TransLiteral Foundation
संस्कृत सूची|शास्त्रः|आयुर्वेदः|सार्थ माधवनिदान|
विषनिदान

माधवनिदान - विषनिदान

" शरिरेंद्रिय-सर्वात्मा संयोगधारी जीवितम् " अशी जीवनाची आयुर्वेदीय, व्यापक व्याख्या आहे.


विषनिदान

विषाचे प्रकार .

स्थावरं जङ्गमं चैव द्विविधं विषमुच्यते ॥

मूलात्मकं तदाद्यं स्यात्‌ परं सर्पादिसंभवम्‌ ॥१॥

विष दोन प्रकारचे आहे ; एक स्थावर व दुसरे जंगम , झाडाच्या मुळादिकांपासून जे विष निघते ते स्थावर होय ; व सर्पदिकांपासून जे विष उत्पन्न होते ते जंगम समजात्रे .

स्थावर व जंगम विषाचीं सामान्य

स्थावर तु ज्वरं हिक्कां दन्तहर्षं गलग्रहम्‌ ॥

फेनर्च्छद्यरुचिश्वासं मूर्च्छां च कुरुते भृशम्‌ ॥२॥

लक्षणें .

निद्रां तन्द्रां क्लमं दाहमपाकं रोमहर्षणम्‌ ॥

शोथं चैवातिसारं च कुरुते जङ्गमं विषम्‌ ॥३॥

स्थावर विषाच्या सेवनाने ज्वर , उचकी , ओकारी , श्वास व तोंडावाटे फेस येणे , अरुचि उत्पन्न होणे , गळा धरणे , दात शिवशिवणे व प्रबळ मूर्च्छा येणे हे प्रकार होतात ; व जंगम विषाच्या प्रयोगाने अन्न न पचणे , अंगाची आग होणे व त्यावर काटा येणे , सूज , अतिसार , तंद्रा , ग्लानि व झोप ही लक्षणे उत्पन्न होतात .

विषप्रयोग करणारांचीं लक्षणें .

इङ्गितज्ञो मनुष्याणां वाक्‌चेष्टामुखवैकृतै : ॥

जानीयाद्विषदातारमेतैर्लिङ्गैच बुद्धिमान्‌ ॥४॥

न ददात्युत्तरं पृष्टो विवक्षुर्मोहमेति च ॥

अपार्थं बहुसंकीर्णं भाषते चापि मूढवत्‌ ॥५॥

हसत्यकस्मात्‌ स्फोटयेदङ्गलीर्विखेन्महीम्‌ ॥

वेपथुस्चास्य भवति त्रस्तश्चान्योन्यमीक्षते ॥६॥

विवर्णवक्त्र : श्यामश्च नखै : किंचिच्छिनत्त्यपि ॥

आलभेतासनं दीन : करेण च शिरोरूहम्‌ ॥

वर्तते विपरीतं च विषदाता विचेतन : ॥७॥

विषप्रयोग करणाराचे बोलणे , चालणे व मुखचर्या यांवरून बुद्धिमान्‌ वैद्यास त्याची परीक्षा करता येते ; ती अशी की , विषप्रयोग करणारास काही प्रश्न केला असता त्यास त्याचे सरळ उत्तर देता येत नाही ; तो बोलू लागला असता काय बोलावे ते विसरतो अथवा भलतेच मूर्खासारखे असंबद्ध व पुष्कळ बोलतो . तसेच तो कारण नसता हसतो . बोटे मोडतो , जमिनीवर रेघा काढतो , नखांनी काहीतरी तोडतो , डोक्याच्या केसावरून हात फिरवतो , लोकांकडे टक लावून पाहतो , तोंडाची कळा पालटते ; एकाच जागी बसून राहतो व भयाने कापत असतो , याशिवाय त्याचे तोंड उतरून काळे ठिक्कर पडते ; मन थार्‍यावर नसते व तो भलभलते करतो .

निरनिराळया स्थावर विषांचीं लक्षणें .

उद्वेष्टनं मूलविषै : प्रलापो मोह एव च ॥

जृम्भणं वेपनं श्वासो मोह : पत्रविषेण तु ॥८॥

मुखशोथ : फलविषैर्दाहोऽन्नद्वेष एव च ॥

भवेत्‌ पुष्पविषैश्छर्दिराधमानं श्वास एव च ॥९॥

त्वक्‌सारनिर्यासविषैरुपर्युक्तैर्भवन्ति हि ॥

आस्यदौर्गन्ध्यपारुषशिरोरूक्कफसंस्नवा : ॥१०॥

फेनागम : क्षीरविषैर्विडभेदो गुरुजिव्हता ॥

हृत्पीडनं धातुविषैर्मूर्च्छा दाहश्च तालुनि ॥११॥

प्रायेण कालघातीनि विषाण्येतानि निर्दिशेत्‌ ॥१२॥

स्थावर विषे मूळ , पान , फळ , फुले , साल , चीक , नार , डिंक , कंद व धातु अशी दहा प्रकारची आहेत ; त्या प्रत्येकाच्या सेवनाने निरनिराळी लक्षणे उद्भवलेली द्दष्टीस पडतात . ती अशी की , मूळ अथवा कंद विषाने हातापायाला वांब , मूर्च्छा ; बडबड ; पत्रविषाने जांभया , कंप , श्वास व मूर्च्छा , फलविषाने तोंड सुजणे , अन्नद्वेष व अंगाची आग होणे ; पुष्पविषाने श्वास , वांति व पोट फुगणे ; साल , नार व डींक या विषांपैकी कोणत्याही विषाने तोंडास घाण व त्यावाटे कफाचा स्रव , अंगाला खरखरीतपणा व डोक्याचे ठिकाणी वेदना ; क्षीरविषाने अतिसार , जिभेच्या ठिकाणी जडत्व व तोंडास फेस ; आणि घातुविषाने टाळूचा ; दहा , उरात वेदना व मूर्च्छा याप्रमाणे प्रकार होतात ; व ही सर्व विषे ( सेवन करण्यात आली असता ) कालांतराने प्राण घेतात .

विषारी शस्त्राचीं लक्षणें

सद्य : क्षतं पच्यते यस्प जन्तो : स्नवेद्रक्तं पच्यते चाप्यभीक्ष्णम्‌ ॥

कृष्णीभूतं क्लिन्नमत्यर्थपूति क्षतान्मांसं शीर्यते यस्य चापि ॥१३॥

तृष्णा मूर्च्छा ज्वरदाहौ च यस्य दिग्धाहतं तं पुरुषं व्यवस्येत्‌ ॥

लिङ्गान्येतान्येव कुर्यादमित्रैर्व्रणे विषं यस्य दत्तं प्रामादात्‌ ॥१४॥

ज्या शस्त्राच्या धारेला विष लावलेले असते त्याने मनुष्यास जखम केली असत ती ( जखम तत्काळ ) पिकून तिच्यावर क्तस्राव होतो व काळया वर्णाचे घाणेरडे व सडलेले असे मांस व्रणातून बाहेर येते , याशिवाय ज्वर , तहान , दाह व मूर्च्छा या लक्षणांनी तो पीडित होतो आणि ती त्वाची जखम पुन : पुन : पिकत जाते . केव्हा केव्हा मनुष्याच्या शरीराचे ठिकाणी पडलेल्या व्रणावर त्याच्या शत्रूकडून विष घातले जाते तेव्हा देखील त्याची याच प्रकारची स्थिति द्दष्टीस पडते .

येथपर्यंत स्थावर विषांविषयी सांगितले ; आता पुढे जंगल विषांविषयी विचार करावयाचा आहे . द्दष्टि , श्वास , दात , नख , मल , मूत्र , अपानवायु , शुक्र , लाळ , केस , चिमटा , अस्थि , पित्त , शूक व शव या सोळा प्रकारांपासून जंगम विष उत्पन्न होते . त्या सर्व जंगम विषांत सर्पविष अत्यंत भयंकर व प्राणघातक असते म्हणून प्रथम त्यापासूनच आरंब करू .

सर्पांच्या मुख्य जाति .

वातपित्तकफात्मानो भोगिमण्डलिराजिला : ॥

यथाक्रमं समाख्याता द्वयन्तरा द्वन्द्वरूपिण : ॥१५॥

भोगी किंवा नाग ( फणा असलेले सर्प ), मंडली अंगावर अनेक मंडले असलेले ( कवडा वगैरे सर्प ) व राजिल ज्यांच्या अंगावर चित्रविचित्र रेषा असतात असे ( धामण वगैरे सर्प ) या सर्पांच्या मुख्य तीन जाती असून , त्या अनुक्रमे वात , पित्त व कफप्रकृति आहेत . यांपैकी दोघांच्या संयोगापासून जे सर्प उत्पन्न होतात त्यांस दव्यंतर म्हणतात ( जसे भोगी मंडली यांच्या संयोगापासून घोणस उत्पन्न होते , तिचा समावेश द्‌व्यंतरांत होतो ) व ते द्वंद्व ( दोन दोन दोषांच्या ) प्रकृतीचे असतात .

सर्पदंशाची लक्षणें .

दंशो भोगिकृत : कृष्ण : सर्ववातविकारवान्‌‍ ॥

पीतो मण्डलिज : शोथो मृदु : पित्तविकारवान्‌ ॥१६॥

राजिलोत्थो भवेद्दंश : स्थिरशोथश्च पिच्छिल : ॥

पाण्डु : स्निग्धोऽतिसान्द्रासृक सर्वश्लेष्मविकारवान्‌ ॥१७॥

वातप्रकृति नागाचा दंश काळया वर्णाचा असून तो आचके वगैरे सर्व वातजन्य विकार उत्पन्न करतो ; पितप्रकृति कवडयाचा दंश पिवळया वर्णाचा , मऊ व सूज आलेला असा असतो व तो मूर्च्छा वगैरे अनेक पित्तविकार उत्पन्न करतो ; आणि कफप्रकृति राजिलाचा दंश पांढर्‍या वर्णाचा , तुकतुकीत , बुळतुकीत , कठीण , सूज आलेला व घट्ट रक्तस्राव करणारा असा असून तो झापड वगैरे सर्व कफविकार उत्पन्न करतो . ( द्वंद्वप्रकृति सर्पदंशाचे ठिकाणी दोन दोन दोषांची लक्षणे संयुक्त झालेली द्दष्टीस पडतात .)

सर्पदंशाची असाध्य लक्षणें .

अश्वत्थदेवायतनश्मशानवल्मीकसन्ध्यासु चतुष्पथेषु ॥

याम्ये च दष्टा : परिवर्जनीया ऋक्षे शिरामर्मसुये च दष्टा ॥१९॥

दर्वीकरणां विषमाशुहन्ति सर्वाणि चोष्णे द्विगुणीभवन्ति ॥२०॥

अर्जार्ण पित्तातपपीडितेषु बालेषु वृद्धेषु बुभुक्षितेषु ॥

क्षीणक्षते मेहिनि कुष्ठदुष्टे रुक्षेऽबले गर्भवतीषु चापि ॥२१॥

शस्त्रक्षते यस्य न रक्तमस्ति राज्यो लताभिश्च न संभवन्ति ॥

शीताभिराद्भश्च न रोमहर्षो विषाभिभूतं परिवर्जयेत्तम्‌ ॥२२॥

जिह्मां मुखं यस्य च केशशातो नासावसादश्च सकण्ठभङ्ग : ॥

रक्त : सकृष्ण : श्वयथुश्च दंशे हन्वो : स्थिरत्वं च विवर्जनीय

पिंपळ , देऊळ , स्मशान , वारूळ अथवा चव्हाटा या ठिकाणी ; तसेच संध्यासमयी अथवा भरणी वगैरे नक्षत्री आणि मनुष्याच्या शिरा मर्मस्थानी जर सर्पदंश झालेला असेल तर मनुष्य वाचणे नाही असे समजून उपचार करू नये व याचप्रमाणे नाग डसाला असता त्याचे विष तत्काळ प्राण घेणारे आहे म्हणून तो डसलेल्या मनुष्याची आशा धरू नये , याशिवाय कोणत्याही विषासंबंधाने हा नियम लक्षात ठेवावा की , उष्णतेच्या योगाने विष दुप्पट कार्य करते ; तर अजीर्ण , पित्त व ऊन यांनी व्याकुळ झालेला , बाल , वृद्ध , बुभुक्षित , उर : क्षताने क्षीण , मेह झालेला , कुष्ठरोगाने पिडलेला , व निर्बल अथवा स्नेहरहीत झालेला असा मनुष्य आणि गरोदर स्त्री यास सर्पदंश झाला असता तत्काळ त्याचा प्राण असे समजून व्यर्थ उपाय करू नये ; तसेच ज्याला विषाचा अंमल चढला असून त्याच्या अंगावर शस्त्राने जखम केली असता रक्त येत नसेल अथवा चाबूक वगैरे मारून वळ उठत नसेल , आणि अंगावर थंड पाणी शिंपडल्यानेही काटा उभा राहात नसेल , तर कसल्याही उताराने तो वाचणार नाही म्हणून त्यांच्या संबंधांची महेनत घेऊ नये ; आणि ज्या मनुष्यांचे तोंड स्तब्ध व वाकडे होते ; नाकाचा शेंडाही तसाच दिसतो , केस ओढताक्षणी आपोआप गळतात डोके सावरत नाही , आणि दंशस्थान सुजते व लालसर काळे होते , गळा बिघडतो , दोन्ही जबडेही जखडतात त्यालाही उतार देण्याच्या भरीस पडू नये .

दूषी विष कसें होतें ?

जीर्णं विषघ्नौषधिभिर्हतं वा दावाग्निवातातपशोषित वा ॥

स्वभावतो वा गुणविप्रहीनं विषं हि दूषीविषतामुपैति ॥२४॥

कोणतेही स्थावर अथवा जंगम विष , विषमारक औषधांनी नि : सत्त्व झाले असता अथवा उन , वारा व वणवा वगैरे त्यास लागून त्याचा जोर शुष्क झाला असता ; तसेच त्याचा गुणच स्वमावत : अल्य शक्तीवा असता अथवा ते जुने झाल्यामुळे हतवीर्य झाले असता त्यास दूषीविष असे म्हणतात .

दूषी विषाचीं कार्ये .

वीर्याल्पभावान्न निपातयेत्तत्‌ कफान्वितं वर्षगणानुबन्धि ॥

तेनार्दितो भिन्नपुरीषवर्णो वैगन्ध्यवैरस्ययुत : पिपासी ॥२५॥

मूर्च्छो भ्रमं गद्नदवाग्वमित्वं विचेष्टमानोऽरतिमाप्नुयाद्वा ॥

आमाशयस्थे कफवातरोगी पक्वाशयस्थेऽनिलपित्तरोगी ॥२६॥

भवेत समुद्धस्तशिरोरूहाङ्गो विलूनपक्षस्तु यथा विहङ्ग : ॥२७॥

दूषीविष वर सांगितलेल्या प्रकाराने अल्य वीर्य झाले असल्यामुळे मनुष्याचा प्राण हरण करू शकत नाही ; तरी त्याच्या शरीराचे ठिकाणी त्याची निरनिराळी कार्ये सुरू राहतात ती अशी की , त्या दूषीविषाचा कफाशी संबंध होऊन त्याच्या ठिकाणची उष्णता नाहीशी होते व ते तशाच अपक्व स्थितीत वर्षानुवषें शरीरांत राहते ; मग त्यामुळे अतिसार , मूर्च्छा , भ्रम , ओकारी , तहान या लक्षणांनी मनुष्य पीडित होतो , त्याच्या शरीराचा वर्ण बदलतो , तोंड बेचव होते ; त्यस वास बरोबर समजत नाही , दरवेळी निरनिराळया वर्णाचा मलोत्सर्ग होतो ; तसेच तो अस्वस्थ असतो , बोलताना अडखळत बोलतो व वेडेवेडे चार करतो . या दूपी विषाची स्थानपरत्वेही निरनिराळी विशेष कार्ये द्दष्टीस पडतात ती - हे आमाशयांत गेले असता यापासून कफवातजन्य रोग होतात व पक्वाशयांत गेले असता पित्तवातजन्य रोग उद्भवतात आणि डोळयांचे व अंगावरचे केस झडले जाऊन पंख उपटलेल्या पक्ष्याप्रमाणे त्या मनुष्याचि स्थिती होते .

रसादि धातुगत दूषीविषाचीं कार्यें .

स्थितं रसादिध्वथवा यथोक्तान्‌ करोति धातुवभवान्‌ विकाराज्‌ ॥

कोपं च शीतानिलदुर्दिनेषु यांत्याशु पूर्वं शृणु तस्प रूपम्‌ ॥२८॥

निद्रागुरुत्वं च विजृम्भणं च विश्लेषहर्षावथवाङ्गमर्द : ॥

तत : करोत्यन्नमदाविपाकावरोचकं मण्डलकोठजन्म ॥२९॥

मांसक्षयं पादकरप्रशोथं मूर्च्छां तथा छर्दिमथातिसारम्‌ ॥

दूषीविषं श्वासतृषाज्वरांश्च कुर्यात्‌ प्रवृद्धिं जठरस्य चापि ॥३०॥

उन्मादमन्यज्जनयेत्तथान्यद्दाहं तथान्यत्क्षपयेच्च सुक्रम्‌ ॥

गाद्नद्यमन्यज्जनयेच्च कुष्ठं तांस्तानिकाराश्च कुष्ठं तांस्तान्विकारांश्च बहुप्रकारान्‌ ॥३१॥

रसादि सप्तधातुगत झालेले दूषीविष त्या त्या घातूसंबंधी विकार उत्पन्न क ते . थंडी , वारा व आभाळ येणे अशा वेळीया विकारांचा तत्काळ कोप होतो ; एखही हे साधारण असतात . अशा प्रकारचे हे धातुगत दूषीविषजन्य विकार अंग मोडून येणे . त्यावर काटा उभा राहणे व तसेच ते शिथिल आणि जड होणे , झोप व जांभया येणे , जेवणानंतर आनंद वाटणे पण अन्नपचन न होणे व तोंडाची रूचि जाणे , तसेच अंगावर गांधी अथवा मंडले उटणे व याशिवाय हातापायांच्या ठिकाणी सूज , मांसक्षय , अतिसार , ओकारी , श्वास , तहान , ज्वर , मूर्च्छा व उदरवृद्धि येणेप्रमाणे होत . कधी कधी निरनिराळया धातुगत दूषीविषापासून निरनिराळे भयंकर रोग होतात ; कोणापासून उन्माद होतो ; कोणापासून नपुंसकत्व येते ; कोणापासून दाह होतो ; कोणापासून वाणी अडखळते , कोणापासून कुष्ट उद्भवते आणि कोणापासून विसर्प उद्भवतो तर कोणापासून विस्फोट उत्पन्न होतो .

दूषीविष म्हणजे काय ?

दूषितं देशकालान्नदिवास्वप्नैरमीक्ष्णश : ॥

यस्मात्‌ संदूषयेद्धातूंस्तमाद्दषीविषं स्मृतम्‌ ॥३२॥

साध्यमात्मवत : सद्यो याप्यं संवत्सरोषितम्‌

दूषीविषमसाध्यं तु क्षीणस्याहितसेविन : ॥३३॥

जे विष प्राणहारक नसून देश , काल , अन्न अथवा दिवानिद्रा या कारणांनी मनुष्याच्या शरीरातील रसादि घातूंना दुष्ट करते ते दूषीविष होय . दूषीविषावर तत्काळ उपाय केल्यास त्याच्या परिणामापासून मनुष्य मुक्त होतो ; एक वर्ष लोटल्यावर उपाय करू लागल्यास ( व तो चांगल्या प्रकृतीचा व पथ्याने वागणारा असल्यास ) ते याप्य होऊन राहते आणि तो क्षीण प्रकृतीचा व अपथ्य सेवन करणारा असल्यास असाध्य समतन्‌ वैद्यास हात टेकावा लागतो .

सौभाग्यार्थं स्त्रिय : स्वेदरजानानाङ्गजान्मलान्‌ ॥

शत्रुप्रयुक्तांश्च गरान्‌ प्रयच्छन्त्यन्नमिश्रितान्‌ ॥३४॥

तै : स्पात्पाण्डु : कृशोऽल्पाग्निर्ज्वरश्चास्योपजायते ॥

मर्मप्रधमनाधमानहस्तयो : शोथलक्षणम्‌ ॥३५॥

जठरं ग्रहणीदोषो यक्षगुल्मक्शयज्वरा : ॥

एवं विधस्य चान्यस्य व्याधेर्लिङ्गानि दर्शयेत्‌ ॥३६॥

वशीकरणार्थ किंवा शत्रूच्या सांगण्यावरून स्त्रिया आपल्या पतींना गर देतात , ते असे की अंगावरचा घाम , आपला विटाळ व स्याचप्रमाणे आपल्या इंद्रियांचे निरनिराळे ; मळ हे अन्नात कालवून ते अन्न त्यांजकडून खाववितात , त्याने मनुष्य पांढरा पडतो ; स्याचा जठराग्नि मंद होऊन तो कृश होतो व त्यास ज्वर येतो ; तसेच मर्मस्थानी वेदना हातापायांना सूज , पोट फुगणे व दुखणे , संग्रहणी , उदर , राजयक्ष्मा , गुल्म व क्षय या अथवा याच प्रकारच्या दुसर्‍या भयंकर रोगांची लक्षणे त्याच्या ठायी उद्भवतात .

आता लूतादिकांच्या विषासंबंधाने खाली सांगावयाचे आहे .

लूताविष व त्याचीं लक्षणें .

यस्माल्लृनं तृणं प्राप्ता मुने : प्रस्वेदबिन्दव : ॥

तस्माल्लृता : प्रभाष्यन्ते सङ्ख्ययातास्तु षोडश ॥३७॥

ताभिर्दष्टे दंशकोथ : प्रवृत्ति : क्षतजस्य च ॥

ज्वरो दाहोऽतिसारश्च गदा : स्युश्च त्रिदोषजा : ॥३८॥

पिडका विविधाकारा मंडलानि महान्ति च ॥

शोथामहान्तोमृदवो रक्तश्यावाश्चलास्तथा ॥३९॥

सामान्यं सर्वलृतानामेतद्दंशस्य लक्षणम्‌ ॥

लूता ( कोळी ) यांच्या संबंधाने पौराणिक मत असे आहे की , वसिष्ठ ऋषीपाशी एक कामधेनु होती ; ती आपल्यापाशी असावी अशी विश्वामित्रास इच्छा झाल्यावरून तो त्यापाशी ती मागू लागला . पण वसिष्ठऋषि त्यास ति देईना ; तेव्हा तो बलात्काराने तिला नेऊ लागला असता वसिष्ठास राग येऊन त्यावेळी त्याच्या ललाटापासून घामाचे बिंदू निघाले व ते जवळ कापलेले गवत होते त्यावर पडले व त्याच्याच निरनिराळया सोळा जातींच्यालृता झाल्या . यांची सामान्य लक्षणे अशी आहेत की , या लूतांनी मनुष्यास दंश केला असता ती दंशाची जागा सडून रक्त वाहते व ज्वर , दाह , अतिसार , तसेच अनेक प्रकारचे सान्निपातिक रोग आणि अंगावर निरनिराळया प्रकारच्या गांधी , मोठमोठी मंडले व तांबूस , हिरव्या अथवा निळया वर्णाची व तशीच मऊ आणि वारंवार कमी जास्त होणारी सूज , हे प्रकार उत्पन्न होतात .

दूषीविषलृतांच्या दंशाचीं लक्षणें .

दंशमध्ये तु यत्कृष्णं श्यावं वा जालकावृतम्‌ ॥४०॥

उर्ध्वाकृति भृशं पाकक्लेदकोथज्वरान्वितम्‌ ॥

दूषीविषाभिर्लूताभिस्तद्दष्टभिति निर्दिशेत्‌ ॥४१॥

दूषीविषलूतांनी दंश केला असता त्यांच्या डासाचा मधला भाग काळया , निळया अथवा हिरव्या वर्णाचा असून जाळयाप्रमाणे वर उचलून आलेला दिसतो ; तसाच तो लागलीच पिकतो व त्यातून सडक्या लसीचा लसीचा स्राव होतो आणि अंगात ज्वर भरतो .

प्राणहारक लूतांच्या दंशाचीं लक्षणें .

सर्पाणामेवविण्मूत्रशवकोथसमुद्भवा : ॥

दूषीविषा : प्राणहरा इति संक्षेपतो मता : ॥४२॥

शोथा : श्वेताऽसितारक्ता : पीता : सपिटिकाज्वरा : ॥

प्राणान्तिकाभिर्जायन्ते दाहहिक्काशिरोग्रहा : ॥४३॥

सर्पाचे मलमूत्र व शवांच्या कुजण्यापासून ज्या लूता उत्पन्न होतात त्यांनी मनुष्यास दंश केला तर त्याचा प्राण जातो . शरीराच्या ज्या भागावर यांनी दंश केलेला असतो तो भाग काळया , तांबडया , पिवळया अथवा पांढर्‍या वर्णाचा होतो ; व त्यावर पुरळ येतो आणि ज्वर , दाह , उचकी व मस्तकशूल या लक्षणांनी मनुष्य पीडित होतो .

विषारी उंदीर डसल्याचीं लक्षणें .

आदंशाच्छोणितं पाण्डु मण्डलानि ज्वरो‍ऽरुचि : ॥

लोमहर्षश्चदाहश्चाप्याखुदूषीविषार्दिते ॥४४॥

विषारी उंदीर डसला असता दंश केलेल्या स्थानातून पांढर्‍या वर्णाचे रक्त वाहते , अंगावर मंडले उठतात , आणि त्याचप्रमाणे ज्वर , अरुचि , रोमांच व दाह ही लक्षणे उद्‌भवतात .

प्राणहारक उंदीर डसल्याचीं लक्षणें

मूर्च्छाङ्गशोथवैवर्ण्यं क्लेदो मन्दश्रुतिज्वर : ॥

शिरोगुरुत्वं लालासृक : छर्दिश्चासाध्यमूषकै ॥४५॥

मनुष्यास प्राणहारक उंदीर डसला असता तत्काळ त्यास मूर्च्छा येते , अंगाचा वर्ण बदलतो व त्यावर उंदराच्या आकाराची सूज उद्भवते , ऐकू येणे कमी होते व डोके जड होते ; आणि त्याचप्रमाणे ज्वर , क्लेद , लाळ व रक्ताची गुळणी ही दुसरी लक्षणे उत्पन्न होतात .

सरडा डसल्याची लक्षणें .

कार्ष्ण्यं श्यावत्वमथवा नानावर्णत्वमेव च ॥

व्यामोहो वर्चसो भेदो दष्टे स्यात्कृकलासकै : ॥४६॥

कृकलास अथवा सरडा मनुष्यास डसला असता त्याने दंश केलेल्या शरीराच्या भागाचा वर्ण काळा , निळा , हिरवा अथवा दुसर्‍या अनेक प्रकारचा होतो व अतिसार आणि भ्रम ही दुसरी लक्षणे त्याच्या ठिकाणी द्दष्सटी पडतात .

विंचू डसल्याचीं लक्षणें .

दहत्यग्निरिवादौ तु भिनत्तीवोर्ध्वर्माशु वै ।

वृश्चिकस्य विषं याति पश्चाद्दंशेऽवतिष्ठति ॥४७॥

दष्टोऽसाध्यस्तु ह्रदंघ्राणरसनोपह्तो नर : ॥

मांसै : पतद्भिरत्यर्यं वेदंनार्तो जहात्यसून्‌ ॥४८॥

विंचू डसला असता तत्काळ डसलेल्या जागी अग्नीने भाजल्यासारखी आग होते व मग ते विष शरीरात चढू लागते . काही वेळाने तो उतरतो ; पण डसलेल्या जागी फुणफुण कायम राहते . विंचू नाक , जीभ अथवा , हृदय या ठिकाणी डमला असता अत्यंत वेदना होतात ; डसलेल्या जागेतून मांस , गळते व मनुष्याचा प्राण जातो .

इंगळी डसल्याचीं लक्षणें .

हृष्टरोमोच्चिटिङेगन स्तब्धलिङ्गो भृशार्तिमान्‌ ॥

दष्ट : शीतोदकेनैव सिक्तान्यङ्गानि मन्यते ॥४९॥

इंगळी डसली असता अत्य्म्त वेदना होतात , अंगावर काटा येतो , शिश्च ताटते व सर्वांगावर थंड पाणी ओतल्यासारखे वाटून रोगी अगदी व्याकुळ होतो .

विषारी बेडूक डसल्याचीं लक्षणें .

एकदंष्ट्रार्दित : शून : सरुज : पीतकं : सतृट ॥

छर्दिर्निद्रा च सविषैर्मण्डूकैर्दष्टलक्षणम्‌ ॥५०॥

विषारी बेडूक डसला असता त्याचा एक दात लागून तो डसलेल्या जागी उठतो . तेथे पिवळया वर्णाची सूज येते व तिला ठणका असतो ; तसेच तहान , ओकारी व झोप या प्रकारची इतर लक्षणे होतात .

विषारी मासा .

मत्स्यान्तु सविषा : कुर्याद्दाहं शोथं रुजस्तथा ।

विषारी मासा डसला तर डसलेल्या जागी सूज , दाह व वेदना हे प्रकार उद्भवतात .

विषारी जळवा .

कण्डू शोथं ज्वरं मूर्च्छां स विषास्तुजलौकस : ॥५१॥

विषारी जळवा डसल्या म्हणझे डसलेल्या जागी कंड सुटते व सूज येते आणि ज्वर व मूर्च्छा या लक्षणांनी पीडा होते .

पाल .

विदाहं श्वयथुं तोदं च गृहगोधिका ॥

पाल डसली असता तिच्या विषापासून डसलेल्या जागी दाह , सूज व सुई टोचल्यासारख्या वेदना उद्भवतात .

गोम .

दंशे स्वेदं रुजं दाहं कुर्याच्छतपदीविषम्‌ ॥५२॥

शतपदी अथवा गोम ही ज्या जागी डसते त्या ठिकाणी घाम , दाह व वेदना हे प्रकार उद्भवतात .

डांस डसल्याची लक्षणें .

कण्डूमान्मशकैरीषच्छोथ : स्यान्मन्दवदेन : ॥

असाध्यकीटसद्दशमसाध्यं मशकक्षतम्‌ ॥५३॥

घरात घाणीपासून वगैरे झालेले डास डसले असता डसल्या ठिकाणी किंचित्‌ सूज , कंड व थोडी वेदना ही लक्षणे होतात ; पण डोंगरावर वगैरे उत्पन्न झालेले डास डसले तर त्याच्या डसण्याच्या जागी क्षत पडून ते विषारी कीटकाने केलेल्या दंशापासून पडलेल्या क्षताप्रमाणे असते .

मक्षिकादंशाची लक्षणे .

सद्य : प्रस्नाविणी श्यावा दाहमूर्च्छाज्वरान्विता ।

पिडकामक्षिकादंशे तासां तु स्थगिकाऽसुह्रत्‌ ॥५४॥

गांधीणमाशी वगैरे विषारी माशी डसली असता तिच्या डसलेल्या जागी काळया वर्णाची पुळी उद्भवून ती तत्काळ वाहू लागते व त्या ठिकाणी अतिशय आग होते ; तसेच मूर्च्छा व ज्वर वगैरे प्रकारहि होतात . या विषारी माशांपैकी स्थगिका म्हणून जी माशी आहे ती डसली तर मनुष्याचा प्राण घेते .

कुत्रा पिसाळण्याचीं कारणें .

शुन : श्लेष्मोल्बणा दोषा : संज्ञां संज्ञावहाश्रिता : ॥

मुष्णन्त : कुर्वते क्षोभं धातूनामतिदारूणम्‌ ॥५५॥

लालावानन्धबधिर : सर्वत : सोऽभिघावति

स्नस्तपुच्छहनुस्कन्ध : शिरोदु : खी नतानन : ॥५६॥

कुत्र्याच्या ठिकाणी असलेले कफादि दोष जेव्हा प्रकोप पावून त्याच्या ज्ञानवहिनी धमन्यात शिरतात व तेथेच राहून त्याचे ज्ञान नष्ट करतात व धातूचा अत्यंत क्षोभ करतात , तेव्हा तो पिसाळतो ; यावेळी त्याची लक्षणे - तोंडावाटे लाळ गळणे , शेपूत , हनुवटि व खांदे गळणे , ढोक्याच्या जागी वेदना , तोंड खाली वाकणे व त्याचप्रमाणे त्यास दिसेनासे व ऐकू येइनासे होऊन तो सैरावैरा धावणे , अशा प्रकारची द्दष्टीस पडतात .

कुत्रा डसल्याचीं लक्षणें

दंशस्तेन विदष्टस्य सुप्त : कृष्णं क्षरत्यसृक ॥

हच्छिरोरुग्ज्वर : स्तम्भतृष्णामूर्च्छोद्भवोऽनु च ॥५७॥

वर सांगितलेल्या प्रकारचा पिसाळलेला कुत्रा मनुष्यास डसला असता दंश झालेली जागा बधीर होऊन काळया वर्णाच्या रक्ताचा स्त्राव होतो व याशिवाय हृदय व डोके दुखणे , ज्वर येणे , अंग ताठणे , तहान लागणे व मूर्च्छा येणे अशी दुसरी लक्षणे उद्भवतात .

चतुष्पाद्भिर्द्विपाद्भिर्वा नखदन्तविषं च यत ॥

शूयते पच्यते चापि स्नवति ज्वरयत्यपि ॥५८॥

वाघ वगैरे चतुष्याद प्राणी , वानर वगैरे द्विपाद प्राणी व त्याचप्रमाणे मनुष्ये यांची नखे व दात लागण्याने ( दाताच्या व नखांच्या विषामुळे ) शरीरावरचा तो भाग सुजतो व पिकतो व त्यातून रक्तस्त्राव होतो आणि त्याचप्रमाणे रोग्यास ज्वर येतो .

सविष व निर्विष दंशलक्षणें .

कण्डूनिस्तोदवैवर्ण्यसुप्तिक्लेदज्वरभ्रमा : ॥

विदाहरागरूक्पाकशोफग्रन्थिविकुञ्चनम्‌ ॥५९॥

दंशावदरणं स्फोटा : कर्णिका मण्डलानि च ॥

सर्वत्र सविषे लिङ्गं विपरीतं तु निर्विषे ॥६०॥

कोणत्याही प्रकारच्या ज्या दंशामुळे कंड , टोचणी , बधिरता , ज्वर , चक्कर , दाह , ठणका , पाक , सूज , फोड व त्याचप्रमाणे अंगाचा वर्ण बदलणे व त्यावर मंडले उठणे , अंगास भेगा पडणे , गाठी उत्पन्न होणे व लाली येणे हे प्रकार मनुष्याच्या ठिकाणी उद्भवतात , तो दंश सविष होय ; व या लक्षणांशिवाय असलेला तो निर्विष होय .

विष उतरल्याचीं लक्षणें

प्रसन्नदोषं प्रकृतिस्थधातुमन्नाभिकाङक्षं सममूत्रविदकम

प्रसन्नवर्णेन्द्रियचित्तचेष्टं वैद्योऽवगच्छेदविषं मनुष्यम्‌ ॥

अंगांतील कोणत्याही प्रकारचे विष उत्तरले असता वातादि दोष व रसादि धातु शुद्ध ( निरोगी मनुष्याचे जसे असतात तसे ) होऊन मल व मूत्र प्रकार साफ होतात ; भूक लागते , शरीराचा वर्ण पहिल्यासारखा व इंद्रिये आणि मन हे प्रसन्न असून त्याचे व्यापार सुरळीतपणे चालतात .

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2015-06-24T13:49:47.2830000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

कद्र

  • स्त्री. कदर पहा . - आफ . 
RANDOM WORD

Did you know?

मुक्ती म्हणजे काय? आणि किती प्रकार आहेत.
Category : Hindu - Beliefs
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.