मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|कीर्तन आख्यान|श्री दासगणु महाराजांची आख्याने|
चरित्र २

श्रीमदाद्यशंकराचार्य - चरित्र २

श्रीसद्गुरू दासगणु महाराजांची कीर्तनाख्यानें हीं अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण, रसाळ आणि विविध काव्यगुणांनी संपन्न असून श्राव्य काव्याचा तो एक उत्कृष्ट नमुना आहे.


( भाग दुसरा )

॥ श्लोक ( शार्दूलविक्रीडित ) ॥
नंबूद्रीकुलिं केरळांत शिव तो पूर्णा नदीच्या तिरीं ।
वेदोद्धार करावयाप्रति आला जन्मास भूमीवरी ॥
आर्यांबा जननी, पिता शिवगुरू पंडीत ज्या शोभला ।
कर्तृत्वें अपुल्या जगद्गुरूपदा जो का पुढें पावला ॥१॥

॥ दिंडी ॥
पुत्र नव्हता शिवगुरू पंडितासी । म्हणून त्यानें ध्यायिला व्योमकेशी ।
उभयतांचें तप जयीं पूर्ण झालें । अंबिकेच्या उदरास ईश आले ॥२॥

॥ आर्या ॥
पौर्णिमेस वैशाखीं रविवारीं त्या द्वितीय प्रहरांत ।
वेदोद्धार कराया आले जन्मास ईश साक्षात् ॥३॥

॥ लावणी ॥
आर्यमा पुरंदर विधी वरुन दिनकर ।
अप्सरांसहित ते आले गंधर्व यक्ष किन्नर ॥
पहावया प्रभूचा बालवेष भूवरीं ।
आश्चर्यचकित त्या झाल्या अवघ्याहि देवसुंदरी ॥
( चाल ) पाहिला बालवेषांत, पार्वतीकांत, हर्ष अत्यंत ।
ऋषींसी झाला । गणुदास नमी त्याजला ॥४॥

॥ पद ॥ ( नृपममता )
पहिल्याच वर्षि तो वदला । अस्खलित वाणि गीर्वाण ॥
कर जोडुनी उभे ज्यापुढती । श्रुति, सांख्य, तर्क, व्याकरण ॥
( चाल ) गुरु कोणी धजेना त्यासी ।
विद्या ती शिकवायासी ।
वाटलें चोज शिवगुरुसी ।
म्हणे कोठें नेऊन याला ठेवूं, तरी शिकावयाला ? ॥५॥
बापाच्या चित्ताची चलविचलता पाहून आचार्यांनीं मनांत विचार केला कीं, ‘ माझें हें करणें चुकतें आहे. मनुष्य किती जरी शहाणा असला तरी त्याला -

॥ श्लोक ( पृथ्वी )
बुधा जनपरंपरा कधिं न टाकितां ये खरी ।
श्रुतिज्ञ असुनी बटू शिकत कश्यपाचे घरीं ॥
तसा शिकत हा पहा गुरुगृहीं श्रुती शंकर ।
गुरु शिकवि जें तयापुढिल हा वदे अक्षर ॥६॥

॥ लावणी ॥ ( विकम्प ज्याच्या )
आचार्यांच्या विमल मुखानें श्रुतिचें तें अक्षर ।
येतां होई कुंडामाजीं प्रगटची वैश्वानर ॥
अभिनव ऐसें कौतुक पाहुनी अध्यापक तो मनीं ।
कुंठित होई, तेज हिर्‍याचें लोपेल तरि कोठुनी ॥७॥

॥ ओवी ॥
सहाध्यायांसह माधुकरीं । आचार्य मागती दोनप्रहरीं ।
एक्या दरिद्री द्विजाचिया घरीं । सहज पातलें एक्या दिनीं ॥८॥

॥ श्लोक ( इंद्रवज्रा ) ॥
पाहून सूर्यासम ब्रह्मचारी । कांता द्विजाची मनिं होय भारी ।
दु:खीत तेव्हां कर तो कपाळा । लावून पाहे वरती नभाला ॥९॥

॥ पद ॥ ( मंगल प्रभु मधुर नाम )
ओंगळ ही खचित वेळ । दैवदशें आली ॥
( चाल ) भिक्षा या घालण्यासी । कांहीं नसे आगरासी ।
आज मी उपवासी । कोण आतां वाली ॥
( चाल ) मी अभागि पूर्ण असें । पातकासी जोड नसे ।
व्हावें करें पुण्य कसें ? । पाव चंद्रमौळी ॥१०॥

॥ श्लोक ( वसंत तिलक ) ॥
होता घरांत आवळा बहु वाळलेला ।
तोची तिनें बटुप्रती झणिं अर्पियेला ॥
आणी म्हणे नमुन याविण अन्य कांहीं ।
नाहीं घरांत, निवटा धनहीनता ही ॥११॥
याप्रमाणें बाईची अतिथिपूजनाविषयींची निष्कलंक निष्ठा पाहून आचार्यांना परम संतोष झाला. त्यांनीं लगेच तिचें दारिद्र्य नाहींसें करण्याकरितां इंदिरेचें आवाहन केलें. ते म्हणाले,

॥ पद ॥ ( बागेश्री - त्रिताल )
झालीस का कमले, अशी तूं ।
रुष्ट द्विजावर हें कथि सत्वर पूर्ण करी हेतू ॥ध्रु०॥
( चाल ) भरीव याचे हेमफ़लांनीं । सदन आपुल्या अतुल कृपेनीं ॥
हें मी विनवित जोडून पाणी । मान वचा विमले ॥१२॥

॥ श्लोक ( पृथ्वी ) ॥
स्तवास परिसूनिया प्रकटली तिथें इंदिरा ।
चतुर्भुज मनोरमा विमलकीर्ति बिंबाधरा ।
नमून चरणा म्हणे गुरुवरा करूं मी कसें ? ।
अभागि द्विज हा पुर लवहि पुण्य केलें नसे ॥१३॥
तें ऐकून आचार्य म्हणाले,

॥ दिंडी ॥
त्वदिय अंबे लागले पाय जेथ । धनाची ती समृद्धि व्हावी तेथ ।
भास्कराचा तो उदय जेथ झाला । तेथ मिळतें का स्थान वद तमाला ? ॥१४॥

॥ पद ( नमुं तुजला ईश्वरा ) ॥
तै भरलें सदन तें ।
हेमफ़लांनीं क्षणांत एक्या, नुरल कुठें रितें ॥धृ०॥
( चाल ) असंख्य जन पहाया येती ।
आचार्यांना वंदन करिती ।
कुणि कमलेचे गूण वानिती ।
विबुध जनांचीं विविध मतें हो, वाटे नवल तें ॥१५॥

॥ ओवी ॥
या गोष्टीचा पुकारा । चहूंकडे झाला खरा ।
येऊं लागले भराभरा । लोक दर्शन घ्यायातें ॥१६॥

॥ लावणी ( राणि ती ) ॥
संहिता चारि वेदांच्या । स्वरसहीत अभ्यासिल्या ॥
नुसत्या न पाठ केल्या कीं । अनुभवुन असति पहिल्या ॥
( चाल ) आचारशुद्ध अत्यंत, म्हणुनिया, मंत्र, फ़लद होतात ।
आणा हें ध्यानीं । श्रुति नव्हे खचित कहाणी ॥१७॥
श्रीशंकरार्चांना पाहून लोक असें म्हणत असत कीं,

॥ पद ॥ ( शूकमुनी )
हा नव्हे मानवी पोर, कुणितरी थोर, धरुनि अवतार, देव आला ।
महीचा भार हरायला । हो केवढें ॥
केवढें अंगिं सामर्थ्य, याचिया सत्य, आली साक्षत, लोकमाता ।
त्यजुन वैकुंठ पहा आतां । हो मागुती ॥
मागुती सुदाम्या घरीं, येऊन श्रीहरी, दरिद्रा दुरी, करुन गेला।
तसा हा प्रकार इथें झाला । हो बनविला ॥
बनविला एक घटकेंत, धनिक अत्यंत, येथल्या येथ, कृती ऐशी ।
नव्हे हा मनुज व्योमकेशी ॥ हो गणु म्हणे ॥१८॥

॥ आर्या ॥
अवघी शिकून आले विद्या आचार्य परत कालटिला ।
पाहुन जननी धाली तैसा आनंद सर्व पौराला ॥१९॥

॥ ओवी ॥
नेम त्रिकालस्नानाचा । आर्यांबेनें केला साचा ।
समय वसंतऋतूचा । पाहुनिया वैशाखीं ॥२०॥

॥ लावणी ॥ ( भला जन्म )
एकादशिला माध्यान्हीसी स्नान करुनिया घरीं ।
जातां घडुन आलें यापरी ॥
तिरिप उन्हाची लागुन झाली जननी ती घाबरी ।
पडली चक्कर येऊन खरी ॥
( चाल ) पाहुनी असे ते लोक बहुत धांवले ।
उचलून तियेला सदनिं आणुन ठेविले ।
एकानें वृत्त हें आचार्यां कळविलें ।
तें कळतांचि धांवत आले आचार्य अपुल्या घरीं ।
घेतलें जननिस मांडिवरी ॥२१॥

॥ आर्या ॥
मांडीवरती अपुल्या जननीच्या मस्तकास घेतियलें ।
संध्यापळिनें वदनीं शीतोदक घालणें सुरु केलें ॥२२॥

॥ अभंग ॥
वाळा, कापूर, चंदन । एके ठायीं मिसळून ।
भालभागा लेप केला । देह शुद्धीवरी आला ॥
निजपुत्राच्या मांडीवरी । मस्तक पाहुनी म्हातारी ।
बहुत गेली गहिंवरुन । तिचें वर्णन करी कोण ? ॥२३॥

॥ पद ॥ ( गोदावरिच्या पासुनी )
माध्याहूनीचें स्नान साधण्या बाळा पूर्णेचें ।
कांठावरती जाऊन राहूं महिनाभर साचें ।
मळ्यांत अपुल्या करुन झोपडी त्याविण हें कांहीं ।
साधुन घ्याया उपाय दुसरा उरला बघ नाहीं ॥२४॥

॥ पद ॥ ( पोरे नच थोर )
हें नच मज योग्य दिसत । चंडांशू प्रखर बहुत ।
चटचटा ते पोळतात । पाय पथिं पहा ॥ध्रु०॥
कुटि नको ती राहूं घरीं । मीच तुला पाठीवरी ।
माध्यान्हिस पूर्णातिरीं । स्नान घालण्या ॥
नेइन गे जाण खचित । पूर्वभाग्य म्हणुन घडत ।
तव सेवा जननी सत्य । लाभ केवढा ॥
दासगणु म्हणत अशी । आचार्य जे ज्ञानशशी ।
ते विनती जननीसी । करिते जाहले ॥२५॥
ऐकून आर्यांबा म्हणाली, ‘ शंकरा ! -

॥ श्लोक ( वसन्त तिलक ) ॥
पाठीवरी तुजसि नेइन या वचानें ।
संतोषले मन, तसें न करी कृतीनें ॥
कां कीं त्वदीय पद कोमल फ़ार बाळा ।
बाधेल त्या प्रखर हा गमतें उन्हाळा ॥२६॥

॥ दिंडी ॥
दिलें न उत्तर यावरति मुळिच कांहीं । आचार्यांनीं रात्रीस केलें कांयी ।
प्रहर रात्रिला उदय चंद्रम्याचा । नभोभागीं जाहला असे साचा ॥२७॥

॥ पद ॥ ( उपवनीं गात कोकिळा )
व्योमीं, उदय पावला ।
शीतलसा रजनिनाथ, प्राचीला ॥धृ०॥
( चाल ) झालि आनंदीत निशा, उजळल्यात दाहि दिशा ।
त्या धाकें भ्याला तम, दरिंत बैसला ॥
( चाल ) चक्रवाक् कुजबुजती । शशिसन्मुख नाचताती ।
पवन मंदमंद गती । वाहुं लागला ॥२८॥
अशा रम्य वेळीं आचार्यांनीं पूर्णेची प्रार्थना केली.

॥ पद ॥ ( रजनिनाथ हा )
पूर्ण करिसि तूं मनीषा म्हणुनी ।
म्हणति तुला जन पूर्णा जननी ॥धृ०॥
( चाल ) प्रत्यंतर तें याचें यावें । मम सदनाच्या समिप चलावें ।
आर्यांबेला तें घडवावें । स्नान प्रत्यहीं तव माध्यान्हीं ॥२९॥
तें ऐकून पूर्णा म्हणाली,

॥ पद ॥ ( मंद बुद्धिचे जन )
चला आचार्या, मी येतें । तुम्हि जोडुं नका हे कर मातें ॥धृ०॥
पूर्णब्रह्म परमेश परात्पर, आद्य जनक या जगतातें ।
तुम्हीच, नाहीं कुथें तुम्हांविण । त्रिभुवनीं या स्थान रिते ॥
मनुष्यनाट्य हें धारण केलें, परी आपुलें ना लपतें ।
मूळ तेज तें दीनदयाळा, वासें कस्तुरी जशि कळते ॥३०॥

॥ आर्या ॥
मागोमाग आलें मी तुमच्या आपण पुढें चला नीट ।
योग्य जगीं चालाया जी गुरुंनीं दाविली असे वाट ॥३१॥

॥ श्लोक ॥ ( इंद्रवज्रा )
मागून पूर्णा पुढती आचार्य । आले गृहीं ना घडतां अपाय ।
येथूनिया संतत तूं वहावें । हे बोल खोटें मम ना करावें ॥३२॥

॥ ओवी ॥
आचार्यवचन ऐकोनिया । लागली पूर्णा तेथून वहाया ।
ओघ पूर्वींचा सोडोनिया । हें सामर्थ्य सद्गुरूचें ॥३३॥
पूर्णा नदी गांवाजवळून वाहूं लागली हें पाहून गांवांतील लोक आश्चर्यचकित झालें.

॥ कटाव ॥
दुसरे दिवशीं प्रात:काळीं । कालटिची ती पौरमंडळी ।
गांवाबाहेर येऊं लागली । नयनीं पूर्णा पाहुन धाली ।
अती अतुरते एकमेकां । पुसूं लागले जन ते देखा ।
कोण असा अधिकारी बाका । आहे आपुल्या गांविं कळेना ।
ग्रामामाजीं कोणि न उरले । अवघे जन ते बाहेर आले ।
सुवासिनी त्या अपुलीं बाळें । घेउनिया कीं कडेस पहाती ।
पूर्णानदिला हात जोडिती । कोणि खणानें ओट्या भरती ।
धनिकमंडळीं स्नानें करिती । भिक्षुक त्या संकल्प सांगती ।
विद्वानांनीं कयास केला । हा जो नदिचा ओघ फ़िरविला ।
ग्रामाचीया सान्निध्याला । तो जननीच्या स्नानासाठीं ।
शंकर अपुला ज्ञानजेठी । मनुज नव्हें साक्षात् धूर्जटी ।
म्हणून ऐसा प्रकार जहाला । दासगणू हा वंदित त्याला ॥३४॥

N/A

References : N/A
Last Updated : August 13, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP