मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीमुद्‍गल पुराण|खंड १|

खंड १ - अध्याय ४७

मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.


श्रीगणेशाय नमः। वर मिळता वामन जात । वक्रतुंडासी पूजून त्वरित । कश्यपा प्रणाम करुन विनीत । बळीच्या यज्ञशाळेप्रती ॥१॥
सूर्यसदृश वेदाध्ययनपारंगत । हृस्वाकृती तो पाहून विस्मित । यज्ञमंडपीं मुनिजन समस्त । स्वागत केलें बळीनें ॥२॥
भक्तिपूर्वक पूजन करित । काय देऊं म्हणे तुम्हांप्रत । ते मज सांगावें त्वरित । महामुने आपण ॥३॥
वामनाचें प्रयोजन ओळखीत । तत्क्षणीं शुक्राचार्य मनांत । गणेशाचें पूजन न केलें यज्ञांत । दुष्ट बुद्धीमुळें बळीनें ॥४॥
त्याचा हा परिणाम खचित । विघ्नदेव आला विष्णुरुपांत । आता जें व्हायचें तें होवो म्हणत । हळहळला अंतर्यामीं ॥५॥
बळीचें वचन ऐकत । वामन तेव्हां म्हणे तयाप्रत । तीन पाउलें भूमि मजप्रत । दैत्यपते दे हे मागणें ॥६॥
जेव्हां बळी महाभक्तिनें देत । तेवढी भूमि सादर तयाप्रत । वामन देव गणेशा मनीं स्मरत । विराटरुप घेतसे ॥७॥
एका पाउलांत स्वर्ग व्यापिला । दुसर्‍या पाउलानें भूमिभाग व्यापिला । पृथ्वी व्यापून विचारी तयाला । तिसरे पाऊल कुठे ठेवूं ॥८॥
बलीं विस्मयाकुल भरांत । शोकाकुल झाला मानासांत । कांहीं न बोलता विचारी मनांत । काय उत्तर यास द्यावें ॥९॥
तेव्हा विष्णू क्रोधें बोधित । महासुरा जो ऋणी होत । ब्राह्मणाचा म्हणोनि क्षणांत । वामन शासन कठोर सांगे ॥१०॥
दैत्यपा तू जाई नरकांत । ऐसें विष्णूचें वचन ऐकत । बळी तेव्हां अति दुःखित । विष्णुभक्ता विष्णु शापी ॥११॥
बळी विचार करी मनांत । महा मोह माझ्या चितांत । उपजला तेणें वेद विवर्जित । कर्म ऐसें मी केले ॥१२॥
विघ्ननायका गणेशाला । यज्ञारंभीं मी  न पूजिला । त्याचा हा परिपाक झाला । विष्णू नरक दे विष्णुभक्तासी ॥१३॥
म्हणोनि त्या गणेशांते शरण । जातां करील तो संरक्षण । ऐसा विचार मनीं करुन । ध्यान करी ढुंढीचें ॥१४॥
सर्वभावसमन्वित । दैत्यश बळी गणेशा ध्यात । त्याचें भक्तीनें स्तवन करेत । स्तोत्र रचना ती सुंदर ॥१५॥
विघ्नराजासी विघकर्त्यासी । भक्तांचीं विघ्ने हरणारासी । अभक्तांच्या विनाशकासी । सर्वाकारा तुज नमन ॥१६॥
देवा गम्यागम्यस्वरुपासी । स्वानंद पतीसी हेरंबासी । ब्रह्मपतीसी गणाध्यक्षासी । सिद्धिबुद्धिपतीसी वंदन ॥१७॥
विश्वंभरा अपारासी । नाना मायेच्या आश्रयासी । मायामोह हारकासी । गणेशाला नमो नमः ॥१८॥
सर्वांतयामी चिंतामणीसी । सतत ब्रह्मभूतासी । अंती मध्यांत सर्वत्र संस्थितासी । सिंहवाहनाला नमन ॥१९॥
आदिमध्यान्तहीनाला । नमन गणाधीशा तुजला । असंख्य अपराध क्षमा करुन मला । रक्षावें नरकवासातून ॥२०॥
तुझ्या मायामोहें मोहित झालों । मत्सराभावें तुज विसरलों । तुज सोडून शरण रिघलों । विष्णूच्या मी अज्ञानानें ॥२१॥
हें सर्व जग चराचर । विघसंयुक्त सर्वत्र । शिव विष्णू आदि सर्व । तुझ्या मायेनें मोहित ॥२२॥
ढुंढे शिवविष्णू आदि देव जर । शरण तुज आले तर । मोहहीन ते निर्विघ्न अमर । अन्यथा होती भरष्टरुप ॥२३॥
पदहीन ते होत । तू सर्व देवांचा धारक असत । यांत संशय कांहीं नसत । सत्तारुप महाविघ्नें ॥२४॥
त्या विघ्नांचा स्वामी होऊन । सर्वांचा स्थापक तूं उत्तम । उथापनकारक महान । तुझ्या प्रसादें सावध झालों ॥२५॥
प्रबुद्ध झालो गजानन आतां । शरण तुज दीनानाथा । सांप्रत रक्षी मज गणाध्यक्षा सर्वथा । दयानिधे नरकापासून ॥२६॥
तुझ्या स्मरणामात्रे होत । जनां सारे सर्वार्थ प्राप्त । ऐसें नानाविध स्त्रोत्रं स्तवित । दनुजेश्वर गणेशाते ॥२७॥
तितुक्यामाजी आकाशवाणी होत । बळीराजा ऐके ती परम अद्‌भुत । दैत्येंद्रा भिऊं नको शरणागत । रक्षितों मी सर्वदा ॥२८॥
नरकाएं भय तुज नसत । माझ्या स्मरणें तूं पुनीत । तुझ्या ह्या स्तोत्रें मज भजत । तेही नरकभय मुक्त होतील ॥२९॥
वाचील तैसे ऐकवील । उभयतां नरकभय त्या नसेल । धर्म अर्थ काम मोक्ष लाभेल । स्तोत्रपाठें करुनिया ॥३०॥
माझी भक्ति दृढ होईल । त्याच्या मनांत ठसेल । जो हें स्तोत्र वाचील । ऐकवील वा अन्यांसी ॥३१॥
आकाशवाणी ऐकून । बळी झाला हृष्टमन। त्या गणपाचें ध्यान । चित्तीं करीत तिथेचि राहे ॥३२॥
त्या समयीं विघ्नदेव सोडित । विष्णुहृदयांतील वास त्वरित । तेणें विष्णूच्या मनांत । बुद्धिप्रकाश उजळला ॥३३॥
वामनावतारी विष्णु उमजत । माझ्या भक्ता मीच गांजित । अति मौर्ख्य माझें हे असत । आता काय करावें ॥३४॥
बळीनें वेदबाह्य कर्म केलें । गणाध्यक्षा न पूजिलें । म्हणोनि फळ न मिळाले । भक्तरक्षणा मी काय करु ॥३५॥
मीच शरण जातों गणेशाप्रत । तेणें सौख्य होईल प्राप्त । ऐसा विचार करुनि हृदयांत । स्मरण करी गणेशाचे ॥३६॥
स्मरण करताचि गजानन । प्रकटला त्याच्या पुढे तत्क्षण । त्याला करुनि नमन । पूजिति तेव्हा भक्तिभावें ॥३७॥
सर्व देवगण पूजिती । मुनी ही तया अर्चिती । त्यासमयीं बळी वामनाप्रती । ऐसी उक्ती बोलतसे ॥३८॥
गणेशदर्शनें जागृत । त्या महायशा बुद्धि प्राप्त । तो पार्थी वामनाप्रत । ब्राह्मणा पाय दे माझ्या शिरीं ॥३९॥
तुझें तिसरें पाऊल । टाक माझ्या शिरावर अमल । दानशूर माझा देह निर्मळ । दिला असे तुज आता ॥४०॥
विष्णू तें ऐकून तोषला । बळींच्या शिरीं पाय दिला । ब्राह्मणाच्या ऋणापासुन मुक्त केला । आपुला भक्त सत्वर ॥४१॥
नंतर मुनिदेवां सहित। कर जोडूनि गणेशा स्तवित । जनार्दन त्या सर्वसिद्धिस विनीत । भाव भक्तीनें तेव्हां ॥४२॥
वामन म्हणे गणनाथासी । सर्वांच्या पतीसी जगकर्त्यासी । नानागणविभक्तासी । विघ्नांच्या पतीसी नमन असो ॥४३॥
अर्धचंद्र भाळीं धारकासी । त्रिनेत्रधरा भक्तसंरक्षकासी । अमेय मायेनें जगरचित्यासी । विघ्नपा तुला नमस्कार ॥४४॥
तुझ्या मायेनें विमोहित । त्यांना रक्षी तूं जगांत । तुझा मायाप्रभाव ज्ञानातीत । गजानना सर्वदा ॥४५॥
आम्हांसी योगीगणासीं न ज्ञात । तरी अन्य कोण तो जाणत । अपराधाची क्षमा मागत । देवेशा मज क्षमा करी ॥४६॥
तुझे नाथा आम्ही भक्त । देवदेवा तुज नमित । हा बळी माझा परम भक्त । पक्षपाती मम जाहला ॥४७॥
माझ्या श्रेष्ठत्वाचा आग्रह धरित । झाला म्हणोनि मत्सरयुत । वेदविरुद्ध कर्म आचरित । तुला न पूजिलें यज्ञारंभी ॥४८॥
त्याचे परिणामें न मिळत । यासी यज्ञफल जगांत । मुनि देवांसह मीं प्रार्थित । दानवा या साफल्य द्या ॥४९॥
तूं विनायक नामें ख्यात । तूं जें आदरें करित । तें तें मान्यता पावत । वेदांदींत निःसंशय ॥५०॥
आम्हीं नायक संयुक्त । जेव्हां वेदबाह्य कर्म करित । तेव्हां पदभरष्ट करुनि शिक्षा देत । देवा तूंचि त्यावेळीं ॥५१॥
म्हणोनी माझ्या भक्तांसी । यज्ञफळ मिळे ऐसे करिसी । तुझी कृपा त्याच्या अपराधासी । क्षमा करण्या उचित असे ॥५२॥
ऐसें बोलून वामन । धरी गणपतीचे चरण । त्यासी वरती उठवून । गणाधीश सांगतसे ॥५३॥
काय करावें सांप्रत । तुजसी पूर्वीं माझा वर प्राप्त । तुझ्या हस्तें दैत्य जाईल नरकांत । तैसेचि आतां घडत असे ॥५४॥
क्रोध समाविष्ट तें असत । आता हा खळ मज स्मरत । कायावाचा मनें शरण येत । दैत्य, तूंही प्रार्थिसी ॥५५॥
तुझें वांछित पूर्ण करीन । आतां मज पुढें करुन । यज्ञपूर्ती करी पावन । त्यानें योग्य फळ मिळेल ॥५६॥
सर्व यज्ञांचे फळ मिळेल । इंद्र जो सांप्रत स्वर्गी असेल । तो निवृत्त होता यांस लाभेल । त्याचे पद निःसंशय ॥५७॥
तरी सांप्रत यास पाताळांत । स्थापावें जनार्दना विगतभरांत । ह्यांचे फलहीनत्व गेले असत । वामना ऐसें जाणावें ॥५८॥
गणेशाचें वचन ऐकून । सर्व झाले हषसंपन्न । वाहवा उत्तम केलेंस तू गजानन । वक्रतुंड भक्तरक्षका ॥५९॥
ऐसे बोलून गणेशासी करित । बळी प्रमुख यज्ञांत । भावभक्तीनें पूर्ण असत । कृतकृत्य बळी झाला ॥६०॥
तदनंतर गणेश अंतर्धान पावला । वामनमहात्म्य वृत्तान्त हा भला । भक्तीनें वाचील ऐकवील सकळां । दुर्लभ काही न जगांत ॥६१॥
ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्‌गले महापुराणे प्रथमे खण्डे वक्रतुंडचरिते वामनचरितनाम सप्तचत्वारिंशोऽध्यायः समाप्तः । श्रीगजाननार्पणमस्तु ॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP