मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|सिध्दान्तबोध|
अध्याय ४ था

श्रीसिध्दान्तबोध - अध्याय ४ था

‘श्रीसिध्दान्तबोध’ हा संतकवि श्रीशहामुनि यांचा ग्रंथ म्हणजे मराठी वाड्मयाच्या खाणींतील एक तेजस्वी हिरा आहे.


श्रीगणेशायनम: ॥
श्रीकृष्णा तुज मी शरण ॥ माझा तोडीं अभिमान ॥ जन्ममरण निवारुन ॥ सन्निध पद दे आपुले ॥१॥
माझा तूंचि गणपती ॥ होसी तूंचि सरस्वती ॥ सद्गुरु जे ब्रह्ममूर्ती ॥ तो तूंचि श्रीकृष्णा ॥२॥
अनेक ग्रंथांचे प्रारंभास ॥ आधीं नमिती श्रीगणेश ॥ मग वर्णिती सरस्वतीस ॥ तिचे पाठी सद्गुरु ॥ गुरुमागें संत सज्जन ॥ संत जाहलिया श्रोतयां लागुन ॥ श्रोतयां पाठीं सभामंडण ॥ कवीश्वर स्तविताती ॥४॥
तैसें येथें नाहीं केलें ॥ धरिलीं श्रीकृष्णाचीं पाउलें ॥ ज्याचे कृपेनें मति चाले ॥ कविताशक्ति वदावया ॥५॥
अनन्यभावें भजा भगवंता ॥ ऐसी बोले भगवद्गीता ॥ पुसों जातां भागवता ॥ तेणें साक्ष दीधली ॥६॥
अनुभव आणिला मनास ॥ गीता वंद्य त्रैलोक्यास ॥ सदैव आवडे सनकादिकांस ॥ ब्रह्मादिक पूजिती ॥७॥
त्याहोनि श्रेष्ठ नसे कांहीं ॥ ऐसी भागवताची ग्वाही ॥ यालागीं सर्वां आधीं पाहीं ॥ श्रीकृष्णदेवी नमियेलें ॥८॥
जो सकळ देवां शिक्षा करिता ॥ बाळपणीं ठकिला विधाता ॥ इंद्रास फजीत करुनि पुरता ॥ दैत्य वधिले अतुर्बळी ॥९॥
यमासि दंड करुनि ॥ गुरुपुत्र आणिला ते क्षणीं ॥ जयाची प्रगट गुप्त करणी ॥ सहसा न कळे कवणासी ॥१०॥
बाणासुराचा कैवार ॥ घेऊनि आला शंकर ॥ इंद्रा जितोनि शार्ड्गधर ॥ पण नेला सिध्दिते ॥११॥
हनुमंत सर्वांहूनि बलिष्ठ ॥ उचलों पाहे भूगोल श्रेष्ठ ॥ सेवक अर्जुनाहातीं स्पष्ट ॥ जिंकोनि ठेविला ध्वजेशी ॥१२॥
हारीं आणोनि चैद्यासी ॥ बहु विटंबिले रुक्मियासी ॥ लग्न लावूनि भीमकीसी ॥ द्वारकेसी आणिली ॥१३॥
संहारुनि कौरवांला ॥ राज्यीं स्थापिले धर्माला ॥ युध्दीं अर्जुन उपदेशिला ॥ विश्वरुप दावुनी ॥१४॥
प्रगट केली भगवद्गीता ॥ पावन होती पठण करितां ॥ तैसेंचि उध्दव भक्ता ॥ भागवत निवेदिलें ॥१५॥
उध्दव अर्जुन भक्तांसी ॥ सांगितलें ब्रह्मज्ञानासी ॥ ज्याचे आधारें विश्वजनासी ॥ परमार्थ कळे तरावया ॥१६॥
ऐसा जाणोनि अगाध महिमा ॥ शरण आलों मेघश्यामा ॥ जीवीं धरोनि तव नामा ॥ आठवीतसें आवडीं ॥१७॥
अल्ला तूंचि गणेश सरस्वती ॥ तूंचि गुरु संतमूर्ती ॥ तूंचि श्रोता गोतजाती ॥ मायबाय बहीण बंधू ॥१८॥
यालागीं तुज सांडून ॥ कवणालागीं जाऊं शरण ॥ तूं भक्तवत्सल नारायण ॥ माझी करुणा करावी ॥१९॥
नाहीं विद्या नाहीं ज्ञान ॥ नाहीं शास्त्र वेदपठण ॥ महावाक्यनिरुपण ॥ कोण आम्हां सांगतों ॥२०॥
घडलें नाहीं तीर्थदान ॥ जप तप ना अनुष्ठान ॥ भाग्यहीन दरिद्री दीन ॥ पदरीं पुण्य असेना ॥२१॥
यापरी मी चांगला ॥ योतीनें कडू भोपळा ॥ आतां गोड करोनि गोपाळा ॥ चवी आणीं कवितेसी ॥२२॥
देवा अगाध तुझी करणी ॥ इंद्रासी स्थापिसी अमरासनीं ॥ निश्चळ पद ध्रुवासी देऊनी ॥ सुखी केला अक्षयी ॥२३॥
तुझी कृपा जाहलियावरी ॥ काय एक न धडें श्रीहरी ॥ पाषाणगोटा धरितां करीं ॥ करी सोनें तत्काळ ॥२४॥
आतां सर्व माझें भांडवल ॥ तें तूंचि गा गोपाळ ॥ यालागीं चरणकमळ ॥ दृढ धरिलें म्यां हृदयीं ॥२५॥
ऐसा करुनि एक नेम ॥ मनीं स्मरला मेघश्याम ॥ पुढील कथेचें काम ॥ सूचना जाहली बुध्दीसी ॥२६॥
वैकुंठपुर महालाला ॥ स्तुतिकार खाना लागला ॥ शहामुनि कामाठयाला ॥ महिमा देतो श्रीगुरु ॥२७॥
घेऊनि कृपेच्या रोजमुर्‍यासी ॥ लागलों कवितेच्या कामासी ॥ करीन कारागिरीसी ॥ चोज दावीन चतुरांतें ॥२८॥
मागिल्या अध्यायीं ऋषीनें ॥ निंदिलें ब्रह्मलोकभुवन ॥ सत्यलोक वैकुंठस्थान ॥ तेंचि निरुपण सांगतों ॥२९॥
ऋषि म्हणे ऐक बरवें ॥ विष्णु परमात्मा जाणावें ॥ शरण गेलिया मनोभावें ॥ महासंकटीं रक्षी तो ॥३०॥
तोचि निराकार परि सगुण ॥ जाहला भक्तां कारण ॥ वैकुंठपुरीं घालोनि ठाण ॥ राज्य करितो महाराज ॥३१॥
जे निराकार निजज्योती ॥ तेचि श्रीविष्णूची मूर्ती ॥ स्तवन करिती देव श्रुतीं ॥ ब्रह्म म्हणती पुराणें ॥३२॥
पन्नास सहस्त्र गांवें लांब ॥ तितुका मध्य असे गर्भ ॥ सत्ता खांब उभे स्वयंभ ॥ त्यावरी माडी सहस्त्रखणी ॥३३॥
इंदुभगिनीचा कांत ॥ सिंधुजामात वसे जेथ ॥ नगरमहिमा अद्भुत ॥ नये वर्णितां मुखानें ॥३४॥
ज्याचे घरीं देव पाईक ॥ अर्जी करिती ब्रह्मादिक ॥ इंद्र चंद्र जैसे रंक ॥ द्वारीं उभे तिष्ठती ॥३५॥
गण गंधर्वांची दाटी ॥ पैस नाहीं घ्यावया भेटी ॥ जय विजय द्वारपाळ काठी ॥ हातीं घेऊनि लोटिती ॥३६॥
अष्टमहासिध्दि ज्याचे घरीं ॥ सदैव तिष्ठती कामारी ॥ अनंत शक्ती घरीं ॥ झाडलोट करिताती ॥३७॥
नवनिधी भांडाराअस ॥ रक्षक ठेविलें कुबेरास ॥ नारद जासूद त्रैलोक्यास ॥ वार्ता आणी जाउनी ॥३८॥
प्रकाश पडती दिव्य तेजांचे ॥ डोळे तरळती ज्ञानाचे ॥ रात्रि आणि दिवसाचें ॥ काम जेथें असेना ॥३९॥
हिरे पडिले जेवीं पाषाण ॥ रत्न जडिताचें आंगण ॥ सोन्यारुप्या लागून ॥ कोणी तेथें पुसेना ॥४०॥
काम मोक्ष धर्म अर्थ ॥ चारी पुरुषार्थ वसती तेथ ॥ यश कीर्ती सत्वा सहित ॥ माहेर जैसें नांदती ॥४१॥
दया शांति आणि क्षमा ॥ यांसहित नांदे रमा ॥ त्याचे मर्यादेची सीमा ॥ उल्लंघूं न शके समुद्र ॥४२॥
चावडी बांधोनि स्वर्गांत ॥ तेथें बैसविला सूर्यसुत ॥ जगाचें पापपुण्य पहात ॥ शिक्षा करी तैसीच ॥४३॥
वेद भाट होउनि गर्जती ॥ अठरा पुराणें कीर्ति गाती ॥ ऐसा टाकूनि वैकुंठपती ॥ ईश्वर म्हणतां ब्रह्मयातें ॥४४॥
मत्स्य होऊनि वेद आणिले ॥ कूर्म होऊनि उचलिले ॥ वराहरुपें हिराण्याक्षा तुडविलें ॥ पीठ केलें रगडुनी ॥४५॥
महाविशाळ स्तंभ चिरिला ॥ नृसिंहरुपें कडकडिला ॥ हिरण्यकशिपु दैत्य मर्दिला ॥ भक्त रक्षिला प्रल्हाद ॥४६॥
वामनरुपें भिक्षुक जाहला ॥ बळी पाताळी घातला ॥ स्थिर राखिलें इंद्रपदाला ॥ सुखी केलें अमरांतें ॥४७॥
होऊनि रेणुकेचा बाळ ॥ क्षत्रिय जिंकिले एकवीस वेळ ॥ पृथ्वी जिंकोनि ब्राह्मणकुळ ॥ संतोषविलें समस्त ॥४८॥
रामरुप प्रतापखाणी ॥ सिंधू वरते पाषाण तारुनी ॥ दशाननातें मारुनी ॥ मुक्त केलें विबुधांसी ॥४९॥
धरोनि कृष्णावतार ॥ मारिले कंस चाणूर ॥ बांधोनि द्वारका नगर ॥ राज्य केलें भूलोकीं ॥५०॥
यापरीच बौध्द जाण ॥ भक्तां साह्य नारायण ॥ पुढें कलंकी होऊन ॥ संहार करील दुष्टाचा ॥५१॥
ऐसे दहा अवतार ॥ धरिता जाहला लक्ष्मीवर ॥ दयावंत कृपासागर ॥ पवाडा गर्जे त्रिभुवनी ॥५२॥
कृतयुगाचे ठायीं ॥ सनत्कुमार भक्त पाहीं ॥ मुक्त जाहले ज्याचे पायीं ॥ केवढी महिमा विष्णूची ॥५३॥
योगी सिध्द ऋषि उध्दरिले ॥ अजामिळासी विमान आलें ॥ मानवी जन कित्येक तरले ॥ नाम घेतां आवडीं ॥५४॥
साधु संत पुण्यात्मे ॥ पावन जाहले याचि नामें ॥ अंतकाळीं मेघश्यामें ॥ मुक्ति दीजे स्मरतां ॥५५॥
व्यास वसिष्ठ अगस्ती ॥ वैकुंठलोकीं नित्य वसती ॥ अत्रिऋषी अनसूया सती ॥ विश्वामित्र गौतम ॥५६॥
कपिलमुनि कण्व देख ॥ भारद्वाज दुर्वासादिक ॥ शुक आणि वाल्मीक ॥ ज्यांची कीर्तिपुराणीं ॥५७॥
अनंत सिध्दि अनंत ऋषी ॥ अनंत योगी तापसी ॥ सर्वकाळ अनंतापासीं ॥ क्रीडा करिती स्वानंदे ॥ ५८॥
गरुड बलिष्ठ गुणसंपन्न ॥ उडो पाहे त्रिभुवन ॥ तोही हरिचें वहन होऊन ॥ जाहला सेवक आवडीं ॥५९॥
अगाध विष्णूचा गरिमा ॥ वर्णितां शेषास भरला दमा ॥ उध्दरावया आपुला आत्मा ॥ केला पलंग अंगाचा ॥६०॥
निराकार आणि सगुण ॥ सत्य विष्णु नारायण ॥ याहोनि श्रेष्ठ आन ॥ बोलतां कष्ट जिव्हेसी ॥६१॥
ऐसें ऐकोन वचन ॥ एक ऋषी उठला क्षोभून ॥ म्हणे श्रेष्ठांपुढें वचन ॥ बोलतां लज्जा न येची ॥६२॥
आधीं बरे बोधूनि पहावें ॥ तैशा सारिखें बोलावें ॥ पांगुळ भरुनि हांवें ॥ म्हणे डोंगर चढेन ॥६३॥
एक पंचोपाख्यान शिकला ॥ पत्र धाडिलें वाचस्पतीला ॥ जो न्याय न होय तुम्हांला ॥ अडल्या कामा मज हटका ॥६४॥
नृसिंहाचा मंत्र शिकला ॥ चमत्कार दाखवी लोकांला ॥ म्हणती हाचि देव भेटला ॥ पायां पडती नरनारी ॥६५॥
चिकण गोटा सांपडला ॥ परी भावें पदरीं बांधिला ॥ बळें घासितां लोखंडाला ॥ सोनें होईल कोठुनि ॥६६॥
हिणाचे आणि सुरती ॥ रुपये सारखेच दिसती ॥ परी परीक्षावंत निवडिती ॥ पारखूनि वेगळे ॥६७॥
बरें समजल्यावांचून ॥ व्यर्थ तंडों नये भल्यानें ॥ तुम्हीं तों ऋषिवेष घेऊन ॥ नाहीं शोधिली निजवस्तु ॥६८॥
ज्ञान नाहीं पुरतें ॥ भलतें बोलों नये तेथें ॥ बैसोनि श्रेष्ठांच्या सभेतें ॥ आपली योग्यता मिरवूं नये ॥६९॥
आतां ऐका सावधान ॥ वैकुंठ दावितों उघडोन ॥ तुमची बुध्दि आणि मन ॥ संशयातीत होईल ॥७०॥
जेथें जन्म ना मरण ॥ ऐसें वर्णिलें वैकुंठभुवन ॥ तरी कां पावले पतन ॥ जय आणि विजय ॥७१॥
चुकावया लक्ष चौर्‍यायशी ॥ तपें तपती अहर्निशीं ॥ सायांसे जाती वैकुंठासी ॥ मोक्ष होईल हे आशा ॥७२॥
वैकुंठ नगर मोक्षाचें ॥ जय विजय द्वारपाळ हरीचे ॥ शाप बैसतां ऋषीचे ॥ खचोनि पडले भूतटीं ॥७३॥
ज्याचे स्वरुपीं भिन्नपण ॥ सन्निध असतां पावले पतन ॥ परमात्मा ऐसिया लागुन ॥ कैसा वाचें म्हणावा ॥७४॥
विष्णु म्हणतां परमेश्वर ॥ तरी कां ऋषीस क्रोधभर ॥ अपवित्र राग साचार ॥ कैसा तेथें प्रवेशला ॥७५॥
आणिक ऐका नवलपरी ॥ भृगु ऋषि कोपला भारी ॥ लात मारोनी उरावरी ॥ दांतघसणी पाडिला ॥७६॥
तेव्हांचि कळली त्याची कळा ॥ नव्हे ब्रह्मींचा पुतळा ॥ कित्येक कृत्रिम कर्मे वर्तला ॥ तेंही तुम्हां सांगतों ॥७७॥
कोणे एके दिवशीं ॥ भस्म लावोनि अंगासी ॥ शिव एकांती कैलासीं ॥ नग्न होऊनि बैसला ॥७८॥
मांडीवरी ते हिमालयंतनया ॥ बैसली होती आदिमाया ॥ सर्व भूषणें दिव्यकाया ॥ प्रकाशलीसे साजिरी ॥७९॥
तेचि समयीं एक दैत्य ॥ विचरत होता गगनपंथ ॥ अकस्मात गौरीप्रत ॥ पापमूर्तीनें देखिलें ॥८०॥
पाहोनि लावण्य़सुंदरी ॥ मग मनांत विचार विवरी ॥ म्हणे आजि दैवाची थोरी ॥ अपूर्वे वस्तु लाधली ॥८१॥
उचलोन नेऊं घराकडे ॥ मज जिरों नेदिती दैत्य गाढे ॥ आतां जावोनि रायापुढें ॥ वार्ता इची सांगावी ॥८२॥
दीपकावरी पतंग ॥ तैसा धांवला लगबग ॥ दैत्य राजयास म्हणे भाग्य ॥ आजि तुझें उघडलें ॥८३॥
सकळ दैत्यांचा नृपती ॥ जालंधर नामें अगाधकीर्ती ॥ त्यातें जाऊनि पापमूर्ति ॥ वार्ता निवेदी गौरीची ॥८४॥
ऐक राया चूडामणी ॥ म्यां देखिली एक कामिनी ॥ तिज सारिखी त्रिभुवनीं ॥ निरखितां कोठें दिसेना ॥८५॥
मंदोदरी सुलोचना ॥ सीता सुंदरी गौतमांगना ॥ रुक्मिणी रती देवांगना ॥ रंभा आणि मेनका ॥८६॥
लक्ष्मी सावित्री इंद्राणी ॥ द्रौपदी लावण्याची खाणी ॥ गौरी विद्युल्लते पासोनी ॥ दीपकळिका भासती ॥८७॥
हास्य वदन मृगलोचनी ॥ म्यां देखिली हो नयनीं ॥ तन्मय होऊनियां मनीं ॥ धांवत आलों तुजपासीं ॥८८॥
ते असे ज्याचे पदरीं ॥ तो जन्माचा भिकारी ॥ राख लाऊनि जटाधारी ॥ नग्न होऊनि बैसला ॥८९॥
हेंचि विपरीत वाटे मातें ॥ पद्मिनी अर्पिली नुपुंसकातें ॥ मुक्ताफळांचे हार कागातें ॥ केवीं शोभती सांग पां ॥९०॥
महिषापुढें गायन ॥ गभाधा हातीं दर्पण ॥ पाटांवाचे भूषण ॥ केवीं शोभे मर्कटा ॥९१॥
तैसें शिवापाशीं ॥ म्यां देखिलें गौरीसी ॥ या लागीं सांगावयासी ॥ त्वरें तुजपाशीं पातलों ॥९२॥
चौघे दूत धाडोनि तेथें ॥ बळें आणिजे गृहातें ॥ झोंबू जातां शिवातें ॥ त्याचें बळ चालेना ॥९३॥
ऐकोनि भृत्याचें वचन ॥ राजाचें संतोष पावे मन ॥ आज्ञापी दूतां लागुन ॥ त्वरें आणा गौरीसी ॥९४॥
जेणें सांगीतली हे मात ॥ त्यासी म्हणे तूं परम आप्त ॥ माझा पुरवावा मनोरथ ॥ तूंचि सखा सर्वस्वीं ॥९५॥
आतां निद्रा नये नयनीं ॥ चटपट लागलीसे मनीं ॥ केव्हां देखेन मृगलोचनी ॥ तरीच संतोष या जीवाचा ॥९६॥
नृपे आज्ञापितां दूतांसी ॥ दैत्य धांवले पापराशी ॥ जाऊनि कैलासशिखरासी ॥ हैमवतीं लक्षिली ॥९७॥
नेत्रीं निरखोनि पहाती ॥ मुख विलोकितां नेत्र दिपती ॥ ही विद्युल्लतेची मूर्ती ॥ कोठें येथें उगवली ॥९८॥
एक म्हणे हिमालयकरंडयांतुनी ॥ शोधूनि काढली हिरकणी ॥ अर्धांगाची अंगठी करुनी ॥ शिवविलास भोगित ॥९९॥
दैत्य म्हणती गौरीलागुन ॥ तुझें उघडलें भाग्य पूर्ण ॥ आतां स्वामीण आमुची होऊन ॥ सौख्य भोगी राजसें ॥१००॥
शिव उकरडयाआंत ॥ पडली होतीस सुरुपमुक्त ॥ शोधूनि काढिलें आजि त्वरित ॥ मोला चढसी राजसे ॥१॥
अर्धांग जालंधराचें ॥ तेंचि नाक कल्पूनि साचें ॥ छिद्रा पडेल सुखशयनाचें ॥ पलंगसुखावर शोभसी ॥२॥
पायीं चालसी तेथें ॥ किंवा शिंबिका आणवूं येथें ॥ हें ऐकोनि गिरिजाकांतें ॥ क्रोधें नेत्रीं पाहिलें ॥३॥
कितेक होऊनि पडिले भस्म ॥ स्वल्प उरले कवळीती व्योम ॥ जीव घेऊन राजधाम ॥ हुडहुड करीत पळाले ॥४॥
राजा म्हणे काय जाहलें ॥ भृत्य म्हणती पिसें लागलें ॥ दीपभेटीस पतंग गेले ॥ जिवंत राहती कशानें ॥५॥
सिंहासि झोंबू जातां कोल्हा ॥ गुरगुरतांची पडिला ॥ मुंगी मस्तकीं घेऊनि शिळा ॥ तरेन म्हणे सिंधूतें ॥६॥
युध्द करावया हनुमंतासी ॥ आस्वलें इच्छा धरिली मानसीं ॥ कुबेराचे कन्येसी ॥ पूर्ण पाहे भिल्लटा ॥७॥
खद्योत ब्रहयापासी गेला ॥ सूर्याचा हुद्दा द्यावा मजला ॥ शिकलकर चंद्रासी बोलिला ॥ कलंक तुमचा काढितों ॥८॥
चवघे कावळे मिळोन ॥ राजहंसाचे घरा जाऊन ॥ म्हणती उभयतां सोयरे होऊन ॥ विवाहकार्य संपादूं ॥९॥
गारुडी भेडसावी गरुडासी ॥ म्हणे सर्प डंखवीन तुजसी दर्दुर वदे शेषासी ॥ धरा देईं मम शिरीं ॥१००॥
तैसी बुध्दि तुझी राया ॥ गौरी म्हणिजे आदिमाया ॥ तीतें करीन म्हणसी जाया ॥ याचि पापें भस्मसी ॥११॥
आतां धरोनि शहाणपण ॥ त्यजूनि विषय अभिमान ॥ भावें वंदोनि त्रिनयन ॥ शरण जावें रुद्रासी ॥१२॥
हें नये तुझिया मना ॥ सध्यां पडसी काळवदना ॥ सत्य मानीं या वचना ॥ आग्रह सांडीं नृपवर्या ॥१३॥
ऐसी ऐकोनि भृत्यवर्ता ॥ क्रोध भरला दैत्यनाथा ॥ करकरां चावोनि दांतां ॥ मारा म्हणे या नष्टा ॥१४॥
कां माजलासी दुर्मतिमंदा ॥ सांडोनि बोलसी मर्यादा ॥ डोईवरती घालोनि गदा ॥ चिरोनि करा दुखंड ॥१५॥
नाहीं कळलें माझें बळ ॥ शिव करुनि दाविला बागुल ॥ सिंहापुढें जंबुक बाळ ॥ रमवितां लज्जा नयेची ॥१६॥
सूर्यापासीं जाऊनि त्वरित ॥ सांगे खद्योत आपली मात ॥ तैसा तूंहि मूर्ख येथ ॥ भाषण करिशी मजपुढें ॥१७॥
ऐसें बोलोनि उभा ठेला ॥ सैन्य समुदावो त्वरित सज्जिला ॥ नगरा आंतूनि चालिला ॥ सती मिरवे जयापरी ॥१८॥
दहालक्ष सैन्यानिशीं ॥ वेढा घातला कैलासासी ॥ शिव आणि दैत्यांसी ॥ युध्द मोठें मांडलें ॥१९॥
ब्रह्मा विष्णु चंद्र सूर्य ॥ सकळ देवांचा समुदाय ॥ अवघे शिवासी होऊनि साह्या ॥ रणकंदना मिसळले ॥१२०॥
श्वास घालोनि बैसला ॥ तेव्हा विष्णु सन्निध आला ॥ म्हणे उपाय एक सुचला ॥ सांगतो तो अकर्णी ॥२१॥
या दैत्याची अंगना ॥ चंद्रवदनि लावण्यसदना ॥ तिचा नेम टळल्या जाणा ॥ मृत्यु पावेल हा दैत्य ॥२२॥
ते पवित्र पतिव्रता ॥ वृंदा नामें सत्वसरिता ॥ वर्म जाणे मी लक्ष्मीभर्ता ॥ कार्य साधीन युक्तीनें ॥२३॥
तिचे पतिव्रतापण जंववरी ॥ तंववरी याचें आयुष्य भारी ॥ तिला भ्रष्टवूनि करावी व्यभिचारी ॥ आयुष्य त्याचें सरेल ॥२४॥
जालंधर दैत्य तेची वाती ॥ वृंदासत्व तेल भरती ॥ उणी नोहे आयुष्यज्योती ॥ अधिक धरी तेजातें ॥२५॥
वृदेचें सत्व तेंचि तेल ॥ विष्णुकाम उंदिर जाईल ॥ सत्व शोषूनियां घेईल ॥ आयुष्य वाती पडेल कोरडी ॥२६॥
रुद्रपाणीगगनाहून ॥ त्रिशूळवायु सुटेल कडाडून ॥ त्याची झडप लागतां दारुन ॥ प्राणज्योती विझेल ॥२७॥
हेंचि कथेचें रहस्यक ॥ पुढें परिसावें आवश्यक ॥ श्रवणें श्रोतयां होय हरिख ॥ ऐसी गोडी आणीन ॥२८॥
घोकिलें नाहीं संस्कृत ॥ नाहीं पाहिले ग्रंथ बहुत ॥ येथें दत्तकृपा समर्थ ॥ तेणें लेखणी धरविली ॥२९॥
मी तो चर्माची नौबत ॥ हातें वाजवी श्री दत्त ॥ ज्ञान कंदुकावरी पडत ॥ ध्वनि उठत कवित्वाची ॥१३०॥
माझें अंत:करण ॥ सदा चित्तवृत्ति समाधान ॥ संसारदु:खाचें भान ॥ कदा कल्पांतीं स्पर्शेना ॥३२॥
अनंत जन्मांचे अन्याय ॥ क्षमा केले गुरुरायें ॥ पुरतें देऊनियां अभय ॥ निर्भय केलें स्वानंदीं ॥१३॥
ऐसी सत्ता श्रीगुरुची ॥ चिंता नाहीं जन्ममरणांची ॥ रंगली वृत्ति शहामुनीची ॥ फणी तैसा डुल्लत ॥३४॥
इति श्रीसिध्दांतबोधग्रंथे अध्यात्मनिरुपणतत्वसारनिर्णये चतुर्थोध्याय: ॥४॥ अध्याय ॥४॥ ओव्या ॥१३४॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥

N/A

References : N/A
Last Updated : September 23, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP