मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|कीर्तन आख्यान|श्री दासगणु महाराजांची आख्याने|
गर्वहरण १

गरुड - गर्वहरण १

श्रीसद्गुरू दासगणु महाराजांची कीर्तनाख्यानें हीं अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण, रसाळ आणि विविध काव्यगुणांनी संपन्न असून श्राव्य काव्याचा तो एक उत्कृष्ट नमुना आहे.


रामअवतार संपवितांना रामानें सांगितलें होतें कीं, “ बा मारुती ! तुला कृष्ण अवतारांत दर्शन देईन. ” त्याप्रमाणें -

॥ आर्या ॥
द्वारावतीस आला अंजनिचा बाळ काळ जो अरिचा ।
ज्यानें सहजगतीनें करून विवर ठाव घेतला महिचा ॥१॥

॥ पद ॥ ( मित्रा मम )
पाहुनिया द्वारकेस चोस वाटलें ।
बोले हें भव्य नगर कोणिं निर्मिलें ? ॥धृ०॥
कांचनमय सदनें हीं या पुरांतरीं ।
सुमन - रजा सिंचिति तरु पदपथावरी ।
गुंजारव भ्रमरावलि करित त्यावरी ।
वृक्षराज पांथिकांस बाहती भले ॥२॥

॥ श्लोक ॥ ( शार्दूल विक्रीडित )
लंका जी दिधली असे बिभिषणा मन्नाथ रामें खरी ।
ती कोनी असुरें आणून ठिविली या सागराभीतरीं ॥
“ हे पुच्छा ! उचली हिला झडकरी द्रोणागिरीचे परी ” ।
ऐसें बोलून तो कपींद्र बुध हो ! तात्काळ तैसें करी ॥३॥
द्वारकेला बहुतेक पुच्छाचा वेढा पडला आहे व तो उचलण्याच्या बेतांत मारुती आहे हें पाहून नारद मोतीबागेंत आले आणि त्यास म्हणतात.

॥ लावणी ॥
नारद म्हणे मारुती ! ऐक निश्चितीं, निगुती ।
हे नव्हे बिभीषणपट्टण, द्वारावती ॥
या पुरिचा रे भूपती असे सन्मती, मदुपती ।
‘ बलराम ’ जयाचें नांव महाभारतीं ॥
यासाठिं सांगतों तुला, नको चेष्टेला, करुं भला ।
हा नाहिं तुझा रे ! दशरथी लागला ॥४॥

॥ आर्या ॥
आला राग कपीतें मुनि नारद यापरी पहा वदतां ।
शेंडी धरुन तयाची भूपासुन उचलिला बळें वरता ॥५॥
नारद म्हणाला, “ बा मारुते !

॥ कामदा ॥ ( श्लोक )
कोपुं तूं नको हे कपीवरा । शरण तुजसि मी जोडितों करा ॥
प्राण - दान दे मजसि हे बली । मत्करें चुकी खचित जाहली ॥६॥
मारुती म्हणाला,

॥ आर्या ॥
सांग मुने ! त्या जाऊन बलरामासी असाच या पदिं जा ।
मांगिल उपपद टाकीं तूं राम राम एक तो माझा ॥७॥

॥ ओवी ॥
फ़ार बरें म्हणून । नारदें केलें हास्यवदन ।
स्कंधीं विणा घेऊन । प्रयाण केलें द्वारकेसी ॥८॥
नारद द्वारकेला गेले आणि बलरामास म्हणूं लागले कीं;

॥ कटिबंध ॥
हलधरा ! रेवतीवरा । ऐक मम गिर, आपुले कानीं ।
संदेश कपीनें तुजसि धाडिला जाणीं ॥
बलराम नाम हें टाक, घातला धाक, तुजसि नि:शंक, होउनी त्यानें ।
बैसून वृक्षिं बोलला बहुत गर्वानें ॥
आणि धरून तया वानरा, करुनिया त्वरा, नृपा यदुविरा ! सेवकाहातीं ॥
ना सहन करावी नृपें कधीं गर्वोक्ति ॥
गणुदास म्हणे यापरी, लाविली खरी, आग ती सारी, द्वारकेमाजीं ।
भगवंत राहतो संत - कृतीला राजी ॥९॥
अशा प्रकारें नारदानें जिकडे तिकडे लावालावी केलीं व त्यचें करनें प्रभूच्या पथ्यावर पडलें. म्हणून भगवान श्रीकृष्ण गप्प बसले. कारण बलराम, गरुड आणि सत्यभामा या तिघांनाहि ‘ ग ’ ची बाधा झाली होती.

॥ दिंडी ॥
हेर येउन बलराम भूपतीला ।
कपीचा तो वृत्तांत कथन केला ॥
नव्हे वानर तो असुर वाटताहे ।
रूप धरिलें मायावि साच पाहें ॥१०॥

॥ ओवी ॥
छप्पन कोट यादव घेऊन । गेला वानर धराया जाण ।
जो अंजनीचा तनय हनुमान । उर्ध्वरेत महाबली ॥११॥

॥ पद ॥  ( नृपममता )
पाहून समुह तो त्यांचा । हर्षला कपी मनिं साचा । तेधवां ॥
निज पुच्छ खालतीं केलें । व्हावया लांब बोधीलें । त्याप्रती ॥
( चाल ) यादवा आला तो परी, राग सत्वरीं, पुच्छ ते करीं ।
धरून ओढीती । गणुदास गात त्या गीतीं । विबुधहो ! ॥१२॥
मारुतीरायानें सर्व यादव आपलें शेंपूट धरून ओढीत आहेत असें पाहून ‘ जय रघुवीर ’ म्हणून उड्डाण मारलें !

॥ ओवी ॥
मारुती उडतां अंतराळीं । नारदानें पिटिली टाळी ।
साथ त्याची वनमाळी । करिता झाला तेधवां ॥१३॥

॥ आर्या ॥
अंतर्गृहांत गेला तो हरिचा भक्त पुत्र ब्रह्मयाचा ।
धांविन्नल्या स्त्रिया तैं घ्यायासी लाभ संतभेटीचा ॥१४॥

॥ लावणी ॥ ( निर्धनेची माळ )
विकल्प ज्याच्या मनिं न तयासी भय कोठें राहिलें ।
नारिपुरूष हा भेद न जेथें हरिरूप जाहलें ॥
नासाग्रींची दृष्टि चळेना, मन शैलाचे परी ।
कधिं नच डहुळे सागर ढेकुळ, येउन पडलें जरी ॥
तसें संतांचें मन गंगाजल, पाप, न स्पर्शें भलें ।
दासगणु म्हणे संतापुढतीं ईश्वर जणुं बाहुलें ॥१५॥
यादवांच्या सर्व स्त्रियांना नारद म्हणतात,

॥ श्लोक ॥ ( पृथ्वी )
सुयोग मुलिंनो ! अजी बहुत थाट द्वारापुढें ।
दिपा उजळुनी करा हळदकुंकवाचे सडे ॥
नटा सकल गे ! तुम्ही नखशिखांत येतां पती ।
तया गणु म्हणे करा रणशुरास पंचारती ॥१६॥
इकडे -

॥ आर्या ॥
वस्त्रें गळून गेलीं, नभमंडळ भेदितां कपीवर तो ।
वाटे लांगुल - वेलिस आला जणुं बहर पडावळांचा तो ॥१७॥
सरतेशेवटीं बलराम दीन होऊण मारुतीला म्हणूं लागला कीं,

॥ कटिबंध ॥
कपिवरा, गूणगंभिरा, दयासागरा, कृपा, करिं बा ती ।
करुं नको भ्रमण हें नभीं, चाल भूवरतीं ॥
डोळ्यांत धूळ चालली, मुक्त जाहलीं, धोतरें भलीं, कटीपासून ।
सोडून निघाया देहें पाहतो प्राण ॥
मेल्यास आम्हि मारुती, स्त्रिया त्या अती, शोक निश्चितीं,
जाण करतील । कुंकूमकाजळावीण सर्व राहतील ॥
यासाठिं स्त्रियांची तरी, दया अंतरीं, येउं दे खरी, तुझ्या गुणवंता ।
महाबली या जगीं तूंच अंजनीसूता ॥१८॥

॥ श्लोक ॥ ( वसंत तिलक )
द्रोणागिरी निजकरें उचलून नेला ।
ज्याचा प्रताप बघतां प्रभुराम धाला ॥
तो वीरश्रेष्टु अबला विधवा कराया ।
आला, असें बुध तुला म्हणतील वायां ॥१९॥
हें ऐकून मारुती म्हणाला,

॥ पद ॥  ( मित्रा मम )
तुमच्यांत मनुज येथ मला कोणि ना दिसे ।
कां कीं मुखीं तुमच्या नच राम येतसे ॥धृ०॥
द्विपाद पुच्छहीन पशू वाटतां मला ।
यादव तुम्हि सजिव सर्व दगड शोभलां ।
असुन नसुन सारखेच भार महितला ।
मनुजाविण मी न कृपा कधिंहि करितसें ॥२०॥

॥ ओवी ॥
प्रस्तर तुम्ही खलांनो । वदुनि असे त्या कपी जलीं टाकी ।
हा कपिकृत नव सेतू ऐसें सुरवर म्हणोत मज नाकीं ॥२१॥

॥ ओवी ॥
शेंपूट घेतों ओढून । ना तरी म्हणा ‘ जानकीरमण ’ ।
ऐसें हनुमान गर्जोन । सांगता झाला यादवां ॥२२॥

( श्लोक )
‘ रामराम ’ ते सर्व बोलले । मारुतीप्रती चोज वाटलें ।
शेंपुटामध्यें सर्व बांधुनी । काढिले वरी आंत बुडवुनी ॥२३॥
त्या सर्वांना समुद्रस्नान घालून एका डोंगरावर आपलें शेंपूट कोरडें करण्याकरितां धाडकन् आपटलें. त्यामुळें,

॥ दिंडी ॥
नाक कोणाचें, कान तुटुनि गेले ।
कैक यादव ते दंतभग्न झाले ।
पुढेंमागें लाविले हात त्यांनीं ।
कपी - सन्मुख बैसले सुनांवांणी ॥२४॥

॥ ओवी ॥
महाबलीच्या भयेंकरून । कोणी न करिती वरती मान ।
जैसे केसरीप्रती पाहुन । जंबुक अवघे स्तब्ध होती ॥२५॥
मारुती म्हणाला,

॥ श्लोक ॥ ( मंदाक्रांता )
जा जा गेहीं परि नित करा ध्यान त्या राघवाचें ।
नामीं झाल्या विसर लवही प्राण घेईन साचे ॥
येवोनीया सदनिं तुमच्या, वागवा हें मनांत ।
निद्रासौख्या त्यजुनिच तुम्ही आठवा तो अनंत ॥२६॥

॥ आर्या ॥
सर्प - मुखांतुनि सुटतां दर्दुर जैसा आनंद मानितसे ।
आज्ञा कपिची होतां यादव झाले मुदीत तेथ तसे ॥२७॥
इकडे यादव्व आतां फ़जीत पावून घराला येण्याच्या रंगांत आहेत असें जाणून नारदानें सगळ्या गांवांत व यादवांच्या स्त्रियांना असें सांगितलें कीं, “ आजचें हें पर्व सुखसौभाग्यवर्धक आहे. म्हणून सर्वांनीं मोठा थाट करून घरोघर दिवाळीसारखे दिवे लावावे. रात्रभर मंगलवाद्यें वाजत राहावींत. असें जो करणार नाहीं तो बारा वर्षें दरिद्री राहील. मग काय विचारतां ! द्वारकेंत एकच गर्दी उडून गेली !

॥ कटाव ॥
द्वारकेंत त्या नवल जाहलें । रस्तोरस्तीं दीप लाविले ।
शतशां रवि जणु पथी उदेलें । तत्तेजानें पट्टण भरलें ।
पौरजनांची गर्दी झाली । म्हणति आज ही नवी दिवाळी ।
नारदमुनिनें अम्हां बोधिली । राजमार्ग ते सखलादीनीं ।
झाकियले कीं धनिक जनांनीं । मंगलवाद्यें वाजति नाना ।
जिकडे तिकडे होत तनाना । मौज पाहतो पंडरिराणा ।
यादवांच्या सदनांपुढती । सडे घातिले अभिनापंथी ।
रांगोळ्यांला आली भरती । घरघर - द्वारीं उभ्य सुंदरा
जणूं महीवर दुजी अप्सरा । पिंपळपान, बिंदलि, बिजवरा ।
बाळ्या, बुगड्या, कर्णीं रुळती । मूद, राखडी शोभे वरती ।
पांच तुर्‍याची नथ नाकीं ती । काजळ कुंकुम ल्याल्या असती ।
भरजरतारी शालु मनोहर । किनखापाच्या चोळ्या सुंदर ।
खडी असूनी पोपट त्यावर । बाजुबंद नी वाक्या दंडीं ।
गळां घातिली मौक्तिकपेंडी । पदीं साखळ्या, वाळे, तोडर ।
वामहस्त ठेवुनी कटीवर । वक्रभ्रुकुटी करून पाहती ।
मार्गप्रतीक्षा पतिची करिती । नारदमुनिला अवघ्या पुसती ।
केव्हां येतिल नवरे अमुचे । हें सांगावें झडकर साचें ।
अगम्य आहे ज्ञान तूमचें । दासगणू म्हणे हो ! संतांचें २८॥
तें ऐकून नारद म्हणतात,

॥ आर्या ॥
येतिल आतां मुलींनो ! नवरे तुमचे; न व्हा उताविळ कीं ।
विजयश्रीची माळा घालुन कंठीं, न वर्णवे बल कीं ॥२९॥
इकडे मारुतीपासून सुटका होतांच यादव निघाले ते

॥ श्लोक - शार्दूल विक्रीडित ॥
खालीं घालुन मान यादव गृहा आले निशीं नग्न ते ।
बोलाया मुख ना मुळींच उरलें मागेंपुढें हात ते ।
तेजानें त्यजिलें तया शशि जसा होतो प्रभातीं पहा ।
कांता त्या पुसती हळूंच हंसुनी “ केला कुठें थाट हा ? ॥३०॥

N/A

References : N/A
Last Updated : August 12, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP