मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|सिध्दान्तबोध| अध्याय ७ वा सिध्दान्तबोध प्रस्तावना अध्याय १ ला अध्याय २ रा अध्याय ३ रा अध्याय ४ था अध्याय ५ वा अध्याय ६ वा अध्याय ७ वा अध्याय ८ वा अध्याय ९ वा अध्याय १० वा अध्याय ११ वा अध्याय १२ वा अध्याय १३ वा अध्याय १४ वा अध्याय १५ वा अध्याय १६ वा अध्याय १७ वा अध्याय १८ वा अध्याय १९ वा अध्याय २० वा अध्याय २१ वा अध्याय २२ वा अध्याय २३ वा अध्याय २४ वा अध्याय २५ वा अध्याय २६ वा अध्याय २७ वा अध्याय २८ वा अध्याय २९ वा अध्याय ३० वा अध्याय ३१ वा अध्याय ३२ वा अध्याय ३३ वा अध्याय ३४ वा अध्याय ३५ वा अध्याय ३६ वा अध्याय ३७ वा अध्याय ३८ वा अध्याय ३९ वा अध्याय ४० वा अध्याय ४१ वा अध्याय ४२ वा अध्याय ४३ वा अध्याय ४४ वा अध्याय ४५ वा अध्याय ४६ वा अध्याय ४७ वा अध्याय ४८ वा अध्याय ४९ वा अध्याय ५० वा श्रीसिध्दान्तबोध - अध्याय ७ वा ‘श्रीसिध्दान्तबोध’ हा संतकवि श्रीशहामुनि यांचा ग्रंथ म्हणजे मराठी वाड्मयाच्या खाणींतील एक तेजस्वी हिरा आहे. Tags : pothisiddhant bodhपोथीसिध्दान्तबोध अध्याय ७ वा Translation - भाषांतर श्रीगणेशायनम: ॥ श्रीकृष्णा राजाधिराजा ॥ करी त्रैलोक्याच्या मौजा ॥ पावे भक्ताचिया काजा ॥ संकट पडतां निर्वाणी ॥१॥बहुतांसि केलें पावन ॥ त्यांत आम्हांस होईल प्राप्त ॥ तोचि लाभ तव चरणीं ॥३॥ज्याचें प्रारब्ध उघडलें ॥ दैवें राज्य प्राप्त जाहलें ॥ कित्येक दरिद्री जन्मले ॥ त्यांस लाभ काय राज्याचा ॥४॥वर्णिली दुजियाची सावकारी ॥ पैसा नाहीं आपुलें पदरीं ॥ देखिली परवानितां सुंदरी ॥ काय होय मार्गस्था ॥५॥ बहुत पथिक मिळोनी ॥ मार्ग क्रमिती संभाषणीं ॥ तों पुढें सरितां भरोनी ॥ असंभाव्य जातसे ॥६॥त्यांत एक पोहणार ॥ आपण गेला पैलतीर ॥ त्याचा पुरुषार्थ थोर ॥ काय इतरीं करावा ॥७॥तैसे साधु संत सज्जन ॥ त्यांवरी देवें कृपा करुन ॥ संसारसमुद्रांतून ॥ मोक्षवेटीं लाविले ॥८॥पतित जनालागीं काळें ॥ बांधोन यमपुरी नेलें ॥ वैकुंठसुखाचे सोहळे ॥ केवीं लाभती नरकस्थां ॥९॥जिहीं जैसी करणी केली ॥ त्यांस तैसीच प्राप्ति जाहली ॥ तयाची गोष्ट वाईट भली ॥ काढिल्या काय सार्थक ॥१०॥असेल दैवीं ते भोगावें ॥ नातरी प्राक्तना रुसावें ॥ परमेश्वराचें नाम घ्यावें ॥ सार्थक होय ज्याचेनी ॥११॥यालागीं सांडोनि सर्व गोष्टी ॥ कृष्णचरणीं घातली मिठी ॥ कृपा करुन जगजेठी ॥ चुकवी माझ्या चौर्याशी ॥१२॥बहु भ्यालों जीवासे ॥ आलों काकुळती देवासी ॥ श्रीदत्त येउनि रात्रीसी ॥ मंत्र कर्णासी फुंकिला ॥१३॥तोचि धरिला म्यां जीवे ॥ जप केला मनोभावें ॥ ब्रह्मांडचि आघवें ॥ एवढी मौज माजली ॥१४॥काय सांगूं लोकांसी ॥ हर्ष वाटतो मनासी ॥ संतमंडळी सभेसी ॥ मौज करितो शहामुनी ॥१५॥मौजेंत थोर मौज ॥ सेविलें श्रीगुरुचरणरज ॥ सफल जाहलें जन्मकाज ॥ प्रेमें बैसलों हरिभजनीं ॥१६॥आनंदतुरंगीं बैसोनी ॥ मन लगाम करीं धरुनी ॥ दत्तकृपेंच्या पटांगणीं ॥ कविताछंदें नाचवी ॥१७॥नाचविता ऋषिकटकांत ॥ पुढें फिरविला कैलासांत ॥ देवदैत्यांच्या भांडणांत ॥ कांहीं तेथें स्थिरावला ॥१८॥तेथोनि घोडें उडालें ॥ वोढोनि द्वारकेसी नेलें ॥ बळराम गरुडांचीं बळें ॥ कपिटापें तुडविलीं ॥१९॥सत्यभामेच्या पोटीं ॥ होती गर्वाची ताठी ॥ कृष्णें मोडोनियां हाटीं ॥ फिरोनि कैलासी पातला ॥२०॥जालंधरशिवयुध्दांत ॥ मिळोन दोहींकडे नाचत ॥ तेथें कैसी वर्तली मात ॥ तोचि वृत्तांत सांगेन ॥२१॥येथेंचि राहिली होती कथा ॥ तेचि आठवली आतां ॥ दत्तगुरुचा प्रसाद पुरता ॥ वाढीतसें मीं श्रोतयां ॥२२॥याचि कथेच्या सनगास विणीत होतों सावकाश ॥ तर्कधसकट लागोन त्यांसी ॥ चिरोन केलें दोठायीं ॥२३॥त्यांसी बुध्दीचे तंतु घेवोनिई ॥ निश्चयाचे पिळानें सांधोनी ॥ पहिल्या ऐसे अखंड करोनी ॥ लावीन काम मागाचें ॥२४॥पसरुन मतीच्या सुतासी ॥ विचित्र विणकर करीन खाशी ॥ यथार्थाच्या वस्त्रासी ॥ करीन सनगें घडीचीं ॥२५॥विवेकानें उकलोन ॥ श्रवणीं श्रोतयां पांघरवीन ॥ त्यांचा आशीर्वाद घेऊन ॥ प्रसंग शेले उतरितों ॥२६॥चतुर्थाध्यायीं निरुपण ॥ दैत्ययुध्दीं शिव श्रमून ॥ खालीं बैसला श्वास घेऊन ॥ तंव विष्णु आला त्यापासी ॥२७॥तेचि कथा विस्तारेंसीं ॥ नैमिषारण्यीं सांगें ऋषींसी ॥ निरसी वैकुंठलोकासी ॥ आपुल्या ज्ञानें करोनियां ॥२८॥याचि दृष्टांताकारण ॥ आठवलें जालंधराचें कथन ॥ ऋषि म्हणे सावधान ॥ सांगेन तें परिसावें ॥२९॥शिव दैत्यासी भांडतां ॥ श्रमोनि बैसला खालता ॥ विष्णूस म्हणे आतां ॥ कोण उपाय करावा ॥३०॥हरि म्हणे गौरिरमणा ॥ निर्दयी दैत्य मरेना ॥ यासी भिडतां रणकंदना ॥ अनर्थ करील दुष्ट हा ॥३१॥आतां अवीट भांडों नये ॥ कीजे मुक्तीचा उपाय ॥ युक्तीवांचोनि कार्य ॥ सिध्दी नपवे सर्वथा ॥३२॥ अवघड दुर्ग धुरंधर ॥ युध्दीं सैन्य जाहले जर्जर ॥ त्यासी उपाय करोनि चतुर ॥ सुरुंग लावून उडविती ॥३३॥कवणे एके समयीं ॥ भृंग पडला समुद्रप्रवाहीं ॥ सागरास म्हणे उदार होई ॥ प्राण माझा रक्षी कां ॥३४॥ऐक सांगतों जळराशी ॥ वाचवावें मम प्राणाशीं ॥ मीही तुझिया संकटासी ॥ आडल्या कामासी येईन ॥३५॥परिसोन भ्रमराचा शब्दु ॥ हांसोनि बोले विशाळ सिंधु ॥ तुझा दिसे धाकुटा देहसंबंधु ॥ शब्द आगाधु बोलसी ॥३६॥आश्चर्याची वाटते मज थोरी ॥ मूषक सिंहाचें संकट वारी ॥ तैसा विवेक तुझा निर्धारीं ॥ केवीं चतुरीं मानावा ॥३७॥महाप्रळयाचे अंतीं ॥ मी क्षोभेन सरितापती ॥ वैकुंठ कैलास वरती ॥ लाट माझी उसळेल ॥३८॥बुडवीन ब्रह्मांड समग्र ॥ अवघें करीन निराकार ॥ ऐसा मी बळाब्धी दुर्धर ॥ केवीं संकटीं पडेन ॥३९॥तूं बोलसी तितुकें व्यर्थ ॥ काय वांचविसी जीवित्व ॥ लाटेसरिसा सारोनि त्वरित ॥ भृंग तटाकीं टाकिला ॥४०॥यावरी कोणे एके दिवशीं ॥ परशुरामें जिंकिलें क्षत्रियांसी ॥ पृथ्वी दान देऊनि ब्राह्मणासी ॥ राम गेला सिंधुतीरा ॥४१॥रेणुकानंदन म्हणे जळखाणी ॥ म्यां धरा सर्व वोपिली दानीं ॥ तुवां सारोनि आपुले पाणी ॥ ठाव द्यावा राहावया ॥४२॥सागर बोले द्वादश गांवें ॥ स्थळ वोपितों सुखें राहावें ॥ राम म्हणे या गौरवें ॥ संतोष नेदी आमुतें ॥४३॥मी सोडितों आपला शर ॥ पडले तितुका तूं सर ॥ हें परिसोनियां सागर ॥ चिंताज्वरें पोळला ॥४४॥आतां यास नाहीं म्हणतां ॥ हा प्राण घेईल तत्त्वतां ॥ होय म्हणावें तरी शर उरता ॥ पैल तीरा जाईल ॥४५॥पुढें आड मागें विहीर ॥ तैसाचि दिसे हा प्रकार ॥ कोण सखा सहोदर ॥ भ्रम ऐसा वारील ॥४६॥यापरी विचारितां सागर ॥ तंव मनीं आठवला भ्रमर ॥ तुज संकट पडल्या थोर ॥ मी त्या समयीं पावेन ॥४७॥परी त्याचें नाम आठवितां ॥ लज्जा वाटे माझिया चित्ता ॥ ऐसा विचार जंव करित ॥ तंव भृंग तेथें पातला ॥४८॥सागर म्हणे षट्पदा ॥ कैसी निवारे हे आपदा ॥ तुवां बोललिया शब्दा ॥ सिध्दी नेलें पाहिजे ॥४९॥परिसोनि सागराची वाणी ॥ सुगंधभक्षक हासोनि मनीं ॥ म्हणे त्वां निर्भय अंत:करणीं ॥ स्वस्थानीं असावें ॥५०॥ऐसें बोलोनि उडाला ॥ सीतागर्भातें चाटिता जाहला ॥ रंगत्वचेच्या पदराला ॥ स्वल्पमात्र ठेविलासे ॥५१॥यावरी जमदग्नीचा कुमर ॥ सज्जून धनुष्य वोढी शर ॥ तंव तुटोनि पडलें महीवर ॥ आश्चर्य करी भार्गव ॥५२॥म्हणोनि अगाध महिमा ईश्वराची ॥ युक्ति पाहोनि भ्रमराची ॥ संतोषवृति सागराची ॥ काडी आड डोंगर ॥५३॥सागर म्हणे गा अलिनायकां ॥ दु:खसमुद्रामाजी नौका ॥ होऊनि तारिलें हो देखा ॥ उपकार निका फेडिला ॥५४॥आज्ञा मागोनि इंदुजनका ॥ गमन केलें षट्पदें देखा ॥ विष्णु शिवातें म्हणे कौतुका ॥ चरित्र भृंगाचें परिसिलें ॥५५॥भृंगयुक्तीचा चमत्कार ॥ तैसाचि आणिक एक प्रकार ॥ वर्तला तो सादर ॥ परिसा तुम्हांतें सांगेन ॥५६॥कोणे एका काननांत ॥ वारण फिरत असे उन्मत ॥ दर्दरें स्वबुध्दीनें अकस्मात ॥ जीवें मारिला कुंजर ॥५७॥संदेह धराल मनांत ॥ तोही सांगतों वृत्तांत ॥ गजें कवळोनि वृक्षातें ॥ खांदी एक मोडिली ॥५८॥तिजवर होतीं चिमणीचीं पिलीं ॥ खांदी तुटतां पडोनि मेलीं ॥ चिमणा चिमणी आक्रंदलीं ॥ हस्ताभोवतीं तडफडती ॥५९॥चिमणी म्हणे रे चांडाळा ॥ त्वां कां वधिलें माझिया बाळां ॥ आतां घेईन तुझिया जीवाला ॥ तरीच प्राण ठेवीन ॥६०॥रडत तेथोनि निघाली ॥ कर्ढोकपक्षियापाशीं गेली ॥ म्हणे माझीं पिलीं मारिली ॥ उन्मत गजें पापिष्ठें ॥६१॥कर्ढोक म्हणे वो चिमणी ॥ विशाळ हस्ती उन्मत्तखाणी ॥ त्यापुढें माझी करणी ॥ केवीं मिरवे सांगपां ॥६२॥आतां ऐक एक विचार ॥ माझा मित्र असे भ्रमर ॥ त्यासी जाऊनि सविस्तर ॥ वृत्तांत सांगें वर्तला जो ॥६३॥दोघें मिळोनि सांगातें ॥ पातलीं बैसला भ्रमर जेथें ॥ अवघें दु:ख सांगोनि तयांतें ॥ मारु म्हणती गजातें ॥६४॥भ्रमर म्हणे तुम्ही अज्ञान ॥ कैसा घ्याल हस्तीचा प्राण ॥ आम्ही तिघे तृणासमान ॥ काय त्याचें करावें ॥६५॥ परी माझी एक मैत्रीण ॥ बेडकुळी नामें अभिधान ॥ तिजपाशी जाऊन ॥ सांगेल उपाय तो करुं ॥६६॥ऐसें विचारुनि तिघेजण ॥ दर्दुरीपासीं आलें धांवून ॥ येरी म्हणे कर्म दारुण ॥ सिध्दि कैसें पावेल ॥६७॥दर्दुरी वदे अनुभवें ॥ सांगेन तैसें तुम्ही करावें ॥ येरी बोलोनियां बरवें ॥ चौघें आलीं गजापाशीं ॥६८॥दर्दुर म्हणे भ्रमरा ॥ रिवें हस्तीच्या कर्णद्वारा ॥ घुंगाटोनि श्रवणीं शरीरा ॥ त्रास देईं ये समयीं ॥६९॥तंव भ्रमर वचन मानुनी ॥ प्रवेशला हस्तीच्या कर्णी ॥ घाबरा होऊन गजमनीं ॥ मस्तक झाडी आपुलें ॥७०॥कर्ढोकास म्हणे बेडकुळी ॥ फोडीं याची नेत्रबुबुळीं ॥ येरें जपोनि चक्षुकमळीं ॥ चंचुप्रहारें छेदिलें ॥७१॥मग तो वारण अंध जाहला ॥ बहुत तृषानळें शोषिला ॥ दर्दुरीनें टाहो केला ॥ कडा पाहोनी अवघड ॥७२॥ऐकोनि दर्दुरीची वाणी ॥ मातंग म्हणे असेल पाणी ॥ पुढें चालतां चौं चरणी ॥ निरसोनि पडला तळवटीं ॥७३॥विष्णु म्हणे तैंसें शिवाला ॥ दर्दुरें गज या रीतीं मारिला ॥ तैसेंचि या दैत्याला ॥ उपाय कांहीं करावा ॥७४॥आतां सांगेन तैसें करावें ॥ त्याचें वर्म मज ठावें ॥ माझें हातीचें चक्र बरवें ॥ आपल्या करीं असों द्या ॥७५॥त्याची अंगना पतिव्रता ॥ तिशीं युक्तीनें व्यभिचार करितां ॥ तेव्हांचि चक्र सोडोनि त्वरित ॥ शीर छेदावें दैत्याचें ॥७६॥ऐसें बोलोनि शिवासी ॥ धरिलें जालंधररुपासी ॥ विष्णु जाऊनि वृंदेपासी ॥ द्वारीं उभा ठाकला ॥७७॥वृंदेस म्हणे धांव लौकरी ॥ युध्दीं घाव लागले भारी ॥ तुझिया जीवास्तव लौकरी ॥ धावोनि आलों मम प्रिये ॥७८॥आतां देई वो आलिंगन ॥ तेणें हरेल माझा शीण ॥ तुझिया वियोगेंकरुन ॥ दहन जाहलें देहाचें ॥७९॥देवाचें बळ दिसे फार ॥ दैत्य युध्दीं जाहलें जर्जर ॥ ते समरंगण टाकोनि घोर ॥ तुझे आवडीं पातलों ॥८०॥मग हासोनि करीं धरिली ॥ उभयतां मंचकीं पहुडलीं ॥ तो विलास वर्णावया मति फावली ॥ परी श्रोतेजनीं वारिलें ॥८१॥म्हणोनि ठेविला गूढार्थ ॥ विष्णूनें संपादिला कार्यार्थ ॥ चक्र सुटोनियां दैत्य ॥ मृत्यु पावला दुरात्मा ॥८२॥सवेंच विष्णूनें काय केलें ॥ चतुर्भुज रुप धरिलें ॥ वृंदेसी म्हणे तुज ठकविलें ॥ पति तुझा निमाला ॥८३॥पाहोनि विष्णूचें कृत्रिम ॥ वृंदेस चढला क्रोध परम ॥ म्हणे पापिष्ठा माझा नेम ॥ अढळ कैसा ढाळिला ॥८४॥वीज पडो कडकडोन ॥ तुझें हो कां निसंतान ॥ पाषाणजन्म पावोन ॥ मृत्युलोकीं पडसील ॥८५॥ऐसी विष्णूची अवकळा ॥ दैत्यवनितेनें शापिला ॥ मग पाषाणदशा पावला ॥ ब्राह्मण संपुष्टीं पूजिती ॥८६॥विष्णू परमात्मा असता ॥ तरी वृंदेचा शाप न लागता ॥ शोध न करितां पुरता ॥ अल्पज्ञानें फुगों नये ॥८७॥मस्य सूकरयोनीं ॥ जन्म घेतला अपवित्रखाणीं ॥ ठकवूनि वधी दैत्यांलागोनी ॥ कृत्रिमें करोनी वर्तत ॥८८॥नृसिंहाचा अवतार धरिला ॥ दैत्य वधोनि पोटीं चिरिला ॥ परमात्मा ऐसियाला ॥ काय निमित्तें म्हणावें ॥८९॥विरोचनाची बाईल जाहला ॥ म्हणे हालवितें डोईला ॥ नखें रोवोनि प्राण घेतला ॥ ऐसा ठक श्रीहरी ॥९०॥ऐसी विष्णूची करणी ॥ सवेंचि भिकारी होउनी ॥ हात पसरी बळी लागुनी ॥ हें उचित काय अच्युतातें ॥९१॥ज्याचें घेतलें दान ॥ त्यावरी पडिला फिरोनि ॥ शुक्राचा नेत्र फोडून ॥ बळी पाताळा घातला ॥९२॥ जिच्या पोटीं जन्मला ॥ तेचि मातेचा वध केला ॥ त्याचि दोषें राम जाहला ॥ पिटोनि लावला दशरथें ॥९३॥तेथेंही अरिष्ट जाहलें ॥ स्त्रियेस राक्षस घेऊनि गेले ॥ रडे भूमीस लोळे ॥ झाडें कवळी पोटासी ॥९४॥मेळवूनि वानरें माकडें ॥ तिहीं निवारिलें सांकडें ॥ देवापरीस राक्षस गाढे ॥ धुळी माजी मेळविले ॥९५॥नळाचे हातें पाषाण तरले ॥ मध्येंचि आपुलें नाम मिरविलें ॥ अहिरावणें चोरोनि नेलें ॥ हाल मोठे जीवाचे ॥९६॥तो आपुले अंबिकेसी ॥ आहुती देतसे रामाची ॥ कपि पातला त्या समयासी ॥ प्राणदाता तो जाहला ॥९७॥पोटीं जन्मले वनमाळी ॥ मायबापें पडिलीं बंदिशाळीं ॥ उपजतांच गोकुळीं ॥ चोरुनि नेलें वसुदेवें ॥९८॥नंदें देऊनि पोटिंची लेंक ॥ पोसणा घेतला विधिजनक ॥ काठी कांबळी देऊनि देख ॥ गुराखी करुनी ठेविला ॥९९॥तेथें करी व्यभिचार चोरी ॥ नित्य कलह माजवी घरीं ॥ जरासंधें धाक लाविल्यावरी ॥ गेला पळोनि द्वारके ॥१००॥धर्म लागला कासेसी ॥ त्यास लाविलें वनवासी ॥ ऋषीनें शापून यादवांसी ॥ नाश केला कुळाचा ॥१॥आपण पडिला उताणा ॥ कोळियें बाण लाविणा चरणा ॥ ऐसिया पावला मरणा ॥ ईश्वर केवीं म्हणावा ॥२॥कलीमाजी बौध्द जाहला ॥ जैनमार्ग तेणें स्थापिला ॥ ब्राह्मण हेळसिती त्याला ॥ शास्त्रें कोणी न मानिती ॥३॥पुढें कलंकी जन्मेल ॥ बहुत प्राणी नाश पावतील ॥ ऐसा हा विष्णूचा खेळ ॥ एक निश्चय असेना ॥४॥एकाचें बरवें क्री ॥ एकाचें जीवें मारी ॥ द्वैतभाव चराचरीं ॥ वर्तन असे जाण पां ॥५॥विष्णूस लागलें जन्मकर्म ॥ जगदीश तो निष्कर्म ॥ विष्णूस अभिमान परम ॥ निरभिमानी ईश्वर ॥६॥यापरी विष्णूचा आविर्भाव ॥ दाविला उघडोनि सर्व ॥ आतां मुख्य कोण देव ॥ तो अभिप्राय सांगेन ॥७॥सकळदेवांचा आदिदेव ॥ ज्यासी म्हणती महादेव ॥ त्याचा सांगेन नांव ठाव ॥ जो पूज्य सुरनरांसी ॥८॥त्याचिया सामर्थ्याची थोरी ॥ न माये ब्रह्मांडाभीतरी ॥ ध्याती ब्रह्मादिक अंतरीं ॥ एवढी सत्ता सयाची ॥९॥तोचि सर्वांचा ईश ॥ जगीं म्हणती जगदीश ॥ मुख्य परब्रह्म महेश ॥ कैलासीं वास करीतसे ॥११०॥सकळदेवांचा मुगुटमणी ॥ सदैव स्तविती देव फणी ॥ जयाची अगाध करणी ॥ कर्ता हर्ता ईश्वर ॥११॥तयाचें सांगेन महिमान ॥ श्रवणें तृप्त होय मन ॥ फिटेल संदेहाचें भान ॥ सत्य वाटेल तुम्हांतें ॥१२॥यापरी ऋषिमंडळींत ॥ निर्भत्सिला रमाकांत ॥ सांगेल कैलासाची मात ॥ तेचि कथा परिसावी ॥१३॥एकापरीस एक अधिक ॥ बोलता आपुला विवेक ॥ यांचें युक्तीची लापणीक ॥ सज्जनालागीं निवेदीन ॥१४॥ शहामुनि मुखडब्यांत ॥ गुरुज्ञानकस्तूरी भरित ॥ सुगंधकाव्य श्रोते सेवित ॥ श्रवणद्वारें करुनियां ॥११५॥इति श्रीसिध्दांतबोधग्रंथे अध्यात्मनिरुपणतत्त्वसारनिर्णये सप्तमोऽध्याय: ॥७॥अध्याय ॥७॥ ओंव्या ॥११५॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ N/A References : N/A Last Updated : September 23, 2020 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP