मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|कीर्तन आख्यान|श्री दासगणु महाराजांची आख्याने|
श्री संत जनाबाईचें चरित्र १

श्री संत जनाबाईचें चरित्र १

श्रीसद्गुरू दासगणु महाराजांची कीर्तनाख्यानें हीं अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण, रसाळ आणि विविध काव्यगुणांनी संपन्न असून श्राव्य काव्याचा तो एक उत्कृष्ट नमुना आहे.


॥ आर्या ॥ ( गीति )
गंगाखेडामाजीं पुनित अशा गौतमी - तटा झाली ।
भगवद्भक्त जनी ती, ख्याति जियेनें जगत्रयीं केली ॥१॥

॥ दिंडी ॥
जनकजननी संगें ती पंढरीसी । आली यात्रे वंदण्या विठ्ठलासी ।
प्रखर झाला चंडांशु उन्हाळ्याचा । तयीं होता तो ज्येष्ठ मास साचा ॥२॥

॥ ओवी ॥
गरीबी ती अनावर । पताक पित्याचे खांद्यावर ।
पडशी मातेच्या शिरावर । टाळ हातीं जनीच्या ॥३॥

॥ दिंडी ॥
पीठ पिवळ्याचें नित्य खावयासी । वहान नव्हतें एकही बसायासी ।
त्रिवर्गातें भूमीच पहुडण्याला । अशा थाटें चाललें पंढरीला ॥४॥

॥ पद - कटिबंध ॥
ठेंगणी जनीची मूर्ती, असे कुरुप ती, नेसण्याप्रती, फ़ाटकी फ़डकीं ।
बिनकांठिं चोळि अंगांत असे बहु तुटकी ॥
सांवळा जियेचा वाण, नयन ते लहान, अखुडशी मान, शिरीं कच उडती ।
ना तेल म्हणूनि गार्‍हाणिं जणूं का करिती ॥
ना पदीं घालण्या वहाण, काकणें लहान,
करामधि छान, काळि खुळखुळती ।
निज बन्धु टाळ जो साथ तयाची करिती ॥
चटचटा पोळती पाय, तापला काय, उन्हानें हाय, झालि पथ क्रमितां ।
गणुदास म्हणे ही कठिण किती निर्धनता ! ॥५॥

॥ आर्या ( गीति ) ॥
शिवगण दापिती सूर्या प्रेरूं नको प्रखर त्वदिय किरणातें ।
कांकीं गौतमी - कन्या जात जनी येधवां अजोळातें ॥

॥ ओवी ॥
ऐसें ऐकतां तद्भाषण । बोलला सवितृनारायण ।
माते अवघे नेत्र उघडून । पाहुंद्या गौतमी - कन्येतें ॥५ अ॥

॥ पद ( हटातटानें पटा ) ॥
वायु, वरुण, त्रयचरण धनाधिप, इंद्रयणिचा पती जनीला पाहुनियां बोलती ॥ध्रु०॥
‘ निज कन्येला जनक - गृहासी धाडित पंढरपुरीं गंगा गौतमि गोदावरी ’ ॥

॥ ओवी ॥
चंद्रभागा अवलोकितां । जनीं हर्षली तत्त्वतां ।
घातिले तिनें दंडवता । शिखर दृष्टीं पडतांची ॥६॥

॥ दिंडी ॥
चिखल झाला पथानें पंढरींत । वरी वर्षें पर्जन्य अतोनात ।
मेघ पटलांनीं सूर्य लोपवीला । जसा दुर्जन झांकीत सज्जनाला ॥

॥ आर्या ॥
वस्त्रें अवघीं भिजलीं हूडहूडि भरली तदा त्रिवर्गाला ।
धनहीनता बहु पदरीं देति न जागा कुणी उतरण्याला ॥८॥

॥ ओवी ॥
न्यग्रोध वृक्षाचे तळवटीं । जाऊन उतरले शेवटीं ।
त्या चंद्रभागेच्या कांठीं । जनीचे ते मायबाप ॥९॥

॥ अभंग ॥
बया पोत खेळावया । आली होती तया ठाया ॥
आळोआळीं रडारडी । नाल्या खोल्या माजीं मढीं ॥
लोळूं लागली अपार । एकचि झाला हाहा:कार ॥
एक होता ढाळ वान्ती । प्राणी यमलोका जाती ॥१०॥

॥ आर्या ॥
जननीजनक जनीचे झाले हैराण फ़ार वाख्यांनीं ।
मुळमुळ जनी रडे तैं दुर्धरसा तो प्रसंग पाहोनी ॥११॥

॥ दिंडी ॥
उभयतांचे ते प्राण निघुनि गेले । अल्पवयि त्या जनिला न कळुनि आलें ।
शवालागीं जाऊन मिठी मारी । मुखावरचे जननीच्या केंस वारी ॥

॥ ओवी ( जात्यावरील ) ॥
आई ! कां न मला बोलसी ? । कां कठीण माया अशी ।
हें तरण तुज घालित्यें । घेईं पायां मी लागत्यें ॥१३॥

॥ आर्या ॥ ( गीति )
सुटली घाण शवासी परि न जनी त्या  क्षणैकही सोडी ।
वरचेवर कवटाळी, कुरवाळी सांवरून पासोडी ॥१४॥

॥ पद ( नृपममता ) ॥
द्विज - वेष घेऊनी आला । तिजपाशीं भीमातटवाला ॥
‘ तूं सांग कुणाची ? पोरी ! । वद मला हकीकत सारी ॥
 ( चाल ) हीं मढीं, चवाळ्यांवरी, कुणाची तरी ’ ॥
असें तिज वदला ॥ करि देव साह्य गरिबाला । पहा कसा ॥१५॥

॥ आर्या ॥ ( गीति )
यात्रेकरू आम्हीं बा ! आलों यात्रेस पंढरीमाजीं ।
ही न मढीं भूदेवा ! मातापितरें आहेत कीं माझीं ॥१६॥
तें ऐकून परमेश्वराला गहिंवर आला, व तिची समजूत घालण्यासाठी देव म्हणूं लागला कीं, ‘ खुळे पोरी ! हे तुझे आईबाप नाहींत. तुझे आईबाप आतां देवळांत भजन करीत बसले आहेत. मी त्यांचा बडव्या आहें.
रात्रीं कोणाचीं तरी प्रेतें वाहून आलेलीं आहेत. चल ! मीं तुझे आईबाप दाखवितों. तुझें नांव जनी आहेना ? तूं गंगाखेडची राहणारी आहेस. तें ऐकून जनाबाई घोटाळल्या व प्रेतांकडे निरखून पाहूं लागल्या, तों प्रेतें फ़ुगून गेल्यामुळें हे आपले आईबाप नसावेत असें तिला वाटूं लागलें; व ज्याअर्थी आलेल्या भटानें आपलें नांव घेऊन तूं गंगाखेडची आहेस असें म्हटलें त्या अर्थी माझे आईबाप नि:संशय देवळांत असतील व त्यांच्या सांगण्यावरूनच हा माझा शोध करण्याकरितां येथें आला असेल असेम म्हणून जनाबाई उठल्या आणि त्या आलेल्या भटाबरोबर देवळांकडे जाण्यास निघाल्या. इकडे देवाच्या आज्ञेनें गरुडानें त्या दोन्ही प्रेतांची योग्य ती व्यवस्था लावून टाकिली. असो. जनाबाईला घेऊन देव देवळांत आले.
गर्दी संपल्यावर देव पुन्हां जनाबाईपाशीं आला व म्हणाला ‘ जने ! चल, मी तुला आतां तुझे आईबाप दाखवितों. ’ असें म्हणून जनाबाईसह श्रीमंतांची स्वारी मुख्य गाभार्‍यांत आली व म्हणाली, ‘ जने, आतां माझ्याकडे पहा, मी तुझ्या चौर्‍यांशीं जन्माचे आईबाप आपल्या पोटांत दाखवितों ’ व त्याप्रमाणें देवांनीं तिला दाखविलें. तें पाहून जनाबाईस आनंद होऊन त्या म्हणाल्या, ‘ देवा ! आलेला भटजी दुसर तिसरा कोणी नसून तूंच होतास, हें मला आतां कळलें. ’
देव म्हणाले, ‘ जने ! आतां तुला जेव्हा जेव्हां आईबापाला पहावेसें वाटेल तेव्हां तेव्हां मजकडे येत जा, म्हणजे मी तुला ते दाखवीत जाईन. ’
अशा तर्‍हेनें जनाबाई गंगाखेडाहून ज्या पंढरीस आल्या, त्या पुन्हा परत गेल्याच नाहींत. या गोष्टीला सहा वर्षें झालीं.

॥ पद ( हटातटानें ) ॥
एके दिवशीं नामयाच्या दृष्टिस पडली जनी ।
पुसे तिज ‘ आलिस तूं कोठुनी ? ॥
अल्पवयीं परि शान्तपणाअचा तूं मेरू वाटसी ।
आहेत काम जननि जनक गे तुशी ? ’ ॥
( चाल ) ऐकून तयाचे बोल जनी बोलली ।
“ मम मायबाप ही साच विठू माउली ।
ठेवूनी कटीवरि हात उभी राहिली ।
त्याविण मजला कोणि न आतां अवघा हा श्रीहरी
सारी भिस्त तयाच्या वरी ” ॥१७॥

॥ दिंडी ॥
जनी उपवासें बहुत रोड झाली । नामदेवा तिज बघुनि दया आली ।
म्हणे, ‘ माझ्या गेहास चाल पोरी ! ’ अनाथाचे ते संत साह्यकारी ॥१८
घरीं जातांच गोणाबाईनें दोघांस पाहिलें, व नामदेवाला विचारलें कीं,

॥ पद ॥ ( दधिबेचन मैना )
‘ नाम्या ! ठोंब्या ! तूं वेडाच दिससी मला ! ॥ध्रु०॥
घरची उपाशी निशिदिनिं मरती । मग का तूं आणिलें हिला ? ॥
आग लागो तव संतपणासी । शिणवीलें व्यर्थ मला ’ ॥१९॥
जनाबाई म्हणाल्या,

॥ आर्या ॥
तापुं नको तूं माते ! राहिन उच्छिष्ट सेवुनी तुमचें ।
परि संत नामदेवा अशुभ असें गे ! नको वदूं वाचें ॥२०॥

॥ अभंग ॥
एके दिवशीं हृषीकेशी । आला नाम्याच्या गेहासी ॥
नामा, राजा, गोणाबाई । वसती झालीं एक्या ठायीं ॥
प्रेमभातुकीं भोजन । करिता झाला नारायण ॥
गणु म्हणे जनाबाई । आस त्याची करी पाही ॥२१॥

॥ ओवी ॥
कवळ घालिती एकमेकां । देव भक्तांच्या कौतुका ।
पाहण्याप्रती जनी देखा । द्वारामाजीं तिष्ठली ॥२२॥
जनाबाई मनांत म्हणूं लागल्या कीं, “ केवढा माझ्या सद्गुरूचा अधिकार कीं देव, प्रत्यक्ष त्याच्या एका ताटांत भोजनाला बसत आहेत !

॥ पद ॥ ( नृपममता रामा० )
मी हीन दीन भगवंता ! म्हणुनि का रमेच्या कान्ता ॥ या क्षणीं ॥ध्रु०॥
वगळिलें मला घननीळा । हे कमलनयन गोपाळा ! ॥ यदुपते !
श्रीधरा श्यामसुंदरा नटा नागरा भक्त - प्रियकरा ! तुझ्या उष्ट्याची
दासीहि भुकेली साची ॥ विठ्ठला ! ॥२३॥
जनाबाई दारांत उभी आहे, तें पाहून गोणाबाई म्हणाल्या,

॥ ओवी ॥ ( जात्यावरील )
उभी राही न मेल्यें द्वारा । घांस लागेल शार्ङ्गधरा ! ।
बसुं नकोस टोंकित इथें । जाइ लठ्ठे बाहेर जरा ॥२४॥

॥ आर्या ॥ ( गीति )
फ़ार बरें म्हणुनि जनी, जाउनि निज झोंपडीमधें निजली ।
परि ती गोष्ट विबुधहो ! भीमातटवासिया नसे रुचली ॥२५॥

॥ पद ॥ ( तूं टाक० )
झोंपडी वाटली जाण, जनीची छान । जरि वंश, गवत
तिजवरती, परि करी हरि तियेचा मान ॥ध्रु०॥
अंथरण्या वाकळ आंत । वरि ठिगळें तियेला सात ।
वळवळति उवा अत्यंत । घपघपा येत जरि घाण ।
परी ती झालि शालुवरि ताण ॥२६॥

॥ आर्या ॥ ( गीति )
होइल वेळ जनीला, म्हणूनि प्रभु काननीं शुभा वेंची ।
तिज गुज गोष्टी सांगे, ‘ आस जने ! मज तुझ्याच पायाची ’ ॥२६अ॥

॥ ओवी ॥
गोवर्‍य़ांची भरुनि पाटीं । निजशिरी ये जगजेठी ।
जनाबाईच्या प्रेमासाठीं । वेडा झाला विठ्ठल ॥२६आ॥

॥ आर्या ॥
मंचक, गाद्या त्यागुनि हरि तेथें वाकळीवरी बसला ।
भगवद्भक्त जनीचे चहुं हातें पाय दाबिता झाला ॥२७॥

N/A

References : N/A
Last Updated : August 24, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP