिची आज्ञा वंदून ॥ सकळ देव वर्तती ॥१६॥
सकळ देव आज्ञाधार ॥ त्या यक्षिणीचे किंकर ॥ तेंचि तेज महाउग्र ॥ सर्वांवरी वरिष्ठ ॥१७॥
ते विश्वाची सेवा घेत ॥ आपुलें ठायीं ईश्वरत्व मिरवित ॥ परी मोक्ष द्यावयाचा पदार्थ ॥ तिचे हातीं असेना ॥१८॥
यापरी कर्मभूमीची ॥ रचना सांगितली देवांची ॥ तयावरी अष्टकोनींची ॥ मांडणी तूतें सांगतों ॥१९॥
कर्मभूमिआंत ॥ तेरा कोटि देव समस्त ॥ त्यांचें मुख्य स्वामित्व ॥ यक्षिणीस असे कीं ॥१२०॥
त्या यक्षिणीवरतें विशाळ ॥ अष्टदेवकोणीचें मंडळ ॥ तेथें देव सांब प्रबळ ॥ त्याचा परिवार कोटि तेरा ॥२१॥
तेरा कोटींचा अधीश ॥ सांब असे नि:शेष ॥ अष्टदेवकोणिमंडळास ॥ आवरोनि असती सर्वही ॥२२॥
त्यांची सत्ता कर्मभूमीप्रत ॥ द्विगुणें चाले सामर्थ्य ॥ यक्षिणीचा पुरुषार्थ ॥ सांबापुढे चालेना ॥२३॥
म्हणोनि सांबासी ॥ यक्षिणी शरण अहर्निशीं ॥ यालागीं सामर्थ्य सांबासी ॥ यक्षिणी परीस द्विगुणित ॥२४॥
कर्मभूमीचे यक्षिणीसी ॥ सामर्थ्य नाहीं वरतें जावयासी ॥ यालागीं नीच ते परियेसी ॥ त्याहूनि सांब वरिष्ठ ॥२५॥
आतां सांबाचे ठायीं ॥ मोक्ष द्यावया सामर्थ्य नाहीं ॥ त्यावरिष्ठ असे पाहीं ॥ अंतराळींचें दैवत ॥२६॥
तो चित्रसेन गंधर्वराजा ॥ तेरा कोटी त्याच्या प्रजा ॥ तो सांबाचिया काजा ॥ पडिले संकटीं येतसे ॥२७॥
सांबापरीस सबळ त्रिगुण ॥ चित्रसेनाचा प्रताप गहन ॥ कर्मभूमीपर्यंत जाण ॥ सत्ता चाले तयाची ॥२८॥
सांबास दोनमंडळीं सत्ता ॥ चित्रसेना त्रिमंडळीं स्वामिता ॥ म्हणोनि सांबासी न्यूनता ॥ चित्रसेनापरीस ॥२९॥
गण गंधर्व तेरा कोटी ॥ त्याची अंतराळमंडळीं दाटी ॥ घेऊनि चित्रसेनाची भेटी ॥ त्याचे सेवे तिष्ठती ॥१३०॥
चित्रसेन दैवत अंतराळींचें ॥ परी मोक्ष द्यावया सामर्थ्य कैचें ॥ म्हणोनि भजन केल्या तयाचें ॥ उपयोग कांहीं पडेना ॥३१॥
आतां चित्रसेनाची थोरी ॥ दिसे अंतराळभीतरीं ॥ तयावरी स्वर्ग अवधारीं ॥ सुरमंडळीं विराजे ॥३२॥
मुख्य स्वर्गीचा अधिपती ॥ इंद्र राजा विशाळ मूर्ती ॥ तेहतीस कोटी देवांच्या पंक्ती ॥ सादर असती सेवेशीं ॥३३॥
तेहतीस कोटी देवांची संख्या ॥ स्वर्गभुवनीं वसती देखा ॥ त्यांत स्वामित्व इंद्रादिकां ॥ अमरपुरीं विराजे ॥३४॥
कामधेनु पारिजात ॥ कल्पतरु असंख्यात ॥ चिंतामणि परीस बहुत ॥ इंद्रलोकीं आसती ॥३५॥
चित्रसेनाहून विशेष ॥ चतुर्गुण सामर्थ्य इंद्रास ॥ यालागीं चित्रसेन सेवेस ॥ आर्जवुनी असे इंद्रासी ॥३६॥
जे विषयास जिंकिती ॥ कामवासना निरोधिती ॥ त्यांसि स्वर्गलोकीं वस्ती ॥ प्राप्त होय अनायासें ॥३७॥
करिती शतभरी यज्ञ ॥ अश्वमेध याग संपन्न ॥ समरंगणीं त्यजिती प्राण ॥ तयाप्राप्ति स्वर्गाची ॥ अपार करिती द्रव्यदानें ॥ वस्त्रें भूषणें गोधनें ॥ अश्व हत्ती भूदानें ॥ करितां प्राप्ति स्वर्गाची ॥३९॥
इतुकीं आचरणें करिती ॥ तेव्हा स्वर्गाची घडे वस्ती ॥ पुण्य सरतांचि पतन पावती ॥ मोक्षगति त्यां नाहीं ॥१४०॥
हेंचि ब्राह्मणा नवल देख ॥ स्वर्गीच नाशिवंतसुख ॥ हेंहि जाणोनि मूर्खलोक ॥ पुण्यमार्गे धांवती ॥४१॥
यापरी स्वर्गलोकीं ॥ मोक्ष कैंचा अवलोकीं ॥ हावें भरोनि अविवेकी ॥ त्याची प्रवाहीं लोटले ॥४२॥
जो स्वर्गाचा सहस्त्रनयन ॥ त्यासी दैत्यकलह दारुण ॥ म्हणोनि परमेश्वरगुण ॥ त्याचे ठायीं नसे कीं ॥४३॥
कर्मभूमीच्या देवता होती ॥ परीपरमात्मा न होती ॥ यालागीं त्यांचे ठायीं भक्ति ॥ धरितां मोक्ष जोडेना ॥४४॥
तयावरतें अष्टमंडळ ॥ तेरा कोटि देव प्रबळ ॥ परि परमात्मा आढळ ॥ नव्हे विशाळ मोक्षदानीं ॥४५॥
तयावरतें अंतराळीं ॥ तेरा कोटी देवांची मंडळी ॥ परी परमेश्वर नव्हती न्याहाळी ॥ मोक्ष विश्रांति मग कैंची ॥४६॥
तैसें स्वर्गाच्या ठायीं ॥ तेहतीस कोटी देव पाहीं ॥ सामर्थ्यवान् असोनिही ॥ परमात्मा न होती निश्रयें ॥४७॥
कर्मभूमि स्वर्ग पर्यंत ॥ सांगितले देव समस्त ॥ परी परमेश्वराचें कर्तृत्व ॥ अणुमात्र असेना ॥४८॥
यापरी जगदीश आपुल्या मुखें ॥ बोलिला ब्राह्मणा विवेकें ॥ तें परिसोनि द्विज सन्मुखें ॥ विस्मय करी मानसीं ॥४९॥
अनुभव आणोनि मनास ॥ पुढें पुसेल प्रश्न देवास ॥ तेंहीं अनुपम रहस्य ॥ दिसों येईल सहजची ॥१५०॥
प्राकृत ग्रंथ फार जाहले ॥ संस्कृतआधारें बोलिले ॥ तैसे येथें नाहीं जाहलें ॥ नसे टीका ग्रंथाची ॥५१॥
नसतां श्लोकाचा आधार ॥ ग्रंथ चाले सविस्तर ॥ हेंचि अपूर्व साचार ॥ परिसा तुम्ही श्रोतेहो ॥५२॥
इतर ग्रंथांचे ठायी ॥ जें निरुपण प्रगट नाहीं ॥ तेंचि विस्तारलें येथें पाहीं ॥ तरीच कौतुक देवाचें ॥५३॥
जें नाही देखिलें ऐकिलें ॥ तेंचि जाईल येथें निरुपिलें ॥ श्रवणार्थी तेंचि वहिलें ॥ ज्यावरी असे गुरुकृपा ॥५४॥
गुरुसमान ज्ञानदाता ॥ न दिसे ब्रह्मांडीं पाहतां ॥ यालागीं चरणीं ठेविला माथा ॥ अनन्यभावें कवीनें ॥५५॥
कवि फार जाहले कलींत ॥ ज्यांचे कीर्तीची वाजे नौबत ॥ त्यांत माझी टिमकी किंचित ॥ काय टणटणा वाजेल ॥५६॥
परी एक तुळसीदळ घालोन ॥ कृष्णातें सोडवी रुक्मिण ॥ शुकें स्पर्शितां शीतकण ॥ स्वर्गघंटा घणघणी ॥५७॥
तैसें ईश्वराचें करणें ॥ अल्प तें बहु विस्तारणें ॥ सूर्यबिंब दिसे सानें ॥ परि प्रकाश पसरे ब्रह्मांडीं ॥५८॥
दीपकळिकेची लहान ज्योती ॥ परी बहुत प्रकाशते धरी ती ॥ तैसी शहामुनीची मती ॥ ग्रंथ वदती अपार ॥१५९॥
इति श्रीसिध्दांतबोधग्रंथे अध्यात्मनिरुपणतत्वसारनिर्णये सप्तदशोध्याय: श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ अध्याय ॥१७॥ ओंव्या ॥१५९॥   

N/A

References : N/A
Last Updated : November 21, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP