मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|कीर्तन आख्यान|श्री दासगणु महाराजांची आख्याने|
जन्म - कथा १

श्रीगीता - जन्म - कथा १

श्रीसद्गुरू दासगणु महाराजांची कीर्तनाख्यानें हीं अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण, रसाळ आणि विविध काव्यगुणांनी संपन्न असून श्राव्य काव्याचा तो एक उत्कृष्ट नमुना आहे.


॥ श्लोक ॥ ( पृथ्वी )
नसून तनु हो जिला भवभयास जी वारिते ।
ऐहिक परमार्थ हे निवडुनी खरें सांगते ॥
अयोनि जगिं जन्मली समरभूस जी भारती ।
गणू नमितसे तिला, जनक जीस भामापती ॥१॥
या श्रीगीतेचा जन्म कां झाला ?

॥ पद ॥ ( मित्रा मम )
अज्ञातवास संपवुनी पातले घरा ।
काय अतां करणें आम्ही सांग, श्रीवरा ! ॥
आमुचि म्हणायास अम्हां नच कुठें धरा ।
पांडव ते प्रभुसि असे बोलले गिरा ॥२॥

॥ लावणी ॥ ( भ्यावेस काय )
बोलली कुंति कृष्णाला । हीं असुन नृपाचीं मुलें ।
आजवरी अतीशय यांनीं । आहेत काष्ठ भोगिले ॥
चारिले विषाचे लाडू । भीमास मार्गे माझिया ।
त्यांतून वांचला तो कीं । तुझि होति म्हणुनिया दया ।
( चाल ) वारणावतीभीतरीं, केलि तय्यारी, पांडवा हरी ।
जाळण्या जाण । लाखेच्या गृहीं घालुन ॥३॥

॥ पद ॥ ( रजनिनाथ हा )
दुष्ट जनांचे हनन कराया ।
अवतरलासी तूं यदुराया ॥
( चाल ) ऐसें असुनी उलटें होतें ।
अधमनराला नृपपद मिळतें ।
सुजन भोगिती जगिं आपदेतें ।
विचार याचा करि लवलाह्या ॥४॥

॥ लावणी ॥ ( भला जन्म हा )
सभेंत ज्याच्या सभापती ते चतुर धूर्त धोरणी ।
एकही गोष्ट हो नव्हती उणी ॥
महिपालाचा मुगुटमणीं जो कीर्ति ज्याचि दुरवरी ।
जनन ज्या कुरुवंशाभीतरीं ॥
( चाल ) हस्तिनापुरीं तें तक्त जयाचें असे ॥
जन्मांध परी तो राज्य पहा करितसे ॥
शतपुत्र नृपाला दुष्ट दुर्मती असे ॥
याच नृपाची कारण झाली अप्पलपोटी कृती ।
गीतेचें जनन व्हावयाप्रती ॥५॥

॥ पद ॥ ( पोरें नच )
दुर्योधन पांडवांस । बघुन सदा मानी त्रास ।
हे वैरी असती खास । म्हणत मजप्रती ॥
मजपेक्षां धर्मावरी । प्रेम करिति नरनारी ।
फ़ार काय गांधारी । बरें न मज म्हणे ।
हे पांडव सर्प - पोर । जोंवरि ना झालें थोर ।
तोंवरीच यास ठार । केलें पाहिजे ॥
यापरिचें दुर्योधन । शकुनीसी करि भाषण ।
तोहि त्या तुकवी मान । दासगणु म्हणे ॥‍६॥

॥ श्लोक ॥ ( वसंत तिलक )
शिष्टाइला करून कौरव - पांडवात ।
संधी घडून आणण्यास्तव आज येथ ॥
आला असे तनय हा बघ देवकीचा ।
काळा जसा वरी, तसाच आंतून साचा ॥७॥

॥ पद ॥ ( मंद बुद्धीचे )
धृतराष्ट्राच्या भेटीसी । मुळिं जाउं न द्यावें कधिं यासी ॥
( चाल ) अतिशय भोळा कौरवपति तो, कपट ठावुकें नच ज्यासी ।
कुटिलत्वाचा सागर हरि हा । पाडिल मोहामधें त्यासी ॥
( चाल ) आहे हस्तिनापुरीं कृष्ण हा, तोंवरि त्यजुं नको राजासी ।
सुयोधना, नच होइल बरवें । जरी कराया हें चुकशी ॥८॥

॥ दिंडी ॥
तुम्ही जें काम कथियलें मला मामा ।
तेंच आहे येणार मदिय कामा ॥
जंवर येथें देवकीतनय जाणा ।
तंवर राहिन मी नृपति - सन्निधाना ॥९॥

॥ आर्या ॥
दुर्योधन धृतराष्ट्रासन्निध येउन सभेमधें बसला ।
तें पाहून परमात्मा चित्तीं अतिशय मुदीत कीं झाला ॥१०॥
धृतराष्ट्राला भेटण्यास कृष्ण दुर्योधन जवल असतांना गेला. दुर्योधनाला व श्रीकृष्णाला हेंच पाहिजे होतें. तें घडून आलें. श्रीकृष्ण म्हणाले, “ धृतराष्ट्रा ! -

॥ पद ॥
नसे हा, तनय - मोह बरवा ।
कुलिंचा लौकिक तो राखावा ॥
( चाल ) राजहंस हे पांच रक्षुनी ।
कागसमुह हा झणिं त्यागावा ॥११॥
“ तुझ्यासारख्या सूज्ञ राजाला या दुष्ट, आततायी, पापकर्म करणार्‍या पोरांचा पक्ष धरून पांडवांसारख्या राजहंसांचा त्याग करणें बरें नाहीं. अरे !

॥ लावणी ॥ ( तूं चारु गोमटी )
हे पुत्र तुझे नृपवरा दुष्ट दुर्मती ।
जन्मले उदरिं म्हणुनीया, का जंत कुणी पोसती ? ॥
तूं म्हणसि सुयोधन यास मांग हा परी ।
मरण्यास भिमा घातिलें, यानेंच वीष भूवरीं ॥
वारणावती क्षेत्रांत वन्हिभीतरीं ।
जाळण्या पंडुपुत्राला, इच्छिलें यांनि अंतरीं ॥
( चाल ) खेळण्या बाहिलेम द्यूत, कपट करि त्यांत, लौकिकी रीत ।
त्यजुनिया नेली । द्रौपदी सभेसी भली ॥
वनवास सारुनी पुरा परत ते आले ।
यासाठीं राज्य त्यांचें त्यां, पाहिजे आतां तूं दिलें ॥
मानेल तुला ना मदिय वचन हें जरी ।
मरणाची पाळी येईल, अवघ्यांस रणाभीतरीं ॥
( चाल ) थोरांसी वैर ना करी, समज ही धरी, वाटणी करी ।
आतांचे आतां । गणु होय कवनिं सांगता ॥१२॥
धृतराष्ट्र दुर्योधनास म्हणाला,

॥ श्लोक - वसंत तिलक ॥
दुर्योधना ! करि न हट्ट उगाच आतां ।
आहे युधिष्ठिर तुझा बघ ज्येष्ठ भ्राता ॥
तो सद्गुणी म्हणुन पांडव श्रेष्ठ झाले ।
त्वां पाहिजे उचित त्यांसह सख्य केलें ॥१३॥
तें ऐकून, दुर्योधन खळवून म्हणतो -

॥ दिंडी ॥
तुम्ही बाबा कैवार पांडवांचा ।
हवा असल्या, मी मुळिं न घ्यावयाचा ॥
आम्ही शंभर आहोंत, पांच कीं ते ।
आशिर्वादे तुमच्या किं चिरडुं त्यांतें ॥१४॥

॥ श्लोक ॥ ( पृथ्वी )
सुइवरिल मृत्तिका नच मिळेल या पांडवां ।
उगीच दर तो तुम्ही तदिय ना अम्हां दाखवा ॥
करीं न भरल्या आम्ही अजुनि त्या पहा बांगड्या ।
मुखास आवरी, नको करुंस गोष्टि या वांकड्या ॥१५॥

॥ पद ॥ ( मित्रा मम )
यापरिचें परिसुनि वच चित्तिं तोषला ।
कृष्ण परी वरपंगी ऐसें बोलला ॥
कौरव कुल नामशेष होय यामुळें ।
असुनि क्योवृद्ध तुला हें न कां कळे ।
वेडातें पांघरून बसु नको बळें ॥
पांडवांसी जिंकिलसा कुणि न राहिला ॥१६॥

॥ आर्या ॥
सर्वत्रासी भेटुन परमात्मा पांडवाकडे आला ।
जिंकुं आतां हां हां म्हणतां आपण पांडवांला ॥
( चाल ) भीष्म - द्रोण - कर्णांपुढतीं काय पाड त्यांचा ।
पल्वला न येई हरितां मान सागराचा ।
जोंवरी न श्रवणीं पडला शब्द केसरीचा ।
तोंवरीच निर्भय कोल्हे वसति काननाला ॥१८॥

॥ कटिबंध ॥
उभयांनीं सैन्य आपुलें, पहा सजविलें, रथा जोडिले, तुरग साचार ।
युद्धास निघाले असती धनुर्धर वीर ॥
बाहु ते स्फ़ुरण पावती, धनुष्यें हातीं, मागें झळकती, बाण - भाते तें ।
तटतटा बंडिचे बंद तुटत कीं होते ॥
समराची हौस ती फ़ार, झालि अनिवार, निघेना धीर, घडीचा कवणा ।
रणभेरी वाजती चहुंकडे दणदणा ॥
( चाल ) निशाण अग्रभागाला चाललें ।
उभयतां कुरुक्षेत्रासी पातले ।
आकाशीं युद्ध पहायाला सुर आले ॥
हे युद्ध नव्हे, अखेर आतां होणार, खचित साचार, याही जगताची ।
गणुदास म्हणे आलि कठिण वेळ ही साची ॥१९॥
पुढेम पांडवांचें व कौरवांचें सैन्य लढाईच्या तयारीनें कुरुक्षेत्राला आल्यानंतर -

॥ आर्या ॥
दुर्योधन द्रोणासी दाखवुनी सैन्य पंडुपुत्राचें ।
म्हणे तुम्हाशीं आलें लढण्यासी शिष्य गुरुवरा तुमचे ॥२०॥

॥ कटाव ॥
अजात शत्रू धर्म युधिष्ठिर । घेउनि अपुले पहा सहोदर ॥
पुत्र माद्रिचे खरेच रणशूर । धृष्टद्युम्न जो द्रुपद नृपाचा ॥
द्रोणाचार्या शिष्य तुमचा । जो सेनानी चतुर साचा ।
महाबली बलवान भीम हा । युयूधान सात्यकी आला पहा ॥
विराट राजा आहे रथीं महा । धृष्टकेतु हा महाधीराचा ।
चेकितान हा त्याच परीचा । काशिराज हा युद्धवनींचा ।
केवळ पंचानन ज्या म्हणती । शैव्य पुरुजित् भोज कुंती ।
युधामन्यु हा वीर सन्मती । उत्तमौजा महारथी कीं ।
अभिमन्यु हा उतरिल झाकी । महारथ्यांची एक क्षणीं कीं ।
द्रौपदीचे पुत्र पांचही । रथी महारथी आहेत तेही ।
दासगणू त्या कवनीं गाई ॥२१॥
ही पांडवांची बाजू द्रोणाला दाखवून दुर्योधन म्हणाला, “ आतां आपली बाजू पहा -

॥ कटाव ॥
आता आचार्य बाजू आमुची । अवलोकन ही करणें साची ।
पितामहा या श्रीभीष्माची । न ये सरी कोणास महीवर ।
तैसे आपण वीर धुरधर । कृपाचार्यही झाले सादर ।
अश्वत्थामा पुत्र तुमचा । गौरव करुं मी किती कर्णाचा ।
विकर्ण आहे त्याच परीचा । भूरिश्रवा हा महारथी वीर ।
तसेंच आणखी भूप अवांतर । त्यांचीं नांवें सांगुं कुठवर ॥
माझ्यासाठीं प्राण आपुलें वेंचण्यास जे इथवर आले ।
कमी कशाचें येथ न उरलें । व्यूहावरती व्यूह रचावे ।
जिवंत पांडव नच ठेवावे । हें माझें की प्रीय करावें ।
ऐसें बोलुन तो दुर्योधन । द्रोणाचार्या करून वंदन ।
अतिहर्षानें बसला जाऊन । रथांत आपुल्या, अशाच केल्या ।
इतरासी त्या गोष्टी वहिल्या ॥२२॥

॥ दिंडी ॥
शंख भीष्मानें प्रथम वाजवीला ।
इतर वीरांनीं तोच स्विकारीला ॥
पंथ, शंखाच्या नादें भरुन गेलें ।
व्योम, ऐसें युद्धास सिद्ध झालें ॥२३॥

N/A

References : N/A
Last Updated : August 12, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP