मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|कीर्तन आख्यान|श्री दासगणु महाराजांची आख्याने|
जन्म - चरित्र

श्री दत्त - जन्म - चरित्र

श्रीसद्गुरू दासगणु महाराजांची कीर्तनाख्यानें हीं अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण, रसाळ आणि विविध काव्यगुणांनी संपन्न असून श्राव्य काव्याचा तो एक उत्कृष्ट नमुना आहे.


॥ आर्या ॥
सद्गुरुपथ दावाया अज्ञजना ईश जगतिं अवतरला ।
अत्री महाऋषींच्या उदरीं घेऊन दत्त नामाला ॥१॥
दत्तावतारास निमित्त झालें तें असें :

॥ दिंडी ॥
विणा स्कंधी घेऊन नारदानें ।
गमन केले कैलासी आदरानें ॥
सत्य लोका वैकुंठि पुढें गेला ।
तिन्ही देवा वृत्तांत कथन केला ॥२॥
भूलोकींचा वृत्तांत सांगत असतां महासाध्वी अनसूयेची नारदांनीं मोठी महती गाइली.

॥ कटिबंध ॥
भूवरी सती ती खरी, विप्रसुंदरी, सगुणगुणखनी ।
सत्वास तिच्या वानिता थकली श्रुतिवाणी ॥
अनुसया शोभते नांव, पतिपदी भाव, शुद्ध अत्यंत ।
स्त्रीधर्म सर्व जाणते तीच जगतांत ॥
( चाल ) तिजपुढें पाड कवणाचाही नसे ।
रवितेज अशापरी नाकीं हें जसें ॥
सांगता जगतिं कवणा ना येतसे ॥
त्यापरी तियेची स्थिती, रमा पार्वती, लघू ठरतील ।
तिजपुढें महेशा, मदिय रोकडे बोल ॥३॥
 
॥ दिंडी ॥
नारदाच्या या अशा भाषणानें ।
हास्य केलें कौतुकें शंकरानें ॥
परी आलासे क्रोध पार्वतीस ।
त्याच परी हो सावित्री इंदिरेस ॥४॥

॥ श्लोक ॥
देवांगना आम्ही तिघी आमुच्या पुढारी ।
हा वानि नारद मुखीं कशि मर्त्यनारी ॥
मोरास काय कधीं कुक्कुट लाजवील ।
रत्नास गार लघुता कधिं कां आणील ? ॥५॥

॥ ओवी ॥
मग तिघीजणींनीं । संगनमत ते करोनी ।
अनुसयेचें सत्व पहाण्यालागुनी । विधी हरिहर पाठविले ॥६॥
आपल्या पतीस त्या म्हणाल्या,

॥ आर्या ॥
तुमच्या समक्ष आमुचा केला अपमान नारदानें या ।
यास्तव अनसूयेचें सत्व हरा भूस शीघ्र जावुनिया ॥७॥

॥ लावणी ॥
शंकर म्हणे पार्वती हट्ट न करी ।
अनसुया थोर अधिकारी, करूं नको तिची बरोबरी ॥
मत्सर काजवा जसा दिपाचा करी ।
वा श्वान भुंकण्या लागे, पंथांत गजपतीवरी ॥
त्यापरी तुझा हा यत्न समज अंतरीं ।
धाडिसी कशाला तेथें गणु म्हणे बसूं दे घरीं ॥८॥

॥ ओवी ॥
येणेंच रिती विधात्यानें । कथिलें सावित्री कारणे ।
लक्ष्मीसी नारायणे । ऐसेंच केलें संभाषण ॥९॥

॥ दिंडी ॥
परि त्याचा उपयोग मुळिं न झाला ।
भाग जाणें पडलेंच त्रिवर्गाला ॥
प्रपंची या श्रेष्ठत्व कामिनीचे ।
ब्रह्म झालें स्वाधीन प्रकृतींचे ॥१०॥
पत्नीच्या हट्टासाठीं तिघेहि अनसूयेचें सत्व पहाण्यासाठीं भूलोकीं आले.

॥ पद ॥ ( वामना )
भूवरी विधी हर हरी, आले सत्वरी, धरून वेष ।
सत्व साध्वीचें पाहण्यास हो ॥ अंगणी ॥
अंगणी उभे राहिले, सतिस बाहिले, वचन बोलले भीक घाली ।
नय होऊन अम्हा वहिली गे ॥ अनसुये ॥
अनसुये वेळ करूं नये, चित्त असु नये; तुझें दु:खी ।
तरिच तूं साध्वी तिन्ही लोकीं गे ॥ यापरी ॥
यापरी वटुन वैखरी, विधी हरहरी, स्वस्थ ठेलें ।
तेथ साकडे सतिस पडले हो ॥ गणु म्हणे ॥११॥
अनसूया मनांत म्हणते,

॥ पद ॥ ( नृपममता )
जरि नाहीं म्हणू मी यास ।
तरि हानि होय सत्वास करूं कसें ॥
कशि जाउं नग्न होऊन ।
या लागिं वाढण्या अन्न ॥ ’
( चाल ) विपरीत कृती ही परी, कशि करुं तरी, सांग सत्वरी ।
विभो भगवंता । गणु म्हणे पंढरीनाथा ॥१२॥

॥ ओवी ॥
ऐशी झाली आड विहीर । अनसूयेसी साचार ।
परी पोक्त करुनी विचार । ऐसें तिनें ठरविलें ॥१३॥

॥ अभंग ॥
ज्याअर्थीं अतिथी मज नग्न व्हाया । सांगती ये ठाया अवर्जून ॥
त्याअर्थी नसावे हे कोणी सामान्य । अधिकारी पूर्ण ब्रह्मांडाचे ॥
मातेसी बालक नग्नची पाहतो । तया न लागतो दोष त्याचा ॥
यांची इच्छा माझी बालकें व्हायाची । आहे मनीं साची कळून आले ॥१४॥

॥ आर्या ॥
ऐसा विचार करुनी झाली ती नग्न शीघ्र वेल्हाळा ।
अनुपम तेच तियेचें धैर्य घनाची विराजली चपला ॥१५॥

॥ ओवी ॥
एक्या करीं अन्नपात्र । एक्या करीं पतीचें तीर्थ ॥
घेऊन सिंचिले त्रिवर्गाप्रत । बालकें करून टाकिली ॥१६॥
अशा रीतीनें तीन बालकें होतांच बालकरूप झालेल्या त्रिवर्गाचे तिने नामकरण केलें.

॥ श्लोक ॥
दुर्वास नाम दिधलें सतीनें शिवाला ।
तैसेंच चंद्र बुधहो चतुराननाला ॥
श्रीपंढरीश भगवान हरि जो रमेश ।
श्रीदत्त नाम दिधलें नमुनी पदास ॥१७॥

॥ कामदा ॥
बालकें तिन्ही अंकि घेउनी । खेळवी तया गीत गावुनी ॥
तुम्हि अहा तिघे जगत सोयरे । जाहला परी माझी लेकरें ॥१८॥

॥ पद ॥ ( मित्रा मम )
येउनिया अत्रि ऋषी बोलुं लागले ।
म्हणति कुणाची ही तुवं आणियली मुलें ॥
सती बोले तुम्हीच पहा ज्ञान दृष्टीनी ।
ही जन्मा आली इथें जननी वाचुनी ॥१९॥

॥ श्लोक ॥
कांतेचें वच ऐकतां निजमनीं अत्री ऋषी तोषले ।
प्रत्येका निरखोनिया आतुरतें प्रेमे बघूं लागले ॥
भार्ये हे आदिदेव साच असती ब्रह्मांड उत्पादिते ।
झाले कुंठित यास पाहुनि पहा वानावया देव ते ॥२०॥
नारदानें हें वृत्त वैकुंठलोकीं जाऊन विदित केलें.

॥ लावणी ॥ ( भला जन्म हा )
रमे उमेला सावित्रीला खिजवी नारदमुनी ।
फ़िरा गे पती कटी घेउनी ॥
अनुपम जोडा दिसेल तुमचा जा या पति घेउनी ।
निजवा पय त्याप्रति पाजुनी ॥
अनसूयेनें बरेंच केलें चिरली नाके पूरी ।
आतां तरी सावध व्हा अंतरीं ॥
( चाल ) अभिमान जगीं या नच कोणाचा टिके ।
जा चरण धरा साध्विचे जाउनी सुखे ॥
पडणार पितळ गे सोन्यापुढती फ़िके ॥
अत्रीजाया साध्वी अनसूया एकचि या त्रिभूवनी ।
नाहीं अन्य तिच्याहुनी कुणी ॥२॥

॥ आर्या ॥
चिडल्या नारद वचनें आल्या पहाण्या तिघी खरें खोटें ।
ऋष्याश्रमीं शिराया परि वाटे भय मानसी मोठें ॥२२॥
आश्रमांत येतांच, रमा, उमा, सावित्रीला अनसूया हंसत हंसत म्हणाली,

॥ लावणी ॥ ( भूपाळीची )
भिऊं नका निर्भय मनानें येउन येथें बसा ।
मुली तुम्हाला कांहीं न करी मी हा धरणें भरंवसा ॥
ओळखुन घ्या नवरे आपुले मजवरती ना रुसा ।
ओळख पटल्या बरेंच झालें, नच पटल्या मज पुसा ॥२३॥
प्रयत्न करूनहि तिघींना आपापला पती ओळखतां आला नाहीं. अभिमान सोडून तिघी सती अनसूयेस म्हणाल्या,

॥ श्लोक ॥
आम्ही प्रकृति शुद्ध ज्ञान अमुच्या वांट्यास ना या जनीं ॥
त्यातें जाणती एकची अनुसये सद्भक्तचूडामणी ॥
आतां अंत न पाहतां निवडुनी द्यावे पती सत्वरी ।
ऐसें बोलुन लोळल्या तिघी तिच्या जाऊन पायावरी ॥३४॥
त्यांच्या मागणीनें प्रसन्न होऊन,

॥ ओवी ॥
घेऊन पतीचें चरण तीर्थ । सिंचन केलें बालकाप्रत ॥
तै ते प्रगटले मूर्तिमंत । विष्णू, पिनाकी, विधाता ॥२५॥

॥ दिंडी ॥
पती तिघीचे देवून तिघीलाही ।
साध्वी झाली दु:खीत मनाठायीं ॥
नग्न होऊन म्या भीक वाडियेली ।
तयाची कां पूर्तता अशी झाली ॥२६॥

॥ ओवी ॥
अत्री ऋषी त्यावर । तिघा करुनी नमस्कार ॥
करितां झाला मधुरोत्तर । येणें रिती पहा ते ॥२७॥

॥ श्लोक ॥
जे थोर ते सत्त्व पहावयाला ।
येती परी ना करिती छळाला ॥
तुम्ही तिघे या जगतांत मोठें ।
जाता परी कर्म करून खोटें ॥२८॥
यावर त्रिमूर्ती म्हणाले,

॥ श्लोक ॥
हताश मनिं व्हा न हो मुनिवरा वरा मागणें ।
आम्ही न जरि तो दिला तरिच दोष हा लावणें
तुम्हा उभयताप्रती आम्ही प्रसन्न झालों पहा ।
सती अनसुया शुची विमल कीर्ति साध्वी महा ॥२९॥
अत्री म्हणाले,

॥ श्लोक ॥
तिघासारखा पुत्र व्हावा अम्हासी ।
नसावा परी एकही दोष त्यासी ॥
असें ऐकतां देव चित्तांत धाले ।
झणीं कौतुका यापरी तेथ केलें ॥३०॥

॥ पद ॥ ( भूपाळी )
सत्त्व गुणाचे दैवत श्रीहरी दत्तात्रय बनला ।
विधि शंभूच्या घेउन अंशा भूवर अवतरला ॥
षट् कर तैसें तीन शिरें ही लीलेनें धरिली ।
शूल शंख करीं चक्र कमंडलू बगलेसी झोळी ॥
दत्त दिगंबर जो विधिहरिहर पाहुनी मुनि धाला ।
दासगणूचें नमन असो त्या निशिदिनी पदकमला ॥३१॥

॥ आर्या ॥
हेमंती मृगशीर्षी संध्याकाळीं प्रदोष समयाला ।
पदनत रक्षक ऐसा दत्त प्रभू पौर्णिमेस अवतरला ॥३२॥

॥ पाळणा ॥
निज निज बा दिगंबरा । जगत्रया तूं आसरा ।
निद्रा कर थोडी, अवधूता । विनवी मुनिची कांता ॥
मी नाहीं तव जननी । कां कीं तूं व्यापुनी ।
अवघ्या जगताला आहेस । ठकवी मायाभास ॥
अज्ञजना करि शमना । निरसी अवघ्या द्वैता ।
विनवी दासगणू श्रीदत्ता । तव पदिं ठेवुन माथा ॥३३॥

॥ समाप्त ॥

N/A

References : N/A
Last Updated : August 12, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP