मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|सिध्दान्तबोध|
अध्याय ४३ वा

श्रीसिध्दान्तबोध - अध्याय ४३ वा

‘श्रीसिध्दान्तबोध’ हा संतकवि श्रीशहामुनि यांचा ग्रंथ म्हणजे मराठी साहित्याच्या खाणींतील एक तेजस्वी हिरा आहे.


श्रीगणाधिपतये नम: ॥ श्रीगुरुभ्यो नम: ॥
गणेश सरस्वती श्रीगुरु ॥ एकरुपें आत्मा साचारु ॥ श्वेत उष्मा प्रकाशे भास्करु ॥ काय भेद कल्पावा ॥१॥
बुदबुदा लहरी सागर ॥ थंड कठिण मऊ सागर ॥ शेला सूत कापूस तीन प्रकार ॥ मुळीं विचार एकची ॥२॥
एकाचे अनेक अनेकीं एक ॥ सुवर्णी अलंकार नगीं कनक ॥ शून्यापासोनि लक्ष आंख ॥ शेवटीं शून्य एकचि ॥३॥
यापरी अभेदभावना ॥ नमूं विश्वमय जनार्दना ॥ मोडूनि भेदाची कल्पना ॥ अभेदभेदीं समरसलों ॥४॥
त्याच भेदाचा हृदयीं भर ॥ उठे जी विवेक विचार ॥ बिंदु अक्षरें उमटती अपार ॥ ग्रंथपीठिका रचितसें ॥५॥
परिसा चरित्र सावकाश ॥ ज्यांत अनुभव अत्यंत रहस्य ॥ गोड सुढाळ प्रांजळ सुरस ॥ निर्मळ चोख चांगलें ॥६॥
गौडबंगाल देश उत्तरखंडाप्रती ॥ तेथील राजा तिलकचंद सुमती ॥ पराक्रमी विशाळकीर्ती ॥ दयावंत धर्मात्मा ॥७॥
त्याची भार्या लावण्यखाणी ॥ चातुर्याची शिरोमणी ॥ सखोल सरळ सुलक्षणी ॥ नाम तिचें मैनावती ॥८॥
हृदयकमळीं एकचि शुध्द ॥ जन्मला पुत्र गोपीचंद ॥ ज्याच्या कीर्तीचा छंद ॥ विश्वामुखीं विस्तार ॥९॥
जाहलीं द्वादश वर्षें पुत्रास ॥ पित्यानें केला स्वर्गवास ॥ वैधव्य मैनावतीस ॥ गळसूत्र शमनें खंडिलें ॥१०॥
गोपीचंद जाहला राज्याधिकारी ॥ विषयांवरी वासना भारी ॥ पर्णिल्या सोळा शतें नारी ॥ बारा शतें नाटकशाळा ॥११॥
अहर्निशीं विषयीं रत ॥ भोगीं गुंतले अक्षयीं चित्त ॥ नाठवे प्रपंच परमार्थ ॥ उन्मत्त अतिमदांध ॥१२॥
कोणे एके समयीं मैनावती ॥ सहज उभी मंदिरावरुती ॥ निरखितां लक्षी योगमूर्ती ॥ जालंधर सिध्दाची ॥१३॥
तो सिध्दांमाजी अग्रणी ॥ तपोनिधि अगाध ज्ञानी ॥ विवेक शांतींत शिरोमणी ॥ जिंकिला काळ पुरुषार्थें ॥१४॥
निरामय आनंदभरित ॥ पृथ्वीवरुता सहज विचरत ॥ सदा परोपकारार्थ ॥ काष्ठें वाहे मस्तकीं ॥१५॥
काष्ठभार घेतां शिरीं ॥ अधांत्रीं वोझें मस्तकावरी ॥ पाहोनि जन आश्चर्य  करी ॥ कोणी त्यासी वोळखीना ॥१६॥
त्या काष्ठांचा विक्रय करुन ॥ द्रव्य तितुकें करी दान ॥ देई अनाथ दीना लागून ॥ अंधपंगू अशक्तां ॥१७॥
परोपकार हाचि पुरुषार्थ ॥ परोपकार हाचि मोक्षपंथ ॥ परोपकार समर्थ ॥ करी पार सर्वांसी ॥१८॥
परोपकारीं शरीर कर्वतिलें ॥ परोपकारीं मांस कांपिलें ॥ चांगुणेनें बाळ वधिलें ॥ राज्य दीधलें हरिश्चंद्रें ॥१९॥
परोपकारावांचोनि नर ॥ जैसें क्षारकूपांत नीर ॥ किंवा पंडुरोगी शरीर ॥ अथवा अंधपंगू समान ॥२०॥
जो परोपकारी पुरुष नाहीं ॥ तो नपुंसक देह पाहीं ॥ काय करावा षंढ जांवई ॥ व्यर्थ वांझोटी संसारीं ॥२१॥
परोपकाराचें अर्थीं ॥ दधीचि ऋषीनें वोपिल्या अस्थी ॥ हें समजोनि जालंधर चित्तीं ॥ परोपकारीं कष्टवी शरीर ॥२२॥
काष्ठें विकोनि करी दान ॥ मग वेंची बीदीचे कण ॥ त्यावरी करी उदर पोषण ॥ संतुष्ट सदा आनंदमय ॥२३॥
ग्रामाबाहेर अर्धकाश ॥ तेथें करी एकांतवास ॥ कोण न जाय त्या स्थानास ॥ पिशाचमय मानूनी ॥२४॥
चिन्हें विलोकूनि नयनीं ॥ मूर्ति ठसावोनि गेली मनीं ॥ मैनावती संतोष पावोनि ॥ आश्चर्यातें पावली ॥२५॥
म्हणे हा ईश्वर पूर्ण अवतार ॥ नव्हे सिध्द साधक योगी नर ॥ यांचें दर्शनें संसार घोर ॥ भवाब्धीचा तरेन ॥२६॥
याची घेतल्या निकट भेटी ॥ तोडील जन्ममरणांची राहाटी ॥ जीव बैसेल ज्ञानमठीं ॥ कृपादृष्टीं याचिया ॥२७॥
आतां कोणे उपायें करुन ॥ याचें घडेल मज दर्शन ॥ माझा स्त्रीदेह जाण ॥ लज्जा बुंथीनें वेष्टिला ॥२८॥
यासी करावया वोळखी ॥ संगें नेऊं नये कोणी सखी ॥ अवघीं परमार्थीं पारखीं ॥ नव्हेत विवेकी सुखाचीं ॥२९॥
आतां बैसोनियां मनोरथीं ॥ धैर्य करुनियां सोबती ॥ घेऊनि सद्भाव श्रध्दा सुमती ॥ शरण जावें योगिया ॥३०॥
ऐसें विचारुनियां महासती ॥ निशी पातल्या मध्यरात्रीं ॥ दोर लावूनि महाल खालती ॥ उतरती जाहली निर्भय ॥३१॥
वस्त्रें सांवरोनि घाली कांसोटा ॥ निरखीत चालली नीट वाटा ॥ निशींचा अंधकार होता मोठा ॥ चिंता चित्तीं असेना ॥३२॥
हरुषें पातली त्यास्थळा ॥ जेथें योगिराज बैसला ॥ मग पाहोनि निर्मळ डोळां ॥ अष्टभावें निवाली ॥३३॥
प्रेम भरोनियां चित्तीं ॥ घाली लोटांगण सद्भक्तीं ॥ प्रदक्षिणा करोनि सिध्दाप्रती ॥ कर जोडूनि उभी ठाकली ॥३४॥
योगिराज होते समाधिस्थ ॥ ध्यानीं पाहात त्रैलोक्य समस्त ॥ स्वर्गींची रचना विलोकित ॥ सत्य कैलास वैकुंठ ॥३५॥
सप्त पाताळें सप्त द्वीपें ॥ पाहे दशखंडीचे महाभूप ॥ देश पर्वत नगर अमूप ॥ समीप देख ज्ञानदृष्टीं ॥३६॥
निरखितां गौडबंगाल देश ॥ मठीं एक अंगना उभी असे ॥ मग पावोनि विस्मयास ॥ ध्यान विसर्जीं योगींद्र ॥३७॥
उघडोनि पाहे नेत्रकमळीं ॥ पुढें उभी लावण्यपुतळी ॥ म्हणे तूं कोण यावेळीं ॥ किंनिमित्त आलीस ॥३८॥
मैनावती घाली लोटांगण ॥ म्हणे मी अनाथ रंक दीन ॥ सर्वभावें मी शरण ॥ कृपादान मज करीं ॥३९॥
पाहोनि तुमच्या स्वरुपासी ॥ वेधोनि गेलें माझ्या मानसीं ॥ कल्पोनी स्त्री देहासी ॥ उपेक्षा न करीं दयाळुवा ॥४०॥
तिलकचंदाची पट्टराणी ॥ गोपीचंदाची जननी ॥ सुकृतें पाहिलें तुजलागोनी ॥ नाम माझें मैनावती ॥४१॥
एकोनि बोले तीस योगी ॥ आम्ही नव्हेति सिध्दयोगी ॥ आतां भक्षूं तुजलागीं ॥ जाय वेगीं माघारी ॥४२॥
आम्ही तामस पिशाच अघोर ॥ निर्दय निष्टुर मांस खाणोरी ॥ तूं पडलीस या फेरीं ॥ कैसी वांचोनि जासील ॥४३॥
मैनावती म्हणे स्वामी ॥ तुमचे लक्षितां पादपद्म आम्ही ॥ कोठें उद्भवेल संतापउर्मी ॥ अंतर्यामीं तूं साक्षी ॥४४॥
भूतीं भूत तूं महद्भूत ॥ पिंड ब्रह्मांड खासी समस्त ॥ नुरे चंद्र सूर्यांचा अंत ॥ शेखीं खासी जीवशीवां ॥४५॥
भूतीं भूतात्मा तूं एक ॥ अंतकाचाही अंतक ॥ मारिसी कर्मावरी मेख ॥ नव्हेसि भक्षक गोसावी ॥४६॥
आतां लागतें मी पायां ॥ उदार होई योगिराया ॥ नको पाहूं माझी चर्या ॥ करीं छाया कृपेची ॥४७॥
पाहोनि सतीचा भाव दृढतर ॥ संतोष पावला जालंधर ॥ म्हणे ईचें सुकृत अपार ॥ अनुतापें तापली ॥४८॥
मग परमकृपें अवलोकुनी ॥ बीजमंत्र उपदेशिल कानीं ॥ शिरीं अभयपाणी ठेवोनि ॥ तन्मय केली समाधी ॥४९॥
विसरली स्त्रीपुरुषभावना ॥ उडाली जीवशीव-कल्पना ॥ न दिसे गुरुसी जाणा ॥ स्वयें स्वरुपीं कोंदली ॥५०॥
कैंचें पाप कैचें पुण्य ॥ जिरोनि गेलें मीतूंपण ॥ सबाह्य अंतरीं चैतन्य ॥ कल्पांबुधि जाहाला एकचि ॥५१॥
शब्द विरे नभाचें पोटीं ॥ लहरी तोयांचि पडे मिठी ॥ तेवीं जाहलीसे गोरटी ॥ उठी उतरली विषयाची ॥५२॥
करें कुरवाळोनि सुकुमार ॥ देहांत आणिली सुंदर ॥ नेत्रकमळीं झरे नीर ॥ प्रेमा हृदयीं दाटला ॥५३॥
मस्तक ठेवोनि चरणकमळीं ॥ कर जोडोनि उभी ठेली ॥ मंजुळशब्दें बोलली ॥ अति नम्र होवोनी ॥५४॥
परिसें स्वामी योगिराजा ॥ पावलासी भक्तकाजा ॥ हेत पूर्ण केलासी माझा ॥ निवलें तरलें तव चरणीं ॥५५॥
गुरु पहा लक्षकोटी ॥ परी नवल तुझी हातवटी ॥ व अवलोकितां कृपादृष्टीं ॥ बैसविलें पदीं मोक्षाचें ॥५६॥
ज्यासाठीं साधनें अगाध ॥ तो सहज जाहला समाधिबोध ॥ कोंदोनि गेला निजानंद ॥ न दिसे द्वंद्व द्वैताचा ॥५७॥
विराला जाति कर्म कुळाभिमान ॥ जाहलें संचित प्रारब्ध दहन ॥ अक्षयीं सुखी केलें कल्याण ॥ अढळ बैसलें साम्राजी ॥५८॥
थोर कृपेची जाहली गरिमा ॥ पुसणें सांगावयाची जाहली सीमा ॥ नांदूं आनंदमंगळधामा ॥ नाहीं उपमा या सुखा ॥५९॥
ऐसें बोलोनियां गोरटी ॥ हर्ष न माये तिच्या पोटीं ॥ मग चरणीं घालोनि मिठी ॥ मौनावली चौंवाचे ॥६०॥
यापरी संतोष पावोनि जालंधरें ॥ उठविली धरोनियां दोन्ही करें ॥ मग म्हणे शाबास सुकुमारें ॥ बरें सार्थक त्वां केलें ॥६१॥
तुतें जाहली स्वरुपप्राप्ती ॥ हें सुख सांठवीं आपुल्या चित्तीं ॥ गुह्य फोडों नको कोणाप्रती ॥ गुज ठेवीं अंत:करणीं ॥६२॥
आतां आलीस तैसी जाई ॥ सुखरुप नांदें आपुल्या देहीं ॥ माझी आज्ञा पाळिल्या पाहीं ॥ दासी होती चारी मुक्ती ॥६३॥
आज्ञापितां महायोगी ॥ संतोष पावली अंतरंगी ॥ चरणकमळ वंदोनि उगी ॥ येती जाहली स्वगेहीं ॥६४॥
जो अनुभव जाहला तीतें ॥ तेणें शांत जाहल्या वृत्तीतें ॥ सुशीळ पवित्र निर्मळ मतीतें ॥ वागवी देहसंबंध ॥६५॥
उघड मुद्रा जगीं जगदीश ॥ लक्षी एकचि चिदाकाश ॥ ऐसिया पावोनि भाग्यास ॥ राहे निमग्न सर्वदा ॥६६॥
यावरी कोणे एके दिवशीं ॥ गोपीचंद बैसला स्नानासी ॥ वनिता तिष्ठती सेवेशीं ॥ साहित्य सर्व घेवोनि ॥६७॥
रत्नजडित चौकी जिरी ॥  राव बैसला जाऊनि त्यावरी ॥ भोंवत्या वेष्टोनियां नारी ॥ नाना विलास जाणविती ॥६८॥
दोघी प्रक्षाळिती दोन चरणां ॥ दोघी लाविती उटणें जाणा ॥ दोघी घालिती विंझणा ॥ दोघी चामरें ढाळिती ॥६९॥
एक करोनि देतसे विडा ॥ एक झारी घेऊनि उभी पुढां ॥ एक धांवोनि दुडदुडां ॥ पिकदाणी वोढवी ॥७०॥
वाजती पायीं पैंजण मधुर ॥ घुमघुमे नाद उठे गजर ॥ ध्वनि ऐकोनि माडीवर ॥ माया पाहे तळवटीं ॥७१॥
पुत्र बैसला चौरंगावरी ॥ भोंवत्या वेष्टिती सुंदर नारी ॥ तनु सुकुमार साजिरी ॥ लावण्यपुतळा नेटका ॥७२॥
गोचिरा बळसंपन्न ॥ हर्षवदन विशाळ नयन ॥ रत्नासारिखे दों बाहीं दशन ॥ वोतींव मदनाचा पुतळा पैं ॥७३॥
बहु नक्षत्रें एक चंद्र ॥ बहु नागिणी एक भोगींद्र ॥ तैंसा शोभला नरेंद्र ॥ थाट बहुत वनितांचा ॥७४॥
बहु किरण एक भास्कर ॥ बहु नदया एक सागर ॥ बहु अक्षरें एक ओंकार ॥ बहु वासना मन एक ॥७५॥
बहु लतेनें वेष्टीला तरुवर ॥ बहु कमळीं एक भ्रमर ॥ यापरी बहु कामिनी एक नृपवर ॥ भोक्ता त्यांसी गोपीचंद ॥७६॥
मैनावतीनें पाहोनि डोळां ॥ म्हणे हा वोतींव रसपुतळा ॥ लावण्यरुपीं विकासला ॥ कैसा वोतींव रोखिलासे ॥७७॥
ऐशिया सगुणबाळासी ॥ पाहतां काळ ग्रासील यासी ॥ काया होईल भस्म स्मशानवासी ॥ दग्ध होईल अस्थिमांस ॥७८॥
हें समजोन वाटला खेदू ॥ नेत्रीं आले अश्रुबिंदू ॥ पाठीवर पडतां गोपीचंदू ॥ फिरोनि पाहे माडीवर ॥७९॥
जळ भरोनियां नयनीं ॥ शोक पावोनियां रडे जननी ॥ धावोनियां मस्तक ठेविला चरणीं ॥ करी प्रार्थना मातेसी ॥८०॥
काय जाहलें कारण ॥ शोक करिसी मनापासून ॥ कोण बोलिलें दुष्टवचन ॥ राणी प्रजा सेवक ॥८१॥
जो बोलिला असेल शब्द ॥ त्याचा करीन शिरच्छेद ॥ त्वां सांडोनियां खेद ॥ बोले निर्मळ मजपासी ॥८२॥
सर्व राज्याची तूं स्वामीनी ॥ मी सेवक तुझा तुजलागूनी ॥ तुझी आज्ञा शिरीं वंदोनि ॥ सांगसी तें करीन ॥८३॥
परिसोनि पुत्राची विनयवाणी ॥ मैनावती बोले अनुतापोनी ॥ म्हणे म्यां खेद केला समजोनी ॥ बरें कुमरा दिसेना ॥८४॥
ज्या तनूचा उपचार देख ॥ त्याची होईल उदयां राख ॥ तुझा पिता तुजहूनि अधिक ॥ मजदेखतां भस्मला ॥८५॥
तृणकाष्ठाचिया परी ॥ अस्थिकेशा जाळिलें वैश्वानरी ॥ तनु ठेवितां चितेवरी ॥ कोणी न जाहला सोबती ॥८६॥
आतां घेईं अनुताप ॥ वमीं विषयवासना पाप ॥ जाळोनि सांडी त्रिविधताप ॥ नसे संताप तें करीं ॥८७॥
पूर्वीं राजा भर्तृहरी ॥ तुजपरीस विषयविलास भारी ॥ अनुताप संचरला अंतरी ॥ त्याच्या चरित्रा परिसें पैं ॥८८॥
सहस्त्र स्त्रिया पट्टराणी ॥ दोनसहस्त्र नाटकशाळा त्यालागूनी ॥ आणिक वेश्या लावण्यखाणी ॥ या विरहित परद्वारीं ॥८९॥
इतुक्या विषयकर्दमांत ॥ राव लोळे मंडूकवत ॥ नेणोनि आपुलें स्वहित ॥ अति उन्मत्त मदांध ॥९०॥
एके दिवशीं बहुत वनिता ॥ रासक्रीडा जळीं खेळतां ॥ श्रम पावोनियां चित्ता ॥ वृक्षाखालीं पहुडला ॥९१॥
गोरक्षनाथ महासमर्थ ॥ त्या वृक्षापासी आले अकस्मात ॥ राव उठोनियां त्वरित ॥ घाली साष्टांग लोटांगण ॥९२॥
म्हणे संसारश्रम जावया ॥ शरण तूतें योगिराया ॥ वृत्ति जडली तुझिया पायां ॥ करीं छाया कृपेची ॥९३॥
बुडोन गेलों विषयराहाटीं ॥ स्वहित विचार नाठवे पोटीं ॥ मोहममतेची पडली मिठी ॥ बैसल्या गांठीं सुटेना ॥९४॥
परमार्थ जाहला अवघा कडू ॥ विषय वाटती गोड लाडू ॥ कोण्या रीतीनें यातें सोडूं ॥ कैसे जोडूं तुझे पाय ॥९५॥
आजि पावेतों विषयींरत ॥ होतों कुबुध्दीमाजी पूर्ण रत ॥ आतां चित्त जाहलें विरक्त ॥ हा महिमा स्वामीचा ॥९६॥
तुझिया आगमनाची उडी ॥ वृत्तीनें आनंदाची उभविली गुढी ॥ कोणत्या जन्माची हे जोडी ॥ गोडी तुझ्या पायांची ॥९७॥
लोह जडत्व काळिमा पूर्ण ॥ परीस स्पर्शतां होय सुवर्ण ॥ तेवी स्वामीच्या दर्शनेंकरुन ॥ जीवीं न दिसे जीवबुध्दी ॥९८॥
मी तों पतित पापी अपराधी ॥ राज्यमदें मातलों दुर्बुध्दी ॥ तूं कृपेचा महोदधी ॥ करीं पावन जीव आत्मा ॥९९॥
आजि तुमचें जाहलें दर्शन ॥ राज्यसुख भासे वमन ॥ स्वामीनीं कृपा करुन ॥ करावा उपदेश शुध्दबोध ॥१००॥
माझे तनु मन पंच प्राण ॥ केले स्वामीस अर्पण ॥ राज्य सांडिलें ओंवाळून ॥ थुंकोनि सांडिलें थोरिवां ॥१॥
हिरे माणिके दिसती खडे ॥ वनिता भासती अस्वलें मूढें ॥ सोनें रुपें हें तों जड ॥ पाषाण निश्चय मानिलें ॥२॥
आजिपासोनी सकळ कामिनी ॥ वनितासहित मातें जननीं ॥ साक्ष असे शूलपाणी ॥ दिव्य पाय मज तुझे ॥३॥
सत्यसंकल्प गुरुराजा ॥ म्यां अनुतापाची लाविली ध्वजा ॥ तुझिया संगें करीन मौजा ॥ मानिलें राज्य विषवत ॥४॥
नको नको पुरे पुरे ॥ कोण फिरतो भवफेरे ॥ आतां तुझे पाय दिसती बरे ॥ जेणें उध्दरे जीव माझा ॥५॥
पुरे संसार छी छी ॥ अस्थिमांसांच्या तनूची ॥ सांठवण आतं विष्ठामूत्राची ॥ काय रुची कफ वात ॥६॥
आतां घेईं जानचक्र ॥ सोडवीं घोर संसारनक्र ॥ जेवीं स्वर्गीं राजा शक्र ॥ तेवीं बैसवी कैवल्यपदीं ॥७॥
मृत्यूलोकीं राज्य पदवी ॥ जैसी श्रियाळशेट जगांत मिरवी ॥ किंवा रायविनोदें सोंग दावी ॥ अथवा गंधर्वनगरीं काय हुडे ॥८॥
जमे वितुळे अभ्र छाया ॥ तेवीं पाहतां दिसे माया ॥ मेघ वळे वोसरे जाय लया ॥ अथवा विदया वोडंबरी ॥९॥
स्वप्नींचा लाभ आणि हानी ॥ जागृतीमाजी कोण गणी ॥ दुर्बळाची संसारकाहाणी ॥ परिसिल्या काय संतोष ॥११०॥
पति करी दुसरे नारीस ॥ पहिलीस काय सवतीचा उल्हास ॥ सजलिया राधेच्या सोंगास ॥ व्यर्थ विटंबना पुरुषाची ॥११॥
आतां असो संसारराहाटी ॥ तुझिया पायीं घातली मिठी ॥ मजवर पाहें कृपादृष्टीं ॥ करीं वृष्टि सुखाची ॥१२॥
पाहोनि अनुताप रायाचा ॥ संतोषला आत्मा श्रीनाथाचा ॥ म्हणे बरा विवेक चित्ताचा ॥ निश्रयो केला एकनिष्ठ ॥१३॥
म्यां सांगावा अनुभव सुरेख ॥ त्याचा त्वांचि कथिला विवेक ॥ उपदेश करावया देख ॥ नाहीं राहिला अणुमात्र ॥१४॥
वैराग्य भाग्याची दशा ॥ ते आली नरेशा ॥ सोडिली राज्यभोगाची आशा ॥ दु:खलेशा वारिलें ॥१५॥
या कर्मांचे कापुरगिरी ॥ जाळिले अनुताप वैश्वानरीं ॥ रवि उदयीं कैची शर्वरी ॥ तेवीं बोधीं भ्रम कैंचा ॥१६॥
सन्मुख बैसवूनि श्रीनाथानें ॥ उपदेशिला राजनंदन ॥ कर्णीं बीजमंत्र फुंकोन ॥ शिरीं हस्त ठेविला ॥१७॥
लागली तन्मय उन्मनी निद्रा ॥ न दिसे पाहतां अविदया भद्रा ॥ लक्ष्मी चिन्मय पूर्णचंद्रा ॥ वारिले दरिद्रा मृत्यूच्या ॥१८॥
सबाह्य ब्रह्म एक लक्षी ॥ न दिसे भेद कल्पना पक्षी ॥ आपआपणा जाहला साक्षी ॥ अक्षय सुखीं सुखावला ॥१९॥
चहूंकडे स्वरुप पारखी ॥ ब्रह्मचि दिसे नाथ गोरखी ॥ आप आपणातें जंव निरखी ॥ दिसे ओळखी ब्रह्मची ॥१२०॥
मग म्हणे नाथ बाबा ॥ बरा केला जी अचंबा ॥ आतां घेईन हातीं तुंबा ॥
करीन योग आवडी ॥२१॥
वाजवीन अनुहताची शिंगी ॥ बैसेन अनुभवाची तुरंगीं ॥ चातुर्य सुखाचे संभोगीं ॥ मिरवेन योगीं योग्यता ॥२२॥
बैसवीन वैराग्याची कडकी ॥ उडवीन महाकाळाची धडकी ॥ त्यागीन देहलोभाचीं मडकी ॥ तुटकी जेवीं पैजार ॥२३॥
लावीन अनुभवचा तुरा ॥ उडवीन कुवासनेचा थारा ॥ मारीन मीपण पामरा ॥ अहंकारद्रुम उपडीन ॥२४॥
घेईन क्षमेची विशाळ ढाल ॥ विवेकखड्ग वागवीन प्रबळ ॥ शांतिटोप शिरीं अढळ ॥ ज्ञानकवच लेईन ॥२५॥
घेईन एकात्मतेची गदा ॥ भेदभोंदूचा करीन चेंदा ॥ वागवीन लयलक्षाचा हुद्दा ॥ जिंकीन निंदा मत्सर ॥२६॥
ऐसें बोलूनि राजा भर्तृहरी ॥ केशांच्या जटा वळल्या भारी ॥ भस्म लावून शरीरीं ॥ फेडिला पीतांबर नेसला कौपीन ॥२७॥
झोळी पात्र घेतली किंगरी ॥ श्रीनाथास नमस्कार करी ॥ जोगी होऊनियां भर्तृहरी ॥ गेला भिक्षेस महालांत ॥२८॥
उभा ठाकला महाद्वारीं ॥ अलेख शब्दे हांक मारी ॥ भिक्षा घाला वो मातोश्री ॥ तों दासीनें लक्षिला ॥२९॥
परतोन गेली मंदिरांत वेगीं ॥ म्हणे बाई राजा जाहला जोगी ॥ राख लावूनियां अंगीं ॥ भिक्षा दयावी बोलता ॥१३०॥
असत्य नव्हे माझें वचन ॥ तुम्हीं पाहा विलोकून ॥ राणी होऊन क्रोधायमान ॥ ताडन करी दासीला ॥३१॥
द्वारासी आली महारागें ॥ तों पतीनें घेतला देखे जोग ॥ म्हणे कांहो दावितां सोंग ॥ ठकवावया आम्हांतें ॥३२॥
तो म्हणे माते भिक्षा देईं ॥ येरी म्हणे बोलतां विपरित काई ॥ गलबला ऐकोनियां गेहीं ॥ सहस्त्र अंगना धाविन्नल्या ॥३३॥
राव ओळखोनियां दिठीं ॥ अवघ्या पायीं घालिती मिठी ॥ वेष घेतला कासयासाठीं ॥ खरा कीं सोंग महाराजा ॥३४॥
येरु म्हणे ऐका मातोश्री ॥ माझ्या कामवासनेची जाहली बोहरी ॥ अनुताप संचरला अंतरीं ॥ भजनलहरी ऊठली ॥३५॥
गेले विषयांचे ढग ॥ विकल्प पळाला मांग ॥ रतिविलास वनितासंग ॥ ओकून त्यावर थुंकलों ॥३६॥
विषयवासना गेली निवटोन ॥ सकळ ललना मातृवत् मानोन ॥ मन गेलें उन्मन होऊन ॥ देहीं देहभाव असेना ॥३७॥
हें परिसोनि सकल नारी ॥ पडिल्या सर्व शोकसागरीं ॥ नयनीं नीर चाललें भारी ॥ कपाळ पिटती आपुलें ॥३८॥
ज्या तनूस सुगंध लाविले अनेक ॥ त्यास लाविली रायानें राख ॥ सुकुमार कुरळ केश देख ॥ त्याच्या केल्या जटा ॥३९॥
कोण प्रक्षाळी तुमचे चरण ॥ कोण करील संगें शयन ॥ कोण बोलेल हास्य करुन ॥ कोण देईल भोजनविडा ॥१४०॥
राजा म्हणे विश्व आपुलें ॥ घरोघरीं मायबाप संचले ॥ पादप्रक्षाळणीं नदया अनुकूल ॥ वस्त्रें अंबर मंचक धरा ॥४१॥
महाल मंदिर द्रुम-च्छाया ॥ उशा पाषाण धुणी पासिया ॥ किन्नरी मंजुळ गाणें गाया ॥ बोले आपआपणा ॥४२॥
शिरीं अक्षयी बोधछत्र ॥ हातीं सुविचार घेतलें पत्र ॥ नानाद्रुमीं फळें विचित्र ॥ भक्षावया आवडी ॥४३॥
हे परिसोनि बोले अंगणा ॥ ज्याणें उपदेशिलें तुज ज्ञाना ॥ तो पावो निसंताना ॥ जेणें विघडिलें आम्हांसी ॥४४॥
गुरुनिंदा परिसोनि श्रवणीं ॥ त्रास पावोनिया मनीं ॥ मौनेंचि परतला जनीं  गेला संबंध तोडोनियां ॥४५॥
यापरी तोडोनि बंधन ॥ आपुलें केलें कल्याण ॥ विचरे जनीं वनीं आनंदघन ॥ कीर्ती भूषण जगामुखीं ॥४६॥
यापरी भर्तृहरीचें चरित्र ॥ निर्मळ कीर्ती परम पवित्र ॥ परिसोनि माझेही ॥ आनंद पुत्रा पावलें ॥४७॥
पूर्वी राजा होता गंगाधर ॥ भार्या त्याची रखुमाई सुंदर ॥ पुत्राचें नाम रत्नाकर ॥ ऐकें चरित्र तयाचें ॥४८॥
राव गेला स्वर्गलोका ॥ कांतेनें फार केलें शोका ॥ तीस भेटला निजसखा ॥ श्रीदत्त योगिया ॥४९॥
पाहोनियां श्रीदत्त ॥ शोक करी अद्भुत ॥ म्हणे स्वामी वैधव्यपणांत ॥ विटंबना देहाची ॥१५०॥
वनितादेह लज्जायमान ॥ सदा संकोचित सासुरवास गहन ॥ माहेरासाठीं झुरे मन ॥ मुर्‍हाळी फिरवितां हृदय फुटे ॥५१॥
सासु-नणंदांची जाचणी ॥ नित्य पतीची कांचणीं ॥ किती लवोनि चालावें
जनीं ॥ बाहेर फिरतां बोलतां नये ॥५२॥
किती अवळावें ठायीं ठायीं वेणी ॥ किती टोचावें कानालागोनी ॥ नाकास छिद्र पाडोनी ॥ कटीं किती वेष्टणें ॥५३॥
दंड कर माजघोटें बोटांत ॥ दशांगुळांसि बंधन होत ॥ कर बोटांत मुद्रिका दाटत ॥ काय तें सोंग शरीरा ॥५४॥
पति निमालिया जाणा ॥ भूषणांची विटंबना ॥ यापरी वनितादेह जाणा ॥ कुश्चळ अमंगळ विटाळाचें ॥५५॥
तरूणपणीं चालत अंगना ॥ परपुरुषांची धांवे वासना ॥ कापटयखाणी कलहो जाणा ॥ वनितादेह साजिरा ॥५६॥
बंधु सख्यांत वैराकार ॥ घर फोडोनि करी वेगळेचार ॥ महाराजांचे राज्यभार ॥ विनाशातें पावले ॥५७॥
त्या कुडींत सांठवण ॥ त्यावरी पातलें वैधव्यपण ॥ शोक घोर जाहला दारुण ॥ चित्त चिंतेनें भवचक्रीं ॥५८॥
तिचा परिसोनि वृत्तांत ॥ कृपेनें द्रवला श्रीदत्त ॥ मस्तकीं ठेविला अभयहस्त ॥ कृपादृष्टीं पाहिलें ॥५९॥
अमृतांची पडतां मिठी ॥ मग मृत्यूच्या कैंच्या गोष्टी ॥ बैसतां मारुतीच्या पाठीं ॥ भूतबाधा मग कैंची ॥१६०॥
राया संगे चालतां स्वारीस ॥ तस्कार भय करील त्यास ॥ सूर्यरथीं अरुणास ॥ उदयोग दीपाचा घडेना ॥६१॥
श्रीदत्तें कृपा केलिया ॥ गेले शोक मोह दु:ख लया ॥ विवेक पावला तीतें उदया ॥ सग्ददीत कंठें दाटली ॥६२॥
तुझी तूंच आत्मकळा ॥ वोळखे आपआपणाला ॥ यापरी बोध ठसावला ॥ रखमाईच्या चित्तांत ॥६३॥
बोधूनि गेला दत्तदीप ॥ रखुमाईस पावला अनुताप ॥ जिकडे तिकडे अमूप ॥ चिन्मय दशा कोंदल्या ॥६४॥
गेला पतीचा खेद ॥ मनीं भरला ब्रह्मानंद ॥ सर्वदा लक्षी आनंदकंद ॥ न दिसे द्वंद्व दु:खाचा ॥६५॥
रखुमाई स्वयें स्वरुपांत मिळाली ॥ पुत्र कर्ता चतुर बळी ॥ तेणें राज्यक्रिया आटोपिली ॥ पित्यापरीस विशेष ॥६६॥
रत्नाकर चतुर शहाणा ॥ प्रपंची सावधान जाणा ॥ बहु आवडला जनां ॥ माता त्यासी न बोले ॥६७॥
खेद पावोनियां चित्तीं ॥ पुत्र मातेस करी विनंती ॥ माझा संतोष नसे तुजप्रती ॥ काय निमित्त सांग पां ॥६८॥
पित्यामागें संसार ॥ म्यां संपादिला बहुताप्रकारें ॥ लोक म्हणती मजला बरें ॥ तूं चितीं कां उदास ॥६९॥
माता बोले रत्नाकरा ॥ मूर्ख म्हणती तूतें बरा ॥ काय धरिला त्वां फुगारा ॥ संसाराचे शहाणपणें ॥१७०॥
काय करावें बकाचें लक्ष ॥ बिडाल मूषकावरीं दक्ष ॥ शकुनींनें धरिला दुर्योधनाचा पक्ष ॥ किंवा कणीकनीति धृतराष्ट्रें ॥७१॥
काय कागाचें शहाणपण ॥ काय कोल्हाटीं बिरुद बांधोन ॥ वृथा सवतीचें भांडण ॥ कीं चावट गोष्टी दुर्बळाच्या ॥७२॥
काय शिमग्याचें सोंग समजणें ॥ कीं रायविनोदयाचें बोलणें ॥ कीं चित्रकथ्यांचे पाहणें ॥ कीं खेळ गारोडियांचा ॥७३॥
यापरी संसारी बाजेगिरी ॥ जैसी मृगजळाची लहरी ॥ त्यांत तुझी चातुरी ॥ काय उपयोगा येईल ॥७४॥
मुलें घालिती हमामा ॥ श्रमी होऊनि भरती दमा ॥ श्रीकृष्णाचा कंस मामा ॥ कार प्रीत चांगली ॥७५॥
काय पिनसीचा तुरा पगडी ॥ खासदार नाचवी पराची घोडी ॥ लटकीं वेश्येची प्रीत गोडी ॥ द्रव्य सरल्या विघड पडे ॥७६॥
काय स्वप्नींचे मोकासे ॥ दु:खाची रांड चांगली दिसे ॥ काय करावें बोडकीच्या गर्भास ॥ नाश होय बाळाचा ॥७७॥
काय कसाबा घरींचे सोहळे ॥ वांझ खेळवी दुसर्‍यांचीं बाळें ॥ व्यभिचारिणीची आण प्रबळें ॥ काय सत्य मानावी ॥७८॥
काय मदयपियाची भाक ॥ शिमग्यांत शंखध्वनीचा कोण हरिख ॥ मोलें रडे तिचा वृथा शोक ॥ काय तेज गुंजांचें ॥७९॥
काय गंधर्वनगरीचा कोट ॥ विहीर उपसावयाची मोट ॥ समुद्रीं फुटल्या मिठाचा घाट ॥ काय लोट धुकटाचा ॥१८०॥
यापरी संसार मिथ्या ॥ थुंकोन टाकीं पुत्रा तूं त्या ॥ सायुज्यपदीं बैसें आपल्या ॥ धोका नसे काळाचा ॥८१॥
काय मुलाम्याचें नाण ॥ वाउगें पदरीं बांधोन ॥ संगें घेऊनियां अंध शुन ॥ शिकार करणें वृथाचि ॥८२॥
अंध बधिर मुकी वनिता ॥ मग संतोष काय भर्ता ॥ परीक्षेविण हिरा घेतां ॥ खोटा होय व्यापारीं ॥८३॥
आतां पुत्रा संसार वमीं ॥ लक्ष लावीं परब्रह्मीं ॥ जाऊन बैसे मंगळधामीं ॥ जेथें आनंद सुखाचा ॥८४॥
यापरी मातेचा उपदेश ॥ हृदयीं बिंबला पुत्रास ॥ लात मारुनि संसारास ॥ अरण्यवासी तो जाहला ॥८५॥
तपें तपला अद्भुत ॥ विमान आलें त्यास त्वरित ॥ वैकुंठीं गेला मिरवत ॥ कीर्ति घोष माजविला ॥८६॥
आणिक एक ऐकें चरित्र ॥ चंद्रसेन राजा होता समर्थ ॥ राज्यकारभारांत सावचित्त ॥ न्याय नीतीं करितसे ॥८७॥
चारी प्रहर चालवी राजकारण ॥ मध्यरात्रीं एकांतीं शयन ॥ म्हणे भाग्यें लाधलों राजमंडण ॥ ईश्वर भेटे तरी बरें ॥८८॥
मज देव देईल भेटी ॥ जाऊनि बैसेन वैकुंठी ॥ उभय भागीं लाभ गांठी ॥ उणें काय दैवास ॥८९॥
बैसोनियां मध्यरात्रीं ॥ नित्य हाचि विचार करी ॥ एके दिवसीं श्रीहरी ॥ माडीवर उभा ठाकला ॥१९०॥
पाय वाजवितां नृपती ॥ म्हणे एवढे मध्यरात्रीं ॥ तस्कर आला कोणें गतीं ॥ शेखीं भय तो पावला ॥९१॥
शस्त्र घेऊनियां करीं ॥ कोण म्हणोनियां हांक मारी ॥ देव त्यासी उत्तर करी ॥ म्हणे मी असें सारवीन ॥९२॥
माझा गमावला उंट एक ॥ त्याची करितों शोधणूक ॥ त्वां मारिली हांक ॥ करीं निद्रा संतोषें ॥९३॥
राजा म्हणे बोलसी विपरीत ॥ उंट शोधावा वनांत ॥ तूं धुंडिसी माडीवरुत ॥ कोण शाहाणीव हे तुझी ॥९४॥
हरि म्हणे तूं मंचकीं बैससी ॥ देव भेटावा हें जरी इच्छिसी ॥ तरी जावें वनासी ॥ राज्य थुंकोन सोडिजे ॥९५॥
राजा चमत्कारिला भारी ॥ पश्चात्ताप प्रवेशला अंतरीं ॥ धावोनि पाहे माडीवरी ॥ तों देव गुप्ते जाहला ॥९६॥
मग पुत्रास बोलावून ॥ राज्य केलें त्याचें स्वाधीन ॥ आपण संन्यासी होऊन ॥ महाअरण्यांत प्रवेशला ॥९७॥
सोडोनि देहाचा लोभ ॥ मन धैर्याचा केला स्तंभ ॥ हृदयीं चिंतोनि पद्मनाभ ॥ निर्भय नि:संग बैसला ॥९८॥
निराहार तीन वरुष ॥ लक्षूनि बैसला जगदीश ॥ कृपाळु होऊनियां महेश ॥ येऊन त्यास भेटला ॥९९॥
म्हणे जाहलों प्रसन्न ॥ येरु घाली लोटांगण ॥ म्यां निष्काम केलें भजन ॥ हेत कांहीं असेना ॥२००॥
तुझें जाहलिया दर्शन ॥ माझें जाहलें कृत कल्याण ॥ मग महेशे विमान आणोन ॥ कैलासवासी तो केला ॥१॥
ऐसी भगवद्गीतेची ख्याती ॥ स्वर्गीं ध्वजा त्याच्या मिरवती ॥ विषयलोभी नरकीं पचती ॥ कोण पुसे त्यांलागीं ॥२॥
उमज समज पडत अंतरीं ॥ नको जाऊं नरकद्वारीं ॥ यमजाचणीं भारी ॥ दु:ख दारुण बोलवेना ॥३॥
तारुण्य जाईल जरा येईल ॥ कर्ण बधिर नेत्र अंध दशन गळतील ॥ दम खोकला झुरळ्या पडतील ॥ घोर लागेल दाटतां कफ ॥४॥
काळ चेपेल गळ्यापासी ॥ कोण मैत्र सोडवी या समयासी ॥ पाय पसरुन उताणा पडसी ॥ भोंवत्या रडतील वनिता तुझ्या ॥५॥
चहूंकडोनि उठती शंखध्वनी ॥ होईल प्रेताची मिरवणी ॥ मसणखाईंत जाशील जळोनी ॥ लोक सतीचे बोळावे ॥६॥
ऐकोन मातेचा अगाध बोध ॥ उत्तर करी गोपीचंद ॥ बोलिलीस माते सुशब्द ॥ म्यां मस्तकीं वंदीला ॥७॥
परी कोण गुरु वरिष्ठ चतुर ॥ जो मस्तकीं ठेवून अभयकर ॥ करील काया अजरामरा ॥ मृत्यूपासोनि सोडवी ॥८॥
मैनावती वदे उत्तर ॥ समर्थ योगी जालंधर ॥ तुझी काया करील अमर ॥ मृत्यू स्पर्शो देईना ॥९॥
गोपीचंद वदे मातेसी ॥ द्वाद्वशवर्षें करीन राज्यासी ॥ मग होईन जोगी उदासी ॥ आज्ञा तुझी प्रमाण ॥२१०॥
माता म्हणे पुत्रा सुजाण ॥ कोणास करवेल काळाची वंचना ॥ कोण वेळेस काय होईल जाणा ॥ आजची घडी उदयां नये ॥११॥
नसे मृत्यूचें प्रमाण ॥ अष्टही प्रहर त्याचें संधान ॥ आकार त्याचे मुष्टींत जाण ॥ भक्षितां वेळ नलगेची ॥१२॥
ग्रास घेतां लागे उचकी ॥ काळ इतुकियांत जीव उचकी ॥ डोळयांस लागतां वाईचं वाईच लचकी ॥ काळ चकवी इतुक्यांत ॥१३॥
श्वास घालावया नाहीं अवकाश ॥ जाहली तनु गांठ मृत्यूस ॥ कंठीं बैसेल काळपाश ॥ तेव्हां डोळे वटारिसी ॥१४॥
जेथील तेथें राहिल संपदा ॥ मेल्यापाठीं थोर आपदा ॥ जन्ममरण चौर्‍याशीं रेंदा ॥ छी छी थू थू फजीती ॥१५॥
तुज पाहिजे आपुलें कल्याण ॥ तरी आतांच निष्टे या मोहांतून ॥ जालंधर सिध्दास जाय शरण ॥ काळचक्र चुकवील ॥१६॥
यापरी मातेनें उपदेश ॥ केला पुत्रास सुढाळ सरस ॥ तो जाईल गुरु करावयास ॥ ते कथा पुढिले प्रसंगीं ॥१७॥
रसिक गोड चरित्र ॥ लिहिलें पवित्राचें पवित्र ॥ परिसोन सज्जनाचे श्रोत्र ॥ संतोषातें पावती ॥१८॥
पदकीं कोंदणीच साठीं ॥ लाख मिरविली रायाचे कंठीं ॥ संतपायीं पडतां मिठी ॥ मान्य जाहलों जगातें ॥१९॥
यांत अभिमान सांडोन ॥ संतांस घातलें लोटांगण ॥ तेथें शहामुनी पावन ॥ प्रसाद लाधे निजमोक्ष ॥२२०॥
इति श्रीसिध्दांतबोधग्रंथे अध्यात्मनिरुपणतत्वसारनिर्णये त्रिचत्वारिंशोध्याय: ॥४३॥
॥अध्याय ४३॥ ओव्या २२०॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ श्रीराम ॥

N/A

References : N/A
Last Updated : November 24, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP