मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|सिध्दान्तबोध|
अध्याय ३० वा

श्रीसिध्दान्तबोध - अध्याय ३० वा

‘श्रीसिध्दान्तबोध’ हा संतकवि श्रीशहामुनि यांचा ग्रंथ म्हणजे मराठी साहित्याच्या खाणींतील एक तेजस्वी हिरा आहे.


श्रीगणाधिपतये नम: ॥ श्रीगुरुदत्तात्रेयाय नम: ॥
लक्ष लावोनि श्रीगुरुचरणीं ॥ आशा धरोनियां मनीं ॥ निजमोक्षप्राप्ती लागोनी ॥ सेवा केली संतांची ॥१॥
बहुतांचें मतें ॥ आशा नसावी साधूतें ॥ परी निराशा पाहतां चितें ॥ आशा कोणातें सोडीना ॥२॥
आशा लागली सर्वांतें ॥ गृहस्थ जोगी संन्याशांतें ॥ देव दानव राक्षसांतें ॥ आशा कोणातें सोडीना ॥३॥
आशेसाठी सुरासुरु ॥ कलहो करिती योध्दे थोरू ॥ आशेसाठीं निशाचरु ॥ महा अरिष्ट मांडिती ॥४॥
आशेसाठीं ऋषि मुनी ॥ उग्र तपातें बैसती साधनीं ॥ योगाभ्यास वज्रासनीं ॥ कष्टी होती योगिये ॥५॥
ईश्वरप्राप्तीसाठीं ॥ तोडिती संसारफांसवटी ॥ करिती इंद्रियआटाआटी ॥ देवभेटीकारणें ॥६॥
आशेसाठीं जावें काशी ॥ आशेस्तव करणें व्रतासीं ॥ कर्वत कर्मरी गळणें सीतासी ॥ कावडी नेती रामेश्वरा ॥७॥
याग यज्ञ अश्वमेध ॥ पाठ करिती चारी वेद ॥ साही शास्त्रांचे वाद ॥ आशेसाठीं भांडती ॥८॥
आशेसाठीं पुराणिक ॥ भट जोशी आणि वैदिक ॥ आचार्य पंडित वैय्याकारण ॥ सेवक स्वामित्वाची आशा ॥९॥
कथा करावी पुण्यासाठीं ॥ ऐकती जन त्याची राहाटी ॥ दोघांसी आशेची फांसोटी ॥ निराशा कोठें दिसेना ॥१०॥
द्रव्यलोभ लौकिक आशा ॥ मंत्रविद्या स्वर्ग आशा ॥ उत्तम दारा पुत्र आशा ॥ मोक्ष आशा सहजेंची ॥११॥
एक वासना जावें काशी ॥ एक वासना राखिती वेश्येसी ॥ पाप अथवा पुण्यासी ॥ आशा वासना सोडीना ॥१२॥
भक्तांसी आशा देव व्हावा ॥ देवासी आशा भक्त व्हावा ॥ दोहींमाजी आशेचा गोवा ॥ उगवा कोठें दिसेना ॥१३॥
सुवासना कुवासना ॥ उभयतां मनाच्या कल्पना ॥ तें मन लागतां गुरुचरणा ॥ सर्व सिध्दि ते तुष्टे ॥१४॥
एवढा लाभ गुरुचरणीं ॥ जीवासि बैसविती मोक्षसदनीं ॥ यालागीं आशेची मांडणी ॥ उच्चारिली कवीनें ॥१५॥
आतां ऐका ग्रंथगोडी ॥ उडे मोहाची झांपडी ॥ श्रवणार्थी देतां बुडी ॥ मोक्ष जोडी तो लोभ ॥१६॥
ब्राह्मण म्हणे दयादानी ॥ सांगीतला श्रीकृष्णावतार वदनीं ॥ त्यांत संशयाची रजनी ॥ कैंची बोधभानूसी ॥१७॥
गंगा यमुना सरस्वती ॥ एकत्र मीनल्या त्रिवेणी म्हणती ॥ ब्रह्म माया ईश्वरगती ॥ सच्चिदानंद हे पदवी ॥१८॥
यापरी तीन आचरतां कृष्णीं ॥ तुम्हीं निवडिली कृपादानी ॥ जेवीं कर्दळीची फणी ॥ सलपट गर्भाआंत कळे ॥१९॥
पय घृत आणि तक्र ॥ एक पदार्थी निवडिले स्वतंत्र ॥ यापरी अवतारचरित्र ॥ त्रिधा भेद लाविला ॥२०॥
जाहला द्वापाराचा अस्त ॥ पुढें उदेला कलि मस्त ॥ जीवा न दिसे कोठें वस्त ॥ वाहती रस्ता विषयाचा ॥२१॥
अहंता कर्म देहाभिमान ॥ अहंपणाचा फुंद दारुण ॥ विवेकज्ञान भक्तिहीन ॥ दंभाचार बहु जाहला ॥२२॥
कामक्रोधमत्सर ॥ विकल्प हिंसा लोभ अपार ॥ विषयतृष्णा अनिवार ॥ विस्तारली कलींत ॥२३॥
क्षुद्रदेवता पिशाच भूत ॥ यांचे सेवेसि विश्व समस्त ॥ संसार आहार मद्याची प्रीत ॥ मतवादी दांभिक ॥२४॥
ऐसिया दुर्मती जीवा ॥ त्यास तरणोपाय सांग देवा ॥ त्यांत कलि न करी गोवा ॥ त्या उपावा प्रबोधीं ॥२५॥
मत्स्यापासोनि कृष्णपरियंत ॥ अष्ट अवतार केले श्रुत ॥ प्रत्यक्ष या कलियुगांत ॥ अवतार दोन बोलती ॥२६॥
आतां बौध्द अवतार ॥ कोणाचा जी साचार ॥ त्यांचे गुज मज समग्र ॥ विस्तारुनि निवेदा ॥२७॥
कलिअंतीं कलंकी ॥ कोण देव होईल शेखीं ॥ वधील दुराचारी अविवेकी ॥ मुख्य धर्म स्थापील ॥२८॥
दोहीं अवतारांची गुंती ॥ उगवूनि सांगा कृपामूर्ती ॥ परिसोनि त्याची विनंती ॥ संतोष मानी जगदात्मा ॥२९॥
देव म्हणे ब्राह्मणा ॥ बरें पुसिलें विचक्षणा ॥ अभिप्राय आणीं मना ॥ यथार्थ तेंच सांगतों ॥३०॥
जैनवंशीं सारमंडल ॥ होता राजा अतिप्रबळ ॥ सत्तासामर्थ्ये द्रव्य पुष्कळ ॥ संग्रहीं त्याचें असे कीं ॥३१॥
मुख्य घ्यावें इंद्रपदासी ॥ इच्छा उदेली मानसीं ॥ आरंभिता जाहला यज्ञासी ॥ वेदाज्ञा आधारें ॥३२॥
यज्ञीं करावया पशुवध ॥ वेदाचा पूर्वदक्ष बोध ॥ रायें मानूनि अगाध ॥ साहित्य केलें सर्वही ॥३३॥
नारदें इंद्रासि केले श्रुत ॥ इंद्रें प्रार्थिला विधिदैवत ॥ ब्रह्मा होउनि बोधवंत ॥ मृत्युलोका पातला ॥३४॥
हातीं कुंचा लुंचित केश ॥ नेसोनि श्वेत वस्त्रास ॥ दंडकमंडलु लेवोनि पादुकांस ॥ यज्ञानिकट पातला ॥३५॥
प्रकाशें याज्ञिक मूर्छित ॥ विस्मयो पातला राया बहुत ॥ घाली साष्टांग दंडवत ॥ कर जोडूनि उभा पुढें ॥३६॥
राजा म्हणे जी स्वामी ॥ तुम्हीं कोण हें नेणों आम्हीं ॥ नेमिता नमे अंतर्यामि ॥ तर्क ठायीं बैसेना ॥३७॥
ब्रह्मा म्हणे मी विश्वकर्ता ॥ महेश विष्णु नव्हे विधाता ॥ वेद नेणती माझी वार्ता ॥ मायेपर्ता मी असें ॥३८॥
कृत त्रेता द्वापारांत ॥ नाहीं जाहला जीव मुक्त ॥ लोक राम कृष्ण म्हणत ॥ भ्रष्ट जाहले सर्वही ॥३९॥
कैंचा वेद कैंचीं शास्त्रें ॥ मिथ्या रचिलीं कर्मसूत्रें ॥ विपरीत यज्ञाची मंत्रें ॥ हिंसाचारीं निर्मिली ॥४०॥
मत्स्यें शंखासुर वधिला ॥ कूर्मे मंदराचळ पृष्ठीं धरिला ॥ बहु जीव आकांतला ॥ हिंसा जाहली जळचरां ॥४१॥
मंथूनि कष्टीं सुरासुर ॥ पुढें युध्द जाहलें घोरांदर ॥ तेथें कैंचा ईश्वर ॥ काळचक्रें आटिलें ॥४२॥
वराहवेषें हिरण्यास मर्दिला ॥ नरसिंहें हिरण्यकशिपू विदारिला ॥ वामनें बळी पाताळीं घातला ॥ परशुरामें केली पृथ्वी नि:क्षत्र ॥४३॥
रामें राक्षसांच्या कोटी ॥ छेदूनि केली वंशाची आटी ॥ कृष्णा एवढा कपटी ॥ दुजा कोणी दिसेना ॥४४॥
उफराटा गीताउपदेश ॥ वधिलें सख्यां गोत्रजांस ॥ हा तों केवळ काळपुरुष ॥ जगदीश रीत नव्हे ॥४५॥
यादव सखे सात्विक साधु ॥ त्यांचे हाते त्यांचा वधू ॥ हा काय ईश्वराचा बोधू ॥ जगाअगाधु उमजेमा ॥४६॥
ज्या अन्नें विश्व जग ॥ त्यातें जाळिती हें सांग ॥ हा वेद उफराटा मार्ग ॥ जग बुडवण मांडिली ॥४७॥
पशुवध हें महापाप ॥ येणें नासे पुण्य अमूप ॥ इंद्रपद म्हणजे अल्प ॥ भोगिसी नरक जन्मकोटी ॥४८॥
अरिहंता हें माझें नाम ॥ राया जपें तूं सुगम ॥ इतर नामें तोचि भ्रम ॥ नव्हे तारक मजविणें ॥४९॥
बहु प्रकारें नेमून मनें ॥ बौध्दमत स्थापिलें ब्रह्मयानें ॥ विस्तार कासया सांगणें ॥ त्यापर्यंत तुज दाविली ॥५०॥
रायें यज्ञ केला समाप्त ॥ इंद्रपद राहिलें स्वस्थ ॥ यापरी स्थापोनि बौध्दमत ॥ ब्रह्मा गेला स्वस्थाना ॥५१॥
रायें बौध्दशास्त्र मान्य केला ॥ निंदी वेदशास्त्रपुराणांला ॥ द्वेषी गीताभागवताला ॥ रामकृष्ण मानीना ॥५२॥
जती शेवडे जैन ॥ बौध्द शास्त्रीं जाहले निपुण ॥ वादें जिंकिती पंडितजन ॥ अवमानिती ब्राह्मणां ॥५३॥
हें जाणोनि ब्रह्मदेव ॥ प्रार्थिता जाहला सदाशिव ॥ तो होऊन मानव ॥ शंकराचार्य प्रगटला ॥५४॥
जेणें आपुल्या पुरुषार्थे ॥ जिंकोनि जैनमतातें ॥ स्थापिलें वेदशास्त्रातें ॥ स्वधर्मी ब्राह्मण श्रेष्ठ केले ॥५५॥
यापरी बौध्दअवतार ॥ तुज सांगितला निर्धार ॥ कलींत मुख्य ईश्वर ॥ मीच ओळखें द्विजोत्तमा ॥५६॥
अगा या कलीमाझारी ॥ जो मातें भजेल निर्धारीं ॥ त्यासी मी तारीन संसारीं ॥ इतर उपाय असेना ॥५७॥
या कलींत इंद्रियजित ॥ काम क्रोध दंभरहित ॥ तोचि तरेल भवाब्धीत ॥ क्षमाशील जो साधु ॥५८॥
मायाचक्रापासूनि देवता ॥ त्यांचें भजनें न घडे मुक्तता ॥ यालागीं चारी पदार्थां ॥ मागें तूतें निरुपिलें ॥५९॥
परमेश्वरावांचून ॥ मोक्ष न घडे जीवालागून ॥ ते योग परत्र जाण ॥ अवतार एक हरीचा ॥६०॥
कृतीं हंस त्रेतीं दत्त ॥ द्वापारीं कृष्ण समर्थ ॥ कलीमाजी अनंत ॥ चक्रधर नाम माझें ॥६१॥
या चक्रधरनामाची प्रौढी ॥ ज्याचे वाचेमाजी गडबडी ॥ तो उभवील मोक्षाची गुढी ॥ कलि त्यासी बाधीना ॥६२॥
या चक्रधरनामापुढें ॥ भूत पिशाच पळे बापुडें ॥ देवतांचें विघ्न उडे ॥ अंगीं जोडें ज्ञानकवच ॥६३॥
मी सकळांचा गोसावी ॥ माझी लाधे तो पदवी ॥ न पडे देवतांचे गोवीं ॥ लावी इतरां मद्भजनीं ॥६४॥
विषयभोग मानिजे वमन ॥ दंभ लौकिक त्यागून ॥ संसार सांडी ओवाळून ॥ मातें शरण रिघावें ॥६५॥
नको पडूं तीर्थांचिया फेरी ॥ गुंतूं नको व्रतांचिया भंवरी ॥ माझें शुध्द भजन करीं ॥ देवताचक्रीं फसूं नको ॥६६॥
यज्ञ याग क्रिया जीवास ॥ देवतांनीं घातले फांस ॥ भक्षिताति मद्य मांसास ॥ पशुवधाचे दोष भारी ॥६७॥
माझी हेचि आज्ञा प्रमाण ॥ न करावें आत्महनन ॥ याहूनि पातक आन ॥ भुवनत्रयीं असेना ॥६८॥
भक्ति ज्ञान वैराग्य ॥ जो आचरला यथासांग ॥ तोचि जीव भाग्य ॥ साम्राज्यपदवी त्या लाभे ॥६९॥
भक्ति ज्ञान नसे ज्या शरीरीं ॥ तो जाणवा हीन दरिद्री ॥ भोगी चौर्‍यांशींचे क्लेश भारी ॥ विश्रांति क्षणभरी त्या नसे ॥७०॥
ऐका संसाराची राहाटी ॥ द्रव्य पदरीं तोही कष्टी ॥ द्रव्यहीन तो हिंपुटी ॥ संतुष्ट कोणी असेना ॥७१॥
प्रारब्धकर्म सुकृत प्रमाण ॥ त्रिविध प्रकारें वर्ते जन ॥ त्रिगुणसूत्रें वेष्टून ॥ जीव भोगी सुखदु:खें ॥७२॥
निखळ जो सत्वगुण ॥ ज्या पुरुषा असे जाण ॥ तयासी वैकुंठपुरीं गमन ॥ विष्णुसन्निध विराजे ॥७३॥
ज्याची रजोगुणी बुध्दी ॥ त्यासी पुन्हा जन्म बाधी ॥ पडे गर्भवासाचिये बंदीं ॥ पावे मनुष्यदेहातें ॥७४॥
ज्याचे देहीं तमोगुण ॥ तो भोगी नरक दारुण ॥ तिहीं गुणीं जीव जाण ॥ गुंतला मुक्त होईना ॥७५॥
शुध्द हंस सत्व गहन ॥ तो चौथा परमेश्वर जाण ॥ तो लाभतां जीव पावन ॥ कैवल्यपदा पाविजे ॥७६॥
त्रिगुणीं देवतांचे बंद ॥ गुंतले असती संबंध ॥ ते सोडावे अबध्द ॥ मिळावें शुध्दांश निर्द्वंद्वीं ॥७७॥
सर्वधर्मान्परित्यज्य ॥ ऐसें वदला देवकी तनुज ॥ त्याचा अर्थ विचारिजे ॥ धर्म म्हणिजे कशातें ॥७८॥
आपल्या स्वधर्मास सांडावें ॥ अथवा दानधर्म करावे ॥ ऐसें सांगीतलें नाहीं देवें ॥ धर्म म्हणिजे महाभक्ती ॥७९॥
असतां देवाची उपासना ॥ तेंचि फळदायक जाणा ॥ यज्ञ याग दान पुण्या ॥ केलिया स्वर्गसुख जोडे ॥८०॥
या नांव स्वधर्म ॥ त्यजावा देवाचें हें वर्म ॥ भजावा मुख्य पुरुषोत्तम ॥ जो निजपदीं बैसवी ॥८१॥
मातें यावें शरण ॥ म्हणिजे सांडावें दुजेपण ॥ ते अनन्याची खूण ॥ अनुसरोनी बोलिजे ॥८२॥
दारा पुत्र गोत्र संबंध ॥ हा त्यागिजे विषयकंद ॥ काम क्रोध लोभ मद ॥ वांतिप्राय मानिजे ॥८३॥
मान प्रतिष्ठा थोरपण ॥ याति कर्म अभिमान ॥ इतुकें सुटे मनापासोन ॥ तेव्हां शरण रिघावें ॥८४॥
भक्त म्हणती देवाचा ॥ वेष घेऊनि भिक्षुकाचा ॥ द्रव्य मेळवून कुटुंबाचा ॥ चरितार्थ करी जो नर ॥८५॥
तो जाणावा नोव्हे साधू ॥ दुराचारी नष्ट भोंदू ॥ मी जगदीश परमानंदू ॥ यास स्वप्नीं नातुडें ॥८६॥
यालागीं प्रपंचपरमार्थी ॥ दक्ष असावें बुध्दिमंतीं ॥ तरीच घडे ईश्वरप्राप्ती ॥ भक्ति त्याचे घर रिघे ॥८७॥
ऐकें भक्त्तीचें लक्षण ॥ आवडे साधुसंत जन ॥ अखंड ईश्वरभजनीं मन ॥ संसारआश्रमीं उदास ॥८८॥
विषयभोगीं उदास ॥ संतसेवेसि परम हर्ष ॥ मार्गी जातां मुंगीस ॥ पाहोनि पाय तो चुकवी ॥८९॥
मार्गी जातां तांतडी ॥ न मोडिजे तृणकाडी ॥ मांसभक्षासी आवडी ॥ सांडी वोक पैं जैसी ॥९०॥
हिंसा पाप अति गहन ॥ हें त्यागी तो पुरुष धन्य ॥ राहे शांति क्षमा धरुन ॥ भक्ति लक्षण या नांव ॥९१॥
लोभी न विसरे ठेवण ॥ वत्स आठवी धेनुलागून ॥ चकोर इच्छी चंद्रकिरण ॥ चातक स्मरे मेघासी ॥९२॥
यापरी जगदीशीं ॥ लय लावी अहर्निशीं ॥ वयें तनु अंगनेपासीं ॥ कामिक जैसा लंपटे ॥९३॥
उठे संसाराचा त्रास ॥ कृपा करो जगदीश ॥ हें आवडे त्याच्या मनास ॥ भक्ति त्यासी म्हणावी ॥९४॥
आतां सांगतों वैराग्य ॥ राज्यवैभव मानी सोंग ॥ श्वानविष्ठेसमान स्वर्ग ॥ विषयसुख ज्या वमन ॥९५॥
स्वर्गीची पातल्या देवांगना ॥ पिशाच खरी मानी मना ॥ यापरी उडे विकल्प कल्पना ॥ वैराग्या शोभा तैं दिसे ॥९६॥
हिरे माणिक द्रव्य पाहून ॥ मानी श्वानमांसासमान ॥ पालखी तिरडी भावी मन ॥ पलंग शय्या शेणखाई ॥९७॥
न धरी रंक-रायांची भीड ॥ पापालागीं मोठा भ्याड ॥ सांडी संसारिक बंड ॥ लिगाड तोडी मळाचा ॥९८॥
बहु मिष्टान्न पाहून ॥ मानी महिषीचें आंबवण ॥ न करी अंगमर्दन ॥ लोकसेवा इच्छीना ॥९९॥
ऐसी वैराग्याची कसवटी ॥ अहर्निशीं देहातें आटी ॥ तया होय ईश्वरभेटी ॥ पडे मिठी आत्मतत्वीं ॥१००॥
यापरी वैराग्य शुध्द ॥ केल्या पावे आत्मबोध ॥ नाहीं तरी भोरपी मैंद ॥ जगभोंदू तो जाहला ॥१॥
आपुल्या कुटुंबाकारण ॥ शिष्याचें दारीं बैसे धरण ॥ कलहो करी जाय रुसोन ॥ शापें हस्त आपटी ॥२॥
शिष्यामागें गडबडी ॥ आपुल्या ठायीं चडफडी ॥ दोहींकडे द्वेष नाडी ॥ परमार्थ गोडी त्या कैंची ॥३॥
वैराग्य करावें आपणासाठीं ॥ शिष्यवर्गा न पडावी आटी ॥ नुसती पडे कपाळकुटी ॥ दोहींकडें नागवण ॥४॥
सांगीतली वैराग्याची रीति ॥ ज्ञान परिसें सुमती ॥ जेणें मोक्षातें पावती ॥ लाभे जैं त्या सदैवा ॥५॥
ज्ञानसंसारबांदवडी सोडवी ॥ परमेश्वरातें भेटवी ॥ संशय विकल्प उडवी ॥ अज्ञान बुडवी समूळ ॥६॥
ज्ञान कामक्रोध सोडी ॥ वासनेचें मूळ खुडी ॥ द्वेषाचे दुर्ग पाडी ॥ मोडी खोडी विषयांची ॥७॥
ज्ञान मनातें करी अचळ ॥ सद्बुध्दि माजवी प्रबळ ॥ मोह ममतेचा प्रबळ मळ ॥ धुवोनि सांडी कुटुंबासी ॥८॥
ज्ञान धैर्यासी देई बळ ॥ शांतीचा करी सुकाळ ॥ मतीसी राखें निर्मळ ॥ क्षमा दया ते वाढवी ॥९॥
ज्ञानें ओळखी जिवशिव ॥ मी कोण हा कळे अनुभव ॥ बध्दमुक्तत्वाचा ठाव ॥ जाणे भाव अभावासी ॥११०॥
कर्म क्रिया पाप पुण्य ॥ जन्म मरण चौर्‍याशीं बंधन ॥ वेद शास्त्र पुराण ॥ निरखी ज्ञान स्वयें डोळां ॥११॥
देह चारी चारी अवस्था ॥ पंचीकरण महावाक्यता ॥ सारासार विचार पुरता ॥ बोधकर्ता ज्ञान तें ॥१२॥
या ज्ञानची पैं प्राप्ती ॥ मज ईश्वरातें भजती ॥ माझ्या नामाची परम ख्याती ॥ निज ज्ञानातें भेटवी ॥१३॥
अद्यापि माजला नाहीं कली ॥ तों हें आधी ज्ञान उजळी ॥ करुनि कर्मांची होळी ॥ मोक्षमेळीं तूं बैसें ॥१४॥
येथूनि पुढें कठिण काळ ॥ कलि वाढेल प्रबळ ॥ देवाचें सामर्थ्य राहील ॥ अधर्म होईल विख्यात ॥१५॥
ऋषि न देती दर्शन ॥ देखतां अलोप होती जाण ॥ लोक पूजिती पाषाण ॥ क्रियाहीन वर्तती ॥१६॥
रोगांचें बळ होईल भारी ॥ पीडा पावती नर नारी ॥ भूतें झडपितील नानापरी ॥ मंत्रऔषधी मंदतील ॥१७॥
अल्प आयुष्यांत मरतील प्राणी ॥ राजा पीडी प्रजे लागूनी ॥ पीक सांडील मेदिनी ॥ पर्जन्य समयीं पडेना ॥१८॥
कलहो माजेल घरोघरीं ॥ अविश्वास होईल भारी ॥ पुत्र पित्यासी वैर धरी ॥ सोयरें संबंधीं वैर पडे ॥१९॥
कुमार मातेसी म्हणे वैरिण ॥ वेगळा निघे बाईल घेऊन ॥ कडेस खेळवी मेहुणी लागून ॥ पाठी लागे भगिनीच्या ॥१२०॥
आपुल्या वनितेचा मानी वीट ॥ परदारा भोगी चावट ॥ कुटुंबात करी कटकट ॥ वीट मानी संतांचा ॥२१॥
जन होईल कठोर ॥ परस्परें माजेल मत्सर ॥ निंदा दोष अहंकार ॥ फुंद माजेल चहूंकडे ॥२२॥
गायत्री मंत्र कामधेनु असोन ॥ भिक्षा मागती ब्राह्मण ॥ वेदसामर्थ्य विसरोन ॥ साबरीमंत्र घरोघरीं ॥२३॥
करी गायत्रीचा वध ॥ शिवालयें भंगिती अविंध ॥ देशोदेशीं कलहद्वंद्व ॥ गोत्रामाजी वाढेल ॥२४॥
कौलिकमार्ग घरोधरीं ॥ मद्यमांस आणिती दुराचारी ॥ अठरा वर्ण एकत्रीं ॥ अभक्ष्य भक्ष्य भक्षिती ॥२५॥
कलियुगीं तमाखूकरुन ॥ कलिनें जगासी केलें बंधन ॥ तिचा वाढवूनि बहु मान ॥ विश्वामाजी विस्तारली ॥२६॥
ओढिती खाती नाकीं कोंदिती ॥ ऐसी काळाची विपरीत गती ॥ उच्छिष्ट धूर घेती देती ॥ न म्हणती यात परयात ॥२७॥
भांग तमाखू ज्या मठीं ॥ तेथें जगाची पडे मिठी ॥ जावया साधूचे भेटी ॥ आळस पोटीं येतसे ॥२८॥
पोथी ऐकतां निद्रा लागे ॥ संसारगोष्टी अहोरात्र सांगे ॥ भिक्षुक पाहोनि भरे रागें ॥ टीका करी संतांचीं ॥२९॥
अध्यात्मविद्या न रुचे ॥ वाउग्या कर्मा बुध्दि सुचे ॥ ईश्वरभजनीं मन कैचें ॥ चावटीस जिव्हा वळवळी ॥१३०॥
दया धर्म जाईल ॥ पुण्य जाईल पाप होईल ॥ शांति क्षमा विवेक नासेल ॥ सुबुध्दि दडेल दिसेना ॥३१॥
सांडोनि जपतपांसी ॥ युध्द करतील संन्यासी ॥ वागवितील शस्त्रांसी ॥ ग्रंथ स्वप्नीं रुचेना ॥३२॥
सत्याचा पडेल तोटा ॥ असत्याचा भरेल फांटा ॥ पंचाईत न्याय करितील खोटा ॥ चेष्टा भल्याची होईल ॥३३॥
बहुत ग्राम करिती वोस ॥ कोणी न जाती यात्रेस ॥ दरवडा पडेल उगवतां दिवस ॥ दाद कोणी घेईना ॥३४॥
मातेपुढील बालक ॥ ओढून नेतील व्याघ्र वृक ॥ मोहनी घालोनियां ठक नागवितील मार्गस्थां ॥३५॥
अन्नवस्त्रांचा तोटा ॥ न पडे पर्जन्यथेंबुटा ॥ लोक राहातील अव्हाटा ॥ रोजगार कोठें लागेना ॥३६॥
अन्नासाठीं प्राणी कळवळे ॥ विकितील आपुलींच बाळें ॥ भिकारी भाकर घेऊनि पळे ॥ बळेंचि शिरतील गृहांत ॥३७॥
हलकल्लोळ होईल जग ॥ नित्य कलहाचा प्रसंग ॥ घर फोडोनियां मांग ॥ वित्त नेतील दोनप्रहरां ॥३८॥
कोणे समयीं पर्जन्य फार पडे ॥ केव्हां अवर्षणचि घडे ॥ विश्वातें क्लेश गाढे ॥ सुखाचा लेश दिसेना ॥३९॥
कोणी कोणास न पुसत ॥ हेचि इच्छा करावा घात ॥ होईल सृष्टीचा आकांत ॥ रक्तवृष्टि होईल ॥१४०॥
पृथ्वीस होईल भूकंप ॥ दिवसा दिसती भूतांचे कळप ॥ झोटिंग हडळींचा दर्प ॥ पंचाक्षरी कांपती ॥४१॥
यापरी माजेल कली ॥ राक्षसक्रिया वर्तेल सकळीं ॥ मग कोपोनि इंद्र बळी ॥ अवतार घेईल कलंकी ॥४२॥
मोडोनि अधर्माची राहटी ॥ स्वधर्मे बैसवील पटीं ॥ करोनि पराक्रमाची राहाटी ॥ आटील म्लेंछराज्यातें ॥४३॥
असो त्याचा विस्तार ॥ कासया वाढवावा प्रकार ॥ तुझें पृच्छेचें उत्तर ॥ परिहार सांगितला ॥४४॥
आतां माझी आज्ञा प्रमाण ॥ धरोनि त्वां वर्तावें जाण ॥ तोचि उपदेश करुन ॥ विश्वालागीं प्रबोधीं ॥४५॥
माझी ब्रह्मविदया हें शास्त्र ॥ काळासि अजिंक्य शस्त्र ॥ त्वां अनुतिष्ठावें पवित्र ॥ परम सूत्र ईश्वरी ॥४६॥
ओळखोनि चारी पदार्थ ॥ मुख्य भजावा अनंत ॥ येणें जीवास होय मुक्तत्व ॥ येर्‍हवीं पडे भवचक्रीं ॥४७॥
अवतार भिन्न सांगीतलें ॥ हें व्यासासी नाहीं कळलें ॥ दहा अवतार विष्णूनें घेतले ॥ हेंचि गमलें ऋषींसी ॥४८॥
म्यां गीता केली व्यासें म्हणतां ॥ मान वांकडी जाहली तत्वतां ॥ हे समस्त ईश्वर सत्ता ॥ केवी गोचर होईल ॥४९॥
स्वरुपीं वसे समता ॥ देवतांठायीं विरोधता ॥ यालागीं अवतारभिन्नता ॥ कार्याकारणें निरुपिली ॥१५०॥
शांति क्षमा दया ॥ कृपा करुणा माया ॥ विवेक ज्ञान तुर्या ॥ हेंच चर्या ईश्वराची ॥५१॥
धैर्य गांभीर्य औदार्य ॥ सत्ता सामर्थ्य ऐश्वर्य ॥ व्यापक आनंद अक्रिय ॥ हे गुण ईश्वरीं ॥५२॥
बोधकर्ता उध्दरिता ॥ सद्गुरुपद जोडे तत्वता ॥ मोक्षदेता भवहर्ता ॥ हे गुणवार्ता ईश्वरीं ॥५३॥
सर्वांतीत सर्वसाक्षी ॥ लक्ष्यातीत नये लक्षीं ॥ भवचक्रांत जीव रक्षी ॥ हे गुणादीक्षा ईश्वरीं ॥५४॥
निर्विकार निराधार ॥ अढळ विमळ परमेश्वर ॥ मायातीत परात्पर ॥ जगदीश दीनबंधू ॥५५॥
निर्वैर निरुपम ॥ परमात्मा पुरुषोत्तम ॥ स्तवितां थकित निगमागम ॥ तो निरायम जगदीश ॥५६॥
दीपासी लाविजे वाती ॥ तेवीं परमेश्वर चतुर्थज्योती ॥ जीवास पावावया गती ॥ अवतरती युगायुगीं ॥५७॥
कृतयुगाचे आयुष्य त्रेतीं नये ॥ त्रेताचें द्वापारीं नये ॥ द्वापारींचें कलींत नयें ॥ हे तंव उघड ये प्रत्ययासी ॥५८॥
तेवीं अवतारांचे गुण ॥ देह प्रकृति वेगळी जाण ॥ समईत दीपकळिका भिन्न ॥ एक तैलआधारें ॥५९॥
यापरी स्वरुपसागर ॥ तरंगवत् हे अवतार ॥ प्रकृतिकुंभीं बिंबाकार ॥ परीं तें स्वरुपीं संचले ॥१६०॥
जाणोनियां हें वर्म ॥ आतां ओळखें पुरुषोत्तम ॥ जपास सुगमे नाम ॥ चक्रधर प्रतापी ॥६१॥
यापरी बोधोनि द्विज ॥ सांगितले गोप्य रहस्य गुज ॥ अवतार गुप्त जाहला सहज ॥ तेथिची तेथें संपला ॥६२॥
ब्राह्मण-ईश्वर संवाद ॥ परिसतां श्रोतयां होय बोध ॥ परमार्थतरणोपाय अगाध ॥ शहामुनि बोलिला ॥१६३॥
इति श्रीसिध्दांतबोधग्रंथे तत्त्वसारनिर्णय त्रिंशत्तमोऽध्याय: ॥३०॥
अध्याय ॥३०॥ ओव्या ॥१६३॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥

N/A

References : N/A
Last Updated : November 22, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP