मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|कीर्तन आख्यान|श्री दासगणु महाराजांची आख्याने|
श्री माणकोजी बोधले चरित्र १

श्री माणकोजी बोधले चरित्र १

श्रीसद्गुरू दासगणु महाराजांची कीर्तनाख्यानें हीं अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण, रसाळ आणि विविध काव्यगुणांनी संपन्न असून श्राव्य काव्याचा तो एक उत्कृष्ट नमुना आहे.


( पूर्वार्ध )

॥ आर्या ॥
बालेघाटावरती धामण गांवांत बोधला झाला ।
भगवद्भक्त महा जो ज्यानें निज देह विठ्ठला विकला ॥१॥
हें धामणगांव बार्शी तालुक्यांत तुळजापुराजवळ आहे.

॥ दिंडी ॥
जनन ज्याचें जगताप कुळीं झालें । मराठ्याचें कीं, कुळ भूषवीलें ॥
माणकोजी हें नाम जया जाणा । असे पाटिल दस्कती भक्तराणा ॥२॥

॥ ओवी ॥
ममताई नामें कलत्र । यमाजी तो होय पुत्र ।
स्नुषा अति पवित्र । भागीरथी नाम जियेचें ॥३॥

॥ लावणी ॥
शेतीचा, तो भव्य पसारा, गडीमाणसें घरीं ।
इनामी जमीन चहुरभरीं ॥
बागबगीचे घोडे, गाड्या थळी उंसाची अती ।
अवघे जन आज्ञा पाळिती ॥
( चाल ) देखणे तसे मजबूत बैल - संग्रहा ॥
माळवी, देशि, नेमाडि खिलारी पहा ।
दुधदुभत्याला किमपि न तोटा लक्ष्मी नांदे घरीं ॥
बोधला उदास परि अंतरीं ॥४॥

॥ आर्या ॥
याचक येतां द्वारीं पुरवि तदिच्छा करून बहु मान ।
वाटे धामणगांवीं झाला अवतीर्ण हा दुजा कर्ण ॥५॥
अशी श्रीमंती व पाटीलकीची हुकमत, परंतु,

॥ साकी ॥
पाटिलकीचा जाम न अंगीं लीन लव्हाळ्यापरि हो ।
जिव्हा रत हरि नामस्मरणीं गमविन वायां पळ हो ॥६॥
सात्विक व उदार भावनेमुळें प्रपंचांत उत्तरोत्तर संपतीला ओहटी लागून,

॥ दिंडी ॥
दान देतां धन - धान्य नष्ट झालें । बोधल्यासि दारिद्र्य पहा आलें ॥
घरीं नुरलें ढोरहि एक त्याच्या । झुंडि फ़िरती गोठ्यांत मूषकांच्या ॥७॥

॥ ओवी ॥
शुद्ध पक्षाची एकादशी । येतां बोधला प्रत्येक मासीं ॥
जातसे क्षेत्र पंढरीसी । वारी कराया कारणें ॥८॥
पूर्वी संपत्ति घरांत असतांना पाटिलबुवाबरोबर शेकडों यात्रेकरू निघत होते. आतां दारिद्यामुळें पाटिलबुवांना स्वत: वारीला जाणें कठीण झालें. तें पाहून बायको म्हणाली;

॥ पद ॥
उरला न कपर्दिक गेहीं । वदे मधुर वचें ममताई ॥ त्याप्रती ॥
ना पीठकूट गृहिं नाथा । वारीस काय मग नेती ॥ बरोबरी ॥
( चाल ) ना घरीं, घान्य मुठभरी, वेळ ही खरी, आलि साजिरी,
आम्हा मरण्याची । ना पत गांवीं कौडीची ॥ राहिली ॥९॥
तिला दारिद्य येण्याचें कारण ‘ श्रीपांडुरंगाचें भजन ’ हेंच आहे असें वाटलें, म्हणून ती नवर्‍यास म्हणाली.

॥ श्लोक ॥
जों जों तुम्ही भजतसां प्रभु शेषशायी ।
तों तों घरांत शिरली धनहीनता ही ।
तन्नाम मंगल नसे मज वाटताहे ।
प्रापंचिकास स्मरण्या विठु योग्य नोहे ॥१०॥
या तिच्या म्हणण्यानें पाटीलबुवांस वाईट वाटलें व तिचें ते समाधान करतात.

॥ कामदा ॥
गेलि संपदा हीच सुंदरी । केलि गे कृपा आपणांवरी ॥
जाण विठ्ठले निंदुं त्या नको । चित्त या भवीं गोंवु तूं नको ॥११॥

॥ साकी ॥
जल बुद्बुद्वत् धन - दौलत ही, मोह तिचा नच वाही ।
परलोकीं या ऐहिक सुखाला, किंमत नच गे ! कांहीं ॥१२॥
दारिद्र्य प्राप्त झाल्यामुळें पूर्वींच्या डामडौलांत अर्थांतच फ़रक पडला.
त्या दैन्यावस्थेला पाहून लोक पाटीलबुवांविषयीं निंदा व कुचेष्टा करूं लागले.

॥ लावणी ॥
पाटिल झाला पिसा, दिसतो एखादा वैदु जसा ॥ध्रु०॥
( चाल ) शेला मुंडासे हो शेरवाणि गेली ।
गेठ्या ऐवजीं ती माळ घातिली ॥
पायतन घ्यायाला हो शक्ति न उरली ।
झाला रिकामा तो कंबर कसा ॥ दिसतो ॥
( चाल ) दाढीमिशाची ती अंबाडि झाली ।
खोल खोल गेले गाल पडली झुरळी ॥
सुदामजीची ती हो अवस्था झाली ।
गणु म्हणे खपाटिस गेल्या कुसा ॥ दिसतो ॥१३॥

॥ आर्या ॥
धामणगांवीं झाली किंमत त्याची गृहीं जसा केर ।
म्हणती वृक्ष सुरूचा परि झाल पर्णरहित साचार ॥१४॥
पंढरीला वारीला गेल्यावर देवाच्या देवाच्या नैवेद्याकरितां तरी कांहीं नेलें पाहिजे. तें तरी काय नेणार असें कुटुंबानें विचारतांच बोधलेबुवा म्हणाले -

॥ दिंडी ॥
कुर्‍हाडीसी दे अणुनि मला कांते ! पथीं जातां तोडीन सर्पणातें ॥
तीच मोळी नेऊन पंढरीला । विकुन नेइन वारीहि सांगतेला ॥१५॥
बायको म्हणाली, कुर्‍हाड कशाला ? लोक काय म्हणतील -

॥ लावणी ॥
नका वारीस जाऊं दीनवाणी शपथ ही तुम्हाला ।
बसा ऐटींत गाडींत चैनींत पांघरुनि शेला ॥
( चाल ) घाला उंची झुली बैला, बांधा गळ्यांत घागरमाळा ॥
तुम्ही पाटील मनीं आणा, ध्यावें बिगारीसी महाराला ॥१‍६॥
पाटील म्हणाले, मी दीनवाणा जाणार नाहीं माझा थाट और आहे.

॥ श्लोक ॥
सन्निश्चयाची मम जाण गाडी । सद्भाव नी प्रेम हि बैलजोडी ।
म्यां जोडिली त्या अनुहात माला । वैराग्यरूपी मम जाण शेला ॥

॥ ओवी ॥
मार्गी जातां सर्पण । काढोन, बांधली मोली जाण ।
मुखें ‘ विठ्ठल ’ नामस्मरण । मंत्र जपे सर्वदा ॥१८॥
पूर्वीं पाटीलबुवा यात्रेला आले म्हणजे बडव्यांच्या झुंडीच्या झुंडी चंद्रभागा ओलांडून यात्रेला त्यांच्या स्वगताकरितां येत असत; परंतु आतांची परिस्थिती पडली प्रतिकूल. बोधराज पाटील गांवांत हिंडून राहिले, पण -

॥ दिंडी ॥
पाहुनी त्या धनहीन बोधल्याला । देति जागा नच बडवे बिर्‍हाडाला ॥
लक्षुमीनें त्यजिलिया असें होतें । नाहिं किंमत या जगतिं मानवातें ॥१०॥

॥ पद ॥
जिकडे तिकडे या पैशाचा मानमरातब तो सारा ।
झाडें पहाड पर्वत जिकडे तिकडेच वाहे तो वारा ॥
खिसा जयाचा गरम तयापुढें नरम, सारे जन होती ।
या या म्हणुनी गालीच्यावरे लोडापाशीं स्थल देती ॥
चलती ज्यांची घरीं तयांच्या पाहुण्यास ये बहु भरती ।
मांसपिंड तो दृष्टिस पडतां जशीं गिधाडें वनिं जमतीं ॥
खिसा जयाचा गरम तयाच्या बाइल झेलित वचनाला ।
तोच झाल्या टरकल पुढतीं पाही मुरडुनि नाकाला ॥
धनिक असल्या काळा म्हणती वर्ण सांवळा मजेदार ।
दुर्गुण त्याचे सद्गुण होती पहा धनाचा किति जोर ॥
सर्व धनाचे काका, मामा, बाइल, भगिनी आप्त नरा ।
दासगणु म्हणे अनाथाचा वाली विठ्ठल एक खरा ॥२०॥

॥ ओवी ॥
चंद्रभागेंत वाळवंटीं । जाऊन उतरला शेवटीं ।
तें पाहून जगजेठी । झाला कष्टी मनांत ॥२१॥
देव कष्टी झालेले पाहून रुक्मिणीनें विचारलें, ‘ देवा !

॥ पद ॥
दीन जनोद्धर ! भो करुणाकर ! सचिंत कां तरी तुम्हि दिसतां ॥
अनंत कोटी ब्रह्मांडांचे नायक आपण हो असतां ।
( चाल ) पाहा टाळ विणे झांजा, घेउनिया ते ।
आले साधु संत जन तुझ्या भेटितें ॥
तसें तन मन देवा अर्पुनियां ते ।
ऐहिक सुखावर लोटुन माती तव नामीं जे रत नाथा ॥
समूह त्यांचा सन्मुख असतां दु:खित कां हो ! श्रीकांता ॥२२॥
देव म्हणाले :-

॥ ओवी ॥
रमे हे अवघे वायस । बोधला माझा राजहंस ।
उतरला वाळवंटास । लेकरूं माझें थंडीमधें ॥२३॥

॥ लावणी ॥
साळून कांटे निवडुंगाचीं फ़ळें आणिलीं बहु जरी ।
परि न ये अंजिराची सरी ॥
निजतेजानें नक्षत्रें तीं चमकति गगनीं जरी ।
परि न ये इंदूची बरोबरी ॥
( चाल ) कुठें कांचमणी तो कुठें सांग गे ! हिरा ॥
चंदना त्यजुनिया हिंवर कोण धरि उरा ॥
नंदिला पुजुन वगळावें काय शंकरा ॥
अंजिर, इंदू, माणिक, चंदन, शिव माझा सुंदरी ।
बोधला गणु म्हणे भिवरातिरीं ॥२४॥
इकडे वाळवंटांत बोधलेबुवांनीं -

॥ आर्या ॥
हरिजागर तो केला तनमनधन विठ्ठलास अर्पुनिया ।
एकादशीस बुधहो ! थंडीचा प्रखर ताप सोसुनिया ॥२५॥

॥ दिंडी ॥
द्वादशीचा बहु थाट पंढरींत । भक्त करिती नैवेद्य असंख्यात ॥
कुणी लाडू, कुणि खीर, पुरी फ़ेणी । परि न सेवी एकही चक्रपाणी ॥२६॥
तें पाहून

॥ श्लोक ॥
अपांपति - सुता म्हणे सुकलि का मुखश्री तरी ।
मना न रुचतात का विविध भोग हे श्रीहरी ! ॥
अला सुदिन द्वादशी बहुत भक्त आनंदलें ।
परी न अपुली विभो ! ठरति राउळीं पाउलें ॥२७॥
तें ऐकून देव म्हणाले, मला हे उपचार मुळींच पटत नाहींत. का म्हणशील तर -

॥ पद ॥
दांभिक सकल हे जाण, बडे बैमान ।
हे विविध भोग मजसाठिं खचित ना प्रिये ! रमे मनिं आण ॥ध्रु०॥
( चाल ) हा समुह मला नच प्यारा ।
हा ऐहिक सुखेच्छू सारा ॥
नच भूतदयेचा वारा ।
धर्माचि कापुनी मान, सदा हे अंध चाहति धनमान ॥२८॥
तथापि देवाचें हें बोलणें तिला रुचलें नाहीं म्हणून पुन: देवालाच ती बोल लावून म्हणाली -

॥ पद ॥
पुरे पुरे हा बोध अतां ।
विमल सकल जन मन हे असतां । व्यर्थ तया तुम्हि दूषवितां ॥ध्रु०॥
( चाल ) चित्त जयाचें ज्यापरि असतें, जगत् तयाला त्यापरि दिसतें ।
तुम्ही मुळीं, अहा कपटी कली, नेलात तळीं, तो भूप बळी ।
शिरिं पद देउनि पंढरिनाथा ! विदित गणू म्हणे भागवता ॥२९॥

॥ अभंग ॥
तूंच असत्याची खाण । मज टाकिलें झांकुन ।
तुझा मायिक बाजार । पहातां भुलले नारी नर ॥
शुद्ध चैतन्याचे ठाईं । नाहीं निष्ठा एकाची ही ।
मी तो पंढरिचा राणा । द्याया इच्छितो निर्वाणा ॥३०॥

N/A

References : N/A
Last Updated : August 24, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP