मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|कीर्तन आख्यान|श्री दासगणु महाराजांची आख्याने|
श्री तुलसीदास चरित्र ४

श्री तुलसीदास चरित्र ४

श्रीसद्गुरू दासगणु महाराजांची कीर्तनाख्यानें हीं अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण, रसाळ आणि विविध काव्यगुणांनी संपन्न असून श्राव्य काव्याचा तो एक उत्कृष्ट नमुना आहे.


एके दिवशी झाले श्रीरामाला विचारतें तुलसी ।
हिंदी रामायण मम आहे ना मान्य राघवा तुजसी? ॥१॥
त्यावर श्रीरामचंद्र म्हणाले,

॥ दिंडी ॥
अरे वाल्मिकी पूर्विचा असुन आतां । तुलसि होउन आलास तीच गाथा ।
सांगण्यासी हिंदीत जगाठाई । यांत काहीं नवलचि गोष्ट नाहीं ॥२॥

॥ श्लोक (वसंततिलका) ॥
श्रीसूरदास कविच्या कवनांत फार ।
आहे प्रसाद भरला आणखी मधूर ॥
तें काव्य न सजलसा घन अंबरीचा ।
लावील नृत्य करण्या रसिकास साचा ॥३॥

॥ लावणी ॥ (भ्यावेंस काय)
ऐकतां सूरदासाच्या । काव्यास चित्त डोलतें ।
कथुं काय मलाहि माझा । तें काव्य विसर पाडितें ॥
(चाल) यापरी आहे तें फार, गोड साचार, तूंही एकवार,
ऐक जा त्यातें । असे झाले प्रभु बोलते ॥४॥

॥ श्लोक (वसंततिलका) ॥
ऐसें प्रभू-वचन ऐकून मोद झाला ।
तुलसी-मनाप्रति, पुढें मग तो निघाला ॥
वास्तव्य जेथ बुधहो! सुरदासजींचे ।
त्या पट्टणा, कथित हें गणुदास वाचें ॥५॥

॥ दिंडी ॥
तुलसीदासा पाहून पौरवासी । आले त्याचे ते चरण वंदण्यासी ।
आज आपल्या आगमनें धन्य झाला ।
गावं अमुचा गणु करि वर्णनाला ॥६॥
तुलसीदास म्हणाले,

॥ लावणी ॥ (भला जन्म हा)
काव्यनिपुण हें गावं धन्य जाहलें ॥
मीही आलों कृतार्थ व्हावा इथें फार लांबुन ।
घ्यावया त्या कविचें दर्शन ॥
(चाल) दाखवा तयाचा मजला वाडा निका ।
जो सरस्वतीचा सूरदास लाडका ।
हल्लीं न महीवर कोणि तयासारखा ।
प्रासादिक कवि, श्रीरामाने ज्याची कीर्ती भली ।
बुधहो! मजपुढती गाईली ॥७॥
“ तें ऐकून गावकरी मंडळी आश्चर्यचकित मुद्रेंने म्हणाली.”

॥ दिंडी ॥
तुम्हांला जो राघवें सूरदास । कथियला तो येथील नव्हे खास ।
अहो, अमुचा जो सूरदास आहे । तयासम की पातकी कुणी नोहे ॥८॥

॥ कटिबंध ॥
कामांध असे मतिमंद, सदा तो धुंद नीति नाठवते ।
दिनरजनिं तयाची विषयसेवनीं जाते ॥
वाकडी नजर साजिरी, परस्त्रीवरी, हमेशा धरी, असा बदमाष ।
तो मांग आमुच्या पुरीस लांछन खास ॥९॥

॥ पद ॥ (शिरि तिच्या)
तो जरी कवन करितो । तरि नच प्रासाला बघतो ।
(चाल) टला ट, पला प, लावुनिया, गुरमीत ।
आपुल्या सदा राहतो ॥१०॥

॥ लावणी ॥ (सौंदर्य हेंच राजाच्या)
तुम्हि तुलसि जान्हवी गंगा । तो मांग तूमची सरी ।
पावे न कधिच हो जाणा । सुरदास गटारापरी ।
(चाल) त्याचें तें वृत्त सांगतां, वाणिला वृथा, दोष सर्वथा, ।
आहे घडणार । गणू म्हणे विचारा कर ॥११॥
हें ऐकून तुलसीदास म्हणतात,

॥ श्लोक (वसंततिलका) ॥
छे छे असें म्हणु नका सुरदासजीची ।
मूर्ती सजीव विचरे जगिं शारदेची ।
तुम्हि विचार करुनी नच बोललांत ।
ज्याचे पहा गुण सदा प्रभु राम गात ॥१२॥

॥ पद ॥ (प्रगटला कीं)
थोर हिरा जिथवर आहे खाणिचिया ठायीं ।
तोंबरी न किंमत त्याची कळत कुणालाही ॥
जेविं हिरा तेवेचिं राहे मोति शिंपल्यात ।
परिस श्रेष्ठ असुनी राहे पडुनि प्रस्तरांत ।
सूरदास कविचा तेवीं वास या पुरीत ।
मजसि गमे आहे झाला दैववशें पाही! ॥१३॥

॥ श्लोक (वसंततिलका) ॥
अज्ञान टाकुनि तुम्हि झणिं पारखी व्हा ।
तो व्यर्थ दोष कविला नच लावणें हा ॥
त्याच्यामुळेच महती तुमच्या पुरीसी ।
आली असे, गणुं नका कधिं हीन त्यासी ॥१४॥

॥ पद ॥ (धग्य उमा शंभूची)
गेले पुढें भेटीसी । सुरदासाच्या सदनीं तुलसी ॥
(चाल) एक रघुपती राम कीं साचा ।
एक जणूं का सुत नंदाचा ।
भेटी अशी व्हायाची । गणूं बोले कीं त्या दोघांची ॥१५॥
तुलसीदास जेव्हा सूरदासजीच्या भेटीसाठी आले त्यावेळी सूरदासजींचे भजन मोठया प्रेमाने चालले होतें.
 
॥ पद ॥ (कृपा करो रघुनाथ)
धन्य धन्य ये गोकुल पटट्ण प्रगट भयो भगवान ।
नंद पटलके पूत दयाघन गोपगोपिका प्राण ॥
भगा दिया है दुष्ट कालिया करके हरण अभिमान ।
चरनकमलपर भ्रमर बने जो उनका राखत मान ॥१६॥

॥ श्लोक (शार्दूलविक्रिडित) ॥
गोपालांप्रति दाविलें प्रभुवरा वैकुंठ अत्यादरीं ।
लीलने धरिले करांगुलिवरी गोवर्धनाला हरी ॥
रूपें तीं बहुसाळ घेऊनि तुम्ही तो रास केला पुरा ।
अज्ञानी बहु पातकी खचित मी उद्धार माझा करा ॥१७॥

॥ पद ॥ (मित्र मम)
मी पापी आपण प्रभो पतितपावन ।
याची कां राहिली ना मुळिच आठवण? ॥
मी असाच पापपकि रुतून राहिल्या ।
गोष्टि तुझ्या व्यासानें व्यर्थ गाइल्या ।
कां की त्या प्रत्ययास मुळिच ना आल्या ।
घाणिला प्रसवें का जगति चंदन ॥१८॥

॥ पद ॥ (कृपा करो रघुनाथ)
भयी दिवानी तुम्हे देखकर अनयाकी वो नार ।
राधा उस्का डुबा दियाजी तुमने सब संसार ।
सारिया छीने जमुनाजीपर ऐसो तुम अनिवार ।
दासगणु कहे निज भक्तनको नच करना लाचार ॥१९॥
याप्रमाणे भजन ऐकून तुलसीदासाला असें वाटलें कीं, “अरेरे!

॥ ओवी ॥
या कृष्णभक्तीमुळें याची । निंदा होते जगीं साची ।
तीच केल्या राघवाची । हा तरल नि:संशय ॥२०॥

N/A

References : N/A
Last Updated : September 22, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP