मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|कीर्तन आख्यान|श्री दासगणु महाराजांची आख्याने|
श्रीमल्हारी अवतार

श्रीमल्हारी अवतार

श्रीसद्गुरू दासगणु महाराजांची कीर्तनाख्यानें हीं अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण, रसाळ आणि विविध काव्यगुणांनी संपन्न असून श्राव्य काव्याचा तो एक उत्कृष्ट नमुना आहे.


॥ श्लोक ॥
मणी मल्ल हें नाम ज्या राक्षसासी ।
जया मारिता जाहला व्योमकेशी ॥
कथा आदरे ही तुम्ही आयकावी ।
कुबुद्धी मनीं मात्र कांहीं नसावी ॥१॥

॥ दिंडी ॥
विधात्याच्या जे वरे प्रबल झाले ।
अतुल अंगीं सामर्थ्य असे आले ॥
दिवी भीती पाहून देव ज्यांना ।
काळ जे कां महिवरी ब्राह्मणांना ॥२॥

॥ आर्या ॥
मणिचूर पर्वतासी दैत्य भये लोक सर्व घाबरले ।
जप ज्याप्य यजन याजन भूवरीचे बंद आवघे झाले ॥३॥

॥ कटिबंध ॥
नगराज नामे मणिचूर, म्हणती मैलार, प्राकृती ज्याला
जे ठीयीं असा वृत्तांत घडुन कीं आला ॥
वैदिक पळो लागले, पुराणिक भ्याले, साधुसंतांनीं ।
पाहिली नगाची गुहा असुर त्रासांनीं ॥
( चाल ) संहार होती धेनुचे ना मिती ।
द्विजमुखीं मद्य - मांसाला घालिती ।
धरुनिया बळें राक्षस कथु किती ।
सन्निती तशा कुलसती, दृष्टि ना पडती, महीच्या ठाया ।
गणु म्हणे धजेना कुणी हरीगुन गाया ॥४॥

॥ ओवी ॥
ऐसें होता ब्रह्मसुत । घेऊन महीचे विप्र समस्त ॥
गेला इंद्र पुराप्रत । गार्‍हाणें तें करावया ॥
नारद इंद्रास म्हणाले,

॥ पद ॥
तूं इंद्र सुरांचा पती उदधी शौर्याचा ।
रक्षक तसा शचिपती गोरगरिबांचा ॥
तुजवीण आम्ही फ़िर्याद कुणा सांगावी ।
शिशुलागी वाटे भरवसा जननिचा जेवी ॥
त्या न्याये आवघे आम्ही तुझ्याकडे आलों ।
मणि मल्ल भयानें बहुत त्रासुनी गेलों ॥६॥
त्यावर इंद्रानें उत्तर दिलें.

॥ दिंडी ॥
दुष्टशा त्या मणिमल्ल राक्षसांचा ।
वध न होई हो मदिय करे साचा ॥
प्रबल झाले विधिवरें ते त्रिलोकी ।
परी मारिल हो एक त्या पिनाकी ॥७॥
तेव्हां शंकरांना विनंती करण्यासाठीं श्रीविष्णूनें मध्यस्थी करावी. म्हणून सर्व वैकुंठलोकींस आले.

॥ पद ॥ ( प्रगटला कीं )
कमलनाभ कमलावर जो श्रीहरी तयाला ।
देवसमुह इंद्रासह तै विनविण्यास आला ॥
पुत्र तुझा ब्रह्मा त्यानें देवुनी वरासी ।
असुर प्रबल केले देवा त्रास ब्राह्मणासी ॥
इंद्रही न धजतो देवा ज्यास मारण्यासी ।
तूंच युक्ती काढुनी कांहीं तोड सांग याला ॥८॥
त्यांचे म्हणणें मान्य करून विष्णू सर्वांना घेऊन शंकराकडे गेले व म्हणाले,

॥ श्लोक ॥
अगा पशुपते हरा परमपावना शंकरा ।
अगा प्रणतवत्सला भयहरा भवानीवरा ॥
अगा परममंगला परिस आमुची प्रार्थना ।
वधून मणिमल्ल हे सुखि करी त्वरे सज्जना ॥९॥
मृत्युलोकाची परिस्थिति मोठी बिकट झाली आही.

॥ कटिबंध ॥
नय नीति बुडाली पार, म्हणुनि संचार, महितली झाला ।
बायानी पदर डोइचा खालीं टाकिला ॥
श्रुति स्मृती, पुराणें तशी, पडली सांदिसी, मनोहर चुटके ।
सेवुनी सेविती विषय सुखाचे घुटके ॥
( चाल ) अनितिला नीति जन देवा बोलती ।
खल कपटि दुष्ट विभवाला पावती ॥
मणिमल्ल दुष्ट भूपती, म्हणून यारिती, त्रास कीं झाला ।
गणु म्हणे निशिच्या ठायीं भाव घुबडाला ॥१०॥

॥ श्लोक ॥
परिसुनी वच ऐसे हास्य केलें शिवानें ।
म्हणत सुरवरांना ना तुम्ही त्यास भीणें ॥
असुर विधिवरानें मत्त होवो कितीही ।
वधिन खचित त्या मी यांत संदेह नाहीं ॥११॥
देव म्हणाले,

॥ दिंडी ॥
आतां ही ना प्रभु वेळ वायद्याची ।
वेळ आली महिवरी अखेरीची ॥
काय करणें तें त्वरित त्वां करावें ।
असुर त्रासापासून सोडवावें ॥१२॥

॥ झंपा ॥
परिसुनी या परि सुर गिरेला ।
क्रोध आला बहू कंठनीला ॥
त्यजुनि सिंहासना, थोर करी गर्जना ।
आपटी तयीं दणदणा, पद महीला ॥
केस पिंजारिले नयन रक्ताळिले ।
जटें निर्मियेले महामरीला ॥१३॥

॥ श्लोक ॥
कृतांताची वाटे बहिण दुसरी ती महामरी ।
आला स्त्री वेषाला धरुन गमते वा नरहरी ॥
मनीं भ्याले सारे अमर असुनिया तिजप्रती ।
जसे कां कांतारी बधुन हरिला जीव पळती ॥१४॥
त्या महामारीला शांत करण्यासाठीं,

॥ दिंडी ॥
वेदवेत्याशा चतुर ब्राह्मणांनीं ।
युक्ति केली यापरी तया स्थानीं ॥
करुनि अभिमंत्रित आज्य सिद्ध केलें ।
तेंच मरिच्या देहास सिंचियेले ॥१५॥

॥ आर्या ॥
तेणें ती महामारी शांत स्वभावे असे जरी झाली ।
परि ना पालटली तनू घृतमारी नांव पावती झाली ॥१६॥

॥ लावणी ॥
महामारीची शामतनू ती भेसूर अत्यंत ।
खदिरांगारासम ते चक्षू पाठीस कच मुक्त ॥
चपलेवत् ती जिह्वा लळलळ व्याघ्रापरी दंत ।
क्षीराब्धीही पाहुन तिजला चित्तीं भयभीत ॥१७॥
महामारी शंकरास म्हणाली,

॥ श्लोक ॥
निर्माण तूं मज कशास्तव सांग केलें ? ।
ऐकोनिया वच तिचें भगवान बोले ॥
तूं जा झणीं महितली असुरा वधाया ।
प्रवृत्त हो परि गे न । सुजना छळाया ॥१८॥

॥ लावणी ॥
रोगापैकीं अजीर्ण जें तव साह्या धाडितो ।
रेच उलटी हे निर्वाणीचे बाण तुला अर्पितो ॥
लघुशंकेला बंद करूनिया फ़ुगवुन पोटाप्रती ।
बघता बघता प्राण खलांचे आणुन देतिल हातीं ॥
वचन हराचें ऐकुन ऐसें मरि ती संतोषली ।
वायुरथामध्यें बैसुन महीवरी संचारास्तव आली ॥१९॥

॥ आर्या ॥
ऐशी आयुधें दिधल्या लोक तिला एक साथ गणतील
तेणें तव कृत्याचें कौतुक ना सूज्ञ लोक करतील ॥२०॥
शंकरांनीं उत्तर दिलें,

॥ ओवी ॥
महामरीचें प्रयोजन । आहे याच कारण ।
तें देवोनी अवधान । परिसा देव हो येकाळीं ॥२१॥

॥ श्लोक ॥
प्रथम तप करोनी दुष्ट जो कां पुढारी ।
जगति निजकृतीनें होत त्या मीच मारी ॥
इतर शठ खलाला मारनें या मरीनी ।
अहि वध कपि हस्ते ढेकना ऊन पाणी ॥२२॥
त्यानंतर

॥ दिंडी ॥
मणी मल्लाचें मरण साधण्यास ।
रूप धरिता जाहला श्रीमहेश ॥
क्षणामाजी मार्तंड भैरवाचे ।
देव करितां जय शब्द तयीं वाचे ॥२३॥
मार्तंड भैरवाचें स्वरूप मोठे अलौकिक होते.

॥ कटिबंध ॥
कांती ती सुवर्णापरी, विराजे खरी, कुंडलें कानीं ।
दंडास भुजग नेत्रांत बैसला वहूनी ॥
मुंडाची माळ कंठांत, त्रिशुल हातांत, हिर्‍यापरी दंत, झळकती तेजें ।
डिमडिमा करीचे डमरु वाद्य तें वाजे ।
सोन्याची पडदणी गळा, कटीं सोनसळा, तिलक पिवळा, भलि भंडार
मार्तंडरुपी अवतरले देव मल्हार ॥
( चाल ) मार्तंड भैरवाला त्या पाहुनी ।
पावले देव हर्षाला निजमनीं ।
जयघोष करिती पुष्पाला उधळुनी ।
संगती श्वान साचार, सैन्य अनिवार, जाहले स्वार, वारुच्यावरती ।
मार्तंडदेव, त्या असो गणूची प्रणती ॥२४॥

॥ कटाव ॥
मणिमल्लाच्या नाशासाठीं । निघता झाला शिव जगजेठी ।
रुद्रगणांची अतिशय दाटी । वीरभद्र तो परम भयंकर ॥
कार्तिकस्वामी अग्नि पुरंदर । महिषावरती यमाजिभास्कर ॥
वायु वरुण ते अवघे आले । द्वादश आदित्यासी कळाले ।
तेहीं येऊन त्यांत मिलाले । दिवी दिवौकस कोणी न उरले ।
सेनाउदधी असा उसळला । मैराळाच्या सन्निध आला ॥
तेणें जो कां उडे धुराळा । तोच नभीचा जणुं छत झाला ।
हाणा मारा ठोका म्हणती । त्या योगे ते असूर पळती ।
दरी कंदरी जाउन लपती । अश्व गजांच्या पदघातानीं ।
गेला पर्वत चूर्ण होउनी । दासगणू तें गाई कवनीं ॥२५॥
शंकराची सेना चालून येतांच,

॥ श्लोक ॥
गर्वेक्ति मल्ल वदला निज सैनिकास ।
न भ्या तुम्ही मुळिंच त्या पशुवाहनास ॥
तो षंढ कां मजसवें लढण्यास आला ? ॥२६॥
दोघांचें घनघोर युद्ध झालें.

॥ आर्या ॥
तुंबळ युद्ध जाहलें सुरासुरांचे बहूत निकरानें ।
गतासुभैरव उठती मार्तंडाच्या कृपाकटाक्षानें ॥२७॥

॥ दिंडी ॥
रणीं पाहुन संहार राक्षसांचा ।
खड्गदंष्ट्रासी कोप आला साचा ॥
तयाला त्या श्री - स्वामी कार्तिकानी ।
दिला कीं हो यमलोकीं पाठवोनी ॥२८॥

॥ आर्या ॥
उलुकामुख गजवदने नंदी वधी तेविं कुंतलोमासी ।
वाटेल काय जड हो दीपासी जाळणें पतंगासी ॥२९॥

॥ श्लोक ॥
असुर चमु निमाली पाहूनी हे मणीला ।
अतिशय मनीं आला राग बोले प्रभूला ॥
असु तव तुजलागी स्थान कोठे न द्याया ।
म्हणुन मजसवें कां पातलासी लढाया ? ॥३०॥

॥ दिंडी ॥
युद्ध झाले घनघोर उभयतांचें ।
रूप धरिलें मायावि तुरंगाचे ॥
मणीनें, त्या मार्तंड मुळिं न सोडी ।
शूल घाते छातीस त्वरें तोडी ॥३१॥

॥ पद ॥ ( आलिस तूं )
प्रभूनें निजपद जै अपुला ।
मणि असुराच्या छातीवरती द्याया उचलीला ॥
तयि तो मणिनें शिरी धरिला ।
वैर करोनी म्याच मिळविले प्रभु तव पदकमला ॥
( चाल ) सोडी या नच मी आतां ।
द्या हा वर पार्वतीकांता ।
तुरगरूपानें स्थान असावें तव मन्मुख मजला ॥३२॥

॥ ओवी ॥
शिवज्ञेनें मल्लासी । बोलता झाला ऋषिकेशी ॥
अभिमान टाकून मार्तंडासी । शरण तूं जावे येधवां ॥३३॥
मल्ल म्हणाला,

॥ अंजनी गीत ॥
मज शूरा लागुनी तूं आपलें ।
शिकवावयासी पाहसी वहिले ।
मम बंधूला ज्यानें वधिलें ।
त्या मी सोडू कसा ? ॥३४॥
त्यावेळीं,

॥ आर्या ॥
घृतमारीनें अपुलें कौतुक थोडे तयास दाखविले
परि मल्लानें तिजला हां हां म्हणतां क्षणांत जिंकियले ॥३५॥
मल्ल उन्मत्त होऊन शंकरास म्हणतो,

॥ लावणी ॥
लावून राख अंगाला । भिक मागत जा घरघरीं ।
रानांत माजला कोल्हा । परि मानील कां केसरी ॥
( चाल ) तव अंत करे माझिया, होइल ये ठाया, म्हणुन झगडाया ।
येईना आतां । कैलास पाही सर्वथा ॥३६॥

॥ पद ॥ ( शिरि तिच्या )
शिव वदे तया असुरा ।
हे खल कपट्या अधम खरा ॥
( चाल ) माझ्याशीं, गांठ तुझी, आहे आजी, जशी, भाजी ।
खुडिती मी तसा तुजला ।
मारीन फ़ेकुन या शूला ॥३७॥
शंकरानें आपला शूल मल्लावर फ़ेंकतांच तो त्याच्या मर्मी लागला.

॥ ओवी ॥
मल्ल पडता धरणीवरी । देव गर्जले जयजयकारी ॥
बेल भंडार भूमीवरी । उधळूं लागले अमर ते ॥३८॥
मल्ल शंकरास शेवटीं म्हणतो,

॥ श्लोक ॥
पाप्यासी यम ने परी मजप्रती न्यायास तूं शंकरा ।
आलासी कृतकृत्य साच जाहलो देई मला या वरा ॥
माझें नांव तुझ्या आधीं नित निघो जोडून नांवा तुझ्या ।
मल्हारी धरि नांव दासगणुला दाखीव पादांबुजा ॥३९॥

॥ कटिबंध ॥
मल्लाचे पुत्र अनिवार, पांच साचार, लढाया आले ।
शंकरे तया देऊन शाप नग केले ॥
म्हणुनिया वैर थोरासी, बरें ना महीसी, विचारा करणें ।
मूषका घडावें काय फ़णीला धरणें ॥४०॥
अशा रीतीनें सर्व राक्षसांचा नाश होतांच देवांनीं जयघोष केला आणि ते भगवान शंकरास म्हणाले,

॥ अभंग ॥
देवा या गोष्टीची राह्यासी आठवण । करावें आपण आतां ऐसें ॥
स्वयंभू होऊन लिंग तूं असावें । कदा न सोडावें मैलारासी ॥
तुझी नामें घेती ध्यास तया ठेवी । सुखी तार भवीं पार्वतीशा ॥
तथास्तु बोलुनी लिंगरूप झाला । नमी नित त्याला गणूदास ॥४१॥

॥ आर्या ॥
शुद्धांत मार्गशीषीं षष्ठी शततारका सुनक्षत्रीं ।
रविवारीं अवतरला हयवाहन प्रेमपूर या क्षेत्रीं ॥४२॥

॥ श्लोक - वसंततिलक ॥
लिंगास पाहुन द्विजे जयघोश केला ।
यळकोट बोलुन मुखें पदिं लीन झाला ॥
मल्हार नांव वदतीं सुर आदरानें ।
हें काव्य गौतमी तटा रचिलें गणूनें ॥४३॥

॥ आरती ॥
जय जय श्रीशिवशंकर राजा मल्हारी ।
दुस्तरशा भवपाशापासुन जन तारी ॥धृ०॥
दितिसुत मणिमल्लानी चतुरानन स्तविला ॥
अमोघसा अर त्याच्यापासुन मिळवीला ।
अजिंक्य झाले खल ना मानिती कवणाला ।
ज्याचें पाहून बल तें शशिपती हरि भ्याला ॥
त्यांचें नाशास्तव तूं धरिला अवतार ।
मार्तंडाचा करिती सुर जयजयकार ।
मन्मथसम ती कांती भाली शशिकोर ।
कटिसी पीत पितांबर अंगी भंडार ॥
असुरभयाच्यापासुन रक्षण मैलारी ।
केले निर्दाळुन या राक्षस मल्लारी ।
नाहीं तुजवीण आमुचा कोनी कैवारी ।
पदनत दासगणूची भयचिंता वारी ॥४४॥

॥ समाप्त ॥

N/A

References : N/A
Last Updated : August 12, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP