मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|कीर्तन आख्यान|श्री दासगणु महाराजांची आख्याने|
चरित्र ३

श्रीधनेश्वर - चरित्र ३

श्रीसद्गुरू दासगणु महाराजांची कीर्तनाख्यानें हीं अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण, रसाळ आणि विविध काव्यगुणांनी संपन्न असून श्राव्य काव्याचा तो एक उत्कृष्ट नमुना आहे.


॥ श्लोक ( पृथ्वी ) ॥
किशोर वदतां असें जननि होय शोकाकुल ।
अधीक नच बोलवे नयनिं वाहुं लागें जल ॥
नको म्हणुस राजसा ! मजसि माय मी राक्षसी ।
स्ववत्स जशि खातसे पशुंत माजरी मी तशी ॥४१॥

॥ ओवी ॥
परी याच इंगित । कांहीं न कळे पोराप्रत ।
आली शिवरात्र अखेर सत्य । सोमवारीं माघमासीं ॥४२॥

॥ ओवी ( जात्यावरील ) ॥
आई ! मी न बसें एकटा । नाहायाला पाटावरी ।
दादा तात्याला घालणें । न्याउ आणून माझ्यापरी ॥४३॥
तो मुलाचा हट्ट पाहून बाप म्हणतो,

॥ श्लोक ( इंद्रवज्रा ) ॥
झाल्यात मुंजी म्हणुनी तयांसा । ना न्हाणितां ये शिवपवणीसी ॥
आहे तयांतून अवश्य तुला । न्हावोन जाणें शिवदर्शनाला ॥४४॥

॥ लावणी ( भला जन्म ) ॥
बलि देतांना किमपि न यावा बालक शुद्धीवरी ।
म्हणुन त्या भुल दिधली अधिं खरी ॥
प्राकाराच्या भोंवतिं सैनिक पहार्‍यावर ठेविले ।
मंदिरीं येउं न कुणा दीधलें ॥४५॥
( चाल ) चांगल्या कृतीला भय कोठेंहि नसे ।
दुष्कृत्य कराया नर यापरि जपतसे ।
जाणिव, दोहोंची ज्याची त्या होतसे ।
दासगणु म्हणे पुण्याहवाचनिं स्त्री पतिचा कर धरी ।
कुलटा जाराला खुण करी ॥

॥ श्लोक ( शार्दूल विक्रीडित ) ॥
मातेनें धरिलें शिरा, पद तसे दोन्ही पित्याचे करीं ।
भूपाचे करिं खङ्ग तें; परि आला तो बाल शुद्धीवरी ॥
पाहूनी नृप बोलला पुनरपी बेशुद्ध यातें करा ।
देऊनी झणिं औषधी तरिच हें साधेल चित्तीं धरा ॥४६॥

॥ दिंडी ॥
बाल देतां औषधी मुळिं न घेई ।
रडूं लागे म्हणुनिया ‘ आई आई ’ ॥
“ कसें झालां निष्ठूर तुम्ही बापा ! ।
नको मजला मारूंस व्यर्थ भूपा ! ” ॥४७॥
शेवटीं आतां आपल्याला या संकटांतून सोडविण्याला श्रीशंकराशिवाय कोणी वाली राहिलेला नाहीं असा ठाम सिद्धांत करून त्या मुलानें भगवान श्रीशंकराची म्हणजे धनेश्वराची अनन्यभावानें प्रार्थना करण्यास सुरुवात केली.

॥ पद ( सोहनी त्रिवट ) ॥
अदय कधिं न तव झालें शिवा रे ॥धृ०॥
चित्त अजवरी हरा ! उमेशा ! । प्रतापतुंगा ! हे जगदीशा ! ॥
त्वांच रचियलें जग निजलीले ॥
समुद्र - मंथनकालीं ईशा । जग रक्षाया तूंच महेशा ! ॥
हलाहलासी प्राशन केलें ॥
सत्वगुणाची तूंच देवता । महादेव तूं पार्वतिकांता ।
म्हणुनि सुरांनीं पुजिलें ॥
दासगणु म्हणे भाललोचना । हरा ! उदरा ! पतितपावना ॥
चरण तुझे मी धरिले ॥४८॥

॥ लावणी ॥
भूत, प्रेत, वेताळ, आसरा, मुंज्या, भैरव, मरी ।
यांना बलिचें विधान कथिलें, नाहिस तूं त्यापरी ॥
धनलोभानें जननींजनकें मज बाला ओपिलें ।
मृकंड ऋषिच्या मार्कंडेया यम नेतां रक्षिलें ॥
तूंच दयाळा ! सिमंतिनीचें कोड सकल पूरविले ।
ऐसें असतां गाजत कीर्ति अघटित इथे जाहलें ॥
आतां तुजविण आश्रय नाहीं अनाथ झालों हरा ।
दासगणु म्हणे दीनवत्सला, पाव शिवा शंकरा ॥४९॥

॥ श्लोक ( पृथ्वी ) ॥
असें म्हणुन घातिली द्वयकरें शिवाला मिठी ।
अव्हेरिल कसा तरी पदनताप्रती धूर्जटी ॥
स्वयें प्रगट जाहला; दशभुजा जया शोभती ।
अही प्रबलसे गळां; वरदमूर्ति कालीपती ॥५०॥
शंकरानें रागानें आपला तिसरा डोळा उघडून त्या त्रिवर्गाकडे पहातांच,

॥ झंपा ॥
तृतिय नेत्राचिया दृष्टिपातें ।
मरुन पडलें तिघे मंदिरातें ॥धृ०॥
( चाल ) देव ज्याच्या शिरी वरदपाणी धरी ।
अशुभ त्यापासुनी दूर पळतें ॥
माग वर हे मुला ! वश मी झालों तुला ।
बोलला शिव असें बालकातें ॥
दासगणु हा म्हणे, एक ईशाविणें ।
ना निवारी कुणी संकटातें ॥५१॥
मुलानें वर मागितला तो असा कीं,

॥ साकी ॥
उठेव माझ्या जननी, जनका तसा नृपति हा देवा ।
हाच मनींचा हेतू माझ्या तो तूं झणिं पुरवावा ॥
याविण तुज कांहीं । दुजें मागणें मम नाहीं ॥५२॥
हें ऐकून भगवान शंकर म्हणतात, “ बाळ ! -

॥ श्लोक ( वसंत तिलक ) ॥
माता अवश्य परि ती विवशी नसावी ।
वात्सल्यता विमल तातमनीं दिसावी ॥
स्वार्थार्थ देत अपुल्या बळि जो प्रजेला ।
खाटीक तो, म्हणुं नको महिपाल त्याला ॥५३॥
या भगवान् श्रीशंकराच्या बोलण्यानें त्या मुलाचा बुद्धिभेद झालाच नाहीं. उलट तो देवास म्हणतो -

॥ पद ॥ ( धन्य उम शंभूची )
कुणी कांहीं करो जगपाला ।
परि नच सोडी पथ मी आपुला ॥
( चाल ) आइबापाचे, तेवि नृपाचें ।
अशिव चिंतणें उचित न साचें ।
होइल शिशु रयतेला ।
त्यागुं कसा या शास्त्रज्ञेला ।
( चाल ) थोर तिघे हे असतिल पापी ।
न्यायें पाहतां अनितीवापी ।
परि लहानानें त्यांस कदापि ।
ठेवुं नये दोषांला । गणु म्हणे ऐकून प्रभु हें हंसला ॥५४॥

॥ पद ( धपधपा ) ॥
तव भक्त सती चांगल्या उमेच्या नाथा ! ।
तिनें सुत एकुलता, धरुनिया हातां ।
वधियला असे कीं, सत्वरक्षणाकरितां ॥
ना तिला दिलिस दुर्गती, उलट कैलासीं ।
प्रभु आणविले अससी, अती प्रेमेंसी ।
गणुदास म्हणे हें विदित असे सकलांसी ॥५५॥

॥ श्लोक ( शार्दूलविक्रीडित ) ॥
प्रह्लादें अपुला पिता अदय हें जाणून त्याच्या छला ।
साहीलें म्हणुनीच तो नरहरी - पादांबुजा पावला ॥
भीष्मानें नृप शंतनू सुखविण्या कांता नसे पर्णिली ।
पुण्यश्लोक पुरु ययातिचि जरा घेऊन झाला बली ॥५६॥

॥ अभंग ॥
मायबापालागीं पुत्रें तोषवावें । रयतेनें मानावें भूपा प्राण ।
दृढतर निष्ठा सद्गुरुच्या ठाईं । राहवी, ना लक्षावी छिद्रें त्याची ॥
कांतेनें पतीच्या अज्ञेसी मानावें । तेथ नच घ्यावें कुतर्कासी ।
गणु म्हणे ऐशीं व्रतें जो कां पाळीं । तयाचा वनमाळी ! पाठेराखा ॥

॥ पद ॥ ( कोणा भजति )
अदय पित्याला, स्वार्थि नृपाला ।
तेवि जननि जी विवशि तिला ॥धृ०॥
( चाल ) शिक्षा करण्या तूंच समर्थची । एक जगीं या जगपाला ॥
शतशा लावून दीप तमाचा । नाश नये तो कधिं करितां ।
तें करण्याला योग्य असे कीं । दासगणु म्हणे नभिं सविता ॥५८॥

॥ श्लोक ( वसंत तिलक ) ॥
आनंदाला मनिं उमेश अशा वचानें ।
केलें सजीव जननीजनकास त्यानें ॥
भूपाल तोहि उठला तिसर्‍या वरानें ।
सद्भक्त काय न करी प्रभुच्या कृपेनें ॥५९॥

॥ झंपा ॥
नृपा ! पुनरपि तूं न ऐसें करावें ।
सदा स्वप्रजेचे आशिर्वाद घ्यावें ॥
स्वार्थसाधूपणा, हाच अपीं जनां ।
शेवटीं हिनपणा, त्यां त्यजावें ॥
जननिजनकापरी, रयत रक्षी खरी ।
शस्त्र त्याच्यावरी, ना धरावें ॥६०॥

॥ श्लोक ॥ ( शार्दूल विक्रीडित )
सत्तेचा उपयोग नीट आपुला जो भूपती ना करी ।
त्याचा होईल नाश तो समुळ कीं लोकांत माझ्या करी ॥
स्वार्थी भूपति जाय शेवटिं पहा भोगावया दुर्गती ।
होई ना सुखदा कधींच समजे चोराचि ती संगती ॥६१॥

N/A

References : N/A
Last Updated : August 12, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP