मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|कीर्तन आख्यान|श्री दासगणु महाराजांची आख्याने|
चरित्र २

मुकुंदराज - चरित्र २

श्रीसद्गुरू दासगणु महाराजांची कीर्तनाख्यानें हीं अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण, रसाळ आणि विविध काव्यगुणांनी संपन्न असून श्राव्य काव्याचा तो एक उत्कृष्ट नमुना आहे.


शिपाई चकित झाले व हें वर्तमान राजाला येऊन सांगूं लागले,

॥ दिंडी ॥
भूपतीच्या असनास एक योगी ।
बैसलासे माइना तेज अंगीं ॥
कोण, कोठिल, कोठून, कसा आला ।
हें न छाती पुसण्यास होय त्याला ॥२१॥
तो आहे तरी कसा, असें राजानें विचारल्यावर शिपाई त्याचें थोडक्यांत वर्णन करून सांगतात कीं,

॥ पद ( गजल, धुमाळी ) ॥
वेष सहज सांगे त्याचा, देव दिवींचा कीं हा, देव दिवींचा ।
असनिं परि अधरचि बसला ॥
कटिस एक कौपिन ल्याला ।
मुगुट शिरीं जणुं कां झाला । भार जटेचा ॥२२॥
शिपायांच्या वर्णनानें राजा आश्चर्यचकित होऊन त्या योग्याच्या भेटी करतां आतुर झाला, आणि

॥ श्लोक ( वसंत तिलक ) ॥
आला नृपाळ वच ऐकुन मंदिरास ।
त्या भृत्य - वर्णित अशा बघण्या मुनीस ॥
योगीवरास बघतां मनिं थक्क झाला ।
‘ हा कीं दुजा रवि, म्हणे ’ असनीं ‘ उदेला ’ ॥२३॥
योगी ( जयत्पालास )

॥ श्लोक ( वसंत तिलक ) ॥
कोठून मी नच आलों, न कुठेंहि जाईं ।
आहे जसा सतत राहिन त्याच ठाईं ॥
नाना तरंग उठले जरि सागरांत ।
अन्य स्थलाहुनिहि ते आले काय त्यांत ॥२४॥

॥ झंपा ॥
सकल सुगुणाकरा कर विचारा ।
हा न ऐसा बरा भ्रम - पसारा ॥धृ०॥
कोण तूं, मी असे पौरवासीय हे ।
तेज, व्योम नि महि, वारि, वारा ( सकल० ) ॥
हेंच जाणावया मनुजयोनी असे ।
मुळिं न देई अविद्येस थारा । ( सकल० ) ॥
वदुन ऐशापरी त्यास आसनावरी ।
गुप्त झाला म्हणे मज न विसरा । ( सकल० ) ॥२५॥

॥ ओवी ॥
मग त्या दिवसापासून । सहज उद्विग्न झालें मन ।
प्रत्येक साधूकारण, ब्रह्म पुसू लागला ॥२६॥
राजाला ब्रह्मजिज्ञासा उत्पन्न झाली ही वार्ता हां हां म्हणतां सार्‍या राज्यांत पसरली. त्याला ब्रह्मज्ञानाचा उपदेश करण्याकरितां चोहोंकडून साधूंचा समूदाय आपल्या आनुयायांसह राजाकडे येऊं लागला; व आपल्या गुरूंचीं वर्णनें करूं लागला -

॥ पद ॥ ( पोरें नच )
चार वेद यास येती, हे तिनदां स्नान करिती ।
मौन धरून हे राहती, बोलति न कदा ॥ध्रु०॥
राजयोगि हे महंत, जल काढुन दावितात ।
हे भाकित सांगता, भाविकांप्रती ॥२७॥

॥ पद ॥ ( भूपति खरें० )
हा साधु असे हटयोगि घेत उफ़राटे ।
टांगून आपणा पसरि निजाया कांटे ॥२८॥

॥ श्लोक ( वसंत तिलक ) ॥
हा वर्गणि करून बांधित धर्मशाळा ।
क्षेत्रांमधें दिनजनां उतरावयाला ॥
हा तो फ़लाहार करी न शिवेच अन्ना ।
गोरक्षणा करित, हा करि धूम्रपाना ॥२९॥

॥ पद ॥ ( पांडु नृपति० )
हा आहे काव्यानिपुण, प्रेमळ बहु यत्कीर्तन ।
हरि - दिनिला करित गमन, पंढरीस हा ॥
ज्ञानेश्वरि यास येत, शिष्य याचे धनिक बहुत ।
दहिदुधांनि न्हाणितात, देव मानुनी ॥३०॥

॥ पद ॥ ( फ़टका )
बसत नागवा कटघरि हा कीं लावून पोतें उगिच बरी ।
शिष्यवरांतें म्हणे, निज भार्या करा रे अर्पण मज आदरीं ॥
तरीच नेइन वैकुंठाप्रत; करिन तुम्हांला साच हरी ।
दासगणु म्हणे मजसि कळेना गोम यांतली काय खरी ॥३१॥
सामाजिक सम्यतेच्या विरुद्ध वागणार्‍या या साधूचा तर राजाला फ़ारच राग आला आणि त्यानें सेवकांस हुकूम केला कीं -

॥ श्लोक ( वसंत तिलक ) ॥
या नागव्याप्रति नका शहरांत ठेवूं ।
संतत्व एक शशि त्यास किं हाच राहू ॥
याचा विसंगत विधी श्रुतिशास्त्रमार्गा ।
दुर्वर्तनी नरपशू करि व्यर्थ सोंगा ॥३२॥
याप्रमाणें एकामागून एकेक नानावेषधारी साधु राजाच्या गुरुताचा मान मिळावा या लौकिक महत्ताकांक्षेनें आले खरे,

॥ दिंडी ॥
परी इतुक्यांही वश न भूप झाला ।
त्यांसि करितां संवाद दमुनि गेला ॥
अखेर त्यानें काढिली युक्ति एक ।
चुकविण्यासी साधुचा त्रास देख ॥३३॥
साधूंचीं दर्शनें घेऊन सत्कारसमाचार करतां - घेतांच त्याचा जीव त्रासून गेल्यावर त्यानें खर्‍या साधूची निवड करण्याच्या हेतुनें एक युक्ति शोधून काढिली.

॥ अश्वधाटी ॥
साधु अल्या नृप त्यासि पुसे, म्हणे ब्रह्म कसें तें दाव मला ।
नातरि करण्या काम तळ्यावर जाणें आहे भाग तुला ॥
टिकाव, खोरें आणून द्या या कामा लावा शीघ्र गती ।
या ऐद्यांनीं निजधर्माला दिली गणु म्हणे अधोगती ॥३४॥
व्यसनी साधूंचा तर अतिच सुळसुळाट झाला. त्यांना उद्देशून राजानें त्यांची चांगलीच कानउघडणी करावी.

॥ श्लोक ( वसंत तिलक )
गांजा, अफ़ू, मदत, माजुम, भांग, घोटा, ।
या सेवितां खचित होईल हो करंटा ॥
कामा करून अठवा रघुराजरामा ।
हा व्यर्थ वेळ दवडा कधिं ना रिकामा ॥३५॥
राजानें वरील उपाय अंमलांत आणल्यामुळें, मोठमोठे फ़डवाले साधू महंत, संन्यासी, भजनकारी, गोसावी, बैरागी, इत्यादि लोकांच्या चैनीला आळा पडला; इतकेंच नव्हे तर, त्यांचें चांगलेंच दैन्य होण्याला सुरुवात झाली ! ढेरी उतरली, हाडें बाहेर पडलीं, डोळे खोल गेले, गाल बसले, मान वीतभर उंच झाली, आणि ‘ उदरनिमित्त ’ नव्हे, तर खरोखरीच देव आठवूं लागला. शिपाई त्यांचेवर देखरेख करीत होते, ते म्हणूं लागले,

॥ पद ॥ ( कलियुगमें )
क्यौं बुवाजी अब कैसा हैं, कहां गई वो महंतगिरी ।
चटनी, रोटी मानत है अब, तव लगतीथी शिरापुरी ॥
ईश - चरनके दर्शन खातर, वेष फ़कीरी जो लेता ।
उस्की दैना कबु नहि होती, तुम्हारे माफ़क यहां आता ॥
जयत्पाल भूपाल हमारे, साचे चलनकू चाहते है ।
ढंगडेवाले, भोंदू, पागल महबसमे रख देते हैं ॥
पिछे हु वासो हुवा अब तुम, भगवत्की करुना भाको ।
दासगनु कहे हिंदुधर्मकी, दुनियामे इज्जत राखो ॥३६॥
साधूंना पश्चात्ताप वाटूं लागला, व ते देवाचा आतां अंत:करणापासून धांवा करूं लागले,

॥ पद ॥ ( माया ममता )
धांव मुकुंदा ! परमानंदा ! आनंदकंदा ! हरी ! ।
आम्हांस पावे किति सोसावे, हाल अपेष्टा तरी ॥
नको नको हें जीवित देवा ! मरण बरें याहुनी ।
निडदमडीचे राजदूत हे, करिती आम्हां जाचणी ॥
परमार्थाचें सोंग करुनिया अम्हि उदरा भरियलें ।
दासगणु म्हणे त्याचें कां हें फ़ळ आम्हां दीधलें ॥३७॥

॥ पद ॥ ( नृपममता )
करुनिया पुरश्चरणाला । स्वयमेव ब्रह्म कीं झाला । विबुध हो ।
( चाल ) आत्म्याचें जाहल्या ज्ञान, उरे नच भान, वेगळें आन,
प्रती ईश्वर तो । गणु मह्णे सहजची होतो । विबुध हो ! ॥३८॥
तिकडे मुकुंदराजांनीं, योग व ज्ञान अशा दोहोंतहि पारंगत होऊन गुरुकृपा संपादन केली, आणि

॥ श्लोक ( पृथ्वी ) ॥
अतुल बलि जाहले मुनि मुकुंद योगामुळें ।
अशक्य जगतीतलावरी न कांहिं त्या राहिलें ॥
क्षणांत गमना करी, गिरि, पुरीस, रामेश्वरीं ।
समर्थ बहु योग, ये नच कुणास याची सरी ॥३९॥
योगबळानें त्यांना पुढील सामर्थ्य आपोआपच प्राप्त झालें.

॥ दिंडी ॥
योगि पाण्याच्या वरून पळत जाई ।
पद न महिला लाविता अधर राही ॥
करी शीतळ अग्नीस, सजिव प्रेता ।
अचल चालवि कीं ऐसि योग सत्ता ॥४०॥

N/A

References : N/A
Last Updated : August 13, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP