मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|कीर्तन आख्यान|श्री दासगणु महाराजांची आख्याने|
श्रीसंत सेना न्हावी चरित्र ४

श्रीसंत सेना न्हावी चरित्र ४

श्रीसद्गुरू दासगणु महाराजांची कीर्तनाख्यानें हीं अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण, रसाळ आणि विविध काव्यगुणांनी संपन्न असून श्राव्य काव्याचा तो एक उत्कृष्ट नमुना आहे.


॥ पद ॥ ( राग - मालकंस, ताल - झंपा )
अलेहमदुल्लील्ला इलाही इल्लील्ला ॥
अजब तेरि कुदरत है अल्लाहुताला ॥
अय् करीम, अय् रहीम, अय् खुदा, अय् रसूल, ।
अय् इमाम, अय् महबूब, करो सर्फ़ राजी हूं ।
मैं आपसे राजी ॥ भरा है तुही, तूंही दुनियामे अल्ला ॥६१॥

॥ श्लोक ॥
आहेस तरि कोण तूं मजसि हें न कांहीं कळे ।
विचित्र स्वरुपें तुझ्या मम मनास केलें खुळें ॥
तुझ्याविण नको मला मुळिंच कांहींही भूवरी ।
असें म्हणून लोळला नृप तदीय पायांवरी ॥६२॥

॥ ओवी ॥
तैं ईश्वरें माव केली । माया आपुली प्रेरिली ॥
ईश्वर स्वरूपाची झांकिली । जाणीव शहाची तेधवां ॥६३॥

॥ पद ॥ ( सुंदर सुख तुंदिल तनु० )
आज तुवा मदिय अंग सुबक दाविलें ।
हस्त तुझे बहुत मृदु जैशीं कां फ़ुलें ॥
हें घेई बक्षिस रे होन मुठभरी ॥
गोफ़ गळां, घाल कडे एवढें करीं ॥
पांघरण्या घेई हा शालु भरजरी ॥
मदिय चित त्वत्कृतिनें खचित तोषलें ॥६४॥

॥ आर्या ॥
गूण तुझे अति उत्तम, परि येशी ना कधींच वेळेला ।
नौकरी करावयातें, यायोगें येत राग तव मजला ॥६५॥

॥ ओवी ॥
नृपाचें बक्षीस घेऊन । गुप्त झाला रुक्मिणीरमण ॥
तो इतक्यांत पौरजन । आले कांहीं शहाकडे ॥६६॥
सेनारूपी देव गेल्यावर, गांवांतले संभावित लोक, सेनाबद्दल विनंति करण्यास बादशहाकडे आले व म्हणूं लागले,

॥ पद ॥ ( बर्‍या घातल्या गळ्यांत. )
वधूं नको सेनास भूपते अविचारें आजी ।
अशा कृतीनें राहिल कधिं ना रयत तुला राजी ॥
( चाल ) गरिबाला, दुबळ्याला, रयतेला, फ़ांसाला ॥
कधिं नच चढवी व्यर्थ गणु म्हणे ॥ जो कां रणगाजी ॥६७॥
अशी त्यांची विनंति ऐकल्यावर बादशहा म्हणाला,

॥ साकी ॥
मेरे रियामें हजाम सेना अकलमंद है बांका ।
उसी मुवाफ़क अजतक मैनें कुही नही अदमी देखा ॥
करूंगा वजीर मै उस्कू ॥ सल्ला मसलत देनेकू ॥६८॥
असें म्हणून बादशहा व सर्व लोक सेनाच्या घराकडे आले.

॥ दिंडी ॥
ऐकुनिया तें वृत्त सकल सेना । उठून पाहे धोकटीप्रती जाणा ॥
पारितोषिक दिसतांच रडूं लागे । म्हणे केलें हें काय पांडुरंगें ॥६९॥
बादशहा आपल्या घरीं आला आहे असें पाहून, सेना वारिक बाहेर आला व मोठ्या अदबीनें बादशहास मुजरा करून उभा राहिला. तों बादशहानें पुसलें कीं, “ सेना, आतां या वाटींत माणूस कां दिसत नाहीं ? तो मला पुन: दाखीव. त्याचें स्वरूप मला फ़ार आवडलें. ”
तें ऐकून सेना न्हावी घोटाळ्यांत पडला, व म्हणाला, मी यांच्या हजामतीला गेलों नाहीं. तेव्हां हा सर्व प्रकार माझ्या श्रीपांडुरंगानेंच केला असला पाहिजे, असें म्हणून धोकटीला हात घातला, तों त्यांत बादशहानें सांगितल्याप्रमाणें बक्षिस होतें ! म्हणून सेना न्हावी बोलूं लागला,

॥ पद ॥ ( नृपममता रामावरती० )
केलेंस काय हे रामा, मनमोहन मेघ:शामा । विठ्ठले ! ।
वारिक तुला जगजेठी आले होणें माझेसाठीं ॥ विठ्ठले ! ॥
( चाल ) धोकटी घेऊन बगलेसी । गेलास राजवाड्यासी ॥
त्या तुष्टविण्या भूपतिसी । श्रीकांता सद्गुणधामा ॥७०॥

॥ श्लोक ॥
प्रगटला तयीं तो करुणाकर । नरहरी मधुसूदन श्रीवर ॥
टकमकां जन ते बघती तया । गणुवरी करणें प्रभुजी दया ॥७१॥
देव प्रगट झाला असें पाहून सेना न्हाव्याच्या बायकोनें देवाचा हात धरिला व ती म्हणाली,

॥ अभंग ॥
तुझ्या घरची उलटी सारी । रीत आहे गा श्रीहरी ॥
माझ्या पतिनें सेवा केली । फ़लप्राप्ति नृपा झाली ॥
साखरेचा गोडपणा । परासाठीं नारायणा ॥
भूप तरला बरें झाले । भेट आम्हां परि विठ्ठले ॥७२॥

॥ पद ॥ ( सुंदर मुख तुंदिल. )
जयजय हे भीमातटवासी श्रीवरा ॥
भक्त कामकल्पद्रुमश्यामसुंदरा ॥
संतमना तोषविशी, नित्य माधवा ॥
भक्तिविणें गवससिना कधिंच केशवा ॥
( चाल ) तारी ॥ वारी ॥ सारी ॥ मम दैना ॥ अघशमना ॥
श्रीरमणा ॥ गणुसि उद्धरा ॥७३॥

N/A

References : N/A
Last Updated : September 18, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP