मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|कीर्तन आख्यान|श्री दासगणु महाराजांची आख्याने|
श्रीनरहरि अवतार

श्रीनरहरि अवतार

श्रीसद्गुरू दासगणु महाराजांची कीर्तनाख्यानें हीं अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण, रसाळ आणि विविध काव्यगुणांनी संपन्न असून श्राव्य काव्याचा तो एक उत्कृष्ट नमुना आहे.


॥ श्लोक - मालिनी ॥
प्रबल असुर झाला धातयाच्या वरानें ।
यजन पुजन झालें बंद त्याच्या भयानें ॥
मुनि यति जटि धाके लोपले कंदरींत ।
म्हणुनि बहु उदेली काळजी निर्जरांत ॥१॥
हिरण्यकश्यपूनें अमरत्व मिळविण्यासाठीं उग्र तपश्चर्या केली. ब्रह्मदेव प्रसन्न झाले. त्यांनीं त्यास वर दिला. त्या वरानें दिवसा, रात्रीं, घरांत, बाहेर, जमिनीवर, अधांतरी, शत्रानें - अस्त्रानें, माणसाकडून वा पशूकडून मृत्यू येणार नाहीं असा वर त्यानें मिळविला. त्याचा परिणाम म्हणून तो दैत्य उन्मत्त झाला. त्रस्त्र झालेले देव आपलें गार्‍हाणें सांगण्यासाठीं भगवान् विष्णूस शरण गेले.

॥ ओवी ॥
क्षीरसमुद्राचे तीरीं । मिळाले देव नानापरी ।
स्तवन करिती बद्धकरी । वासुदेवाचें तेधवां ॥२॥
देव स्तुती करीत असतांना म्हणाले,

॥ पद ॥
भो भगवन् लक्ष्मीकांता । तूं जगत्त्रायातें त्राता ॥ श्रीहरी ॥
पुण्यांश महीचा सरला । अनितीचा सुकाळ झाला ॥ भूवरीं ॥
( चाल ) जाणती कुनी ना नीति, संत सन्मती, लपुन बैसती,
वरून धाकाळा । हें कां ना अवगत तुजला ॥ श्रीहरी ॥३॥

॥ दिंडी ॥
दिला देवा वर कनकाकश्यपूसी ।
मरन नाहीं तुज दिवा वा निशिसी ॥

॥ पद ॥ ( नृपममता )
कुलधर्म शिकावें कुलिचे । ना उचित भजन तुज हरिचे ॥ येधवां ॥
( चाल ) तो विष्णू करी नि:पात, आण ध्यानांत, तुझा तो तात ॥
भजत ज्या नाहीं । तूं त्याच्या लागशि पायीं ॥ काय हें ॥१४॥

॥ ओंवी ॥
प्रहळाद बोले त्यावरी । कुलधर्म आमुचें कोणते तरी ।
कीं ज्या धर्मास माझा हरी । कुपथ्यकारक जाहला ॥१५॥
प्रह्लादाच्या या प्रश्नावरा राक्षसांची वागण्याची पद्धती कशी असावी ते शिकवितांना गुरुजी म्हणाले कीं,
 
॥ श्लोक - शार्दूल - विक्रीडित ॥
दंडावें द्विज सर्वदा अमरही प्यावी सुरा आदरी ।
धेनू मारुन मांस भक्षण करी संता धरावें दुरी ।
द्यावा ताप परा निरर्थक तुवा मारीत जा मानवा ।
प्रहलादा कुलधर्म हे आचर तूं ध्याऊं नको केशवा ॥१६॥
हें बोलणें ऐकून प्रह्लाद अत्यंत दु:खित झाला आणि त्वेषानें म्हणाला,

॥ पद ॥ ( नृपममता )
धि:कार असो कुलधर्म । जो मुळिच्या सारित वर्मा ॥ साच कीं ॥
( चाल ) त्याहून मरण हें बरें, वाटतें खरें, जेथ ना उरे ।
नीतीचें अंग । मग आठवे ना श्रीरंग ॥ खचित कीं ॥१७॥

॥ श्लोक - वसंत - तिलक ॥
आजन्म मी भजत जाइन देवदेवा ।
संतादिका सदय जो जगतीं विसांवा ॥
ज्याच्या शुची धवल कीर्तीस गावयाला ।
तो वेदसंघ गुरुजी जगिं भाट झाला ॥१८॥
प्रह्लादाचें बोलणें ऐकून गुरुजी घाबरले. या वृत्तीमुळें आपल्या नोकरीवर पाणी पडणार या भीतीनें हिरण्यकश्यपूला हें सर्व सांगून स्वत: उत्तरदायित्वांतून मोकळे व्हावें या कल्पनेनें ते प्रह्लादास म्हणाले.

॥ दिंडी ॥
चल नेतो तुज पित्याकडे आजी ।
तूं न धडगत लाविशी खचित माझी ॥
तुझ्या बापाचें अन्न खाउनिया ।
काय शिकवूं तुज केशवा भजाया ॥१९॥

॥ ओवी ॥
प्रहलाद करीं घेवोनी । षंढामर्क आले सभास्थानीं ।
हिरण्यकश्यपूस वंदोनी । बोलूं लागले ऐशारिती ॥२०॥

॥ लावणी ॥ ( भला जन्म )
हा वैरी तुझा पूर्वींचा वाटे आला शिशु होउनी ।
कराया घात तुझा अवनी ।
जेवी दांडाअ बघ फ़रशूचा घात कुला करितसे ।
नृपा हें तुझें कारटें तसें ॥
( चाल ) ॐकार तया मी गेलों शिकवावया ।
बैसला मानसीं तेंच घट्ट धरूनिया ॥
म्हणे आतां पुढें शिकविता तरी कासया ॥
येणें होइन कृत्यार्थ गुरुजी ऐसें वदला झणीं ।
आलो त्या म्हणुनी मी घेउनी ॥२१॥
गुरुजींनीं केलेली तक्रार ऐकूनहि हिरण्यकश्यपूस प्रथमत: वात्सल्यामुळें प्रह्लादाचा राग आला नाहीं. उलटे

॥ दिंडी ॥
आला पाहुन पुत्रास मोह फ़ार ।
करें उचलून अंकास घे कुमार ॥
काय बाळा ! शिकलास गुरूपाशीं ।
असें बोलुन भूपती चुंबि त्यासी ॥२२॥
प्रह्लादानें उत्तर दिलें.

॥ श्लोक - वसंत तिलक ॥
ताता गुरू महिवरी न दिसून येत ।
हे भारभूत अवघे जगतांत जंत ॥
तोची गुरू नृपवरा जगिं होय साचा ।
ज्याची अखंड वदते हरिनाम वाचा ॥२३॥
पुत्राचें हे बोलणें ऐकून हिरण्यकश्यपोस सखेद आश्चर्य वाटलें. तो प्रह्लादास म्हणाला.

॥ पद ॥ ( मित्रा मम )
धिग् धिग् हें अशुभ काय बोलसी असें ।
तव कुलिचा विष्णु वैरी, तदिय त्यज पिसे ॥
विहगगणीं अशुभ जसा उलुक पिंगळा ।
प्रह्लादा निर्जरांत तेवि सांवळा ॥
भजुन तया होउ नको व्यर्थ तूं खुळा ।
असुर कुळीं जन्म तुझा ध्यानीं कां नसे ॥२४॥
ज्यांची भक्ती करावी असें तूं म्हणतोस तो विष्णू कसा अधम आहे तें तुला सांगतो. ऐक.

॥ लावणी ॥ ( भला जन्म )
होउन मासा त्या दुष्टानें शंखासुर मारिला ।
पुढें तो कूर्म जाहला मुला ॥
तव चुलत्याच्या घातास्तव तो डुक्कर झाला हरी ।
नसे ज्या लाज मुळीं तिलभरी ॥
( चाल ) फ़सविण्या तान्हुल्या अपुल्या भस्मासुरा ।
थयथया नाचला नटवा होउन खरा ॥
त्या हिजड्याचें भजन करिसी योग्य न हें तूजला ।
हंसा दैवत कां कावळा ? ॥२५॥
बापानें केलेली विष्णूची निंदा ऐकूनहि प्रह्लादाच्या मनावर त्याचा कांहीं परिणाम झाला नाहीं. उलट तो म्हणाला,

॥ श्लोक - इंद्रवज्रा ॥
जें जें तया तूं म्हणशील ताता ।
तें तें तया साजत श्रीअनंता ॥
माया महा दुर्धर त्या हरीची ।
संसार डोहीं मनुजास खेची ॥२६॥
प्रह्लादाच्या या भाषणानें हिरण्यकश्यपूचा राग अनावर झाला आणि तो म्हणाला,

॥ श्लोक - उपजाति ॥
धि:कार याच्या असो वाचण्याला
जयीं पोटीं होता तयीं कां न मेला ॥
वधा रे वधा या वधा कारट्यासी ।
असें बोळुनी लोटिले त्या क्षितीसी ॥२७॥
त्यानें सेवकांना आज्ञा केली कीं,

॥ दिंडी ॥
खङ्गघाते या त्वरित कुणी मारा ।
नको दुष्टाचा किमपि मजसि वारा ॥
दग्ध करणें घालून वन्हिमाजी ।
नेउन लोटावा पर्वतास आजी ॥२८॥
त्याप्रमाणें राक्षस सेवकांनीं प्रह्लादास मारण्याचा पुष्कळ प्रयत्न केला.

॥ श्लोक ॥
खङ्गानें करितां न होय वध तो वहनीही थंडावला ।
लोटीता गिरिच्यावरून शिशु तो खालीं उभा राहिला ॥
झाले राक्षस त्रस्त तेथ न चले कांहीं कुणाचें बळ ।
ज्याचा रक्षक वासुदेव करितो त्या काय सांगा खळ ? ॥२९॥
कोणत्याहि उपायांनीं प्रह्लाद मरत नाहीं हें पाहून हिरण्यकश्यपू आपल्या मनाशीं म्हणतो,

॥ लावणी ॥ ( चंद्रकांत )
पंचभुतें ती मारायला समर्थ या नच कशी ।
शस्त्रास्त्राचे कांहीं न चाले बळ ऐसे याजसी ॥
कोठ्न आले मजसि कळेना अल्पवयी हा दिसे ।
मूर्तिमंत हा मृत्युच मजला मग या ठेवू कसे ? ॥३०॥
नंतर त्यानें आपली पत्नी कयाधु हिला सांगितलें कीं,

॥ श्लोक - शार्दूल विक्रीडित ॥
रंभोरू ! विषपान यास करवी हें ना तुझें पोरटें ।
सौभाग्यावरती कुठार तुझिया घालील हें कारटें ॥
यासाठीं झणिं मार हा लहान गे आहे प्रिये जोंवरी ।
रोगा वाढवुनी जगांत जगणें व्हावें कसें सुंदरी ! ॥३१॥
नवर्‍याची ही आज्ञा ऐकून त्या पतिव्रतेस फ़ार दु:ख झालें. ती म्हणाली;

॥ पद ॥ ( नृपममता )
मम शिशु पांच वर्षाचे । विष कैसे याला देऊं ? ॥ माधवा ॥
जननित्व त्यजुन मी माझें । विवशी कां देवा होऊं ॥
( चाल ) हे हाय हाय हतदैवा ।
साधिला कसा तूं दावा ॥
मम करे दीप विझवावा ।
कुलिचा या कोठें फ़ेडूं ।
हे पाप पंढरीनाथा । नको मजला ऐसे नाडू ॥ माधवा ॥३२॥
पतीची आज्ञा मोडावी तर पातिव्रत्यास बाध येतो आणि पाळावी तर आईपणास डाग लागतो. म्हणून,

॥ आर्या ॥
प्याला भरुन विषानें लावि कयाधूच आपुल्या वदनीं ।
परि ते कुमार ओढी जो भवजलधींत मानवा तरणी ॥३३॥
परंतु प्रल्हादानें तिच्या हातांतील विषाचा पेला ओढून घेतला आणि तो म्हणाला,

॥ दिंडी ॥
भाग माझा तूं काय बळें पीसी ।
नेवूं मग मी फ़िर्याद कुणापाशीं ॥
माय हेंची स्थळ एक कुमाराला ।
पहा गर्‍हाणें जगतिं करायाला ॥३४॥

॥ श्लोक - पृथ्वी ॥
तवोदर असे महा विमल संत तत्संगती ।
सुदैव म्हणुनी सती घडलि याच पिंडाप्रती ॥
आतां न उरला कुठें त्रिभुवनी मला तो दर ।
करील मम रक्षणा कमलनाभ सर्वेश्वर ॥३५॥

॥ आर्या ॥
या न विषा मी भीतो परि भी मी विमल त्वदीय कीर्तीला ।
पत्याज्ञाभंग तुझ्या करि घडतां समज मृत्यु तो मजला ॥३६॥
विषप्राशन करूनहि प्रल्हादावर त्याचा कांहींच परिणाम झाला नाहीं.

॥ ओंवी ॥
हिरण्यकश्यपू तें आडुन । करीत होता विलोकन ॥
त्या आद्य भागवतासी मरण । न आलें त्या विषानें ॥३७॥
तें पाहतांच हिरण्यकश्यपू त्वेषानें प्रल्हादाच्या अंगावर धावून आला आणि म्हणाला,

॥ झंपा ॥
कुठे रे कुठे तो तुझा साह्यकारी ।
दाव मज पोरट्या वेळ न करी ॥
स्फ़ुरति क्रोधे बहू बाहु ते दणदणा ।
टाकी पद भूस तओ निर्जरारी ॥
केस पिंजारले खङ्ग करि घेतलें ।
आसन तें त्यागिलें वेग भारी ॥३८॥
प्रल्हादानें शांतपणें उत्तर दिलें.

॥ पद ॥
व्हा शांत अहो तुम्हि तात मदिय भगवंत कुठे नाहीं ? ।
तयानें व्याप्त सर्व कांहीं हो ॥ नृपवरा ॥
नृपवरा खोटी ना गिरा विचारा करा त्यजुनीं क्रोध ।
हरिच्या ठायीं मुळिं न भेद हो ॥ जल मही ॥
जल मही पवन तेजही दृश्यजातही तुम्ही मी अवघा ।
पसरला पट ईश धागा हो ॥ त्याविना ॥
त्याविना कांहीं होईना सगुन निर्गुणा तोच आसरा ।
दासगणु म्हणे दुजें विसरा ॥ हो व्हा शांत ॥३९॥
हिरण्यकश्यपूनें संतापानें विचारलें,

॥ आर्या ॥
हा दिसतो स्तंभ पुढें दारूमय शुष्क भक्ष्य अग्नीचे ।
यांत तुझा तो काळा आहे कां कारट्या ! वदे वाचे ॥४०॥

॥ साकी ॥
प्रह्लादानें होय म्हणूनी जयि ग्रीवा हालविली ।
तयि त्या स्तंभापासुन गुरगुर ऐशी भयप्रद उठली ।
ध्वनि मग घाबरले । असुर तेथिचे ते सगळे ॥४१॥
प्रह्लादानें होय म्हणतांच त्या लाकडाच्या खांबांतून ध्वनी निघूं लागला.

॥ श्लोक - मालिनी ॥
कड कड कड मोडे स्तंभ तो त्या क्षणांत ।
धड धड धड व्योमी दुंदुभी नाद होत ॥
पट पट पट भूसी तारकापुंज लोटे ।
तड तड तड भूमी ठायिंच्या ठायी फ़ाटे ॥४२॥

॥आर्या ॥
रक्ताक्षी सिंहमुखी भयप्रद ऐसा प्रदोष समयाला ।
शुक्ल चतुर्दशी दिवशीं वैशाखीं नारसिंह अवतरला ॥४३॥

॥ लावणी ॥
प्रकटता प्रभू राक्षस पळूं लागले ।
कितिकांनीं बघुन रूपाला पटपटा प्राण सोडिले ॥
धरियला कनककस्यपू हरीनें करी ।
पोटांत नखें खोवून वधि त्यास उंबर्‍यावरी ॥
घातिलीं आंतडीं ती गळा पोट फ़ाडुन ।
गर्जना करी सिंहाची कर आपटुन नारायण ॥
चळचळा कापे लक्ष्मी पुढें जावया ।
आली तीच स्थिती इंद्राला नलकूवर शिव धातया ॥
अवध्यानीम करुनि प्रह्लाद पुढें पाठीसी ।
राहिले उभे कीं त्याच्या भय मानुन बहु मानसी
वाघीण जगा भेसूर परि तत्पिलें ।
गणु म्हणे तिला कां भीती । प्रह्लाद तसा ना ढळे ॥४४॥
प्रह्लादानें भगवंताचे पाय धरिले आणि प्रार्थना केली.

॥ श्लोक ॥
हे पूर्णब्रह्म अघनाशक देवदेवा ।
हे दानवारि जगदीश्वर नारसिंहा ॥
नौका भव्वाब्धि तरण्या तव दिव्य पाय ।
तुभ्यं नमो भगवते कमलावराय ॥४५॥

॥ समाप्त ॥

N/A

References : N/A
Last Updated : August 05, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP