मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|सिध्दान्तबोध|
अध्याय २७ वा

श्रीसिध्दान्तबोध - अध्याय २७ वा

‘श्रीसिध्दान्तबोध’ हा संतकवि श्रीशहामुनि यांचा ग्रंथ म्हणजे मराठी साहित्याच्या खाणींतील एक तेजस्वी हिरा आहे.


श्रीगणाधिपतये नम: ॥ श्रीगुरुभ्योनम: ॥
अहो जी स्वामी दयार्णवा ॥ करीं मज कृपेचा हेलावा ॥ होय विश्रांती या जीवा ॥ पुन्हा भावना नाताळो ॥१॥
करितां तीर्थ व्रत तप दान ॥ न सुटे जीवाचें बंधन ॥ तुझी कृपा जाहलिया पूर्ण ॥ होय पावन जीवदशा ॥२॥
ब्रह्मादिकां गेलिया शरण ॥ करितां हरिहरांचें भजन ॥ न होय जीवांचें मोचन ॥ परमपुरुषा तुजविणें ॥३॥
तूं तंव करुणेची राशी ॥ दया माया तुजपाशीं ॥ निश्चय भावोनि मानसीं ॥ आलों शरण तव पायां ॥४॥
ऐसी विनंति पुरुषोत्तमा ॥ करोनि प्रमाण पादपद्मा ॥ मग आरंभिला प्रसंगमहिमा ॥ श्रोते परिसा सादर ॥५॥
जो आकार डेर्‍याचा स्तंभ ॥ ब्रह्मकर्दळीचा मध्य कोंभ ॥ मुख्य मायेसी विक्षोभ ॥ सांग गर्भ मुळींचा ॥६॥
गोसावी म्हणे द्विजवर्या ॥ परिसिली हंसअवतारचर्या ॥ सनकादिक आचार्या ॥ निरुपिली अनुपम ॥७॥
जें कां ब्रह्माविद्याशास्त्र ॥ कथिलें रहस्य बीजमंत्र ॥ परिसोनि सनकादिक पवित्र ॥ पावन जाहले ते समयीं ॥८॥
धरुनि हंसनामाची कांस ॥ गुरुत्व करिती सनकादिकांस ॥ ते जीव गेले मोक्षपदास ॥ परमपुरुषासंनिध ॥९॥
ज्याचा कुळस्वामी देव हंस ॥ आचार्य मानिती सनकादिकांस ॥ नित्य वाचिती हंसगीतेस ॥ ते जीव होती पावन ॥१०॥
जे हंसगीतेनें वर्तलें ॥ कृतयुगीं मुक्त जाहले ॥ उरले त्रेतीं लोटले ॥ गुंतले गर्भवासीं ॥११॥
कृतयुग धर्म संपला ॥ त्रेतायुगाचा प्रारंभ जाहला ॥ तेथींच्या अभिप्रायाला ॥ तूतें सांगेन ब्राह्मणा ॥१२॥
त्रेतायुगीं त्रय अवतार ॥ तिहीं देवांचे धुरंधर ॥ वामन परशुराम दशरथकुमर ॥ श्रीराम म्हणती जयातें ॥१३॥
प्रथम अवतार वामन ॥ सकारण सुरेंद्राकारण ॥ कोणता पुरुष जाहला जाण ॥ तूतें सांगों मूळसूत्र ॥१४॥
बळीनें याग नर्मदेच्या तटीं ॥ आरंभिला इंद्रपदासाठीं ॥ मिळोनि असुरांच्या कोटी ॥ स्वर्गपदा इच्छिती ॥१५॥
भय पावोन सहस्त्रनयन ॥ महाविष्णूस गेला शरण ॥ म्हणें असुरीं उत्पात दारुण ॥ धरापृष्ठीं मांडिला ॥१६॥
महाविष्णु प्रार्थी भैरवांसी ॥ भैरवीं विनविलें विश्वरुपासी ॥ साह्य व्हावें या कार्यासी ॥ सुरेंद्रपद रक्षावया ॥१७॥
ब्रह्मांड जयाचे कुशीस ॥ जो स्वयंभ विराटपुरुष ॥ परम विष्णु म्हणती जयास ॥ तोचि वामन अवतरला ॥१८॥
होऊनि अदितीचा बाळ ॥ मुखीं विद्या वसती सकळ ॥ बळी लक्षितां चरणकमळ ॥ मनोभृंग वेधिला ॥१९॥
नमस्कारोनि द्विजकुमरा ॥ पुसे काय मागसी चतुरा ॥ तुझे मनोरथ सुकुमारा ॥ पुरवीन इच्छेसारिखे ॥२०॥
वामन म्हणे असुरराजा ॥ लाविली दातृत्वाची ध्वजा ॥ मागावया हेतु माझा ॥ स्वल्प हृदयीं उदेला ॥२१॥
माझिया पदीं त्रिपाद धरा ॥ परम हरुषें देई उदारा ॥ याहून अर्थ दूसरा ॥ इच्छा कांहीं असेना ॥२२॥
बळी म्हणेगा ब्राह्मणा ॥ त्रैलोक्यांतील वस्तु नाना ॥ ममगृहीं भरल्या जाणा ॥ त्यांतील अपूर्व माग तूं ॥२३॥
उरगमस्तकींचे दिव्यमणी ॥ तेजें प्रकाशती जेवीं तरणी ॥ असती अपूर्व ममसदनीं ॥ संग्रहिले जाणपां ॥२४॥
पाहतां पृथ्वीचें मोल थोडें ॥ ऐसें लाल हिरे रत्नें चोखडे ॥ माझिया घरीं जैसे खडे ॥ आहेत असंख्य कोण गणी ॥२५॥
विशाळ वपु दंत भारी ॥ रगडोनि पिष्ट करिती गिरी ॥ ऐसे मातंग कोटी वरी ॥ मम द्वारीं झूलती ॥२६॥
श्वेत पीत श्यामवर्णी ॥ अबलक कुर्माईंत खुरासनी ॥ उदकीं चालत चपळगुणीं ॥ उड्डाण घेती आकाशीं ॥२७॥
ऐसिया अश्वांचिया थाटी ॥ ममगृहीं साठकोटी ॥ मग अजा धेनूंच्या गोष्टी ॥ कोण हाटीं वदेल ॥२८॥
द्रव्य भरलें समुद्रतुल्य ॥ वस्त्रपटांचें पडले शैल ॥ रत्नें माणिकें अमूल्य ॥ मुक्ताफळां कोण पुसे ॥२९॥
म्यां वर्णिली एक गुणें ॥ याहून संपदा सहस्त्रगुणें ॥ भरली असे ते द्विजनंदनें ॥ आवडे तितुकी मागावी ॥३०॥
वामन म्हणे बळराया ॥ सुधासिंधू भेटे पक्षिया ॥ चंचूनें तृप्त करी काया ॥ हरी तृषा सर्पिणी ॥३१॥
दोन जिव्हा सर्पालागुन ॥ इतर प्राणिया एकच जाण ॥ जो द्विधा करील वचन ॥ त्याचा जन्म सर्पाचा ॥३२॥
तूं संपत्तीचा क्षीराब्धी ॥ माझी तृषा इतुकीच बुध्दी ॥ त्रिपाद धरा वोपीं आधी ॥ अधिक इच्छा मज नाहीं ॥३३॥
बळीनें संकल्प सोडितां ॥ कवि खुणावी तया परता ॥ हा नव्हे द्विज मागता ॥ श्रेष्ठ विष्णु जाण पां ॥३४॥
बळि म्हणे याहून लाभ ॥ कोणता आहे सांगा सुलभ ॥ प्रत्यक्ष लक्ष्मीवल्लभ ॥ याचक होय आमुचा ॥३५॥
तपें यज्ञें तोषविजे ज्यातें ॥ तो भिक्षा मागे बळीतें ॥ याहोनि दुज्या पुरुषार्थातें ॥ संग्रहावें गुरु स्वामी ॥३६॥
बळीनें उदक सुंदता करीं ॥ उशना प्रवेशे झारीमाझारी ॥ उदक निरोधिले शुक्रीं ॥ तोयबिंदु पडेना ॥३७॥
दर्भशिखा घेऊनि वामन ॥ झारींत घालोनि फोडिला नयन ॥ असुरगुरु निघे संकोचून ॥ मुक्त तोय पडे हस्तकीं ॥३८॥
उदक पडतां करकमळीं ॥ वामन वाढे गगनमंडळीं ॥ एक्यापदें पृथ्वी सकळीं ॥ दुजियानें गोंविलें ब्रह्मांड ॥३९॥
वामन पुसे हो बळीसी ॥ तृतीय पाद कोठूण देसी ॥ आपुली संपदा वांनिसी ॥ लाहो घेसी मुखानें ॥४०॥
बळि म्हणे त्रिविक्रमा ॥ ब्रह्मांड तैसा पिंड उत्तमा ॥ यांतील तृतीय पाद तुम्हां ॥ औट हात देतसें ॥४१॥
मग जाऊनि पहुडला समुद्रीं ॥ वामनें पाद ठेविला पृष्ठीवरी ॥ बळी नेला पाताळविवरीं ॥ इंद्राचें अरिष्ट वारिलें ॥४२॥
वामन चरित्र बळिआख्यान ॥ प्रगट असें विश्वालागून ॥ यालागीं स्वल्प कथन ॥ संज्ञा मात्र जाणविली ॥४३॥
ब्राह्मण म्हणे दयार्णवा ॥ कृपेनें वारिसी भवार्णवा ॥ वामन अवतार जाहला ठावा ॥ विराट पुरुषें घेतला ॥४४॥
कोण जीवा उपदेशून ॥ केलें नाहीं अपरोक्ष ज्ञान ॥ हा अनुभव मजलागून ॥ निश्चयात्मक बिंबला ॥४५॥
जरी तो परमेश्वर असता ॥ जीवाची करुणा करिना ॥ या लागीं तो होय देवता ॥ कार्यकर्ता देवतांचें ॥४६॥
उंच देवता नीचाकारण ॥ अवतरोनि धरी अभिमान ॥ जीवाचें दु:ख पाहून ॥ करुणा नये देवासी ॥४७॥
यालागीं वामन अवतार ॥ देवतेचा होय निर्धार ॥ तो नव्हे परमेश्वर ॥ मोक्षदानी जीवांसी ॥४८॥
तुमचे कृपेचा उजेड ॥ निरखितां न दिसे तम उघड ॥ आतां सांग स्वामी निवाड ॥ परशुराम कवणाचा ॥४९॥
सर्वोत्तम म्हणे द्विजा भला ॥ अपूर्व पुससी प्रश्नाला ॥ तुझ्या प्रश्नें संतोष जाहला ॥ मानसीं आमुच्या ॥५०॥
वामनें बळी घातला पाताळीं ॥ पराभविली दैत्यमंडळीं ॥ असुरसंपदा बुडविली ॥ दैत्य कोठें दिसेना ॥५१॥
मग क्षत्रिय माजले प्रबळ ॥ घालिती अधर्माचा गोंधळ ॥ स्वधर्म मर्यादेचें मूळ ॥ अहंशस्त्रें छेदिलें ॥५२॥
नाहीं देवांची मर्यादा ॥ पुराणश्रवण न घडे कदा ॥ परपीडा हाचि धंदा ॥ अष्टौ प्रहर लागला ॥५३॥
गोब्राह्मणां करिती छळ ॥ ऋषींस मानिती तृणतुल्य ॥ प्रजांसि पीडिती राजे सकळ ॥ त्रास देती जीवांसी ॥५४॥
गाईचा वेष धरा धरोनी ॥ गेली क्षीराब्धिपदालागूनी ॥ महाविष्णूसी प्रार्थी वचनीं ॥ करुणा भाकी अपार ॥५५॥
महाविष्णूस वसुधा बोले ॥ क्षत्रिय स्वधर्मपत्नीवर रुसले ॥ अधर्म वेश्येसी रतले ॥ तेणें कलह माजला ॥५६॥
लोपली नीती-रवीची दशा ॥ पातली अनीतीची निशा ॥ मत्सर तस्कर घालोनि फांसा ॥ शांति शुध्दा नागविली ॥५७॥
क्षत्रियांच्या दुराग्रहापुढें ॥ सिध्द ऋषि जाहले वेडे ॥ परमार्थ पाताळविवरीं दडे ॥ उघड दये वागवेना ॥५८॥
परिसोन वसुधेची कींव ॥ महाविष्णुस भरली हांव ॥ मग पाचारिला सदाशिव ॥ आज्ञापि क्षत्रिय मारावे ॥५९॥
महाविष्णु म्हणे रुद्रासी ॥ क्षत्रीय मदांध जाहले महीसी ॥ बस्त माजले अजापाळासी ॥ तैसी गति तयांची ॥६०॥
तयांचा करोनि संहार ॥ स्थापावा स्वधर्म सादर ॥ आज्ञापितां लक्ष्मीवर ॥ महेश महीवरी पातला ॥६१॥
रेणुकासतीच्या उदरीं ॥ गर्भ संभवला त्रिपुरारी ॥ जन्मतां तेजाची उजरी ॥ दिसे जैसा मार्तंड ॥६२॥
युध्दीं निवटोनि सहस्त्रार्जुना ॥ संहारोनि सकळ सेना ॥ एकविंशति वेळा जाणा ॥ पृथ्वी केली नि:क्षत्रिय ॥६३॥
होऊनि जमदग्निचा कुमर ॥ धरा ओपिली द्विजां समग्र ॥ दानशूर उदार ॥ नांव ठेविलें भार्गव ॥६४॥
समस्त सांगा चरित्रकथन ॥ पुराणीं प्रगट ऐकती जन ॥ यालागीं विस्तारोन ॥ नाहीं लिहिलें या ग्रंथीं ॥६५॥
रुद्र परशुराम होऊन ॥ केलें क्षत्रियांचें निसंतान ॥ परी एकाही जीवा उपदेशून ॥ नाहीं गेला निजगती ॥६६॥
यालागीं देवतेचा विग्रहो ॥ परशुराम अवतार सदाशिवो ॥ मुख्य जगदीश पहाहो ॥ तो न होय द्विजोत्तमा ॥६७॥
म्हणोनि परशुराम अवतार ॥ सत्य होय उमावर ॥ परमात्मा निर्विकार ॥ तो न होय सर्वथा ॥६८॥
ब्राह्मण म्हणे महाराजा ॥ निवेदिले परशुरामगुजा ॥ उमावल्लभ होय काजा ॥ क्षत्रियसंहार पैं केला ॥६९॥
थोर रामाची प्रौढी ॥ मातें सांगा पैं उघडी ॥ जे उभविली गुढी ॥ वाल्मीकें रामायणीं ॥७०॥
विश्वामध्यें रामनाम ॥ उच्चारितां मुखीं सुगम ॥ मुख्य सदाशिवाचें प्रेम ॥ अहर्निशी निदिध्यास ॥७१॥
राम परब्रह्म अवतार ॥ ऐसा विश्वामध्यें गजर ॥ तुम्हीं सांगा साचार ॥ त्याचा निर्धार आमुतें ॥७२॥
समुद्रीं तारिले पाषाण ॥ अहल्या केली पावन ॥ चिरंजीव जाहला बिभीषण ॥ दशग्रीवा विदारिलें ॥७३॥
येवढी श्रीरामाची थोरी ॥ मातें सांगा त्याची परी ॥ ऐसा बोलोनि चरणांवरी ॥ मस्तक ठेवी ब्राह्मण ॥७४॥
द्विजप्रश्नाची खोली ॥ ती उघडावयाची किल्ली ॥ एक सर्वोत्तमाजवळी ॥ दुजा न दिसे ब्रह्मांडीं ॥७५॥
ऐकिलीं शास्त्रें पुराणें ॥ नाहीं कथिले अवतार भिन्न ॥ परी हा जगदीश उगवोन ॥ दावी सूत्र मुळींचें ॥७६॥
परम हर्षे परमेश्वर ॥ म्हणे द्विजा तूं परम चतुर ॥ पुससी श्रीराम अवतार ॥ कोण प्रकार तुज सांगों ॥७७॥
हिरण्यकशिपु नृसिंहें वधिला ॥ परी मोक्षासि नाहीं गेला ॥ त्रेतायुगीं रावण जाहला ॥ पुलस्त्यवंशामाझारी ॥७८॥
हिरण्याक्ष जाहला कुंभकर्ण ॥ हिरण्यकशिपु जाहला रावण ॥ हे जय विजय दोघेजण ॥ बंधुत्वें जन्मले ॥७९॥
ब्राह्मण म्हणे कृपादानीं ॥ एक पुसणें स्वामीलागूनी ॥ हिरण्याक्ष हिरण्यकशिपु दोनी ॥ कुंभकर्ण रावण ॥८०॥
त्यांत तिसरा बिभीषण ॥ तो कोण सांगा निवडोन ॥ देव म्हणे हे विचक्षण ॥ ऐसा श्रोता नसे कीं ॥८१॥
ओळखें द्विजा हेचि खूण ॥ प्रल्हाद तोची बिभीषण ॥ जय विजय न्यावया त्वरें करुन ॥ विश्वंभर जन्मला ॥८२॥
जन्मला राक्षसवंशीं ॥ पूर्वीचें ज्ञान असे त्यासी ॥ म्हणोनि सद्भावें रामासी ॥ शरण गेला आवडीं ॥८३॥
पूर्वी कुबेराची लंका ॥ रावणें बळें हरिली देखा ॥ तपें तोषविलें त्र्यंबका ॥ त्याच्या वरें माजला ॥८४॥
समूळ वदों कथन ॥ तरी घरोघरीं रामायण ॥ या लागीं विस्तार न करितां जाण ॥ स्वल्प तूतें सांगतों ॥८५॥
रावणपुरुषार्थ सांगों वदनीं ॥ देव ज्याचे बंदिखाणीं ॥ पाताळींचा सहस्त्रफणी ॥ करभार देत प्रति वर्षी ॥८६॥
समुद्रवलयांकित धरा ॥ एक आज्ञांकित फिरे डांगोरा ॥ आज्ञा भंगी ऐसा दुसरा ॥ त्रैलोक्यींही असेना ॥८७॥
मध्यान्हीं येतां दिनमणी ॥ आज्ञा न घेतां नित्यानी ॥ पुढें जावया अस्तमानीं ॥ सामर्थ्य त्यासी असेना ॥८८॥
चतुरानन येऊनि पुढें ॥ नित्य वाची पातडें ॥ इंद्रादिक बापुडें ॥ भणंगप्राय तिष्ठति ॥८९॥
शिवविरहित सकळ देव ॥ सेवा करिती नित्य आर्जव ॥ सिध्द ऋषि महानुभाव ॥ त्यांचीं सामर्थ्येअ लोपलीं ॥९०॥
गण गंधर्वांच्या नारी ॥ गायन करिती सप्तस्वरीं ॥ चंद्र हातें चामरें वारी ॥ मार्तंड दावी दर्पण ॥९१॥
मंदोदरी पट्टराणी ॥ तिचे शेवेसि देवांच्या कामिनी ॥ कर्णभूषणांची लेणीं ॥ पाहोनि लाजे रविशशी ॥९२॥
हिरे कोंदले खणोखणीं ॥ जाणों अक्षयी बैसले तरणी ॥ तैल दीपिकें लागोनी ॥ स्वप्नीं कोणी पुसेना ॥९३॥
वाजतां वाजत्र्यांचा ध्वनी ॥ नाद उठे कैलासभुवनीं ॥ गर्जना पडतां श्रवणीं ॥ शिवही माथा डोलवी ॥९४॥
गिरिसमान विशाळ भेरी ॥ राक्षस वाजविती उभयकरीं ॥ नाद पसरे ब्रह्मांडाभीतरी ॥ पाताळीं दचके फणींद्र ॥९५॥
संपदा वर्णूं सविस्तर ॥ होईल ग्रंथासी पसर ॥ यालागी आवरिला दोर ॥ स्फुर्तितुरंगकाव्याचा ॥९६॥
सागरातुल्य भरिली संपदा ॥ बुडाला स्वधर्म धंदा ॥ मोडिली वेदांची मर्यादा ॥ ऐश्वर्यमदें मातला ॥९७॥
त्रिलोकींचा अहंकार ॥ होऊनि एकत्र केलें बिढार ॥ काम क्रोध मद मत्सर ॥ देहामाजी कोंदलें ॥९८॥
चित्ती भरली वासना ॥ मोंहें भ्रंशिली बुध्दि जाणा ॥ मानी ब्रह्मांड ठेंगणा ॥ इतुकी चढली अहंता ॥९९॥
जाहल्या अपराधांच्या कोटी ॥ सांठवे ना हरीच्या पोटीं ॥ तेही जाऊनि क्षीराब्धितटीं ॥ महाविष्णु प्रार्थिला ॥१००॥
ब्रह्मादिक जोडून कर ॥ विनविते जाहले लक्ष्मीवर ॥ म्हणती पुलस्त्यवंशी क्रूर ॥ रावण राक्षस जन्मला ॥१॥
त्याच्या कर्माची राहाटी ॥ बुडवूं पाहे सकळ सृष्टी ॥ सुरांच्या जिंकोनि थाटी ॥ कारागृहीं कोंडिल्या ॥२॥
जो अमरांचा नायक ॥ त्याचे गृहींचा सेवक ॥ आम्हां मानी जैसा रंक ॥ ऋषिजन ते फळअहार ॥३॥
महाविष्णु म्हणे बहुत बरवें ॥ तुम्ही स्वस्थानीं जावें ॥ तो परिहारातें पावे ॥ ऐसा उपाव मी जाणें ॥४॥
मग विष्णु करी ध्यान ॥ लक्षी भैरवालागूनी ॥ आठांतील विष्णु जो आपण ॥ येता जाहला क्षीराब्धीं ॥५॥
भैरव म्हणे विष्णुसी ॥ कोण्या अर्थी ध्यान करिसी ॥ तें निवेदीं त्वरेसीं ॥ होईल सिध्दि तत्काळ ॥६॥
कानीं पडतां अभयवचन ॥ महाविष्णु करी नमन ॥ म्हणे भूलोकी रावण ॥ ऐश्वर्ये न गणी आम्हांसी ॥७॥
समस्त सुरांची मंडळी ॥ त्याचे पडिली बंदिशाळी ॥ ते सोडवी ऐसा बळी ॥ तुजविण दुसरा दिसेना ॥८॥
थोर आपुला पुरुषार्थ ॥ करावे विबुधासी मुक्त ॥ असंख्य राक्षस नि:पात ॥ होती तुमची हस्तकी ॥९॥
वधोनि बिभीषणअग्रजा ॥ सुखें नांदवींजे प्रजा ॥ ऐसी मृत्युलोकीं ध्वजा ॥ लावी आपुल्या नांवाची ॥११०॥
महाविष्णूचा होता गौरव ॥ हावें भरला विष्ण भैरव ॥ मानवदशेचें वैभव ॥ अंगिकारिता स्वयें जाहला ॥११॥
सूर्यवंशी राजा दशरथ ॥ कौसल्या पत्नी बुध्दिमंत ॥ तिच्या पवित्र जठरांत ॥ गर्भ संभवला विष्णूचा ॥१२॥
चैत्र शुध्द नवमीसी ॥ मध्यान्हीं पातल्या रवीसी ॥ प्रसूतिकाळीं कौसल्येसी ॥ रायें उत्साह मांडिला ॥१३॥
कैकयीच्या पोटीं भरत शत्रुघ्न ॥ सुमित्रेचा लक्ष्मण ॥ शेषसंगी होऊन ॥ देवकार्यासी सिध्द जाहला ॥१४॥
वसिष्ठे पाहिलें जातकर्म ॥ नाम ठेविले श्रीराम ॥ हा होईल सार्वभौम ॥ निशाचरा अंतका ॥१५॥
अकरा रुद्रांमाझारी ॥ ईशान रुद्र जो भारी ॥ त्याते महाविष्णु आज्ञा करी ॥ रामसाह्या लागोनी ॥१६॥
तो हनुमंत अंजनीकुमर ॥ ईशानरुद्राचा अवतार ॥ धीर गंभीर महावीर ॥ कवळूं पाहे ब्रह्मांड ॥१७॥
विष्णूचा परिवार होता ॥ महापतापी देवता ॥ ते वानर जाहले तत्वतां ॥ राक्षसवधाकारणें ॥१८॥
पहा पुराणांचें मत ॥ तेहतीस कोटी देव समस्त ॥ तेचि वानररुप धरित ॥ राक्षस मर्दावयासी ॥१९॥
समस्त देव बंदीखानीं ॥ ऐसें वदलें पुराणीं ॥ मग तेचि वानर होऊनी ॥ राक्षस कैसे मारिले ॥१२०॥
स्वर्गीचे देव धरोनी ॥ रावणें घातले बंदीखानीं ॥ मग उंच पदींचें वानर होऊनीं ॥ क्षीराब्धींचे बलिष्ठ ॥२१॥
त्या देवतांची खोली ॥ पुराणांसी नाहीं कळली ॥ यास्तव यांची हरिख बोली ॥ सत्यमिथ्यामिश्रित ॥२२॥
आतां ऐक द्विजा स्वस्थ ॥ दाशरथी चौघे सुत ॥ राम लक्ष्मण तृतीय भरत ॥ चौथा शत्रुघ्न प्रसिध्द ॥२३॥
अयोध्येमध्यें दशरथ ॥ अवलोकूनि चौघे सुत ॥ हृदयीं जाहला संतोषभरित ॥ धन्य म्हणे मी एक ॥२४॥
सन्निध बैसले चौघे कुमर ॥ सिंहासनारुढ नृपवर ॥ तोचि समयीं ऋषीवर ॥ कौशिकमुनि पातला ॥२५॥
रायें नमस्कारूनि ऋषीसी ॥ चौघे कुमर लावी चरणांसी ॥ सन्मानूनि बैसवी तपस्व्यासी ॥ पुष्पांजळीं पूजिला ॥२६॥
आणोनि द्रव्याच्या राशी ॥ रायें वोपिल्या ऋषीसी ॥ येरु म्हणे या अर्थासी ॥ काज मातें असेना ॥२७॥
माझे आश्रमीं मांडिला यज्ञ ॥ राक्षस येवोनि करिती विघ्न ॥ त्यांसी रक्षावया कारण ॥ रामलक्ष्मण देइंजे ॥२८॥
राजा म्हणे मुनिवर्या ॥ सर्व अर्पीन तुझिया पायां ॥ रामविरहित स्वामिया ॥ आवडे तें मागिजे ॥२९॥
सहस्त्र ग्राम सहस्त्र रथ ॥ सहस्त्र कुंजर मदोन्मत्त ॥ अश्व धेनु असंख्यात ॥ नेईं इच्छेसारिख्या ॥१३०॥
ऋषि म्हणे राया परिस ॥ कणाविण काय करावें भूस ॥ ऊंस ठेवूनि देती बांडयास ॥ गोडी कैंची चोखितां ॥३१॥
मी विश्वामित्र महाहटी ॥ ब्रह्मयावरी केली नूतन सृष्टी ॥ तूं भूचर सांगसी गोष्टी ॥ हटी आम्ही तपस्वी ॥३२॥
म्यां हटविग्रह करुन जाण ॥ क्षत्रिय असतां जाहलों ब्राह्मण ॥ वसिष्ठाचे शतनंदन ॥ कृतांतसदनीं वसविले ॥३३॥
सार्वभौम हरिश्चंद्राला ॥ माझा कोपग्रह लागला ॥ राखितां सुकृत सत्याला ॥ मुक्त केला पुनरपि ॥३४॥
तो मी जाण विश्वामित्र ॥ मागों पातलों तुझा पुत्र ॥ न देतां शापबाणास्त्र ॥ प्रळयेंची वर्षेन ॥३५॥
रायें धाक घेतला पोटीं ॥ राम लक्ष्मण जगजेठी ॥ ऋषीच्या देऊन करसंपुटीं ॥ निरवीं विनीत होऊनियां ॥३६॥
माझे सुकुमार बाळक ॥ तुम्ही जाणावी तहानभूक ॥ ऋषि म्हणे हा विवेक ॥ मातें नलगे सांगणें ॥३७॥
आज्ञा मागोनि राजकुमर ॥ घेऊनि उभयतां सहोदर ॥ ऋषि गेला मार्गी सत्वर ॥ भयानक काननीं ॥३८॥
त्या वनीं वसे ताटिका ॥ सहस्त्रगजांची कंठीं माळिका ॥ विशाळ वपूं भयानका ॥ श्रीरामें वधिली क्षणार्धे ॥३९॥
सुबाहु मारीच बाणे छेदिला ॥ ऋषियज्ञ सिध्दी नेला ॥ पुढें उध्दरिली अहल्या ॥ पाषणात्वापासोनी ॥१४०॥
जानकी पर्णूनि भार्गव जिंकिला ॥ पितृआज्ञें राज्य त्यजिता जाह्ला ॥ अनुजपत्नीसह वना गेला ॥ मागें दशरथ निमाला ॥४१॥
पातला भागीरथीतीरा ॥ अवलोकितां भागीरथीनीरा ॥ उतरावया पैलपारा ॥ गुहकातें पाचारिलें ॥४२॥
राम म्हणे गुहकासी ॥ जाणें आम्हां पैलतीरासी ॥ नौका आणोनि त्वरेंसी ॥ प्रयागवटीं पाववी ॥४३॥
गुहक पुसे तुम्ही कोण ॥ सांगा आपुलें नामाभिधान ॥ कोठूनि आलेति कोठें गमन ॥ प्रगट केलें पाहिजे ॥४४॥
हांसोनि बोले रघुवीर ॥ माझें नाम रामचंद्र ॥ संगे लक्ष्मण सहोदर ॥ तिसरी भार्या जानकी ॥४५॥
येरु म्हणे म्यां ऐकिले दोन राम ॥ एक दाशरथी परशुराम ॥ तुम्ही कोण हें वर्म ॥ मातें निवेदा उगवोनी ॥४६॥
सीतापति म्हणे गुहकासी ॥ राजा दशरथ सूर्यवंशीं ॥ त्याचा पुत्र मी परियेसी ॥ रामनामें प्रसिध्द ॥४७॥
ऐकोनि राम दाशरथी ॥ गुहकें भय मानिले चित्तीं ॥ न बोलतां शीघ्र गती ॥ पळवी नौका तेथुनी ॥४८॥
राम म्हणे गुहकालागुनी ॥ कां पळसी नौका घेउनी ॥ येरु म्हणे तुझ्या दर्शनीं ॥ अनर्थ मातें दीसतो ॥४९॥
तुझ्या पद स्पर्शतां पाषाणा ॥ सुंदर जाहली अंगना ॥ ऐसी वार्ता रघुनंदना ॥ ऋषिमुखें ऐकिली ॥१५०॥
तूं ठेवितां पाद नौकेंत ॥ होईल स्त्री मूर्तिमंत ॥ मी दरिद्री दीनवत् ॥ कोठें वागवूं उभय भार्या ॥५१॥
रामा दरिद्रपणाचें दु:ख ॥ शक्रालागीं नको देख ॥ किंचित् विश्रांतीचें सुख ॥ स्वप्नीं न दिसे प्राणियां ॥५२॥
दरिद्री मानिती तृणासमान ॥ चौघांत कैंचा सन्मान ॥ सर्वत्र बोलती धिक्कारुन ॥ भणंगदशा कपाळीं ॥५३॥
दरिद्री जितचि प्रेतासमान ॥ पिशुन संबंधी पाहाती हांसोन ॥ घरिंची वनिता क्षोभोन ॥ पाठी लागे लांस जैसी ॥५४॥
जन्मापर्यंत एक कांवळा ॥ शुष्क कण्या भक्षावला ॥ सहस्त्र ठिगळेची वाकळा ॥ तेही मिळतां दुर्बल ॥५५॥
कष्ट करितां काया दमली ॥ पशु जैसा धाप घाली ॥ त्रैलोक्याचीं पातकें सकळीं ॥ दुर्बळाघरीं नांदती ॥५६॥
दुर्बळा न घडे तीर्थक्षेत्र ॥ कोण सांगतो पुराण शास्त्र ॥ पठण करावया नाम स्तोत्र ॥ अवकाश कैंचा तयाला ॥५७॥
यालागीं सर्वांहून ॥ दरिद्रदु:ख महादारुण ॥ त्याहूनही वरिष्ठ जाण ॥ चिंता जया फारशी ॥५८॥
क्षणक्षणा दुश्चित मन ॥ उद्वेगें भरलें अंत:करण ॥ तो दुर्बळाहूनि हीन ॥ दुप्पट दु:खी बोलिजे ॥५९॥
चिंताग्रस्तापरीस दुसरा ॥ दु:खी बोलिजे रघुवीरा ॥ ज्या देहीं रोग जरा ॥ सुख कैचें तयासीं ॥१६०॥
रोग जाहला शरीरीं ॥ पोटशूळ व्यथा भारी ॥ लागे झिजणी तळमळ ॥ सरिता जैसी तोयुरहित ॥६१॥
रोगियापरि दु:खी चौथा ॥ ज्याचें घरीं दोघी कांता ॥ भांडणाचा सुकाळ पुरता ॥ आठ प्रहर होतसे ॥६२॥
दों भार्यांचे दु:ख शंकरा ॥ तेणें सोडिलें कैलासशिखरा ॥ जावोनि श्मशानीं केला थारा ॥ तरी उपाधि तुटेना ॥६३॥
दोनभार्यांचें दु:ख ॥ मातें न सोसवे देख ॥ यालागीं रामा नौका देख ॥ स्पर्शो नको पादरजें ॥६४॥
माझ्या गृहींची पत्नी कठिण ॥ दुसरी नौकेची होईल जाण ॥ दो भार्याचें उदरपोषण ॥ कवण करी मी दरिद्री ॥६५॥
राम म्हणे तूं अज्ञान ॥ मानिसी भय मजपासोन ॥ निर्जीव काष्ठाची नौका जाण ॥ स्त्री कैसी होईल ॥६६॥
अहल्या ऋषीची नारी ॥ शापें पाषाण जाहली शरीरीं ॥ उ:शापास्तव पुढारी ॥ पूर्वस्थिती पावली ॥६७॥
तो ऋषिशाप गहन ॥ माजें पदाचें निमित्त जाण ॥ एक अहल्यावाचोन ॥ दुजी दावी गुहका ॥६८॥
परिसोनि श्रीरामवचनाला ॥ गुहकाचा भ्रम निरसला ॥ रामलक्ष्मणसीतेला ॥ पैलतीरा उतरिलें ॥६९॥
स्नान सारोनि तीरासी ॥ नमस्कारोनि जान्हवीसी ॥ भरद्वाज आश्रमासी ॥ राम गेला ऋषीच्या ॥१७०॥
तेथोनि पुढती केलें गमन ॥ घेतलें वाल्मीकीचें दर्शन ॥ मग चित्रकुट लंघून ॥ अगस्तिगुंफा टाकिली ॥७१॥
पुढें गेला गंगातटीं ॥ वस्ती केली पर्णकुटीं ॥ चौदा सहस्त्र राक्षस निवटी ॥ खरदूषणांसमवेत ॥७२॥
छेदिले शूर्पणखेचे नासिक ॥ ते धाकें पळाली लंकेसी देख ॥ मग येवोनि दशमुख ॥ केला मृग मारीच ॥७३॥
राम गेला मृगवधा ॥ मग रावणें केली बाधा ॥ भिक्षा मागोनि केली आपदा ॥ सीता घेऊनि पळाला ॥७४॥
राम पाहे पंचवटींत ॥ सीता नसे गुंफेंत ॥ शोकें लक्ष्मणासि कवळित ॥ केउती सीता सांग पां ॥७५॥
शोध करित पुढें चालिला ॥ पंपासरोवरी गेला ॥ शबरीचा आदर घेतला ॥ पुढें भेटला सुग्रीव ॥७६॥
बाणें मारोनी वाळीसी ॥ तारा वोपिली सुग्रीवासी ॥ हनुमंत धाडिला शुध्दीसी ॥ तो लंकेसी उडाला ॥७७॥
मारोनि अखया जंबुमाळी ॥ करुनि लंकेची समूळ होळी ॥ जानकीसि मुद्रा दीधली ॥ शुध्दि आणिली रामापासी ॥७८॥
अठरा पद्में कपींसी ॥ आणिले समुद्राचे तटासी ॥ शरणागत बिभीषणासी ॥ लंकादहन तैं केलें ॥७९॥
वानरीं विशाळ पर्वत आणिले ॥ नळहस्ती पाषाण तरले ॥ शतयोजनें सेतूसि बांधिले ॥ कपि उतरले लंकेशी ॥१८०॥
अंगद प्रेरिला शिष्टाईसी ॥ लंकेशें अवमानिलें नीतीसी ॥ मग मांडिलें युध्दासी ॥ भूतसृष्टी खवळली ॥८१॥
शिळा धोंडी वृक्ष पर्वत ॥ ऐसीं शस्त्रें ज्यांचे मुष्टींत ॥ मग युध्दाची मात ॥ काय तेथें वर्णावीं ॥८२॥
शक्ति लागतां लक्ष्मणासी ॥ हनुमंतें आणिलें द्रोणागिरीसी ॥ मग मारिलें इंद्रजितासी ॥ सुलोचना सती निघाली ॥८३॥
रावण आणि कुंभकर्ण ॥ रामें मारिले बाणेंकरुन ॥ प्रहस्त प्रधानकुमर जन ॥ राक्षस मूळीं निवटिले ॥८४॥
राज्यीं बिभीषण स्थापिला ॥ अंगीकारोनि जनकबाळा ॥ राम अयोध्येसी आला ॥ मुक्त करोनि सुरांसी ॥८५॥
हें सविस्तर रामायण ॥ वाल्मीकें कथिलें विस्तारुन ॥ मुख्य चंद्र अवलोकून ॥ नक्षत्रमाळा कोण गणी ॥८६॥
काढोनि घेइंजे मघाची पोळी ॥ समग्र मक्षिका कोण कवळी ॥ तैसी रामायणाची बोली ॥ मुख्य तूतें निरुपिली ॥८८॥
ऐसें बोलिला परमात्मा ॥ परिसोनि आश्चर्य विप्रोत्तमा ॥ पुढें वंदोनि पादपद्मा ॥ प्रश्न पुसेल देवासी ॥८९॥
ब्रह्मविद्या जान्हवींतूनी ॥ भरोनि कुपिका सद्भावजीवनीं ॥ विरक्त श्रोतयां लागोनि ॥ प्रसादबिंदु वांटी तो ॥१९०॥
इति श्रीसिध्दांतबोधग्रंथे अध्यात्मनिरुपणतत्त्वसारनिर्णये सप्तविंशोध्याय: ॥२७॥

N/A

References : N/A
Last Updated : November 22, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP