मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|कीर्तन आख्यान|श्री दासगणु महाराजांची आख्याने|
चरित्र १

श्रीधनेश्वर - चरित्र १

श्रीसद्गुरू दासगणु महाराजांची कीर्तनाख्यानें हीं अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण, रसाळ आणि विविध काव्यगुणांनी संपन्न असून श्राव्य काव्याचा तो एक उत्कृष्ट नमुना आहे.


॥ श्लोक ॥ ( शा. वि. )
सह्याद्रीनिकटीं पुरातन असे इंद्रायणीचे तिर ।
शंभूचें शिवलिंग जेथ पुजिलें त्या किन्नरेशें हरा ॥
ज्या लिंगा म्हणुनी धनेश्वर अशी नामाभिधा लाधली ।
जे ठायीं नरवाहना वर शिवें देऊन केला बली ॥

॥ दिंडी ॥
देवगिरिच्या हेमाद्रि प्रधानानें ।
तिथें मंदिर बांधिलें आदरानें ॥
शैवभक्ती आपुली दाखवाया ।
विषय झाला तो दासगणुस गाया ॥२॥

॥ ओवी ॥
धनेशलिंगाशेजारीं । एक शिला होती खरी ॥
तीन श्लोक तियेवरीं । होते गीर्वानभाषेचे ॥३॥
त्यांपैकीं पहिल्या श्लोकांत असें लिहिलें होतें कीं,

॥ आर्या ॥
आहेत चार कोटी, पुरलेल्या या धनेशलिंगाच्या ।
खालीं चार हतावर, मोहरा बहुमोलशा सुवर्णाच्या ॥४॥
दुसर्‍या श्लोकांतील आशय असा होता कीं,

॥ दिंडी ॥
पांच वर्षाचा पुत्र ब्राह्मणाचा ।
शिर करिं जननीचें, पाय ते तातहातीं ॥
विकल मनिं न होतां, कंठ तो भूपतीनें ।
चरचर चिरुनीया नंतरीं द्रव्य घेणें ॥६॥

॥ पद ॥ ( मदिय प्रभव )
फ़िरत फ़िरत एक भूप सहज तेथ पातला ।
नमन करून शंकरास मंदिरांत बैसला ॥
( चाल ) नजर वरी जैं केली । तैं ति शिला दृष्टि पडली ।
वाचण्याचि बुद्धि झाली, वाचुं लागला ॥७॥
राजाचा विश्वास बसेना. म्हणून साशंक होऊन आपल्या प्रधानाला म्हणतो -

॥ पद ॥ ( धाडूं नको मज )
शब्द शिलेच्या वरचे । खचित असावें कल्पित साचे ॥
( चाल ) लिहिलें असुनी कां नच केला ।
यत्न धना वरि काढायाला ।
कां हा प्रथमची मजला दिसला । लक्ष कसें कवणाचें ।
गेलें न याकडे, वदे गणु वाचे ॥८॥
हें ऐकून प्रधान राजाला म्हणतो,

॥ श्लोक ( पृथ्वी ) ॥
असेल बहुतांनिं ही अजवरी शिला वाचिली ।
नसेल अटि वाचितां कुणिच यत्न केला मुळीं ॥
तशांत शिवलिंग हें खणुन द्रव्य काढावया ।
धजेल नच एकही मनुज भूपते ! लोकिं या ॥९॥
राजा प्रधानाला म्हणतो,

॥ दिंडी ॥
धनासाठीं होतात लढाया रे ।
धनासाठीं विकितात हटीं पोरें ।
धनासाठीं या कितिक प्राण देती ।
हीन द्रव्या कोनी न लेखिताती ॥१०॥

॥ आर्या ॥
लिहिली असेल वाटे ही बलिची आट दावण्या भीती ।
ज्ञान्यापुढें फ़िका कीं, भिववी बागुल अजाण मंदमती ॥११॥

॥ दिंडी ॥
एक कोटी हे शब्द किती गोड ।
म्हणुनि चित्ता हें धर्मवेड सोड ॥
लिंग शंभूचें हाहि एक धोंडा ।
गरज द्रव्याची मुळिं न पंचतुंडा ॥१२॥
या विचारांत राजा निमग्न झाला. इतक्यांत त्या राजाचें दैव म्हणा किम्वा कांहीं म्हणा -

॥ कटिबंध ॥
इतुक्यांत एक ब्राह्मणी, आली त्या स्थानीं, मुला घेऊन ।
नेसली बांड सुतकांठि, गरीबी पूर्ण ॥
त्याचीच कंचुकी खरी, रुळे कोपरी, बांगड्या हाता ।
काळ्याच, डोइचा भांग वाकडा नव्हता ॥
( चाल ) भूषण भालिं कुंकवाचें ढळढळित ।
नसुनिया तेल कच होते तुळतुळित ।
काजळ नयनिं घतीलें कुळकुळित ॥
भृकुटिच्या ठाइं हळदिचा, तिलक तो साचा, विराजे हातीं ।
वाहण्या बेल, तांदूळ ठेवण्या पुढतीं ॥१३॥

॥ श्लोक ॥
राजा पुसे, हा मुलगा कुणाचा । बाई म्हणे, याच अभागिनीचा ।
वर्षें पुरीं होतिल पांच यासी । येत्या नृपाळा ! बघ माघमासीं ॥१४॥

॥ पद ॥ ( नृपममता )
स्वमनांत भूपती बोले । हें कितितरी उत्तम झालें ॥ येधवां ॥
यावरुन यत्न केल्यासी । होईल प्राप्त धनराशी ॥ मजप्रती ॥
( चाल ) आजवरी, जगाभीतरी, सर्वतोपरी, फ़ोल ना ठरला ।
हें विदित असें सकळांला । गणु म्हणे ॥१५॥

॥ ओवी ॥
यावरी तो भूपती । गेला ब्राह्मणाच्या सदनापूढतीं ।
गरजवंताचे चित्तीं । मानापमान नुरतसे ॥१६॥
प्रत्यक्ष राजा आपल्या घरीं आलेला पाहून त्या भिक्षुक ब्राह्मणास फ़ारच आनंदाश्चर्य वाटलें. तो राजापुढें नम्र होऊन म्हणतो -

॥ पद ॥ ( शुकमुनी )
नृपवरा, सुगुनसागरा, लागले घरा, चरण आपुले ।
म्हणून वाटतें कुदिन सरले ॥ हो अजदिनीं ॥
अजदिनीं, अली पर्वणी, समजतो मनीं, धन्य आपणा ।
जसा कां हरि सुदाम - सदना । हो मागुती ॥
मागुती, कोणत्या रितीं, तुझा भूपती, करूं आदर ।
सकल बाजूंनीं मुळिं मी लाचार । हें पिढें ॥
हें पिढें, आहे एवढें, तोंचि मी पुढें, केलें बैस ।
रची हें कवन गणूदास । हो साच कीं ॥१७॥
राजा आपला मनोदय व्यक्त करूं लागला -

॥ श्लोक ( शिखरिणी ) ॥
तुम्ही दारिद्र्याला मदिय वचना मान्य करुनी ।
पिटाळूनी, नांदा सतत भटजी ! सौख्य - सदनीं ॥
विपत्तीं प्रापंचीं निरय दुसरा, यांत न मजा ।
तुम्हा मुद्रा देतों कनकमयशा लक्ष उमजा ॥१८॥
भटजीनें विचारलें कीं, “ सरकार ! आपण या लाख मोहरा मला कशासाठीं देणार आहांत ? ” त्यावर राजा म्हणतो -

॥ आर्या ॥
तुमच्या चार मुलांतिल तिसरा जो वर्ष पांचवें ज्याला ।
तो बलि द्यायासाठीं मज पाहिजे धनेशलिंगाला ॥१९॥

॥ पद ( मित्रा मम ) ॥
मी न्यायी भूप म्हणून हेतु कळवुनी ।
पुत्र विकत मागतसें आण हें मनीं ॥
जन्मापरी मरण जिवा ठेविलें असें ।
“ प्राण अमर अक्षयिंचा ” वेद वदतसे ॥
म्हणुन मोह त्यजुनि, वचन मान्य करि कसें ।
सुखि व्हाया हीच तुजसि आलि पर्वणी ॥२०॥

N/A

References : N/A
Last Updated : August 12, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP