मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|सिध्दान्तबोध|
अध्याय २५ वा

श्रीसिध्दान्तबोध - अध्याय २५ वा

‘श्रीसिध्दान्तबोध’ हा संतकवि श्रीशहामुनि यांचा ग्रंथ म्हणजे मराठी साहित्याच्या खाणींतील एक तेजस्वी हिरा आहे.


श्रीगणाधिपतये नम: ॥ श्रीगुरुभ्योनम: ॥
नमो संसारतमहरणा ॥ नमो भवाब्धिमोचना ॥ नमो अविद्याबंध छेदना ॥ कृपाघना तुज नमो ॥१॥
नमो मोक्षदानी कल्पना ॥ नमो क्षराक्षरातीत अनक्षरु ॥ नमो प्रणवा परमेश्वरु ॥ मायावरु तुज नमो ॥२॥
नमो निजब्रह्मींच्या कंदा ॥ नमो सुखरुपस्वानंदा ॥ नमो उद्बोधबोधा ॥ आनंदनंदा तुज नमो ॥३॥
नमो निष्कामकामा ॥ नमो पुराणपुरुषोत्तमा ॥ नमो परमात्मया आरामा ॥ सर्वोत्तमा तुज नमो ॥४॥
नमो अनंत अमूपा ॥ नमो कोटिसूर्यस्वरुपा ॥ नमो अनंतब्रह्मांडभूपा ॥ ज्ञानियां सोपा तुज नमो ॥५॥
नमो परमेश्वरा अपारा ॥ नमो जगदीशा निर्विकारा ॥ नमो दयेच्या सागरा ॥ जीवउध्दारा तुज नमो ॥६॥
इतर कवींचा अनुभव ॥ नमनीं स्तवनीं अनेक देव ॥ माझा एकचि भाव ॥ मुख्य देव नमियेला ॥७॥
कोणाचा देव मागतो लाखोली ॥ कोणाचा मागतो बेलाची मोटळी ॥ कोणाचा मागतो दिवटी बुधली ॥ कोणाचा मागतो तुळसीपत्रें ॥८॥
कोणाचा मागे गोंधळ घाली ॥ कोणाचा मागतो रोडगे पोळी ॥ कोणाचा मागतो हरळीची डाहाळी ॥ दूर्वांच्या पेंढया पाहिजे ॥९॥
कोणाचा मागतो लावा गळतीला ॥ कोणाचा मागे लग्न तुळसीला ॥ कोणाचा मागे पिंपळास पार घाला ॥ मुंज करा नरसिंहाची ॥१०॥
कोणाचा मागतो मद्यमांस ॥ कोणाचा मागतो कुक्कुट अजास ॥ कोणाचा मागे कडेलोट कर्मास ॥ कोणाचा मागतो तळीभरा ॥११॥
कोणाचा मागतो यात्रेसी ॥ कोणाचा मागतो करा व्रतांसी ॥ कोणाचा मागतो नित्य पूजेसी ॥ कोणाचा मागतो होम करा ॥१२॥
माझा देव कांहीं देईना घेईना ॥ मीही कांही मागेना वाहींना ॥ दोहींकडे सारखें जाणा ॥ म्हणोनि घडला संबंध ॥१३॥
फुका देव कांहीं मागेना ॥ मीही फुकाच्या देईंना घेईंना ॥ हा फुकट व्यवहार जाणा ॥ आमचा आणि देवाचा ॥१४॥
मी चुकलों देव रुसेना ॥ देव देईना मी रागें भरेना ॥ ह्या फुकाच्या आमुच्या खुणा ॥ ऐका तुम्ही श्रोते हो ॥१५॥
सांडूनि कामनिक भाव ॥ कोण फुकाचा धरितो देव ॥ आमुचें कपाळीं पडिला पाहा हो ॥ याचा संबंध तुटेना ॥१६॥
आतां असो आमुची वार्ता ॥ पुढें चित्त द्यावें श्रोतां ॥ मागील अध्यायीं कथा ॥ देवें निरुपिली भट्टासी ॥१७॥
वेद शास्त्रें पुराणें ॥ यांचा निर्णय केला देवानें ॥ सांगीतली साही दर्शनें ॥ पांची आश्रम दाविले ॥१८॥
ते परिसोनि द्विजवर्या ॥ वंदोनि देवाचे पायां ॥ मग म्हणे जी स्वामिया ॥ परिसा माझी विनंती ॥१९॥
त्रिकांड वेदांचा सिध्दांत ॥ मातें दावी कृपावंत ॥ साही शास्त्रांचें मत ॥ भिन्न भिन्न बोलिला ॥२०॥
अठरा पुराणांतील गूढ ॥ करुनि दाविला तुम्हीं उघड ॥ षट्‍दर्शनांचा निवाड ॥ फाडोवाडी दाविला ॥२१॥
पांचांही आश्रमांची राहाटी ॥ भिन्न भिन्न वर्तावयाचीं कसवटी ॥ त्याचा सिध्दांत परिपाटी ॥ तेही गोष्टी बोलिलां ॥२२॥
जे वेदांप्रमाणें वर्तले ॥ ते चैतन्यमायेच्या पदा गेले ॥ परी परब्रह्मवस्तु चुकले ॥ ऐसा जाहला सिध्दांत ॥२३॥
ज्याणें शास्त्रीं धरिला निश्चय ॥ तो अष्टभैरवपदासि जाय ॥ परंतु परब्रह्मींची सोय ॥ त्यासि न लाभे सर्वथा ॥२४॥
जों पुराणाप्रमाणें राहाटे जाण ॥ तो जाय महाविष्णुपदालागून ॥ त्यासि परब्रह्मींचें ठेवण ॥ अंतरलें कीं स्वभावें ॥२५॥
श्रीपाददर्शनाची ॥ सांगीतली प्राप्ति विश्वरुपाची ॥ कानफाटे शेवडयांची ॥ अष्टभैरवी नेमिले ॥२६॥
सोपी मुंडी फकीर ॥ यांसि महाविष्णुपद चार ॥ उटी आणि जंगम समग्र ॥ शिवलोकीं जातील ॥२७॥
यापरी साहीदर्शनालागून ॥ नेमिलीं देवतांचीं स्थान ॥ परी परब्रह्म निर्वाण ॥ तयांसि न घडे जाणपां ॥२८॥
ब्रह्मचार्‍यास प्राप्ती ॥ सांगितली सत्यलोकीं निश्चितीं ॥ परंतु परब्रह्मींची वस्ती ॥ नाही घडली तयांसी ॥२९॥
गृहस्थाश्रमीयांसी ॥ प्राप्ति वैकुंठपदासी ॥ परी परब्रह्मसुखासी ॥ नाहीं गेले निर्धारें ॥३०॥
वानप्रस्थांचें आचरण ॥ यांस प्राप्त कैलासभुवन ॥ परी परमेश्वर सान्निधान ॥ नाहीं लाभलें तयांसी ॥३१॥
संन्यासी जो प्रांजळ ॥ तयांसि क्षीराब्धिमंडळ ॥ परी अच्युतपद अढळ ॥ नाहीं लाभलें तयासी ॥३२॥
मुख्य जो परमहंस ॥ गेला अष्टभैरवपदास ॥ परी परब्रह्म वस्तूस ॥ तोही न पवे कळलें हें ॥३३॥
आतां वेद शास्त्रें पुराणें ॥ यांचा आश्रम साही दर्शनें ॥ इतुकेठायीं मोक्ष न मिळे जाणें ॥ ऐसें तुवां निवडिलें ॥३४॥
ऐशा जाहल्या गोष्टी ॥ तेव्हां बुडाली अवधी सृष्टी ॥ मोक्षाचा प्रांत शेवटीं ॥ कोठें न दिसे जाणपां ॥३५॥
आतां कोणता उपाय करणं ॥ मोक्ष घडे जीवालागूनी ॥ बरवें पुसिलें ब्राह्मणा ॥३७॥
कोणत्या युगीं काय आचरावें ॥ ऐसें शोधूनि पहावें ॥ मग तैशासारिखें वर्तावें ॥ युगधर्म या रीतीं ॥३८॥
कोणत्या युगीं काय धर्म ॥ युगपरत्वें ओळखोनि कर्म ॥ आचरा जीवानें नेम ॥ आपुलाले वर्णाश्रमें ॥३९॥
कृतयुगाचे ठायीं ॥ लक्षभरी आयुष्य पाहीं ॥ आयुष्यासारिखे तेही ॥ आचरत होते जीव कर्मे ॥४०॥
त्रेता युगीं दहा सहस्त्र ॥ आयुष्याची असे सदर ॥ तयासारिखे मनुष्य निर्धार ॥ करीत होते कर्मासी ॥४१॥
द्वापारीं सहस्त्र एक ॥ आयुष्याची मर्यादा देख ॥ म्हणोनियां यागादिक ॥ कर्म होतें त्यासमयीं ॥४२॥
कलियुगीं एक शत ॥ असें आयुष्याचें गणित ॥ आयुष्याप्रमाणें पध्दत ॥ आचरतां गती जीवांसी ॥४३॥
कृतयुगीं चौं शेरांचा आहार ॥ त्रेतायुगीं तीन शेर ॥ द्वापारी नेमिले दोनशेर ॥ कलियुगामाजी शेर एक ॥४४॥
ज्या युगीं जितकें आयुष्य ॥ तैसे आचरावें कर्मास ॥ वरल्या युगींचा खालल्या युगीं अभ्यास ॥ करितां श्रमी जीव होती ॥४५॥
ज्या युगीं जे धर्म स्थापिले ॥ तोचि जीवानें पाहिजे राहाटले ॥ म्हणोनि युगधर्म बोलिले ॥ वर्तावया जीवातें ॥४६॥
बत्तीस लक्ष कृतयुग ॥ करावी आत्मउपासना यथासांग ॥ आचरतां भक्तीचा मार्ग ॥ तोचि अधर्म त्या समयीं ॥४७॥
कृतयुगीं धर्म ॥ जीवाची उपासना मी ब्रह्म ॥ जप ध्यान क्रिया कर्म ॥ वर्ज होतें त्यासमयीं ॥४८॥
सोहं धारण जीवासी ॥ मीच आत्मा निश्चयेसीं ॥ भक्ती ज्ञान वैराग्यासी ॥ करितां दूषण त्यायुगीं ॥४९॥
याग अनुष्ठान ॥ तीर्थव्रतादि उपोषण ॥ कथा कीर्तन नामस्मरण ॥ करितां दूषण त्यायुगीं ॥५०॥
मीचि आत्मा स्वयें सम ॥ ऐसा आचरला जो नेम ॥ तयासीच चैतन्य धाम ॥ प्राप्त होय फलभोग ॥५१॥
जो आचरे भक्तीचा नेम ॥ तयासि खालले युगीं जन्म ॥ चुकला आत्म उपासनेचें वर्म ॥ म्हणोनि श्रम बहु त्यासी ॥५२॥
कृतयुगीं जो धर्म आचरला ॥ तो चैतन्यपदा गेला ॥ अधर्मे त्रेतायुगासि आला ॥ भोगावया संसार ॥५३॥
कृतयुगीं आत्मउपासना धर्म ॥ भक्ति करणें हा अधर्म ॥ हा युगपध्दती नेम ॥ नेमिला असे कर्त्यानें ॥५४॥
धर्मे वर्तता चैतन्यप्राप्ती ॥ अधर्मे खालल्या युगीं जन्मती ॥ हे कृतयुगाची युग स्थिती ॥ तूतें निरुपिली द्विजोत्तमा ॥५५॥
त्रेतायुगीं भक्ति हा अधर्म ॥ योग याग क्रिया उत्तम ॥ जप तपादि क्रिया कर्म ॥ हा अधर्म त्यायुगीं ॥५६॥
विष्णु उपासना शिवउपासना ॥ आसन मुद्रा ध्यानधारणा ॥ अष्टांगयोगसाधना ॥ होता नेम त्यायुगीं ॥५७॥
भेदोनी जाती षटचक्रांसी ॥ खडतर आचरती तपश्चर्येसी ॥ प्राणायामीं अनुहतासी ॥ वाजविती त्यायुगीं ॥५८॥
करिती साधनाचे कष्ट ॥ बहुत भक्ति नेम अचाट ॥ विशाळ धैर्य बळकट ॥ होतें उत्कृष्ट त्या युगीं ॥५९॥
ऐसी जे भक्ति करिती ॥ ते कैलासवैकुंठास जाती ॥ याग क्रिया जे आचरती ॥ ते जन्मती द्वापारीं ॥६०॥
धर्मे वैकुंठाची प्राप्ती ॥ अधर्मे खालल्या युगीं पडती ॥ ऐसी त्रेतायुगींची रीती ॥ तूतें दाविली ब्राह्मणा ॥६१॥
धर्मे स्वर्गलोका जाती ॥ अधर्मे खालल्या ॥ युगीं पचती ॥ अनेक देहातें धरिती ॥ कष्ट पावती अपार ॥६२॥
द्वापारीं याग हा धर्म ॥ तीर्थव्रतें अधर्म ॥ क्षेत्रयात्रेचें कर्म ॥ हा अधर्म द्वापारीं ॥६३॥
कलियुगीं तीर्थे व्रतें दान धर्म ॥ हिंसा करणें तो अधर्म ॥ मांसआहार निंद्यकर्म ॥ राहाटतां दुर्गम कलीतें ॥६४॥
धर्मे अंतराल प्राप्ती ॥ अधर्मे नरकासि जाती ॥ अघोरकुंडीं रौरवीं पचती ॥ न मिळे विश्रांती होतां कल्प ॥६५॥
उत्तम धर्मानें पावे अंतराळ ॥ मध्यम धर्मानें अष्टकोनी मंडळ ॥ कनिष्ट कर्मे नरक प्रबळ ॥ घडे तुंबळ जीवासी ॥६६॥
कृतयुगीं लक्ष वर्षे आयुष्य ॥ त्रेतायुगीं दाहा सहस्त्र वर्षे आयुष्य ॥ द्वापारीं सहस्त्र वर्षे आयुष्य ॥ कलियुगीं एक शत ॥६७॥
बत्तीस लक्ष कृतयुग ॥ सोळालक्ष त्रेतायुग ॥ आठलक्ष द्वापार युग ॥ कलियुग चार लक्ष ॥६८॥
कृतयुगीं अस्थिगत प्राण ॥ त्रेतायुगीं मांस नासल्या पावे मरण ॥ द्वापारीं रुधिरप्रवाहीं जाय निघोन ॥ कलियुगी अन्न न मिळतां ॥६९॥
कृतयुगीं भक्ति अधर्म ॥ त्रेतायुगीं याग अधर्म ॥ द्वापारा तीर्थव्रतें दान अधर्म ॥ कलियुगीं अधर्म हिंसा ते ॥७०॥
कृतयुगी आत्मउपासना धर्म ॥ त्रेतायुगीं भक्ति हा धर्म ॥ द्वापारीं याग हा धर्म ॥ कलियुगीं धर्म तीर्थ दान ॥७१॥
कृतयुगधर्मी चैतन्यप्राप्ती ॥ त्रेतायुगधर्मी वैकुंठा जाती ॥ द्वापारीं स्वर्गीची वस्ती ॥ कलियुगाचे धर्मी अंतराळ ॥७२॥
ऐसा चौयुगांचे धर्मांत ॥ परमेश्वर होईना प्राप्त ॥ जे परमेश्वरास ओळखित ॥ तया घडे निजमोक्ष ॥७३॥
मोक्ष परमेश्वरावांचून ॥ न घडे करितां यज्ञ दान ॥ यालागीं परमेश्वरासि ओळखून ॥ भजतां मोक्ष तैं जोडी ॥७४॥
जो त्रिमूर्ती अवतार ॥ परमेश्वर निर्विकार ॥ त्रयावस्थेहून पर ॥ तयासी भजतां मोक्ष जोडे ॥७५॥
या सृष्टीमाझारी ॥ भजतां देव कोटीवरी ॥ परंतु जन्ममरण निवारी ॥ ऐसा कोणी असेना ॥७६॥
तीर्थे व्रतें तपें दान ॥ करितां अनेक साधन ॥ परी न फिटे अविद्याबंधन ॥ परमेश्वरावांचूनी ॥७७॥
तोचि एक परमेश्वर ॥ निरवयव निराकार ॥ परी कृपा वसे साकार ॥ सावयव होती ॥७८॥
छेदोनि जीवाचे अविद्याबंधन ॥ देत मोक्षपद निर्वाण ॥ ऐसा त्रिमूर्ती अवतार पूर्ण ॥ तयासी भजतां होय गती ॥७९॥
ऐसा बोलला भवहर्ता ॥ विप्रें चरणीं ठेविला माथा ॥ म्हणे अहो जी कृपावंता ॥ परिसा माझी विनंती ॥८०॥
तुम्हीं बोलला परमेश्वरावांचून ॥ मोक्ष न जोडे निर्वाण ॥ तरी त्याचा अवतार कोण ॥ मातें सांगा उगवूनी ॥८१॥
मागें तुम्हीं विवेक कथिला ॥ परमेश्वर निर्विकार सांगीतला ॥ तो सगुण कैसा झाला ॥ मूर्ती धारिया होऊनी ॥८२॥
त्या सगुणमूर्तीचें काय नांव ॥ कोण गांव कोण ठाव ॥ याचा सांगा जी अनुभव ॥ उघड करुनि दातारा ॥८३॥
ऐका दहा अवतार उघडे ॥ त्यांतें भजतां मोक्ष जोडे ॥ तुमचा परमेश्वर कोणीकडे ॥ या विरहित सांगा तो ॥८४॥
किंवा हेचि दहा अवतार ॥ घेता जाहला परमेश्वर ॥ या प्रश्नाचें उत्तर ॥ प्रांजळ मातें निरुपा ॥८५॥
पुराणीं निरुपिलें ॥ जे विष्णूनें अवतार घेतले ॥ परी तुमचे मुखें निवडले ॥ पाहिजेत कीं आमुतें ॥८६॥
जगदीश म्हणे द्विजाला ॥ त्वां अपूर्व प्रश्न केला ॥ या अवतारांची चरित्रकळा ॥ नाहीं कळली पुराणा ॥८७॥
कोणत्या देवाचा कोण अवतार ॥ याचा अगम्य तर्क साचार ॥ मी एक जाणे परमेश्वर ॥ ब्रह्मादिकां कळेना ॥८८॥
जरी ब्रह्मयास कृष्णअवतार कळता ॥ तरी कां वत्सें चोरुनि नेता ॥ इंद्र जळवृष्टि न वर्षतां ॥ भय धरितां देवाचें ॥८९॥
यालागीं अवताराची खूण ॥ न कळे इतरलोकांलागून ॥ हें जाणता मी एक पूर्ण ॥ इतर ऋषि नेणती ॥९०॥
अवताराची पध्दती ॥ तुज सांगों द्विजमूर्ती ॥ परिसतां मनाची भ्रांती ॥ निरसून जाईल तत्काळ ॥९१॥
एकें समयीं सनत्कुमार ॥ करीत होते तपश्चर्या खडतर ॥ शरीर शुष्क होऊनी जर्जर ॥ प्राणतंतु उरलासे ॥९२॥
त्याच्या पाहून कष्टांला ॥ लक्ष्मीस गहिंवर आला ॥ नेत्रांतुनि अश्रुबिंदू पडिला ॥ त्याचा जाहला शंखासुर ॥९३॥
तो म्हणे वो आई ॥ मातें खेळावया कांहीं देईं ॥ येरी म्हणे सत्यलोका जाईं ॥ करीं क्रीडा तें स्थळीं ॥९४॥
लक्ष्मीची आज्ञा होतां ॥ सत्यलोका पातला त्वरिता ॥ ध्यानीं बैसला विधाता ॥ शंख गेला त्यापुढें ॥९५॥
ब्रह्म्यानें न करितां सन्मान ॥ शंखास क्रोध जाह्ला दारुण ॥ म्हणे गर्विष्ठ हा ब्राह्मण ॥ नेणें महिमा श्रेष्ठाची ॥९६॥
आतां यासि ठकवून ॥ वेद न्यावे चोरुन ॥ ऐसा विचार मनीं करुन ॥ हरिता जाहला वेदांतें ॥९७॥
घेऊनि मूर्तिमंत वेंदांसी ॥ शंखासुर गेला लक्ष्मीपासीं ॥ म्हणे म्यां ठकविलें ब्रह्मयासी ॥ वेद त्याचे आणिले ॥९८॥
लक्ष्मी म्हणे अरे नष्टा ॥ अविचार केला त्वां पापिष्ठा ॥ कळतां महाविष्णु श्रेष्ठा ॥ अनर्थ करील अविलंबें ॥९९॥
आतां जाय येथोनि लवकरी ॥ आच्छादूनि राहें समुद्रोदरीं ॥ प्रगट होतां निर्जरी ॥ शिक्षा करितील तुजलागीं ॥१००॥
ऐकोनि लक्ष्मीची वाणी ॥ शंखासुर पळे वेद घेऊनी ॥ विशाल सिंधूचें जीवनीं ॥ प्रवेशूनी राहिला ॥१०१॥
येरीकडे हो विधाता ॥ ध्यान विसर्जून सावध होतां ॥ वेदउच्चार करुं जातां ॥ प्रणवस्फूर्ती स्फुरेना ॥२॥
पाहतां हृदयाचे परवरी ॥ वेदधन नेलें तस्करीं ॥ भ्रतरावीण विधवा नारी ॥ तेपरी जाहली विधातया ॥३॥
पदच्युत होय नृपती ॥ कीं वाळित पडे द्विजमूर्ती ॥ तैसी जाहली ब्रह्मयाची गती ॥ वेदांविणें ते समयीं ॥४॥
वेदहीन ब्रह्मा जाहला ॥ महाविष्णूसी शरण गेला ॥ जोडूनि पाणी पायां लागला ॥ विज्ञापना निवेदी ॥५॥
विरिंचि म्हणे लक्ष्मीकांता ॥ हृदयीं तुझें ध्यान करितां ॥ विसरोनि देहाची अवस्था ॥ समाधिस्थ होती मनोवृत्ती ॥६॥
कोणें असुरें त्या समयीं ॥ वेदहरण केलें पाहीं ॥ यास्तव होऊनि विदेही ॥ शरण आलों स्वामिया ॥७॥
परिसोनि ब्रह्मयाची वाणी ॥ महाविष्णु पाहे अंत:करणीं ॥ वेद शंखासुर घेऊनी ॥ समुद्रामाजी दडाला ॥८॥
मग नारदासि आज्ञा करी ॥ त्वां जावें वैकुंठपुरीं ॥ विष्णूसी घेऊनी झडकरी ॥ क्षीराब्धीस आणिजे ॥९॥
आज्ञा करितां लक्ष्मीवर ॥ गमन करी ब्रह्मकुमर ॥ वैकुंठपुरीं जाऊनि सत्वर ॥ कमळानाहो वंदिला ॥११०॥
नारद म्हणे वैकुंठपाळा ॥ संकटे पडिलें विरिंचीला ॥ त्या परिहारीं दयाळा ॥ महाविष्णु पाचारी ॥११॥
वर्णी परिसोनियां निरोप ॥ क्षीराब्धी गेला वैकुंठाधिप ॥ शेषशायी समीप ॥ जाऊनी वंदी चरणासी ॥१२॥
महाविष्णू म्हणे विष्णूलागून ॥ वेदे नेले शंखासुरें चोरुन ॥ त्याचें करुनियां हनन ॥ वेद दीजे विधातया ॥१३॥
महाविष्णूची आज्ञा होतां ॥ विष्णूस लागली परम चिंता ॥ त्याचा परिवार तीनकोटी होता ॥ त्यांत एका प्रेरिलें ॥१४॥
वज्रभान विष्णुपासीं ॥ होतां देवसेवेसी ॥ तो म्हणे या कार्यासी ॥ करीन मी प्रतिज्ञा ॥१५॥
मग विष्णूची आज्ञा घेऊनी ॥ वज्रनाभ गेला समुद्रजीवनीं ॥ शंखासुराची शंखावती पत्नी ॥ तिच्या हृदयीं प्रवेशला ॥१६॥
होऊनि शंखावतीचा बाळ ॥ मत्स्यरुपें जन्मला प्रबळ ॥ शंखावतीनें प्रतिपाळ ॥ प्रौढ केला मोहानें ॥१७॥
खेळत असतां एके दिवशीं ॥ मत्स्यें पुसिलें शंखावतीसी ॥ पित्याचें दर्शन आम्हांसी ॥ होत नाही जननीयें ॥१८॥
निमाला किंवा कोठें गेला ॥ हें श्रुत नाहीं मुळीं मजला ॥ येरी म्हणे मत्स्याला ॥ आहे जिवंत तव पिता ॥१९॥
तुझा पिता शंखासुर मूर्ख ॥ ब्रह्मयाचे वेद हरिले देख ॥ तयाचें भयास्तव निष्टंक ॥ कपाटविवरीं दडाला ॥१२०॥
मग म्हणे वो जननी ॥ मातें दावी जनक नयनीं ॥ येरी तर्जनीतें धरुनी ॥ विवरामाजीं तो नेला ॥२१॥
धेनुगोठणीं पंचानन ॥ कुंजरमेळीं सिंहाचें प्रवेशन ॥ तैसा शंखासुराचें संनिधान ॥ मत्स्य पावला ते समयी ॥२२॥
शंखावतीस दिसे बाळ ॥ शंखासुरासि भासे काळ ॥ मग उठोनि असुर विशाळ ॥ मुख पसरोनि धांविन्नला ॥२३॥
मत्स्यें धरुनि सूक्ष्मरुप ॥ मुखामाजी घातली झेंप ॥ हृदय विदारुनि सकोप ॥ वेद घेवोनी निघाला ॥२४॥
त्यागूनि मत्स्यदेहाची बुंथी ॥ धरिली देवदेहाची आकृती ॥ वेद घेऊनि विष्णूप्रती ॥ वज्रभान तो गेला ॥२५॥
विष्णूनीं पाचारुन चतुरानना ॥ वेद केले त्याचे स्वाधीन ॥ मग कर्मराहाटी लागून ॥ करिता जाहला विधाता ॥२६॥
यापरी मत्स्य अवतार ॥ वज्रभानाचा साचार ॥ विष्णूचा म्हणती ते अविचार ॥ नेणोनि वर्म बोलती ॥२७॥
मत्स्य अवतार जाहला ॥ तेणें वेदांचा निर्गम केला ॥ परि मोक्ष द्यावया जीवाला ॥ अधिकार त्यास असेना ॥२८॥
ब्राह्मण म्हणे सर्वेश्वरा ॥ सांगीतलें मत्स्यावतारा ॥ परी कच्छ अवतार कोणाचा दातारा ॥ तो मज सांगा उगवोनी ॥२९॥
गोसावी म्हणे द्विजालागून ॥ ऐक सांगतों उघडून ॥ एके दिवशी सहस्त्रनयन ॥ सिंहासनीं बैसला ॥१३०॥
सबाह्य निर्जरांच्या पंक्ती ॥ पुढें अप्सरा नृत्य करिती ॥ गायन कळा अद्भुत होती ॥ श्रवणीं निमग्न सर्वही ॥३१॥
तेच समयीं बृहस्पती ॥ आला शैलारिसभेप्रती ॥ तयासि न सन्मानी शचिपती ॥ अवमान पावला सुरगुरु ॥३२॥
मधवा लुब्धला नृत्यगायनाला ॥ अंगिरा पातला त्याच वेळा ॥ अमरसभेंत उभा ठेला ॥ नाहीं देखिला सुरेशें ॥३३॥
इंद्रें न केला सन्मान ॥ ऋषि क्षोभला दारुण ॥ देता जाहला शापवचन ॥ अतिक्रोधें तें ऐका ॥३४॥
म्हणे अरे नष्टा अधमा ॥ भुललासी संपत्तीच्या भ्रमा ॥ आम्हीं पातलों तुझिया आश्रमा ॥ नेणसी महिमा श्रेष्ठांची ॥३५॥
ज्या संपदें जाहलासि उन्मत्त ॥ ती संपदा पडो उदधींत ॥ रंक होऊनि भाग्यरहित ॥ राहें अदृष्ट येथून ॥३६॥
आधींचा गुरुचा अवमान ॥ त्यावरी अंगिराचा क्षोभ दारुण ॥ समग्र संपत्ति उलथोन ॥ जळापोटीं लोटली ॥३७॥
अमरेंद्र होऊनियां भणंग ॥ लागला दरिद्रक्षयरोग ॥ त्यासी औषध ऐश्वर्यसंयोग ॥ इच्छीत असे पुन: पुन: ॥३८॥
मग चिंताज्वरें व्यापुनी ॥ गेला महाविष्णूच्या भुवनीं ॥ विनयें बोले जोडूनि पाणी ॥ मस्तक ठेवी पादांबुजीं ॥३९॥
म्हणे अहो जी शेषशयना ॥ शरण तूतें श्रीनारायणा ॥ माझी विनंति करुणाघना ॥ परिसावी निवाडें ॥१४०॥
स्वल्प अपराधासाठीं ॥ ऋषिशापाची क्रोध आगटी ॥ पडली संपदा सिंधुपोटीं ॥ रंक झालों स्वामिया ॥४१॥
ब्रह्मा विष्णु नीलकंठ ॥ त्यांसी नुगवे हे संकट ॥ यालागीं तुम्हांनिकट ॥ येणें घडलें दयाळा ॥४२॥
सिंधुगर्भीची संपत्ती ॥ मातें प्राप्त होय कवणे रीतीं ॥ याची सांगावया युक्ती ॥ कृपामूर्ति तूं एक ॥४३॥
परिसोनि अमरेंद्रवचन ॥ आज्ञा करी लक्ष्मीरमण ॥ तुम्ही दैत्य एकत्र होऊन ॥ सिंधुमंथन करावें ॥४४॥
आपुलिया कार्यार्थी ॥ सांडिजे अहंपणाची बुंथी ॥ लागिजे नीचाचिये भक्ती ॥ तोचि शाहाणा बोलिजे ॥४५॥
सोडूनियां तिचा अभिमान ॥ नाठवी आपुलें श्रेष्ठपण ॥ होइंजे खळासि अति लीन ॥ कार्य साधिजें हरयुक्ती ॥४६॥
प्रसंगासारिखा राहाटों नेणे ॥ मिथ्या वागवी अहंपण ॥ तोचि एक मूर्ख जाण ॥ स्वहित नेणे आपुलें ॥४७॥
नाहीं विद्या नाहीं बळ ॥ नाहीं शास्त्रज्ञान कुशळ ॥ नसतां ऐश्वर्य माझें प्रबळ ॥ तोचि मूर्ख जाणावा ॥४८॥
नाहीं चातुर्य शाहाणपण ॥ भलतेंचि बोले अवलक्षण ॥ चौघांत पावे अपमान ॥ तोचि मूर्ख जाणावा ॥४९॥
घरीं वनितेस न मिळे गळसरी ॥ ऋण काढोनि वेश्येस नग करी ॥ पत्नी असोनी परस्त्री भोगी जरी ॥ तोचि मूर्ख जाणावा ॥१५०॥
नाहीं स्वयें जातीसी नम्रता ॥ विनयें न भजे साधुसंतां ॥ चढे गर्वाचिया पर्वता ॥ तो अतिमूर्ख जाणावा ॥५१॥
असोनि संपदा पुष्कळ ॥ राहाटे जैसा कंगाल ॥ सौख्य असोनि करी हळहळ ॥ तोचि मूर्ख जाणावा ॥५२॥
पदरचें द्रव्य वेंच करी ॥ दु:ख भरोनि तिडका मारी ॥ जन थुंके तोंडावरी ॥ तोचि मूर्ख जाणावा ॥५३॥
जवळी असोनियां धन ॥ लोकांचें न वारी ऋण ॥ जाय अधोगति मरुन ॥ तोचि मूर्ख जाणावा ॥५४॥
यश येतां परम हरिख ॥ अपयश पावल्या करी दु:ख ॥ धन हरपल्या मांडी शोक ॥ तोचि मूर्ख जाणावा ॥५५॥
असो आतां मूर्खलक्षण ॥ त्वां असावें सावधान ॥ असुरांसी सख्य करुन ॥ कार्य साधीं आपुलें ॥५६॥
मंदराचळाची रवि करुन ॥ बिरडी करा वासुकीलागून ॥ उभयतां भागी होऊन ॥ सुरीं असुरीं घुसळावें ॥५७॥
तुम्हीं धरावें पुच्छासी ॥ मुखीं करावें असुरांसी ॥ प्राप्त व्हाल संपदेशी ॥ विशेष लावाल अमृत ॥५८॥
मी होईन तुम्हां साह्य ॥ कार्य साधीन निश्चय ॥ आतां होऊनियां निर्भय ॥ करीं सख्य बळीसी ॥५९॥
ऐसें आज्ञापितां शेषशायी ॥ इंद्र धांविन्नला लवलाहीं ॥ प्रवेशोनि बळीच्या गेहीं ॥ सुरेश असुरां भेटला ॥१६०॥
अमरेंद्र म्हणे बळिराया ॥ सांडोनि कल्पना आलों तुझ्या ठाया ॥ त्वां होऊनियां निर्भया ॥ करीं सख्य आम्हांसी ॥६१॥
म्यां त्यजिली दुराग्रहाची पीठिका ॥ त्वां मोडावी अहंकृतीची ग्रंथिका ॥ उभयतां मिळोनियां ऐक्य ॥ साधूं निश्चयें कार्यासी ॥६२॥
तुम्ही आम्ही एकत्र होऊन ॥ करुं समुद्राचें मंथन ॥ अमृत निघेल आंतून ॥ उभयतां भागी स्वीकारुं ॥६३॥
बळी म्हणे बहुत बरवें ॥ यथार्थ भाक मातें द्यावें ॥ अंतर पडतां स्वभावें ॥ कलह माजेल सहजची ॥६४॥
यापरी एक होउनी ॥ उभयतां पावले समुद्रमंथनीं ॥ गिरि मंदराचळ आणोनी ॥ ठेविते जहाले जळांत ॥६५॥
सिंधूवरी सोडितां मंदराचळ ॥ भेदीत चालिला पाताळ ॥ इंद्र होऊनियां व्याकुळ ॥ धांवा करी विष्णूचा ॥६६॥
क्षीरसिंधूचा रहिवासी ॥ आजि पावे या समयासी ॥ त्वां बोलिल्या वचनासी ॥ सिध्दी नेलें पाहिजे ॥६७॥
इंद्र धांवा मनीं करितां ॥ त्वरें पावला लक्ष्मीभर्ता ॥ विशाळ कमठदेह धरिता ॥ विष्णु जाहला त्या समयीं ॥६८॥
धरुनि विशाळ देह प्रबळ ॥ पृष्ठी वरी घेतला मंदराचळ ॥ देव दैत्यांचे तुंबळ ॥ गिरिभोंवतें वेष्टिले ॥६९॥
घालूनि वासुकीचे वेढे ॥ दैत्य मीनले मुखाकडे ॥ पुच्छीं अमरांचे जुंबाडे ॥ उभयभागीं आसुडिती ॥१७०॥
मंदराचळासि फिरवूं जातां ॥ झोंकोनि पडों पाहे खालता ॥ त्यासी उपाय लक्ष्मीभर्ता ॥ करिता जाहला तें ऐका ॥७१॥
वैकुंठींच्या विष्णूसी ॥ महाविष्णु आज्ञापि त्यासी ॥ तो धांवोनियां गिरीसी ॥ आवरिता जाहला मस्तकीं ॥७२॥
महाविष्णु कूर्म होऊन ॥ तळीं धरिलां गिरि झेलून ॥ वैकुंठींच्या विष्णूनें जाण ॥ मस्तकावरी थोकिला ॥७३॥
तळीं महाविष्णूनें धरिला ॥ वरी वैकुंठींच्यानें आवरिला ॥ तेव्हां मंदराचळ
स्थिर जाहला ॥ घुसळावया देवांसी ॥७४॥
सुर असुर ठोकोनियां भुजा ॥ वोढिते जाहले अहिराजा ॥ मंदराचळ धुमों लागला वोजा ॥ गरगरां पाण्यांत ॥७५॥
आसुडितां वासुकीचें अंग ॥ तडतडों लागला भुजंग ॥ वमिता जाहला विषाचे स्फुलिंग ॥ ज्वाळा जैश्या प्रळयींच्या ॥७६॥
अहिमुखीं विषकल्लोळ ॥ प्रगट जाहले तत्काळ ॥ देवदैत्यांचा कोलाहल ॥ होता जाहला त्यासमयीं ॥७७॥
तप्त जाहलें सिंधूचें पाणी ॥ ज्वाला उसळों लागल्या गगनीं ॥ सूरा असुरांच्या श्रेणी ॥ जळों लागल्या भडभडां ॥७८॥
हे महाविष्णूनें जाणोन ॥ पाचारिला पंचवदन ॥ तेणें विषातें प्राशून ॥ विघ्न हरिलें देवांचें ॥७९॥
निर्भय होऊनि सुरसमुदाव ॥ संगें घेऊनियां दानव ॥ मग भरोनियां हांव ॥ पुन्हां घुसळूं लागले ॥८०॥
अकस्मात अमृत तेथें ॥ तरंगोनि आलें सिंधुवरुतें ॥ दानवीं घेऊनियां त्यांतें ॥ निघते जाहले त्वरेनें ॥८१॥
तेव्हां महाविष्णु धांवोन ॥ मोहिनीरुपें असुरां ठकवून ॥ सुधा सुरांपांशीं देऊन ॥ स्वर्गलोकीं धाडिले ॥८२॥
हें परिसोन ब्राह्मण पुसे ॥ म्हणे स्वामी हें कैसें ॥ माझ्या हृदयीं संशय असे ॥ तो फेडा जी दातारा ॥८३॥
जैं समुद्रमंथन जाहलें ॥ चौदा रत्नें निघाली ते वेळे ॥ ऐसें आम्हीं ऐकिलें ॥ पुराणीं प्रसिध्द स्वामिया ॥८४॥
तुम्ही सांगीतलें अमृत ॥ इतर कां राखिला भाव गुप्त ॥ हा माझे मनींचा हेत ॥ पुसावया स्वामीस ॥८५॥
जगदीश म्हण बहुत बरवें ॥ येथें प्रचीतीनें घ्यावें ॥ अनुभवें उघड पाहावें ॥ व्यर्थ संदेह धरुं नये ॥८६॥
अगा चंद्राची उत्पत्ति ॥ मागें सांगीतली द्विजमूर्ती ॥ सिंधूंत जन्मला हें पुढती ॥ कोण्या अर्थी घेशी ॥८७॥
एक्या पुराणीं सांगीतला ॥ अत्रिऋषींच्या नेत्रीं जन्मला ॥ एक ठायीं सिंधुमंथनी कथिला ॥ कोणता धरिशी निश्चय ॥८८॥
समुद्रमंथनीं लक्ष्मी निघाली ॥ पूर्वी काय नव्हती विष्णुजवळीं ॥ जैं देवांची उत्पत्ति जाहली ॥ तैं जन्मली लक्ष्मी ॥८९॥
यालागीं समुद्रमंथन जाहलें ॥ तेव्हां अमृत मात्र निघालें ॥ चौदा रत्नें जें कथिलें ॥ तें ऋषिमत विपरीत ॥१९०॥
चौदारत्नें पुरातन ॥ स्वर्गसंपदा पुरातन ॥ इंद्रासि प्राप्त जाहली जाण ॥ सुखीं जाहली अक्षयी ॥९१॥
ऐसें देव वदला महाराज ॥ ऐकोनि ब्राह्मण करी अर्ज ॥ तुमच्या निरुपणाची मौज ॥ अपूर्व वाटे मज देवा ॥९२॥
परी एक पुसणें स्वामीस ॥ तें सांगा जी जगन्निवास ॥ समुद्रमंथनीं अमृतरस ॥ कोठूनि आला स्वामिया ॥९३॥
कोणत्या पदार्थापासून ॥ अमृत जाहलें निर्माण ॥ गोसावी म्हणे ऐक वचन ॥ त्या परिहारा तुज सांगों ॥९४॥
दुग्धमंथनीं घृत निपजे ॥ तेवीं सिंधुमंथनीं सुरा उपजे ॥ यालागीं उदकाचा अंश वाळिजे ॥ अमृत होय निर्धारें ॥९५॥
द्विज म्हणे संदेह गेला ॥ परी सुरा कासयाचा जाहला ॥ देव म्हणे अनुभवाला ॥ परिसें आतां सुजाणा ॥९६॥
जैसीं दुधाच्या पोटांत ॥ घृत आणि तक्र निघत ॥ तेवीं तोयाच्या पोटांत ॥ मद्य सुधा प्रगटली ॥९७॥
सुधा गेली सुरांकडे ॥ मद्य आलें असुरांकडे ॥ विष गेलें शिवाकडे ॥ हें निवाडें जाण पां ॥९८॥
विष वासुकीउदरांतून ॥ अमृत सुरा सिंधुपासून ॥ यापरी तीन पदार्थ जाण ॥ सिंधुमंथनीं प्रगटले ॥९९॥
अमृत देवीं अंगीकारिलें ॥ विष महादेवें घेतलें ॥ सुरा असुरीं प्राशिलें ॥ जाह्ले उन्मत्त अनिवार ॥२००॥
सुरेतें असुर प्राशूं लागले ॥ तेणें मांसाहारी जाहले ॥ म्हणोनि हिंसामार्गी प्रवर्तले ॥ घोरकर्मी अतिमंद ॥१॥
दानव दैत्य राक्षस ॥ मद्य मांसाहारी कर्कश ॥ हिंसाचारी बहु तामस ॥ उग्र प्रकृती जयांची ॥२॥
मद्यमांस आसुरीकर्म ॥ तेंचि स्वीकारिती मनुष्य अधम ॥ नेणती स्वहिताचा नेम ॥ अहंभ्रमें माजले ॥३॥
नाचरावें तें आचरती ॥ न करावें तेंचि करिती ॥ तयांसि मोक्ष निश्चितीं ॥ कोठोनि होईल संसारीं ॥४॥
दुजयाचा जीव मारुन ॥ त्याचें मांस भक्षी आपण ॥ वरी प्राशी मद्यालागून ॥ महत्पाप या नांव ॥५॥
निद्रिताचा वध करी ॥ चोरी परद्वारव्यसन स्वीकारी ॥ भूतमात्रीं द्रोह धरी ॥ महत्पाप या नांव ॥६॥
नेणे साधूचें महिमान ॥ करीं निंदा मुखेंकरुन ॥ चाहाडी कुचेष्टा उच्चारण ॥ महत्पाप या नांव ॥७॥
पावोनि मनुष्यजन्मासी ॥ जो न भजे परमेश्वरासी ॥ जाय चौर्‍याशींच्या फांसीं ॥ महत्पाप या नांव ॥८॥
मोहरा टाकीं वेश्येपुढें ॥ धर्मासि पैसा देतां रडे ॥ अखंड जुंवा खेळूं आवडे ॥ महत्पाप या नांव ॥९॥
शास्त्रश्रवण नावडे ॥ सर्वदा घोकी मंत्र कुडे ॥ मसणवटीं उकरो मढें ॥ महत्पाप या नांव ॥२१०॥
करी दुसर्‍याचा विश्वासघात ॥ अखंड मनीं कपट वसत ॥ नाठवी आपुलें स्वहित ॥ महत्पाप या नांव ॥११॥
ब्राह्मण जाय दावलमलका ॥ अविंध पूजी मुंजा कालिका ॥ क्षत्रिय जरी मागे भिका ॥ महत्पाप या नांव ॥१२॥
होऊनि श्रीमंतपदाचा अधिकारी ॥ लांच घेऊनि न्याय करी ॥ अन्याय नसतां जीवें मारी ॥ महत्पाप या नांव ॥१३॥
अनाथ पातल्या राजद्वारीं ॥ त्याची दाद नेदी जरी ॥ प्रजालागीं पीडा करी ॥ महत्पाप या नांव ॥१४॥
अन्नवस्त्र पदरीं असोन ॥ न तोषवी सत्पुरुषालागून ॥ धन पुरोनि जाय मरोन ॥ महत्पाप या नांव ॥१५॥
असोन आपुला भ्रतार ॥ परपुरुषीं करी व्यभिचार ॥ ते स्त्री अति अपवित्र ॥ महत्पाप या नांव ॥१६॥
ठेवूनियां पति घरासी ॥ आपण जाय अनेक तीर्थांसी ॥ विधवा नारी रते पुरुषीं ॥ महत्पाप या नांव ॥१७॥
आतां असोत या गोष्टी ॥ किती सांगावी जनासी राहाटी ॥ तुझिया आवडीस्तव गोष्टी ॥ बोलतसें मी ब्राह्मणा ॥१८॥
यापरीं कच्छअवतार ॥ तुज कथिला सविस्तर ॥ आतां वराह नृसिंह अवतार ॥ यांचें कारण तुज सांगों ॥१९॥
महाविष्णूचे द्वारपाळ ॥ जयविजय अति प्रबळ ॥ सनकादिक एक वेळ ॥ क्षीराब्धीसीं प्रवेशती ॥२२०॥
जातां महाविष्णूचे भेटी ॥ जयविजय होते द्वारवंटीं ॥ त्यांणीं डंवचोनियां काठी ॥ परतविलें मुनींद्रा ॥२१॥
होतां जयविजयांचा अपराध ॥ ऋषीस चढला परम क्रोध ॥ मग म्हणे रे मतिमंद ॥ करिसी द्वंद्व श्रेष्ठांसी ॥२२॥
अरे नष्टा क्षुल्लका ॥ मातें दिधला तुम्ही धक्का ॥ आतां शापूनि मृत्युलोका ॥ तत्काळ तुम्हा धाडीन ॥२३॥
तुमचा मुख्य जो धनी ॥ तो मातें परम मानी ॥ तुम्ही केंलीं अधर्मकरणी ॥ दुराचार नष्टहो ॥२४॥
आतां माझिया शापेंकरुन ॥ भोगा गर्भवास दारुण ॥ मृत्युलोकीं जन्म घेऊन ॥ असुरदेहीं वर्ताल ॥२५॥
शाप ऐकोनि अद्भुत ॥ जयविजय जाहले भयभीत ॥ महाविष्णूपासीं गेले धांवत ॥ मुनिशाप सांगती ॥२६॥
म्हणती अहो जी लक्ष्मीरमणा ॥ सनकादिक येतां तुमच्या दर्शना ॥ आम्हीं वर्जिलें जाणा ॥ शाप वदले अद्भुत ॥२७॥
या विघ्नाची निवारणा ॥ कैसी की जे कृपाघना ॥ परिसोनिया ऐशा वचना ॥ विष्णु जाहला दु:खित ॥२८॥
विष्णु जाउनि मुनिपासीं ॥ उ:शाप मागे तयांसी ॥ येरु म्हणती करुनि विरोधभक्तीसी ॥ तिहीं जन्मांत उध्दरतील ॥२९॥
सात्विक भावें कराल भक्ती ॥ पावाल शतजन्मांत मुक्ती ॥ विरोधभाव धरितां चित्तीं ॥ तिहीं जन्मांत उध्दराल ॥२३०॥
यामाजी आवडेल कोणतें ॥ सुखें अनुतिष्ठा निर्भयचित्तें ॥ ऐसें बोलोनि मुनि त्यांतें ॥ गमन केलें विचरावया ॥३१॥
यापरी जय विजय दोघे जण ॥ पावले विष्णुपदापासून पतन ॥ मृत्युलोकीं येऊन ॥ दैत्यवंशीं जन्मले ॥३२॥
हिरण्याक्ष हिरण्यकशिपू ॥ धरुन असुरांचीं वपू ॥ होऊन दानवांचें नृपू ॥ राज्य करिती भूलोकीं ॥३३॥
दोघे बंधू करुन विचार ॥ आरंभोनि तपश्चर्या उग्र ॥ पिंड भावोनियां पाथर ॥ अनुष्ठान आरंभिलें ॥३४॥
पर्जन्यकाळीं जळवृष्टी ॥ घेती उघडया अंगें मोठी ॥ सीतमासी तोयपृष्ठीं ॥ बैसोनि करिती जपातें ॥३५॥
उष्णकाळीं पंचाग्नी ॥ शेकिती काया तप्त करुनी ॥ उभें राहोनियां एक चरणीं ॥ सहस्त्र वर्षे अतिनिकट ॥३६॥
खडतर पाहोनियां तपातें ॥ त्वरें पातला ब्रह्मा तेथें ॥ म्हणे श्रमों नका दैत्यातें ॥ मागा वर मी देतों ॥३७॥
ऐकोनि ब्रह्ययाची वाणी ॥ हिरण्यकशिपु जोडूनि पाणी ॥ म्हणे माझे इतुकेंचि मनीं ॥ आयुष्य वृध्दि बहु व्हावी ॥३८॥
अमर अथवा असूर ॥ त्यापासोनि न घडे मरण साचार ॥ पशु पक्षी सर्प  व्याघ्र ॥ यांपासूनि मी न मरें ॥३९॥
न मरें ऋषींचिया शापें ॥ न मरें मनुष्यांचिया कोपें ॥ न मरें राक्षसांचिया जल्पें ॥ शस्त्र खोचें न मरें मीं ॥२४०॥
न मरें विष अग्निपासोनि ॥ न मरें वायु पाणी यांतून ॥ न मरें पडतां प्रचंड पाषाण ॥ न मरें निजतां बसतां ॥४१॥
न मरें ग्रामीं वनांतरीं ॥ न मरें अंगणीं माझारी ॥ न मरें दिवसा किंवा रात्रीं ॥ पृथ्वीवरी न मरेंची ॥४२॥
ऐसें हिरण्यकशिपें प्रार्थितां जाण ॥ तथास्तु म्हणे चतुरानन ॥ मग आज्ञापी हिरण्याक्षालागून ॥ तूंही मागें वरासी ॥४३॥
येरु म्हणे जी विधाता ॥ मज द्यावी बळाची पुष्टता ॥ इतुकाचि संतोष मम चित्ता ॥ आणखी इच्छा असेना ॥४४॥
मजसमान दुसरा बळी ॥ नसावा जी ब्रह्मांडमेळीं ॥ ऐसी कृपेची येक उकळी ॥ वोपी माझ्या मस्तकीं ॥४५॥
ऐसें मागतां असुरानें ॥ वर वोपिला विधातियानें ॥ दोघीं विसर्जून अनुष्ठानें ॥ जाहलें उन्मत्त अविचारी ॥४६॥
हिरण्याक्ष बळाच्या प्रतापें ॥ कवळोनि वसुधेचि मूर्ति कोपें ॥ काखें मारुनियां भूपें ॥ पाताळविवरीं दडाला ॥४७॥
नेली धात्री असुरानें ॥ वार्तां परिसिली चतुराननें ॥ मग खेद पावूनि खिन्नमतें ॥ महाविष्णूपासीं तो गेला ॥४८॥
म्हणे अहो जी दयावंत ॥ असुरें केला बहुत उत्पात ॥ धरा कवळोनियां काखेत ॥ पाताळविवरीं प्रवेशला ॥४९॥
ऐसें ऐकूनि महाविष्णु ॥ पाचारिला वैकुंठींचा विष्णू ॥ म्हणे तुम्हांवांचोनियां दैत्यमर्दनु ॥ दुजा कोणी करीना ॥२५०॥
अवश्य म्हणे वैकुंठपाळ ॥ धरिलें वराहरुप विशाळ ॥ पाताळविवरीं असुर चांडाळ ॥ त्यासी वधिलें गवसुनी ॥५१॥
महीलागीं दाढे धरुनीं ॥ पुढें आणिली संस्थानीं ॥ ही वराह अवताराची करणीं ॥ तूतें द्विजा निरुपिली ॥५२॥
मच्छ कच्छ वराह जाहला ॥ तिहीं देवांनीं अवतार घेतला ॥ त्यांत कोणता जीव उध्दरिला ॥ तूंचि सांग विवेकें ॥५३॥
यालागीं परमेश्वरावांचून ॥ जीवाचा उध्दार होईना जाण ॥ म्हणोनि ज्ञानाचें साधन ॥ वारंवार करावें ॥५४॥
ऐसें बोलिला विश्वव्यापक ॥ ब्राह्मणांहृदयीं अत्यंत हरिख ॥ पुढें पुसेल प्रश्न अलौकिक ॥ तोही अनुभव सांगेन ॥५५॥
परंतु दुश्चित न व्हावें श्रोता ॥ आणूं नका संशय चित्ता ॥ मध्येंचि भ्रांतीची वार्ता ॥ उर्मि उसळों न द्यावी ॥५६॥
अद्भुत अध्यात्मनिरुपण ॥ पुढें येईल गति गहन ॥ जोडेल मोक्षपदींचें ठेवण ॥ ऐसी गोडी वर्षेल ॥५७॥
ऐकोनि ग्रंथाची मात ॥ कौतुक वाढेल या जगांत ॥ म्हणती आम्ही जन्मांत ॥ शहा मुनी देखिला ॥२५८॥
इति श्रीसिध्दांतबोधग्रंथे अध्यात्मनिरुपणतत्वसारनिर्णये पंचविशोंध्याय:  ॥२५॥ अध्याय ॥२५॥

N/A

References : N/A
Last Updated : November 22, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP