मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|कीर्तन आख्यान|श्री दासगणु महाराजांची आख्याने|
श्री संत दामाजी चरित्र १

श्री संत दामाजी चरित्र १


श्रीसद्गुरू दासगणु महाराजांची कीर्तनाख्यानें हीं अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण, रसाळ आणि विविध काव्यगुणांनी संपन्न असून श्राव्य काव्याचा तो एक उत्कृष्ट नमुना आहे.


॥ आर्या ॥
मंगळवेढयामाजी, झालासे पंत संत दामाजी ॥
ज्यानें भक्तिबळानें, श्रीविठ्ठल ठेविला सदा राजी ॥१॥

॥ पद ॥
दुष्काळ काळ भूवरती । दुष्काळ ॥
‘ आ ’ पसरोनी कीं अवतरला ॥
लक्षावधि बळि पडले ज्याला । बाप विचारी नच पोराला ॥
खायास मिळेना मुठ पुरती ॥ दुष्काळ ॥२॥

॥ श्लोक (पृथ्वी) ॥
भिती धनिक पाहूनी अमित त्या भिकाराप्रती ॥
गरीब मरती किती क्षुधित होउनिया पथीं ॥
असें पसरलें तईं बहु भिकार दाही दिशा ॥
कलत्र शिशुची तदा उरलि नाहीं कोणा आशा ॥३॥

॥ साकी ॥
ऐसें होतां एक विम्र तो मंगळवेढ्या गेला ॥
दामाजीतें पाहुनि नयनीं, चित्तीं प्रभुदित झाला ॥४॥
दामाजीपंतांनी त्या ब्राम्हणाचा योग्य आदरसत्कार केला.

॥ श्लोक (भुजंगप्रयात) ॥
दिलें धान्य तें द्रव्य सोंने द्विजाला । तयाला न ते नववें भार झाला ॥
पथीं चालतां टाकि काढून काहीं । मनीं मानुनी हर्ष आला स्वगेही ॥५॥
तो ब्राम्हण पंढरीचा होता. तो परत आल्यावर पंढरपुरच्या ब्राम्हणांनी विचारपूस केली. तेव्हा त्याने त्यांस सर्व हकीकत कळविली. तेव्हा-

॥ पद ॥ (चाल-लावणी)
निघाली पंढरपुरची भटं । धरिली की वाट । आली मंगळवेढया नीट ॥
झाले हातपाय काडयांपरी । पोरें बरोबरी । कसा कोपला तो श्रीहरी! ॥६॥
ही ब्राम्हणमंडळी दामाजीपंताच्या घरी गेली. पंतांनी, ‘तुम्ही कोण; कुठले, सर्व विचारपूस केली. भुकेने व्याकूळ झालेले, त्यामुळे ते म्हणाले,

॥ पद ॥ (ताल - त्रिवट)
आमच्यानें बोलवेना । नच वस्त्रहि अंगासी ॥
तसें मिळेना खायासी । हा ताप आम्हां साहेना ॥
आम्ही सकळ भिकारी । आलो तुझिया द्वारीं ॥
माघारी आम्हां फिरवीना ॥आ०॥७॥

॥ पद ॥ (लावणी)
ब्राम्हण तेधवां वदति आपुल्या वाचें ॥
आम्हीं पंढरपुरचें । आहों कीं साचें ॥
जें क्षेत्र पुनित भूवरति तीर भीमेचें ॥८॥

॥ श्लोक (पृथ्वी) ॥
असें परिसतांच ये कुलवधू तयासी तिथें ॥
म्हणे द्विजवरां, ‘जरा धिर धरा बसा गा! इथे ॥
तुम्हां करुनि घालितें त्वरित दिव्य पाकाप्रती ॥
आम्हां तुमचिया मिषे खचित भेटला श्रीपती ॥९॥
संताचे माहेरघर अशी ती पंढरी, आणि तेथील ही सर्व
ब्राम्हणमंडळी आपल्या घरीं आलेली पाहून उभयंताना
अतिशय आनंद झाला.  दामाजी (ब्राम्हणांस)

॥ पद ॥ ( चाल-मज सोडुनि अ.)
धन्य धन्य हा दिन अजिचा । आगमनानें कीं आपुलिया ॥
कमलनयन जगतात भेटला मज साचा भेटला मज साचा ॥
महा पुनित तें तट भीमेचें । प्रति वैकुंठचि या भूवरचें ।
निवासस्थल तें, मम जननींचे ।
तेथ उभा श्रीकांत । निधी जो करुणेचा ॥१०॥
तोपर्यंत तिकडे पंताच्या स्त्रीने स्वयंपाक तयार केला. ब्राम्हणभोजनाचा थाट काय वर्णन करावा!

॥ पद ॥ (कटाव)
थाट माट बहु पाट शिशीचे । परिमल सुटती उदबत्त्यांचे ।
पान सव्वा हात, द्रोण केळिचे । मीठ धवल, लिंबू, पंचामृत ।
तक्कू, रायतें, भेंडवडे ते । दाटी झाली कोशिंबिरीची ।
खिरा, कांकडी आणि केळांची । पेरु, अननस, डाळिंबाची ।
डाळ वाटिली बहुत मजेची । कुरडी, पापड, भज्या, वडयाची ।
गर्दी झाली तशि शाकांची । मुळा, दोडका आणि भोपळा ।
चुका, चाकवत, वांगि, कोहळा । भेंडी, डिंगरी, घोळ, पोकळा ।
घेंडस, वाघाटी, घोसाळी । अबई, शेवगा, चवळि, पडोळी ।
हदगा, गाजर, पपइ, तोंडली । अळूं, घेवडा, शुभ्र कार्‍हळी ।
खिरि मनोहर नानापरिच्या । वळवट टिकल्या नी गव्हल्याच्या ।
रायभोग तांदूळ मजेचे । पिवळें दाट वरण तुरींचे ।
तूप साजूक तें गायीचें । घीवर, जिलेबी, ती बासुंदी ।
बेसन, दळिया, चुटिया, बुंदी । साखरभात, शिरा, करंजी ।
साखर आज्य युक्तीचे सगळे । नानापरिच्या पक्वान्नांचीं ।
चवी निराळी सुधारसाची । कढी मनोहर तशी दह्याची ।
एकेक रुपया पात्रिं दक्षिणा । प्रमोद झाला विप्रविरांना ।
दासगणूच्या या नव कवना । मान्य करो! तो पंढरिराणा ॥११॥
पानें वाढून मंडळी जेवावयास बसतात तोंच-

॥ आर्या ॥ (गीति)
होऊं तृप्त सकल परि, आहे गेहीं कलत्र उपवासी ।
त्याची येवो करुणा, तुज पावो तो सदा हॄषीकेशी ॥१२॥
पंतांनी आश्वासनापर अभय दिल्यावर, मंडळींनी भोजन केले.
नंतर पंतांनी सर्व बाजुंनी विचार करून सरकारची प्रज्ञा उपाशी मरत असतां, सरकारी धान्याची कोठारें लुटविणे गैर नाही, हें जाणून-

॥ पद ॥ (कटाव)
बादशहाची । बक्षि गव्हाचीं । बहुमोलाची धान्यागरें ।
पाहुनि, म्हणती । पंत ‘लुटा रे! । हात आखडता तुम्ही न घ्यावा ।
नेववेल तो तितका न्यावा । माल खजीना, सोने, नाणें ।
मोहरा अकबर शिक्केशाही । भरूनि थैल्या, शिक्के केल्या ।
त्या मी आजी सर्व तुम्हांसी । दिधल्या घेऊनि जा गेहासी-पंढरीसी’ ॥१३॥
धान्यागरे लुटून सर्वजण पंढरपुरास रवाना झालें. दामाजीपंतांचे हे वर्तमान
समजले. त्याने बर्‍याच दिवसांपासून बढतीच्या आशेने दामोजीपंताचे उणें शोधून काढण्याचे योजिले होते. तेव्हां ही वेळ, हीच संधि योग्य आहे, असे पाहून

॥ पद ॥ (चाल-मित्रा मज जन्म)
पेशकारें पत्र लिहुनि धाडिले शहा ॥
“ पंताने धान्य सर्व लुटविलें पहा! ॥
कोठारीं धान्य किमपि राहिलें नसे ॥
निमकहराम कृति ही साच होय तरि कसें?”॥१४॥
पत्र पाहताच, राजाने तें वाचून पाहण्याकरिता, वजीरास दिलें व त्याने ते वाचून दाखविले. पंताने सर्व खजिना लुटविला आहे.

॥ साकी ॥
संदेसा ये सुनकर मालक उस घडि घुस्सा पाया ॥
“ दगलबाज ये पंत हुआ है गुन्हा हमारा किया ॥
पकडो जा! उस्को । वो बदमाष अंधको” ॥१५॥
राजाने दामाजीपंतांना, जसा असेल तसा मुसक्या बांधून घेऊन या, असा एकदम हुकूम सोडला. मग काय!

॥ पद ॥ (चाल-पंचरंगी घोडा)
होतां हुकुम ऐशापरी । निघाले शिपाई पंचह्त्यारी ॥
अति जात दांडगी खरी पठाण अरबांची ॥
त्यांनी वाट धरिली नीट मंगलवेढयाची ॥१६॥
ते शिपाई ताबडतोब दामाजीपंतांच्या घरी येऊन त्यांना

॥ साकी ॥
क्यौं वे गध्दे तुने लुटवाया, अनाज बम्मनको ॥
उस खातर तुझे ले चलनको हुकुम हुवा है हमको ॥१७॥
दुष्काळाने प्रजानन पीडीत झाले असतां सरकारी धान्यागरे लुटविली,
ही गोष्ट राजाला न पटून त्यानें ज्याअर्थी मला घेऊन येण्याकरिता शिपाई
धाडले आहेत, त्याअर्थी राजाला जाऊन भेटणे योग्य होय, असें पंतांना पांडुरंगाच्या दर्शनाचा योग कसा येणार, असा विचार करून ते त्या शिपायांना नम्रपणे म्हणतात,

॥ पद ॥ (चाल-रुचती का)
विनती ही एक माझीम तुम्हि ऐका हो झणी ॥
पंढरिच्या वरूनि जावें मजलागि घेउनी ॥
शेवटचें तेथ मी त्या पाहिन श्रीविठ्ठ्ला ॥
मग होवो! पुढें काहीं नच खंति मुळि मला ॥१८॥
शिपायांनी तेवढी गोष्ट कशीतरी मान्य केली व नंतर-

॥ पद ॥ (चाल-रुचती जा.)
बेदरासी जाया निघाले लवलाही ॥ की चहूं बाजूला पठाणमाई ।
चित्तीं ज्या दया लवहि नाहीं ॥ कीं रडती लोक धायिधायी ॥
पंत म्हणति, “ तुम्ही लोभ ठेवणें जातों वेदराला ॥
मालक मजवरि खपा जाहला सक्त हुकुम केला ॥
निराधार ही स्त्री मम झाली सांभाळा हिजला ॥
आई, बाप, भाऊ माझा रमापती ॥
कीं, त्यातें कथा मम ही विनति” ॥१९॥
भोवताली गराडा घालून शिपायी जेव्हां पंतांना नेऊ लागले, त्या वेळी त्यांची कुलस्त्री भाकूं लागली.

॥ पद ॥ (चाल-नृप ममता)
हे अनंत पंढरिराया! । काम निष्ठूर किलेस माया । ईश्वरा!
चुकल्यें मी काय सेवेला । म्हणुनीच मोकलिसी मजला । ईश्वरा!
ईश्वरा! रमेच्या वरा! दयासागरा! । शिणावे ना वायां ॥
संकटी रक्षी पतिराया । ईश्वरा! ॥२०॥

N/A

References : N/A
Last Updated : September 22, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP