मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|कीर्तन आख्यान|श्री दासगणु महाराजांची आख्याने|
श्री तुलसीदास चरित्र ३

श्री तुलसीदास चरित्र ३

श्रीसद्गुरू दासगणु महाराजांची कीर्तनाख्यानें हीं अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण, रसाळ आणि विविध काव्यगुणांनी संपन्न असून श्राव्य काव्याचा तो एक उत्कृष्ट नमुना आहे.


राम म्हणाले,  

॥ श्लोक ॥
तूं वाल्मिकी तुजवरी मम प्रेम भारी ।
रामायणा रचुन हिंदित, लोक तारी ॥
मागें पुढें सतत मी तुझिया असेन ।
जेथे पडेल जड तेथेचि सांवरीन ॥४१॥

॥ ओवी ॥
आनंदवनीं जान्हवी तटीं । वाराणसींत असी घाटी ।
राहिले तुलसी करून मठी । आरंभ केला रामायणा ॥४२॥

॥ पद ॥
नमो नाथ हेरंब सरस्वति पकडूं गुरूकी कास ।
रामकथारस पीयुष परसो बहुत लागी है प्यास ॥
रामचरनकी बडि बलहारी पद मिलता अविनाश ।
ऐसा कहगये आनंद बनमो गनु कहे तुलसीदास ॥१॥४३॥

॥ लावणी ॥
झालि निशा दोन प्रहर तमानें अंबर कोंदाटले ।
आले तै धनाशा धरूनी तस्कर चोरि कराया भले ॥
ऐवज घेउन जाउं लागता द्वारी त्या अडविले ।
राम-लक्ष्मणें संताचे ते पहरेकरि जाहले ॥
जिकडे जावें तिकडे पुढती तेच उभे राहिले ।
दासगुण म्हणे चोर तयाला पाहुन घोटाळले ॥४४॥

॥ आर्या ॥
झाली प्रभात मग तें रात्रीचे वृत्त तुलसिला कळलें ।
धन्य धन्य तुम्हि तस्कर नयनीं श्रीरामचंद्र देखियेले ॥४५॥

॥ दिंडी ॥
नावं होतें हो जयत्पाल ज्याला । असा काशीचा साहु शांत झाला ।
तदिय भार्या सहगमन करायासी । निघालीसे, आलि तुलसि-दर्शनासी ॥४६॥

॥ अभंग ॥
हातिं भरला हिरवा चुडा । डोइवरती जाळी दांडा ।
भालिं मळवट रक्तवर्ण । मुखामाजी ते दांतवण ॥
डोळा काजळ घातिले । मुख हळ्दीनें माखिले ॥
हिरवे लुगडे नेसावया । ऐशी सजली सती जाया ॥४७॥

॥ ओवी ॥
साधूसी केला नमस्कार । चरणांवरी ठेविलें शिर ।
तयीं ते रामभक्त साचार । आशिर्वाद बोलले ॥४८॥

॥ साकी ॥
सो बरसतक जिवो बच्ची! सुख ले पतिके साथ ।
अष्टपुत्र देवेगा तुजकूं धनुकधारी रघुनाथ ।
वाकू स्मर मनमों । जो घट घटके तनमों ॥४९॥
तें ऐकून बाई म्हणाली, महराज! हा आपला आशिर्वाद कसा फलद्रप होणार?

॥ पद ॥
मैं जाती सती साधुराम इस घडि मेरे पतिके साथ ।
फिर मुझे कच्चे बच्चे कैसा देवेगा सुख श्रीरघुनाथ ॥
चला प्रेत रास्तेसे पतिका मै पीछेसे जाति रहीं ।
चरनकमलके दरसन खातर खडी हूं मूठमे आयी ॥५०॥
ते ऐकून तुलसीदास म्हणाले, असें काय? बरें आहे.

॥ पद ॥
बच्ची फिकिर छोडना । साच बचन मानना ।
क्या होतासो देखना । जनाजा कुं कर खडा ।
चल उठाता मर्दूक । रोति खालि काय कू ।
कम न कछू रामकू । वो जगतमे है भरा ॥५१॥
तुलसीदासाच्या आज्ञेने वाहकांनी प्रेत खाली ठेविले.

॥ पद ॥
मै बैठाहुं तोरे भरोसे जानकिजीवन रघुनाथ ।
जयत्पाल ये उठा देवोजी मेरे खातर श्रीकांता ॥
संदिपनीका बच्चा लायो बहोत दिनोसे यदुनाथा ।
ये न उठे तो गुन कहे आया झुटया कहना सब बाता ॥५२॥

॥ श्लोक ॥
फिरवितां कर ते शव ऊठले । सतिस त्य बहु कौतुक वाटलें ॥
मनिं म्हणे तुलसीप्रति ईश्वर । उचित ना म्हणणें कधिं या नर ॥५३॥

॥ श्लोक ॥
ओटी भरून सचिती पतिच्या सर्वं हो ।
लावी झणी स्वसदना परतून बा हो ॥
संता अशक्य करण्या जगलांत काहीं ।
बोले गणु विबुधहो! उरलेंच नाही ॥५४॥
ही जयत्पाल उठल्याची वार्ता दिल्लीच्या बादशहास कळाली. त्याने तुलसीदास दिल्लीस आणविले व तो म्हणाला कीं मला तो प्रेतें उठविणारा राम दाखीव.

॥ दिंडी ॥
पुढें नेलें दिल्लीस पहा वेगीं । अकबराने ते तुलसिदास योगी ॥
शहा बोले मज राम दाखवाया । तुम्ही ज्याची करितसां बहुत सेवा ॥५५॥
तुलसीदास म्हणाले, हे बादशहा मी राम दाखवीन. पण रामहि
तुझ्यासारखा फार मोठा आहे. तेव्हा त्याच्या सैन्याची सरबराई आधी कर.

॥ पद ॥
दावीन रामचंद्राला । श्री प्रभुला, नृपाला ॥
(चाल) परि आधीच्या तूं त्रासासी । सोसशील कां सांगे मजसी ॥
हाच प्रश्न उरला ॥५६॥
बादशहा म्हणाला ठीक आहे. रामाच्या सैन्याची सरबराई मी करीन. त्याची काळजी नको. मला राम दाखवा.

॥ आर्या ॥
एक पद्म ते वानर आले दिल्लीत त्रास लोकांला ।
झाला, मारूं जातां दुप्पट होती न ये मरण त्याला ॥५७॥

॥ पद ॥
दिल्लीमाजी कहर उसळला लोकिं पळापळ बहु झाली ।
कुणि म्हणे माझा डोळा फोडिला, कुणी म्हणे दाढी उपटिली ॥
कुणि म्हणे वानर समोर येउन विजार माझी फाडियली!
वारूं जातां त्यानेच उलटी मुखांत माझ्या भडकाविली!
(चाल) कुणि म्हणे घराची कौले तीं काढली ॥
कुणि म्हणे आमची तावदानें फोडिली ॥
कुणि म्हणे चुलीवर शौचाला बैसली ॥
कुणि म्हणे घरांतलि मुसळें घेउन खबर आमुची घेतियली!
पेटया फोडुन थैल्या नेल्या, फाडियल्या हो नव शाली!
गज शाळेचे हत्ती नेले सहज गतींने हो गगनीं ।
महात अवघे शिमगा करिती आणुन लोचनांमधिं पाणी ।
तोफखाना केला उताणा पहा पहा कपिराजांनीं ।
पळत्या घोडयावरील नेती स्वार अचानक उचलोनी!
(चाल) तंगडिला धरून वाण्याला भिरकाविती ॥
पिपे तेल तुपाचें रस्त्यावर ओतिती ॥
आपण तयाच्या गादीवरी बैसती ॥
‘भूप!’ करिती येउन मुखापुढे दंत आपुले विचकोनी ।
जो तो आपुल्या घरांत दडला, फिरे न कोणी रस्त्यांनीं ।
“ माटी मिल्ले व्हां क्या करते बिवी ले चले है बंदर ।
जनानेका किया खराबा दौडो भागो आवो अंदर ॥
साडी छीने निकले पशीने औरतोकी जान चली ॥
तोबा तोबा करने लागे, मूसे कहते इमाम अली ॥
(चाल) महेताबखा तो पठाण बाके बडे ॥
ठोकर लगीं बंदरकी ओ गिर पडे ॥
औरतके मुवाफक गफूर दाउत दडे ॥
आय खुदा अल्ला उताला रोषन्निगा तो जलदि कर” ।
देख रहे हनुमान तमाशा दासगनु कहे दिल्लीपर ॥५८॥

॥ श्लोक ॥
काजी म्हणे पढुं न देति कपी नमाजा ॥
बोले दिवाण कपि ना करु देति काजा ॥
बाजार सर्व लुटिला उदमी म्हणाले, ॥
सैन्यश बोलत अम्हां कपि शेर झालें ॥५९॥

॥ दिंडी ॥
राजवाडा उध्वस्त सर्व केला । तया योगें अकबरा त्रास झाला ॥
आला शेवटि तो शरण तुलसिदासा । नाक धरिल्या मुख उघडि मगर जैसा ॥६०॥

॥ आर्या ॥
आले कुठें आतांशी थोंडेसे सैन्य रामचंद्राचें ।
तो तूं घाबरलासी इतका, आल्यास सर्व होय कसें ॥६१॥

॥ ओवी ॥
अठरा पद्म वानर । त्यांतून आले दहा हजार ।
थोडी नृपा काढा कदर । पहाणें असल्यास रामातें ॥६२॥६२॥
या त्रासानें बादशहा तुलसीदासाला म्हणाला, तुमच्या रामाचें सैन्य असेंच येत राहील, तर या दिल्लीची धडगत बरी दिसत नाही! तुलसीदास म्हणतात,

॥ पद ॥
प्रसुतिंचे दु:ख सोसावें । तेव्हांच पुत्रवति व्हावें ॥अकबरा!
आधिं शीर हातावर घ्यावें । मग राजसौख्य भोगावें ॥
(चाल) प्रथम तूं भीशी, आणिक इच्छिसी, मात्र सुखराशी ॥
कसे लाभावे । गणु म्हणे चित्ती शोधावें ॥ अकबरा! ॥६३॥

॥ पद ॥
मजसि पावलें रामदर्शन वानर आटोपा ।
झालें अपुलें हाच समजतो लाभ मी मोठा ॥
(चाल) गुरुराया, हे सदया, विघ्ना या, ने विलया ॥
छलक बुध्दिला खचीत दिधला आजपासुनीं फाटा ॥६४॥
तुलसीदास म्हणाले ठीक आहे. हे बादशहा! तुझ्यावर फार मोठी जबाबदारी आहे.

॥ पद ॥
दिल्लीपती सम्राट तुं अससि अकबरा ।
थोरांनी नीतिपथा त्यजुं नये जरा ॥
हिंदु यवन रयत तुझी भेद करूं नको ॥
रामरहीम एक त्यासी भिन्न गणुं नको ॥
दुष्ट कुटिल कपटि खलां जवळ करूं नको ॥
(चाल) भूपा! बापा, कोपा, नित सावरि, सुजनावरि
करूणाकरि । सुखवि चाकरा ॥६५॥
असें म्हणूंन तुलसीदासानें बादशहास मारुतिला भेटविलें व सांगितले कीं, हे राम-सैन्याचे सेनापती आहेत. त्या सैन्याचा बंदोबस्त करणें यांचेकडे आहे. तुझी काय इच्छा आहे ती यांना कळीव. बादशहांनी त्याप्रमाणे मारुतीस विनंती केली. मारुतींनी वानरांचा बंदोबस्त केला.
॥ साकी ॥
बादशहा सुन बाबा अदमकी साची है ये मूरत ॥
बडे प्रभुके प्यारे है ये अतुलबली हनुमंत ।
पडको पद उनके । यही वसीले भक्तनके ॥६६॥

॥ पद ॥
जयजय श्री रामदुता! अंजनिसुता, प्रतापवंता
मम भवभयहर ॥जय०॥
दोणाचल जो शैलपती । घेउन हातीं, प्रतापज्योती ।
क्रमिलें अंबर ॥जय०॥
अहीमही खल मद्रियेले प्रभु रामासी, रक्षियेले ।
त्वां मज उध्दर ॥जय०॥
दासगणू तव आस करी । चरण धरी, ठेव शिरीं ।
तव करपंजर ॥जय०॥

N/A

References : N/A
Last Updated : September 22, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP