संस्कृत सूची|शास्त्रः|आयुर्वेदः|सार्थ माधवनिदान|
पांडुरोगनिदान

माधवनिदान - पांडुरोगनिदान

" शरिरेंद्रिय-सर्वात्मा संयोगधारी जीवितम्‍ " अशी जीवनाची आयुर्वेदीय, व्यापक व्याख्या आहे.


पांडुरोगाचे प्रकार .

पाण्डुरोगा : स्मृता : पञ्च वातापित्तकफैस्नय : ॥

चतुर्थ : सन्निपातेन पञ्चमो भक्षणान्मृद : ॥१॥

वात , पित्त व कफ या तीन दोषांच्या प्रकोपामुळे होणारे तीन , ( वातपांडु , पित्तपांडु व कफपांडु ) तिन्ही दोष मिळून होणारा एक सन्निपाततपांडु ) आणि माती खाल्लयामुळे जो रोग्याचे ठायी उत्पन्न होतो तो एक मिळून पांडुरोगाचे पांच प्रकार जाणावे .

पांडुरोगाची संप्राप्ति व कारणें .

व्यवायमम्लं लवणानि मद्यम्‌

मृदं दिवा स्वप्नमतीव तीक्ष्णम्‌ ॥

निषेवमाणस्य विदूष्य रक्तम्‌

दोषास्त्वचं पाण्डुरतां नयन्ति ॥२॥

अति स्त्रीसंग केल्यामुळे , फार आंबट , खारट , खाल्लयामुळे , माती खाल्यामुळे , आणि त्याचप्रमाणे अति तीक्ष्ण मद्यपान केल्यामुळे व दिवसा झोप घेतल्यामुळे रोग्याचे रक्त दूषित होऊन त्याच्या शरीराची त्वाचा पांढरी होते . हाच पांडुरोग होय .

पांडूचें पूर्वस्वरूप .

त्वक्‌ स्फोटनष्ठीवनगात्रसादमृद्भक्षणप्रेक्षणकूटशोथा : ॥

विण्मूत्रपीतत्वमथाविपाको भविष्यतस्तस्य पुर : सराणि ॥३॥

रोग्याने खाल्लेले अन्न नीट पचत नाही , त्याची त्वचा फुटते , अंग गळते व गालावर सूज येते ; तसेच त्याचे तोंडातून थुंका येतो व तो माती खातो आणि त्याच्या मलमूत्राचे ठायी पिवळटपणा उत्पन्न होतो . भावी पांडुरोगाची ही पूर्व चिन्हे होत .

वातपांडूचीं लक्षणें .

त्वङ्‌मूत्रनयनादीनां रूक्षकृष्णारूणाभता : ॥

वातपाण्डवामये कम्पतोदानाहभ्रमादय : ॥४॥

वातप्रकोपामुळे उत्पन्न होणार्‍या पांडुरोगात रोग्याची त्वचा , डोळे व मूत्र वगैरे रूक्ष होऊन त्यांचे ठिकाणी काळेपणा किंवा तांबडेपणा येतो व त्याचप्रमाणे सुया टोंचल्याप्रमाणे वेदना होणे , कापरे भरणे , पोट फुगणे आणि चक्कर येणे ही लक्षणे त्याचे ठायी दिसू लागतात .

पित्तपांडूचीं लक्षणें .

पीतमूत्रशकृन्नेत्रो दाहतृष्णाज्वरान्वित : ॥

भिन्नविट्‌कोऽतिपीताभ : पित्तपाण्डवामयी नर : ॥५॥

पित्तदोषामुळे जो पांडुरोग उत्पन्न होतो , त्यात शरीराचा वर्ण , डोळे , मळ व मूत्र ही अति पिवळी होणे , ज्वर येणे , मळ पातळ होणे , व अंगाचा दाह होणे , तहान लागणे ही लक्षणे रोग्याचे ठायी उत्पन्न होत असतात .

कफपांडूची लक्षणें .

कफप्रेसकश्वयथुतन्द्रालस्यातिगौरवै : ॥

पाण्डुरोगी कफाच्छुक्लेस्त्वङमूत्रनयनाननै : ॥६॥

कफदोषापासून पांडुरोग उत्पन्न झाला म्हणजे रोग्याचे तोंडावाटे कफ पडतो . शरीराला जडत्व येते व सूज उत्पन्न होते ; व त्याचप्रमाणे त्वचा , डोळे , तोंड व मूत्र यांचे ठायी पांढरेपणा , आळस व झापड ही लक्षणे उत्पन्न होतात .

( वर सांगितलेली वातादि त्रिदोषांची लक्षणे एकत्र मिसळली असता रोग्यास सन्निपातपांडुरोग झाला आहे असे समजावे .)

असाध्य सन्निपातपांडु .

ज्वरारोचकहृल्लासच्छर्दितृष्णाक्लमन्वित : ॥

पाण्डुरोगी त्रिभिर्दोषैस्त्याज्य : क्षीणो हतेन्द्रिय : ॥७॥

सन्निपातपांडुरोग झालेल्या रोग्याचे ठायी अरुचि , ओकारी , तहान व उम्हासे ही लक्षणे द्दष्टीस पडली व त्याचप्रमाणे तो क्षीण होऊन त्याची सर्व इंद्रिये आपापले व्यापार चालविण्यास असमर्थ झाली म्हणजे तो ज्वर असाध्य समजून सोडून द्यावा .

मृत्तिकाभक्षणजन्य पांडुरोग .

मुत्तिकादनशीलस्य कुप्यत्यन्यतमो मल : ॥

कषाया मारुतं पित्तमूखरा मधुरा कफम्‌ ॥८॥

कोपयेन्मृद्रसादींश्च रौक्ष्याद्‌ भुक्तं च रूक्षयेत्‌ ॥

पूरयत्यविपक्वैव स्नोतांसि निरुणद्धयपि ॥९॥

इन्द्रियाणां बलं हत्वा तेजो वीयौंजसी तथा ॥

पाण्डुरोगो करोत्याशु बलवर्णाग्निनासनम्‌ ॥१०॥

शूनाक्षिकूटगण्डभ्रू : शूनपान्नाभिमेहन : ॥

कृमिकोष्ठोऽतिसार्येत मलं चासृवकफान्वितम्‌ ॥११॥

माती खाण्याची सवय लागली असता , माती तुरट , खारट व गोड या गुणामुळे क्रमाने प्रकोप पावणारे वात , पित्त व कफ हे तिन्ही दोष , यांपैकी रोग्याचा कोणता तरी एक दोष कुपित करून त्याचे ठायी पांडुरोग उत्पन्न करतो . रोग्याने खाल्लेली माती पोटात गेली म्हणजे रसादिक धातूंना रूक्षपणा उत्पन्न करिते व तो रूक्षपणा जोरावून - त्यामुळे तो जे जे अन्न खाईल ते ते रूक्षच होऊन जाते , पोटात गेलेली माती कोष्ठादिकांच्या अग्नीनी पचन न होऊन तशीच रसादि वाहिन्यांत शिरते व त्यांच्या व्यापारास प्रतिबंध करते . त्यामुळे रोग्याच्या सर्व इंद्रियांची शक्ति , अंगाची कांती व सर्व धातूंचे सार जें ओज ते , ही क्षीण होतात . जठराग्नि नष्ट होतो ; कोठयात कृमी होतात ; रक्त व कफमिश्रित असे ढाळ होतात . बल व वर्ण हे दोन्ही जातात आणि त्याशिवाय त्याचे नेत्रगोल . गाल नाभी , पाय , भिवया आणि शिवन यांचे ठिकणीं सूज येते .

पांडुरोगाचीं असाध्य लक्षणें .

पाण्डुरोगश्चिरोत्पन्न : खरीभूतो न सिध्यति ।

कालप्रकर्षाच्श्र्च्छुनाङ्गो यो वा पीतानि पश्यति ॥१२॥

बद्धाल्पविद्‌ सहरितं सकफं योऽतिसार्यते ॥

दीण : श्वेतातिदिग्धाङ्गश्चछर्दिमूर्च्छातृषान्वित : ॥१३॥

स नास्त्यसृक्‌क्षयाद्यस्तु पाण्डु : श्वेतत्वमाप्नुयात्‌ ॥

पाण्डुदन्तनखो यस्तु पाण्डुनेत्रश्च यो भवेत्‌ ॥

पाण्डुसंघादर्शी च पाण्डुरोगी विनश्यति ॥१४॥

अन्तेषु शूनं परिहीणमध्यं म्लानं तथान्तेषुअ च मध्यशूनम्‌ ॥१५॥

गुदे च शेफस्यथ मुष्कयोश्च शूनं प्रताम्यंतमसंज्ञकल्पम्‌ ॥

विसर्जयेत्पाण्डुकिनं यशोऽर्थी तथातिसारज्वरपीडितं च ॥१६॥

रोग्याचे ठायी फार दिवस राहिलेला पांडूरोग जुना झाल्यामुळे बरा होत नाही . तसाच ज्या पांडुरोगात रोग्याच्या सर्वांगावर सूज येऊन त्यास सर्व पदार्थ पिवळे दिसतात तोही बरा होत नाही , या लक्षणांशिवाय ज्यांत रोग्याच्या गुदद्वारावाटे अगदी घट्ट , अल्प , कफमिश्रित व हिरव्या रंगाचा मळ पडतो तो एक ; ज्यात रोगी पांढरा फटफटीत होऊन म्लान होतो व ज्याचे ठायी ओकारी , तहान व मूर्च्छा हीं पीडा करणारी लक्षणे असतात तो एक ; आणि ज्यात रोग्याचे दात , नखे व डोळे पांढरे होतात सर्वच ज्याला पांढरा दिसते तो एक ; हे तिन्ही प्रकारचे पांडुरोग असाध्य होत . रक्तक्षयामुळे पांढरा पडलेला पांडुरोगी हे जिवंत असून मेल्यासारखेच आहेत . या आतापर्यंत सांगितलेल्या प्रकारांखेरीज जे बरे करण्यात वैद्याला कधीच यश यावयाचे नाही असे पांडुरोगाचे असाध्य प्रकार आहेत ते हात , पाय आणि डोकें यांचे ठिकाणी सूज उत्पन्न होणें व शरीराचा मध्यभाग शुष्क होणे , तसेच शरीराचा मध्यभाग , गुदद्वार व शिश्न यांचे ठायी सूज येणें व हात , पाय , मुंडके हीं शुष्क होणे ; आणि याशिवाय ज्वर व अतिसार उत्पन्न होऊन रोगी मृतप्राय होणें इतक्या प्रकारची पांडुरोगाची लक्षणे ज्या रोग्याच्या ठिकाणी उत्पन्न झाली त्यास त्याने अवश्य सोडावे .

N/A

References : N/A
Last Updated : June 24, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP