मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|कीर्तन आख्यान|श्री दासगणु महाराजांची आख्याने|
श्रीमत्स्येंद्रनाथ चरित्र ३

श्रीमत्स्येंद्रनाथ चरित्र ३

श्रीसद्गुरू दासगणु महाराजांची कीर्तनाख्यानें हीं अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण, रसाळ आणि विविध काव्यगुणांनी संपन्न असून श्राव्य काव्याचा तो एक उत्कृष्ट नमुना आहे.


॥ श्लोक ( शार्दूल विक्रीडित ) ॥
लोकां नश्वर सांगुनी आपण जो भोगीत भोगांप्रती ।
तो ना सिद्ध, महंत, संत अथवा साधू, शुची, सन्मती ॥
ढोंगी, दांभिक, शब्दजालपटु ते, थोड्या दिसांनीं पहा ।
येणारे असती पहात म्हणुनी तूं वाट त्यांची रहा ॥४१॥

॥ आर्या ॥
बा जन्मास पुन्हां ये या अपुल्या मैत्रिणींस घेऊन ।
भोगुन विषया ऐकें अध्यात्माचें सदैव व्याख्यान ॥४२॥
मच्छेंद्रनाथ मैनाकिनीला म्हणाले,

॥ पद ॥ ( वसंती बघुनि )
हा नच विषयां भुलणारा ।
स्थल रविजवळीं कुठुन मिळावें सुभगे ! अंधारा ? ॥
असे हा गोरख ज्ञानी पुरा ।
शैल न हाले सोसाट्याचा जरि सुटला वारा ॥
( चाल ) वातें झाडें उन्मळती ॥
तेवीं दांभिक जे असती ॥
ते या विषया बळि पडती ॥
मम ही मानी सत्य गिरा ।
अगाध महती अध्यात्माची गणु म्हणे ध्यानीं धरा ॥४३॥

॥ श्लोक ( वसंत तिलक ) ॥
जाणें अवश्य मज येथुन संगतीं या ।
आतां न आग्रह उगा धजणें कराया ॥
हा घेतल्याविण मला हालणार नाहीं ।
वत्सा त्यजून कधिं ना खरि माय राही ॥ ॥४४॥
ते ऐकून मैनाकिनी म्हणाली,

॥ पद ॥ ( मालकंस )
स्वार्थीं खरोखर या पुरूषाची ।
जात जगामध्यें खनि कपटाची ॥ध्रु०॥
( चाल ) यथेच्छ सेवुन सुमनरजाला ॥
भ्रमर त्यागिती जसे कुसुमाला ॥
तेविं तरुणिच्या तारुण्याला ॥
भोगुन सोडिती संगत त्याची ॥४५॥

॥ लावणी ( भला जन्म हा ) ॥
स्वजातियाचा पक्ष धरूनी विधिनें जग निर्मिलें ।
स्त्रियांना दुबळेपण अर्पिलें ॥
मनोनिग्रह हा त्यांच्या वांट्या अम्हां उताविलपणा ।
आणखी जवर विषयवासना ॥
( चाल ) एवंच विधीनें स्त्रीजातीच्या वरी ।
पाखडलि आग ही गोष्ट न केली बरी ॥
सर्वही सुखें तीं पुरुषाधिन साजिरीं ॥
भोग्य आम्ही, भोक्तेपण त्यांना, स्वातंत्य न राहिलें ।
गणूनें तें कवनीं गुंफ़िलें ॥४६॥
मच्छेंद्रनाथ म्हणाले,

॥ ओवी ॥
ऐसें ऐकतां मच्छेंद्रनाथ । दोष न देई विधीप्रत ॥
कमीजास्तीवीण खचित । घोडेण न चाले निसर्गाचें ॥४७॥

॥ श्लोक ( शार्दूलविक्रीडित ) ॥
आज्ञाधारक एक गोरख खरा नाहींस तूं त्यापरी ।
माझीया वचना न मान दिधला तूं गे कितीदां तरी ॥
केलें तें अवघें परी सहन मीं आतां न हट्टा धरीं ।
कोल्ह्यानें जरि मारिल्या बहु उड्या ये का हरीची सरी ॥४८॥
यावर मैनाकिनी म्हणाली,

॥ ओवी ॥ हीनांत हीन ऐसें तुम्हि कांहीं काम गोरखा सांगा ।
मग पाहूं तरी कैसा गोरख स्वमनीं न येतसे रागा ॥४९॥

॥ ओवी ॥
फ़ार बरें म्हणुन । मच्छेंद्रें केलें हास्यवदन
काम गोरखालागुन । ऐसें सांगते जाहले ॥५०॥

॥ दिंडी ॥
मीननाथें हें शौच पहा केलें ।
मळानें या हातपाय भरुन गेले ॥
धुऊन आणी गोरखा शीघ्र यासी ।
मळ न ठेवी कोठेंच शरीरासी ॥५१॥
अशी गुरूची आज्ञा होतांच -

॥ कटिबंध ॥
घेऊन हगिरडें पोर, कडेच्यावर, किंतु साचार, लव न मनिं धरला ।
गोरख मुदित मानसें जाय सरितेला ॥
बहु रम्य नदीचें तीर, झाडि ती कीर्र, जलाच्यावर सुमनरज पडले ।
मत्स्यांस कराया गट्ट तटीं बक बसले ॥
पात्रिं तें स्फ़टिकसम नीर, वाहे गंभीर, आला भास्कर, रवी उदयाला ।
वाहतां सुवासित शीत समीरण झाला ॥
( चाल ) वार्‍यानें तरूंच्या शाखा हालती ।
वाटतें जणूं त्या नाथा बोलती ॥
नको मारूं मीननाथाला या रितीं ।
अल्लड शिशु तें आहे, सोड लवलाहें, दया करिं पाहें, अजानावरतीं ।
गणुदास म्हणे सत्पुरुष दया ना त्यजिती ॥५२॥
मीननाथ म्हणाला, गोरखनाथा ! हे मासे आपलीं डोकीं वर काढून कोणाला काय मागतात ? ” त्यावर गोरखनाथ म्हणाले,

॥ श्लोक ( वसंत तिलक ) ॥
डोकीं जलावरति काढुन मीन सारे ।
भेटावयास गमती तुजला आले रे ॥
तूं मीननाथ मग या तव लेंकरांस ।
कांहींतरी आणुन दे झणिं खावयास ॥५३॥
“ हें काय खातात ? ” यावर गोरखनाथ म्हणाले,

॥ पद ॥ ( अरसिक किती हा )
खाती हे मांसमलाला । याविण आवडी दुसरी न याला ।
तव मल अवघा यांनीं । टाकियला कीं, भक्षण करुनी ॥
परि नच तृप्ती जहाली । म्हणून तुझ्याकडे पुनरपी आली ।
मंडळी, दे कांहीं याला । लावी न विन्मुख या कवणाला ॥५४॥
मीननाथ म्हणाला, ‘ ठीक आहे. द्या माझे मांस त्यांना ’

॥ श्लोक ( पृथ्वी ) ॥
असे आपटिला करें धरुन बाळ घोंड्यावरी ।
धुईत जणुं धोतरा परिट तो नदीच्या तिरीं ॥
हाडें तशिंच चामडीं खळबळून वाळावया ।
आणून वरि घातिलीं, नुरली गोरखाला दया ॥५५॥
गोरखनाथ मच्छेंद्रास म्हणाले,

॥ सवाल ॥
अच्छी तर्‍हेसे वच्चेकू धोके गोष बद्न्का निकाला ।
खानेके लिये मैने मच्छिकू वो सब नदीमें डाला ॥
गीली वो हड्डी चमडा गुरूजी गच्चीपे धूपमें सुकता ।
करनेमें आपने तामिल हूकूमकी, गनु कहे बंदा न चुकता ॥५६॥

॥ श्लोक ( पृथ्वी ) ॥
पुढें आणुनि टाकिलीं शिशुचीं तीं हाडें कातडें ।
बघून मैनाकिनी धरुन त्या उराशीं रडे ॥
वृथा वधियलें कसें निरपराधि या बालका ।
शठा, खल, नराधमा, अशुभ, जोगड्या, गोरखा ॥५७॥

॥ पद ॥ ( अजि अक्रूर हा )
हा गोरख ना काळ अम्हांसी झाला ।
मम बाळ ठार तो केला ॥
हें बाल न कीं गृहिंचे वैभव गेलें ।
मम सौख्य सर्व मावळलें ॥
( चाल ) लडिबाळ बोबड्या वचनीं ॥
आइ आइ अशा प्रेमांनीं ।
बाहील कोण मज अवनीं ॥
गडे घेउं अतां अंकावर कवणाला ।
करि अशा बहुत शोकाला ॥५८॥
तें पाहून गोरखनाथ म्हणतात,

॥ सवाल ॥
जहांसे आया वो वहांपे गया है, वो नहीं तेरा, न मेरा ।
खाली लगावत है मय्या तुजसे रोनेकू मोहपसारा ॥
अविनाश अक्षय शाश्वत आत्मा उस्से न मालूम मरना ।
नाथकृपासे इतने दिनोंमें गनु कहे क्यौं नहीं जाना ॥५९॥
हें ऐकून मैनाकिनी म्हणाली,

॥ ओव्या जात्यावरील ॥
नको बोलुंस रे जोगड्या । ही वटवट ऐशा रितीं ।
ज्यास उदरीं म्यां वाहिलें । त्याचि पडेल का विस्मृती ? ॥
ह्या खुळचट वेदांतांनीं । जगीं बुडले प्रापंचिक ।
आली पुतना त्या गोकुळा । तेवि येथें हा खाटिक ॥६०॥

N/A

References : N/A
Last Updated : August 13, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP