मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|सिध्दान्तबोध| अध्याय २ रा सिध्दान्तबोध प्रस्तावना अध्याय १ ला अध्याय २ रा अध्याय ३ रा अध्याय ४ था अध्याय ५ वा अध्याय ६ वा अध्याय ७ वा अध्याय ८ वा अध्याय ९ वा अध्याय १० वा अध्याय ११ वा अध्याय १२ वा अध्याय १३ वा अध्याय १४ वा अध्याय १५ वा अध्याय १६ वा अध्याय १७ वा अध्याय १८ वा अध्याय १९ वा अध्याय २० वा अध्याय २१ वा अध्याय २२ वा अध्याय २३ वा अध्याय २४ वा अध्याय २५ वा अध्याय २६ वा अध्याय २७ वा अध्याय २८ वा अध्याय २९ वा अध्याय ३० वा अध्याय ३१ वा अध्याय ३२ वा अध्याय ३३ वा अध्याय ३४ वा अध्याय ३५ वा अध्याय ३६ वा अध्याय ३७ वा अध्याय ३८ वा अध्याय ३९ वा अध्याय ४० वा अध्याय ४१ वा अध्याय ४२ वा अध्याय ४३ वा अध्याय ४४ वा अध्याय ४५ वा अध्याय ४६ वा अध्याय ४७ वा अध्याय ४८ वा अध्याय ४९ वा अध्याय ५० वा श्रीसिध्दान्तबोध - अध्याय २ रा ‘श्रीसिध्दान्तबोध’ हा संतकवि श्रीशहामुनि यांचा ग्रंथ म्हणजे मराठी वाड्मयाच्या खाणींतील एक तेजस्वी हिरा आहे. Tags : pothisiddhant bodhपोथीसिध्दान्तबोध अध्याय २ रा Translation - भाषांतर ॥ श्रीगणाधिपतये नम: ॥ भावें लोटांगण श्रीकृष्णचरणा ॥ पूर्णब्रह्म तूं सनातना ॥ तुजवांचून अन्य भावना ॥ धरितां वैखरी दुखंड ॥१॥हाचि निश्चय तुझ्या पायीं ॥ धरावया मज सामर्थ्य नाहीं ॥ तुझी कृपा जाहलिया पाहीं ॥ तरीच जाईल सिध्दीतें ॥२॥नारदें तुजशीं धरिला अभिमान ॥ म्हणे मी ब्रह्म तुजसमान ॥ तुझें माझें एकचि ज्ञान ॥ भिन्न भेद असेना ॥३॥तूं सर्व भोगून अलिप्त ॥ मीही पापपुण्यातीत ॥ सोळासहस्त्र अंत:पुरांत ॥ एक समर्पी मज भार्या ॥४॥हांसोनि बोले मेघश्याम ॥ नारदा तूं ज्ञानी परम ॥ तुझीया ठायीं नाहीं विषम ॥ समभावें बोलसी ॥५॥सोळासहस्त्र अंत:पुरीं ॥ ज्या गृहीं नसेल मी कंसारी ॥ तेच तुझी मुख्य अंतुरी ॥ समर्पिली यथार्थ ॥६॥कृष्णआज्ञा जाहलियावरी ॥ नारदासी हर्ष परम अंतरीं ॥ गाय नाचे शिखा पिंजरीं ॥ आल्हाद हृदयीं न समाय ॥७॥म्हणे वीणा आतां कासयाला ॥ फेडिली कापीन पीतांबर नेसला ॥ वस्त्रभूषणीं शृंगारिला ॥ हरुषें चालिला कृष्णसदनीं ॥८॥आपुलें हृदयीं विजार विवरी ॥ राहों नये द्वारके भितरी ॥ वनिता घेऊनि वनांतरीं ॥ क्रीडा करीन विनोदें ॥९॥आलिंगून करीन चुंबन ॥ जानुस्थानीं बैसवीन ॥ एकासनीं करीन शयन ॥ सुरवाडेन रतीशीं ॥१०॥ऐसें विचारुनियां मनीं ॥ प्रवेश केला मुख्य सदनीं ॥ तेथें देखिली रुक्मिणीं ॥ श्रीहरीस विडा देतसे ॥११॥संकोचित मुरडोनि ॥ गेला सत्यभागेच्या घरा ॥ श्रीकृष्ण पक्षीमयूरां ॥ नाचवीत बैसला ॥१२॥तेथूनि जाय दुजिया गृहासी ॥ तेथेंही लक्षी सर्वोत्तमासी ॥ अनेक गोपुरांत प्रवेशी ॥ खेळे सारिपाट गंजिफा ॥१३॥कोठें निजला कोठें बैसला ॥ कोठें बुध्दिबळांचा डाव मांडिला ॥ आणिक एक गोपुरीं प्रवेशला ॥ भावी हरि हा नसे कीं ॥१४॥माडीवरी पाहे निरखुनी ॥ तेथें बैसली मृगलोचनी ॥ हे एकटी दिसे चंद्रवदनीं ॥ ऐसें भावूनि सरसावला ॥१५॥कवळूं पाहे श्रीकृष्णपत्नीसी ॥ पुढें पहुडले हृषीकेशी ॥ येरी म्हणे लाज नाहीं मुनीसी ॥ एकांत समयी येतसां ॥१६॥जळो तुमची विरक्ती ॥ कासया वाढविली महंतीं ॥ एवढी वासनेची फजिती ॥ तरी कां जाहला गोसावी ॥१७॥नाहीं आवरिला क्रोधकाम ॥ तरी कां डोईस लावितां भस्म ॥ ऋषिवेष धरुनियां उत्तम ॥ पूजा घेतसां विश्वाची ॥१८॥वचन ऐकतां ललनेचें ॥ मन मुनीचें अंतरीं खोचे ॥ तरंग उसळती अनंगाचे ॥ प्रयत्न अणुमात्र सुचेना ॥१९॥ मौनेंचिअ फिरला मागुता ॥ फार श्रमला हिंडतां ॥ मध्यान्हीं पातला कालिंदीपिता ॥ मुनि स्नाना चालिला ॥२०॥दुरी गेला कोश एक ॥ एकांत पाहे नदी तटाक ॥ बुडी मारी धरुनि नासिक ॥ म्हणे खेंकडा झोंबला ॥२१॥चांचपडोनि धरिलें हातीं ॥ किरवें नोहे झमके मोतीं ॥ डोई चोळितां केश लागती ॥ फणीने जैसें विंचरिले ॥२२॥करीं पाटल्या गोट कांकणें ॥ तर्जनींत मुद्रिका दर्पणाची सगुण ॥ त्यांत पाहे मुख अवलोकून ॥ विपरीत लेणें देखिलें ॥२३॥मूद राखडी डोके वरुती ॥ केश मिशा न दिसती ॥ कर्णी मासबाळ्याचे घोंस लोंबती ॥ बुगडया आणि तानवडें ॥२४॥भाळीं शेंदुराची चिरी उमटली ॥ नेत्रीं अंजन ललाटीं बिंदली ॥ मुखीं अंगनेची शोभा आली ॥ गळां हार मोतियांचें ॥२५॥पयोधर उचलले कठोर ॥ कवंठा ऐसें वर्तुळाकार ॥ काळे ठिबके ओंठावर ॥ गुंडया जैसा झग्याच्या ॥२६॥भांडवल सांभाळावया हात घाली ॥ तंव सपाट योनी देखिली ॥ अंगी शोभे पातळ चोळी ॥ तारुण्य तनू मुसमुसीत ॥२७॥बहुत मन जाहलें घाबरें ॥ पायीं अन वट बिचवे पोल्हारे ॥ वांकी सांखळ्या नेपुरें ॥ वाळे घुळघुळ वाजती ॥२८॥पौषमासाचा वारा अद्भुत ॥ वपू शीताशें कंपित ॥ कैसा प्रवेशूं ग्रामवस्तींत ॥ कवणा दाखवूं हे दशा ॥२९॥ऐसें विचारुन मानसीं ॥ आश्रम पाहे वस्तीसी ॥ निरखितां देखिलें गुंफेसी ॥ संकोच चित्तें प्रवेशला ॥३०॥पर्णकुटींत तपस्वी ब्राह्मण ॥ धुष्टपुष्ट वयें तरुण ॥ नेत्रीं पाहे लक्षून ॥ सौदामिनीशा चमके ॥३१॥विस्मयो पावोनि पृच्छा करी । तूं कवणाची कुमारी अंतुरी ॥ सुरीं असुरीं राक्षसाघरीं ॥ जन्मलीस तें सांगपां ॥३२॥ऐकोनि विरक्ताची वाणी ॥ हांसोनि बोले मृगलोचनी ॥ म्हणे मी गंधर्वाची भगिनी ॥ मृत्युलोकीं पातलें ॥३३॥पाहे तरी देव लोकींची ॥ मनीं श्रध्दा पर पुरुषाची ॥ आतां कांता होऊनी तुमची ॥ शुश्रुषेस सदा तिष्ठेन ॥३४॥तपस्वी म्हणे तूं अज्ञान ॥ मी ब्रह्मचारी ब्राह्मण ॥ सांगसी तितुकें व्यर्थ वचन ॥ अघटित कर्म घडेना ॥३५॥ऐसें संवादता दिवस गेला ॥ पुढें रात्रिसमयो पातला ॥ वस्त्र नसे पांघरावयाला ॥ करुणा आली ब्राह्मणा ॥३६॥अर्ध वस्त्र घालोनि तिजवरी ॥ सहज पहुडली शेजारीं ॥ येरी हळुचि चरण चुरी ॥ सेवा माझी होऊंद्या ॥३७॥अंगास अंग लागल्यावरी ॥ दोघां हृदयीं कामलहरी ॥ खवळली अद्भुत भारी ॥ भुजंग जैसा फुंपाटे ॥३८॥मद्यापरीस मदाचा कैफ ॥ उसळो लागला कंदर्प ॥ मग पालवोनि दीप ॥ उभयतां एकत्र कवळिती ॥३९॥गाढालिंगन चुंबन ॥ हास्य विनोद सुख मैथुन ॥ चार युगें प्रहरासमान ॥ ऐसा आनंद लोटला ॥४०॥यापरी लोटले दिवस कांही ॥ साठ पुत्र प्रसवले गेहीं ॥ त्यांच्या खटपटीची नवाई ॥ लिहितां विस्तार न पुरेची ॥४१॥समस्त अर्भकांची विष्ठा मूत्रें ॥ काढणें लागे दोन्हीं करें ॥ नदीस प्रक्षाळी नेऊनि चिरें ॥ सवेंचि होती मलिन ॥४२॥ऋषि विसरला जप ध्यान ॥ फार वेष्टिला अर्भकेंकरुन ॥ समस्त झोंबती अंगालागून ॥ दाढी मिशा वोढिती ॥४३॥एक मागती उदकास ॥ एक मागती भोजनास ॥ एक लोळती भूमीस ॥ एक रडती हांसती ॥४४॥बहुत वेष्टिलें जंजाळें ॥ कष्टी अर्भकीं फार केलें ॥ म्हणती कोण कर्म वोढवलें ॥ उभयतां त्रासूनि तंडती ॥४५॥क्रोधें भरुनियां ब्राह्मण ॥ म्हणे कोठून आलीस पापीण ॥ माझें भंगलें अनुष्ठान ॥ भ्रष्ट जाहलों तव संगें ॥४६॥येरी म्हणे लज्जा नाहीं तुम्हांसी ॥ भोगितां सुरवाडलां रतीसी ॥ आतां कंटाळोनि हेळिसी ॥ क्रियानष्ठा पापिष्ठा ॥४७॥जेव्हां देशी आलिंगन ॥ तेव्हां प्रार्थिसी आज्ञा प्रमाण ॥ आतां वीट घेऊन मन ॥ जायीं म्हणसी निर्लज्जा ॥४८॥ब्राह्मण म्हणे ढालाची ॥ होती वळवळ विषयाची ॥ गळां पडलीस येऊनि कैची ॥ नसता कळंक लाविला ॥४९॥अंगनेचे संगतीकरुन ॥ बहुत नाडले सज्ञान ॥ मुख्य कामारी आपण ॥ तोही लुब्धे भिल्लणीसी ॥५०॥विष्णु भ्रष्टला वृंदेसी ॥ ब्रह्मा भाळला कुमारीसी ॥ सुरेंद्र भोगितां गौतम सतीसी ॥ भगेंद्र जाहला शरीरीं ॥५१॥गाधिजमुनीनें तपाच्या राशी ॥ बुडविल्या लुब्धता मेनकेशी ॥ पराशराची गती कैसी ॥ ढीवरीसी सुरवाडला ॥५२॥पौलस्तीचा कुळक्षय ॥ जाहला लागतां जनकसुतेचा पाय ॥ गौरी अभिलाषितां देह ॥ भस्मासुराचा भस्म जाहला ॥५३॥काय वदों राहटी विश्वाची ॥ प्रस्तुत जाहली फजिती आमची ॥ विपरीत गति या कर्माची ॥ वोढवली ते नेणवे ॥५४॥ऐसें विचारुनि अंतरीं ॥ म्हणे त्यजूनी दवडिजे बाहेरी ॥ मग कोपोनियां भारी ॥ जाय म्हणतसे उध्दटे ॥५५॥कठोर ऐकोनि तापसवचना ॥ नदीस गेली उठोनि ललना ॥ म्हणे आतां प्राण ठेवीना ॥ मी कोण कर्म काय केलें ॥५६॥सर्वी श्रेष्ठत्व मिरविलें होतें ॥ निर्जर नमस्कारिती मातें ॥ ते प्रतिष्ठा गेली केउतें ॥ हीनत्व देहा लाधलें ॥५७॥ऐसें विचारुनि मनीं ॥ पश्चात्ताप प्रवेशला अंत:करणीं ॥ म्हणे त्राहें चक्रपाणी ॥ बहुत श्रमी मी जाहलों ॥५८॥बुडी मारितां जळांत ॥ काया पालटली त्वरित ॥ जटा मुगुट कौपीन सहित ॥ पूर्वस्थिती पावला ॥५९॥मी पुरुष कीं नारी ॥ जागृती असें कीं स्वप्नामाझारी ॥ भ्रमें वेष्टिला शरीरीं ॥ कांही उमज सुचेना ॥६०॥मग कृष्ण येऊनि संमुख ॥ म्हणे स्त्रियेचे कैसे ॥ परिवार जाह्ला कितीएक ॥ सांगे तुज मुनिवर्या ॥६१॥परिसोनि सर्वोत्तमाची वाणी ॥ मुनी चरणा लागे जोडोनि पाणी ॥ बरें ठकविलें देवा मजलागुनी ॥ फार पावलों फजीत ॥६२॥जगदीश म्हणे नारदासी ॥ मी तूं ब्रह्म एक म्हणविसी ॥ कवणें ठकविलें देवा कवणासी ॥ द्वैतभावना असेना ॥६३॥नारद म्हणे नारायणा ॥ म्यां धरली कुडी वासना ॥ त्याचें फळ पावलों जाणा ॥ महदन्याय घडलासे ॥६४॥तुं अपरिमित परमेश्वर ॥ सुरासुरां न कळे पार ॥ अव्यक्त आत्मा विश्वंभर ॥ सर्व सूत्र तुझें हातीं ॥६५॥तूं त्रैलोक्याचा जनिता ॥ तुझी कांता ती माझी माता ॥ तिचा अभिलाष धरिला ॥ चित्तां त्याच दोषें विटंबलों ॥६६॥तूं दृष्टि करिशी वाकुंडी ॥ पाडिसी ब्रह्मांडाची उतरंडी ॥ तेथें माझी कायसी प्रौढी ॥ तुजसी समता धरावया ॥६७॥मी सहस्त्रअन्यायी अपराधी ॥ अहंकृतीनें धरिली दुर्बुध्दी ॥ ते क्षमा करोनि दयाब्धी ॥ करीं उदधी कृपेचा ॥६८॥यापरी प्रार्थोनि लागे चरणीं ॥ गंतव्य केलें स्वर्गभुवनीं ॥ आश्चर्य पावला आपुलें मनीं ॥ अद्भुत कळा देवाची ॥६९॥जो हरिहरांसी बुध्दि शिकवी ॥ ज्याचे शिष्य व्यास वाल्मीक कवी ॥ त्या मुनीची एवढी पदवी ॥ तृणप्रायी केली हरीनें ॥७०॥तेथें मानवाचा कोण केवा ॥ समभाव धरितां देवा ॥ ज्याच्या अनंत शक्ति मावा ॥ न कळती ऋषिनिर्जरांसी ॥७१॥जेथें विबुधऋषींला अटक ॥ तेथें काय मानवी तर्क ॥ थिल्लरज्ञानें भ्रमले लोक ॥ कांजीस कल्पिती अमृत ॥७२॥शर्करा भावुनि सोमल खाती ॥ ते चिरंजीव कैसे होती ॥ भलतिया देवास ईश्वर म्हणती ॥ मोक्षपद कैं जोडे ॥७३॥भक्ति करितो वेताळाची ॥ आशा लक्षी विमानाची ॥ गाहाण पाठवी पोतडी गुंजांची ॥ इच्छी घडाभर मुक्ताफळें ॥७४॥शुकाच्या पोटीं पुत्र जन्मला ॥ भीष्में आपुला जामात केला ॥ वंध्या कुमारें सिंह वधिला ॥ काय यथार्थ कल्पावें ॥७५॥निर्नासिका खोविलें मोती ॥ उभे बाजारीं दुजी फजीती ॥ सैंधव तुरंगासी म्हणती ॥ पाकउपयोगी येईल कीं ॥७६॥पय पाजूनि उरग पोशिला ॥ करें स्पर्शितांचि फुंपाटला ॥ कुरवाळितां वृश्चिकपृष्ठीला ॥ डंखोनि नाचवी देहातें ॥७७॥ज्या देवतेला भजती ॥ अंतर पडल्या तेची क्षोभती ॥ तैसी नव्हे भगवद्भक्ती ॥ जीवन्मुक्ती भाविकां ॥७८॥जेथे ज्याचा निश्चय बैसला ॥ तेणें तोचि ईश्वर कल्पिला ॥ परी परमात्मा नाहीं लक्षिला ॥ जेणे जोडे मोक्ष ठेवा ॥७९॥या रीतीची वर्तणुक ॥ प्रारंभप्रसंगी निवेदिली देख ॥ आतां ऋषीश्वरांचें कौतुक ॥ संवाद करिती तें परिसा ॥८०॥सांडोनियां परमेश्वरा ॥ इतर देवता जैशा गारा ॥ किंवा त्यजूनि निर्मळ नीरा ॥ फेंस घेणें हें बरें ॥८१॥मृत्युलोकीं मानवी जन ॥ बोलती याचे नवल कोण ॥ महर्षिदेवासमान ॥ ऐक्य संवाद न मिळती ॥८२॥नैमिषारण्य श्रेष्ठ तीर्थ ॥ मीनले असंख्यात ॥ ज्यांची सामर्थ्यकळा अत्यद्भुत ॥ निर्मू शके ती ब्रह्मांडें ॥८३॥करिती सरित्पतीचें आचमन ॥ शापें मदनारीचें लिंगपतन ॥ कमलावल्लभास ताडिती चरण ॥ अन्याचा पाड कोणसा ॥८४॥निशारमणां लाविला कलंक ॥ भगीरथपूर्वजांची केली राख ॥ इंद्र भगेंद्र सहस्त्र एक ॥ पाषाण जाहली अहल्या ॥८५॥जे धातयासि करित हाट ॥ निर्मूं शकती नवी सृष्ट ॥ जे श्रेष्ठांहूनि अतिश्रेष्ठ । तेही ऋषि मीनले ॥८६॥समस्त बैसोनि एके ठायीं ॥ स्थापिती परमार्थ आपलाले निश्चयीं ॥ प्रथमारंभी एक पाहीं ॥ आपुला अनुभव दावितो ॥८७॥म्हणे या संसारीं जन्मिजे ॥ यज्ञादिक कर्मे कीजे ॥ तेणें स्वर्गातें पाविजे ॥ सार्थक होय जन्माचें ॥८८॥मृत्युलोकीं दु:खाच्या राशी ॥ रोगें दरिद्रें पीडिलें बहुतांसी ॥ जन्ममरण चौर्यायशी ॥ अनिवार यातना होतसे ॥८९॥यालागी करावे आचार पुण्य ॥ बैसावया धाडिती विमान ॥ घंटाघोष घणघण ॥ हरुषें जाती स्वर्गासी ॥९०॥अमरेंद्र सिंहासनी आरुढती ॥ गंधर्वाचीं गायनें परिसती ॥ सुंदर अप्सरा नृत्य करिती ॥ भोग भोगिती रंभेचे ॥९१॥जेथें कामधेनूंचीं दुभतीं ॥ स्वारीस वहन ऐरावती ॥ तारुण्यवयें सदैव असती ॥ वृध्ददशा न स्पर्शे ॥९२॥चिंतामणीच्या भूमिका ॥ लागली कल्पवृक्षवाटिका ॥ अपूर्व रम्य गोपुर पीठिका ॥ निरखितां विरक्त वेधती ॥९३॥रोग दरिद्र भय चिंता ॥ स्वप्नीं न दिसे मनें कल्पितां ॥ एकवेळ सुधा प्राशितां ॥ पुन: क्षुधा न लागे ॥९४॥युग जाय पळासमान ॥ एवढया आनंदांत लोटे मन ॥ दान पुण्य केलिया जाण ॥ ऐसी पदवी पाविजे ॥९५॥यापरी वदतां ऋषि एक ॥ दुजा म्हणेल कळला विवेक ॥ नाहीं जाहलें ज्ञान ठाऊक ॥ तरी कां तोंड घालावें ॥९६॥मी सांगतों सारांश ॥ तुम्ही परिसा सावकाश ॥ यज्ञ घडे नृपलोकांस ॥ प्रजास द्रव्य तें कैंचे ॥९७॥सार्वभौम याग करिती ॥ ते स्वर्गसुखास जाती ॥ अन्य जन काय नरकीं पचती ॥ यज्ञावांचोनि सांग पां ॥९८॥जिहीं पुण्य फार केली ॥ त्यासी जिताचि विघ्नें पातलीं ॥ कर्वत घालोनि काय चिरिली ॥ मांस कापिलें एकानें ॥९९॥पुण्यमागें लागतां झटें ॥ हरिश्चंद्राचे हाल मोठे ॥ नळे सेविलें वन अचाटें ॥ पांडव पावले अवदशा ॥१००॥कर्णाचे दशन पाडिले ॥ चांगुणेचें बाळ वधिलें ॥ द्रौपदीस नग्न केलें ॥ वस्त्रें फेडिलीं सभेंत ॥१॥पुण्यवंतांचे हें लक्षण ॥ जिताचि भोगिती क्लेश गहन ॥ निमाल्या अंतीं जाणे कोण ॥ गति किंवा अवगती ॥२॥शतमखसुकृताच्या पाठी ॥ स्वर्गा जाती प्राणसंकटीं ॥ तेथें उपाधि घडे मोठी ॥ लोटोनि देती माघारे ॥३॥जोंवरी शिक्का चाले धन्याचा ॥ तोंपर्यंत अंमल त्याचा ॥ तो तहगिर जाहलिया गांवींचा ॥ प्रजा आज्ञा पाळिती ॥४॥जोंवरी वस्त्रें द्रव्य देत ॥ तोंवरी वेश्येसी सख्य प्रीत ॥ धन सरल्या तुच्छ मानित ॥ उंबरा ठाका देईना ॥५॥यावरी पुण्य असतां पदरीं ॥ चाले सत्ता अमर पुरीं ॥ तें सुकृत सरल्यावरी ॥ तोंडींच्या तोंडीं मारिती ॥६॥तहगिर करुन लोटिती खालतें ॥ मृत्युलोक अध:पंथे ॥ पुन:गर्भवास भोगिती तेथें ॥ केलें पुण्य बुडालें ॥७॥स्वप्नामाजी दरिद्री ॥ लाहे कनककुंभ भारी ॥ मानी आतां माझें घरीं ॥ न्यून पदार्थ असेना ॥८॥उभवीन सप्तखणीं गोपुरासी ॥ पर्णीन उभयतां पत्नीसी ॥ पहुडेन मंचकाशीं ॥ दोहों बाहीं वनितां कवळूनि ॥९॥होईल संतती पुत्र पणतू ॥ प्रजा विस्तारे गृहातु ॥ उत्साह करीन सोयरियांतु ॥ व्याही जांवई होतील ॥११०॥ऐसा विचार मनीं कल्पितां ॥ पातली जागृत अवस्था ॥ उठला मस्तक खाजवितां ॥ उशास विळा चर्हांटें ॥११॥तैसें पुण्यवंतां जाहलें ॥ स्वर्गसुख बुडालें ॥ शेखीं गर्भवासा पडिले । केली खटपट ते गेली ॥१२॥जो स्वर्गी इंद्राणीचा पती ॥ तोचि धाके सदा चित्तीं ॥ कोणी तप केलिया क्षिती ॥ मत्सिंहासन जाईल ॥१३॥परिसा मधव्याचा अवगुण ॥ गौतमऋषीचा वेष घेऊन । मनीं विषयवासना धरुन ॥ कपटें अहल्या भोगिली ॥१४॥ऋषीनें शापिला बहुत रागें ॥ इंद्रासी पडलीं सहस्त्र भगें ॥ म्लानवदन स्वर्गमार्गे ॥ करी गंतव्य लज्जित ॥१५॥निवाचकवच दैत्य दारुण ॥ अमर पुरीं नेतसे लुटून ॥ पुरंदर धाकें जाय पळोन ॥ शक्ति पाहोन असुरांची ॥१६॥खगेंद्र येऊनियां पक्षी ॥ अमृतकुंभ घेतला कुक्षी ॥ इंद्र संमुख नयनीं लक्षीं ॥ शक्ती नोहे घ्यावया ॥१७॥जनमेजयाचा यज्ञ गहन ॥ काद्रवेय हुताशनीं दहन ॥ एक उरग धाक घेऊन ॥ शरण गेला मधव्यासी ॥१८॥अभय देत सहस्त्रनयन ॥ तुज रक्षीन हुताशनापासून ॥ तक्षक घालितां पेटविला ॥ बुरुज उडविला स्वर्गीचा ॥१२०॥उसळोनि इंद्राचें आसन ॥ अध:पंथे येतसे ढासळोन ॥ गळ्याच अही झुगारोन ॥ धाकें पळाला स्वर्गातें ॥२१॥जो शरणागतां अव्हेरी ॥ त्याची काय वर्णिली थोरी ॥ संकटी भक्तांसि तारी ॥ तो अंतरात्मा बोलिजे ॥२२॥ विश्मामित्रें तप मांडिलें ॥ तेव्हां इंद्रपद गडबडिलें ॥ तें सांकडें मेनकेन फेडिलें ॥ स्वस्थ राखिलें इंद्रासी ॥२३॥ज्याचें संकट वेश्या वारी ॥ त्याचा पुरुषार्थ काय करी ॥ अमरांसहित अमरपुरी ॥ नाशवंत जाणिजे ॥२४॥याहूनि श्रेष्ठ विरंचिभुवन ॥ परम पवित्र अति पावन ॥ तेथील महिमा निरुपम ॥ परिसतां संतोष मानसीं ॥२५॥आतां येथूनि कथा रसिक ॥ ऋषि वर्णील सत्यलोक ॥ त्याचिया ज्ञानाची शोधणूक ॥ श्रुत करीन श्रोतयां ॥२६॥पुढील कथेची सूचना ॥ श्रीदत्त सांगे येऊनि काना ॥ तोचि आठव धरुनि मना ॥ विस्तारेंशीं लिहितसें ॥२७॥माझी अति मंद वाणी ॥ आदरें परिसावी श्रवणीं ॥ जैसें दुर्बळाचे आमंत्रणीं ॥ मान्य करिती श्रीमंत ॥२८॥नव्हे यातीचा ब्राह्मण ॥ क्षत्रिय वैश्य नोहे जाण ॥ शूद्रापरीस हीनवर्ण ॥ अविंधवंशीं जन्मलों ॥२९॥ज्यांचा शास्त्रमार्ग उफराटा ॥ म्हणती महाराष्ट्र धर्म खोटा ॥ शिवालयें मूर्ती भंगिती हटा ॥ देवद्रोही हिंसाचारी ॥१३०॥जयांच्या सणाच्या दिवशीं ॥ वधितां तो उल्हास मानसीं ॥ वेद शास्त्र पुराणासी हेळसिती उध्दट ॥३१॥ऐसें खाणींत जन्मलों ॥ श्रीकृष्णभक्तीस लागलों ॥ तुम्हां संतांचे पदरीं पडिलों ॥ अंगिकारावें उचित ॥३२॥व्यास ढीवरीपोटी जन्मला ॥ कोणें त्यासी वाळिला ॥ मेनकेचे पोटीं शकुंतला ॥ वेश्या कोण म्हणावी ॥३३॥तिच्या वंशीं जन्मले भारत ॥ वंद्य करिती लोक समस्त ॥ जांबवंती अस्वल जात ॥ जामात जाहला श्रीकृष्ण ॥३४॥जयास दुर्गंधीचें आळे कीजे ॥ त्यांत केशराचा बूट निपजे ॥ तें पूजेसाठीं पाहिजे ॥ पवित्र देवां ब्राह्मणां ॥३५॥जवादि मार्जाराच्या वृषणांतून ॥ जन्म पावली कस्तुरी जाण ॥ त्याची हर्षे पेटी करुन ॥ श्रीमंत मस्तकीं खोविती ॥३६॥केतकीसी सर्वांगीं कांटे ॥ गर्भी सुवासिक कणीस गोमटें ॥ सांडोनि फणसाचीं सालपटें ॥ आंतील गरे स्वीकारिती ॥३७॥मध खातां गोड लागली ॥ कोणी न पुसे कोठें जन्मली ॥ ओल्या चर्मी हिंघली ॥ फोडणीस आधीं पाहिजे ॥३८॥मीनउदरीं मत्स्येंद्र जन्मला ॥ सिध्द कोण न म्हणे त्याला ॥ गौरीनें मळीचा गणेश केला ॥ विश्व पूजी तयासी ॥३९॥राक्षसवंशीं बिभीषण ॥ काद्रवेयकुळीं सहस्त्रवदन ॥ अरुणानुज विनतानंदन ॥ जाहले प्रिय सर्वोत्तमा ॥१४०॥गज प्रल्हाद शुक नारद ॥ भक्तीनें सुरांस जाहले वंद्य ॥ गणिका कुब्जा मतिमंद ॥ पावन केली श्रीनिवासें ॥४१॥ तैसा मी कर्मक्रियाहीन ॥ बुध्दिहीन ज्ञानहीन ॥ ऐसिया अनाथालागून अंगीकारिजे सर्वोत्तमें ॥४२॥रसमात्रा जरी सांपडे ॥ ताम्रपात्रीं सुवर्ण जोडे ॥ धरितां देवाचे पाय दृढें ॥ अवघड काय कवितेचें ॥४३॥नेत्रीं घालितां अंजन ॥ लक्षी पाताळीचें धन ॥ तैसें श्रीगुरुचें करणें ॥ दिसे ब्रह्मांड लोचनें ॥४४॥हरिभक्तीची घालूनि कास ॥ मनबुध्दीस करुन उल्हास ॥ प्रसंगें निवेदीन सावकाश ॥ जे परिसोनि करिती आश्चर्य ॥४५॥ यापरी प्रसंग संपला ॥ श्रीगुरुकृपेनें निवेदिला ॥ शहामुनीच्या वचनाला ॥ रहस्य आणी ईश्वर ॥१४६॥इति श्रीसिध्दांतबोधग्रंथे अध्यात्मनिर्णयतत्त्वसारनिर्णये द्वितीऽध्याय: ॥२॥॥ अध्याय ॥२॥ ॥ ओंव्या १४६ ॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ N/A References : N/A Last Updated : September 23, 2020 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP