मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|कीर्तन आख्यान|श्री दासगणु महाराजांची आख्याने|
चरित्र २

श्रीसुदाम - चरित्र २

श्रीसद्गुरू दासगणु महाराजांची कीर्तनाख्यानें हीं अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण, रसाळ आणि विविध काव्यगुणांनी संपन्न असून श्राव्य काव्याचा तो एक उत्कृष्ट नमुना आहे.


॥ पद ॥ ( नृपममता )
परततां सुदामा द्वारीं । जाहला प्रगट कंसारी । अतुरतें ॥
मिठि मारि घट्ट पायाला । भगवान् लोळता झाला ॥ तत्पदीं ॥
( चाल ) द्विजवरा ! मदिय तूं खरा, गळ्यांतील हिरा,
धरी ना जरा, राग मजविषयीं । मित्रास पदरिं या घेई । द्विजवरा ॥२१॥

॥ ओवी ॥
सुदाम्यातें घेऊन पाठीं । नाचूं लागला जगजेठी ।
ती मौज पहाण्या दाटी । फ़ार झाली जनांची ॥२२॥

॥ लावणी ( भला जन्म ) ॥
द्वारकेंत त्या पुकार झाली, लोक बोलूं लागले ।
म्हणति अम्हि प्रेत सजिव पाहिलें ॥
अस्थिपंजर केवळ वपु ती, मान डुगडुगा हले ।
कुठें ना मांस लवहि राहिलें ॥
( चाल ) अंगिंच्या शिरा त्या सहज सकल गनवती ॥
तद्गाल जणूं का निरांजनें भासती ॥
घपघपा घाण ती येत तनूची अती ॥
पोट जयाचें कोनाडा तें, सांप्रत कीं जाहलें ।
तयाचीं हरि वंदित पाउलें ॥२३॥
इकडे परमेश्वरानें सुदाम्याला राजवाड्यांत आणून,

॥ आर्या ॥
बसवुनि सिंहासनिं त्या परमात्मा पाय दावि प्रेमानें ।
बहुत दिसांची भेटी, मित्रा ! केलें बरें तुवां येणें ॥२४॥

॥ ओवी ॥
“ आजपासोन मित्रोत्सव । द्वारकेंत करावा अभिनव ” ॥
ऐसें सचिवास सांगे देव । आणवून ते ठाईं ॥२५॥
परमेश्वर सुदामदेवास म्हणूं लागले कीं,

॥ दिंडी ॥
कुशल वहिनी, असति कीं मुलेंबाळें ।
मदिय भेटीला काय आणियेलें ॥
रिक्त हस्तें ना भेट कदा घ्यावी ।
भूपतिची, ही गोष्ट तुला ठावी ॥२६॥
सुदामदेव म्हणतात,

॥ श्लोक ॥ ( वसन्ततिलक )
देवा ! अकिंचन असे तव हा सुदामा ।
त्वन्नाम हेंच धन कीं मम साच रामा ॥
पोहे आहेत जवळी, परि लाज वाटे ।
द्याया तुला, मदिय प्राक्तन जाण खोटें ॥२७॥

॥ आर्या ॥
पीत पितांबर दिधला कौपिन सोडून त्यास ल्यायाला ।
कृष्णांगना खदाखद परि पाहुन फ़ार हांसल्या त्याला ॥२८॥

॥ ओवी ॥
इकडें ब्रह्मपुत्र नारदमुनि । अष्टनायिकां लागुनी ।
म्हणे देवरदर्शनातें झणीं । चला बायांनो ! ये वेळां ॥२९॥

॥ कटिबंध ॥
डुगडुगा हले ती मान, तनूची घाण, नेसण्या छान, एक लंगोटी ।
मस्तकीं वाढल्या जटा करामधें काठी ॥
ना मुखीं एकही दंत, कृश अत्यंत, मूर्ति साक्षात, दिसे काळाची ।
पाहण्या तयाला दाटि झालि लोकांची ॥
म्हणुनिया चला लौकरी, नमा द्वयकरीं, तया आदरीं, तूमचा भाया ।
तो असे म्हणुन सांगण्या आलों ये ठायां ॥३०॥
सरतेशेवटीं रुक्मिनी पुढें येऊन म्हणालोई कीं, सरळ सांगा.

॥ पद ॥ ( चंद्रकांता )
म्हणे रुक्मिणी कोण नारदा ! दीर आमुचा आला ।
थोडक्यांत परि स्पष्ट रीतिनें सत्वर सांगा मला ॥
( चाल ) पंचवदन विरुपाक्ष सदाशिव । तो कांहिं देवी नव्हे ग ! ॥
बोबडकांद्या पेंद्याभावजी ॥ तो० ॥
वा मथुरेसी ज्यांनिं आणविले ॥ तो० ॥
किंवा आला विदूर, उद्धव ॥ तो० ॥
धर्म, युधिष्ठिर अजातशत्रू ॥ तो० ॥३१॥

॥ ओवी ॥
नारद म्हणे, वो रुक्मिणी । हा तुझा दीर विचित्र जाणी ।
अधिकारें तव पतीहूनी । श्रेष्ठ आहे रंभोरू ! ॥३२॥

॥ श्लोक - वसंत तिलक ॥
ज्याच्या पदा न पुरलें त्रैलोक्य बाई ! ॥
जो विश्वरूप, मरमर्दन शेषशायी ॥
ऐसा जरी तव पती अतुल प्रतापी ।
तो त्या बसून हृदयीं निजबोध मापी ॥३३॥

॥ आर्या ॥
बाह्यस्वरूप ज्याचें वेड्यापरि कीं फ़ळीं जसा फ़णस ।
शुचि अहेतुक भक्तीचे या फ़णसें ते विपूलसे घोस ॥३४॥

॥ पद ॥ ( भूपती खरे )
तव पती कृष्ण तो पीतपीतांबरधारी ।
नेसला तुझा परि दीर वल्कलें सारीं ॥
वैडुर्यमण्यांनीं युक्त मुगुट एकाचा ।
एकाचे मस्तकीं जटाभार तो साचा ॥
एकाचे गाल गुलगुलित गेंदसे गमती ।
एकाचे लावण्या योग्य पहा फ़ुलवाती ॥३५॥
( चाल ) कस्तूरेतिलक ल्यालासे तव पती ॥
रुक्मिणी ! तुझ्या भायाला राख ती ॥
पहा अंतर दोघांमाजीं हें किती ॥
परि त्यजुनि थोरवी लोळे दिराच्या पायीं ॥
तो तुझा गोवळा दासगणू ज्या गाई ॥
हें ऐकून रुक्मिणीच्या थोडेंसें लक्षांत आलें. ती म्हणते :

॥ श्लोक ( वसंत तिलक ) ॥
आला असेल गमतें बहूधा सुदामा ।
या लक्षणांवरुनि सांगत साच रामा ॥
झाल्यास रे ! तदिय दर्शन मुक्त होती ।
प्राणी भवीं परतुनी नच जन्म घेती ॥३६॥

॥ साकी ॥
मुनि नारदके पीछे दौरत दौरत चलि मृगनयना ।
धन्य भाग्य ये मुनिजी ! मेरो साधुसंतसे मिलना ॥
बंदा वहां ये हरी । जो कोइ लेत फ़कीरी ॥३७॥
नारदाच्या मागें रुक्मिणी धांवली व म्हणाली, “ नारदा ! चला चला. त्या भक्तश्रेष्ठ सुदामाजीनें मला दर्शन घेतलेंच पाहिजे. ” असें म्हणून रुक्मिणी सुदामदेवापुढें आली व मोठ्या आदरानें नमस्कार करती झाली. तेव्हां त्यांनीं आशीर्वाद दिला कीं,

॥ ओवी ॥
वज्रचूड्र्मंडित । वहिनी ! तूं हो अखंडित ।
तुम्हां उभयतांपाशीं हेत । गुंतो माझा अहर्निशीं ॥३८॥

॥ पद ॥ ( नृपममता )
मटमटा देत मिटक्यांसी ।
बहुमोल मानि पोह्यांसी ॥ श्रीहरी ॥
करि टुकटुक माकड इतरां ।
माचा न पडों दे वारा ॥ तिळभरी ॥
( चाल ) ही अली, लाव ये स्थळीं, मला ना मुळीं,
म्हणे वनमाळी, सुचूं दे कांहीं ।
गणुदास लागतो पायीं ॥ ईश्वरा ॥३९॥
रुक्मिणी धांवली व श्रीकृष्णाच्या हाताला धरून म्हणाली कीं -

॥ आर्या ॥
जन्मोजन्मीं तुजला मी कृष्णा ! ना कधींहि सुटणार ।
जे ठायीं भाग तुझा तेथें अर्धा मदीय असणार ॥४०॥

N/A

References : N/A
Last Updated : August 12, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP