TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पुराणे|श्रीमुद्‍गल पुराण|खंड १|

खंड १ - अध्याय ५३

मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.


नारायणयाज्ञवल्क्यसंवादः
श्रीग्णेशाय नमः । नारायण तेव्हां सांगत । याज्ञवल्क्या या जगांत । गणेशाधारें सर्व असत । ऐसे जाण ब्राह्मणोत्तमा ॥१॥
हृदयांत बुद्धिप्रदाता । बाहेर सिद्धींचा तो दाता । म्हणोनि सर्वदा पूज्य जगता । सर्व प्रथम कार्यरंभी ॥२॥
महामुने तो देव वसत । आदि मध्य तसा अन्तात । गुणरुप आम्हीं देवादी निश्चित । ब्रह्माकार गणेश्वर ॥३॥
सर्वपूज्य तो असत । सिद्धि बुद्धिपति जगांत । स्वानंद त्याचा लोक विलसत । भावाभाव विवर्जित ॥४॥
अगम्य मुनिदेवांसी द्वंद्वहीन । परात्पर हा देव गहन । ऐसें गणपति स्वरुप जाणून । सर्व बंधनांतून मुक्ति ॥५॥
त्याच्या आधारें सारें जग । तोचि महामते ब्रह्म सत्त्वग । एकदा सर्व तत्त्वें सांग । मत्सरें युक्त वाद करिती ॥६॥
प्रत्येक तत्त्व प्रतिपादित । मीच श्रेष्ठ या जगतांत । माझ्या आधारें हें सारें स्थित । पालक कर्ता मीच याचा ॥७॥
मायेनें मी हरण करित । स्वेच्छारुपें मीच निश्चित । ऐसा मोठा विवाद चालत । महाबळी तत्त्वांत ॥८॥
सामर्थ्यानें विमोहित । विवाद ऐसा बहु करित । नंतर तेथ ब्राह्मणवेष येत । गुणाधीश गजानन ॥९॥
वाद त्यांचा शांत करावा । ज्ञानदानाचा लाभ व्हावा । ऐसा मानस त्याचा बरवा । प्रकटला अवचित देवांपुढें ॥१०॥
त्यास पाहून देव विस्मित । म्हणती कोण हा आला येथ । आत्माकार आम्हीं सतत । ह्याची स्थिति कोणती? ॥११॥
तेव्हां सर्व तत्त्वें विचारिती । आपण कोण सांगा निश्चिती । ब्रह्माकार मार्गांची गती । कैसी आपणा प्राप्त झाली? ॥१२॥
तो विज हृष्ट मनांत । योगमाया प्रभावें होत । म्हणे ब्राह्मण सुयोग साहाय्यें लाभत । मार्ग मज या स्थळाचा ॥१३॥
परी तुम्ही सर्व विवादपर । कां तें तत्त्वांनी सांगा सत्वर । सांगेन तुम्हां जे हितकर । तें मानवलें तत्त्वांना ॥१४॥
तीं सारी संतुष्ट होत । म्हणती प्राज्ञा सांग निश्चित । आमच्यांमध्ये कोण श्रेष्ठ । प्रभो निःपक्षपाती तुम्ही ॥१५॥
त्यांचे वचन ऐकून । म्हणे द्विजोत्तम हसून । तत्त्वांच्या आधारें विद्यमान । सर्व विश्व हें निःसंशय ॥१६॥
माझ्या समक्ष एकेक तत्त्व । जाईल सोडून हें विश्व । जयाच्या वियोगें निःसत्व । विदीर्ण विश्व होईल ॥१७॥
तें श्रेष्ठ ठरेल । हें जरी तुम्हां पटेल । तरी स्पर्धा करावी अमल । सत्वशील मानसानें ॥१८॥
त्याचें वचन मान्य होऊन । क्रमानें विश्व तीं जात सोडून । आत्माकार महाबळी तत्त्वें पावन । स्पर्धा अपूर्व लागली ॥१९॥
ब्रह्माकारा पृथ्वी सोडित । विश्व त्यागून ती जात । परी विश्व न विनष्ट होत । विलसित होतें तत्त्वतां ॥२०॥
नंतर जलतत्त्व तेजतत्त्व । वायुतत्त्व आकाशतत्त्व । ऐसी क्रमश्ह सोडून सत्त्व । आपापलें पारखती ॥२१॥
परी विश्व ना नष्ट झालें । पूर्ववत तें राहिलें । तन्मात्रादिसहित राहिलें । तत्त्वपंचक विश्वा सोडून ॥२२॥
परी विश्व तैसेंचि ठेलें । नंतर पंच ज्ञानेंदिर्ये त्यागिलें । कर्मेदिर्येंही तें सोडिलें । विश्वविनाश तरी न झाला ॥२३॥
नंतर इंद्रात्मक ब्रह्म दूर । परी विश्व पूर्ववत स्थिर । देवगण इंद्रिय प्रकाशक आत्माकार । त्यागिते झाले विश्वासी ॥२४॥
तेव्हां तें निस्तेज होत । सर्व तत्त्व समन्वित । नंतर अन्नब्रह्म त्यागित । विश्व स्वश्रेष्ठत्व सिद्ध करण्या ॥२५॥
परी विश्व तैसेंचि राहिलें । प्राणात्मकें नंतर सोडिलें । मनोमयानेंही त्यागिलें । तरी विश्व तैसेंचि स्थित ॥२६॥
नंतर विज्ञानमय ब्रह्मा त्यागित । विश्वा सोडून तें जात । आनंदरुप नादात्मक बिंदूमयें त्यक्त । परी विश्व तैसेंचि ॥२७॥
सोऽहं ब्रह्मात्मकानें सोडिलें । बोधात्मकेंही विश्व त्यागिलें । विदेहरुपें असत्स्वरुपें त्या वेळ । सत्स्वरुपही दूर जाय ॥२८॥
विश्व तथापि होतें स्थित । नंतर समस्तवेद्य सोडून जात । नेति स्ववेद्यही त्यागित । परी विश्व अचल होतें ॥२९॥
अन्तीं स्वानंदरुप त्यागित । विश्व तेव्हां लय पावत । तेव्हा सर्वही विस्मित । स्वानंदाची स्तुती करिती ॥३०॥
स्वानंदासी सर्व तत्त्वें प्रार्थितीं । देवादिक सारे नमिती । जें जें दिसें त्या आधार जगतीं । तूंच विशेषें स्वानंदा ॥३१॥
तूं सर्व तत्त्वांचा नायक । म्हणोनि तुझे नांव विनायक । तुजसी आम्हीं निःशंक । नमितों मानितों सर्व श्रेष्ठ ॥३२॥
पुनरपी हें विश्व निर्मावें । पूर्वीं होतें तैसें करावें । ऐसी प्रार्थना देवें । विनायकें विश्व विनिर्मिले ॥३३॥
नंतर तत्त्वादिक प्रवेश करित । त्या ब्रह्मरुपमय विश्वांत । आपापलें स्थान घेत । मोदपूर्ण स्वभावें ॥३४॥
त्याचें नाव जगदेश्वर सर्वेश त्यांची कीर्ति थोर । ऐश्या प्रकारें जाणावें समग्र । विशेष रहस्य विश्वाचें ॥३५॥
याज्ञवल्क्या तो विनायक असत । द्विविध रुपें या विश्वांत । संयोगानें निजानंद होत । अयोगानें निरानंद ॥३६॥
ही द्विविध रुपें नाश होत । तेव्हां हा योगरुप ख्यांत । ब्रह्मनायक महातेज स्मृत । विनायक वक्रतुंड ॥३७॥
त्यासी जाणून शांति प्राप्त । आम्हां सर्व देवांप्रत । म्हणून द्विजा शांतिलाभार्थ आराधना करी त्याची ॥३८॥
माया भरांतिकरी ख्याता । वक्रा ती प्राण्यासी तत्त्वतां । तुंडानें मारी तिला सर्वथा । म्हणोनि देव हा वक्रतुंड ॥३९॥
त्या वक्रतुंडा सर्वेशा शरण । जावें तुवा विनीतमन । तेव्हा योगींद्रसेव्य होऊन । मान्यता जगीं पावशील ॥४०॥
‘ग’ कार मनोवाणीमय सर्व । ‘ण’ कार मणोवाणीविहीन अपूर्व । त्याचा ईश योगरुपदेव । गणेश नामें प्रकीर्तींत ॥४१॥
त्याचा लाभ जेव्हां होत । प्राणी होती ब्रह्मभूत । हें वेदांत संभूत । रहस्य तुज कथिलें याज्ञवल्क्या ॥४२॥
तें प्रयत्नें गुप्त राखावें । तेणें सिद्धि लाभ स्वभावें । ऐसें बोलून नारायण देवें । केलें प्रयाण तेथून ॥४३॥
गणेशा तुला नमस्कार । ऐसें म्हणत वारंवार । देव तैसे ते मुनिवर । गणेश स्तुति नित्य करिती ॥४४॥
ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्‌मौद्‌गले महापुराणे प्रथमे खण्डे वक्रतुण्डचरिते नारायणयाज्ञवल्क्यसंवादो नाम त्रिपंचाशत्तमोऽध्यायः समाप्तः ॥ श्रीगजाननार्पणमस्तु ॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2016-11-11T11:49:52.0830000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

कद्नन

  • स्त्री. ताकीद . - आफ . ( अर .) 
RANDOM WORD

Did you know?

How do I become a moderator on QnA?
Category : About us!
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site