मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|कीर्तन आख्यान|श्री दासगणु महाराजांची आख्याने|
श्री कृष्ण लीला २

श्री कृष्ण लीला २

श्रीसद्गुरू दासगणु महाराजांची कीर्तनाख्यानें हीं अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण, रसाळ आणि विविध काव्यगुणांनी संपन्न असून श्राव्य काव्याचा तो एक उत्कृष्ट नमुना आहे.


॥ श्लोक ॥
होते चाल तयासि ते कल पह, धेली नगल्यापली ।
ज्याचे कान सुपासमान जननी ! जो स्वाल उंद्लावली ॥
दोले बालिक, लांब सोंद, फ़लशू होता जयाच्या कली ।
त्यातें पाहुन वातलें भय मला; मी गे ! पलालों दुली ॥२६॥
अर्थांतच यशोदेला खरें वाटलें नाहीं. ती म्हणाली,

॥ ओवी ॥
दाखीव कारट्या तुझें वदन । मशी येधवां उघडून ।
मोदक केलेंसी भक्षण । तूंच वाटे मजलागीं ॥२७॥
कृष्णानें मुख उघडलें मात्र, यशोदेला तेथें मोठें अद्भुत दर्शन झालें.

॥ दिंडी ॥
वदनिं ज्याच्या दिसले कि तिन्ही लोक ।
गोप गोपी गणनाथही अनेक ॥
नद्या, पर्वत पाहून मोठमोठे ।
यशोदेच्या मानसीं नवल वाटे ॥२८॥
गणपतीनें प्रकट होऊन चकित झालेल्या यशोदेस म्हटलें कीं,

॥ ओवी ॥
गणनाथ सांगे यशोदेसी । ‘ मूल लेखूं नको यासी ।
हा अनंत ब्रह्मांडासी । उत्पादिता निजलीलें ’ ॥२९॥
दुसरें दिवसापासून कृष्णाच्या खोड्या पुन्हां चालू झाल्या.

॥ पद ॥
वात सामळो यशोदा माई ।
तारो छोरो कठन बडो बाई ॥धृ०॥
( चाल ) दहि दुधानु मटका जी फ़ोडे ।
मारि नारंगि साडि जी फ़ाडे ॥बा.॥३०॥

॥ पद ॥
मोठा खट्याळ तुझा ग ! बाई ! कान्हा ।
आम्हा रस्त्यानं धड जाउं देइना ॥धृ०॥
( चाल ) जात होतो मथुरेच्या हाटा । यानें पोरांकडुन रोखल्या वाटा ।
धरि पदर करि ग ! धिंगाणा ॥आ०॥३१॥

॥ पद ॥
गोकूल छोडके मै जाती ॥धृ०॥
ईधर उधर ये फ़िरकर आतां ।
जहा चाहिये वहां छुपकर रहिता ।
नहि धुंडी तो जूति खिलाता ।
गनू कहे भगवान, सुनो ! ये क्या कहती ॥३२॥

॥ ओवी ॥
येऊन यमुनेच्या तिरीं । विचार करितां झाला हरी ।
चला रे ! गोकुळाभीतरी । खबर घेऊं गृहांची ॥३३॥

॥ ओवी ॥
घ्या रे सामुग्री बळकट । खडे सराटे काठ्या निट ।
वस्त्र गाळींव चोखट । मृत्तीका तैसि मुलानो ॥३४॥
शेवटीं त्रस्त झालेल्या गौळणींनीं यशोदेस सांगितलें कीं,

॥ आर्या ॥
ठेउं नको या कृष्णा सदनिं यशोदे ! वनामधें धाडी ।
हा रुतलेला कंटक होय बरा ना म्हणोनी या काढी ॥३५॥
त्याप्रमाणें,

॥ दिंडी ॥
गोप घेउनिया सवे जगन्नाथ ।
धेनु चाराया जाय काननांत ॥
यमूनेच्या बैसून तटाकासी ।
करी वादन वेणूस हृषीकेशी ॥३६॥

॥ ओवी ॥
त्या वेणुरवें गोकुळांत । गौळणी झाल्या घाबर्‍या बहुत ।
अवलोकाया कृष्णनाथ । वृंदावनीं धाविन्नल्या ॥३७॥

॥ पद ॥
चालल्या गौळणी भान कुणा नच कांहीं ।
कांकिं तें पोंचलें चित्त हरीच्या पायीं ॥
नाकांत घातिली कुडी कुंकु डोळ्यांत ।
पायांत सर्‍या, सांखळ्या, बाळे डोक्यांत ॥
( चाल ) वेणीस बाजुबंदाला, बांधिले ।  
काजळ कपाळी कोणी, लाविले
टाकून शिशू आठव्यासी, घेतलें ।
माया हि लाविते वेड म्हणे गणु हरिची ॥३८॥

॥ कटाव ॥
खेळ खेळण्या आला मुरारी । यमुना - तीरीं गोप बरोबरी ।
गोप सुंदरी निज धेनूला । हाका मारी भागिरथी ! ये ।
ये यमुने ! ये गोदावरी ! ये । नर्मदे ! ये कावेरी ! ये ।
ये कृष्णे ! ये भीमरथी ये ! । ये प्रवरे ! तूं ये ।
सिंधू साबरमती महीला । तुंगभद्रेला त्या पूर्णेला ।
बाहु लागला घन:सावळा । तीर्थें अवघी धेनुरूपानी ।
मिळवी, तेथें चापपाणी । देव बैसुनी आले विमानी ।
काला होतो अभिनव अवनीं चला पाहूया तो निजनयनीं ।
दुडदुड धेनू धांवत आल्या । हरि - चरणासी वंदुं लागल्या ।
निज पुच्छाच्या चवर्‍या केल्या । श्रीकृष्णांवर वारुं लागल्या ।
धेनु स्तनाला वत्स सोडुनी । चाटुं लागले निज जिह् वानी ।
नंदतनय तो शार्ङगपाणी । कां कीं तेथे गोडी म्हणुनी ।
हें कळलें त्या पशू असूनी । प्रभाव ऐसा संगतीचा ।
विठ्ठलाचा । दासगणु हो किंकर हरिचा ॥३९॥

॥ पद ॥
तूं टाक हरि ती मुरली ॥धृ०॥
सवत आमुची आम्हां खिजविते ।
आमुच्या देखत तुजसी रमते ।
अधर मधूनें धाली ॥तूं०॥
सुवंशजा जरि म्हणशिल तीतें ।
अंग रिते आणि छेदयुक्त तें ।
प्रिय कशी तुज झाली ॥तूं०॥
गुज गोष्टी तूं तिजसी करिसी ।
परि त्या कलवी ती सकलासी ॥
असे असुन करि धरिली ॥तूं०॥४०॥

॥ श्लोक ॥
कृतांत भगिनी - तटा निकट वाळवंटी खरा ।
उभा कमलजापती मुगुटिं मंजुळीचा तुरा ॥
उभारुनि करा वदे सकल गोपगोपीप्रती ।
चला त्वरित खेळण्या लव न हो करा वेळ ती ॥४१॥

॥ ओवी ॥
हमामा घाली हुंबरी । फ़ुगडी, पिंगा आणि टिपरी ।
दमविल्या गोपसुंदरी । खेळ खेळून हरीनें ॥४२॥
खेळ खेळून झाल्यानंतर मुलें आपल्या सर्व शिदोर्‍या एकत्र करून वर्तुळाकार बसली. श्रीकृष्ण स्वत: तो गोपाळकाला वाटूं लागले.

॥ अभंग ॥
काला वांटी नारायण । गोपि - गोपाळालागुन ।
देव मासे होउनिया । आले प्रसाद घ्यावया ॥
सांगे अवघ्या हृषेकेशी । नका जाऊं कालिदीसी ।
हात घ्यावया नेटका । तेथें सर्प आहे देखा ॥
ऐसें वदतां कमलापती । देव खिन्न झाले चितीं ।
गणु म्हणे ज्या संताचा । शेष मिळे तो दैवाचा ॥४३॥
 
॥ श्लोक ॥
काल्याचा मिळतां प्रसाद लवही तापत्रया तो हरी ।
हा काला नच काळ सच समजा पापाप्रती भूवरीं ॥
कष्टा वांचुनि मानवा कलियुगीं वैकुंठ हा देतसे ।
बोले दासगणू अम्हा कथियलें श्रीनिंबराजे असें ॥४४॥

समाप्त

N/A

References : N/A
Last Updated : August 10, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP