मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|कीर्तन आख्यान|श्री दासगणु महाराजांची आख्याने|
श्रीनरहरि अवतार ( संक्षिप्त )

श्रीनरहरि अवतार ( संक्षिप्त )

श्रीसद्गुरू दासगणु महाराजांची कीर्तनाख्यानें हीं अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण, रसाळ आणि विविध काव्यगुणांनी संपन्न असून श्राव्य काव्याचा तो एक उत्कृष्ट नमुना आहे.


( संक्षिप्त )

॥ श्लोक ॥
प्रबल असुर झाला धातयाच्या वरानें ।
यजन पुजन झाले बंद त्याच्या भयानें ॥
मुनि जटि तपि धाके लोपले कंदरींत ।
प्रबल तविं उदेली काळजी निर्जरांत ॥१॥
हिरण्यकश्यपू तपश्चर्येच्या बळावर ब्रह्मदेवाकडून लाभलेल्या वरानें मस्त होऊन अधर्मानें वागूं लागला. त्यामुळें त्रस्त झालेले देव विष्णूस शरण गेले व त्यांनीं त्यांच्या वराची वार्ता विष्णूस सांगितली.

॥ दिंडी ॥
विधात्याच्या जो वरे प्रबल झाला ।
मरण नाहीं राति वा दिवा त्याला ॥
पशू पक्षांच्या तेविं मनुजहातें ।
घात त्याचा होइना शस्त्रपातें ॥२॥
आणि देवांनीं प्रार्थना केली कीं,

॥ कटिबंध ॥
श्रीवर कृपा ती करा, अम्हा आसरा तुझेची पाय ।
माजला कनककश्यपू महिवरी पाह्य ॥
यासाठीं धरी अवतार, महीचा भार, करावा दूर याचना तुजसी ।
सांभाळ संत सज्जना सदा हृषिकेशी ॥३॥
विष्णूंनीं प्रगट होऊन उत्तर दिलें.
 
॥ श्लोक ॥
मद्भाव हाच शिशु होईल कीं तयाचा
प्रह्लाद नाम धरुनी निधि सद्गुणाचा ॥
त्यातें छळील नृप जै अति दुष्ट भावें ।
जन्मास येईन तयीं मग मी स्वभावें ॥४॥
या भगवंताच्या इच्छेप्रमाणें हिरण्यकश्यपूची पत्नी कयाधू हिच्या उदरीं प्रह्लाद जन्मास आला. पांच वर्षाचा होतांच त्याला हिरण्यकश्यपूनें राक्षस - गुरूच्या आश्रमांत पाठविलें.

॥ पद ॥
गेला गुरूच्या गेहीं ॥ विद्या ती शिकण्या पाही ॥
( चाल ) ती असुर गुरुची शाळा । कोठून पटावी त्याला ॥
त्या आश्रमांतील शिक्षण प्रह्लादाला मानवणारें नव्हतेंच पण प्रथमच,

॥ श्लोक ॥
ओंकार तो शिकविताच कुमार धाला ।
आतां पुढें न करणेम गुरुजी श्रमाला ॥
येणेंच होइन खरा जगिं मी कृतार्थ ॥
हें सार याविण दुजें अवघेच व्यर्थ ॥६॥
प्रह्लादाचें हे बोलणे ऐकून गुरु षंढामर्क म्हणाले.

॥ आर्या ॥
षंढामर्क म्हणे तै राजकुमारा तुला न हें उचित ।
हें तव पित्यास कळतां होइल बापा क्षणांत विपरीत ॥७॥
पण तें प्रह्लादास पसंत पडलें नाहीं.

॥ दिंडी ॥
तें न ऐके प्रह्लाद मुळींच कांहीं ।
म्हणुनी गुरुनें नेला तो राजगेहीं ॥
अरे राजा हा शत्रू तुझ्या पोटीं ।
आला रत्नाच्या वंशि गारगोटी ॥८॥
षंढामर्काचें बोलणें ऐकून हिरण्यकश्यपू प्रह्लादास म्हणाला,

॥ पद ॥ ( नृपममता )
भजु नको मुला तूं त्यासी । त्यानेंच वधिले बंधूसी ॥ माझिया ॥
( चाल ) तो देव नव्हे आहे भूत ।
ओंगळ नीच अत्यंत ॥
जाहला सुकर साक्षात ।
तूं राजहंस मम कुलिचा । प्रह्लादा अससी साचा ॥ हे मुला ॥९॥
त्यावर प्रह्लादानें सांगितलें कीं,

॥ श्लोक ॥
नाहीं तयाविण नृपा जगतांत कांहीं ।
तो विश्वव्यापक प्रभू विठु शेषशाई ॥
तूं ही न द्रोह करणें जगदात्मयाचा ।
येणेंच होशील खरा बहु धन्य साचा ॥१०॥

॥ ओंवी ॥
ऐसें बोलता कुमार । हिरण्यकश्यपू कोपला फ़ार ।
म्हणे करा या सत्वरी ठार । हें पोरटें बरें नसे ॥११॥
हिरण्यकश्यपूच्या आज्ञेप्रमाणें राक्षस सेवकांनीं प्रह्लादाला मारण्याचे अनेक प्रकारचे प्रयत्न केले.

॥ श्लोक ॥
कड्यावरून लोटला परि न मृत्यू आला मुळीं ।
तसाच स्थिर राहिला परम उग्र दावानळी ॥
समर्थ नच जाडले किमपि शस्त्र मारावया ।
खराच हरिभक्त तो गणित ना कशाच्या भया ॥१२॥
प्रह्लाद मरत नाहीं असें पाहून हिरण्यकश्यपू मनाशीं म्हणाला.

॥ लावणी ॥
काय करावें या पोराला मृत्यू न ये याजला ।
कसा हा अमर जगीं जाहला ॥
पर्वत - शिखरावरूनी दिधले लोटुन या खालती ।
परी ना दुखावला तिळरती ॥
अग्नि जगाला जाळी परंतु शीतल तो जाहला ।
बघता या पोरासी भला ॥
शस्त्रास्त्राची गति ती कुंठीत या पोराच्यापुढें ।
शिशू ना मृत्यूच माझ्यापुढें ॥१३॥
त्यानें आपल्या पत्नीस सांगितलें कीं,

॥ श्लोक ॥
सौभाग्य वृक्ष तव छेदन गे कराया ।
हें कारटें उपजलें तुझियाच ठाया ॥
देवोनिया विष मुलास झणी वधावें ।
हा रोग यावरि न प्रेम कधीं करावें ॥१४॥
ही आज्ञा कयाधूला मोठी अवघड वाटली ती म्हणाली.

॥ श्लोक ॥
देउ काय वीष यास लेकरास या करे ।
तेंच वीष मीच घेत वांचणें आतां पुरे ॥
माय वीष घेत हें बघून पुत्र धांवला ।
भाग हा मदीय साच तूं न घेई त्याजला ॥१५॥
प्रह्लादानें आईंच्या हातांतील विषाचा पेला काढून घेतला आणि आपल्या तोंडास लाविला.

॥ श्लोक ॥
ग्रहण करी विषाला भक्त प्रह्लाद जेव्हां ।
बघत नृपती होता आड राहोन तेव्हां ॥
म्हणत मनीं कसें या वीष मारीत नाहीं ।
मदिय मरण वाटे साच याच्याच पायीं ॥१६॥
हिरण्यकश्यपूनें त्वेषानें विचारिलें;
॥ झंपा ॥
कुठे रे कुठे तुझा साह्यकारी ।
असें बोलला गर्जुनी निर्जरारी ॥
पाय आपटी भले । केंस पिंजारिले ॥
नयन रक्ताळले । क्रोध भारी ॥
सांग वेगे मला । वधिन त्यासी मुला ।
लपुन कां बैसला । मम पुढारी ॥१७॥
प्रल्हाद म्हणाला,

॥ श्लोक ॥
सर्वत्र तो भरुनिया जगतांत आहे ।
कोठे तयाविण रिते जगतांत नोहे ॥
भावावीणे मुळिं न ये बघ प्रत्ययाला ।
सर्वाद्य जो भजतसे गुणदास त्याला ॥१८॥
हिरण्यकश्यपूनें विचारिलें,

॥ आर्या ॥
हा दिसतो स्तंभ पुढें दारूमय शुष्क भक्ष्य अग्नीचे ।
यांत तुझा तो काळा आहे कां कारट्या ! वदे वाचे ॥१९॥

॥ पद ॥ ( प्रकटला कीं )
दिसत पुढती माझ्या जो हा स्तंभ लाकडाचा ।
त्यांत सांग आहे कां रे वास त्या खलाचा ॥
होय म्हणुनि प्रह्लादानें मान हालविली ।
तेणें चढली भूपाच्या त्या नयनद्वया लाली ॥
करिची गदा आपुली त्यानें सहज सावरिली ।
गर्भगळित झाला तेणें समुह राक्षसांचा ॥२०॥

॥दिंडी ॥
स्तंभीचा तो पाहण्या जगन्नाथ ।
भूपतीनें मारिली पहा लाथ ॥
तया स्तंभा तै घोर ध्वनी झाला ।
नाहीं उरली हो जोड कुठें त्याला ॥२१॥
स्तंभांतून अत्यंत भयंकर असा ध्वनी उमटला आणि,

॥ श्लोक ॥
कड कड कड मोडे स्तंभ तो त्या क्षणांत ।
धड धड धड व्योमी दुंदुभी नाद होत ॥
पट पट पट भूसी तारका पुंज लोटे ।
तड तड तड भूमी ठायिच्या ठायी फ़ाटे ॥२२॥

॥ आर्या ॥
वैशाख शुद्ध पक्षीं चतुर्दशीसी प्रदोष समयाला
रक्ताक्षी सिंहमुखी ऐसा श्रीनारसिंह अवतरला ॥२३॥

॥ समाप्त ॥

N/A

References : N/A
Last Updated : August 05, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP