मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|सिध्दान्तबोध|
अध्याय १२ वा

श्रीसिध्दान्तबोध - अध्याय १२ वा

‘श्रीसिध्दान्तबोध’ हा संतकवि श्रीशहामुनि यांचा ग्रंथ म्हणजे मराठी वाड्मयाच्या खाणींतील एक तेजस्वी हिरा आहे.


श्रीगणाधिपतये नम: ॥
श्रीगुरुभ्यो नम: ॥ ओं नमोजी श्रीगुरुराया ॥ अगाध अपरिमित परम सौंदर्या ॥ श्रेष्ठ सर्वां सुरवर्या ॥ नवल चर्या परी तुझी ॥१॥
हरि हर ब्रह्मादि करिती पूजा ॥ ऋषि सनकादिकांसी अभय तुझा ॥ प्रकृतिपुरुषावरी लाविली ध्वजा ॥ ज्ञानासी कळा तुझेनी ॥२॥
संसार-माया-घोरांतून ॥ निघावया जीवां कैची आंगवण ॥ तो जीव होय सनाथ तुझेन ॥ चरणरज वंदिल्या ॥३॥
साधिल्या कोटी यज्ञांसी ॥ गुरुवाचूनि न पवे मुक्तीसी ॥ करितां समुद्रवलयांकित तीर्थांसी ॥ श्रम होय वाउगा ॥४॥
गुरुवाचून जप तप अनुष्ठान ॥ तें दिसे वांझ वृक्षासमान ॥ लागलें शिंदीचें अपार वन ॥ आंब्यासमान नव्हे कीं ॥५॥
लक्ष देवतां सेवितां शिण सोस ॥ जेवीं कण न मिळे कांडितां भुस ॥ काय करावें निवडंगवृक्षास ॥ फळ फुल ना धड काष्ठ ॥६॥
सद्गुरुवांचून जें साधन ॥ जैसें वंध्यानारीचें मैथून ॥ किंवा षंढास अलंकारभूषण ॥ जन्म व्यर्थ पुरुष ना स्त्री ॥७॥
केला सर्वशास्त्रीं अभ्यास ॥ गुरुवाचून दिसती फोसलस ॥ निपजलें उसाग्रीं विशाल कणस ॥ रस बीज ना कांहींच ॥८॥
शास्त्रमतें सिध्दांत केला ॥ आणि श्रीगुरुसी शरण न गेला ॥ सहस्त्र ब्राह्मणांचा स्वयंपाक केला ॥ मिठाविण दिसे पाणचट ॥९॥
चारी प्रहर बैसला समुद्रतीरास ॥ तृषा सर्पिणीचें ना हरे विष ॥ संग्रह केला बहुग्रंथास ॥ गुरुगम्याविण अंध तें ॥१०॥
असो आतां शब्दरचना ॥ अज्ञानजनासी बोलवेना ॥ महिषापुढें केल्या गायना ॥ काय चित्त संतोषे ॥११॥
दुर्योधनासी उपदेश ॥ करितां श्रमला जगदीश ॥ न होय ज्ञानप्रकाश ॥ क्षोभे वृत्ति आपुली ॥१२॥
यालागीं दुर्जन पाहून ॥ आधीं करावा सन्मान ॥ जैसे मुखा आधीं सज्ञान ॥ अपमानद्वार आधीं धुती ॥१२॥
यालागीं दुर्जन पाहून ॥ आधीं करावा सन्मान ॥ जैसे मुखा आधीं सज्ञान ॥ अपमानद्वार आधीं धुती ॥१३॥
जगाचा स्वभाव असे वन्ही ॥ साधूनीं असावें होऊनि पाणी ॥ जैसें पडया बैला लागोनी ॥ उपाय कांहीं चालेना ॥१४॥
आतां असो जगाचा पसारा ॥ शरण आलों श्रीगुरु दातारा ॥ ज्याच्या कृपेचा अभयवारा ॥ स्पर्शतां हेलावे चित्त सिंधु ॥१५॥
तोची आनंद गुरुकृपेचा ॥ रसभरित अक्षर उच्चारी वाचा ॥ रचितां सिध्दांत बोधाचा ॥ विस्तार चाले गंगेऐसा ॥१६॥
श्रोते रागेंभरुन ॥ वक्तया ठेविती दूषण ॥ म्हणती अवघ्या देवां निंदून ॥ उच्छेद केला सर्वांचा ॥१७॥
वक्ता म्हणे म्यां हातवटी ॥ दाविली तुम्हां उघडोनि राहटी ॥ विकल्प धरुं नका पोटीं ॥ पुढें उगव अवधियाचा ॥१८॥
ग्रंथसमाप्तीपर्यंत जाण ॥ करावें ग्रंथाचें श्रवण ॥ न होय जरी संशय खंडण ॥ तेव्हा दोष ठेविजे ॥१९॥
ज्याग्रंथीं संशयाची राहाटी ॥ ग्रंथ नव्हे तो देहांतीं नरोटी ॥ मग ग्रंथ म्हणणें श्रेष्ठीं ॥ केवीं मिरवी श्रोतियां ॥२०॥
भेद अभेद कर्म उपासना ॥ याचा सिध्दांन्त लाविला गुरुराणा ॥ यालागीं धरुनि मना ॥ श्रवण करावें हें श्रेष्ठ ॥२१॥
मागील अध्यायीं अमूप ॥ सांगितला शिवाचा खटाटोप ॥ पुढें मायेचा प्रताप ॥ वर्णी ऋषि तें ऐका ॥२२॥
ऋषि म्हणे मुनिवर्या ॥ सर्वांस मुख्य मूळ माया ॥ सकळ देवांचीच चर्या ॥ विस्तारें कीर्ति मूळमायेची ॥२३॥
मायेनें रचिलें ब्रह्मांड ॥ केले देश डोंगर नवखंड ॥ उभारिले कौतुकार्थ पिंड ॥ बहु बंड उभविलें ॥२४॥
ओंकारपिठिका तेचि शक्ती ॥ वेदशास्त्रांसी मूळप्रकृती ॥ परमार्थ प्रपंचाची जाती ॥ मायेमुळें होतसे ॥२५॥
माया म्हणती सगुण ॥ परी न दिसे अवयववर्ण ॥ आकारमात्र तो शून्य ॥ धरितां ठाव दिसेना ॥२६॥
मायेपासूनियां कर्म ॥ तीर्थ व्रतें दान धर्म ॥ फळें परमार्थ सुगम ॥ हेंहि वर्म मायेचें ॥२७॥
पाहतां मायेचें कौतुक ॥ जिणें ठकविले ब्रह्मादिक ॥ चालवी सूत्रें तिन्हीं लोक ॥ जग देख तिचें हातीं ॥२८॥
मायालाघव न कळे शिवासी ॥ म्हणोनि पातला लिंगपतनासी ॥ विष्णु रतला वृंदेसी ॥ विरंची कन्येसी भुलला ॥२९॥
इंद्र जाहला भगेंद्र ॥ कलंकी केला चंद्र ॥ शुंभनिशुंभ दैत्येंद्र ॥ मृत्यु पावले परस्परें ॥३०॥
काळ करी जगाचा घास ॥ माया करी काळाचा नाश ॥ तेथें सुरा असुरांस ॥ केवा कोणता गावया ॥३१॥
वेद शास्त्रें पुराणें ॥ मायेवांचूनि न होती पूर्ण ॥ चाले संसार परमार्थ गहन ॥ हें विंदान मायेचें ॥३२॥
अगाध मायेची प्रौढी ॥ कोटि ब्रह्मांडे घडी मोडी ॥ रची कल्पाचिया कोडी ॥ आणी हुडी सर्वांसी ॥३३॥
शुध्दज्ञानांवाचून ॥ जीव होईना पावन ॥ तें ज्ञानस्वरुप माया जाण ॥ हेचि खूण ज्ञानाची ॥३४॥
यापरी मायेचें सूत्र ॥ ऋषि वदला आपल्या वक्त्र ॥ मुनि म्हणती विचित्र ॥ याचें ज्ञान ऐकिलें ॥३५॥
बैसले होते तपोनिधी ॥ त्यांत बोले एक विशालबुध्दी ॥ म्हणे बरा नेमिला विधी ॥ न कळे संधि ज्ञानाची ॥३६॥
पाहा हो केवढा अनर्थ केला ॥ कण सांडूनि घे भुसाला ॥ स्वीकारिना फणस गर्‍याला ॥ साल संग्रहीं सांठवी ॥३७॥
त्यागूनियां पय पवित्र ॥ स्वीकारिती अल्प तक्र ॥ सोडून श्रीगुरुचा मंत्र ॥ साबरी मंत्रा संतोषें ॥३८॥
करुनि पतिव्रतेचा त्याग ॥ अपवित्र दासीस करणें भोग ॥ तेवीं तुझा हा योग ॥ भासे माझ्या मतीसी ॥३९॥
जे परिसतां पडे गुंती ॥ ऐसी विचारिली पोथी ॥ पेरिलें धत्तुरबीज शेतीं ॥ साळीचा भात मग कैंचा ॥४०॥
लावी षंढासी लग्न ॥ रडे संतती कारण ॥ मुकियासी करी भाषण ॥ उत्तर देईना तोंडीं तो ॥४१॥
बकाचिया बाळकासी ॥ मत्स्याहारीं संतोष त्यासी ॥ त्यापुढें घालितां मुक्तांसी ॥ संतोषी काय ते होती ॥४२॥
शब्द ऐसे बोलावे मुखीं ॥ जेणें ज्ञात्याचें अंतर सुखीं ॥ जें ज्ञान पाहतां विवेकीं ॥ आनंदें डोलविती मस्तक ॥४३॥
ऐका लाउनियां लक्ष ॥ मी उडवितो मायेचा पक्ष ॥ परिसोनि योगी महादक्ष ॥ पावती चितीं संतोष ॥४४॥
जितकें मायामय ज्ञान ॥ तितुकें भवबंधासि कारण ॥ कुपथ्य रोग्यासि देतां जाण ॥ मग उडाली वैद्यकी ॥४५॥
गुंतल्या सुताचे सुताडें ॥ तंतु उगवतां पडें सांकडें ॥ यालागीं मायेचें बिरडें ॥ आधीं उगविती जाणते ॥४६॥
अनुभव आणि विरक्ती ॥ माया निरसावया कारती ॥ यालागीं वेदश्रुती ॥ बोलोनि गेल्या पूर्वीच ॥४७॥
माया म्हणजे कल्पना ॥ तीच प्रपंचासी रचना ॥ जीवासी चौर्‍यासी भ्रमणा ॥ मायेस्तव होतसे ॥४८॥
स्वर्ग नरक पाप पुण्य ॥ हेंचि मायिका बंधन ॥ शुध्दस्वरुप निर्गुण ॥ मायास्पर्श त्या नाहीं ॥४९॥
माया म्हणिजे चंचळ ॥ परमात्मा तो निश्चळ ॥ हेंहि ज्ञान प्रांजळ ॥ नाहीं जाहलें तुम्हांस ॥५०॥
मायेचे ठायीं षड्विकार ॥ गुणमयी हे साचार ॥ परमेश्वर तो निर्विकार ॥ कार्य कारणां वेगळा ॥५१॥
माया म्हणिजे अतिबध्द ॥ घाली दु:खासी संबंध ॥ तिचा केला तुम्ही बोध ॥ कोणें ज्ञानें सांगपां ॥५२॥
आधीं जन अज्ञान ॥ भुललें प्रपंचविषयेंकरुन ॥ त्यासी मायिक उपदेश करुन ॥ केवीं निष्पाप होतील ॥५३॥
जे मायेलागीं भजती ॥ मुळारंभीं हिंसा करिती ॥ जीव घेऊनियां मारिती ॥ अशुध्द शिंपिती देवीला ॥५४॥
मांडोनियां अघोर कर्म ॥ साबरीमंत्रें करिती होम ॥ भद्रकाळीचें जपोनि नाम ॥ शाकिनी डाकिनी साधिती ॥५५॥
प्रसन्न जाहलिया देवता ॥ मांडी चिरोनि अर्पिती रक्ता ॥ तिच्या सामर्थे लोकां समस्तां ॥ चमत्कार दाविती ॥५६॥
अठरा वर्ण एके ठायीं ॥ एकांतीं मिळोनि रात्रिसमयीं ॥ नाना उपचार आणोनि पाहीं ॥ करिती शक्तिपूजन ॥५७॥
काढोनि अष्टकोण मंडळास ॥ स्थापिती भैरव आणि गणेश ॥ मेळवोनि मद्यमांसास ॥ तीर्थशुध्दि बोलती ॥५८॥
एके ठायीं बैसोनि खाती ॥ मद्य पिवूनि उन्मत्त होती ॥ तेथें स्त्रियांचे संगती ॥ व्यभिचारें करिती अधर्म ॥५९॥
अवघा करोनि भ्रष्टाचार ॥ मानिती एकचि ब्रह्म साचार ॥ ऐसे विषयीं लंपट नर ॥ अनाचारें वर्तती ॥६०॥
कुश्चळमार्गे ब्रह्म होती ॥ तरी योगी तपासि कां रिघती ॥ नाना साधनें कां कष्टती ॥ सोपा असोनी परमार्थ ॥६१॥
जयांसि नाहीं विरक्ती ॥ न सुटे गृहाची आसक्ती ॥ ते वैराग्यासी निंदिती ॥ हित मानिती प्रपंचीं ॥६२॥
म्हणती एकांतीं देव सांपडे ॥ सर्प उंदिर बिळांत काय थोडे ॥ स्त्री त्यागिल्या परमार्थ जोडे ॥ नपुंसक कां न उध्दरती ॥६३॥
दुग्धाहारी सिध्द होती ॥ वांसुरें मुलें कां अज्ञान असती ॥ भस्म लाविल्यानें मुक्त होती ॥ तरीं खर जाती विमानीं ॥६४॥
नागव्या अंगें घडे मुक्ती ॥ तरी पशु कां उध्दरती ॥ ऐसे जे नर वर्तती ॥ तेचि अज्ञान जाणावे ॥६५॥
ईश्वरें निर्मिलें स्त्रियांसी ॥ भोगावया मनुष्यासी ॥ ते त्यागूनि जाती वनासी ॥ वेडे पिसे होऊनि ॥६६॥
तयांचें कपाळीं अन्न कैचें ॥ त्यागिती उत्तम वस्त्र साचें ॥ सोहळे टाकूनि विषयांचे ॥ शरीर आपुलें जाळिती ॥६७॥
ऐसे ते अधम जन ॥ निंदिती विरक्तालागुन ॥ प्रपंचकर्दमीं रुझलें मन ॥ तेचि ब्रह्म भाविती ॥६८॥
जयापासीं द्रव्य फार ॥ त्यासी म्हणती पुण्यवंत नर ॥ जो वस्त्रें अन्नें जर्जर तो पापिष्ठ बोलती ॥६९॥
नेणती सत्पुरुषांचें महिमान ॥ तयांचें करिती उपहासन ॥ राजहंस होता दर्शन ॥ कपाळ उठे कागाचें ॥७०॥
विषय तितुका अघोर ॥ ऐसें जाणोनियां योगीश्वर ॥ सेविती वन निरंतर ॥ ईश्वरभक्तीकारणें ॥७१॥
स्त्रियांसंगें सुखप्राप्ती ॥ शुकाऐसें कां त्यागिती ॥ विष्ठेसमान मानूनि रती ॥ ब्रह्मस्वरुपीं मिळाले ॥७२॥
ऐका शुकाचा योगमहिमा ॥ बंदी घालोनि क्रोधकामां ॥ आरंभोनि अचाट नेमा ॥ बद्रिकाश्रमीं बैसला ॥७३॥
दुर्ग रचिला धैर्याचा ॥ खंदक केला वज्रासनाचा ॥ महाल बांधोनि वैराग्याचा ॥ त्यांत बैसला योगींद्र ॥७४॥
बुरुज बळावूनि शांतीचे ॥ त्यावरी भांडें विवेकाचें ॥ आवाज उठती सोहं गोळ्यांचे ॥ कुतर्क सैन्य थारेना ॥७५॥
ऐसी करोनी बळकटी ॥ वृत्ती फिरविली उफराटीं ॥ मारोनि विषय-चोरटीं ॥ नाहीच केलीं देशांत ॥७६॥
शुध्द भूमिका शोधून ॥ आसन केलें समसमान ॥ त्यावरी दर्भ कुश ठेवून ॥ वरी व्याघ्रांबर पसरिलें ॥७७॥
वामंचरण गुदाऔतें ॥ सव्य ठेविला तयावरुतें ॥ अपान कोंडूनियां तेथें ॥ ऊर्ध्वी करी खळबळ ॥७८॥
प्राण जातसे नासापुटीं ॥ तयां तोंडीं देऊनियां खुंटी ॥ प्राण अपान एकें नेहटी ॥ गाठी पडलीं दोहींची ॥७९॥
प्राण अपान होऊनियां एक ॥ शोषूनि शरीर केलें शुष्क ॥ रोम कर्पून त्वचा देख ॥ जडोनि गेली शरीरीं ॥।८०॥
पंचप्राण एकेठायीं ॥ मिळोन गोळा जाहले पाहीं ॥ तयांच्या झडपास्तव देहीं ॥ कुंडलिनी चेयिलीं ॥८१॥
होती नाभीकमळापासी ॥ वेढा घालोनि सर्पिणी जैसी ॥ तिणें पसरोनि मुखासी ॥ वायु अवघा ग्रासिला ॥८२॥
पदर फोडोनि चक्राचें ॥ उघडिलें द्वार ब्रह्मरंध्रीचें ॥ प्राशन करोनि सत्रावीचें ॥ तृप्त जाहली कुंडलिनी ॥८३॥
सरिता जेवीं सागरीं ॥ तेवीं सहस्त्रदळ भीतरीं ॥ प्रवेशोनियां सुंदरीं ॥ स्वरुपामाजी समरसे ॥८४॥
विरालें जीवाचें जीवपण ॥ विराली कल्पना मनपवन ॥ संसार अवघा जाहला शून्य ॥ देहीं देहभाव असेना ॥८५॥
यापरी स्वरुपस्थितींत ॥ बैसला शुक्र आनंदभरित ॥ संसार उपाधिरहित ॥ तोचि साजे योगींद्र ॥८६॥
दहासहस्त्र संवत्सर ॥ स्थिरासनीं निरहार ॥ अचळ बैसला गंभीर ॥ ध्रुव जैसा ढळेना ॥८७॥
उग्र तपाचें तेजें करुन ॥ सूर्य जाहला कंपायमान ॥ धरा आणि सहस्त्रवदन ॥ धोका वाहती मानसीं ॥८८॥
ब्रह्मा आणि हरिहर ॥ तेही करिती विचार ॥ म्हणे शुका ऐसा योगीश्वर ॥ दुजा कोणी लक्षेना ॥८९॥
मनुष्यासी हिंवाची लहरी ॥ तेवीं इंद्र कांपे शरीरीं ॥ येऊनियां आसनावरी ॥ मूर्च्छावत् पहुडला ॥९०॥
धैर्य सांवरोनि बैसे ॥ आसन हाले पाळणे जैसे ॥ भ्रमिष्ट जाहला जेवीं पिसें ॥ कांही उमज सुचेना ॥९१॥
ऐसा मनीं इंद्र भ्रमित ॥ पाहोनि पातला विरंचिसुत ॥ भेटी होतां तयाप्रत ॥ संतोष मानी सुरपती ॥९२॥
हात जोडोनि सहस्त्रनयन ॥ मुनीस करोनियां नमन ॥ म्हणे माझें शरीर कंपायमान ॥ किंनिमित्ता सांगपां ॥९३॥
मन जाहलें भयभीत ॥ स्वस्थ नाहीं क्षण एक चित्त ॥ काय विघ्न उदेलें त्वरित ॥ भविष्यार्थ कळेना ॥९४॥
तिहीं लोकीं तुझें गमन ॥ जाणसी भविष्य वर्धमान ॥ सर्वसृष्टीचें स्थान ॥ विलोकिसी मुनिवर्या ॥९५॥
स्वर्ग मृत्यु पातळीं ॥ राक्षस दैत्य ऋषि कुळीं ॥ कोण लागला माझ्या मुळीं ॥ तें तूं सांग सर्वज्ञा ॥९६॥
ऐसें वदतां अमरेंद्र ॥ परिसोनि हांसिलां मुनींद्र ॥ म्हणे भूलोकीं योगिंद्र ॥ तपें तपला शुक कीं ॥९७॥
शरीर भाविलें पाषाण ॥ मोडोनि मनाचें मनपण ॥ आकर्षूण पंचप्राण ॥ ब्रम्हीं टाळी लाविली ॥९८॥
शुकाचें तपाचें तेज ॥ म्हणोनि कंप सुटला तुज ॥ ऐसें बोलोनी मुनिराज ॥ जाता जाहला गमनार्थ ॥९९॥
शुकाची सांगोनि वार्ता ॥ मुनि गेला गगनपंथा ॥ चिंता लागली अमरनाथा ॥ कांही गोड वाटेना ॥१००॥
अप्सरां माजी शिरोमणी ॥ श्रेष्ठ रंभा लावण्यखाणी ॥ मग तीतें पाचारोनि ॥ आज्ञा करी अमरेंद्र ॥१॥
इंद्र म्हणे रंभेसी ॥ भरतें दाटलें शुकसरितेसी ॥ मर्यादा सांडोनि गगनासी ॥ लाट उसळ तपोबळें ॥२॥
तिचा धक्का स्वर्गातें ॥ लागतां आसन डळमळतें ॥ सौख्यतारूं बुडूं पाहते ॥ त्यास कैसें करावें ॥३॥
शुकाचे तप सागरगहन ॥ त्यासि अगस्ति तूं होऊन ॥ स्वमुखें प्राशन करुन ॥ क्षार करीं भ्रष्टोनी ॥४॥
शुकासि धरा करोनि ॥ तूं हिरण्याक्ष दैत्य होऊनी ॥ तप वसुधा काखें मारुनी ॥ घेऊनी येईं स्वर्गासी ॥५॥
शुक भावोनियां बळी ॥ तूं वामनरुपें जावें भूतळीं ॥ तप सामुग्री घालोनि पाताळी ॥ स्वस्थ राखें आमुतें ॥६॥
आतां ऐकें वो सुंदरी ॥ माझें हृदयीं खेदलहरी ॥ वारे ऐसी झडकरी ॥ यत्न कांही करावे ॥७॥
परिसोनि अमरेंद्राची वाणी ॥ हांसोनि बोले विश्वमोहिनी ॥ म्हणे जंबूकवधालागोनी ॥ सैन्य सज्जणें कासया ॥८॥
पिसू डसली पाठीसी ॥ म्हणे आणावें खड्गासी ॥ तेंवीं शुकाचें तपासी ॥ घोर तुम्हां लागला ॥९॥
पदरीं बांधिला परिस ॥ मग कां भोगणें दरिद्रास ॥ तेवीं मी असोनि तुम्हांस ॥ चिंता करणें कासया ॥११०॥
आमुच्या चपेटघातीं ॥ बहुत नासले सुरपती ॥ तेथें पाराशराची गती ॥ काय असे आम्हांपुढें ॥११॥
रावण विद्येचा सागर ॥ आमुच्या चपेटघातीं ॥ बहुत नासले सुरपती ॥ तेथें पाराशराची गती ॥ काय असे आम्हांपुढें ॥११॥
रावण विद्येचा सागर ॥ संतती संपदा अपार ॥ बंदीं घातले सुरवर ॥ इतरांचा पाड कायसा ॥१२॥
तो सीतेच्या आसक्तीं ॥ मृत्यु पावला लंकापती ॥ असंख्य राक्षसांच्या पंक्ती ॥ धुळीमाजी मिळाल्या ॥१३॥
शुंभ निशुंभ दैत्य ॥ शक्तिहस्तें पावले मृत्य ॥ प्रौढ प्रौढ असंख्यात ॥ स्त्रीसंगें भ्रष्टले ॥१४॥
उखेसाठीं बाणासुर ॥ शार्ड्गधर आणि शंकर ॥ युध्द केले घोरांदर ॥ कर छेदिले पांचशत ॥१५॥
विभांडकाचा श्रृंगऋषी ॥ अप्सरें मोहिलें त्यासी ॥ लग्न लावोनि राजकन्येसी ॥ गृहस्थाश्रमी तो जाहला ॥१६॥
मुख्य सदाशिव आपण ॥ त्यांचें जाहलें लिंगपतन ॥ सरस्वतीस विलोकून ॥ वीर्य द्रवलें विधीचें ॥१७॥
विष्णु वृंदेनें शापिला ॥ म्हणोनि शालग्राम जाहला ॥ कलंक लागला शशीला ॥ गुरुपत्नीसी अभिलाषितां ॥१८॥
थोर स्त्रियेचा चपेटघात ॥ तुम्हींही जाहला भगांकित ॥ इतर मानवांचें गणित ॥ कोण आणी लेखासी ॥१९॥
देव दैत्य दानव ऋषी ॥ वनितासंगें भ्रंश त्यांसी ॥ यालागीं स्त्रियांसी ॥ पुरी न पडे कोणाची ॥१२०॥
तेथें शुकाची कायसी मात ॥ बहुत पावले फजित ॥ म्हणोनियां स्वस्थ चित्त ॥ असों देणें सुरपती ॥२१॥
ऐसें बोलोन इंद्रासी ॥ रंभा पावली भूलोकासी ॥ सजवून श्रृंगारशस्त्रासी ॥ विंधावया योगींद्रा ॥२२॥
नेत्रीं घातलें अंजन ॥ तेचि तीक्ष्ण शरबाण ॥ भाळीं कुंकुमाची रेघा वोढून ॥ तेंचि धनुष्य भाविलें ॥२३॥
मुद राखडी गुंफिली वेणी ॥ तेचि माथां मुगुट लेवोनी ॥ अंगींची कांति गौरवर्णी ॥ वज्र कवच तेंचि जाण ॥२४॥
दोनी स्तनाच्या भाली ॥ छेदावया योगीं बळी ॥ नासापुटीं बेसर ल्याली ॥ जेवीं कटार तीक्ष्ण ॥२५॥
आधींच लावण्याची राशी ॥ दिव्यशस्त्रें सजली कैसी ॥ विद्युल्लता चमकें महीसी ॥ नीटनेटकीं सिंहकटी ॥२६॥
गजशुंडा ऐसिया भुजा ॥ दशनीं किरणें फांकती वोजा ॥ पट्टा घालोनियां माजा ॥ अनेक नटली भूषणें ॥२७॥
कंचुकी अंगीं तटतटीत ॥ चंद्र सूर्य भाळीं लखलखीत ॥ कोमळ वदन शोभा देत ॥ पाहतां मूर्च्छित सुर होती ॥२८॥
पीतवर्णी पयोधर ॥ हृदयीं उभयतां कठोर ॥ तांबूलें रंगले अधर ॥ दंत जैशा हिरकण्या ॥२९॥
कानीं मुक्ताफळांचे घोंस ॥ तानवडें बुगडया पंखे सुरस ॥ डुल्लत चाले जैसा हंस ॥ पायीं पैंजण वाजती ॥१३०॥
नेसली क्षीरोदक पातळ ॥ अंगीचें अवयव दिसती सकळ ॥ मुखीं बोले शब्द कल्लोळ ॥ मंजुळ गायीं सप्तस्वरीं ॥३१॥
श्रृंगारुनी दिव्यदामिनी ॥ हास्यवदन मृगलोचनी ॥ जेथें बैसला शुकमुनी ॥ तया स्थानीं पातली ॥३२॥
मनमृगातें संहारुन ॥ निष्काम त्वचा काढून ॥ निर्विकल्प आसन घालून ॥ वरता बैसला शुकमुनी ॥३३॥
शुकास अवलोकून नयनीं ॥ रंभा विचार करी मनीं ॥ म्हणे हा समाधिस्थ मुनी ॥ जागृत कैसा करावा ॥३४॥
मग मुनि भोंवती नाचत ॥ गाणें गाऊनि डोळे मोडित ॥ पालवें वारा घालित ॥ हास्य करीत गदगदां ॥३५॥
शुकाचे कर्णी पडतां ध्वनी ॥ नेत्र उघडोनि पाहे नयनीं ॥ पुढें उभी सुंदर कामिनी ॥ चकके जैसी विद्युल्लता ॥३६॥
शुक म्हणे रंभेसी ॥ तूं कोठील लावण्यराशी ॥ किंनिमित्त येथें आलीसी ॥ तें निवेदीं आम्हांसी ॥३७॥
परिसोनि शुकाच्या वचना ॥ हांसोनि बोले पद्मनयना ॥ म्हणे मी देवलोकींची अंगना ॥ सुरसभेसी विराजें ॥३८॥
तुमची पाहोनि तेजमूर्ती ॥ बिंबोनि गेली माझिया चित्तीं ॥ आतां देवोनियां सुरतरती ॥ तृप्त करीं वासना ॥३९॥
गृहस्थाश्रमाचे वोझ्यासी ॥ नलगे देणें द्रव्यासी ॥ नाहीं मागत अन्नवस्त्रांसी ॥ संकट पडो देईना ॥१४०॥
निर्भय होऊनि योगिराया ॥ आवडीनें मज करीं भार्या ॥ सर्वगुणीं मी चातुर्या ॥ रिझवीन तुमचे मानस ॥४१॥
बाहु देऊनि उशासी ॥ आलिंगुनी सर्वांगासी ॥ आनंदें पहुडों शेजेसी ॥ भाग्य भोगूं सुखावें ॥४२॥
तुम्हां ऐसा चतुर भर्ता ॥ मज सारखी चतुर कांता ॥ नेटका जोडा उभयतां ॥ सहज निर्मिला विधीनें ॥४३॥
आतां आळस न करीं चतुरा ॥ मज पर्णी सुंदर दारा ॥ सायसें नातुडें हरिहरां ॥ तुज अनायासें लाधलें ॥४४॥
परिसोनि रंभेची वाणी ॥ हांसोनि बोले शुममुनी ॥ म्हणे राजहंसा लागोनि ॥ मांस वाढीसी दुर्मते ॥४५॥
शेषाची पाठी सुकुमार ॥ त्यावरी पहुडावया तत्पर ॥ इच्छा करी दर्दुर ॥ प्राप्त कैसी होईल ॥४६॥
सदा सुशील पवित्र ब्राह्मण ॥ क्रियाशील वेदसंपन्न ॥ तो अनामिकांचें अन्न ॥ स्पर्श कैसा करील ॥४७॥
तयातुल्य तूं नारी ॥ दिससी जैसी पिशाच खेचरी ॥ मशकाचे थडकें गिरी ॥ कैसा खचेल जाणपां ॥४८॥
जो अमरांचा नायक ॥ सूर्य सोम ज्याचे सेवक ॥ तो दीपासाठी देख ॥ केवी आर्जवील काजव्या ॥४९॥
सुगंध आवडे षट्‍पदा ॥ भोगी सुगंधाच्या अमोदा ॥ तें त्यजोनि विष्ठेचे स्वादा ॥ चवी केवीं घेईल ॥५०॥
तैसा जाणें मी शुकमुनी ॥ बैसलों अच्युतपदसुखासनीं ॥ तूं अपवित्राची खाणी ॥ केवी आतळसी पवित्रा ॥५१॥
स्त्री म्हणिजे कुश्चळ ॥ विष्ठामूत्रें भरिला कोथळ ॥ नाकीं शेंबुड मुखी लाळ ॥ लोक म्हणती चंद्रवदना ॥५२॥
उरीं वाढले मांसगोळें ॥ तारुणदशेंत दाटलें ॥ वृध्दपणीं पिशवी जाहले ॥ सोपट होऊनि लोंबती ॥५३॥
जे स्थळीं करिती भोग ॥ तोचि दुर्गंधीचा माग ॥ वाहे अशुध्दाचा ओघ ॥ घाणी उठे सर्वदा ॥५४॥
स्त्री दु:खदायिनी ॥ त्यांत वेश्या अपवित्र खाणी ॥ कुंड कल्पोनि तिचे योनी ॥ विश्वाचें चाम बुचकळे ॥५५॥
पाहोनि द्रव्यवंत पुरुषासी ॥ म्हणे मी तुमची दासी ॥ नि:संग निजे त्यापासी ॥ होई बाईल त्याची ॥५६॥
जोंवरी पुरवी धना ॥ तोंवरी म्हणे तुमची अंगना ॥ भांडवल सरलिया जाणा ॥ विमुख होय तत्काळ ॥५७॥
त्या वेश्येची तूं जाती ॥ ठकवूं पातलीस मजप्रती ॥ मुंगीच्या मुतांत हस्ती ॥ कैसा बुडेल सांगपां ॥५८॥
कालिकेच्या मंत्रेंकरुन ॥ पिशाच होय वायुनंदन ॥ किंवा किरळ देखोन ॥ कंप सुटे गरुडासी ॥५९॥
सिंह सांडोनियां आपुला पुरुषार्थ ॥ करील काय जंबुकाचें दास्यत्व ॥ तेवीं जाण मी विरक्त ॥ केवीं भ्रष्ट तव संगें. ॥१६०॥
एकोनि शुकाचें वचन ॥ रंभा बोले हास्य करुन ॥ अंगना ऐसें अमूल्य रत्न ॥ केवीं निंदिसी जाणत्या ॥६१॥
ज्यासी म्हणिजे ईश्वर ॥ तेथें हो माया वसे साचार ॥ उभयतांपासोन चराचर ॥ निर्माण जाहलें जाणपां ॥६२॥
मुळीं ब्रह्मीं माया वसे ॥ म्हणोनि विश्वाकार भासे ॥ माया अनादि सिध्द ऐसें ॥ वेद बोले सिध्दान्त ॥६३॥
मायेपासोनि हरिहर ॥ दैत्य राक्षस सुरनर ॥ सिध्द ऋषि विद्याधर ॥ माये पोटीं जन्मले ॥६४॥
तेचि माया स्त्रीवेष ॥ उपजोनि प्रतिपाळी देहास ॥ सर्व सुखाचा विलास ॥ स्त्रीवेगळा दिसेना ॥६५॥
स्त्रीपोटीं नर जन्मती ॥ स्त्रियाचि गा प्रतिपाळिती ॥ शेखीं स्त्रियेसी रमती ॥ नष्ट गती नरांची ॥६६॥
स्त्रियेचें पोटीं जन्मून ॥ तेचि निंदिती तियेलागून ॥ यापरी नराचे अधम गुण ॥ काय वाचें वदावें ॥६७॥
बरें विचारा मुनि चित्तीं ॥ स्त्रीवांचोनि नाहीं गती ॥ सर्व सुखाची विश्रांती ॥ वनितेपासी जाणपां ॥६८॥
स्त्रीवांचून जें जिण ॥ तेंचि दिसे दैन्यवाण ॥ लोक म्हणती दरिद्र दीन ॥ भणंगन्यायें हिंडतो ॥१७०॥
जरी पृथ्वीचें राज्य आलें ॥ अथवा सोन्याचें धाम बांधिलें ॥ स्त्रीवांचूनि न दिसे भले ॥ वांझ वृक्षासारिखें ॥७१॥
अंगना ऐसें अमूल्य रत्न ॥ ईश्वरें निर्मिलें नरालागून ॥ पाहोनि स्त्रियांचें हास्यवदन ॥ आल्हाद वाटे पुरुषांसी ॥७२॥
आतां ऐकें मुनिराजा ॥ मातें करीं आपुली भाजा ॥ मग सर्व सुखाच्या मौजा ॥ प्राप्त होतील तुम्हांसी ॥७३॥
ऐसी बोलिली लावण्यललना ॥ तीसी उत्तर करी योगिराणा ॥ म्हणे तुज ऐसी अंगना ॥ नाहीं कोठें देखिली ॥७४॥
पाषाणासीं कोंभ सरळ ॥ फुटों शकती एक वेळ ॥ परी शुकाचा काम अचळ ॥ चळों न शके कल्पांतीं ॥७५॥
ठेंच लागोनि वायु पडेल ॥ हें सांग कैसें घडेल ॥ किंव आकाश पळों लागेल ॥ अग्निभीणें दश दिशा ॥७६॥
चंद्रासि येईल उष्णता ॥ भानु पावेल शीतळता ॥ परी माझिये हृदयीं कामलतां ॥ कदा कल्पांतीं उगवेना ॥७७॥
ऐकोनि शुकाचा नेम अढळ ॥ रंभा म्हणे कार्य नासेल ॥ या मुनींचें मन चंचळ ॥ कांहीं केल्या होईना ॥७८॥
पाहोनि अंगनेचें सौंदर्य ॥ गळालें ब्रह्मादिकांचें वीर्य ॥ परी अगाध याचें धैर्य ॥ सिंधुपरीस सखोल ॥७९॥
मग म्हणे शुकस्वामी ॥ शोधुनि पहा अंतर्यामीं ॥ ब्रह्मांडव्योमींच्या धामीं ॥ अमूल्य वस्तु अंगना ॥१८०॥
त्यांत मानवलोकींची ॥ मी तव नोहे साची ॥ दिव्य काया सुगंधाची ॥ असे श्रेष्ठ मुनिवर्या ॥८१॥
मातें भोगावयाची रुची ॥ इच्छा करी विरिंची ॥ ते मी जाया फुकाची ॥ होय तुमची योगिया ॥८२॥
शुक म्हणे रंभेसी ॥ तुझ्या पोटीं सुगंधराशी ॥ ऐसें कळतें मम मानसीं ॥ जन्म घेतों तव जठरीं ॥८३॥
जन्म पावलों ज्या योनीं ॥ भोग भोगिजे तेचि स्थानीं ॥ तैसा नव्हे मी मात्रागमनी ॥ सत्य संकल्प जाण पां ॥८४॥
परिसोनि शुकाची अचाट वाणी ॥ रंभा धांवोनि लागे चरणी ॥ म्हणे मूर्ख मी पापिणी ॥ अझून अंत पाहातसें ॥८५॥
मग वंदोनि पादपद्मा ॥ म्हणे अन्याय करावा क्षमा ॥ ऐसें बोलोनि लावण्यपद्मा ॥ जाती जाहली स्वर्गांसी ॥८६॥
सुरमंडळी सभेंत ॥ इंद्रापुढें डोकें आपटीत ॥ माझा अवघा पुरुषार्थ ॥ व्यर्थ केला मुनींनें ॥८७॥
सुरांसहित सहस्त्रनयन ॥ ब्रह्मादिक आदी करुन ॥ अवघे शुकासमीप येऊन ॥ पुष्पांजळीं पूजिला ॥८८॥
शुकाची करुनियां स्तुति ॥ देव गेले स्वर्गाप्रती ॥ हेचि कथा यथानिगुतीं ॥ ऋषीनें कथियेली श्रोतयां ॥८९॥
केलें मायेचें निरसन ॥ सांगीतलें शुकाचें कथन ॥ यालागीं विरक्तिवंत धन्य ॥ रत जाहले जे स्वरुपीं ॥१९०॥
जंववरी मायेचा जंजाळ ॥ तंव न जोडे मोक्षफळ ॥ म्हणोनि मायेचें मूळ ॥ उपडोनि सांडिती योगींद्र ॥९१॥
माया विकल्पाची राशी ॥ मायेमुळें बंधन जीवासी ॥ माया भोगवी चौर्‍यासी ॥ मोहपाशीं गोवोनी ॥९२॥
मायेमुळें दु:ख दारुण ॥ रडती गळां मिठी मारुन ॥ मायेकरितां भोग गहन ॥ घडे जाण पुरुषासी ॥९३॥
यापरी ऋषीन ॥ निरसिलें मायेलागून ॥ आतां विराट्‍स्वरुप विस्तीर्ण ॥ पुढीले अध्यायीं परिसावें ॥९४॥
कवितारहस्य अमृतफळ ॥ गुरुकृपेनें पिकलें रसाळ ॥ तयाची चवी श्रोते सकळ ॥ अनुभव स्वादें सेविती ॥९५॥
आनंदाचे ढेंकर देऊन ॥ कल्याण इच्छिती वक्तया लागून ॥ तेणें सुफळ जन्म जाण ॥ जननी जठरा येऊनी ॥९६॥
जन्मलों यातीं अविंघ ॥ परी गुरुकृपेचा अगाध बोध ॥ म्हणोनि कवितेचा छंद ॥ चाले प्रांजळ विस्तारें ॥९७॥
आतां तुम्ही श्रोतेजन ॥ मज दीनावर दया करुन ॥ अजीं करा देवालागून ॥ कृपावंत होईजे ॥९८॥
तुमची भीड देवासी ॥ विनंति करा माझेविशीं ॥ तेणें करुनि हृषीकेशी ॥ अंगिकारी दीनासी ॥९९॥
मातें हातीं धरोन ॥ निरवा देवा लागून ॥ इतुकेन कृतार्थ होईन ॥ जाणेन परोपकार तुमचा ॥२००॥
आतां समस्तांसी दंडवत ॥ कृपा करा मज बहुत ॥ शहामुनीचा मनोरथ ॥ पूर्ण होऊ हरिपायीं ॥२०१॥
इति श्रीसिध्दांतबोधग्रंथे अध्यात्मनिरुपणतत्वसारनिर्णये द्वादशोध्याय: अध्याय ॥१२॥ ओंव्या ॥२०१॥ श्रीशुभं भवतु ॥

N/A

References : N/A
Last Updated : September 23, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP