मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|कीर्तन आख्यान|श्री दासगणु महाराजांची आख्याने|
श्रीवामन अवतार ( संक्षिप्त )

श्रीवामन अवतार ( संक्षिप्त )

श्रीसद्गुरू दासगणु महाराजांची कीर्तनाख्यानें हीं अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण, रसाळ आणि विविध काव्यगुणांनी संपन्न असून श्राव्य काव्याचा तो एक उत्कृष्ट नमुना आहे.


॥ श्री ॥
सुरपतिपद घ्याया यज्ञ रेवातटाला ।
करित नृप बली तो घेउनी दानवाला ॥
म्हणुनी बहु उदेली काळजी निर्जरास ।
सकल मिळुनी आले क्षीरसिंधूतटास ॥१॥
बलीचे शंभर यज्ञ पुरे झाल्यानंतर आपलें इंद्रपद जाईल या भीतीनें इंद्र सर्व देवांसह विष्णूस शरण आला आणि म्हणाला,

॥ दिंडी ॥
पाकशासन हे म्हणत देवराया ।
सिद्ध झाला बलि मदिय स्थान घ्याया ॥
पुरें न मन्वंतर अजुनी मदिय झालें ।
तोंच कां हें स्थानास विघ्न आलें ॥२॥

॥ लावणी ॥
आणिक जयांच्या वंशावरती तुझी कृपा श्रीवरा ।
झाला तोच शत्रु आजी खरा ॥
आतां तयाचें पारिपत्य तूं करशिल कोण्यारिती ।
काळजी हीच मल वाटती ॥
( चाल ) परी ब्रीद आपुलें सोडुं नको ईश्वरा ।
सांभाळ आदरे तूंच सर्व निर्जरा ॥
आहे हीच विनंती जोडुन दोन्ही करा ॥
दासगणु म्हणे जेथें मतलब तेथेम ऐशारिती ।
भाषणें वरघडिची चालती ॥३॥
बली हा प्रह्लादाचा नातु असल्यामुळें तुझी त्याच्यावर कृपा असणें स्वाभाविक आहे. पण त्याचें पारिपत्य करणें उचित आहे.

॥ दिंडी ॥
देव दानव हा भेद जयीं झाला ।
तयी आमुच्या वाट्यास तुम्ही आला ॥
म्हणुन बाजू आमुचीच तुम्ही देवा ।
भाग धरणें संप्रती वासुदेवा ॥४॥

॥ आर्या ॥
नव्व्याण्णव ते केले यज्ञ बलीनें मदीय पद घ्याया ।
आतां एकची उरला पाव आतां शीघ्र पंढरीराया ॥५॥

॥ श्लोक ॥
शतमख जरि झाले पूर्ण त्याचे महीसी ।
तरि मग बलिराजा मानिना निर्जरासीं  ॥
म्हणून करि त्वरेनें युक्ति ती यास कांहीं ।
अमर पुरिस माझ्या रक्षणें शेषशाई ॥६॥

॥ कटिबंध ॥
आजवरी, तुवा श्रीवरी, रक्षिली खरी, बाजू अमराची ।
दैना ती आतां करितोस काय बद त्यांची ॥
( चाल ) धरिलेस दानवारी हें आपणा ।
तूं नांव हेंच शोधूनी बघ मना ।
संकट हें न कुणी वारी तुजविना ।
गणुदास म्हणे यारिती, देव बोलती, शशीचा पती, पुढारी करून
संकटाविणें नाठवे कुणा भगवान ॥७॥
विष्णु म्हणाले,

॥ पद ॥
ऐकियलें मी गार्‍हाणें । तसें ऐकियलें मी तव म्हणणें ॥
( चाल ) बलिसम पुण्यात्मा मारावा, तरि सन्नीतीला कुनी बघणें ।
हेंच मला झणिं सांगुन देणें ।
आम्र तरूंचा निकाल करूनी काय सावरी जिवविणें ।
त्यजुनी पया कां विष पिणें ॥
भगवंताचें वच हेम परिसुनी इंद्र बैसला खिन्नमनें ।
तेंच कथी या गणू कवनें ॥८॥
त्यावर देव उत्तर देतात,

॥ पद ॥
कोण जगीं करणार । तुझ्याविण ॥
दिवौकसांचा सांग मुकुंदा ॥ चिंतेचा परिहार ॥
अदितीसुताला तूंच मुरारे । सर्वस्वी आधार ॥
दासगणु म्हणे कमललोचना । कथणें नको तुज फ़ार ॥९॥
देवांनीं अशी विनंती केल्यानंतर विष्णूंनीम त्यांचें म्हणणें ऐकून घेऊन त्यांना निरोप दिला; आणि काय करावें या विचारानें ते सचिंत झाले.

॥ दिंडी ॥
काळजीनें तें चित्त व्यग्र केलें ।
मुखावरचें तें तेज लया गेलें ॥
असा पाहुनी भगवान तो सचिंत ।
पुसे नारद येऊन जोडि हात ॥१०॥

॥ दिंडी ॥
तुझ्या नामें परिहार काळजीचा ।
होत ऐसें बोलली व्यास वाचा ॥
असें असतां ही सटवी तुला देवा ।
कशी झाली उत्पन्न वासुदेवा ! ॥११॥
विष्णु नारदास म्हणतात;

॥ आर्या ॥
अत्यंत खोल त्याचें कारण आहे मुनिवरा साच ।
तें न तुला कळणारें आहे अतिशय कठीण हा पेंच ॥१२॥

॥ ओवी ॥
झालेली सर्व हकिकत । कथिली देवें नारदाप्रत ॥
बलीसारखा पुण्यवंत । काय मारून टाकावा ? ॥१३॥
नारद विष्णूस म्हणाले,

॥ आर्या ॥
या अवतारीं देवा हनन करावें न जाण कवणाचें ।
बलिस सुखें सांभाळीं परि नच करणेम अशिव इंद्राचें ॥१४॥
त्याप्रमाणें विष्णूंनीम वामनावतार घ्यावयाचें ठरवून योगमायेनें कश्यप मुनींची पत्नी अदिती हिच्या उदरामध्यें प्रवेश केला. भगवंतांचें जन्माचे वेळीं निसर्गानें त्यांचें स्वागत केलें तें असें:

॥ पद ॥
क्रमिले सजल घनांनीं नभ तें ।
लखलखा मधीं तळपते तडित ती भारी ॥
गडगडाट ध्वनी, जलदाचा जणूं रणभेरी ॥
वाटतें प्रभूकारण, आला द्याया सलामी घन ।
मोरांनीं व्यापिलें वन, नृत्य ते करिती ।
मनिं म्हणती कश्यपा, धन्य तुझी ही अदिती ॥१५॥

॥ आर्या ॥
श्रवणी अदिती - उदरा भाद्रपदीं शुद्धपक्षीं द्वादशीला ।
अभिजित वेळेवरती, कश्यप उटजात ईश अवतरला ॥१६॥
स्वर्गामध्यें देवांनाहि आनंद झाला व त्यांनीं अनेक वाद्यें वाजविली.

॥ श्लोक ॥
दण दण दण भेरी वाजवीती नगारे ।
झण झण झण झांजा ठोकिती देव सारे ॥
छुम छुम छुम नादें अप्सरा नाचताती ।
कुतुहल नजरेनें वामनाला पहाती ॥१७॥
वामनाच्या जन्मानेम आनंदित झालेली अदिती आपल्या पतीस म्हणाली,

॥ पद ॥
वामना बघुनिया मना, हर्ष माईना अदितिचित्ता ।
म्हणे मुनिलागी काय पहाता हो ॥ मुनिवरा ॥
मुनिवरा जगत सोयरा, आला हा घरा, कुठें हो ठेवूं ।
गूण बाळाचे किती गावूं ॥ हो यापुढें ॥
यापुढें, कर्म बापुडें, मुळूमळू रडे, तेच वरिता ।
शुका त्यागून घुबड धरिता ॥ हो असें कसें ? ”
असें कसें लागलें पिसें, वेळ होतसे, उठा हो वेगा ।
गणूचें नमन पांडुरंगा ॥ हो सर्वदा ॥१८॥
अदितीनें वामनास पाळण्यांत घालून त्यांस गाणें म्हटलें कीं,

॥ पाळणा ॥
बाळा जो जो रे । ऋषितनया । श्रीहरि वामनराया ॥
जननी ही तव अदिती । तुजलागी विनवी ती ॥
निद्रा करि आतां । परमसुखें ।  या दर्भाच्या वरती ॥
आलासी तूं उदरा । भिक्षुकाच्या पोरा ।
म्हणुनी विसरावें, नग चिर ते । कौपीन घाली आतां ॥१९॥

समाप्त

N/A

References : N/A
Last Updated : August 10, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP