TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
संस्कृत सूची|शास्त्रः|आयुर्वेदः|सार्थ माधवनिदान|
स्त्रीरोगनिदान

माधवनिदान - स्त्रीरोगनिदान

" शरिरेंद्रिय-सर्वात्मा संयोगधारी जीवितम् " अशी जीवनाची आयुर्वेदीय, व्यापक व्याख्या आहे.


स्त्रीरोगनिदान

पूर्वभाग

स्त्रीरोग या नावाखाली स्त्रियांनाच होणारे जे प्रदर , योनिव्यापत्ति , योनिकंद , मूढगर्भ , सूतिका , स्तनविकार व स्तन्यदुष्टिरोग या सर्वांचा समावेश करून त्यांची लक्षणे माधवाचार्यांनी सांगितली आहेत .

प्रथम स्त्रीरोगांचा पहिला प्रकार जो प्रदररोग त्याविषयी सांगतो .

प्रदराचीं कारणें व प्रकार .

विरूद्धमद्याध्यशनादजीर्णाद्नर्भप्रपातादतिमैथुनाच्च ॥

यानातिशोकादतिकर्षणाच्च भाराभिघाताशयनाद्दिवा च ॥

तं श्लेष्मपित्तानिलसन्निपातैश्चतु : प्रकारं प्रदरं वदन्ति ॥१॥

( दूध , मासे वगैरे ) संयोगविरूद्ध पदार्थ खाणे , मद्यपान करणे , जेवणावर जेवणे , अजीर्ण होणे , अति पुरुषसंग करणे , ओझी वाहाणे , वाहनावर अतिप्रवास कणे , गर्भपात होणे . दिवसा निजणे , उपवासादिकामुळे अंगी कृशपणा जडणे , अतिशोक करणे व कसला तरी आघात होणे या कारणांमुळे स्त्रियांच्या ठिकाणी प्रदर ( धुपणी ) रोग होतो . याचे वातजन्य , पित्तजन्य कफजन्य व सान्निपातिक असे चार प्रकार आहेत .

सामान्य लक्षणें .

असृग्दरं भवेत्‌ सर्वं साङ्गमर्दं सवेदनम्‌ ॥२॥

प्रदररोगाच्या सर्व प्रकारांची अंग मोडून येणे व हातापायांस कळा लागणे ही सामान्यरूपे होत .

प्रदराचे परिणाम

तस्यातिवृद्धौ दौर्बल्यं भ्रमो मूर्च्छा मदस्तृषा ॥

दाह : प्रलाप : पाण्डुत्वं तन्द्रा रोगाश्च वातजा : ॥३॥

प्रदररोग फार वाढला तर शक्तिक्षीणता , थकवा , मूर्च्छा , गुंगी , तहान , बडबड , झापड , पांढरेपणा , तलखी आणि वायूमुळे होणारे आचके वगैरे विकार हे रोग स्त्रीच्या ठिकाणी जडतात .

प्रदराच्या सर्व प्रकारांचीं लक्षणें .

रूक्षारुणं फेनिलमल्पमल्पं वातार्ति वातात्‌ पिशितोदकाभम्‌ ॥

सपीतनीलासितरक्तमुष्णं पित्तार्तियुक्तं भृशवेगि पित्तात्‌ ॥४॥

आमं सपिच्छाप्रतिमं सपाण्डु पुलाकतोयप्रतिमं कफात्तु ॥

सक्षोद्रसर्पिर्हरितालवर्णं मज्जप्रकाशं कुणपं त्रिदोषम्‌ ॥

तच्चाप्यसाध्यं प्रवदन्ति तज्ज्ञा न तत्र कुर्वीत भिषक्‌ चिकित्साम्‌ ॥

जो प्रदर ( स्त्रीच्या योनीवाटे ) थोडथोडा वाहतो व रूक्ष , तांबडया वर्णाचा , मांस धुतलेल्या पाण्यासारखा आणि फेसाळलेला असा असतो तो वायूपासून झाला म्हणून समजावा , यात वायूमुळे होणार्‍या तोदभेदादि वेदनाही होत असतात . पित्तापासून झालेला प्रदर वाहताना तीव्र वेगी व कढत लागतो व त्याचा वर्ण किंचित्‌ पिवळा , काळा , निळा , अथवा तांबडा असतो . तसेच यांत ओषचोषादि पित्तजन्य वेदना चालू असतात . कफापासून वाहणार्‍या प्रदरास श्वेतप्रदर असेही म्हणतात , व हा आमयुक्त , बुळबुळीत , किंचित्‌ पांढरा अथवा कोंडा कालवलेल्या पाण्याच्या वर्णासारखा द्दष्टीस पडतो . सान्निपातिक प्रदर वातादि तिन्ही दोषांच्या प्रकोपाने उद्भवून वाहतो व त्याचा वर्ण मध , तूप , हरताळ अथवा मज्जा यांच्या वर्णासारखा असून त्याची अतिशय , घाण येते . हा असाध्य आहे म्हणून वैद्याने याची चिकिस्सा करू नये .

प्रदराचीं असाध्य लक्षणें .

शश्वत्‌ स्नवन्ती मास्नावं तृष्णादाहज्वरान्विताम्‌

क्षीणरक्तां दुर्बलां च तामसाध्यां विनिर्दिशेत्‌ ॥६॥

प्रदर रोग झालेली जी स्त्री वारंवार प्रदराचा अत्यंत स्राव चालल्यामुळे अंगातील रक्त नाहीसे झालेली व अशक्त अशी असून तहान , ज्वर व दाह य विकारांनी पीडित असेल . तिचा ( प्रदर ) रोग असाध्य आहे म्हणून समजावे .

आता ( या प्रदर रोगाच्या शेवटी ) स्त्रीच्या आर्तवाच्या ( विटाळाच्या ) परीक्षेविषयी सुचवितो ---

आर्तवाचीं ( विटाळाचीं ) शुद्धाशुद्ध लक्षणें .

मासान्निष्पिच्छदाहार्ति पञ्चरात्रानुबन्धि च ॥

नैवातिबहुलं नाल्पमार्तवं शुद्धमादिशेत्‌ ॥

शशासृक्‌प्रतिमं यच्च यद्वा लाक्षारसोपमम्‌ ॥

तदार्तवं प्रशंसन्ति यच्चाप्सु न विरज्यते ॥८॥

ज्या स्त्रीच्या आर्तवाच्या ठिकाणी बुळबुळीतपणा व दाहशूलादि प्रकार नसतात ; ज्यांचा स्त्रात्र महिन्यातून पाचच दिवस होतो व तोही फार कमी नाही व फार जास्ती नाही , तर मध्यम प्रमाणाचा असतो , जे वर्णाने सशाच्या रक्तासारखे किंवा अलित्यासारखे लाल दिसते व ज्यात वस्त्र बुडवून पाण्यात धुतले असता पहिल्यासारखे स्वच्छ होते , ते शुद्ध आर्तव ; व या लक्षणाविरहीत असलेले ते अशुद्ध आर्तव असे समजावे .

स्त्रीरोगापैकी दुसरा योनिव्यापत्ति रोग , त्याची लक्षणे खाली सांगितल्याप्रमाणे जाणावी .

योनिरोगाचीं कारणें .

विंशतिर्व्यापदो योनेर्निर्दिष्टा रोगसंग्रहे ॥

मिथ्याचारेण ता : स्त्रीणां प्रदुष्टेनार्तवेन च ॥१॥

जायन्ते बीजदोषाच्च दैवाच्च शृणु ता : पृथक्‌ ॥

अध्यवस्थित आहार व अव्यवस्थित विहार , दूषित आर्तव , बीजदोष , या कारणांमुळे व दैवाच्या कोपामुळे स्त्रीच्या योनीचे ठिकाणी ए रोग होतात त्यांची संख्या रोगसंग्रहकारांच्या मते वीस आहे . त्या विसांची नावे व लक्षणे येणेप्रमाणे ---

वातजन्य योनिव्यापत्ति .

सा फेनिलमुदावर्ता रज : कृच्छ्रेण मुञ्चति ॥२॥

वन्ध्यां दुष्टार्तवां विद्याद्विप्लुतां नित्यवेदनाम् ॥

परिप्लुतायां भवति प्राम्यधर्मेण रुग्भृशम ॥३॥

वातला कर्कशा स्तब्धा शूलनिस्तोदपीडिता ॥

चतसृष्वपि चाद्यासु भवन्त्यनिलवेदना : ॥४॥

वायूपासून उद्भवणार्‍या योनिव्यापत्ति चार आहेत ; पैकी पहिली उदावृत्ता . इजमध्ये स्त्रीच्या योनीवाटे विटाळ मोठया कष्टाने बाहेर पडतो व तो फेसाळलेला दिसतो . दुसरी वंध्या . हिच्यामध्ये विटाळ दूषित झालेला असतो . तिसरी विप्लुता . ही झाली अ ता योनीच्या ठिकाणी निरंतर वेदना होतात ; व चवथी परिप्लुता . इच्यात पुरुषसंग केल्यामुळे योनीला अस्थंत पीडा होते . या चारी योनिव्यापत्ति वातजन्य असल्यामुळे त्या वाधूपासून होणार्‍या वेदनांनी युक्त असतात . पाचवी वातला नावाची योनिव्यापत्ति . हीही वातजन्यच असून तिजमध्ये योनि कठिण , ताठरलेली व शूलतोदयुक्त अशी असते [ येणेप्रमाणे या पाच वातजन्य योनिव्यापत्ति होत .]

पित्तजन्य योनिव्यापत्ति ,

सदाहं क्षीयते रक्तं यस्या : सा लोहितक्षया ॥

सवातमुद्वमेद्वीजं वामिनी रजसान्विता ॥५॥

प्रस्नंसिनी स्नंसते तु क्षोभितादुष्प्रजायिनी ॥

स्थितं स्थितं हन्ति गर्भं पुत्रघ्नी रक्तसंक्षयात्‌ ॥६॥

अत्यर्थं पित्तला योनिर्दाहपाकज्वरान्विता ॥

चतसृष्वपि चाद्यासु पित्तलिङ्गोच्छ्रयो भवेत्‌ ॥७॥

पित्तापासून होणार्‍या योनिव्यापत्ति चार आहेत ; पैकी पहिली लोहितक्षया , इजमध्ये योनीवाटे कढत कढत रक्ताचा स्त्राव होतो . दुसरी वामिनी . ही झाल्याने [ योनीवाटे ] रजोयुक्त शुक्र [ वायूबरोबर ] स्रवते . तिसरी प्रस्रंसिनी . इच्यात योनिम्थान भ्रष्ट होते ; तिजमध्यें वातवेदना होऊ लागतात व वातहारक स्निग्ध पदार्थांचे मर्दन केल्यानेही ती सुलभप्रसव होत नाही ; आणि चवथी पुत्रघ्नी . इजमध्ये योनीत रक्तक्षय होतो व गर्भ मुळीच ठरत नाही . या चारी पित्तजन्य योनिव्यापत्तीत पित्ताची लक्षणे वाढत असतात . वातलेपाप्रमाणे पितापासून पित्ताला ही पाचवी योनिव्यापत्ति उद्भवते व तिजमध्ये योनि , दाह , पाक व ज्वर या लक्षणांनी युक्त असते . [ येणेप्रमाणे वीस योनिव्यापत्तींपैकी या दुसर्‍या पाच पित्तजन्य होत .]

कफजन्य योनिव्यापत्ति .

अत्यानन्दानसन्तोषं ग्राम्यधर्मेण गच्छति ॥

कर्णिन्यां कर्णिका योनौ श्लेण्यासृग्भ्यां च जायते ॥८॥

मैथुनेऽचरणात्पूर्वं पुरुषादतिरिच्यते ॥

बहुशश्चातिचरणा तयोर्बीजं न विन्दति ॥९॥

श्लेष्मला पिच्छिला योनि : कण्डुयुक्ताऽतिशीतला ॥

चतसृष्वपि चाद्यासु श्लेष्मलिङ्गोच्छ्र्यो भवेत्‌ ॥१०॥

वातपित्ताप्रमाणेच कफापासूनही होणार्‍या मुख्य योनिव्यापत्ति चार व पाचवी श्लेष्मला . होय . कितीही पुरुषसंग केला तरी जीमध्ये योनि तृप्त होत नाही ती अत्यानंदा एक ; जी झाल्याने कफरक्तापासून योनीत कमळाच्या वाटीसारखी मांसाची गाठ उद्भवते ती कर्णिका एका ; जिच्यामध्ये पुरुषसंग पूर्ण होण्यापूर्वीच योनी द्रवते [ म्हणजेव पुरुषाला संतुष्ट करण्यापूर्वींच ती ( योनी ) शांत झाल्याने गर्भबीज धारण करण्यास असमर्थ असते ] ती चरणा एक ; आणि जिच्यात अनेक वेळ पुरुषसंग केल्याने योनि पुरुषाच्या मागून द्रवणारी असते ती प्रतिवरणा एक . याप्रमाणे या ज्या चार मुख्य कफजन्य योनिव्यापत्ति यांमध्ये कफाची लक्षणे वाढत असलेली द्दष्टीस पडतात . पाचवी कफजन्य योनिव्यापत्ति श्लेमला . इजमध्ये योनि थंड आणि बुळबुळीत असून तिला खाज सुटते . [ येणेप्रमाणे या तिसर्‍या पाच कफजन्य योनिव्यापत्तीची लक्षणे होत .]

सान्निपातिक योनिव्यापत्ति .

अनार्तवाऽस्तनी षण्ढी स्वास्पर्शा च मैथुने ॥

अतिकायगृहीतायास्तरुण्यास्त्वण्डिनी भवेत्‌ ॥११॥

विवृता च महायोनि : सूचिवक्त्राऽतिसंवृता . ॥

सर्वलिङ्गसमुत्थाना सर्वदोषप्रकोपजा ॥१२॥

चतसृष्वपि चाद्यासू सर्वलिङ्गोच्छ्रयो भवेत्‌ ॥

पञ्चासाध्या भवन्तीह योनय : सर्वदोषजा : ॥१३॥

वीस योनिव्यापत्तीपैकीं आतापर्यंत पंधरांची लक्षणे सांगितली . राहिलेल्या पाच सान्निपातिक आहेत त्या - पहिली षंढी . ही झालेली स्त्री विटाळशी होत नाही ; तिला स्तन नसतात व तिजशी संभोग करताना तिची योनि खरखरीत लागते . दुसरी अंडिनी . ही संज्ञा मोठया शिस्नाच्या पुरुषाशी संग केल्यामुळे जिची योनि अंडयाप्रमाणे बाहेर येते . तिला देतात . तिसरी महायोनि . इजमध्ये स्त्रीची योनी अत्यंत मोठी झालेली ( वासलेली ) असते ; व चवथी सूचिवक्त्रा . इच्यात योनीचे द्वार ( सुईच्या टोकाप्रमाणे ) अत्यंत संकुचित होते . या चारी सान्निपातिक योनिव्यापत्तींत वातादि तिन्ही दोषांवी लडणे एकत्र झालेली द्दष्टीस पडतात व शेवटी राहिलेली पाचवी सान्निपातिका . हीही त्रिदोष प्रकोपामुळेच उद्‌भवत असून तिच्या ठिकाणी त्यांची सर्व लक्षणे असतात . ( येणेप्रमाणेया शेवटच्या पाच असाध्य सान्निपातिक योनिव्यापत्तींची लक्षणे जाणावी .)

आता स्त्रीरोगापैकी तिसरा जो योनिकंद रोग त्याविषयी विचार करू ---

योनिकंदाचीं कारणें व प्रकार .

दिवास्वप्नादतिक्रोधात‌ व्यायामादतिमैथुनात्‌ ॥

क्षताच्च नखदन्ताद्यैर्वाताद्या : कुपितामला : ॥१॥

पूयशोणितसंकाशं लकुचाकृतिसन्निभम्‌ ॥

उत्पद्यते यदा योनौ नाम्ना कन्द : स योनिज : ॥२॥

दिवसा झोप घेतल्यामुळे अथवा दात , नख वगैरेंच्या योगाने ( योनीमध्ये ) क्षत पडल्यामुळे , त्याचप्रमाणे , व्यायाम , क्रोध व अति पुरुषसंग या कारणांमुळे वातादि दोष प्रकोप पावून ते स्त्रीच्या योनीच्या ठिकाणी पू व रक्त यांच्या मिश्रित वर्णासारखा व ओटीच्या फळाएवढा कंद ( कांदा ) उत्पन्न करतात यासच योनिकंद म्हणतात . याचे पुढे सांगितल्याप्रमाणे निरनिराळे चार प्रकार आहेत .

निरनिराळया योनिकंदाचीं लक्षणें .

रूक्षं विवर्णं स्फुटितं वातिकं तं विनिर्दिशेत्‌ ॥

दाहरागज्वरयुतं विद्यात्पित्तात्मकं तु तम्‌ ॥३॥

नीलपुष्पप्रतीकाशं कण्डूमन्तं कफात्मकम्‌ ॥

सर्वलिङ्गसमायुक्तं सन्निपातात्मकं वदेत्‌ ॥४॥

पहिला प्रकार वातजन्य योनिकंद , हा रूक्ष . बदललेल्या वणीचा व भेगा पडलेला असा असतो . दुसरा प्रकार पित्तजन्य योनिकंद . हालाल असतो , यामुळे योनीत दाह होतो व स्त्रीला ज्वर येतो . तिसरा कफजन्य योनिकंद , हा अळशीच्या फुलासारखा निळया वर्णाचा दिसतो व अत्यंत कंडुयुक्त असतो ; आणि चवथा सान्निपातिक योनिकंद . हा तर सर्व दोषांच्या लक्षणांनी युक्त असा उद्‌भवतो .

उत्तर भाग

आता स्त्रीरोगापैकी चवथा मूढगर्भ रोग अथवा मूल अडणे याविषयी खाली सांगतो .

गर्भपात .

भयाभिघातात्तीक्ष्णोष्णपानाशननिषेवणात्‌ ॥

गर्भे पतति रक्तस्य सशूलं दर्शनं भवेत्‌ ॥१॥

भय , आवात व तीक्ष्ण आणि उष्ण पदार्थांचे सेवन , ही गर्भपाताची कारणे ; व रजोदर्शन व शूल ही लक्षणे होत .

गर्भोऽभिघातविषमाशनपडिनाद्यै :

पक्वं दुमादिव फलं पतति क्षणेन ॥

गर्भावर आघात अथवा त्यास दुसर्‍या प्रकाराने इजा होणे किंवा त्याच्या आईच्या खाण्यापिण्याची रीत विषम असणे या कारणांमुळे झाडावर पिकलेले फळ त्यास सोडून जसे क्षणात खाली पडते त्याप्रमाणे तत्काळ तिच्या गर्भांचे पतन होते .

गर्भस्नाव व गर्भपात .

आचतुर्थात्ततो मासात प्रस्नवेद्नर्भविद्रव : ॥

तत : स्थिरशरीरस्य पात : पञ्चमषष्ठयो : ॥२॥

स्त्री नरोदर राहिल्यापासून चार महिने होईपर्यंत गर्म पातळ असतो म्हणून त्यावेळी तो गळून गेल्यास त्यास गर्भस्राव म्हणतात ; व पाचव्या व सहाव्या महिन्यांत त्यास शरीराकृति आल्यावर तो पडल्यास त्यास गर्भपात म्हणतात .

मूढगर्भ म्हणजे काय ?

मूढ : करोति पवन : खलु मूढगर्भं

शूलं च योनिजठरादिषु मूत्रसङ्गम्‌ ॥३॥

शरीरात फिरणार्‍या वायूची गति कुंठित झाली असता तो गर्भास अवडतो , तेव्हा तशा प्रकारच्या गर्भास मूढगर्भ म्हणतात , हा होतेवेळी वायूमुळे स्त्रीची योनि व पोट यांमध्ये वेदना होऊ लागतात व मूत्रावरोधही होतो .

मूढगर्भाचे प्रकार .

भुग्नोऽनिलेन विगुणेन तत : स गर्भ :

संख्यामतीत्य बहुधा समुपैति योनिम्‌ ॥

द्वारं निरुध्य शिरसा जठरेण कश्चित्‌

कश्चित्‌ शरीरपरिवर्तितकुब्जदेह : ॥४॥

एकने कश्चिदपरस्तु भुजद्वयेन

तिर्यग्गतो भवति कश्चिदवाङमुखोऽन्य : ॥

पार्श्वापवृत्तगतिरेति तथैव कश्चि -

दित्यष्टधा गतिरियं ह्यपरा चतुर्धा ॥५॥

संकीलक : प्रतिखुर : परिघोऽथ बीज -

स्तेषूर्ध्वबाहूचरणै : शिरसा च योनिम्‌ ॥

सङ्गी च यो भवति कीलकवत्‌ स कीलो

द्दश्यै : खुरै : प्रतिखुरं स हि कायसङ्गी ॥६॥

गच्छेद‌भृजद्वयशिरा : स च बीजाकाख्यो

योनौ स्थित : स परिघ : परिघेण तुल्य : ॥७॥

कुंठित गति झालेल्या वायूमुळे गर्भ वक्र होऊन अडकला असता तो अनेक प्रकारांनी योनीच्या द्वाराशी येतो ; त्यांपैकी मुख्य आठ आहेत ते ---

पहिला प्रकार :--- यात गर्भ आपल्या मस्तकाने योनीमध्ये येऊन तिचे द्वार बंद करतो .

दुसरा प्रकार :--- यात गर्भ आपल्या पोटाने योनीकडे येतो . क्वचित्‌ डोक्याने येतो .

तिसरा प्रकार :--- यात योनीत आलेला गर्भ शरीर वळल्याने कुबडा झालेला दिसतो .

चवथा प्रकार :--- यात गर्भ आपला एक हात योनीबाहेर काढतो .

पाचवा प्रकार :--- यात गर्भ आपले दोन्ही हात योनीबाहेर आणतो .

सहावा प्रकार :--- यात गर्भ अडसराप्रमाणे योनीत आडवा होतो .

सातवा प्रकार :--- यात गर्भ आपले तोंड खाली करून येतो .

आठवा प्रकार :--- यात गर्भाचा पार्श्वभाग दुमडून योनीच्या द्वाराकडे आलेला द्दष्टीस पडतो .

येणेप्रमाणे गर्भ कुंठित होण्याचे मुख्य आठ प्रकार झाले . याशिवाय आणखीही कधी कधी द्दष्टीस पडणारे असे चार प्रकार आहेत ते ---

प्रकार १ ला :---- यास संकीलक म्हणतात . यात गर्भ आपले हातपाय वर करतो व डोक्यानेच योनीच्या दारात येऊन तेथे खिळयासारखा अडकून बसतो .

प्रकार २ रा :---- यास प्रतिखुर म्हणतात . यात गर्भाचे शरीर योनीत अडकून राहते व त्याचे हातपाय खुरासारखे बाहेर येतात .

प्रकार ३ रा :---- यास बीजक म्हणतात . यात गर्भ आपले दोन हात व डोके पुढे करून योनीत येतो व अडकून राहतो .

प्रकार ४ रा :---- यास परिघ म्हणतात व यात गर्भ योनीच्या दारात येऊन परियाप्रमाणे अडकून बसतो .

 

असाध्य मूढगर्भ .

अपविद्धशिरा या तु शीताङ्गी निरपत्रपा ॥

नलिद्धेतशिरा हन्ति सा गर्भं स च तां तथा ॥८॥

मूल अडल्यामुळे ज्या गर्भावती स्त्रीच्या मानेचा काटा मोडला जाऊन तिला आपली मान सावरता येत नाही . तिचे अंग गार पडते , तिच्या ठिकाणी लज्ज राहात नाही , त्याचप्रमाणे तिच्या कुशीवर निळया वर्णाच्या शिरा उमटतात ती गरोदर स्त्री व अडलेले मूल ही दोघेही परस्परांची वाट लावणारी आहेत म्हणून समजावे .

पोटांत मूल मेल्याचीं लक्षणें .

गर्भास्पन्दनमावीनां प्रणाश : श्यावपाण्डुता ॥

भवेदुच्छवासपूतित्वं शूनताऽन्तर्मृते शिशौ ॥९॥

जेव्हा गर्भवती स्त्रीच्या पोटातच मूल मरते तेव्हा गर्भाची होणारी हालचाल बंद राहते . प्रसूतिवेदन बंद पडतात , तिच्या श्वासाला घाण येते व तिचे पोट फुगते आणि अंग काळे पांढरे होते .

पोटांत मूल मरण्याचीं कारणें .

मानसगन्तुभिर्मातुरूपतापै : प्रपीडित : ॥

गर्भो व्यापद्यते कुक्षौ व्याधिभिश्च प्रपीडित : ॥१०॥

पोटातच मूल मरण्याचे कारण त्याच्या आईला मानसिक अथवा आगंतुक दु : ख किंवा त्याचप्रमाणे एखादा रोग झाल्यामुळे त्याच्यापासून तिच्या गर्भाला धक्का बसणे हे होय .

गर्भिणीचीं असाध्य लक्षणें .

योनिसंवरणं सङ्ग : कुक्षौ मक्कल्ल एव च ॥

हन्यु : स्त्रियं मूढगर्भो यथोक्ताश्चाप्युपद्रवा : ॥११॥

ज्या गरोदर स्त्रीची योनि वायूमुळे संकुचित झालेली असते व कुशीत गर्भ अडकून राहतो , तसेच रक्तवातजन्य वेदना आणि कासश्वासादिक उपद्रव हे उद्भवुन त्यामुळे तिचा जीव व्याकुळ होतो , तिची त्यातून सुटका होणे शक्य नाही असे समजावे .

मूढगर्भाची लक्षणे येथे संपली . आता स्त्रीरोगापैकी पाचवा सूतिका अथवा बाळंतरोग त्याच्याकडे आम्ही वळतो .

बाळंत रोगाचीं लक्षणें .

वायु : प्रकुपित : कुर्यात् ‌ संरूध्य रुधिरं स्नुतम् ‌ ॥

सूताया हृच्छिरोबस्तिशूलं मक्कलसंज्ञकम् ‌ ॥१॥

अङ्गमर्दो ज्वर : कम्प : पिपासा गुरुगात्रता ॥

शोथ : शूलातिसारौ च सूतिकारोगलक्षणम् ‌ ॥२॥

प्रकुपित झालेला वायु रक्तवाहिनी धमन्यांचा आश्रय करून जेव्हा रक्ताचा अवरोध करतो तेव्हा त्यापासून बाळंतरोग उद्भवतो . त्याची लक्षणें अशी की , स्त्रीचे हृदय , मस्तक व बस्ति यांच्या ठिकाणा वातजन्य वेदना ( मस्तकशूळ ) उद्भवतात , सांग कापते , जड होते , मोडून येते आणि ज्वर येऊन अंगावर सूज उत्पन्न होते , तहान लागते व अतिसार आणि वेदना हे प्रकार होऊ लागतात .

बाळंतरोगाचीं कारणें .

मिथ्योपचारात् ‌ संक्लेशाद्विषमाजीर्णभोजनात् ‌ ॥

सूतिकायाश्च ये रोगा जायन्ते दारूणा : स्मृता : ॥३॥

स्त्री प्रसूत झाल्यावर तिला भलभलते उपचार केल्मामुळे , क्लेश झाल्यामुळे , दूषित अन्न खाण्यास दिल्यामुळे अथवा विशम व जड असे अन्न खाऊन तिला अजीर्ण झाल्यामुळे पुढे सांगितलेला भयंकर उपद्रवांसह बाळंतरोग होतो .

बाळंतरोग व त्याचे उपद्रव .

ज्वरातीसारशोथाश्च शूलानाहबलक्षया : ॥

तन्द्रारुचिप्रसेकाद्या : कफवातामयोद्भवा : ॥४॥

कृच्छ्रसाध्या हि ते रोगा : क्षीणमांसबलाश्रिता : ॥

ते सर्वे सूतिकानाम्ना रोगास्ते चाप्युपद्रवा : ॥५॥

प्रसून झालेल्या स्त्रीच्या ठिकाणी ज्वर , अतिसार , सूज , शूल ( वेदना ), आनाह ( पोट फुगणे व दुखणे ), शवितक्षीणता हे व त्याचप्रमाणे कफवातजन्य रोगात उद्भवणारे तंद्रा , अरुचि व मळमळ हे विकार एकदम उद्भवले असता त्या सर्वास मिळुन बाळंतरोग असे म्हणतात . या सर्व रोगांत कोणता तरी एक प्रधान असून बाकीचे उपद्रवरूपाने असतात व ते प्रसूतीमुळे स्त्रीच्या अंगी जडलेल्या अशक्तता , अग्निमांद्य इत्यादि कारणांमुळे कष्टसाध्य होतात .

आता स्त्रीरोगापैकी सहावा जो स्तनरोग त्याविषयी खाली सांगतो .

स्तनरोगाचीं कारणें .

सक्षीरौ वाऽप्यदुग्धौ वा दोष : प्राप्य स्तनौ स्त्रिय : ॥

प्रदूष्य मांसरधिरे स्तनरोगाय कल्पते ॥१॥

स्त्रीच्या दुग्धयुक्त अथवा दुग्धरहित स्तनांचे ठिकाणी वातादि दोष प्राप्त होऊन ते तेथील रक्तमांस दूषित करतात व त्यामुळे स्तनरोग [ खांदूक ] उद्‌भवतात .

स्तनरोगाचीं लक्षणे .

पञ्चनामपि तेषां हि रक्तजं विद्रधिं विना ॥

लक्षणानि समानानि बाह्मविद्रधिलक्षणै : ॥२॥

हे स्तनरोग वातजन्य , कफजन्य , सान्निपातिक व आगंतुक असे पाच आहेत . त्यांची लक्षणे रक्तजन्य विद्रधि खेरीज करुन बाकीच्या त्या त्या प्रकारच्या बाह्य विद्रधिलक्षणांसारखीच असतात . म्हणून ती मागे सांगितलेल्या विद्रधिनिदानात पाहून समजून घ्यावी . [ आगंतुक स्तनरोगाची उत्पत्ति मात्र दोषप्रकोपापासून नसून ती आघात , शल्य वगैरे बाह्म कारणांपासून होते . पण लक्षणे ही आगंतुक विद्रधिप्रमाणेच असतात .]

आता स्त्रीरोगापैकी शेवटल्या स्तन्यदुष्टिरोगाविषयी यापुढे योडेसे सांगून हे प्रकरण संपवतो .

स्तन्यदुष्टीचीं कारणें

गुरुभिविंविधैरन्नैर्दुष्टैर्दोषै : प्रदूषितम् ‌ ॥

क्षीरं मातु : कुमारस्य नानारोगाय कल्पते ॥१॥

पचन होण्यास जड असे अनेक प्रकारचे अन्न खाल्लयामुळे प्रकुपित झालेले वातादि दोष स्त्रीच्या स्तनातील दुग्ध दूषित करतात व तशा प्रकारचे दुग्ध तिने आपल्या मुलास पाजल्यामुळे त्यास अनेक प्रकारेच रोग होतात .

दूषित दुग्धलक्षणें .

कषायं सलिलप्लावि स्तन्यं मारूतदूषित्‌म् ‌ ॥

कटवम्ललवणं पीतराजीमत् ‌ पित्तसंज्ञितम् ‌ ॥२॥

कफदुष्टं घनं तोये निमज्जति सपिच्छलम् ‌ ॥

द्विलिङ्गं द्वन्द्वजं विद्यात् ‌ सर्वलिङ्गं त्रिदोषजम् ‌ ॥३॥

स्तनातील दूव वायूने दुष्ट केले असता तुरट लागते व पाण्यावर तरंगते : पित्ताने दूषित केले असता खारट , आंबट अथवा तिखट लागते व त्यावर पिवळया वर्णाच्या रेषा उमटलेल्या दिसतात व कफदूषित असते तेव्हा हातास दाट व बुळबुळीत लागते आणि पाण्यात टाकले असता तळी बसते . जेव्हा स्तनदुग्ध द्वंद्वदुष्ट असते तेव्हा त्यात दोन दोन लक्षणे एकत्र दिसतात व सान्निपातदुष्ट होते तेव्हा सर्व दोषांची लक्षणे त्यात मिसळलेली असतात .

शुद्ध स्तनदुग्ध लक्षणें .

अदुष्टं चाम्बुनिक्षिप्तमेकीभवति पाण्डुरम् ‌ ॥

मधुरं चाविवर्णं च प्रसन्नं तत्प्रशस्यते ॥४॥

स्तनातील दुग्ध शुद्ध असले म्हणजे ते पांढरे दिसते , त्यात दुसरा वर्ण नसतो ; मधुर लागते व पाण्यात टाकले असता त्याशी मिळते .

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2015-06-24T13:49:46.8900000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

लेहाजा

  • अ. म्हणून ; सबब ; यासाठी . [ अर . लिहाझा ] 
RANDOM WORD

Did you know?

सुतकात वर्ज्य कार्ये कोणती? गोड सुतक म्हणजे काय?
Category : Hindu - Traditions
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site