मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|कीर्तन आख्यान|श्री दासगणु महाराजांची आख्याने|
श्रीमत्स्येंद्रनाथ चरित्र ४

श्रीमत्स्येंद्रनाथ चरित्र ४

श्रीसद्गुरू दासगणु महाराजांची कीर्तनाख्यानें हीं अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण, रसाळ आणि विविध काव्यगुणांनी संपन्न असून श्राव्य काव्याचा तो एक उत्कृष्ट नमुना आहे.


हें ऐकून दासी म्हणाली,

॥ पद ॥ ( अजि म्या ब्रह्म )
त्यजि शोका लौकरी ।
जें झालें तें बरेंच झालें ।
त्याच बळावर सोय करुन घे । तूं पुढची लौकरि ॥धृ०॥
( चाल ) नाथ मछिंद्रा जाउं न द्यावें ॥
पुन्हा संततिस करुनी घ्यावें ॥
शवा सजीव हा कसें करि पहावें । थोडा दम धरी ॥६१॥

॥ पद ( आज श्याम ) ॥
नाथविरह होण्याचें भय सरलें याचमुळें ।
श्रावणवध दशरथास । तेविंच हा आपणास ॥
इष्ट हेतु साधण्यास । कारण हा कां न कळे ॥६२॥
गच्छेंद्रनाथ म्हणतात,

॥ झंपा ॥
अरे ! लाडक्या तान्हुल्य, मीननाथा ।
मला कोण बोलेल तुजवीण ताता ॥
नाथपंथांतरीं, निंद्य ठरलों जरी ।
मानिलें सुख परी, तुजसी पहातां ॥
तेंही नच लाभलें, कुठें न मज राहिलें ।
दावण्या मुख भलें, स्थान आतां ॥
शिष्य माझा भला, सुख न देई मला ।
उलट कीं जाहला, दु:खदाता ॥६३॥
तें ऐकून गोरख हसूं लागले व म्हणाले, “ गुरुमहाराज,

॥ पद ॥ ( चाल - कशि या त्यजूं पदाला )
अगाध खरि तव माया ॥
कुणा हंसविसी रडविसि कवणा । वेड पांघरसि बळें गुरुराया ! ॥
( चाल ) अजुन परीक्षा कितितरी घेसी ॥
शक्ति असुनिया बळें हिन बनसी ॥
यज्ञ जनां ही कळे तरि कैसी । म्हणत गणू हे सदया ॥६४॥
गुरुमहाराज ! या मीननाथाबद्दल शोक करूं नका. आपल्या चरणप्रतापानें तो मी उठवून देईन. ” असें म्हणून गोरखनाथांनीं -

॥ श्लोक ( मालिनी ) ॥
नमुनि गुरुपदाला पाठ संजीवनीचा ।
करित निजमुखें तो शिष्य मच्छेंद्रजीचा ॥
जपुनि जप विभूति लावितां कातड्याला ॥
फ़िरुन परत आले प्राण त्या बालकाला ॥६५॥

॥ आर्या ॥
तव होता तो गेला, हा अमुचा यास तूं सुखें घेई ।
ठेवुन घ्याया येथें मच्छेंद्रा उचर राहिला नाहीं ॥६६॥
मीननाथ सजीव झाला हें पाहून मैनाकिनीला मोठें कौतुक वाटलें, पश्चात्ताप वाटून मैनाकिनी म्हणते -

॥ अभंग ॥
केली मीं टवाळी वृथा अध्यात्माची । जोड पातकाची जोडीयेली ।
स्वानुभवी ज्ञान धन्य धन्य साचें । तुम्ही ईश्वराचें प्रतिनिधी ॥
सवें मीननाथा घेउनिया जावें । येथें न ठेवावें क्षणभरीं ॥
मैनाकिनी बोले त्यास ऐशा रीतीं । तेंच गाय गीतीं गणूदास ॥६७॥

॥ ओवी ॥
मैनाकिनीचें शिरावर । मच्छेंद्रानें ठेवितां कर ।
तिसी जो पडला विसर । त्याची आठवण जाहली ॥६८॥
मच्छेंद्रनाथांनीं मैनाकिनीच्या डोक्यावर हात ठेवल्याबरोबर तिला पूर्वींची आठवण झाली.

॥ दिंडी ॥
शाप होता उपरिक्ष्य वसूचा कीं ।
म्हणुन आलें जन्मा मी मृत्युलोकीं ॥
म्रुदत त्याची आलीसे भरत आतां ।
म्हणुन घडलें हे सर्व पुण्यवंता ॥६९॥
असो. मी आतां आपलें दर्शन घेऊन इंद्रलोकाला जातें. गुरुदक्षिणा म्हणून या तीन सोन्याच्या विटा झोळींत टाकल्या आहेत त्याचा स्वीकार व्हावा. ” असें म्हणू मैनाकिनी दिव्य देह धारण करून स्वर्गाला निधून गेली. सर्व लोकांना मच्छेंद्रांचा अधिकार कळला.

॥ पोवाडा ॥
विटा तीन - सोन्याच्या दिधल्या हळुंच टाकुनी झोळींत ।
नाथ मछींवर निघून गेले, नगर बुडालें विहरांत ॥
झोळीं, चिमटा, चिलीम, किनरी हींच आयुधें नाथांचीं ॥
मनुज न विचरे महीतलावर केवळ मूर्ती श्रीहरिची ॥
( चाल ) नासाग्रदृष्टि नयनाचें न पातें हालें ।
भूमीस लागेना पाय अधर चालले ।
झालि एक दृष्टि ना द्वैत कुठें राहिलें ॥
स्वानंदाच्या साम्राज्याला भोगित राहे सदोदित ।
दासगणूचा त्या सद्गुरुला असो सदा हा प्रणिपात ॥७०॥

॥ श्लोक ( मालिनी ) ॥
फ़िरत फ़िरत आले नाथ तैलंगणाला ।
पुसति हळुंच कानीं काननीं गोरखाला ॥
निबिडतर वनीं या भीति कांहीं असे का ? ।
वरित सतत माझें चित्त या व्यर्थ धाका ॥७१॥
म्हणून गोरखनाथ म्हणाले,

॥ सवाल ॥
अब त्रिभुवनके राजा गुरूजी योगी निरंजन तुमसे ।
भय किसीका रहा नहीं है डरडार क्यों करते मूसे ॥
सुख दु:ख, भ्रांती ज्ञान, अभय भय, सब कुछ रूप तुम्हारा ।
स्थावर जंगम, सब कुच आपही ज्यूदा न जगत् - पसारा ॥७२॥

॥ ओवी ॥
ऐसें बालेतां गोरखनाथ । मच्छेंद्र तोषले मनांत ॥
खोल बुद्धीच न सांगता । हेत आपला केव्हांही ॥७३॥

॥ दिंडी ॥
विटा झोळिंत पाहून गोरखानें ।
दिल्या फ़ेकुन काननीं निज करानें ॥
करित होते डरडर याजसाठीं ।
उपाधीची या मुळिंच नको भेटी ॥७४॥
पुन्हा एक दिवस मच्छेंद्रानें विचारलें कीं “ गोरख ! यहॉं कुयी डर है ? ” तें ऐकून गोरखनाथ म्हणाले. -

॥ पद ॥ ( अजि म्यां ब्रह्म )
डर मागें राहिला ॥
आज त्रयोदश दिन त्या झाले ।
झोळिस अपुल्या मीं शोधियलें ॥
अशिवापासुन मुक्तचि केलें । आहे तिजला ॥
तुम्हीं गुरूजी मुळीं न भ्यावें ।
निर्भय होऊन पथीं चलावें ॥
अवघें आहे तुम्हांस ठावें । शोधा त्याजला ॥७५॥

॥ श्लोक ॥ ( पृथ्वी )
अतां न डरडर करा उगिच वेड हो घेउनी ।
तमांत रवि चालला गणिल का खरें हें कुणी ॥
पुसावि निज मृत्युची तिथि जशी यमें जोशिया ।
तसेंच पुसणें असे मजसि हें गुरुराजया ॥७६॥
हें ऐकून मच्छेंद्रनाथ म्हणाले, “ बेटा गोरख ! - ”

॥ पद ॥ ( प्रतिकूल होईल )
वित्त व्यर्थ ऐसें वत्सा ! वाचेनें वदावें ।
परि न त्याग बरवा त्याचा संग्रहीं असावें ॥
नाशवंत मृण्मय तनु ही म्हणुनि प्राण बोले ॥
परि न तिच्यावांचुनि याचें जगतिं कांहिं चाले ॥
तेंच तत्त्व द्रव्याविषयीं कां न मनीं आलें ? ॥
पूजन आतां गोदावरिचें कुठुन करें व्हावें ? ॥७७॥

॥ श्लोक ( शार्दूल विक्रीडित ) ॥
सीनेच्या निकटीं असे बिकटसा अद्री सुगर्मागिरी ।
ज्याच्यापासुन पांच योजन पुढें तीर्थेश गोदावरी ॥
सौमित्रासह राम ज्या वनिं आला लंकेस जातां भला ।
धीराब्धी, गुणि, शालिवाहन जिथें राजा असे जाहला ॥७८॥

॥ आर्या ॥
कृपाप्रसादें अपल्या करितो हा मी पहाड सोन्याचा ।
दाविन जगत्त्रयाला गुरुवर्या ! प्रभव शुष्क विभुतीचा ॥७९॥
॥ पद ॥ ( आज शाम )
गर्भागिरि कांचनमय जाहला किं पडतां वरी ।
गोरखकरें धबल विभुति एक क्षणाभीतरीं ॥
धन्य धन्य मंत्रशात्र ! हेंच एक जगिं स्वतंत्र ।
प्रस्तरास हेम करित नवल वानुं कोठवरी ॥८०॥
मत्स्येंद्र म्हणाले,

॥ श्लोक ( वसंत तिलक ) ॥
पहिल्यापरी करुन ठेविं तूं पर्वतास ।
नाहींतरी महितला - वरती विलास ॥
वाढोनिया, नयनितिप्रति लोक सारे ।
होतील विन्मुख मुला धन ना बरें रे ॥८१॥

॥ श्लोक ॥
विभुत पुनरपी ती फ़ुंकितां गोरखानें ।
नगपति झणिं झाला साच पूर्वींप्रमाणें ॥
अतुल बलि असे त्या संप्रदायांत साधू ।
म्हणत गणु तयाचें सत्त्व तेंही अगाधू ॥८२॥

समाप्त

N/A

References : N/A
Last Updated : August 13, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP