मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|कीर्तन आख्यान|श्री दासगणु महाराजांची आख्याने|
श्री माणकोजी बोधले चरित्र ३

श्री माणकोजी बोधले चरित्र ३

श्रीसद्गुरू दासगणु महाराजांची कीर्तनाख्यानें हीं अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण, रसाळ आणि विविध काव्यगुणांनी संपन्न असून श्राव्य काव्याचा तो एक उत्कृष्ट नमुना आहे.


उत्तरार्ध

॥ आर्या ॥
धामणगांवीं झाला प्रेमळ पाटील भक्त श्रीहरिचा ।
भाविक परम दयाळू प्रभु चरणीं हेत गुंतला ज्याचा ॥१॥

॥ दिंडी ॥
यमाजीचें बापास पौष मासीं । प्रार्थुनीया शेतास राखण्यासी ॥
करुन माळा नेऊन बैसवीले । पीक हुरड्याचें ऐन भरीं आलें ॥२॥

॥ ओवी ॥
धामणगांवच्या शिवारांत । एवढेंच पीक जोमांत ॥
ऋणी ज्याचा पंढरीनाथ । त्याचें कौतुक ऐसेंची ॥३॥
माणकोजी बोधले शेताला राखण बसले पण, तें नुसतें नांवाला.

॥ पद ॥
पाटील बसून माळ्याला । सानंद ध्याति श्रीहरिला ॥ निज मनीं ॥
गोफ़ण तशीच डोक्याला । वारिति करें न कवणाला ॥ तेधवां ॥
( चाल ) मनिं म्हणति जिवां प्रीत्यर्थ, पिकविलें शेत, लक्ष्मीकांत ।
धनी अवघ्यांचा । बाप जो अखिल विश्वाचा ॥ श्रीहरि ॥४॥
शेताजवळून एक ब्राह्मण चालला होता तो म्हणाला -

॥ अभंग ॥
“ तुमचा हुरडा हिरवागार । द्याहो पाटिल कणसें चार ॥
भूक पोटा लागली देखा । ‘ नाहीं ऐसें ’ सांगूं नका ॥
तैं पाटिल बोले तया । “ ऐसी दिनवाणी कासया ॥
तुम्हा जीवांच्या प्रीत्यर्थ । पांडुरंगाचें हें शेत ” ॥५॥

॥ श्लोक ॥
पाटील देतां कणसें द्विजाला । चित्तीं तयाच्या बहु मोद झाला ॥
तूं कर्ण बापा ! जगतीतलासी । आहेस, पावो ! तुज व्योमकेशी ॥६॥
ब्राह्मण कणसें घेऊन चालला असतां त्याला ममताईनें पाहिलें. ती नवर्‍याची भाकरी घेऊन शेतांत येत होती.

॥ कटिबंध ॥
भाकरी, टोपल्यांत शिरीं, मोरवा करीं, असे वरणाचा ।
चालतां पथें आवाज निघे वाहणांचा ॥
ढळढाळित, भालिं लाविलें, कुंकू तें भलें, उडे भूरभूर ।
वार्‍यानें पहा तेधवां डोइचा पदर ॥
( चाल ) खुळखुळति बांगड्या काळ्या, वरिवरी ॥
कोपली आधिच होती जी, अंतरीं ।
पाहून पतीस आपटील्या, भाकरी ॥
तळतळुन, सोडि वाक्शर, पाटलावर, “ कसेम बुडवीतां ” ।
पाटिलबुवा एक ना दोन, कांहीं बोलेनात. शेतांतल्या बाया ममताईला शांत करूं लागल्या. पण बाई आवरेना -

॥ ओवी ॥ ( बायकांचें चालीवर )
आहे वाटंवरलं शेतं, त्यांत पाटिल माळ्यावरी ।
आला निसवून जोंधळा । होय राखण कैशापरी ॥
लोक नेतीं कणसें बहू । हा कुणास धमकाविना ।
याचे नादें घालणें आला ॥ बाई मनगटावर चुना ॥८॥

॥ आर्या ॥
शपथ तुम्हा श्रीहरिची काढुन कणसें कुणास ना द्यावी ।
पाटिल ! आपुल्या हस्तें, चित्तीं ही खूणगांठ बांधावी ॥९॥
भाकरी ठेऊन वरीलप्रमाणें पाटलांना पांडुरंगाच्या शपथेंत पक्कें गोवून ममताई घरीं निघून गेली तोंच -

॥ दिंडी ॥
जोशि, डबरी, गोंधळी येउने गेले । फ़किर, वाघ्या, मग बलोद्दार आले ॥
वदे पाटिल, “ कणसांस तुम्हिच नेणें । शपथ मजला घातिली कामिनीनें ”
ही मंडळी हक्काची मागणी करणारी, तेव्हां ‘ आपला हात जगन्नाथ ’ असें तिथें झालें. मनमुराद कणसें घेऊन वरील मंडळी जातात  न जातात तोंच शेताच्या बाजूनें वारकर्‍यांचा समुदाय आनंदानें भजन करीत येऊं लागला -

॥ पद ( हे नव्हे मानवी ) ॥
पांढरे, धुवट साजिरे, जरीचे खरे, शिरीं असती ।
रुमालाची ती एक धर्ती हो ! ॥ कंठांत ॥
कंठांत, तुलशिची माळ, लोंबता टाळ, वजन ज्यांचें ।
असे प्रत्येकि पावशेराचे हो ! ॥ अंगांत, ॥
अंगांत, धवल अंगरखा, कपाळीं बुक्का, कान्सुलाच्या ।
वरी मुद्रा की चंदनाच्या, हो ! ॥ ढळढळित ॥
ढळढळित, असे वारकरी, कवाइत पुरी, भजनिं करिती ।
प्रदर्शन जगा दाख्विती हो ! ॥ खणखणा ॥
खणखणा, टाळ बोलती, पताका हातीं, मृदंग गर्जे ।
पिपी तुरक् तुत् शिंग वाजे; हो ! ॥ टणटणा ॥
टणटणा मारिती उड्या, बहुत काकड्या घेति गर्का ।
जणुं साळ्याचा सूत चरकह, हो ! ॥ असे जरी ।
असे जरी, सजले वारकरी, मुखीं आहे परी, नाम हरिचें ।
म्हणुन त्यालागिं नमन गणुचें हो ! ॥ सर्वदा ॥११॥

॥ श्लोक ॥
बघून घन अंबरीं शिखि जसा वनीं नाचतो ।
चकोर अथवा शशि बघुन पूर्ण वेडावतो ॥
तसा बघुन यांप्रती विबुध श्रेष्ठ माळ्यावरी ।
करी भजन, भान ना मुळिंच राहिलें अंतरीं ॥१२॥
तो भजनानंद पाटीलबुवांच्या पोटांत मावेना. ते स्वत:ला धन्यवाद देऊन वारकर्‍यांची स्तुति करूं लागले.

॥ अभंग ॥
ही तो संतगंगा आली । मज उद्धराया भली ।
किती वानूं यांच्या मुखा । गाती वैकुंठ नायका ॥
त्यांसि कराया वंदन । साधी बोधला उड्डाण ।
गणु म्हणे ना अंतरीं । शुद्धि, विठ्ठल त्या सांवरी ॥१३॥
दिंडी शेताकडेच वळली. पाटीलबुवा त्यांना लोटांगण घालूं लागले, आणि मोठ्या मिनतवारीनें व काकुळतीनें म्हणूं लागले, कीं, -

॥ श्लोक ॥
नाचा नाचा मम तनुवरी या तुम्ही खूप नाचा ।
गाहो ! गाहो ! भजनिंहि तसा नाथ तो पंढरीचा ॥
नाहीं नाहीं हरिविण दुजा देव दु:खांतकारीं ।
लागो लागो चरणधुळ ती तुमचीं या शरीरीं ॥१४॥

॥ श्लोक ॥
असें म्हणुन बोधला धुळिंत लोळण्या लागला ।
तयास परि सांवरि निज करें घन:सावळा ॥
पुशीत निज शालुनें कमलनाभ त्याच्या मुखा ।
करीत जननी जशी निज शिशूचिया कौतुका ॥१५॥
पाटीलबुवांच्या या वर्तनानें वारकर्‍यांना हसूं आले. ते म्हणतात -

॥ पद ( नृपममता० ) ॥
पाटील ! असें काम वेडे । झालांत भान सोडून ॥
राउळ नसें हें हरिचें । आहे निव्वळ काळें रान ॥
( चाल ) तुम्हि भक्त हरीचे कळले । मन भजनीं रंगुन गेलें ॥
प्रेमाश्रू नयनां आले ।
आधि चला जाऊं गांवांत । मग लोळा आनंदांत ॥ कीर्तनीं ॥
मुक्काम अम्ही करूं येथें । भोजना शिरापुरी करणें ॥
कोणास उपरणें जोडी । कोणास रुमाला देणें ॥
( चाल ) तुष्टेल तरी भगवंत । आदि दैवत पंढरीनाथ ॥
जो संताच्या अंकीत ॥
असे संत आम्ही घरिं न्यावें । आदरें चरण वंदावें ॥ तेधवां ॥१६॥
स्वत:ला संत असें भासवून दुसर्‍याची फ़सगत करणार्‍या या वारकर्‍याच्या अभिमानानेम केलेल्या भाषणाकडे, त्या सर्वांभूतीं भगवद्भाव झालेल्या पाटलाचें लक्ष गेलें व ते त्यांना जाणीव देऊन मोठ्या प्रेमानें व नम्रतेनें सांगतात :

॥ छक्कड ॥
हें काय न देऊळ हरिचें । माझ्या पंढरिच्या विठ्ठलाचें ॥ध्रु०॥
विश्विं भरला पुरा, बाप माझा खरा, । पुसा ज्ञानेश्वरा,
वेद बोलून गेलें जें वाचें ॥
जेथें जेथें भाव, तेथें तेथें देव, । कशास हवा गांव, ।
म्हणा ‘ रामकृष्णहरि ’ वाचें ॥
विठ्ठल नरहरी, हीच शिरापुरी; । सेवा अत्यादरीं; ।
कधिं जाड्य न होईल याचें ॥
नाहीं वृत्तिवरी, बोधला उड्या मारी, चित्तीं ठसला हरि: ।
गणूदास मी बटकूर त्यांचे ॥१७॥
हें पाहून वारकर्‍यांना हसें आलें. “ आपल्या शिरापुरीची योजना न करतां हा पिशासारखा उड्या काय मारतो आहे ? ” असें म्हणून ते परस्पर बोलूं लागलें कीं;

॥ अभंग ॥
हा तो पाटील वेडा पिसा । याचा नाद सोडा कसा ॥
सूर ठेक्याविण घे उड्या । जेवि माळ्यांतील रांगड्या ॥
कोण म्हणती वात झाला । डागा डागा लौकर याला ॥
गणू म्हणे हंसा मान । देति कावळे कोठुन ॥१८॥
शेवटीं वारकरी भजन करीत करीत जाऊं लागलें. तें पहातांच पाटील शुद्धीवर येउन -

॥ ओवी ॥
वारकरी जाऊं लागतां । बोधला घाली दंडवता ।
म्हणे; “ महाराज माझा वृथा । राग ऐसा मानूं नका ” ॥१९॥
तर मग तूं असा पिशासारखा काय करतोस ? या वारकर्‍यांच्या प्रश्नावर पाटीलबुवा म्हणतात :-

॥ पद ॥
खचित मी पिसा बनलों । या जग व्यवहारा मुकलों ॥ध्रु०॥
( चाल ) आतां; या दुबळ्या दीन खुळ्यावरि करणें ।
तुम्हि कृपा ; शरण आलों ॥२०॥
पाटीलबुवा ( वारकर्‍यांस ) -

॥ श्लोक ॥
शेतांत या बसुन खा हुरडा जरासा ।
माझी कधीं न करणें बुध हो निराशा ॥
तुम्हार्थ हा पिकविला जगदीश्वरानें ।
शाळू उपोशित असे, कुणिही न जाणें ॥२१॥

॥ आर्या ॥
यापरि पाटिल वदतां दिंडी शेतांत, आवघी शिरली ।
काढुनिया कणसांला निव्वल ताटे उभीं पहा केलीं ॥२२॥
याप्रमाणें वारकर्‍यांनीं पडल्या फ़ळाची आज्ञा समजून शेतांतील सारी कणसें खुडून खाऊन फ़स्त केली व ते पुन्हां भजन करीत पुढें चालते झाले.

॥ पद ॥ ( कटिबंध )
गांवांत कळलि ही मात, यमाजीप्रत, शाळूचें शेत, समुळ लुटवीलें ।
काढून सर्व कणसांस वारकरी गेले ॥
हा असा बाप तव पिसा, व्हावा मग कसा, सुखद संसार ? ।
घालीतां मीठ होय का गोड कधिं खीर ॥
( चाल ) शेतांत निवळ ताटें तीं राहिलीं ।
अवदसा तुझ्या बापाला, अठवली ॥
लौकीक लाज त्यानें ती, टाकिली ।
शुद्धि ना मुळिंच अंतरीं, नाचे वरिवरि, मुखीं जपे हरि, खंड ना त्याला ॥
देशील अतां तूं काय खोतिदाराला ॥२३॥

॥ दिंडी ॥
वृत्त ऐसें ऐकून यमाजीला । बोधल्याचा बहु राग मनीं आला ॥
म्हणे “ देवा ! हा बाप का मरेना ? तया योगें झालों मि दैन्यवाणा ॥२४॥
हें वर्तमान हां हां म्हणतां खोतीदारासहि समजलें. तो घाबरून ताबडतोब पाटलांच्या घरीं आला. तो यमाजीला पाहून म्हणतो : -

॥ पद ॥
यमाजी पाटिल ! मारो पैसा पाछळ आपोजी ।
तारो डोसो नहि नहि सारो अवे नहि हूं राजी ॥
खेतरमां तो अवे रहि माती दाणानूं नथि नाम ।
आपो रुपिया इस घदि मारा अवे तुमसे ना काम ॥२५॥
खोतीदाराचा तगादा चाललेला पाहून यमाजीचा निरुपाय झाला व तो त्याला निक्षून म्हणाला :

॥ आर्या ॥
दाम न सांप्रत द्याया, मजपाशीं एकही तुम्हा कवडी ।
जेथें तेथें माझ्या, पितयाचें कृत्य तें मला नाडी ॥२६॥

॥ ओवी ॥  
ऐसें ऐकतां दुरुत्तर । शेटजी कोपला अनावर ॥
बैसला जाऊन उंबर्‍यावर । धरणें घेऊन तयाच्या ॥२७॥
॥ पद ॥ ( लावणी )
ममताई -
नाहिं थेंब मुळीं पाण्याचा । रांजणी सई राहिला ।
करूं काय अतां या बाई । शेठजी दारिं बैसला
( चाल ) दारास लाविले कर, धरि तो घागर, जातां बाहेर,
चुलिंत विस्त्याला । हा घालुं देईना मला ॥२८॥
हें गार्‍हाणे यजमानानें ऐकतांच स्वारी शेठजीच्या जवळ तोर्‍यानें आली व त्याला दटावून सांगूं लागली कीं :

॥ श्लोक ॥
गुजराथ्या ! तुज एकही न कवडी पासून माझ्या मिळे ।
केलें या द्विजनीतिनें अजवरी बापास माझ्या खुळे ॥
आम्ही क्षत्रिय वीर तेजस बहू, मानूं मुळीं ना कुणा ॥
भोगाया धन, - कामिनी महितलां आम्हास स्वामीपणा ॥२९॥
यमाजीचें हें भाषण सती भागीरथीनें ऐकलें व त्याचें भाषण न्यायाला धरून नाहीं हें जाणून तिला रहावेना. ती मधेंच पडली व नम्रतेनें नवर्‍याला म्हणते,

॥ पद ॥ ( नृपममता )
आधिं दाम त्याचें घेऊन । बोलता उलट टाकून ॥ साहुसी ॥
( चाल ) ही नव्हे खचित सन्नीती, होईल दुनींती, रुक्मिणीपति, ॥
दुरावेल यानें, । पाटील आहां तुम्हि शहाणे ॥सन्मते॥३०॥
बायकांचें शहाणपण चुलीपुरतें असतां ही मध्यें तोंड घालून मला नीतीच्या आणि न्यायाच्या गोष्टी सांगते काय ? या संतापानें यमाजी भागीरथीला म्हणाला :

॥ पद ॥ ( छक्कड )
चर चर करूं नको सांभाळि तोंड ! टवळे ! सांभाळी तोंड ।
सांग वारुं कशि मी पैशाचि धोंड ॥ जलदी सांग ॥
( चाल ) घरादाराचा झाला उन्हाळा।
पाहिजे दुपारीं पोटास गोळा ॥
दाण्यापायिं काल बाजारा नेला ।
उरला होता जो ग ! एकच खोंड ॥
( चाल ) बरा पंढरीचा नाहीं तो काळा ।
माझ्या म्हातार्‍यास त्याचाच चाळा ।
भिकेस लाविलें घरादाराला ।
अजुनही थेरडा तो टाकिना खोड ॥३१॥
यमाजीच्या या अनुचित भाषणानें भागीरथीला वाईट वाटलें. पण स्त्री - धर्माला अनुसरून तिला कांहीं बोलतां येईना. परंतु कर्जमुक्त होण्याकरितां एक उपाय आपल्या पतीला सुचविण्याच्या उद्देशानें ती म्हणाली :

॥ अभंग ॥
साहूच्या मी गेहीं रहत्यें गहाण । फ़ेडावया ऋण, मामाजीचें ॥
मामाजीची सर नये जगीं कोणा । वैकुंठींचा राणा, वश ज्यासी ॥
अनंत जन्मींचें फ़ळा आलें पुण्य । म्हणूनी मी सून झालें त्यांची ॥
गणुदास म्हणे यमाजी पाटला । ऐसा जाव दिला, भागीरथीनें ॥३२॥
मामाजी करितां वाटेल तें करायला मी तयार आहे पण :

N/A

References : N/A
Last Updated : August 24, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP